क्रांती ~ आणि क्रांतीमधील एका 'आयकॉन' च्या फोटोची जादू...!!
" alt="CheA" />
इजिप्तमध्ये अखेर "क्रांती" झाली आणि एक सत्ता उलथवून टाकण्याची एकजुटीची शक्ती जनतेत कशी आणि केव्हा एकवटते याचे पुनश्च एकदा जगभरातील क्रांतीप्रेमींना प्रत्यंतर आले. अर्थात हा लेख त्या क्रांतीवर नसून एका क्रांतिवीरावर आहे. त्याची आठवण या निमित्ताने होण्याचे कारण म्हणजे त्या अठरा दिवसाच्या कायरोमधील घडामोडीविषयी सीएनएन तसेच आपल्याकडील विविध न्यूज चॅनेल्सवर जी लोकक्षोभाची, मोर्च्यांची, मुबारकविरोधी घोषणांची दृष्ये वारंवार दाखविली जात होती ती पाहताना 'युवा' वर्गाच्या घोळक्याकडे लक्ष जात असे. त्यातील काही टीव्ही कॅमेर्यासमोर येऊन अरबी भाषेत घोषणा देतादेता आपल्या टी शर्टावर असलेल्या वा हातात असलेल्या एका पोस्टरकडे बोटे दाखवित. ते काय म्हणत असतील याचा तर्क करण्याचे खरे तर काहीच कारण नव्हते हे अशासाठी म्हणत आहे की त्या टी शर्टवरील एक युवा नेता काय किंवा घोषणा देणार्याच्या हातातील पोस्टरवरील 'ती' जगप्रसिद्ध पोझकाय...."क्रांती" संदर्भात माहिती ठेवणार्या जगातील जवळपास सर्वच देशातील युवाच नव्हे तर आता अगदी साठी ओलांडलेल्या ज्येष्ठांनाही माहीत आहे... त्या 'क्रांतीवीरा'चे नाव 'अर्नेस्टो चे ग्वेव्हरा' किंवा 'चे ग्वेरा....' पण या सर्वापेक्षाही साध्या 'चे' या नावाने प्रसिद्ध असलेला 'युथ आयकॉन' ~
" alt="CheO" />
वयाच्या अवघ्या पंचविशीतच लॅटिन अमेरिकेतील सर्वच लहानमोठ्या राष्ट्रातील युवावर्गाचा 'हीरो' आणि तिशी ओलांडायच्या आतच अमेरिकेला त्याच्याविषयी वाटणारी धाक, तर रशिया आणि चीन सारख्या साम्यवाद्यांना त्याच्या नावाने उफाळून आलेले प्रेम, हे सर्वदूर पोचले. 'क्युबा' च्या फिडेल कॅस्ट्रोचा "उजवा हात" अशी त्याची ओळख करून देणे म्हणजे 'चे' वर अन्याय होईल. कारण मुळात तो क्यूबन नसूनही क्युबा त्याच्या अलोट प्रेमात पडली होती [इतकी की खुद्द फिडेललाही त्याचा वचक वाटावा अशी परिस्थिती]. त्याच्या चेहर्यातच क्रांतीवीराच्या अशा काही खुणा होत्या की, त्याचे नाव आणि त्याचे फोटो या सर्वांची लॅटीन अमेरिका आणि युरोपिअन देशातील युवकांना भुरळ पडली होती. निव्वळ राज्यक्रांतीच नव्हे तर विद्यार्थी वर्ग आपल्या मागण्यासाठी कॉलेज, विद्यापीठ वर मोर्चा नेताना 'चे' चा मागेपुढे फोटो असलेले शर्ट अंगात घालत. मुली त्याचे फोटो असलेल्या चेन्स घालून तर ज्येष्ठ हात उंचावून त्याचीच अदा करीत आजुबाजूला असणार्यांनी 'चे' चा संदेश देत.
