सातारा रस्त्यावरच्या "अख्खा मसूर'वर बऱ्याच दिवसांपासून डोळा होता. कधीतरी त्याचं नाव कुणाकडून तरी ऐकलं होतं. तिथं जायचं डोक्यात होतं, पण योग येत नव्हता. तसा मी फारसा हॉटेलप्रेमी नाही. आहारात चवीपेक्षाही "उदरभरण नोहे' हा मंत्र जपणाऱ्या अंतू बर्व्याचेच आम्ही अनुयायी. त्यामुळं अमक्या हॉटेलात तमकी डिश चांगली मिळते वगैरे तपशील माझ्या गावी नसतात. कुणी सांगितलं आणि सहज जमलं, तर मी ठरवून एखाद्या हॉटेलाकडे वाट वाकडी करतो. नाहीतर कुठेही हादडायला आपल्याला चालतं.
तर सांगण्याचा मुद्दा काय, की काल त्या "अख्खा मसूर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हॉटेलात गेलो होतो. सिटीप्राईडच्या अगदी समोर असलेलं हे हॉटेल. "अख्खा मसूर' म्हणजे तिथे मसूराचे बहुविध पदार्थ मिळत असावेत, अगदी चटण्या आणि कोशिंबिरीही मसूर घालूनच करत असावेत, असा आपला माझा समज. तशी चौकशीही एकाकडे केली होती. पण प्रत्यक्षात तिथे "अख्खा मसूर' ही एकच डिश मिळते, हे प्रत्यक्ष गेल्यावरच कळलं. तिथेच आम्ही निम्मे खचलो. मुळात त्या हॉटेलचं नाव "अख्खा मसूर' नसून "जगात भारी कोल्हापुरी' असं असल्याचा साक्षात्कारही तिथे गेल्यावरच झाला. आत जाऊन उत्साहानं मेनू कार्ड बघितलं, तर तिथे मसुराशी संबंधित फक्त "अख्खा मसूर' ही एकच डिश असल्याचं लक्षात आलं. ती मागविण्यावाचून पर्याय नव्हता. मग त्यासोबत रोटी मागवली.
रोटी एकाच प्रकारची होती. "व्हीट' वगैरे भानगड नव्हती. तरीपण ती करण्याची प्रक्रिया मनस्वीला दाखवण्याची संधी साधता आली. "अख्खा मसूर'ची चव चाखल्यावर आपण घरात मसुराची उसळ यापेक्षा उत्कृष्ट बनवतो, हे लक्षात आलं. रोटी आल्यावर पदरी पडलं आणि पवित्र झालं या भावनेनं समोर ठेवलेलं हादडायला सुरुवात केली. त्याआधी सभोवार एकदा बघून घेतलं. सगळी टेबल भरली होती आणि लोकही अतिशय प्रेमाने तो अख्खा मसूर रिचवत होते. इतर कसे खातात, हे बघून खाणं बऱ्याचदा श्रेयस्कर असतं. मागे एकदा पुण्यात नवीन असताना मी कॅंपमधल्या "नाझ'मध्ये बन-मस्का उत्तम मिळतो, असं ऐकून तिथे खायला गेलो होतो. ऑर्डर दिल्यानंतर वेटरनं "चहा हवाय काय,' असं प्रेमानं विचारलं. मी "नको' म्हणून गुर्मीत सांगितलं. त्यानं एक भलामोठा पाव समोर आणून ठेवला. हा "बन' असावा असा समज करून घेऊन मी हरी-हरी करत पुढच्या "मस्का'च्या डिशची प्रतीक्षा करत बसलो. तो काहीच आणीना, तेव्हा "बन-मस्का' म्हणजे मस्का लावलेला पाव असावा, असा साक्षात्कार मला झाला आणि मग निमूट चहा मागवून मी स्वतःचा पचका वडा करून घेत तो बन घशाखाली घातला.
या वेळी असं काही होऊ नये म्हणून ही काळजी घ्यावी लागली. सगळे जण मसुरावर ताव मारत होते. आम्ही देखील ते मसूर घाशाखाली घातले. चव बरी होती, पण त्यात 70 रुपये देण्यासारखं काही नव्हतं. बायको-मुलीला घेऊन जाऊनही जेवणाचं बिल 230 रुपये येणं एवढाच काय तो माझ्या दृष्टीनं "प्लस पॉइंट' होता.
फक्त मिसळपावाची, फक्त मस्तानीची, फक्त वडा-पावची हॉटेलं ऐकली, पाहिली होती. फक्त चहाच्या "अमृततुल्य'मध्येही हल्ली क्रीम रोल, पॅटीस, सामोसे वगैरे मिळतात. या "अख्ख्या मसूरा'त त्या भाजीशिवाय दुसरी कुठलीही भाजी निषिद्ध होती. "खायचा तर हा अख्खा मसूरच खा. नाहीतर अख्खे तसेच घरी परत जा,' अशी संचालकांची भूमिका असावी.
