एका व्यथित सॉफ्टवेअर इंजिनियरचे मनोगत!
शैशव, बाल्य, पौगंड, तारूण्य, गृहस्थ अन वार्धक्य अशा षटजीवनावस्थांमध्ये कैचर्य (असा शब्द कदाचित मराठीत सापडतो) किंवा कचेरीगिरी (साध्या भाषेत ऑफिसमनशिप) अंतर्भूत करावी असे माझ्यासारख्या नोकरमाणसाला वाटते. नवतारूण्याअंती, गृहस्थांगी अन वार्धक्यापूर्वी आपण आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा कालखंड खेचर म्हणून एका मळ्यात ओझं वाहत सोसतो. हे मळं म्हणजे ऑफिस होय.
इंग्रज जाता जाता भारताला हा नोकरपणा आंदण देऊन गेले. तारुण्यसुलभ "जग जिंकायची इच्छा" ही उपजतच सगळ्यांत असते. बिल गेट्स, टाटा, बिर्ला किंवा सचिन, धोनी, सानिया अथवा अमिताभ, शाहरूख किंवा ऎश्वर्या असं काहीतरी व्हावं असं आपण ठरवलेलं असतं (असा विचार करायला कुणाचा पैसा जातो?) अन त्याच गुर्मीत कॉलेजाचा शेवटचा वर्षाचा निकाल लागतो. तेव्हाच आपल्या इच्छाकांक्षांचाही कायमचा निकाल लागून गेलेला असतो. सेकण्ड क्लास किंवा खरे इंजिनियर असाल तर केटी असं युनिव्हर्सिटीचं लव्ह लेटर घेऊन आपण जग जिंकायला निघतो आणि सुरूवातीच्या काही दिवसांच्या लुटुपुटू नोकरीशोधन लढाईत धारातीर्थी पडतो. मनातल्या टाटा-बिर्लाला टाटा करायची वेळ येते. इण्टरह्व्यू देऊन देऊन आपले रेज्युमी चणेवाल्याकडे पोहोचलेले असतात. चणे खाल्यावर तेच रेज्युमी फुकटात वाचत कुणीतरी आपली कीव करत त्यांना गटारात टाकतो. असे रेज्युमी मग नाल्यातले उंदीरही तोंडी लावत नाहीत. मग अशा कित्येक न खाल्यागेलेल्या आय.टी. रेज्युमींचं कोंडाळं होतं आणि नाला चोंदून पावसाळ्यात पूर येतो! अहो खरं सांगतोय. "२६ जुलैची १०१ कारणं" ह्या माझ्या अप्रदर्शित पुस्तकाची शप्पथ!
तर अशा स्ट्रगलर परिस्थितीत आपल्याला एके दिवशी एका इंडीयन मल्टीनॅशनल आय टी (हा एक फसवा प्रकार आहे... स्वदेशी आणि विदेशी दोन्ही एकच कसं असू शकेल) कंपनीत नोकरी मिळते. इथेच जीवनाची सगळी गम्मत संपलेली असते. "आय.टी. कंपनीत आहे आमचा विनू", आई बाबा कौतुकाने सगळ्यांना सांगत असतात. आपण मात्र, "भला उसकी सॅलरी मेरी सॅलरीसे ज्यादा कैसे?" किंवा "उसका प्रोजेक्ट डेव्हेलपमेण्ट और मेरा मेन्टेनन्स कैसे?" अशा मत्सरग्रस्त वातावरणात कंपनीचा एक दोन वर्षांचा बॉण्ड साईन करत असतो. आपलं फ्रेशर असं नामःकरण होतं. ही डेजिग्नेशन वास्तविक 'प्रेशर' अशी असते.
