भोचक, खोचक आणि वेचक
आयुष्यात अनेक प्रकारचे मनुष्यस्वभावाचे नमुने आपल्याला रोजच भेटत असतात. हसवणारे,फ़सवणारे, चिडवणारे,रडवणारे... एक ना दोन. अनेक प्रकार. पण या सार्यात भोचक माणसांची एक वेगळीच गंमत असते. त्यांचा रागही येतो, अन कधीकधी हसूही येतं. भोचक म्हटल्यावर मला खूप वर्षांपूर्वीचा एक मजेशीर प्रसंग आठवला.
सकाळची वेळ होती. आम्हा बहिणींची कॉलेजला जायची घाई सुरू होती. बाबा सुद्धा कोर्टात निघायच्या तयारीत होते. तोच गावाकडचा एक वृद्ध माणूस आपली केस घेऊन आला. वयाने बराच असावा. बाबांनी आईला चहा पाठवायला सांगितले. बाबांच्या ऑफ़िसच्या दारातून त्याला घरातले थोडेफ़ार दिसत होते.
जरा सावरून बसत, त्याने प्रश्न केला,
'सार्या लेकीच का जी वकीलसायेब? पोरगा न्हाई तुमाला?'
'नाही.' बाबांचे डोळे त्याच्या कागदपत्रांमधे.
'जरा बोलू का जी?' खाजगी आवाजात विचारून, तो बाबांच्या फ़िरत्या खुर्चीजवळ सरकला.
'अजून एक लगीन करून टाका. व्हईल पोरगं....'
आईने आतमधे गाळणी खाड खाड वाजवून आपला राग व्यक्त केला. आम्ही मुली खुसुखुसु हसायला लागलो.
हसू न आवरल्याने बाबाही काही तरी निमित्त काढून आत आले.
'जा घेऊन हा चहा तुम्हीच...' आई वैतागली.
'अग, आता कोणी सांगितल्याने मी या वयात दुसरं लग्न करणार आहे का? तू तरी कमालच करतेस.'
आमच्या सार्यांच्या हास्याचा एकत्रित स्फ़ोट झाला.
आता बाबांना मुलगा आहे की नाही, यात पडायची त्या माणसाला काहीच गरज नव्हती. त्यातून दुसर्या लग्नाचा भोचक सल्ला देऊनही तो मोकळा झाला.
तर असे हे भोचक लोक. सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात अन त्यावर फ़ुकट सल्ले दिलेच पाहिजेत हा त्यांचा आग्रह.
अशीच एक आणखी व्यक्ती. माझे बाबा खूप आजारी असताना मी मुलांना घेऊन काही काळ भारतात गेले होते. तेव्हा या व्यक्तीला जेवायला बोलावले होते. पहिला घास घेतला, अन या नमुन्याचा प्रश्न.
'आता तुम्ही मुली सासरी गेलात. बाबाही आजारी असल्याने वकिली बंदच. मग आईबाबांचा चरितार्थ कसा चालतो?'
'वकिली बंद असली तरी त्यांच्या इतक्या वर्षांच्या गुंतवणुकी, बचत वगैरे नाही का? '
मी रागावर कसाबसा संयम ठेवीत उत्तर दिले.
'पण तेवढ्याने होतं त्यांचं?' पुन्हा चोंबडा प्रतिप्रश्न.
(जणू काही मी नाही म्हटले तर ती व्यक्ती 'मी या महिन्यापासून मनीऑर्डर पाठवीत जाईन' असेच म्हणणार होती.)
आईने मला 'दुर्लक्ष कर' असे डोळ्यांनीच दटावून सांगितले म्हणून बरे झाले.
तर असे हे मनुष्यप्राणी.
माझी बहीण मेरिटमधे आली तेव्हाही 'मुलींना काय करायचंय शिकवून? शेवटी चुलीतच आयुष्य जायचं. त्यापेक्षा लग्न करून टाका लवकर.'
असा भोचक शेरा एका नात्यातल्या बाईंनी मारला होता.(अशा लोकांना नात्यातले म्हणणे ही देखील शिक्षाच. नाही का?)
भोचकसारखेच त्रासदायक, किंबहुना अधिकच तापदायक लोक म्हणजे खोचक. सार्या जगाशी यांचे भांडण असल्यासारखे, जणूकाही सर्व लोकांवर सूड उगवायचा असल्याप्रमाणे हे लोक सतत खवचटच बोलत असतात. खरेतर ही कोण्या एका गावाची मक्तेदारी मुळीच नव्हे. या प्रकारचे लोक भूतलावर सगळीकडे सापडतील अशी माझी खात्री आहे.
