मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी शब्द हवे आहेत.

कलंत्री · · काथ्याकूट
माझ्या मित्राने मला काही इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द हवे आहेत असे विचारले. काही शब्दांना मी प्रतिशब्द देऊ शकलो, परन्तु काही शब्दासाठी माझे मात्र समाधान झाले नाही म्हणून हा प्रपंच. १. पर्फॉमन्स पे किती मिळणार आहे ते सांग?. २. ती / तो स्टेजवर परफॉर्म करणार आहे. ३. तिचा स्टेज परफॉर्मन्स चांगला आहे. ४. माझ्याकडून मी चांगला परफॉर्म करणारच आहे. ५. शेवटी परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे. या सगळ्या वाक्यात परफॉर्म हा शब्द येत असला तरी मराठीतील मात्र शब्द च्छटा मात्र वेगळ्या असाव्यात. वरील वाक्यातील इंग्रजी शब्दांना मराठीतील शब्द सूचवावा ही विनंती. कलंत्री.

वाचने 11204 वाचनखूण प्रतिक्रिया 39

गणपा Mon, 02/14/2011 - 21:34
>>पर्फॉमन्स पे किती मिळणार आहे ते सांग?. सादरीकरणाचे पैसे किती मिळणार आहे ते सांग?. >>ती / तो स्टेजवर परफॉर्म करणार आहे ती / तो स्टेजवर गाणं/नाच/प्रबंध सादर करणार आहे. >>तिचा स्टेज परफॉर्मन्स चांगला आहे. तिच स्टेज वरिल सादरीकरण चांगल आहे. >> माझ्याकडून मी चांगला परफॉर्म करणारच आहे. माझ्याकडून मी चांगलं सादर करणारच आहे. >>शेवटी परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे. शेवटी सादरीकरण महत्त्वाचं आहे. -सादर प्रणाम ;)

In reply to by गणपा

छोटा डॉन Mon, 02/14/2011 - 21:45
'पर्फॉमन्स पे' हे जर एखाद्या कार्यक्रमाशी संबंधित असेल तर त्याला 'सादरीकरणाचे पैसे उर्फ मानधन' हा पर्यायी शब्द मी सुचवतो. जर ते आपल्या पगाराशी संबंधित असेल तर मात्र त्याला वेगळा शब्द हुडकावा लागेल, लवरकच कळवतो. बाकी गणपाशी सहमत .. >>पर्फॉमन्स पे किती मिळणार आहे ते सांग?. मानधन किती मिळणार आहे ते सांग?. - ( मानधनप्रेमी ) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

गणपा Mon, 02/14/2011 - 21:58
मानधन हा शब्द जास्त योग्य वाटतो. येस्सार, जरा घाई घाईत टंकला वरचा प्रतिसाद. थोडा विचार केला असता तर सुचल असतं. :)

In reply to by गणपा

रमताराम Mon, 02/14/2011 - 23:42
नाय हो. मानधन हा शब्द honorarium किंवा remuneration साठी अधिक चपखल बसेल. 'परफॉर्मन्स पे' साठी 'कार्याभिवृद्धी वेतन' कसे वाटते. (हाण्ण तिज्यायला, कै च्या कै.)

In reply to by रमताराम

अहो मराठी शब्द मागितले आहेत कलंत्री काकांनी, तुम्ही काय उगाच परभाषेतले शब्द फेकता आहात? ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रमताराम Tue, 02/15/2011 - 00:04
आता तो शब्दच तसा आहे त्याला काय करणार. अवांतरः यावरून एका नाटकातील 'भाड्याने गाडी आणली आहे' यावरील कोटिक्रम आठवला.

In reply to by यशोधरा

व्यासपीठ? व्यासपीठावर लावणी पण सादर होऊ शकते का? त्यापेक्षा रंगमंच, मंच हे ही वापरले जाऊ शकतात.