" alt="CheC" />
(कायम मित्र आणि सहकारी राहिलेले दोन क्रांतीवीर ~ चे आणि कॅस्ट्रो)
कलकत्यात अर्नेस्टोचे नाव असणे नाविन्याचे वाटणार नाही, पण जेएनयु आणि दिसू च्या संघटना 'चे' च्या तस्विरी आपल्या कार्यालयात ठळकपणे लावीत....इतके 'चे' विषयी सर्वांना प्रेम. वयाची पस्तिशी ओलांडायच्या आतच या तरूण नेत्याची मोहिनी जगभरातील क्रांतिकारकांत निर्माण झाली...आणि हा युवा जणू काही जगातील सर्वच युवकांचे प्रश्न सोडविणार अशीच हवा झाली. आज 'चे' च्या मृत्युला ४० वर्षे होऊन गेली, तरीही 'इजिप्त'च्या निमित्ताने ठळकपणे दिसून आले की त्याच्या मृत्युनंतर जन्माला आलेली पिढीही त्याला विसरायला तयार नाही. क्वचितच असे हेवा वाटण्यासारखे भाग्य एखाद्या नेत्याच्या नशिबी येत असेल.
कोण होता हा "अर्नेस्टो चे ग्वेव्हरा"?
१४ जून १९२८ रोजी रोझॅरिओ, अर्जेन्टिना येथे डाव्या विचारसरणीच्या कुटुंबात जन्मलेल्या अर्नेस्टोने (त्याचे 'चे' असे सुटसुटीत नामकरण नंतर झाले आणि ते जगभर इतके लोकप्रिय झाले की पुढे तो सहीही 'Che' इतकीच करत असे) लहाणपणापासूनच राजकारण आणि समाजकारणाचे धडे वडिलाकडून गिरविले होते. त्याचे वडीलही स्पॅनिश यादवी युद्धात रीपब्लिकनांचे खंदे समर्थक होते. शाळेत आणि महाविद्यालयात चे एक खेळाडू (अॅथलेटिक्स, बुद्धिबळ, फुटबॉल, जलतरण आदीमध्ये तो पारंगत होता) म्हणून जसा प्रसिद्ध होता तशीच त्याला सायकलींग आणि मोटारसायकलचीही आवड होती.
शिक्षणाची आवड आईवडील आणि सर्वच भावंडात असल्याने घरीही मोठे ग्रंथालय असल्याने वाचनाची भूक जशी वाढली तसे त्याने कवितामध्ये रस घेण्यास सुरूवात केली. पाब्लो निरुदा, कीट्स, वॉल्ट व्हिटमन आणि किपलिंग हे जसे त्याला प्रिय होते; त्याचप्रमाणे गद्य लेखनात कार्ल मार्क्स, विल्यम फॉकनर, आन्द्रे गिद, ज्युल्स व्हर्न यांचीही मोहिनी त्याच्यावर पडली होती. साहित्याची आवड असलेल्या कोणत्याही युवकाला जसे त्या त्या वयात काफ्का, काम्यू, लेनिन, सार्त्र भावतात तसे चे यालाही ते भावत असत [पुढे तर पॅरिसमध्ये त्याची सार्त्रसमवेत भेटही झाली...तो उत्कृष्ट फ्रेंच भाषा बोलत असे). इतकेच काय जवाहरलाल नेहरुंचेही साहित्य त्याने वाचले होते. तत्वज्ञान, गणित, अभियांत्रिकी, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, पुरातत्वशास्त्र हे त्याच्या आवडीचे विषय होते. [पुढे १९५८ मध्ये सीआयएने "अमेरिकेने ज्याच्यापासून सावध राहिले पाहिजे" अशा व्यक्तींच्या यादीत चे ग्वेव्हराचे नाव नोंदविताना त्याच्या नावासमोर "व्यापक वाचन केलेला युवक" तसेच "इतर लॅटिनोंच्या तुलनेत फारच बुद्धीमान" असा उल्लेख केला होता.