कंपनीत जॉईन झाल्यावर मग आपल्याला एसीतलं क्युबिकल, फास्ट पीसी, १ जिबीपीएस इंटरनेट, स्वतःचा फोन, आरामदायक खुर्ची, चहा, कॉफी, कोल्डड्रिंक वेंडींग मधिन्स, कॉल कनेक्ट डिसकनेक्ट करणारी मधाळ आवाज असलेली, सुंदर युवा नसली तरी सुबक मध्यमवयीन रिसेप्शनिस्ट अन शनिवारची सुट़्टी हे सगळं मिळतं अन आपण मोमेण्टरीली सद़्गदीत होऊन जातो. एवढ्या ऎषोआरामाची आपल्या याधी घरी किंवा कॉलेजात अजिबात सवय नसते. सुरूवातीला सगळं कसंसंच वाटतं. हे सगळं जमायला कित्येक आठवडे जाऊ द्यावे लागतात.
ह्या वैकुण्ठसृष्टीत मग एके दिवशी कानामागनं सॅलरी येते अन तिखट होऊन जाते. कागदावर दाखवलेले अंक एकदम तीन चार हजारांनी कमी झालेले दिसतात. फसल्याची जाणीव ह्यायला लागते. पण अक्च्युअली आपण जेव्हा इंजिनियरींग जॉइन करतो ना तेव्हाच खरे फसलेलो असतो. पण असायनमेण्ट लिहिताना व मागल्या सेमिस्टरच्या केट्या सोडवताना हे विचार करायचा वेळच मिळाला नसतो. ह्या पहिल्या सॅलरीच्या दिवशी टॅक्सेशनचं सेमिनार असतं. आपल्या सारखेच इतरही काही फसलेले इंजिनियर जमतात अन झालेल्या अन्यायाची दाद मागतात. कंपनीच्या फायनान्स डिपार्टमेण्टची हेड आपल्याला सफाईदार उत्तर देत फसवत असते. त्यात गव्हर्नमेण्ट पॉलिसिज असतात, फायनॅन्स मिनिस्टरची भाषणं असतात, स्पेशल टॅक्सेशन फॅक्ट्स असतात. हे सारं अर्थकारण, १ आणि ० च्या जगात शिकलेल्या सॉफ्टवेयर इंजिनियर्सच्या डोक्यावरून जात असतं. गमतीचा भाग असा की आपल्यालही "ती आपल्याला फसवतेय!" हे माहित असतं पण वेफर वड्याचा स्नॅक खात आपण ती जे सांगतेय ते स्वतःला हतबलतेनं पटवत असतो.
अशाच सेमिनार मधून बाहेर पडल्यावर "मग कसा होता सेमिनार?" विचारणाऱ्या शरद बनसोडेला मी "वड्यात मीठ जास्त होतं" अशी टिप्पणी दिलेली मला आठवतेय.
मग हे दुष्टचक्र रूटीन होतं. सकाळचा घडाळ्याचा गजर हा प्रोजेक्ट मॅनेजरच्या आवाजासारखा भासू लागतो. तसा वाटू नये म्हणून मी मध्यंतरी मॅडोनाच्या आवाजात गरजणारं चिनी घड्याळ आणलं होतं. पण त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर (ह्या श्वापदाला पीएम असे बटूनाम असते) मला मेडोनाच्या आवाजात "आय एम गोन्ना डाय अनदर डे!" च्या चालीत ओरडत असल्याचे स्वप्न पडलं होतं. दुसऱ्या दिवशी मी पीएमला मेडोना समजून किस्स केल्याचं अन तिसऱ्या दिवशी पीएमने माझ्यावर विनयभंगाचा आरोप करून नोकरीतून माझी हकालपट़्टी केल्याची नाइटमेअर्स मला पडू लागली होती. ते घड्याळ मी ई-बे.कॉम वर चांगलं ५०० रूपयात विकलं अन सध्या "ट्रींग! ट्रींग!" वालं ५० रूपयाचं घड्याळ वापरतोय. त्यात निदान मला नोकरी सुटल्याची किंवा पीएम बरोबरची किसिंग सीन्स असलेली भयानक स्वप्न तरी पडत नाहीत!