मुलूखावेगळी Mon, 02/14/2011 - 21:40
मला वाटला तो बदल असा >>ती / तो स्टेजवर परफॉर्म करणार आहे ती / तो व्यासपीठवर सादरीकरण करणार आहे. >>तिचा स्टेज परफॉर्मन्स चांगला आहे. तिच व्यासपीठावरिल सादरीकरण चांगल आहे.

In reply to by मुलूखावेगळी

रेवती Mon, 02/14/2011 - 22:37
सादरीकरण आणि करणार हे दोन्ही शब्द वापरण्यापेक्षा त्याचे / तिचे व्यासपिठावर सादरीकरण आहे हे बरोबर वाट्टय का?

In reply to by स्वाती२

गणपा Mon, 02/14/2011 - 22:27
वर बहुतेक उदाहरणात स्टेजचा उल्लेख आल्याने माझा तसा समज झाला होता. जर तुम्ही म्हणताय तसा अर्थ घ्यायचा तर कामगीरी-भत्ता / बक्षिस म्हणावं का?

धनंजय Tue, 02/15/2011 - 00:23
(गणपा यांच्या सर्व सुचवण्या आवडल्या. जवळजवळ त्याच पुन्हा देत आहे.)
१. पर्फॉमन्स पे किती मिळणार आहे ते सांग?.
कामगिरीसाठी वाढीव पगार किती मिळणार आहे, ते सांग. (कामगिरी-भत्ता - गणपा यांची छान सुचवणी.)
२. ती / तो स्टेजवर परफॉर्म करणार आहे.
ती / तो रंगमंचावर सादरीकरण/पेशकारी/कार्यक्रम करणार आहे.
३. तिचा स्टेज परफॉर्मन्स चांगला आहे.
रंगमंचावरचे/ची तिचे/ची सादरीकरण/पेशकारी चांगले/ली आहे.
४. माझ्याकडून मी चांगला परफॉर्म करणारच आहे.
माझ्याकडून मी चांगली कामगिरी करणारच आहे. (हे वाक्य इंग्रजीत रंगमंचासंदर्भात वापरत नाहीत. शरीरसंबंधाच्या संदर्भातही वापरतात. त्या संदर्भात मराठी शब्द वेगळा असेल.)
५. शेवटी परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे.
शेवटी कामगिरी महत्त्वाची आहे. (रंगमंचाच्या संदर्भात सादरीकरण किंवा पेशकारी)

स्वैर परी Tue, 02/15/2011 - 11:00
मला perfect या शब्दाचा मराठीत अर्थ हवा आहे! कृपया सांगावा!

In reply to by स्वैर परी

kamalakant samant Tue, 02/15/2011 - 11:52
तुम्हाला तो शब्द कसा वापरायचा आहे त्यानुसार खालील मराठी शब्द वापरून पहा. अचूक/निखालस/पूर्णपणे इ.

अमित देवधर Tue, 02/15/2011 - 11:39
योगप्रभूंशी सहमत. सादरीकरण हा शब्द 'सादर करणे' या बाजूला जास्त झुकतो, म्हणजे इंग्रजीमध्ये 'to present' या शब्दाजवळ जातो. याला 'कोणातरी समोर' असं अध्याहृत गृहीतक आहे. कामगिरी हा शब्द 'to perform' याचा इंग्रजीमधल्या अर्थाच्या अधिक जवळ जाईल, असं दिसतं. 'to perform' हा शब्द इंग्रजीमध्ये व्यासपीठावर, ऑफिसमध्ये किंवा सर्वसामान्य अर्थाने, कसाही वापरला जाऊ शकतो.

kamalakant samant Tue, 02/15/2011 - 11:42
तुम्हाला बहुधा दोन इ॑ग्रजी शब्दा॑साठी पर्यायी शब्द हवे आहेत असे वाटते. एका इ॑ग्रजी शब्दाला मराठीमध्ये अनेक छटा असलेले शब्द आहेत्.वापर परिस्थितीनुसार करावा लागतो. १-स्टेज =र॑गम॑च २- परफॉर्म=आविश्कार्/योगदान/कर्तुत्व/प्रभाव/कामगिरी/कलाविष्कार इ. आणखी शोधायला हवेत.