" alt="CheD" />
(पॅरिसमध्ये थोर लेखक ज्याँ पॉल सार्त्र आणि लेखिका सिमॉन बुव्हॉ यांच्यासमवेत 'चे')
पुढे ब्युनोस आर्यस येथे वैद्यकिय शिक्षण घेतानाच त्याला लॅटिन अमेरिकेतील छोट्या छोट्या देशात असलेल्या विषमतेची जाणीव व्हायला लागली. पण केवळ ऐकिव बातम्यावर विसंबून न राहता चक्क एकट्याने त्या काळात मोटारसायकलवरून त्याने फक्त अर्जेन्टिनाच नव्हे तर चिली, पेरु, इक्वेडर, व्हेनेन्झुएला, कोलंबिया, पनामा आदी देशात जवळपास १५ हजार किलोमीटर्सचा प्रवास करून त्या त्या देशात अगदी हुकूमशाही पध्द्तीने चाललेला राज्यकारभार नोंदविला. भयाण दारिद्र्य, रोगराई, शिक्षणाचा अभाव, दोन नव्हे तर एका वेळेच्याही जेवणाचे भ्रांत असलेली जनता....असमानता. सत्तेत असलेल्या राज्यकर्त्याना असलेला 'अंकल सॅम'चा छुपा नव्हे तर उघड पाठिंबा. छोट्या स्वरूपातील या देशांनी आता एकत्र येवून 'हिस्पानिक अमेरिका' नावाचे एकच राष्ट्र स्थापन केले तर जगातील बड्यांना ते तोंड देऊ शकतील आणि तेच शेवटी त्याच्या सर्व रोगावरील रामबाण औषध होईल ही कल्पना मनी ठेवून तो ब्युनोस आर्यस येथे शिक्षण पूर्ण करण्यास परतला आणि १९५४ मध्ये "डॉक्टर" ही झाला. पदवीनंतर समाजसेवेच्या निमित्ताने त्याची अथक भटकंती सुरूच होती आणि या खेपेस लॅटिन अमेरिकेतील बोलिव्हिया, कोस्टा रिका, निकारागुआ, होंडुरास, अल साल्व्हदोर या राष्ट्रातील समाजजीवनाची पाहणी मोटारसायकलने प्रवास करून पूर्ण केली. अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशाने पैसा आणि लष्कराच्या ताकदीवर येथील सत्तेवर कसा अंकुश ठेवला होता याची नोंद करूनच तो ग्वाटेमाला येथील राज्यकारभारात गुंतला.
ग्वाटेमालातील आर्बेन्झचे सरकार हुसकावून लावून आपल्या पठडीतील कार्लोस अर्मासला राष्ट्राध्यक्ष बनविण्यासाठी अमेरिकेने केलेल्या यशस्वी प्रयत्नाने चे अमेरिकाचा कट्टर विरोधक बनला त्यामुळे सीआयएने देखील चे ग्वेव्हरा हे नाव कायमचे पुसून टाकण्यासाठी "संभाव्य टार्गेट" मध्ये नोंदवून ठेवले. एक फर्डा वक्ता म्हणून त्याचे नाव सर्वत्र गाजत होतेच. पुढे तो 'क्युबा' मध्ये पोहोचला आणि १९५४-५५ मध्येच तो फिडेल कॅस्ट्रोच्या सहवासात आला. इथे खर्या अर्थाने त्याला 'क्रांती' ची दिशा आणि ती अंमलात आणण्यासाठी कशाप्रकारची तयारी आणि निर्धार नेत्याकडे हवा असतो याचे प्रमाण मिळाले. कॅस्ट्रोलाही चे याचे नाव आणि लॅटिन अमेरिकेत त्याच्या नावाने होत असलेला उदोउदो माहीत असल्याने असला तगडा युवक आपल्याकडे असणे स्वागतार्हच वाटले आणि त्यामुळे कॅस्ट्रो आणि चे ह्या जोडगळीचे मिलिटरी पोषाखातील फोटो इंग्लंड आणि अमेरिकाच काय पण युरोपातील अन्य कम्युनिस्ट राष्ट्रातही झळकू लागले.