अख्खे 230 रुपये मोजून मसुराची उसळ आणि रोटी खाल्ल्यानंतर पुन्हा कुठल्या तरी हॉटेलात व्यवस्थित जेवण करायचं, असं आश्वासन हर्षदा आणि मनस्वीला दिल्यानंतरच मी अख्खाच्या अख्खा घरी येऊ शकलो!
...
वाचने
10155
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
अस्सल अख्खा मसूर खायचाय का?
शिवराज मध्ये अख्खा मसुर
In reply to अस्सल अख्खा मसूर खायचाय का? by योगप्रभू
मसूराची उसळ हाटेलात जाऊन
अरे बापरे
In reply to मसूराची उसळ हाटेलात जाऊन by रेवती
कोदांचा धसका नाही घेतला.
In reply to अरे बापरे by गोगोल
जेवायला गेल्यावर प्रत्येकाला
In reply to मसूराची उसळ हाटेलात जाऊन by रेवती
हा हा, पण असे तुमच्या
अख्खा मसूर : आख्यायिका
कांदा-टोमॅटो - लसणीची ताजी
In reply to अख्खा मसूर : आख्यायिका by विसुनाना
अगदी सहमत. आणि थोड्या
In reply to कांदा-टोमॅटो - लसणीची ताजी by रेवती
मला तर नाझ चा चहा आनि
आखा मसूर म्हणजे नक्की काय? ती
अरे ते कडधान्य आहे. गुगलवर
In reply to आखा मसूर म्हणजे नक्की काय? ती by स्पा
मसूर?
In reply to आखा मसूर म्हणजे नक्की काय? ती by स्पा
+ १
In reply to मसूर? by आजानुकर्ण
मसूर म्हणजे काय असा प्रश्न
In reply to मसूर? by आजानुकर्ण
नैमित्तिक सुधारणा ...
In reply to मसूर म्हणजे काय असा प्रश्न by पंगा
लेखनशैली आवडली...बाकी मेनू
चांगल झाल
तावरे कौलणी
अच्छा..
अभिजीत भौ पुण्यात उगाचच फेमस
विजुभाऊ जरा दमानं घ्या...
In reply to अभिजीत भौ पुण्यात उगाचच फेमस by विजुभाऊ
अख्खा मसूर साठी स्पेशल हॉटेल
गैरसमज नसावा विजुभाऊ
मसूर ही एक कंटाळवाणी उसळ
कडधान्य
In reply to मसूर ही एक कंटाळवाणी उसळ by शरदिनी
...
अभिजित भौ
In reply to ... by आपला अभिजित
मी मागील वर्षी इस्लाम्पुर ला…
मी मागील वर्षी इस्लाम्पुर ला गेलो होतो तेव्हा अखा मसुर सगळी कडे बघुन हैरान झालो होतो
आज पार फेर्गुसन कोलेज समोर पण हि डिश आहे
चविष्ट आख्खा मसूर
अरेरे, चविष्ट आणि रोटी, कांदा याबरोबर अप्रतिम लागणाऱ्या आख्खा मसूरचा आपल्याला आस्वाद घेताच आला नाही म्हणा...
नीट केलेला अख्खा मसूर फार झणझणीत जाळ नसतो आणि गरम मासल्याची overpowering टेस्ट आणि फ्लेवर ही नसतो.. स्मोकी रोटीसोबत अत्यंत स्वादिष्ट डिश आहे.
इस्लाम्पुर ला बस स्ट्यांड…
In reply to चविष्ट आख्खा मसूर by रीडर
इस्लाम्पुर ला बस स्ट्यांड समोर आस्वाद घेतला होता
पुण्यात कुठे त्यातल्या त्यात चांगले मिळेल ते सांगा
सुस्वरूप तो अभिप्राय आपल्याला उद्देशून नाही
सुस्वरूप तो अभिप्राय आपल्याला उद्देशून नाही.
इन जनरल ज्यांना आख्खा मसूर आणि मसुराची उसळ सेम आहे असं वाटतंय त्यांच्यासाठी
हायला
काल परवा त्या कराड जवळ गेल्यावर कळले कि जवळच "मसुर " नावाचेच गाव आहे , गम्मत म्हणजे मसुर गावात होटेल कमी आणि पार्सल सुविधा देणारी दुकाने खुप झाली आहेत , कानडी मित्रा सोबत चर्चा झाल्यावर असे कळले कि कानडी मध्ये दह्याला मसुर असे म्हणतात ..