In reply to by kamalakant samant

योगप्रभू Tue, 02/15/2011 - 12:32
दोन भाषांमधील शब्द एकमेकांच्या जवळ जात असले तरी अर्थांच्या सूक्ष्म छटेनुसार त्यांच्यात फरक होतो. त्यामुळे पहिला वापर हा समावेशक (कॉम्प्रिहेन्सिव्ह)/सामान्य किंवा ढोबळ (जनरल) असला तरी लवकरात लवकर अचूकता/चपखल (प्रिसिजन) आणण्याकडे लक्ष देणे चांगले. डायस/फोरम - व्यासपीठ स्टेज - मंच/रंगमंच चेअर - अध्यासन आविष्कारला परफॉर्म म्हणणे ढोबळ वाटते. आविष्कारला चपखल बसणारा इंग्रजी शब्द म्हणजे मॅनिफेस्टेशन (स्वामी विवेकानंद म्हणतात 'मॅनिफेस्टेशन ऑफ द डिव्हायनिटी विदिन' म्हणजेच अंतःकरणातील दिव्यत्वाचा (दैवी) आविष्कार) योगदान - काँट्रिब्युशन प्रभाव - इम्पॅक्ट. हाच प्रभाव स्मृतीत कोरला जातो तेव्हा त्याचा ठसा=इम्प्रेशन होतो.

अमित देवधर Tue, 02/15/2011 - 11:46
जर 'performance pay' याला विशिष्ट शब्द हवा असेल, तर काम आणि वेतन याचा समास करून 'कार्यवेतन' असा शब्द करता येईल. समास करायचा आहे म्हणून काम ऐवजी कार्य हा शब्द वापरला आहे.

In reply to by मुलूखावेगळी

गवि Tue, 02/15/2011 - 12:11
कामाबद्दल ठरलेला किमान देय पैसा असतो तो पगार. कला सादर करण्याचा पगार तो म्हणजे मानधन. (म्हणण्याची पद्धत..) परफॉर्मन्स पे मधे ठरलेल्या कामात कंप्लायन्स, किमान अपेक्षा, वेळेत इ इ पूर्ण करणे आणि प्रसंगी त्याहूनही काही अधिक करुन दाखवणे (गोईंग एक्स्ट्रा माईल) अशासाठी दिलेले उत्तेजनपर बक्षीस असा अर्थ येतो.. म्हणून "बक्षिसी". आपण त्याला टिप सारखा वास येत असल्याने उगीच कमी लेखतो.

sagarparadkar Tue, 02/15/2011 - 12:12
अवांतराबद्दल आगाऊ क्षमस्व .... आपल्या अवतीभवती काही परोपदेशे पांडित्य पाजळणारे स्वयंघोषित उपदेशक वावरताना दिसतात. आपली पात्रता न ओळखता कोणालाही बिनदिक्कत उपदेश करण्यात यांचा हातखंडा असतो. आणि स्वतःविषयी त्यांचा असा गोडसा गैरसमज असतो कि "खरं तर आपण खूपच महान आहोत, पण भोवतालच्या पामरांना आपली महती कळतच नाही, म्हणून हे क्षुद्र लोक आपल्याला व्यासपीठावर बोलावून आपला सत्कार कधीच करत नाहीत" अशा लोकांसाठी मी "व्यासपीठवंचित" अशी शब्दयोजना केली आहे; पण त्यासाठी मला चपखल विन्ग्रजी शब्द अजून तरी सापडलेला नाहीये, तरी आपणापैकी कोणाला सापडल्यास कळवावे. ता.क. : stage deprived हे अगदीच शब्दशः भाषांतर वाटते आणि त्यावरून कोणाला काही उलगडा होईल असं वाटत नाही .