" alt="CheE" />
(जगप्रसिद्ध 'टाईम' मॅगेझिनकडून मुखपृष्ठावर झळकण्याचा मान)
ग्वाटेमालाच्या कटू अनुभवामुळे तो आपल्या पत्नीसह (हिल्डा, मूळची 'पेरू' नागरीक असलेली पण ग्वाटेमालामध्ये काम करणारी आणि समाजसेविका...जिच्याशी त्याने १९५५ मध्ये विवाह केला होता) मेक्सिकोत आला व तिथूनच त्याने फिडेल कॅस्ट्रोशी हातमिळवणी केली. दोघांनी संयुक्त प्रयत्नाने क्युबातील अमेरिकन पाठिंब्याने टिकून राहिलेली 'जनरल बतिस्टा' ची सत्ता उलथून टाकून शेतकरी-कष्टकर्यांचेच राज्य आणायचे म्हणून गुरिल्ला पध्द्तीने क्रांती घडविणे या निर्धाराने ८० स्वयंसेवकांसह १९५६ मध्ये क्युबाच्या पर्वतराशीत एकत्र आले. बटिस्टाच्या सैन्याने केलेल्या गोळीबारात ही दोघे आणि केवळ १६ युवक आणि १२ रायफली उरल्या. पण एवढ्याच तुटपुंज्या शक्तीवर गनिमी काव्यानी या दोघांनी ठिकठिकाणी सशस्त्र हल्ले करून सैन्यास बेजार करून सोडले. अर्थात क्युबातील शेतकरी वर्गाचाही या क्रांतिकारकांना सक्रीय पाठिंबा होताच कारण बटिस्टा सरकारच्या जुलूमी कारभाराची कडू फळे त्याना चाखावी लागत होतीच. कॅस्ट्रो आणि चे याना मिळत असलेला वाढता पाठिंबा आणि त्यांच्या गटात मोठ्या संख्येने सामील होत असलेले क्यूबन युवक पाहून बटिस्टा सरकारने गावागावातून दमननिती क्रूरपणे अंमलात आणली. पण याचा खरेतर उलटाच परिणाम झाला. आता केवळ युवकच कॅस्ट्रो आणि चे यांचे दिवाने झाले नव्हते तर मोठमोठ्या संस्थानीही (ज्यात क्युबातील शिक्षणतज्ज्ञ, वकील, इंजिनिअर, आर्किटेक्ट, डॉक्टर्स, बॅन्कर्स आदींचा समावेश होता) या क्रांतीकारकांना लेखी पाठिंबा दिला. केवळ गरीब आणि पिचलेलेच नव्हे तर मध्यमवर्गींयानीही या जोडगळीला आपले मानले. शेवटी अमेरिकेने क्रांती विफल करण्यासाठी कितीही लष्करी साहाय्य दिले तरी कॅस्ट्रो आणि चे यानी धीराने त्या ताकदीला स्थानिकांच्या मदतीने तोंड दिले. १९५८ मध्ये अंतर्गत युद्धात हजारो सरकारी सैनिक युद्धात मारले गेले पण जे पकडले गेले त्यांच्याविरूद्ध कॅस्ट्रो आणि चे यानी मवाळ धोरण ठेवून त्याना कोणतीही पुढील पिडा होणार नाही हे दक्षतेने पाहिले. त्यामुळे झाले असे की खुद्द बटिस्टाच्या सेवेत असलेल्या सैनिकांची सहानुभूतीही क्रांतीकारकांकडे वळली....आणि शेवटी जनतेचा कल पाहून अमेरिकेच्या हातचे बाहुले बनलेल्या जनरल बटिस्टाने प्रेसि.आयझनहॉवर यांच्या सल्ल्याने क्युबात सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली, पण आता क्रांतीकारकांना आपल्या गळ्यातील ताईत मानलेल्या क्युबन जनतेने या निवडणुकीवर पूर्ण बहिष्कार टाकला आणि ते पाहून पर्वतराशीत राहून गनिमी काव्याने सैन्याला भंडावून सोडलेल्या कॅस्ट्रो आणि चे च्या साथिदारांनी उघडपणे राजधानी 'हवाना' मध्ये प्रवेश केला....