खिशात थोडा पैसा खेळू लागला की मग काही सॉफ्टवेअर इंजिनियर्स फोर-व्हिलर विकत घेतात. हे मला मूर्खपणाचे वाटते. सोन्यासारखे तिजोरीत बंद करता येण्याजोगे पेट्रोल हवेत उडवून, एमएम-आरडीए अधिकृत खड्ड्यांतून रस्ते शोधत ट्रॅफिकमधे पुढच्या मंद चालणाऱ्या श्कोडातील ड्रायव्हरला शिव्या हासडत आपण ऑफिसला पोहोचतो तेव्हा सकाळच्या प्रहराचा नाजूक अरूणोदय हा ग्रीष्मातला अग्निकोप वाटू लागलेला असतो. त्याच श्कोडातून उतरणारा शरद बनसोडे, "आजच घेतली!" असं सांगत आपल्या दिवसाची छान (!) सुरूवात करतो. रस्त्यांशिवाय गाडीचा मेण्टेनन्स आणि हप्ता भरणारे इतरही महाभाग असतातच. त्यांना पाहून मग मला जास्तच राग येतो. ह्या सगळ्यांचे प्रोजेक्ट त्यांच्या कंपनीतर्फे पीसीएमएम-आय आणि आयएसो-२००२ क्वालिटी असेसमेण्ट साठी निवडले जावोत हाच माझा त्यांना शाप आहे. आता माझ्या कारलोनचा हप्ता वाढल्याने आणि नो पार्किंगला लावलेली माझी सॅन्ट्रो आर.टि.ओ वाले घेऊन गेल्याने माझे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे! हे तुम्ही माझ्या वरच्या विचारांत ताडले असेलच.
"आपण ऑफिसला नेहेमी वेळेवर पोहोचतो", असे म्हणाणारा कुणीही हा तद्दन खोटारडा आहे असे मी समजतो. त्याला खरोखरच ऑफिसात वेळेवर यायची शिक्षा मिळायला हवी. "मी कधीच ऑफिसात वेळेवर येत नाही", "बॉस नेहेमी माझ्या आधी येतो", "शरद बनसोडे माझ्या नंतर पण पीएमच्या आधी येतो" हे काळ-काम ह्याचं आयुष्याचं नेहेमीचं चुकलेलं गणित!
आधीच्या काळी वेळेवर न येणाऱ्यांवर बॉसेस तणतणायचे. पण आता ते हसतात. हे एक दुष्ट हासू असते. त्याची कॉन्स्पिरसी आपल्याला अप्रेजल मध्ये दिसते जेव्हा "ए" चा अतिसामान्य शिक्का आपल्यावर बसलेला असतो अन शेजारच्या क्युबिकल मधला शरद बिनसोडे "ट्रिपल ए" चा सर्वोत्तम शेरा घेऊन ट्रीट देत असतो. अस्सं जळायला होतं सांगू! जळत जळत त्यावर उतारा म्हणून आपण त्याच शरद बनसोड्याच्या पार्टीत बिन-सोड्याची व्होडका पीत असतो.
मग आउटलूक वर इमेल चेक करा. इकडेही सुटका नसते. आपला अ-आंग्ल (बहुदा जपानी) पण थोडी थोडकी इंग्रजी जाणणारा क्लायण्ट आपल्याला शेकडो फॉल्ट्सचे इमेल पाठवतो. त्याच्या लिखाणात त्याच्या बोलीभाषेचा (बहुदा जपानीच) अन इंग्रजीचा असा आंतरजातिय विवाह लावलेला असतो की त्यातली मंगलाष्टकं कळणे दुर्लभ होऊन जाते. हा इंटरनॅशनल इंग्रजीतला ईमेल जर मी माझ्या शाळेतल्या इंग्रजीच्या कर्वे बाईंना दाखवला तर त्या घेरी येऊन पडतील.