अमित देवधर Tue, 02/15/2011 - 13:30
मला वाटतं, बक्षीस हा शब्द 'टिप्स' च्या जवळचा आहे पण थोडा वरचा. केलेलं काम चांगलं झालं म्हणून देणे. मानधन हा शब्द, जेव्हा एखाद्या विशेष गुण असलेल्या माणसाला त्या गुणासंदर्भात एखादं काम करायला बोलावलं जातं, तेव्हा काहीतरी मोबदला दिला जाणार. तेव्हा त्याचं काम पगाररूपात मोजण्याऐवजी त्याला 'मानधन (मान करायचा म्हणून दिलेलं धन)' म्हणत असावेत. (कारण, आम्ही पैशासाठी आलो नाही वगैरे मतं असू शकतात.) उदा. नोकराला बक्षीस दिलं जाऊ शकतं, त्याला मानधन दिलं जाणार नाही. जर एखाद्या कार्यक्रमाला कोणा मोठ्या माणसाला बोलावलं किंवा त्याच्याकडून काही काम करून घेतलं तर, त्याला बक्षीस दिलं जाणार नाही, मानधन दिलं जाईल.

श्री.कलंत्री यांची जिज्ञासा-भूक ही 'स्टेज=रंगमंच' या घटकाशी संबंधित असल्याचे दिसत असल्याने श्री.गणपा यानी केलेली 'परफॉर्मन्स'ची मराठी सोडवणून स्वीकारावी लागेल. असे असले तरी पुढे काही प्रतिसादकांनी Performance Pay विषयी वेगवेगळी मते मांडली आहेत. त्या संदर्भात मला जी माहिती मिळाली त्यावरून असे म्हणतो की, सहाव्या वेतन आयोगात कमिशनने "Performance-Related Incentives" शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍यांना [अर्थात प्राध्यापकांना] देवू केलेला आहे....म्हणजे प्राध्यापकांनी नोकरीत असताना संशोधनाकडेही लक्ष देवून पीएच.डी. प्राप्त करावी. तसे केल्यास त्या "परफॉर्मन्स" बद्दल त्याना संबंधित वेतनश्रेणीत 'प्रोत्साहनपूरक' वेतनवाढ दिली जाईल. हीच ती Performance-Related Incentives (PRI). ~ याला शासकीय मराठी प्रतिशब्द आहे : "संपादणूक संबंधित प्रोत्साहन वेतन" त्यामुळे इथे Performance=संपादणूक असा अर्थ निपजतो. Honorarium आणि Remuneration मध्येही ढोबळमानाने फरक आहे. पहिल्याचा अर्थ आहे "मानधन".... तर दुसर्‍याचा अर्थ होतो "मोबदला" [शासकीय शब्द : "पारिश्रमिक वेतन"] उदा. ~ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना 'प्राध्यापक' पदाचा पगार मिळतो पण त्यानी त्याच दरम्यान रोटरी क्लब आयोजित वादविवाद स्पर्धेत परीक्षक म्हणून काम केल्यास ती संस्था त्याना त्या कामाबद्दल जे पैसे देईल त्याला 'Honorarium=मानधन' असे म्हटले जाते (या मानधनाचा आकडा किती असावा याला निश्चित असे मानदंड नाहीत...पण बर्‍यापैकी असते). मात्र त्याच आठवड्यात त्यानी त्यांच्याच कॉलेजमध्ये चालू असलेल्या विद्यापीठीय परीक्षेत एका ब्लॉकवर पर्यवेक्षक [Invigilator] म्हणून काम केले तर तेथील बिल्डिंग कंडक्टर त्याना त्या दोन-तीन तासाच्या कामाबद्दल जे [जादाचे] वेतन देईल ते Remuneration=मोबदला म्हणून गणले जाईल. हे Remuneration विद्यापीठाने ठरवून दिलेल्या चौकटीतील असल्याने इथे जादा वा कमी मानण्याचा प्रश्न येत नाही....सेवेचाच तो एक भाग असल्याने तक्रारही कुणी करत नाहीत. इन्द्रा

