सडकें थी सब मेरे बाप की..
आवारा थी रात और सडकें थी सब मेरे बाप की..
एवढी एक ओळ "दिल्ली" गाण्यात ऐकली आणि दिल्लीऐवजी पुणेच दिसायला लागलं.
पुणे एअरपोर्टवर नोकरी. सकाळी सहा ते रात्री आठ. रविवारीसुद्धा सुट्टी नाही. आणि तरीही पुण्याची हवा अशी तुफान जवान की यंव रे यंव. थकवा नावाची गोष्टच नाही. रात्री नवानंतर आम्ही नवी नवी नोकरी करणारे पाच सात होतकरू मित्र एकमेकांना भेटायला नारायणपेठेत एका मोडकळीला आलेल्या वाड्याच्या वरच्या खणवजा खोलीत जमायचो.
तिथे नेहमी राहणारा आमचा मित्र आम्हाला कधीच वैतागला नाही. वैतागायला काही हरकत नव्हती कारण एकतर आम्ही तिथे घुसून साध्या खोलीला "घटनास्थळ" बनवण्याएवढा आवाज करायचो. आमच्या दंग्याने खालच्या मजल्यावर माती पडायची. मग आम्ही त्या मित्राचा "आलेला" घरगुती जेवणाचा डबा झडप घालून गिळंकृत करायचो. अर्थातच एका डब्याने सहा जणांची दाढही भरली जायची नाही. म्हणून मग त्यालाही सोबत खेचून आम्ही अन्नासाठी वेगवेगळे रोड आणि पेठा पालथ्या घालायचो.
एक डिफॉल्ट व्यवस्था हवीच. म्हणून आम्ही बादशाही बोर्डिंग "ठेवलं" होतं. तिथे जिथे "येथे गर्दी करु नये" असं लिहिलंय त्या बोर्डाखाली घोळका आणि गलका करत आम्ही अन्नासाठी वेटिंग करत उभे रहायचो.
मी पहिल्यांदा या ठिकाणी गेलो ते स्वस्त आणि अनलिमिटेड अन्न म्हणून. काउंटरवर बसलेल्या आजोबांना मी "एक कूपन द्या.." असं म्हणून पन्नासची नोट त्यांच्या हातात दिली. त्यांनी अतिशय रागाने माझ्याकडे बघत ती माझ्या अंगावर परत फेकली. मी धसक्याने विचारलं, "का..काय झालं?"
म्हातार्याने एक हात वर उचलून त्याची तर्जनी मागच्या भिंतीकडे डाव्या दिशेने रोखली.
तर्जनीच्या बरोब्बर प्रोजेक्शनमधे पाहिलं तेव्हा "कृपया सुट्टे पैसे देणे" असं लिहिलं होतं.
मला स्वस्त अन्नाची नितांत गरज असल्याने मी हे मनावर न घेता त्यांना नम्रपणे सुट्टे नसल्याचं सांगितलं.
त्याने त्यावरही तोंड न उघडता रांगेतल्या माझ्या मागच्या माणसाला खूण केली.."नेक्स्ट" अशा अर्थाने.
आयचा घो..नसतील सुट्टे तर नका जेवू..
…आय मीन "नसतील सुट्टे तर नका जेवू.." असं ते आजोबा तोंडाने म्हणाले नाहीत. हे शब्द माझेच आहेत. ते आजोबा कधीही एकही शब्द बोलल्याचं आम्हाला कोणालाच आठवत नाही. मुके नव्हते एवढं नक्की. पाट्यांकडे बोटं दाखवून त्यांचं सगळं संभाषण चालायचं आणि त्यामुळे काहीही अडणार नाही इतक्या पाट्या तिथे खोलीभर लावलेल्या होत्याच. मग कशाला शब्द वाया घालवायचे? तिथे एक काळा ठोकळ्यासारखा जुना फोन ठेवला होता. तो सतत ट्रिंग ट्रिंग ट्रिंग वाजत राहायचा पण आजोबांनी एकदाही तो उचलल्याचं उदाहरण आमच्या पाहण्यात नाही. त्यांना ऐकू यायचं. पण फोन उचलला तर बोलावंही लागलं असतं. म्हणजे पुन्हा अमूल्य शब्द वाया.
मग माझे इतर होतकरू मित्र मदतीला आले. नाणी वगैरे जमवून एकवीस रुपये त्या स्थितप्रज्ञाला टिकवले आणि आत जाऊन थाळीसमोर बसलो.
ओहो..इतकं घाऊक अन्न मी आयुष्यात खाल्लेलं नव्हतं. आचार्यांचा वाढण्याचा सपाटा बघून मी घामाघूम झालो. आपली ताटावरची नजर क्षणभर जरी हलली तरी ताबडतोब आमटी, ताक आणि भाजी पूर्ववत भरत असे.
पोटाला तडस लागली तरी पानात अन्न टाकण्याची हिंमत होत नव्हती कारण तिथल्या असंख्य पाट्यांपैकी एकीवर "अन्नाचं महत्व" आणि न टाकण्याची ताकीद होती. बाहेर बसलेल्या कडक म्हातार्याचा (सॉरी..आजोबांचा) अनुभव पाहता अन्न टाकणार्यांवर काय कारवाई होईल याची खात्री नव्हती.
मी ताटावर खूप नीट लक्ष ठेवून एका हाताने माश्या वाराव्यात तसं वाढप्यांना वारीत वारीत एकदाचं अन्न संपवलं.
मग मात्र मला सवय झाली. भात मुठीत कुस्करुन खाणार्या मद्राशांना लाज आणेल अशा रितीने चारपाच पोळ्या मस्तपैकी आमटीत कालवून खायचो.
बादशाही बोर्डिंगखेरीज अन्न मिळवायला कुठे जायचं हा निर्णय मात्र खूप किचकट प्रक्रियेतून घेतला जायचा. या जागा निव्वळ वादविवाद आणि आवाजी मतदानातून निवडल्या जात. एकाने हाटेलाचं नाव घेतलं की इतर कोणीतरी ते तत्क्षणी विनाचौकशी हाणून पाडलंच पाहिजे. तासभर त्यावर खल झाला की एक प्रोव्हिजनल ठिकाण ठरायचं. पण तोपर्यंत फार फार उशीर झालेला असायचा. त्या उशीरात भर म्हणून आमच्यातल्या एकाला बाहेर निघण्यासाठी "चला" म्हटलं की तत्क्षणी कमरेला टॉवेल लावून "थांबा मी जरा जाऊन येतो.." असं म्हणायची सवय होती. मग प्रेशर नीट डेव्हलप व्हावं म्हणून तो टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत खोलीत येरझार्या घालायचा. तोपर्यंत आम्ही त्याला शिव्या घालत तिष्ठत बसायचं.
हे सर्व होईपर्यंत पुणेरी पद्धतीने ठरवलेलं हॉटेल बंद झालेलं असायचं. मग तिरगांव करत मटणहाऊसे,खानावळी, इराणी वगैरे शोधायचो. महिन्याच्या पहिल्या दिवशी काजूवाली मटणबिर्याणी आणि शेवटच्या दिवशी पुलाखालच्या चायनीज हातगाडी वरचा "स्वस्तोत्कॄष्ट" फ्राईड राईस. ("स्वस्त आणि उत्कॄष्ट नव्हे" तर "स्वस्त म्हणूनच उत्कॄष्ट"..!). एक प्लेट दोघातिघांत खेचाखेच करुन खायची आणि जो फास्ट खाऊ शकेल तो जास्त शिते खाईल हाच न्याय असायचा. एकतिशी महिना आला तर एकतिसाव्या दिवशी जवळजवळ भिकेकंगाल अवस्थेत (कै.) लकी मधे जाऊन ऑम्लेट बन हेच जेवण. आमच्यासारख्या गरजूंसाठी लकी सारख्या संस्था सामाजिक बांधिलकीतून रात्रीही मस्का बन, ओम्लेट बन आणि चहा पुरवायच्या. तेही पुण्यासारख्या "मिसळ संपली", "आठला बंद", "चटणी मिळणार नाही", "खिचडी फक्त मं.गु.श. मिळेल" अशा तत्वांच्या गावात..
ते काही असो…. मुख्य पोटभरीचा पदार्थ असायचा तो आमच्या गगनभेदी चर्चा आणि गप्पा. अलका टॉकीजसमोरच्या तत्कालीन दूधवाल्याकडून मलाई मारून दूध ढोसलं की आमचा खरा कार्यक्रम सुरु व्हायचा. तोंडाने अखंद बडबड करत पुण्याच्या ज्वानीनं भरलेल्या थंडीत तिथले रस्ते आणि पेठा तुडवण्याचा. गप्पा हाणताना नारायणातून शनिवारात, शनिवारातून परत नारायणात, मधेच गंधर्व, जंगली महाराज, डेक्कन, नवी पेठ कुठे भरकटत चाललोय हे आमच्यातल्या एकालाही लक्षातच येत नसे..कारण चर्चेत बेभान ना सगळेच..
काकासाहेब गाडगीळ पूल हा वादविवादाचा रंगमंच..आणि चर्चेच्या विषयांची रेंज? अगं आई गं..
द्रौपदी,महाभारत,हिजडे,मायकेल जॅक्सन,गुलाम अली,एक्स-रेटेड मूव्हीज,लाईफमधे आपल्याला नेमकं काय हवंय,पैश्यामागे धावायचं का? किती?, भारत सोडून जाणारे लोक गद्दार किंवा कसे?,स्वातंत्र्य न्येमकं कशामुळे मिळालंय, गांधी चूक की बरोबर, आपण टेक्नॉलॉजीत "मागे का?" किंवा "का मागे?" (हे दोन वेगळे विषय आहेत..!!), पॉप्युलेशन कंट्रोल, देशाची वाट नेमकी कुणी लावली, देशाची वाट लागली आहेच का?, देशाची वाट लागलेली नाहीच्च मुळी, नेहरु,अमुकचा स्वभाव तापट कसा, लिव्ह इन रिलेशन्स, दारू, व्यसनं,..
अंत नाही विषयांच्या यादीला. पहाटे दोनपर्यंतही खूपदा आम्ही गाडगीळ पुलावरच तावातावाने भांडत असायचो. दारू न पिताही सगळ्यांना कैफ चढलेला असायचा. गस्तीवरचे पोलीस येऊन हटकायचे. पण आमचे पांडू चेहरे बघून निघून जायचे.
सगळ्यांचा अक्षरशः काही तासांसाठी निरोप घेऊन पहाटे दोनच्या हाडं गोठवणार्या थंडीत मी फटफटीवरून खडकी साईडने लोहगांवकडे एकटाच यायचो. इतका निर्जन रस्ता मी आयुष्यात फील केलेला नाही. त्या प्रवासात रात्री दीड वाजता मला वर्षभरात एकदाही एकही मनुष्य दिसला नाही की गाडी आडवी गेली नाही. एकतर आधी ख्रिस्ती स्मशानभूमी. मग नदीकिनारी हिंदू स्मशान. नदीशेजारून जाताना थंडी इतकी वाढायची की बोटं क्लचवर दाबता येऊ नयेत. हाडांवरही चरा उठवणार्या त्या थंडीतून मी विश्रांतवाडी गाठायचो आणि माझी नदीकाठच्याच लॉजमधे असलेली खोली स्वतःभोवती लपेटून गाढ झोपायचो.
नॉस्टाल्जिक बोलायला फार आवडतं असं नाही. पण दिसतं ते हे की आता नारायणपेठेतला तो वाडा कै. झालाय. मोठ्ठी अपार्टमेंट्स उभी राहिली तिथे. लकी कै. झालंय. शॉपिंग सेंटर झालंय तिथे. पूना कॉफी हाऊस कै. झालंय. गुडलकला आता शाकाहारी थाळी मिळते आणि कामाशिवाय बसू नये असं म्हणतात. अलका समोरच्या इराण्याच्या जागी आता साबुदाणा खिचडी मिळते. अलकासमोरचा दूधवाला सुद्धा कै. झालाय. ते बादशाहीतले आजोबासुद्धा बहुधा..आता तिथे कौंटरवर इतरच कोणी व्यक्ती आहे असं ऐकतो. तो म्हणे तोंडाने बोलतो. उत्तरही देतो. झपाझप सूचनांकडे बोटं दाखवण्याची रजनीकांतला लाजवेल अशी सफाई नव्या माणसात नाही. तो कदाचित ग्राहक देवो भव म्हणून नम्रपणेही वागत असेल की काय? आणि सुट्टेही गपचूप देत असेल तर? छे बुवा..बादशाहीत जाण्याचं धाडस नाही होणार आता..
तरीही ओढ लागून पुण्याला पोचावं आणि मित्रांना फोन करून चला रे भेटूया आज रात्री गाडगीळ पुलावर, असं म्हणायला जावं तर ते "जरा हिला विचारून सांगतो" असं म्हणतात आणि मग ओशाळवाणेपणाने "या खेपेला जरा जमेलसं वाटत नाही." असं सांगतात.
तेही खरंय. आमच्या सहचारिणींना कशाला असेल आमच्या द्रौपदीचा आणि महाभारताचा संदर्भ्..त्यांना काय माहीत ते बादशाहीतले आजोबा..
तशी आमचीही "ही" आहेच आता. तिने "कुठेही रात्री भटकायला जायचं नाही.." म्हटल्यावर मी ही माझ्या मित्रांना तेच म्हणणार.. "अरे..या खेपेला जमेलसं वाटत नाही..पुढच्या वेळी नक्की.."
खरं तर कधीच जमेलसं वाटत नाही कारण तो जमानाच गाडगीळ पुलाखालच्या (नालासदृश..!!) पाण्यासोबत वाहून गेलाय आणि नंतरही ही खूप पाणी गेलंय त्याखालून.
आता नवा जमाना. नवी विटी.. नवे डोसेवाले.. नवा ऑम्लेटपाववाला…
मुन्नाभाईच्या "फिर हमारे मोहल्ले में हेमा आयी"च्या चालीवर "फिर हमारे लाईफमें मुम्बै आयी..!!"
त्याविषयी परत कधीतरी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा हा हा मस्त च
आयला गवि, शॉल्लीट्ट!! आमच्या
बादशाही च्या त्य आअजोबांचे
सहमत.
:)
च्यायला तब्बल २५-३० लायनिंची
टारु, गविच्याच लेखावर
ह्या मॅटर मधे काही गोची
कसलं ब्येक्कार (नगरी अर्थाने)
पुणे
लाष्ट टाइम मी कोल्ड कॉफी
तोंडावर अपमान
उप्स .. तुम्ही वाचलं होय ;)
एमायटी
आँ?
दुर्गा कोल्ड कॉफी, आता १५ रु.
लिखाण छानच! प्रत्येकाला
गवि इन फॉर्म!!!!
पुण्याबद्दल चांगल्या गोष्टी
खरं तर कधीच जमेलसं वाटत नाही
-१
हाहाहाहा. मान्य.
बादशाहीच्या
छान
खरयं
पुण्याबद्दल विशेष माहिती
>>पुण्याबद्दल विशेष माहिती
पुण्याबद्दल विशेष माहिती
गवि, वर मेवेनं म्हणलंय तसं
आवडला लेख
पहाटे दोनच्या हाडं
स्सह्ही!
मस्तं !
ती. स्व. गविकाका,
स्व.
स्व. गविकाका भारीच की हो
मस्त लेख. त्या दिवसांतले
गविभौ,
छानच लिहिलय गवि! तुमचा आणि
चांगल लिहिलय. आवडल.
आवडलं.
मस्त. पुण्याला चांगलं
छान लेख.
खुसखुशीत भन्नाट लेख!
एक नंबर लेख !
मस्त आठवणी. पुण्यातले
भारी ले़ख गवी.......... आठवणी
>>>>>खरं तर कधीच जमेलसं वाटत
जबरा..
मस्त आवडला.