Skip to main content

सुरवंट

लेखक गौत्या यांनी सोमवार, 16/05/2011 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
९.४६. अंधेरी स्टेशन. लोकलला फारशी गर्दी नव्हती. निदान माझ्यासाठी तरी. मी मोठ्या चपळाईने वाऱ्याची खिडकी पकडली होती. गाडी भरत होती. अनेक माणसे आपला अजून एक दिवस ढकलायला चालली होती. या दरम्यान असाच कोणीतरी एक तो माझ्या शेजारी बसला. मला काय करायचं? कोणी का असेना? मी आणखी सरकणार नाही हे त्याला जाणवावं म्हणून मी किंचित पसरुन बसलो. २-३ बूट पोलीशवाले, १ भिकारी, मोबाइल मोठ्याने बोलणारे महाभाग असे नमुने येत जात होतेच. माझ्या समोरच्या सीटवर एक मराठी बाणा बसला होता. “मोडेन पण अजिबात सरकणार नाही”. लायकी फर्स्ट क्लास ची असूनही परोपाकाराखातर सेकंड क्लास मध्ये आलेल्या लोकांचा मला खूप राग येतो. असो. मला काय करायचंय? मी या सगळ्या माणसांकडे दुर्लक्ष करून अनिल अवचटांचे 'माणसे' पुस्तक चघळायला सुरुवात केली. वाऱ्याची खिडकी असताना आजूबाजूला काही का चालेना? हे आणि बाकीचं सगळं बघायला आणि लिहायला अनिल अवचट आहेत ना! माझ्या बाजूच्या 'त्या'ने बूटपोलिशवाल्यावर एक बाष्कळ जोक केला. कोणी दाद दिली नाही. गाडी सुटायला आली होती. दरवाज्यात उभ्या एका महाभागाने सरकणारी पोरगी बघायला गाडी सोडली आणि गाडी सुटली. परत त्याने तडफडत गाडी पकडली. त्याची ती फरफट पाहून मला जरा हसू फुटल आणि 'त्या'नी डाव साधला. “चढा क्या?” ... “हा”... मी. “काय को ऐसा किया?”.... मी त्याला त्या पोराच्या चढण्याची पार्श्वभूमी त्रोटकपणे सांगितली आणि परत खिडकी बाहेर बघायला लागलो. माझ्या ‘वाऱ्याची खिडकी’ सुखामध्ये मला लुडबुड नको होती. पण आता ‘तो’ थांबायला तयार नव्हता. “ऐसा मेरेको जमता नाही. एक बार ऐसा किया तो वैसा जाके ऐसा बाक पे मु आ गया” अभिनय वगैरे करून त्याची ही विनोदी कहाणी मला त्याने ऐकवली. मी रेशनचं हसू आणून त्याला सहानुभूती दर्शविली. परत खिडकी बाहेर बघू लागलो. पण नाहीच! त्याने चौकशा सुरु केल्या? “क्या करता है?”. मी त्याला माझ्या कॉलेजचं नाव सांगितलं. ते त्याला माहित नव्हते. मग तर मला जास्तच राग आला. आता हां माणूस शिक्षण व्यवस्थेवर बोलायला (तेही हिंदीत) बोलायला लागला. “मेरा बेटा बी ए है, पण अभी तक नौकरी नाही मिलता” अचानक त्याच्या गाडीने रूळ बदलला. डोळ्यात पाण्याची वर्तुळ साचली. आता जाऊ दे ती खिडकी! मी त्याला मी मराठी असल्याची जाणीव करून दिली आणि त्याला कम्फर्टेबल केलं. खिडकीचा नाद पूर्णपणे सोडला, त्याच्याकडे नीट पहिलं. थोडासा टक्कल, कळाहीन रंग, चेहऱ्यावर डाग, पिचका आवाज, काडीचाही आत्मविश्वास नसलेले डोळे. एकंदरीत ठळक अस काहीच नाही. आत्ता सोडाच, पण या माणसाच्या तारुण्यात पण आकर्षक काही नसावा बहुदा. आणि मी याच्यासाठी वाऱ्याची खिडकीला न्याय देत नाहीये? पण नाही. मुलाला नोकरी नाही? पुस्तक नाही पण एखादा लेख कोणाच्या दु:खावर झाला तर काय हरकत आहे? माझ्या काही विचारण्याची त्याने वाट पण नाही पहिली. “हल्ली ग्राजुएशनला किंमत नाही राहिली आहे. किती डबल पदवीधर बेकार आहेत. शेवटी मी मुलाला एक दुकान काढून दिलय. ठीक चाललय त्याचं.” अरेच्चा! हे तर दु:ख नाहीये. पण तो थांबला नाही. “आमच्या काळी असं नव्हते. थोडसं शिकलं की नोकरी मिळायची. भरपूर वर्ष चिकटलं की पगार पण मस्त. मी आता ऑफिसर आहे. अमुक तमुक हजार पगार आहे. माझी मुलगी पण आता एका कोल सेंटर मध्ये लागली, तिला पण जवळ पास तितकाच पगार आहे.” म्हणजे आर्थिक बाजू व्यवस्थित आहे. या माणसाला प्रोब्लेम काय आहे? डोळ्यात दुखः का? “मी ६७ साली नोकरीला लागलो. सगळा पगार आई वडिलांकडे द्यायचो. खर्चाला पैसे मिळायचे. भावांना उच्चशिक्षित केलं. आता ते परदेशात असतात. मस्त कमावतात. पण काय उपयोग आम्हाला?” मला अजूनही काही थांग लागेना. घराची लोक विचारीत नाहीत, वय झाल्यावर पण काम करायला लागतंय तर तसं काही वाटत नाही. “आम्ही एवढे केलं पण आम्हाला काय उपयोग? हुशार होतो मी, शिकलो असतो तर इंजिनिअर वगैरे झालो असतो. नेहमी प्रामाणिकपणे जगलो.” खूप असच काहीतरी बोलला. गाडी थांबली. डोळे कोरडे केले आणि निघून गेला. एवढा वेळ बोलला पण मला नक्की कळेना, या माणसाला झालय काय? सगळं तर नीट वाटतय. जाताना बाय पण म्हणाला नाही. मी खिडकीबाहेर पहिले आणि तो मला जिन्यावरच्या गर्दीत मिसळताना दिसला. त्या गर्दीत लुप्त झाला. आपलं ५४ वर्षांचा आयुष्य फुकट गेल्याची खंत त्याच्या डोळ्यात साचली होती. त्याच्या बोलण्यात त्याच्या तरुणपणीच्या वागण्याबद्दल, आयुष्यभर पाळलेल्या इमानदारीबद्दल ‘आदर्श’ असा शब्द कुठेतरी आला होता. आपलं वागणं आदर्श असूनही आपल्याला त्याचं काहीच समाधान का मिळत नाही? या जाणीवेनी तो गांजला होता का? आता त्याचा इमानदारपणा, त्याची हुशारी खरी किती? हा मुद्दा गौण आहे. कदाचित त्याला कधी बेईमानी करण्याची संधी मिळाली नसेल किव्वा हिम्मत झाली नसेल. हुशारीची झाकली मुठ सव्वा लाखाची. या असल्या कारणांवरून कुणाला खोलवर दु:ख का वाटेल? काही कळत नाहीये. गाडी सुटताना स्टेशन वरच्या माणसांची नुसती एक्जीन्नसी गर्दी पहिली आणि मला त्याचं दु:ख गवसलं. त्याला जगण्याचा कंटाळा आला नव्हता कि मृत्यु समोर दिसत नव्हता. त्याचा काही पराभव झाला नव्हता कि तो हताश झाला नव्हता. त्याला टोचत होतं की आपण इतकी वर्ष ‘आदर्श’ जगलो पण ‘मिळवलं’ काहीच नाही. आपल्याला आत्ता मिळत असलेला पगार हे आपल्या कर्तुत्वामुळे मिळाला नसून खूप वर्ष काम केल्याचा आहे. आपल्या काल नोकरीला लागलेल्या मुलीला तितकाच पगार आहे. म्हणजे पैसा मिळवला असा म्हणावे तर कालौघात त्याचीही किंमत बदलतेच आहे. मुलाचा व्यवसाय, भावांचे परदेशगमन यात आपली कमाई काहीच नाही. मग आपण केलं काय? नुसतं जिवंत राहून रोजचा दिवस निर्मितीशुन्य घालवायचं त्याला वैषम्य वाटत होतं. जर काहीच निर्मिती केली नाही, आपला मार्ग शोधला नाही, आपला आनंद शोधला नाही तर माणूस का व्हायचं? उद्या तो मला दिसला तर मी त्याला ओळखणारही नाही. कसा ओळखणार? अनेकांसाराखाच तोही एक. पंख फुटण्याची वाट पाहून ते फुटत नाहीत म्हणून नुसताच सरपटणारा एक सुरवंट!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2865
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

>>पंख फुटण्याची वाट पाहून ते फुटत नाहीत म्हणून नुसताच सरपटणारा एक सुरवंट! हम्म्म्म्म! मुक्तक वाचून अंतर्मुख झालो. चाकोरीतून पळता पळता माझापण सुरवंट होत नाहीये ना असा प्रश्न पडला. :-)

मस्त रे एकदम आवडलं, पंख सगळ्यांनाच फुटतात, होतं काय आपण आपले पंख बघु शकत नाही आणि दुस-याचे पंख पाहुन मन मारुन घेतो, अशा लोकांनी सकाळी सकाळी ' एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख ' ऐकलं पाहिजे.

टोपी काढली आहे.

सुंदर :) अमोल केळकर

मस्त लिहिले आहे. अतिशय आवडले.

अप्रतिम लिहिले आहे... "चेहरा नसलेली माणसे अचानक जेंव्हा आपल्याला आयुष्याचा मुखवटा उतरावयाला लावतात, तेंव्हा विचारांच्या गर्दीत आपण ही त्या माणसांच्या मागे आपलाच चेहरा शोधत राहतो" - गणेशा

छान लिहलेय मुक्तक, 'अवचट वाचकाचे' निरिक्षण समजायचे का ?