योगप्रभू Tue, 02/15/2011 - 14:19
अमित छान स्पष्ट करताहात तुम्ही. बरोबर आहे. बक्षिस म्हणजे रिवॉर्ड आणि छोटी बक्षिसी म्हणजे टिप. टिपचा लाँगफॉर्म आहे 'टु इन्श्युअर प्रॉमिस'. हॉटेलात आपण ऑर्डर दिल्यावर तेथील वेटर ते पदार्थ आपल्याला तत्परतेने आणून देण्याचे एकप्रकारे अभिवचन (प्रॉमिस) देत असतो. ही वचनपूर्ती केल्याबद्दल त्याला द्यायची बक्षिसी म्हणजे टिप. बक्षिस हे मालक आपल्या कर्मचार्‍याला देत असतो. इथे मालक उदारता दाखवत असतो. तो स्वतः उच्चस्थानी मानून कनिष्ठांच्या कामाचा गौरव करत असतो. मानधनात मात्र जिला मानधन द्यायचे ती व्यक्ती उच्च स्थानावर असते. तिच्या बुद्धिमत्तेप्रती आदर दाखवून सन्मानपूर्वक दिलेले धन म्हणजे मानधन. येथे मानधन देणारी संस्था/व्यक्ती ही उपकृत असते. संस्था आपल्या कर्मचार्‍यांना पगाराखेरीज जी अतिरिक्त रक्कम बक्षीसरुपात देते त्याला 'पर्क्स' म्हटले जाते आणि पगाराचाच भाग म्हणून काही रकमा वेगवेगळ्या शीर्षकांखाली समाविष्ट करुन दिल्या जातात. त्यांना 'अलाऊन्स' म्हटले जाते. मराठीत सध्या या दोन्ही प्रदानांना 'भत्ता' या एकाच शब्दाने ओळखले जाते.

सुधीर काळे Tue, 02/15/2011 - 19:52
जर ती व्यक्ती stageवर काय perform करणार हा संदर्भ कळल्यास नेमका अनुवाद करणे सोपे होईल. उदा: नाटकातले कामः रंगमंचावरील अभिनय/अभिनय सुंदर झाला लावणीचा कर्यक्रमः बारीवरील/रंगमंचावरील नृत्य/नृत्य सुंदर बहारदार झाले व्याख्यानः व्यासपीठावरील व्याख्यान/व्याख्यान माहितीपूर्ण आणि आवेशात झाले कामानुरूप मोबदला मिळेल

कलंत्री Tue, 02/15/2011 - 23:09
सर्व मिपामित्रांचे मनापासून आभार. मराठी शब्दांसाठी खूपच समर्पक आणि समृद्ध असे शब्द मिळाले. खरे तर माझ्या मित्राला स्टेज पर्फॉर्मन्स चांगला आहे यासाठी योग्य असा शब्द हवा होता. ( कोणत्यातरी दूरचित्र वाहिनीवर सूत्रसंचालक वीट येईल इतक्या वेळेस स्टेजपर्फॉर्मनस्न्स हा शब्द वापरत आहे आणि त्यासाठी मराठी शब्द नाही असे सांगीतल्या नंतर मी हा धागा सोडला). सर्व प्रतिसाद वाचत असतांना या साठी या अभिनेत्री / नर्तकीचा अविष्कार (सातत्याने) चांगला आहे असा शब्द मला जास्त चपखल वाटतो. बाकी इतर सर्व पर्यायीवाचक शब्द योग्य आणि अचूक आहेत. परत एकदा सर्वांचे आभार. आपल्या दैनदिन जीवनात असेच मराठी शब्द वापरत जा ही आग्रहाची विनंती.