जनरल बटिस्टाने त्या अगोदरच देशातून पलायन केले आणि मग जानेवारी १९५९ मध्ये क्रांतीचे नेते 'फिडेल कॅस्ट्रो' क्युबाचे प्रमुख बनले....ते अगदी २००८ पर्यंत बिनविरोध (यांच्याविषयी स्वतंत्र लिहिणे गरजेचे आहे). कॅस्ट्रोचा उजवा हात असलेल्या मूळच्या अर्जेन्टिनाच्या चे ग्वेव्हराने आता 'क्युबन नागरिकत्व' पत्करले आणि त्या देशातील तळागाळातील लोकांमध्ये प्रत्यक्ष त्यांच्यासमवेत तो आता काम करू लागला. डॉक्टर तर होताच पण आता तो एक 'ऊस शेतकरी' बनला आणि साखरचे उत्पादन करणार्या कारखान्यात चक्क फॅक्टरी वर्करसारखी कामेही करू लागला. युरोपिअन देशातील कुणी पत्रकार त्याला भेटण्यासाठी वा मुलाखतीसाठी आला तर तो त्याना सरळ ऊसाच्या कापणीसाठी आमंत्रित करत असे आणि दोनतीन तास त्याना 'कामाला' लावल्यानंतरच हसतहसत त्याना मुलाखत देत असे. पुढे कॅस्ट्रो सरकारच्या मंत्रीमंडळात त्याने १९६१-६५ या कालावधीत उद्योग मंत्री म्हणूनही काम पाहिले.
१९५९ ते १९६१ या तीन वर्षात चे ने चीन आणि रशियाचे दौरे केले आणि तेथील साम्यवादी नेत्यांसमवेतच्या चर्चेतून त्याने काही नोंदीही केल्या. १९५९ मध्ये तर 'चे' भारतातही आला [त्या अगोदर तर इजिप्तला भेट देऊन त्यावेळेचे अध्यक्ष नासेर यांच्याशीही त्याने बातचित केली होती]
" alt="CheF" />
(१९५९ मध्ये भारत भेटीत पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्याशी भेट)
आणि पंडित जवाहरलाल नेहरू याना भेटून कॅस्ट्रोकडून आणलेली एक भेट त्याने पंडितजीना दिली. भारताच्या भेटीत केवळ दिल्ली आणि कलकत्ताच नव्हे तर उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागांना त्याने भेटी दिल्या. इथल्या प्रचंड लोकसंख्येने (त्यावेळी ४५ कोटी) भरलेला हा देश किती वैविध्यतेने नटलेला आहे याच्या नोंदीही त्याच्या पुस्तकात सापडतात. 'गाय ही भारतीयांना पूजनीय का वाटते?' या प्रश्नाचेही त्याने उत्तर शोधून काढून भारत आणि गाय यांचे पवित्र नाते त्याने नोंदविले आहे. त्याचा देखणेपणा, सतत हसतमुख वर्तन, प्रभावी वक्ता, साधी राहणी (जवळपास सर्वच फोटो एका ठराविक ऑलिव्ह ग्रीन मिलिटरी ड्रेसचे तरी आहेत किंवा शेतात वा फॅक्टरीत केवळ डंगरी, किंवा पॅण्ट घालून काम करतानेच आहेत. पं.नेहरू असोत, माओ असो, नासेर असो वा यू.पी.मधील एखादा किसान असो, ड्रेस मिलिटरी सैनिकाचाच...) यामुळे जगभरातील युवकांचा तो लाडका आणि क्रांतीचा 'आयकॉन' बनला.
