कूटनतंत्राची (एन्क्रिप्शन) तोंडओळख - १
लेखनविषय (Tags)
ब्लॅकबेरी आणि भारतीय सरकारमधल्या वादाला मिसळपाववरही तोंड फुटलेले पाहिले. ती चर्चा व त्यावरील प्रतिसाद पाहताना अनेकांना कूटनतंत्र (एन्क्रिप्शन), पासवर्ड इ. बद्दल जुजबी माहिती असली, तरी ती परिपूर्ण नाही; आणि अनेक संकल्पनांच्या बाबतीत काहीसा संभ्रम आहे, असे दिसून आले. विकिपिडिया आणि आंतरजालावर या विषयावर अनेक माहितीस्त्रोत उपलब्ध असले, अनेक विद्वानांनी यावर अत्युत्तम लेखन केलेले असले, तरी सर्वसामान्यांना कळेलशा पद्धतीने ही तोंडओळख मायमराठीच्या माध्यमातून करून द्यावी, म्हणून ही मालिका लिहिण्याचे धाडस करीत आहे. संगणकीय, आंतरजालीय दळणवळण आणि त्याची सुरक्षिततता यातील पदव्युत्तर शिक्षण आणि गेल्या चार वर्षांचा व्यावसायिक अनुभव जमेस धरून काहीशा अधिकारवाणीने, पण जमेल तितक्या सोप्या पद्धतीने लेखन करावयाचा मानस आहे.
कूटनतंत्राची गरज कोणाला कधी पडली, याबद्दल अनेक मनोरंजक कथा उपलब्ध असतील. पण मला वाटते अगदी पहिल्यांदा कूटनतंत्राची सगळ्यात जास्त गरज 'कबुतर जा जा जा, पहले प्यार की पहली चिठ्ठी साजन को दे आ' म्हणणार्या प्रेमवीरांना पडली असावी. यातला सगळ्यात मोठा धोका म्हणजे गरीब, बिचारे ते कबुतर! खलनायकाच्या एका गोळीची शिकार झालेल्या कबुतराकडून ती चिठ्ठी हिसकावून घेतली की झाले. त्यानंतरच्या परिणामांचा तर विचारच करायला नको. पण चिठ्ठी खलनायकाच्या हातात जरी पडली, तरी ती त्याला वाचताच येऊ नये, अशी सोय केली तर? म्हणजे चिठ्ठी असलेले ते पाकिट अशा पद्धतीने बंद करायला हवे की ते नायक/नायिका सोडून कोणाला उघडताच येऊ नये; आणि तिसर्या कोणाला उघडता आलेच, तर त्यातील मजकूर नायक/नायिका सोडून कोणाला वाचताच येऊ नये.
असे आपले प्रेमवीर हे केवळ एक उदाहरण झाले. मात्र वास्तव दुनियेत या प्रेमवीरांची जागा अतिरेकी, देशोदेशींची सरकारे, हेर, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि तुमच्याआमच्यासारखे सर्वसामान्य लोक, कोणीही घेऊ शकते. उद्देश एकच - एकमेकांशी जो संवाद साधायचा, त्याचा अन्वयार्थ फक्त ठराविक लोकांनाच लावता यावा आणि/किंवा असा काही संवाद साधला जात आहे किंवा नाही, हे ठराविक लोक सोडून इतर कोणाला कळूच नये!
समजा, मला माझ्या मित्राला चिठ्ठी पाठवून सांगायचे आहे - रात्री आठ वाजता कट्ट्यावर भेट. पण मला असे वाटते आहे की आम्हा दोघांपैकी कोणाच्याही पालकांच्या हातात ती चिठ्ठी पडली की आम्हा दोघांनाही रट्टे पडणार. मग मी 'रात्री आठ वाजता कट्ट्यावर भेट' हेच 'टभे रवट्ट्याक ताजवा ठआ त्रीरा' असे लिहून पाठवले तर? मित्राला खाजगीत फक्त इतकेच सांगायचे - तुला माझ्याकडून मिळणार्या चिठ्ठीतील शब्द उलटे वाच. झाले. आम्हा दोघांचेही पालक आमच्याइतके हुशार नाहीत, असे गृहीत धरले, तर आमच्यातला संवाद त्यांना कळणार नाही. कारण त्यांच्या हाती चिठ्ठी पडलीच, तर त्यांना 'टभे रवट्ट्याक ताजवा ठआ त्रीरा' हे चिठ्ठीत दिसेल; मात्र शब्द 'उलटे' वाचायचे आहेत, हे त्यांना माहीत नाही तर फक्त माझ्या मित्राला माहीत आहे.
प्रतिक्रिया
ब्राव्हो
मालिका इंटरेस्टींग असणार हे
उत्तम केलेत!
वा.... बेलाशेठ, सुरवात तर
उत्सुक
उत्तम! येउदे अजून.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
छान कल्पना
भारी आहे. हे वाचणार आहे..
तोंडओळख आवडली.
मस्त!
नकादुचेण्यापकासके..
तवारुसु
बेला, मला वाटते..
सीझर सायफर