✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वारी हनुमान आणि रोडग्यांचा भंडारा.

न
नीलकांत यांनी
Tue, 04/12/2011 - 13:30  ·  लेख
लेख
नमस्कार, या वर्षी पाडव्याला माझ्या गावाजवळील 'वारी हनुमान' या धार्मीक ठिकाणाला भेट द्यायचा योग आला. तसे या ठिकाणाची खूप ओढ लहानपणापासूनच आहे. शाळेला असताना सायकलने वारीला जाण्यात काही वेगळीच मौज होती. गावाच्या १५ किमी दूर गेलं की पहाडातून येणार्‍या ओढ्यांनी रस्त्याला चढ उतार दिलेले आहेत. ते सायकलने पैज लाऊन चढून जाणे आणि त्यानंतर पुन्हा वर जाऊन तो खोलगट भाग न्याहाळणे अशी मजा करायचो. नंतर याच वारी हनुमान येथे वान नदीवर धरण बांधण्यात आले. यामुळे धरणाच्या कालव्याशेजारी एक कच्चा रस्ता तयार झाला. हा वारीला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे. धुळ उडवत या रस्त्याने जायचे आणि समोरच्या डोंगरावर नजर खिळवायची म्हणजे डोंगर आपल्या अंगावर येत असल्याचा भास होतो. :) आसपासच्या तीन चार तालुक्याच्या श्रध्देचा हा ठेवा वारी हनुमान येथे आहे. येथे हनुमानाची मोठी मुर्ती आहे. तसेच एक छोटा मठ आहे. पुर्वी हा भाग खुप दुर्गम होता. आता मात्र धरणाच्या बांधकामामुळे सर्वत्र रस्ते झाले आहेत.
हे वारीच्या हनुमानाचे मंदिर
हे वारीच्या हनुमानाचे मंदिर
हे प्रवेशद्वार
मंदिरातील मुर्तीचा फोटो घेण्याची परवाणगी नाही मात्र नारळ फोडण्यासाठी असलेल्या जागेवर एक छोटी मुर्ती आहे तिचा फोटो घेतला आहे. विदर्भात भंडारा नावाचा प्रकार खुप होतो. भंडारा म्हणजे सर्वांनी एकत्रीत येऊन जेवन बनवायचं आणि पंगतीने जेवायचं. भंडारा करायला कुठलेही कारण पुरेसे असते. नवीन वर्ष आहे, नवीन धान्य घरात आले, हनुमान जयंती, गणपती असे कुठलेही कारण चालते. :) तर अश्या प्रकारचा वारीचा भंडारा हा प्रकार सुध्दा प्रसिध्द आहे. वारीला भंडारा म्हटलं म्हणजे रोडगे किंवा बाट्या (दाल बाट्या) हा प्रकार येथील खास आहे. वारीला रोडगे हे रानगोवर्‍यांच्या विस्तवात आत शिरवून खरपूस भाजून घेतात. अश्या रोडग्यांसोबत वांग्याची भाजी आणि तुरीच्या डाळीचे घट्ट वरण... अहाहा काय बेत होतो... काय सांगू? :) तर पाडव्याला वारीला गेलो असता काही भंडार्‍यांची तयारी सुरू होती. त्यामुळे या खास वर्‍हाडी रोडग्यांचे काही फोटो घेतले. ते खाली देत आहे.
ह्या आहेत रान गोवर्‍या, या पेटवून मग याचा विस्तव तयार करणार.
ह्या आहेत रान गोवर्‍या, या पेटवून मग याचा विस्तव तयार करणार.
कनिक चांगली तिंबून झाली की मग त्याच्या गोल जाड चपात्या व त्यात आणि छोट्या चपात्या असे छान तेलात बुडवून थर देणार. हे म्हणजे कणकेच्या आत कणकेचे सारण भरल्यासारखे वाटते. ( पा.कृ. तज्ञ अधीक माहिती देतील :) )
असे रोडगे टाकण्यासाठी गोवर्‍या पेटवल्यावर त्या धाडधाड पेटता कामा नये तर त्यांचा विस्तव व्हायला हवा. या कामात खूप धूर होतो.( वर्‍हाडीत याला धुपट असे म्हणतात.) आता तयार झालेल्या विस्तवात हे रोडगे आत शिरवतात. नवीन मानसाने हे केलं की हात पोळलेच म्हणून समजा.
रानटी विस्तवात तयार होणारे रोडगे.
तयार रोडगे काढून असे पोत्यावर ठेवतात. त्यानंतर आवश्यकता असल्यास पोत्यावर रगडून त्यावरील राख काढल्या जाते.
रोडग्यांसोबत वांग्याची भाजी आणि तुरीचे वरण (डाळ) तयार होतेय. विस्तवातील रोडग्यासारखाच येथील बाटी हा प्रकार सुध्दा प्रसिध्द आहे. यात सुध्दा रोडगा बनवल्या जातो मात्र हा विस्तवात भाजण्याऐवजी डाळीत उकळून घेतला जातो व मग तो खरपूस तळून लालसर झाल्यावर वाढल्या जातो. दाल बाटी हा अत्यंत चविष्ट प्रकार आहे.
बाटी बनवण्याची तयारी चालली आहे.
बाटी डाळीत उकळणे चालले आहे.
उकळलेली बाटी
शेवटी तयार झालेली बाटी.
रोडगे किंवा बाटी सोबत वांग्याची भाजीच हवी. :)
जेवण तयार होई पर्यंत फुटाणे आणि रेवड्या खा. वारीला एक अखंड पाण्याचा स्त्रोत असलेला झरा आहे. या गडबडीत त्या गोमुखाचा फोटो घ्यायचा राहूनच गेला.
मंदिराच्या बाजूलाच 'हनुमान सागर' नावाच्या धरणाची भींत दिसते. छोटं धरण आहे मात्र त्यामुळे शेजारच्या चार पाच तालुक्यांची शेती बहरली आहे आणि अकोल्यापर्यंत पिण्यासाठी पाणी नेता येते. अधीक चौकस लोकांसाठी रोडगा बनवण्याची पध्दत व्हिडीयो तुनळीवर चढवला आहे.
अशी ही काही तासांची भेट तुम्हाला कशी वाटली ते कळवा. आणि हो, येत्या २३ तारखेला पुन्हा वारीला भंडारा आहे. येताय ना मग? - नीलकांत
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
33737 वाचन

