✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तिच्या मनातून.....................

क
कवितानागेश यांनी
Wed, 04/06/2011 - 14:37  ·  लेख
लेख
आज या अथांग उत्तुंग हिमालयाच्या पायथ्याशी येऊन पोचलेय... त्याचे अस्तित्व अगदी एखाद्या गंभीर पण आश्वासक मुनींसारखे भासतंय ... असे वाटतंय की कितीतरी काळापासून प्रवास करतेय, करतेय ....... ते शेवटी या इथे पोचण्यासाठीच. आत्तापर्यंत सोबत असलेले सगळेच निघून गेलेत पुढे, कधीचेच. पण मला भीती वाटत नाहीये, कसलीच नाही, कधीच वाटली नाही, ना माणसांची, ना संकटांची, ना परिस्थितीची, ना जगण्याची, ना मरणाची! पण मला आता अजून पुढे मात्र जाता येत नाहीये.... खरें तर माझी तशी इच्छाही नाही. मला खरोखरच कधी कसली इच्छा होती का? मला तरी आता आठवत नाही. होती ती फक्त आग, प्रचंड आग! माझ्यासकट सगळे काही जाळणारी आग. जन्मापासून माझ्या सोबत असलेली सूडाची आग. खरें तर मला कधी कळले नाही, त्या जगद्म्बेनी कशासाठी मला जन्माला घातले. माझ्या भावाच्या जन्माला तरी काहीतरी निमित्त होते. त्याला एक काम करायचंच होते. माझ्या वडलांच्या मनातला धगधगता सूड पूर्ण करायचा होता. पण मी कशासाठी आले? मी काय केले? मी काय मिळवले? मी कुणाला काय दिले? या शेवटच्या क्षणांमध्ये मी या मूळ कारणांचा विचार करतेय, हे किती विचित्र आहे. किती अलगद रहात होते मी लहानपणी..... पुढच्या सगळ्याच गोष्टी कल्पनातीत घडल्या... इतकी वर्षे झाली, अजूनही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो, भीतीनी, आश्चर्यानी.... असा अपमान होऊ शकतो, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते मला. ज्याबद्दल कृतज्ञता वाटावी, अशी प्रत्येक गोष्ट अचानक भोगवस्तू कधी ठरली, कळलेच नाही. राज्यसत्ता ही उत्तरदायित्व ना ठरता उपभोग्य ठरली, भूमाता आणी स्त्री आदरणीय ना ठरता उपभोग्य ठरल्या! तो फक्त माझाच नाही, माझ्याच कुळातल्या अनेक मातांचा देखील अपमान होता. सृजनशक्तीचा असा अपमान होऊ शकतो, असे खरेच कधी वाटले नव्हते.... 'त्या' सोळाहजार जणींचे दु:ख एकाच वेळेस अंगावर कोसळले. लहानपणापासून ऐकत आले होते, की आता कलियुग सुरु होणार आहे, घोर कली पसरणार आहे, अंध:कार येणार आहे,... हेच का ते कलीयुग? खरोखरच तेंव्हा असे भासत होते, माझ्या सभोवताली काळाकभिन्न धुरासारखा कली मला कोंडून टाकत होता, आणि मी एकटीच धगधगत त्याला जाळू पहात होते. त्या क्षणी मला स्वत:लादेखील माहित नव्हते, की या आगीत पुढे काय काय होरपळून निघणार आहे! ...................................................... पुढचे संपूर्ण आयुष्य जगले ते केवळ त्या एका करुणेच्या आधारावर. माझ्याकडे पाहताना त्याच्या नजरेतून उतरलेले ते कारुण्य आणी त्यानंतर माझ्या जीवनातली सगळीच आसक्ती जाळून टाकणारे ते त्याच्या डोळ्यातले वैराग्य. त्याच्या नजरेतूनच मला जाणावले, हे सगळे मला भोगावच लागणार होते,... दुसरा इलाजच नव्हता! जणू काही तो सांगत होता, कणखर हो, अलिप्त हो! बास्स.......इतकीच एक मौल्यवान गोष्ट आहे माझ्या उभ्या आयुष्यात..... आज इथे हे शेवटचे श्वास मोजत शांतपणे मृत्यूची वाट बघतेय........ खरें तर हे विचारही नको वाटतायत... खरें तर जगणे कधीच संपले होते, माझी मुले, माझा भाऊ काळानी ओढून नेले, त्याच क्षणी मीदेखील संपले. ज्याच्या करुणेवर पुढची ओझी ढकलली, तो तर असा अचानक, ना सांगताच निघून गेला. माझ्या संपूर्ण जगातलाच प्राणच संपला. आम्ही सगळेच हतबल झालो. केवळ त्याचे एक हसू, एक नजर, एक शब्द, आम्हाला जगण्याची ताकद देत होते. एरवी माझ्यावर सतत कसल्या ना कसल्या नात्यांचे ओझे होते, कन्या, बहीण , पत्नी,सून, आई, सम्राज्ञी,....संपतच नाहीत अपेक्षा कुठल्या नात्यांच्या. फक्त त्याच्यासमोर असल्यावरच जाणवायचे, की मी मी आहे, एक अस्तित्व. या अथांग विश्वासमोर जरी क्षूद्र भासले, तरीही, एक एकमेवाद्वितीय सुंदर अस्तित्व. जगदंबेची निर्मिती! आता तो नाहीसा होणे ही कल्पना देखील इतकी सैरभैर करते मनाला. त्याच्या आठवणीन्वरच आतापर्यंत तग धरला जीवानी. त्यानंतर फक्त सावली वावरत होती माझी.... आता काही वेळात ती सावली देखील संपेल. बास्स.. याचीच वाट पहात होते मी कितीतरी वर्षे. आपलेच आयुष्य असे ओझे होऊ शकते हे मला कधी माहीतच नव्हते. आज या इथे अचानक पायातले त्राण संपले, आणि मनानी सुटकेचा श्वास सोडला. ...आता मात्र नक्की संपतोय हा प्रवास. आता फक्त आठवणीत तडफडणे संपेल.... हा यज्ञ संपेल, ही याज्ञसेनी संपेल, फक्त राख उरेल मागे. मी मात्र मोकळी होईन....त्याच्याभोवती फेर धरायला.....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
20055 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

