Skip to main content

कवी, रसिक वाचक आणि काव्यानुभव

लेखक शरद
Published on शनीवार, 12/02/2011
कवी, रसिक वाचक आणि काव्यानुभव कवी म्हणजे साहित्य निर्माण कराणारा; मग तो कवी ,कथाकार, कादंबरीकार वा नाटककार असेल. वाचक हा रसिक पाहिजे कारण हिशोबाच्या चोपड्या तपासणारा वा वर्तमानपत्र चाळणारा वाचक इथे अभिप्रेत नाही. त्याला साहित्यात रस पाहिजे. ही आवड नसेल तर मग वाचक मेघदूतही दुकानदार किराण्याची यादी जा पद्धतीने वाचतो तसे वाचेल. तर असा रसिक वाचक काव्यानुभव कसा घेतो वा त्याने कसा घ्यावा याचा विचार या चर्चासत्रात व्हावा हा प्रयत्न. अनुभव तुम्ही आम्ही सर्वच घेत असतो, प्रत्येक क्षणाक्षणाला. हा अनुभव घेतांना त्यात "रस" घेतलात तर तुमचे जीवन संमृद्ध होईल. अचानक आलेल्या पावसात कोण भिजले नाही? पण चरफडून छत्री न घेतल्याबद्दल स्वत:ला शिव्या घालण्याऐवजी जर स्वत: भिजण्यातली मजा घेत, इतरांची होणारी तारांबळ बघत, जर अशा पावसाची गंमत घेतलीत तर तुमचे अनुभव विश्व संमृद्ध होईल.("घन ओथंबुन येती" हे गुणगुणलात, तर खरे भाग्यवान!) हे विश्व जेवढे विशाल तेवढे काव्यानुभव घेणे सोपे. का? तुम्ही जसे अनुभव घेत असता तेच कवीही घेत असतो. पण एकच घटना दोघांना निरनिराळे दर्शन घडवते.कवीची प्रतिभा (ही तर ईश्वराची देणगी) त्याच्या मनात वेगळे तरंग उठवते; त्याला त्याच्या प्रेयसीच्या गालावरून ओघळणारे आंसू आठवतात. आणि मग एका कवितेचा जन्म होतो. रसिक वाचकाला अशा एखाद्या कवितेचा आस्वाद घ्यावयाचा असेल तर त्याने झरझर झरणार्‍या पावसाच्या सरी उपभोगलेल्या पाहिजेत. काव्यानुभव घेण्यासाठी विश्वातील प्रत्यक्षानुभव पाहिजेच ! तीच गोष्ट तुमच्या वाचनाची. तुमचे वाचन जेवढे विशाल तेवढे रसास्वाद घेणे सोपे. स्वा. सावरकर जेंव्हा सागराला दम भरतात ".. अबला न माझी ही माता रे,कथील हे अगस्तीस आता रे .." तेंव्हा याचा चपखलपणा लक्षात येण्यास अगस्तीची गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे. आणखी एक. रसिकतेकरिता तुम्ही सहृदय पाहिजे. नेहमी "यात काय आणि त्यात काय़ " म्हणणार्‍या कोरड्या माणसांकरिता कविता नसतेच. तर एक कवी आणि एक रसिक वाचक यांचा संबंध जोडते कविता. लिहित असतांना कविता कवीची.ती एकदा पूर्ण झाली व वाचकाच्या हातात पडली की मग ती वाचकाची. प्रत्यक्ष अनुभव व कवीला त्यातून आलेला काव्यानुभव, कवीने कवितेत मांडलेला असतो. आता वाचकाला आपले अनुभव व कवीचा काव्यानुभव यांची सांगड घालावयाची आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तुमचे अनुभव! यामुळे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे कीं कवितेचा तुम्हाला भावलेला "अर्थ" हा तुमच्या पुरता १०० टक्के बरोबर असतो. दुसर्‍याने दुसरा अर्थ काढला म्हणून तुमचा अर्थ चूकीचा असे नाही. तिसरा तिसरा अर्थ काढेल, काय फरक पडला ? आणि हां, तुमचा अर्थ कवीच्या मनात असलेल्या अर्थाशी जुळलाच पाहिजे असेही नाही.तुम्ही वाचत आहा ती कविता सर्वस्वी तुमचीच आहे. परत तुम्हीच उद्या तिचा निराळा अर्थ लावलात तर बिचकू नका. तोही उद्यापुरता बरोबरच आहे. जीएंच्या कथेचा मला वीस वर्षांपूर्वी भिडलेला अर्थ व आजचा अर्थ नक्कीच निरनिराळे आहेत. नाही पटले? मग मला सांगा, तुम्ही एकदा तरी म्हणाला आहात ना " अरे, वीस वर्षांपूर्वी शाळेत या कवितेचा अर्थ किती निराळा वाटत होता." या मुक्त विचारांनंतर पु.शि. रेगे यांची एक कविता घेऊ. पु.शि.रेगेच कां ? तर त्यांच्या कवितेचा तुम्ही काहीही अर्थ लावा,मराठीचा कोणीही प्राध्यापक त्यावर आक्षेप घेत नाही. "नसती कटकट" म्हणतो, सोडून देतो. लिलीची फुले लिलीची फुले तिने एकदां चुंबितां, डोळां पाणी मी पाहिले लिलीची फुले आता कधीही पाहता, डोळां पाणी हे साकळे...! मी,ती, लिलीचे फुले आणि डोळ्यातील पाणी.संपूर्ण कविता या चारांशी निगडित आहे. पहिले कडवे भूतकाळातील, लिलीची फुले चुंबिताना ती भावविवश व तिच्या डोळ्यात पाणी, मी पाहतो,अलिप्ततेने. पण जसजसा काळ गेला तसतसा तिच्या भावनेचे लिलीशी जडलेले नाते आता त्याच्या मनात लिलीशीच जोडले गेले आहे. दुसर्‍या कडव्यात ती नाही, काळ वर्तमान(व भविष्यही) पण आता केंव्हाही लिलीची फुले दिसली की ती फुले व त्यांच्याशी जोडले गेलेले संवेदनशील,अमूर्त प्रेम, त्यावेळची तिची करुण भावना, आता "मी"च्या डोळ्यात पाणी आणतात. साकळे, काय अप्रतिम क्रियापद वापरले आहे ! रक्त साकळते, वहावयाचे थांबून जागीच गोठते. इथे कधीही न साकळणारे पाणी डोळ्यातून वहातांना तिथेच थांबले ! पहिल्या कडव्यात भावना रुजली ,भिनली, तिची फुले दुसर्‍या कडव्यात फुलून आली. अशी विशुद्ध प्रेमकविता अबोल, अंतर्मुख करते. आता आपण प्रतिसाद द्यावा म्हणून त्यांचीच एक कविता तेव्हा तू म्हणाली होतीस, चांदणं जेव्हा पाण्यात डुंबतं, तेव्हा आपण कोणी बोलावयाचं नसतं, कारण, ते एकटं असतं. शरद
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3418
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

लेख आवडला. दुसर्‍याने दुसरा अर्थ काढला म्हणून तुमचा अर्थ चूकीचा असे नाही. तिसरा तिसरा अर्थ काढेल, काय फरक पडला ? आणि हां, तुमचा अर्थ कवीच्या मनात असलेल्या अर्थाशी जुळलाच पाहिजे असेही नाही.तुम्ही वाचत आहा ती कविता सर्वस्वी तुमचीच आहे. परत तुम्हीच उद्या तिचा निराळा अर्थ लावलात तर बिचकू नका. तोही उद्यापुरता बरोबरच आहे. सहमत आहे. हे विधान कवितेबद्दल असले तरी कुठल्याही कलाविष्काराला लागू पडणारे आहे असे वाटते.

खूप चांगला विषय आणि सुरेख लेख !! सगळ्या अनुभूती या सापेक्ष असतात, एकाच परिस्थीत असलेल्या विविध व्यक्तींचे अनुभव , आठवणी, क्षमता यात फरक असतो. त्यामुळे एकच कविता ( किंवा कुठलीही कलाकृती ) वाचणार्‍या, बघणार्‍या व्यक्तींचे त्या बद्दलचे इंटरप्रिटेशन वेगवेगळे असले तरी ते त्या त्या व्यक्तीपुरते खरे आणि परिपूर्ण असते .

अर्थ च काढायचा तर तो कसाही काढता येतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा या ओळी प्रेमविराने प्रेयसीकडे पाहून म्हंटल्या तर त्याला वेगळे सामर्थ्य लाभते

लेख छान; त्यातले मुद्दे महत्त्वाचे. पण लेखन काहीसे 'उरकल्या'सारखे, किंचित त्रोटक वाटले. विचारविस्तार केला असता, आणखी काही उदाहरणे देऊन ऊहापोह केला असता, तर अधिक आवडले असते. (विस्तारप्रेमी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

लेख आवडला. विशेषतः कवितेच्या अर्थाच्या सापेक्षतेचा मुद्दा. विषय खूप मोठा आहे. व एका लहान लेखात काही मुद्द्यांच्या भोज्ज्याला हात लावलेला आहे. उदाहरणं देऊन ऊहापोह केला तर भोज्यांपासून सुग्रास भोजनाचा आनंद होईल.

सुंदर लेख , आवडला लिलीची फुले ही रेग्यांची कविताही आवडली..