हे क्लायण्ट बाकी काहीही येत नसले तरी दमदाटी करण्यात उस्ताद असतात. त्यांची दादागिरी पाहून आपली बायको क्लायण्टची राईट हॅण्ड म्हणून तर काम करत नसावी अशी संशय येणे रास्त असते. क्लायण्टच्या सोबतीस त्याचा हेंचमन पीएम. त्याने नुकतीच आपल्या समोर शरद बनसोडेला पाठीवर कौतुकाची थाप दिलेली असते अन आपल्या क्युबिकलकडे येऊन तो असहायतेचा एक उसासा टाकतो आणि "होपलेस्स" असं सरळ सरळ न म्हणता "कॅरी ऑन!" असा गर्भित इशारावजा संदेश देऊन जातो.
लंच टाईम हा क्लायण्ट, पीएम अन शरद बिनसोडे ह्या त्रिकूटांपासून सुटका करून घ्यायची एकमेव वेळ. मी घरून डबा आणतो. पण ज्या सॉफ्टवेयर इंजिनियर्सना डबा आणणे जमत नाही ते कंपनीच्या लंच कुपननी तिकडचे जेवण जेवत असतात. हे जेवण परिचित असतं. कच्च्या भातासोबत पाणीवरण (म्हणजे प्यायला पाणी आणि वरण वेगळे कशाला?), वांग्याच्या भाजीचा चिखल, मटर पनीर मधला पनीर गायब, गहू आणि रबर ह्यांच्या नव्या कलमातल्या धान्याच्या पिठाची चपाती. हा मेनु कमीअधिक फरकाने सापडतो. असं सक्तमजुरीचं जेवण जेवणारे पुअर थिंग्ज पाहिले की नुसतं भडभडून येतं.
मग जेवण जेवल्यावर आलेल्या सुस्तीला "धिस इज अर्जण्ट" म्हणणाऱ्या पीएमची "फिक्स इट इन ५ मिनिट्स" अशी पुस्तीही असते. गेल्या आठवड्यात डिलिव्हर केलेल्या कामातले बग्स क्लायण्टने पाठवलेले असतात. ह्या बुद्धू क्लायण्टला हा एवढा आतला फॉल्ट कसा सापडला? असा विचार करत आपण ते फिक्स करू लागतो अन मग फिक्स करता करता नाकी नऊ आले की हा क्लायण्ट म्हणजे आपलीच बायको असल्याची शंका पूर्ण खात्रीत बदलते. मग साहाजिकच फॉल्ट्स वेळेत फिक्स होत नाहीत अन दुसऱ्या दिवशी क्लायण्टचा इमेलचा धागा वाढतो. ते ईमेलचं ठिगळ शिव्यांनी साचलेलं असतं. ह्या खेपेस पीएम आपल्या क्युबिकलशी येऊन सरळसरळ आपल्याला "होपलेस्स" म्हणालेला असतो. वाकून कोंबडा करायचं अन शंभर उठाबश्या काढायचं तेवढं त्याने बाकी ठेवलेलं असतं.
अशा प्रकारे क्लायण्ट आणि पीएमकडून आपल्या कामाचा यथोचित परामर्ष मिळाल्यावर तो जुना "जग जिंकायचा आत्मविश्वास" कालबाह्य (कॉम्प्युटरच्या भाषेत आर्काइव्ह) झालेला असतो, काम करायची उमेद नामशेष (शीफ्ट डीलीट) झालेली असते. अन जगायचा हेतू गायब (सर्च करूनही फाईल सापडत नाही तेव्हा नाऊमेदीने आपण रिसायकल बिन मध्ये शोधतो ना तसंलच) झालेला असतो. दुपारचा चहा गोड लागत नाही. कारण शरद बनसोडेला ऑनसाईट पेरोलवर ट्रांस्फर आणि प्रमोशन मिळालेलं असतं. आपल्याला त्या कपभर कडू चहात बुडून ठेवायचं काय ते फक्त नियतीने शिल्लक ठेवलेलं असतं.