बापरे .. घामाघुम करणारे

टारझन
Wed, 04/06/2011 - 14:51 नवीन
बापरे .. घामाघुम करणारे मुक्तक आहे हे ! "त्याच्या मनातुन .... " पण इमॅजिन होतंय .. :( - टार्‍यातुटेक
  • Log in or register to post comments

>>'त्या' सोळाहजार जणींचे दु:ख

यशोधरा
Wed, 04/06/2011 - 15:14 नवीन
>>'त्या' सोळाहजार जणींचे दु:ख एकाच वेळेस अंगावर कोसळले. >> जबरी. आवडलं. सुरेख.
  • Log in or register to post comments

मस्तच!!

असुर
Wed, 04/06/2011 - 15:25 नवीन
मस्तच लिहीलंय, पण खरंतर लै डेंजर है! द्रौपदीच्या मनातून लिहायचं म्हणजे किती अवघड काम... --असुर
  • Log in or register to post comments

माऊ

पैसा
Wed, 04/06/2011 - 15:30 नवीन
याज्ञसेनीच्या मनात शिरायचं म्हणजे महाकठीण! मुक्तक मस्तच झालंय.
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Wed, 04/06/2011 - 15:53 नवीन
लीमाऊ, मस्त ग अ- प्र- ती- म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी आहे, एक अस्तित्व- सुंदर शब्दशिल्प.

शशिकांत ओक
Wed, 04/06/2011 - 15:35 नवीन
मी आहे, एक अस्तित्व- सुंदर शब्दशिल्प.. विमानप्रवासात येणारे-जाणवणारे विचार आपण हिमालयाच्या गिरिकुहरात उपभोगून विमुक्तावस्थेला नेणारे कथन सृजन केलेत.
  • Log in or register to post comments

>>विमानप्रवासात

अन्या दातार
Wed, 04/06/2011 - 23:07 नवीन
>>विमानप्रवासात येणारे-जाणवणारे विचार आपण हिमालयाच्या गिरिकुहरात उपभोगून विमुक्तावस्थेला नेणारे कथन सृजन केलेत. तुम्ही कोर्टनी वॉल्शचे चाहते आहात काय? लई म्हणजे लईच बौन्सर गेलं राव!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