कमेरी - अरुण पाटिल धाबा
इस्लम्पुरच्या जवळ कामेरी ला अरुण पाटिल धाबा आहे. हेच अख्खा मसूर चे उगमस्थान. कामेरी–इस्लामपूर भागात अख्खा मसूरबद्दल एक लोकप्रिय लोककथा सांगितली जाते. १९८० च्या दशकात वारणा दुध डेअरीच्या ट्रक ड्रायव्हर्स दुध मुंबई ला घेवुन जात आणी रात्री परत येन असत. रात्री उशिरा येणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सना पटकन मिळणारे, स्वस्त, पोटभर आणि तिखट जेवण हवे असायचे. ठाण्याच्या आसपास तेंव्हा मसूर डाळीची एक डिश ते खात. त्याविषयी त्यानी पाटलांना कल्पना दिली. त्यांनी एकदा पक्षाच्या कामासाठी मुंबईला गेल्यावर त्यांनी ती ट्राय केली. त्यांच्या पश्चीम महाराष्ट्रीय जिभेला ती काही आवडली नाही. त्यात त्यांनी स्वत:चे मसाले घालुन कामेरी भागात पुर्वी घरोघरी बनवत त्यापेक्षा थोडा झणझणीत रस्सेदार अख्खा मसूर बनवला आणि रोटी आणि जिरा राईससह द्यायला सुरु केला. तेंव्हा पासुन हा पदार्थ लोकप्रिय झाला आणि हळूहळू "ढाबा स्पेशल" म्हणून ओळख मिळाली. आजहि ईस्लाम्पुरात "अख्खा मसूर = अरुण पाटील ढाबा" असेच समीकरण आहे. त्यांच्या धाब्यावर दुसरे काहीच मिळत नसे. बहुधा तीच परंपरा आत नव्याने सुरु झालेल्या अख्खा मसूर ढाब्यांनी जपली असावी. मला आठवते तसे, त्यांच्य धाब्यावर उसाचे उत्पादन कसे वाढवावे याचे बोर्ड लावलेले असत.
सातार कराड रस्त्यावर एक…
सातार कराड रस्त्यावर एक हॉटेल आहे. त्याची जहिरात रस्ताभर बरेच फलक लावू" शिक्षिका प्रभा भोसले " यांचे हॉटेल अशी केलेली असते. यात घरगुती मटण , चिकन यांची जहिरात असते. जहिरातीच्या फलकावर ज्या चष्मीष बाईंचा फोटो आहे तो इतका भ्यंकर आहे की पाहिल्यावर त्या हॉटेलात कोणी जाईल का अशी शंका येते. बहुधा उशीरा येणाऱ्या ग्राह्काला त्या अंगठे पकडून ओणवे उभे रहायची शिक्षा देत असतील असे वाटते.
काही कट्टर पंथांमध्ये मसूर…
काही कट्टर पंथांमध्ये मसूर डाळ खाण्यास मनाई आहे, कारण ती तामसिक (सुस्ती आणणारी) आणि राजसिक (अत्यधिक वासना आणि आक्रमकता वाढवणारी) मानली जाते.
काही परंपरा मसूर डाळीचा संबंध कामधेनू गायीच्या रक्ताशी जोडतात. एका आख्यायिकेनुसार, जेव्हा एका प्राचीन राजाने ती गाय चोरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती जखमी झाली आणि तिचे रक्त जिथे जिथे जमिनीला लागले, तिथे तिथे मसूर डाळ उगवली. त्यामुळे मंदिरात ती अर्पण करण्यास किंवा कठोर तपश्चर्या करणाऱ्यांना तिचे सेवन करण्यास मनाई आहे. एकादशीसारख्या उपवासाच्या दिवसांमध्येही मसूर खाण्यास सक्त मनाई आहे.
तिच्या गडद लाल रंगामुळे आणि प्रथिनांमुळे, तिला ऊर्जा देणाऱ्या मांसासारखी मानले जाते. ती मज्जासंस्थेला उत्तेजित करू शकते, ज्यामुळे ध्यानातील एकाग्रता आणि आध्यात्मिक वाटचालीत अडथळा येऊन शांत, सात्विक मनःस्थिती साठी ती अयोग्य ठरते. मसूर डाळीमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीरात अतिरिक्त, आक्रमक ऊर्जा निर्माण होते.
ऐतिहासिकदृष्ट्या, काही समुदाय मसूर डाळीला "रानटी लोकांचे अन्न" मानत असत, कारण तिचे मूळ पश्चिम आशियात होते आणि तिचा संबंध परकीय आक्रमणांशी जोडला गेला होता.
बघा बुवा, मसूर खाताय तर जपून !
झाला कि नाही एक काकाफॉ तयार . 😆