💬 प्रतिसाद (96)

प्रतिक्रिया

मस्त मस्त!

पैसा
Tue, 04/12/2011 - 19:33 नवीन
फोटो, वृत्तांत, रोडगे सगळंच लै भारी! कोणीतरी हे रोडगे घरी गॅसवर कसे करायचे सांगा रे!
  • Log in or register to post comments

हे सूरज गॅस करता येत त्याला

महासंग्राम
Wed, 08/03/2016 - 14:15 नवीन
हे सूरज गॅस करता येत त्याला फक्त चूलच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मस्त ! मस्त !! मस्त !!!

पक्का इडियट
Tue, 04/12/2011 - 19:40 नवीन
मस्त ! मस्त !! मस्त !!!
  • Log in or register to post comments

छान वृत्तांत आणि रोडग्याची

रेवती
Tue, 04/12/2011 - 19:58 नवीन
छान वृत्तांत आणि रोडग्याची चित्रफितही! दालबाटी हा पदार्थ फक्त इंदोरी आहे असे आधी वाटत होते पण थोड्याफार फरकाने हा प्रकार अनेकजणांकडे केला जातो असे दिसते.
  • Log in or register to post comments

मस्तच

विकास
Tue, 04/12/2011 - 22:02 नवीन
वृत्तांत आवडला! बाकी अशा ठिकाणी असलो की बाहेरच्या जगाला चांगल्या अर्थाने विसरायला होतं. तसच तुमचे देखील झाले असेल अशी आशा करतो! :-)
  • Log in or register to post comments

छान नीलकांत. तुमचा लेख आणि

इरसाल
Tue, 04/12/2011 - 22:15 नवीन
छान नीलकांत. तुमचा लेख आणि दिलेले फोटो पाहून जळगाव/भुसावळ कडच्या लग्नांची आठवण झाली.तसेच कॉलेज चे दिवस आठवले. (जळगाव/भुसावळात दाबून डाळ बाटी आणि घोटलेल्या वांग्यांची भाजी खालेल्ला.) इरसाल
  • Log in or register to post comments

छान!