भिती वाटली आधिच घरात बसुन ४

पर्नल नेने मराठे
Wed, 04/06/2011 - 15:51 नवीन
भिती वाटली :( आधिच घरात बसुन ४ दिवस नाहि झालेत तोच फ्र्स्त्ट्रेशन आलेय .
  • Log in or register to post comments

जबर्‍या !माझ्या भावाच्या

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/06/2011 - 15:52 नवीन
जबर्‍या !
माझ्या भावाच्या जन्माला तरी काहीतरी निमित्त होते. त्याला एक काम करायचंच होते. माझ्या वडलांच्या मनातला धगधगता सूड पूर्ण करायचा होता. पण मी कशासाठी आले? मी काय केले? मी काय मिळवले? मी कुणाला काय दिले?
हे काय पटले नाही फक्त. शंकराच्या आशिर्वादाने गतजन्मी पाच पती मिळण्याचा वर प्राप्त झाला असल्याने द्रौपदीचा जन्म झाला असल्याचे व्यासांनी महाभारतात स्पष्ट लिहिले आहे. आणि द्रौपदी यज्ञातुन प्रकट झाल्याक्षणी 'हि कन्या कौरव वंशाच्या नाशाचे कारण बनेल' अशी आकाशवाणी देखील झाली होती.
  • Log in or register to post comments

आपण जो काही वाचतो, तो

कवितानागेश
गुरुवार, 04/07/2011 - 12:38 नवीन
आपण जो काही वाचतो, तो व्यासांनी नंतर लिहिलेला इतिहास आहे. ही सगळी आधीच्या जन्मांमधली गुंतागुंत व्यासमहर्षींना ठाउक असणे शक्य आहे, पण प्रत्यक्ष त्या व्यक्तीना या गोष्टी स्पष्ट्पणे माहित असतीलच असे नाही. पण मी कशासाठी आले? मी काय केले? मी काय मिळवले? मी कुणाला काय दिले? हा एका आईला जाणवणारा फोलपणा आहे. प्रचण्ड संहार झाल्यानंतर, शिवाय पोटची मुले गेल्यानांतर, कुठल्याही आईला ही पोकळी जाणवु शकते. जीव गुंतवायलाच आता मागे कुणी उरले नाही, अशा परिस्थितीत स्वतःचा जन्म व संपूर्ण आयुष्यच निरर्थक वाटू शकते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सुंदरच!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 04/06/2011 - 15:53 नवीन
सुंदरच! अवांतर: मिपावर दिवाळी करावी का? अचानक सगळेच चांगले लिहायला लागले आहेत? ;)
  • Log in or register to post comments

+१

गणपा
Wed, 04/06/2011 - 20:15 नवीन
आणि आवांतराशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

एक्झॅक्टली!! बिपिनदा.. हेच

प्राजु
Wed, 04/06/2011 - 20:39 नवीन
एक्झॅक्टली!! बिपिनदा.. हेच आलं डॉक्यात! लिखाळ, चतुरंग, पिडा काका.... ही माउ... सगळेच लिहायला लागलेत. @ माउ .. सुरेख लिहिले आहेस. @ बिपिनदा.. आपण कधी उपास सोडताय?? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

@ बिपिनदा.. आपण कधी उपास

टारझन
गुरुवार, 04/07/2011 - 13:08 नवीन
@ बिपिनदा.. आपण कधी उपास सोडताय??
शी बै ... काहीतरीच :) असो .. ह्या मंगलप्रसंगी कोदांसारखे कोहिणुरही आपली लेखणीवरची जळमटे झटकुन लिहीती झाली पाहिजेत :) मजा येइल :) - मुळाकारताळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

_/\_

धमाल मुलगा
Wed, 04/06/2011 - 16:13 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