खोचक लोक हे भोचकपेक्षाही वाईट असे माझे मत आहे. भोचक लोक हे कधीकधी निरागसपणे प्रश्न विचारून जातात. त्यांच्या डोक्यात दुसर्याला दुखावण्याचा हेतू असेलच असे नाही. पण खोचक लोकांचा हेतूच मुळी लोकांच्या मनाला त्रास देणे हा असतो. खवचट हे या लोकांचे दुसरे नामाभिधान.दुसर्याला बारीक चिमटे काढणारे शब्द वापरणे यात या प्रकारच्या लोकांना कसला आनंद मिळतो तेच जाणे.
आमच्या बाजूला रहाणार्या एका काकूंना आमच्या घरात कुठलीही नवी वस्तू आली की 'सेलमधे घेतली वाटतं?' असे विचारायची वाईट्ट खोड होती. अन हा प्रश्न विचारताना त्यांच्या चेहर्यावर इतका आढ्यतेचा भाव असे की मला त्यांच्याची बोलावसेही वाटत नसे.
खोचकपणाचा एक विलक्षण नमुना मी लहानपणी बघितलेला आहे.
नागपूरला असताना आम्ही आईबाबांबरोबर एकदा बाजारात गेलो होतो. तिथे आम्हाला एक मामा नावाचे गृहस्थ भेटले. हे मामा बोलायला अतिशय भोचक, खोचक सारेकाही. या कीर्तीमुळे त्यांच्याशी कोणी विशेष बोलतही नसे. बाबा जवळच दुकानात गेलेले. आई आम्हाला घेऊन उभी होती. तेवढ्यात मामांचे आगमन झाले. वय सत्तरीच्या पुढे, हातात काठी अन तोंडात तंबाखूचा तोबरा.
'काय, सार्या मुलीच वाटतं?' मामांचा भोचक प्रश्न.
आईने नुसतेच स्मित केले.
'काही कामाच्या नाहीत म्हणजे. विकून टाका चार पैशात...'
कमालीच्या खवचट आवाजात मामा म्हणाले.
हे अत्यंत मूर्खपणाचे उद्गार काढायची मामांना मुळीच गरज नव्हती. पण मामाच ते. मी लहान असल्याने मला या संवादाचा अर्थ कळण्याचे माझे वय नव्हतेच. पण आईचा लाल झालेला चेहरा अन त्यावर तिने शांतपणे विचारलेला प्रश्न अजूनही आठवतो,
'मामा, तुमची आई केवढ्याला विकली होती हो?'
यानंतर आईबाबा दिसले तरी मामा रस्ता बदलत असे.
-समाप्त
याद्या
6086
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
क्लास...
हेच म्हनते खोचक लोक म्हनजे
In reply to क्लास... by प्रदीप
भोचक प्रतिक्रीया
In reply to हेच म्हनते खोचक लोक म्हनजे by पियुशा
'मामा, तुमची आई केवढ्याला
असतात काही नमुने.. लिहायची
मस्तच लेखन तुमच्या आईचा
साष्टांगच. मस्त लेख. आणिक ते
काय पण लोकांना उत्साह असतो
>>यामध्ये मुलीला (त्यांच्या
In reply to काय पण लोकांना उत्साह असतो by रेवती
करं ठरलं की
In reply to काय पण लोकांना उत्साह असतो by रेवती
छान
सहमत, पण...
In reply to छान by सुनील
पर्याय
In reply to सहमत, पण... by पंगा
स्पष्टीकरण / थोडा वेगळा विचार
In reply to पर्याय by सुनील
पुर्वी कुठेतरी वाचल्या सारखं
छान लेख. तुमच्या आईने दिलेले
मस्त!!!!
-
हमम्म्म्म, अशा लोकांना तोंड
अनुभवाचे बोल म्हणायचे का हे?
In reply to हमम्म्म्म, अशा लोकांना तोंड by मराठमोळा
खूप पाहिली आहेत अशी लोकं
अच्छा .. तरीच ते अजुबा आता
In reply to खूप पाहिली आहेत अशी लोकं by प्राजु
लेखन आवडले लिहित रहा .. वाचत
>>'काही कामाच्या नाहीत
आईचा प्रतिप्रश्न
चांगला लेख.
पहिल्यांदा लेख वाचला तेह्वा
In reply to चांगला लेख. by ज्ञानेश...
मस्त हाणला! लेखन आवडले.
@खोचक लोक हे भोचकपेक्षाही