आळश्यांचा राजा
Tue, 04/12/2011 - 22:35 नवीन
दाल बाटी हा राजस्थानी/ मारवाडी पदार्थ खान्देश-विदर्भातही केला जातो हे माहीत नव्हते. रोडग्याची रेसीपी पहिल्यांदाच पाहिली. इंटरेस्टिंग आहे.
  • Log in or register to post comments

खूप वर्षांपूर्वी एक गाणं ऐकलं

रेवती
Wed, 04/13/2011 - 00:25 नवीन
खूप वर्षांपूर्वी एक गाणं ऐकलं होतं त्यात "भवानीआई रोडगा वाहीन तुला" असे काहीसे शब्द होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

भारूड - एकनाथाचे बहुधा

धनंजय
Wed, 04/13/2011 - 04:08 नवीन
"भवानीआई रोडगा वाहीन तुला" हे एका भारुडाचे पालुपद आहे. भारूड बहुधा एकनाथाचे आहे. सासरच्या वेगवेगळ्या नातलगांचे वाईट चिंतणारी सर्व कडवी आहेत. मला आठवणारे कडवे : नणदेचे कारटे किरकिर करते खरूज होउदे त्याला! भवानीआई रोडगा वाहीन तुला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अरे देवा! हे असं होतं ते आठवत

रेवती
Wed, 04/13/2011 - 06:20 नवीन
अरे देवा! हे असं होतं ते आठवत नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

मस्तच

धनंजय
Tue, 04/12/2011 - 22:35 नवीन
पाकसिद्धीचे सचित्र वर्णन मस्तच आहे.
  • Log in or register to post comments

अरे वा, मस्तच! खंडोबाचा

पुष्करिणी
Tue, 04/12/2011 - 22:57 नवीन
अरे वा, मस्तच! खंडोबाचा प्रसाद म्हणून रोडग्याबद्द्ल ऐकलं होतं पण कृती आत्ताच कळतेय. हे मंदीर कोणत्या गावात आहे?
  • Log in or register to post comments

वा वा वा!! भाग खुल गये! मिपा

प्राजु
Tue, 04/12/2011 - 23:01 नवीन
वा वा वा!! भाग खुल गये! मिपा मालक लिहिते झाले.. वारी फळाली आहे. देव पावला. :) माहिती मस्त. व्हिडीओ सुद्धा सुरेख. रोडगा.. पहिल्यांदाच ऐकला त्याबद्दल.
  • Log in or register to post comments

मस्तंच !

प्राजक्ता पवार
Tue, 04/12/2011 - 23:06 नवीन
विदर्भातील चांगापुर या ठिकाणीही असा भंडारा होतो. तिथे रोडगे , दाल - बाटी , वांग्याची भाजी यांचा आस्वाद एकदा घेतला आहे. या लेखाच्या निमित्ताने आठवण झाली. फोटो व वृत्तांत दोन्ही छान .
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलं रे...

प्रशांत
Tue, 04/12/2011 - 23:49 नवीन
मस्त लिहिलं रे... >>कालव्याशेजारी एक कच्चा रस्ता तयार झाला. हा वारीला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे. धुळ उडवत या रस्त्याने जायचे आणि समोरच्या डोंगरावर नजर खिळवायची म्हणजे डोंगर आपल्या अंगावर येत असल्याचा भास होतो वारीचा सगळा परिसर डोळ्यासमोर उभा राहिला... १२ वी मधे असतांना आपण एकदा वर्गमित्रांसोबत वारीला भंडारा केला होता तो दिवस आठवला... सात-आठ दिवसांपासुन भंडार्‍यासाठी तयारी चालु होती.. भडार्‍यासाठि लागण्यार्‍या सगळ्यावस्तुची यादि... कोण काय आणनार... भंडार्‍याच्या दिवशी सकाळि लवकर जाऊन दिवसभरात जास्तवेळ सावली असेल ती जागा शोधणे हे ..... रानटी विस्तावातुन रोडगे काढ्णे हे काम माझ्या आवडिचे होते (बनविणे किंवा भाजी करणे हे जमत नाहि). सर्वात महत्वाचे म्हणजे जो कोणी काम करत नसेल त्याला कामाला लावणे हा आपला सर्वात आवडता छंद. आणि नदीच्या पाण्यात पोहणे... पुण्यामधे असल्यामुळे २३ ला भंडार्‍याल येणे तसेच रोडगे करणे शक्य नाहि पण बाट्या आणि वांग्याची भाजी खायला मिळणार हे मात्र खरं
  • Log in or register to post comments