संध्याकाळी पुन्हा आपण तीच बिनसोड्याच्या रम-पानासोबत 'गम'पान करत असतो. शरदाचं चांदणं (स्टार्स हो!) लकी आहेत म्हणायचे. सगळं ग्रह आणि चांदण्यांवर वर ढकलून आपण स्वतःचा उरलासुरला सेल्फ एस्टीम सावरायचा प्रयत्न करत असतो. जेव्हा दहा बारा पेग होतात तेव्हा तेथेही पराजय झालेला साफ दिसत असतो. डुलतपडत घरी परतताना आपल्याला कोणी एक भिकारी दिसतो. अन भिकाऱ्याच्या तुलनेत आपण चांगले असल्याचे आपण स्वतःला भासवतो. तसं दारूच्या नशेत आपल्याला आपण शाहरूख खान असल्याचंही भासवता येतं. त्यामुळे तेवढं जमतं. पण तोच तो भिकारी एका कचरापेटीकडे एका गाढवाला पिटाळीत असल्याचं दिसतं. कचऱ्याकडचा कुत्रा गाढवावर भुंकत असतो. भिकर्याने पाळलेला असेल. अचानक आपल्याला गाढवाच्या जागी आपण, कुत्र्याच्या जागी बनसोड्या अन भिकाऱ्याच्या जागी पीएम दिसू लागतो. गाढवाचे समदुःखी व्हायचा भास होतो अन मन गदगदीत होतं.
घरी पोहोचल्यावर आपण दुःखसागरात बुडतो अन पलंगावर पसरतो. सकाळच्या गजरात पुन्हा पीएम ऎकू येऊ लागतो. आपण अर्धवट झोपेत उठतो अन समोरचं कॅलेण्डर शनिवार दाखवतं. आपल्या झोपेतल्या आनंदाला पारावार राहत नाही. आपण पुन्हा लवंडतो अन बाजूच्या ऊशीला आनंदात कवेत घेतो. पण तोच "सोमवारी बघून घेईन!" असं कुणीतरी आपल्या कानात पुटपुटतं. कवेत ऊशी नसते. पीएम असतो. आपण हडबडून उठतो. डोळे चोळून ऊशी चाचपून पाहतो. एक नजर पलंगाखालीही जाते. पीएम आसपास कुठेच नसतो.
छातीतली धडधड कानांना ऐकू येत असते...
तेव्हा आपल्या शनिवारच्या साखरझोपेचं आपल्या प्रोफेशनल आयुष्यासारखं खोबरं झालेलं आपल्याला जाणवतं.....
- एक व्यथित सॉफ्टवेअर इंजिनियर
- विनीत संखे
प्रतिक्रिया
लै भारी
खुसखुशीत
खपलो!!!!
सही ... मस्त लिहिलय ...=))
हाहाहा.. कशाला बनसोड्याच्या
मस्त!
खरेच लई भारी
लई भारी
छान लिहिल आहे. धम्माल !!
विषय तसा चांगला आहे .. आणि
आजकल बनसोड्या झालोय.
चोराच्या उलट्या बोंबा
लेख आवडला
स्पावड्या
लेख आवडेश रे विनीत. मस्त
बाडीस
प्रत्येक व्यवसायात हा शरद
नाही आवडला लेख
आपण शरद बनसोडे तर नव्हे
हा हा हा ... खपलो!
हा हा हा हा... सही.. सगळ कसं
संखेबुवा, मस्तच लिवलंय -
विनित मस्त लिहिलं आहेस, बाकी
चान चान! - (आयटी मधली पोरगी
हा लेख चांगला आहे , पण...
माताय!
हल्ली प्रत्येक छोट्या मोठ्या प्रॉब्लेमचा बदाबदा इश्यू करणे ...
मुळात क्लाऊड याच कारणासाठी
क्लाऊड यायच्या आधी
क्लाउड मध्ये वेगळे ते काय ?
विनितभौ, लेख छान आहे.
अरेच्या
ओके
हा हा हा
रडा तुम्ही