फिडेल कॅस्ट्रोची क्युबातील वाढती आणि चे ग्वेव्हराबद्दल एकूणच जगातील युवकात वाढत चाललेले प्रेम तसेच याना मिळत असलेला रशियाचा वाढता पाठिंबा नोंदवून घेत असता अमेरिकेन सीआयएच्या कारवाया थांबणे शक्यच नव्हते. क्युबाच्या बटिस्टा राजवटीशी एकनिष्ठ पण आता परांगदा असलेल्या काही असंतुष्ट क्युबनना हाती धरून सीआयएने आयझेनहॉवरच्या अध्यक्षीय कारकिर्दीतच क्युबावर हल्ला करण्याची योजना आखली ज्याला पुढे प्रेसिडेंटपदी आलेल्या जॉन केनेडी यानी हिरवा कंदील दाखविला होता...हे प्रकरण "ऑपरेशन बे ऑफ पिग्ज" या नावाने इतिहासात नोंदविले गेले आहे. कॅस्ट्रो, चे आणि त्यांच्या अन्य नीडर नेत्यांनी, तसेच त्यांच्या सैन्यानी योग्य त्या प्रतिकाराने विफल करून अगदी युनोच नव्हे तर जगभर अमेरिकेचे हसे करून टाकले. केनेडीसारख्या नेत्याने आपली चूक तात्काळ ओळखून क्युबातून अमेरिकेचे सैनिक काढून घेऊन एकप्रकारे कॅस्ट्रो आणि चे यांची प्रतिमा आणखीनच उजळ केली.
पुढे ऑगस्ट १९६१ मध्ये उरुग्वे येथे भरलेल्या अर्थविषयक बैठकीला चे ग्वेव्हरा हजर असता त्याने तिथेच आलेल्या व्हॉइट हाऊसचे सचिव रिचर्ड गूडविन यांच्यातर्फे प्रे.जॉन केनेडीला एक मजेशीर पत्र पाठविले. त्यात चे म्हणतो, "बे ऑफ पिग्जची योजना आखल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमच्या आक्रमणापूर्वी आमची क्यूबन क्रांती काहीशी मलूल झाली होती, पण आता तुमच्यामुळेच तिला नवीन ऊर्जा प्राप्त झाली जी कायमपणे टिकेल...."
पण जगात आता 'क्युबा' चे स्थान भक्कम झाले असल्याने 'माझी आता इथे गरज आहे का?" असा प्रश्न त्याला पडू लागला.कदाचित यामुळेच आपण आपले आयुष्य 'मंत्री' म्हणून सुखात न काढता इतरत्र विखुरल्या गेलेल्या आणि पिचलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी काम करणे आवश्यक आहे याची टोचणी त्याला लागली. तसेच क्रांती यशस्वी झाल्याने क्युबामधील राहाण्याचा आपला हेतू आता सफल झाला असून लॅटिन अमेरिकेतील अन्य अशाच एखाद्या राष्ट्रासाठी आपली सेवा देणे गरजेचे आहे असे त्याला तीव्रतेने वाटू लागले. मग १९६५ च्या एप्रिल महिन्यातील अशाच एका सायंकाळी त्याने फिडेल कॅस्ट्रोला एक प्रदीर्घ पत्र लिहून 'माझे क्युबातील काम संपले असून मी आता इथून जाणे गरजेचे आहे...' असे सांगितले ["मी क्युबा का सोडीत आहे...." याची कारणमीमांसा दाखविणारे एक पत्र त्याने फिडेल कॅस्ट्रोला लिहिले. पुढे कॅस्ट्रोने 'चे' कुटुंबियाच्या उपस्थितीत त्या दीर्घ पत्राचे टेलिव्हिजनवर जाहीर वाचन केले होते.] आणि त्याच पत्रात मंत्रीपदाचा राजिनामा देवून त्याने क्युबाला आभारपूर्वक रामराम केला....कायमचा...आणि त्याचवेळी क्रांतीच्या ज्वालेले घेरलेल्या आफ्रिकेतील कांगोत आणि नंतर बोलिव्हियात त्याने तेथील क्रांतीकारकांचा नेता म्हणून जनसेवेचा पुन:श्च ओनामा केला. १९६६ मध्ये अगदी खोलवर जाऊन त्याने बोलिव्हियनांची संघटना बांधली पण १९६७ संपतासंपता सीआयएने शेवटी बोलिव्हियन आर्मीला दिलेल्या ट्रेनिंग आणि शस्त्रांच्या घाऊक मदतीमुळे 'अर्नेस्टो चे ग्वेव्हरा' त्यांच्या हाती जखमी अवस्थेत सापडला आणि त्याच्यावर लागलीच बोलिव्हियाच्या आर्मीकडूनच गोळ्या घातल्या गेल्या ज्यात तो ९ ऑक्टोबर १९६७ रोजी गतप्राण झाला...