पाकृ येऊ द्या! आम्हालाही कळेल

रेवती
गुरुवार, 04/14/2011 - 02:12 नवीन
पाकृ येऊ द्या! आम्हालाही कळेल घरी दालबाटी कशी करायचे ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

सर्वात महत्वाचे म्हणजे जो

अभ्या..
Wed, 08/03/2016 - 14:10 नवीन
सर्वात महत्वाचे म्हणजे जो कोणी काम करत नसेल त्याला कामाला लावणे हा आपला सर्वात आवडता छंद.
माहीते चांगलाच हा छंद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

अरे वा रे वा!

चतुरंग
Wed, 04/13/2011 - 00:07 नवीन
नीलकांता, झकास सफर घडवलीस रे. वारी हनुमान हा भन्नाट प्रकार दिसतोय. दालबाटी- अम्म्म्म्म्म क्या बात है! माझ्या मारवाडी मित्राच्या घरी मी हा प्रकार प्रथम खाल्ला. तुरीच्या घट्ट वरणात बाटी कुस्करुन, त्यात भरपूर तूप आणि पिठीसाखर घालून हाणायचे अरे काय चव लागते महाराजा!! खाणं झालं की हात धुवायला रांगतच जायला पायजे!! निखार्‍याच्या धगीत भाजले जाणारे रोडगे बघून मला मावशीच्या घरच्या समाधान चुलीची आठवण झाली. तिथे स्वयंपाक झाला की चूल शांत झाल्यावर त्या राखेच्या धगीत कृष्णाकाठची छोटी ताजी हिरवी वांगी, छोटे बटाटे, छोटे पांढरे कांदे, रताळी असं खुपसून ठेवायचं. एकीकडे जेवणं होईस्तोवर हे मस्त खरपूस भाजून निघे. मग आंचवून चुलीसमोर बसायचं. पोतं पुढे ओढून हा मेवा राखेतून बाहेर काढायचा राख झटकून सालं काढायची आणि नुस्तं मीठ भुरभुरवून खायचा! अहाहा! आत्ताही आठवणीने तोंडाचा पाझर तलाव झाला राव!! -जलरंगा
  • Log in or register to post comments

फोटो अन माहीती दोन्ही छान. मी

शिल्पा ब
Wed, 04/13/2011 - 02:23 नवीन
फोटो अन माहीती दोन्ही छान. मी दाल बाटी अजुन खाल्लेली नाही. चवदार दिसतेय. शक्य होईल तेंव्हा जरुर खाउन बघेन.
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Wed, 04/13/2011 - 02:41 नवीन
लेख. फोटो आणि वर्णन - दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त लेख झाला आहे . तुमच्या

निनाद मुक्काम …
Wed, 04/13/2011 - 02:47 नवीन
मस्त लेख झाला आहे . तुमच्या यात्रेला शुभेच्छा जय हनुमान
  • Log in or register to post comments

छान लेख आणि माहिती (लेख पाकृ

सुनील
Wed, 04/13/2011 - 04:45 नवीन
छान लेख आणि माहिती (लेख पाकृ ह्या सदरात टाकला असता तरी चालून गेला असता!)
  • Log in or register to post comments

वा!

निनाद
Wed, 04/13/2011 - 06:35 नवीन
अरे वा! अनवट ठिकाणाची मस्त माहिती. वाचायला मजा आली. रोडगे! मावशी व आईने लहानपणी केले होते, ते आठवले. पुढे ते कधी झालेच नाहीत :( आता पाऊस कमी झाला की हा कार्यक्रम मागच्या आंगणात करतोच! मस्त लेखन, चित्रे आवडली. नेहमी प्रमाणे "विकीसाठी देणार का ?;) "
  • Log in or register to post comments

छान वॄतांत...