सुरेखच आहे हे मुक्तक, कधी कधी

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 04/06/2011 - 16:44 नवीन
सुरेखच आहे हे मुक्तक, कधी कधी असा विचार मनात येतो की पांडवांपेक्षा दुर्योधन जास्त पुण्यवान होता. कारण त्याच्या नशिबात हाल अपेष्टा दु:ख काहीही आले नाही. पांडवांचे संपुर्ण आयुष्य खडतर होते. सुख म्हणावे असे काहीही त्यांच्या नशिबातच नव्हते. द्रौपदीही त्यांच्या नशिबाला बांधली गेली होती. श्रीकृष्णाचाही अंतही अपघाती झाला, असे का होते ? त्याचे उत्तर नाही, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

थोडेशे अवांतर : उत्तर असे

गणेशा
Wed, 04/06/2011 - 17:02 नवीन
थोडेशे अवांतर : उत्तर असे असु शकते का ? पांडव सुखी नव्हते पण समाधानी होते .. कौरव सुखी होते पण समाधानी नव्हते .. सुखा पेक्षा ही ह्या जगात समाधानाचे महत्व जास्त आहे .. म्हणुनच अनेक गरीब - कष्टाळु लोक समाधानाने - आनंदाने जगतात .. संत महात्मे हे समाधानाने गाठलेले उत्तुंग शिखर वाटतात मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पांडव समाधानी होते हे काही

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 04/07/2011 - 14:47 नवीन
पांडव समाधानी होते हे काही पटत नाही, असे असते तर महायुध्द झालेच नसते. पांडवांची सत्ता लालसा सुध्दा युध्दाला कारणीभुत आहे. दुर्योधनाने पांडव सोडुन ईतर कोणावर अन्याय केला असे ऐकीवात नाही. तो पण चांगला प्रशासक होता म्हणुन तर महा युध्दात पांडवांपे़क्षा जास्त सैन्य कौरवांचे होते. तो युध्दात हरला म्हणुन नाहीतर कदाचीत आपण वेगळे महाभारत वाचले असते. धर्मराज शेवटी जुगार खेळायला बसलाच ना? स्वतःच्या बायकोला त्याने पणाला लावले ना? यात पांडव कसले समाधान शोधत होते बरे? स्वतःच्याच अजोबा पणजोबांना, जवळच्या नातेवाईकांना युध्दात मारुन मिळवलेले राज्य पांडवांनी किती बर काळ भोगले? नरो वा कुंजरोवा असे म्हणत आपल्या गुरुंची हत्या करण्या मागे कोणते आले आहे समाधान? बर ईतके सगळे करुन फक्त धर्मराज आणि एक कुत्रा सदेह स्वर्गात गेले. बाकीचे वाटेतच खपले ना? पांडव समाधानी होते असे मुळीच नाही. ते जेते होते इतकेच. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

पैजार बुवांचा जास्तच गोंधळ

प्यारे१
Sat, 04/30/2011 - 10:06 नवीन
पैजार बुवांचा जास्तच गोंधळ झालेला दिसतोय. सविस्तर ल्ह्यावे लागणार आहे. कोणी बूच मारणार नसेल तर रुमाल टाकावा म्हणतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अवांतर .

अभ्य
Wed, 02/06/2013 - 17:49 नवीन
अवांतर . कृष्णाचा मृत्यू हि काही अपघाती नव्हता त्याने रीतसर सर्वांचा निरोप घेऊन केलेलं आत्मसमर्पण होत ते .. यासाठी गो नि दांडेकरांचे श्रीकृष्ण हे पुस्तक वाचलेत तरी कळेल.. "पण मुक्तक आवडले ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मसत आवडले एकदम ..पण हे

गणेशा
Wed, 04/06/2011 - 16:58 नवीन
मसत आवडले एकदम .. पण हे द्रोपदी बद्दल होते हे मला रिप्लाय वरुनच कळाले.. शब्द -त्यांची खोली जबरदस्त ..
  • Log in or register to post comments

खुप छान लिहिल

हरिप्रिया_
Wed, 04/06/2011 - 17:09 नवीन
खुप छान लिहिल आहे... आवडल... ... तुम्ही 'कृष्णा' कादंबरी वाचली आहे का? त्याचीच आठवण झाली... त्यात द्रौपदीच आत्मकथन आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर... अप्रतिम...!!!!