वयाच्य ३९ व्या वर्षी. १० आक्टोबरला बोलिव्हियन सरकारने अधिकृतरित्या 'चे' च्या मृत्यूची घोषणा केली. पण त्याचे प्रेत क्युबाच्या हवाली करण्यात आले नाही, इतकेच नव्हे तर त्याचे दफन करण्यात आले की दहन याचाही पुढे कित्येक वर्षे सुगावाही लागला नाही. मात्र पुढे १९९५ मध्ये 'अर्नेस्टो चे ग्वेव्हरा'चे चरित्र लिहिणार्या जोन ली अॅन्डरसन या लेखकास बोलिव्हियन आर्मी जनरलने सांगितले की, "मध्य बोलिव्हियाच्या व्हॅलेग्रॅन्ड या गावाच्या परिसरातील एका डोंगराळ भागात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेल्या स्मशानभूमीत त्याचे शरीर दफन करण्यात आले होते...". मात्र असे असले तरी १९९७ मध्ये त्यावेळेच्या बोलिव्हिया सरकारने त्यांच्याकडे असलेला 'चे' च्या अस्थी आणि अन्य सर्व वस्तू फिडेल कॅस्ट्रोकडे परत पाठविल्या. क्युबानेही अत्यंत शोककुल वातावरणात आपल्या या लाडक्या युवा नेत्याच्या त्या अस्थींचे विधिवत सान्ता क्लारा येथे सरकारी इतमामाने दफन केले. या प्रसंगी खुद्द फिडेल कॅस्ट्रो आणि लाखो 'चे' प्रेमी उपस्थित होते.
" alt="CheF" />
(बोलिव्हियन आर्मीकडून युद्धात वीरमरण)
अर्नेस्टो चे ग्वेव्हरा....४५ वर्षे पूर्ण होत आली त्याच्या मृत्युला पण त्याचा फोटो.... (जगात सर्वाधिक प्रती निघाल्याचा इतिहास आहे असा हा बेफाट लोकप्रियता लाभलेला फोटो....) आजही जिथेजिथे क्रांतीची गरज आहे असे वाटते तिथेतिथे क्रांतीकारकांसाठी एक प्रतिक बनला आहे !!
" alt="CheB" />
इन्द्रा
[लेखनासाठी : पावलो इव्हान्स आणि किम हिली यांच्या Argentine Marxist revolutionary and Guerrilla Leader तसेच The death of Che Guevara : A chronology या लेखांचा, तसेच "Red Envelope Entertainment" यानी सन २००८ मध्ये निर्मित आणि वितरीत केलेला "Chevolution" हा जवळजवळ दीड तासाच्या माहितीपटातील धावते वर्णन यांचा उपयोग झाला आहे. 'चे' संदर्भातील सर्व फोटो विकीपिडीयावरून साभार...ते "कॉपीराईट अॅक्ट" खाली आलेले नाहीत याची खात्री केली आहे !)
वर्गीकरण
अप्रतिम लेख...
सुरेख
In reply to सुरेख by सुनील
श्री.अरूण साधू....!
अत्यंत माहितीपूर्ण लेख...
मस्त
In reply to मस्त by बेसनलाडू
टिटो
In reply to टिटो by सुनील
सहमत
In reply to सहमत by बेसनलाडू
लेख....!!
:-)
In reply to :-) by सहज
महत्त्वाचे मुद्दे
In reply to :-) by सहज
ग्वेव्हरा बद्दल आजवर फार
मस्त
छान माहितीपुर्ण
चे गव्हेराविषयी
पूजा आणि उत्तरपूजा
छान लिहिले आहेस रे. या
अतिशय सुंदर माहिती .. नावा
सुंदर
आभारी आहे.....
छानच लिहीले आहेस रे.
सहजरावांनी उपस्थित केलेले
मस्त.
श्री.सहज, श्री.बे.ला.,
In reply to श्री.सहज, श्री.बे.ला., by इन्द्र्राज पवार
चे
असामान्य लेख
अत्यंत माहितीपूर्ण लेख.
अत्यंत माहितीपूर्ण लेख व