मदनबाण
Wed, 04/13/2011 - 07:54 नवीन
छान वॄतांत... :)
  • Log in or register to post comments

नीलकांत सर एकदम वीस वर्षा पूर्वीची आठवण करून दिलीत !!

पप्पुपेजर
Wed, 04/13/2011 - 08:00 नवीन
अकोट पासून जवळ आहे तसे हे इथे जाताना मध्ये गजानन महाराजांची विहीर पण लागते तिथे पण असे भंडारे होतात आई वडिलान सोबत लहान असताना जायचो , खूप मजा यायची कधी वेळ मिळाला तर नरनाळा आणि विहिरी बद्दल पण जरूर लिहा खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या आज... आणि रोडगे एकदम भारी आमच्या शेतावर सुद्धा असेच करतात हुरडा पार्टी ला :)
  • Log in or register to post comments

भास्कर महाराज संस्थानबद्दल

प्रशांत
Wed, 04/13/2011 - 10:22 नवीन
>>अकोट पासून जवळ आहे तसे हे इथे जाताना मध्ये गजानन महाराजांची विहीर पण लागते तिथे पण असे भंडारे होतात भास्कर महाराज संस्थानबद्दल (अडगाव बु.)बोलत आहात काय आपण? विहिर आणि कावळ्याची गोष्ट... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पप्पुपेजर

मस्त वर्णन आणि फोटो. तिथे

नगरीनिरंजन
Wed, 04/13/2011 - 09:03 नवीन
मस्त वर्णन आणि फोटो. तिथे जाऊन आल्यासारखं वाटलं. रोडगे आणि दालबाटी खायची उत्सुकता मात्र प्रचंड वाढली आहे.
  • Log in or register to post comments

खुप लहानपणी रोडगे खाल्ले होते

विनायक बेलापुरे
Wed, 04/13/2011 - 10:04 नवीन
खुप लहानपणी रोडगे खाल्ले होते त्याची चव ताजी झाली. वारी हनुमानाल दंडवत
  • Log in or register to post comments

जळव जळव

आनंदयात्री
Wed, 04/13/2011 - 22:43 नवीन
जळव साल्या .. जळव आम्हाला. मराठवाड्यात याच पदार्थाला सहसा रोडगे नाही म्हणत, मारवाडी गुजराती दाळ बाटी म्हणतात म्हणुन दाळ बाटीच म्हटले जाते. चव काय असती महाराजा ... लेटेस्ट दाळ बाटी खाल्ली पश्याच्या घरी, वर "प्रशांत" आयडीने जो काड्या करतोय तो !! इतकी खुसखुशीत बाटी मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली. "खुसखुशीत" शब्द त्याचा अर्थ विसरला तर त्याने पश्या घरी जावे, आणि ही बाटी खावी .. बरं नुसती खुसखुशीत नाही, तर अशी सुरेख घडी घालुन तळलेली की गोलाकार बाटीचे कैक पदर उलगडत जातात खातांना .. स्वर्ग दोस्तांनो स्वर्ग. तिच्या बरोबर हिरवा मसाला करुन बनवलेली वांग्याची भाजी आणि साधसं थोडं घट्ट माफक फोडणी दिलेले वरण !! आपण तर स्वयंपाकाची प्लॅनिंग बिघडवली त्याच्या घरची त्या दिवशी .. कच्चकावुन हाणल्या बट्ट्या !! - (वांग्याची मजा एगप्लांटात शोधणारा) आंद्या
  • Log in or register to post comments

आर्रंतिच्या... ए पश्या

धमाल मुलगा
गुरुवार, 04/14/2011 - 16:12 नवीन
आर्रंतिच्या... ए पश्या अंयऽऽ...... कंदी यायचं बोल बे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