नन्दादीप
Wed, 04/06/2011 - 17:23 नवीन
सुंदर... अप्रतिम...!!!!
  • Log in or register to post comments

छान !!

सूड
Wed, 04/06/2011 - 17:24 नवीन
छान !!
  • Log in or register to post comments

छानच लिहिलय.

रेवती
Wed, 04/06/2011 - 18:06 नवीन
छानच लिहिलय.
  • Log in or register to post comments

पॅलेस ऑफ इलुजन !

सुहास..
Wed, 04/06/2011 - 18:32 नवीन
" पॅलेस ऑफ इलुजन ' वाचुन लिहीला की काय लेख ;)
  • Log in or register to post comments

लिमाउ, फार छान लिहिलंय,

५० फक्त
Wed, 04/06/2011 - 19:37 नवीन
लिमाउ, फार छान लिहिलंय, परकायाप्रवेश अतिशय मस्त जमलाय. वर बिकांनी म्हणल्याप्रमाणे खरंच मिपावर दिवाळी सुरु झाली आहे असं वाटतंय.
  • Log in or register to post comments

वा! मस्त लिहीलंय!

नगरीनिरंजन
Wed, 04/06/2011 - 20:47 नवीन
वा! मस्त लिहीलंय!
  • Log in or register to post comments

__/\__ काय लिहु कळत नाही.. अ

प्रीत-मोहर
Wed, 04/06/2011 - 20:55 नवीन
__/\__ काय लिहु कळत नाही.. अ प्र ति म!!!!!
  • Log in or register to post comments

"सलाम"

प्रास
Wed, 04/06/2011 - 21:33 नवीन
लीमाउजेट, खूप छान लिहिलंयत हे मुक्तक-चिंतन! >>>हा यज्ञ संपेल, ही याज्ञसेनी संपेल, फक्त राख उरेल मागे. मी मात्र मोकळी होईन....त्याच्याभोवती फेर धरायला.....<<< हे बाकी भन्नाट आहे. या दो-लायनाला "सलाम".
  • Log in or register to post comments

वा माऊ! छान लिहिलंय!

मेघवेडा
Wed, 04/06/2011 - 23:28 नवीन
वा माऊ! छान लिहिलंय! :)
  • Log in or register to post comments

सह्हीच लिहिलयस माउ, >>>हा

पुष्करिणी
Wed, 04/06/2011 - 23:56 नवीन
सह्हीच लिहिलयस माउ, >>>हा यज्ञ संपेल, ही याज्ञसेनी संपेल, फक्त राख उरेल मागे. मी मात्र मोकळी होईन....त्याच्याभोवती फेर धरायला.....<<< एकदम 'सोलमेट' वगैरे डोक्यात आलं
  • Log in or register to post comments

मुक्तक आवडले माउ

विलासराव
गुरुवार, 04/07/2011 - 00:29 नवीन
छान लिहिता तुम्ही. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

'कृष्णा' वाचलीय मी. खुप आवडल

स्पंदना
गुरुवार, 04/07/2011 - 04:34 नवीन
'कृष्णा' वाचलीय मी. खुप आवडल लिखाण. पण शेवटी भिम मागे वळुन तीच्या कडे आला अस काहिस आहे. तो रांगडाच शेवटी खरा प्रेमी निघाला.
  • Log in or register to post comments

खूप छान

सविता००१
गुरुवार, 04/07/2011 - 14:25 नवीन
अप्रतिम लिहिले आहे
  • Log in or register to post comments

छानच

sneharani
गुरुवार, 04/07/2011 - 14:44 नवीन
छान लिहलय!
  • Log in or register to post comments

मुक्तक आवडले ....पणपुढचे

मनीषा
गुरुवार, 04/07/2011 - 15:07 नवीन
मुक्तक आवडले . . . . पण पुढचे संपूर्ण आयुष्य जगले ते केवळ त्या एका करुणेच्या आधारावर. हे वाक्य याज्ञसेनीच्या संदर्भात आलेले पटले नाही. जिचा जन्मच यज्ञातील अग्नीतून झाला ती अशी दीन होणार नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments

छान.

सूर्यपुत्र
गुरुवार, 04/07/2011 - 16:09 नवीन
अतिशय सुंदर. नक्की काय म्हणू? योग्य शब्दांची उणीव भासतेय.... -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

करुण आणि भव्य....आत्मकथानाची

स्वानन्द
Fri, 04/08/2011 - 14:27 नवीन
करुण आणि भव्य.... आत्मकथानाची खुमारीच काही निराळी. जीवनाचा पट वेगात उलगडवते... त्या त्या प्रसंगीचे मनोव्यापार कथन करते.. कधी त्यावर त्रयस्थ पणे भाष्य करते. मस्तच माउ... अगदी 'तिच्या' मनातून च आलं असावं अशी खात्री वाटावी, असं झालंय हे मुक्तक.
  • Log in or register to post comments

छान !

प्राजक्ता पवार
Fri, 04/08/2011 - 22:49 नवीन
मुक्तक आवडले.
  • Log in or register to post comments

भन्नाट..

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 04/28/2011 - 17:51 नवीन
भन्नाट.. तुफान...नि:शब्द!! तुला __/\__
  • Log in or register to post comments

हे वाचायचंच राहिलं...

राजेश घासकडवी
गुरुवार, 04/28/2011 - 19:40 नवीन
काहीशा प्रासादिक, पण तरीही वैयक्तिक अशा भाषेत चित्र छान रंगवलं आहे. द्रौपदीचं नाव शेवटपर्यंत उघड न करण्याचं तंत्र छान हाताळलं आहे. आणि ही तांत्रिक बाब साधण्यासाठी तिच्या आयुष्यातले प्रसंग, लढे व दुःख अधिक सार्वत्रिक झाली आहेत.
  • Log in or register to post comments

लिमे कठीण आहे ग तुझं.. काय

पिंगू
Fri, 04/29/2011 - 05:18 नवीन
लिमे कठीण आहे ग तुझं.. काय लिहीले आहे.. विचार जरी केला.. तरी डोक्यात झिणझिण्या उठतात. - पिंगू
  • Log in or register to post comments

खुप भनायक लिहिले आहे. पन राग

नरेशकुमार
Fri, 04/29/2011 - 11:35 नवीन
खुप भनायक लिहिले आहे. पन राग नका मानू मला जास्त काही कळाले नाही.
  • Log in or register to post comments

भनायक म्हणजे काय हे मलादेखिल

कवितानागेश
Fri, 04/29/2011 - 12:01 नवीन
भनायक म्हणजे काय हे मलादेखिल जास्त काही कळाले नाही! ;)
  • Log in or register to post comments

ohh sorry, मला भयानक असे

नरेशकुमार
Fri, 04/29/2011 - 12:11 नवीन
ohh sorry, मला भयानक असे बोलायचे होते. माफ करा. पन मला कविता वाचुन जास्त समजले नव्हते, पन प्रतिसाद वाचुनच समजले कि हि द्रोपदिचि कविता आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

अगदी मलाही...शेवटच्या दोन

किसन शिंदे
Fri, 04/29/2011 - 12:33 नवीन
अगदी मलाही...शेवटच्या दोन ओळीत याज्ञसेनी हा शब्द आला तेव्हा कळलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

ही कविता आहे हे मला देखिल

कवितानागेश
Fri, 04/29/2011 - 12:26 नवीन
ही कविता आहे हे मला देखिल अत्ताच आपला प्रतिसाद वाचून समजले! मला इतके दिवस वाटत होते, की मी मुक्तक लिहिलंय. :) असो. धण्यवाद.
  • Log in or register to post comments

सांगत होतो!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 04/29/2011 - 13:09 नवीन
म्हणून सांगत होतो नेहमी की लिही लिही... बघ किती ज्ञान वाढलं तुझं एकाच लेखनात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

जडबुदुक लिहिलंय...झेपलं नाही

शिल्पा ब
Sat, 04/30/2011 - 10:44 नवीन
जडबुदुक लिहिलंय...झेपलं नाही त्यामुळे नुसतीच नजर फिरवली...लोकं म्हणताहेत म्हणजे काहीतरी चांगलं चुंगलं असणार. सिरीयस वाचायचा मुड आला की व्यवस्थित वाचेन म्हणते.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा