लिहिण्यास कारण की -
तहानभूक विसरून , नित्याची कामं बाजूला ठेवून , किंवा हातातली कामं करत करत दूरदर्शन संचापुढे ठिय्या मांडून बसणारे किंवा येता जाता न चुकता दूरदर्शन संचाकडे नजर टाकणाऱ्याचे अभिनंदन करण्याची आवश्यकता नाही ! कारण सदैव ही माणसे चिंतातुर चेहऱ्याने वावरत असतात.त्याच त्याच बातम्या २४ तास ऐकून जगाचे काय आणि कसे होणार याची काळजी त्यांना पडलेली असते! मालिकेतील पात्राच्या दु:खात दूरदर्शन पुढची माणसे समरस होतात, पण त्यांना घरातील पात्रांच्या सुखदु:खात काडीइतका रस घ्यावा वाटत नाही! हातात असलेली कामं निपटून दूरदर्शन संचातील ' पाक-क्रीडा ' पहावयास काय हरकत आहे? जेवणाचे ताट पुढयात घेऊन, हातातला घास गालात-नाकात-तोंडात व्यवस्थित जातोय का ?- याची फिकीर न करता ' कसलाही ' कार्यक्रम हस्त-यंत्राद्वारे चाचपणी करत, बदलत पहाणाऱ्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच! निदान येता जाता तरी 'दूरदर्शन संचावरील एकही कार्यक्रम " आज नजर टाकूनही पाहिला नाही, याची मनाला सतत टोचणी लागून राहिलेले 'आता ऑफिसात तोंड कसे दाखवावे ? ' या चिंतेने काळजीग्रस्त झालेले दिसतात !
ज्यांना बातम्या ऐकायच्या नाहीत , ज्यांना मालिका पहायच्या नाहीत, ज्यांना दूरदर्शन वरील स्पर्धा पहायच्या नाहीत आणि ज्यांना दूरदर्शनमधे काडीमात्रहि स्वारस्य नाही - अशी माणसे ' सुखी 'असणार यात शंकाच नाही ! सुखी माणसांना मन गुंतवायला इतर असंख्य उद्योग आहेत. बातम्या नाही ऐकल्या/पाहिल्या तर आकाश कोसळणार नाही ! मालिकांच्या पात्रांत गुंतून पडलो तर त्यांच्या बापजाद्यांची इस्टेट आपली थोडीच होणार आहे ? नाही गुंतलो तरी आपण नरकात थोडेच जाणार आहोत ! ' एस एम एस ' वरच १०१ टक्के अवलंबून असणाऱ्या स्पर्धात भाग नाही घेतला , मरणोत्तर तर आपल्या पिंडाला कावळा शिवायचा थोडाच राहणार आहे - अशा निर्गुण ,निराकार, स्वस्थ , स्थितप्रज्ञ ,उदास ,भकास वृत्तीने जगणारी माणसे खरीच सुखी नाहीत काय ? दूरदर्शनवर दिसणारे जगातील असंख्य घोटाळे , अगणित भानगडी-लफडी , अतुलनीय भ्रष्टाचार , अवर्णनीय "आदर्श ", अनंत लाचखोर -असल्या फालतू गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी आपण बरे नि आपले काम (- न केलेले ) बरे !
लिहिण्यास कारण की ,
मी चुकून 'जाला'समोर न बसता , दूरदर्शन संचासमोर समोर बसलो (-आणि तिथेच फसलो !). कुठली तरी टुकार ( - पण घरातल्या तमाम महिला वर्गमतानुसार निदान १०००० तरी भाग पूर्ण करणारी ?)मालिका चालू -- एका पात्राने एक शब्द उच्चारण्याचा अवकाश की, पार्श्वसंगीत म्हणून ताट-वाट्या -पातेली -चमचे -डाव वगैरे एकसमयावच्छेदेकरून दणादण कानावर आदळल्याचा आवाज येई ! संगीतकार जाउ द्या (-त्याला काही कळत नसेल !) ; पण मालिकेतील पात्रे, दिग्दर्शक ,इतर सहकारी (-निदान स्पॉट बॉईज तरी ?) यांच्या क्डून तरी पार्श्वसंगीत कानाला सुसह्य वाटते /जाणवते का नाही, हे जाणून घेण्याची तसदीही कुणी घेतली नाही , याचे 'प्रचंड' आश्चर्य वाटते! हा एक भाग झाला ; तदनंतरचे 'महा'आश्चर्य म्हणजे एका पात्राने दुसऱ्या पात्राकडे नजर टाकली की , राहिलेल्या ८/९ पैकी 'प्रत्येक ' पात्राची प्रतिक्रिया /प्रतिसाद जाणून घेण्यासाठी - त्याच्या चेहऱ्यावर काहीकाळ क्यामेरा स्थिर !! मला सांगा , अशा रीतीने कासवापेक्षाही संथ गतीने मालिका चालू राहिली तर १०००० नव्हे तर १०००००० भाग नाही झाले तरच .... ?
धन्य धन्य हो - मालिका निर्मात्याची , दिग्दर्शकाची , संगीतकाराची , (आवडत नसली तरी, पोटासाठी -) काम करणारे कलाकार आणि त्या " मूर्ख-खोक्या " पुढे ठिय्या मांडणा-या - सर्वांची !
वाचने
1866
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
मालिका भिकार, बातम्या त्याच त्याच म्हणून टीव्ही भिकार हे गणित पटले नाही.
डिस्कव्हरी, हिस्टरी, अॅनिमल प्लॅनेट या वाहिन्यांवर डोकावून पहा. एनडीटीव्ही ल्युमिअर मुव्हीज चॅनेलवरचे नॉन अमेरिकन उत्कृष्ट सिनेमे पहा. टीव्ही ५ माँडे या फ्रेंच वाहिनीवरचा दर शनिवारी संध्याकाळी होणारा नेत्रदीपक मनोरंजन कार्यक्रम पहा , कदाचित तुमचे मत बदलेल.
In reply to ??? by तिमा
डिस्कव्हरी, हिस्टरी, अॅनिमल प्लॅनेट या वाहिन्यांवर डोकावून पहा........कदाचित तुमचे मत बदलेल.सहमत आहे. NGC, Cartoon Network राहीले.
टेलिव्हिजनला इतके रागे भरू नका राव, बर्याच उत्तम मालिका आम्ही पहायचो.. जसे की- ह्मसफर, सर्कस, दामिनी, धनंजय, मुगेंरिलाल इ.इ.
आणि आज कालच्या पण सगळ्याच मालिका वाईट नाहीत, शेवटी तुम्ही काय पाह्ता ते महत्वाचे. आता आंतरजालावर सुद्धा पोर्नोग्राफीक साईटस आहेत, त्या बघायचे तुम्ही टाळताच ना (का नाही!), असो तसेच टिव्हीचे पण आहे.
मालिकांचे संगीत एवढे मोठे असण्याचे कारण म्हणजे त्यांचा प्रमुख प्रेक्षक महिला वर्ग घरातील कामे करता करता ह्या मालिका पाहत असतात. त्यामुळे मोठे पार्श्वसंगीत आले कि त्यांना जाणीव होते कि काहीतरी महत्वाचा प्रसंग चालू आहे व त्या हातातील काम सोडून TV कडे धाव घेतात.
???