मस्त

राजेश घासकडवी
गुरुवार, 04/14/2011 - 12:14 नवीन
या रोडग्यांवरून एक गोष्ट आठवली... 'माझं काय मेलीचं, माझं जेवण चुलीत!' एक जहांबाज बाई असते. ती नवऱ्याला व मुलांना साध्या भाकरी भाजून देत असते. स्वतःसाठी काही भाकरी उरत नसत. तिला नवरा विचारत असे, 'काय गं, तू काही खात नाहीस का? ' त्यावर ती म्हणे 'माझं काय मेलीचं, माझं जेवण चुलीत!' चुलीत तिने भरपूर तूप वगैरे घातलेले जाडजूड रोडगे स्वतःसाठी खमंग भाजत ठेवलेले असत. नवरा कामावर गेल्यावर ती ते चापत असे. :) इतके दिवस फक्त गोष्ट माहीत होती. हा लेख वाचून ते प्रत्यक्ष पहायला मिळाले.
  • Log in or register to post comments

निळूभाऊ, फारा वर्षांपूर्वी

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/14/2011 - 12:20 नवीन
निळूभाऊ, फारा वर्षांपूर्वी तुमच्याच भागात एका शेतात खाल्ले होते यातले बरेच काही. साधारण मोठ्या आकाराच्या पातेल्यात १/३ वांग्याची भाजी आणि २/३ लालभडक तर्री, त्याच्या बरोबर शेतातच खरपूस भाजलेल्या बाट्या आणि साधं वरण, त्यावर साजुक तुपाची धार. कालवून खाल्लं. तेव्हाही त्रास झालाच होता पण आत्तापण झाला. :) बाकी परत गेलात तर मारुतरायांना आमचाही दंडवत पोचता करावा!
  • Log in or register to post comments

खिक्क

आनंदयात्री
गुरुवार, 04/14/2011 - 21:25 नवीन
>>तेव्हाही त्रास झालाच होता पण आत्तापण झाला. तेव्हा त्रास झाला ठिक आहे, ते तर्री वैगेरे वाचून आम्हाला कळ्ळे ;) पण आता न खाताच त्रास होणे हे वाढत्या वयाचे लक्षण असावे !! - (ढँग करुन अंतर्धान पावलेला) आंद्या गायब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अरे वा..

केशवसुमार
गुरुवार, 04/14/2011 - 12:24 नवीन
स्वतः मालकही लिहिते झाले.. उत्तम.. निलकांतशेठ, वृत्तांत एकदम झकास.. (वाचक)केशवसुमार
  • Log in or register to post comments

मस्त...एकदम कडकडून भूक लागली

हरिप्रिया_
गुरुवार, 04/14/2011 - 15:18 नवीन
मस्त...एकदम कडकडून भूक लागली वाचून... डाळ-बाटी, वांग्याचा रस्सा अस सगळ मनसोक्त हादडून, दुपारभर निवांत झोपायचे दिवस आठवले... आम्ही घरी पण बनवली आहे डाळ-बाटी, पण त्याला चुलीची चव नाही हेच खरे...
  • Log in or register to post comments

लेख व चित्रे, दोन्हीही

विसोबा खेचर
गुरुवार, 04/14/2011 - 17:03 नवीन
लेख व चित्रे, दोन्हीही जबरा..! तात्या.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख

प्रदीप
गुरुवार, 04/14/2011 - 18:35 नवीन
आवडला.
  • Log in or register to post comments

रोडग्याबद्दल मिळालेली माहिती

सूड
Tue, 08/02/2016 - 17:51 नवीन
रोडग्याबद्दल मिळालेली माहिती नवीन आहे.
  • Log in or register to post comments

व्वा व्वा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/02/2016 - 18:06 नवीन
चक्क, मिपामालक मिपावर लिहित होते. डोळे भरुन आले. ;) (च्यायला, ब्यान तर नै ना होणार आम्ही ) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

फोटो आणि वृत्तांत भारीच !!

नीलमोहर
Tue, 08/02/2016 - 18:11 नवीन
मिपा मालक छान लिहीतात की :)
  • Log in or register to post comments

सुंदर लेख.

पद्मावति
Tue, 08/02/2016 - 21:29 नवीन
सुंदर लेख. वीडियो वरची रोडगा बनवण्याची कृती खूपच मस्तं आहे.
  • Log in or register to post comments

झकास!!! वरती चिगो म्हणाले तसे मानसिक अन शारीरिक कष्ट झाले,

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 08/02/2016 - 21:35 नवीन
आसपासच्या तीन चार तालुक्याच्या श्रध्देचा हा ठेवा वारी हनुमान येथे आहे. येथे हनुमानाची मोठी मुर्ती आहे. तसेच एक छोटा मठ आहे. हा पूर्ण जिल्ह्याच्या श्रद्धेचा ठेवा आहे भाऊ :) (किमान वाशिम अलग काढल्यावर तरी =)) ) हा मारुती स्वतः समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केल्याचे ऐकले आहे एकदा मी, खूपच जबरी जागा, फक्त ह्याच्या जवळच पाण्याचा डोह आहे त्याला लोक घाबरतात, तिथे वरतून पडणारे पाणी असे पडते की कातळाच्या बाजूच्या भिंती अन कपारीत खबदाडी तयार झाल्यात दर तीनचार महिन्यात एखादा जीव तिथे जातोच, पाट्या लावल्या आहेत आता उडी मारू नये म्हणून , रोडग्या विषयी गंमत म्हणजे रोडगे लागतात, लागतात म्हणजे बेवडा मारल्यावर नशा केल्यावर होते अवस्था तसे चढतात बऱ्याच लोकांना, तोंडाला कोरड पडते, घसा सुकतो, अश्यावेळी लोकांना लिंबू सरबत, लिंबूपाणी पाजून ताळ्यावर आणायला लागते, नाहीतर अनर्थ प्रसंगही ओढवतात, मूलतः आमच्याकडे ऊन मरणाचे, राजस्थान खालोखाल किंवा बरोबरीने वऱ्हाड अन तेलंगणाचा भाग तापतो, त्यामुळे इकडल्या जेवणात तिखट जास्त असते जेणेकरून घाम जास्त येतो अन शरीर गार राहते, जास्त पाणी प्यायला लागेल असं जेवण ही विकसित झाले आहे त्याचमुळे असे जुनी माणसे सांगतात आमच्याकडली, बैठकीत 4-4 रोडगे उडवून निवांत सुपारी कातरणारी बहाद्दर माणसे आहेत आमच्याकडे ती वेगळीच!
  • Log in or register to post comments

माझं गाव हिवरखेड इथून जवळच

संदीप डांगे
Tue, 08/02/2016 - 21:54 नवीन
माझं गाव हिवरखेड इथून जवळच आहे, आमचेही हे श्रद्धास्थान आहे, अगदी घरच्यासारखे, मागे निलकांतशेठ भेटलेत तेव्हा यावर बरीच चर्चा आम्हा दोघा शेजाऱ्यांची घडलेली....!☺
  • Log in or register to post comments

माझं गाव हिवरखेड इथून जवळच

संदीप डांगे
Tue, 08/02/2016 - 21:54 नवीन
माझं गाव हिवरखेड इथून जवळच आहे, आमचेही हे श्रद्धास्थान आहे, अगदी घरच्यासारखे, मागे निलकांतशेठ भेटलेत तेव्हा यावर बरीच चर्चा आम्हा दोघा शेजाऱ्यांची घडलेली....!☺
  • Log in or register to post comments

क्या बात है सरजी!!! आम्ही अलग

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 08/03/2016 - 09:28 नवीन
क्या बात है सरजी!!! आम्ही अलग बाजूकडले, गुडधी कडले आमचे गाव, अकोल्यातली एकेकाळीची बिलाटवस्ती, उर्फ आमची प्यारी मोठी उमरी!, हा धागा नॉस्टॅल्जिया मध्ये रुपांतरीत होते वाटते बावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

धागा नॉस्टॅल्जिया मध्ये

महासंग्राम
Wed, 08/03/2016 - 14:26 नवीन
धागा नॉस्टॅल्जिया मध्ये रुपांतरीत होते वाटते बावा
ऑलरेडी झालाय रोडगे म्हणजे जीव कि प्राण बाप्पू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा