Skip to main content

आत्मविश्वास

आत्मविश्वास

Published on 10/02/2011 - 07:23 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रसंग आहे एका शनिवारी मी लंडनहून गावी परतत होतो तेव्हाचा. लंडनहून घरी परतताना मी नेहेमी रात्री १०:१४ ची ट्रेन पकडायचा प्रयत्न करतो, कारण या गाडीला अजिबात गर्दी नसते. तुरळक प्याशिंजर लोक आपले इथंतिथं सांडलेले असतात. आणि मोजून चार ष्टापात गाडी आमच्या ठेसनात पोहोचतेदेखील. अशी अजिबात गर्दी नसलेली गाडी पकडली की मलासुद्धा फोनाफोनी करायला आणि मोकळ्या आवाजात गप्पा हाणायला बरं पडतं! त्या दिवशीसुद्धा माझा डबा ऑलमोस्ट मोकळाच होता, अगदीच बोटावर मोजण्याइतकी डोकी होती, दाराजवळची एक मोक्याची जागा पकडून मी बसून घेतलं, सगळं कसं मस्त जमून आलं होतं. मी लगेच फोन काढून हिरव्या देशातल्या एका मित्राला कॉललो आणि गफ्फा सुरु केल्या! अगदी गाडी सुटायच्या वेळी एक मुलगी शेजारी येऊन बसली. आश्चर्य! कारण गोर्‍या ललना आपल्या शेजारी फक्त 'इतरत्र जागेचा अभाव' या एकाच कारणास्तव बसतात. वर यांचा आविर्भाव तर असा की जणू शेजारी बसून यांनी मला एकदम पवित्रच करुन टाकलाय आणि या शेजारी बसल्या नसत्या तर मी ट्रेनमधून थेट नरकातच गेलो असतो वगैरे वगैरे! आणि ही पोरगी सगळा डबा रिकामा असताना शेजारी येऊन बसली, आणि अगदी दहा वर्षांची ओळख असल्यासारखं हसली. असला ब्येक्कार धक्का बसला राव! त्या धक्क्यातच मी मित्राला सांगितलं की घरी जाऊन कॉलतो परत आणि फोन कटवला. माझा फोन बंद झाल्याचं पाहून शेजारणीच्या गप्पा चालू! मन में आश्चर्यका एक और फटाका फुट्या! मी तर पडायचाच बाकी राहीलो होतो. कारण याआधी अशी कधी वेळच आली नव्हती, आणि या ताई तर सुंदर, गोर्‍यापान, सोनेरी केस, निळे डोळे वगैरे होत्या. आता हा नेम कसा काय चुकला याचा विचार करत मी त्या इंग्रजी हल्ल्याला माझ्या पुणेरी इंग्रजीतून जमेल तसं तोंड देऊ लागलो. त्यानंतर पुढला पाऊण तास त्या ललनेने गावभरच्या गप्पा मारल्या. तिचं नाव 'लिझ' (बहुधा एलिझाबेथ असावं)! पेशाने एक पर्फ्युमिस्ट असलेली लिझ लंडनमधल्या एका फ्येमस पेर्फ्युम फॅक्टरीत काम करीत होती. मग गप्पा सहाजिकच अत्तर, वास वगैरे गोष्टींवर गेल्या. तिच्या कामाच्या बाबतीत ती जाम एक्सपर्ट आहे हे पुरेपूर जाणवत होतं. माझी पण उगाच बॅटींग करुन झाली होतीच, आणि पाठ केलेल्या इंग्रजी शब्दांचा साठा संपत आला होता, तेव्हढ्यात तिचं स्टेशन आलं! जायला उठली, दारापर्यंत गेली, आणि वळून हाक मारून म्हणाली, "मला जरा उतरायला मदत करतोस का?" मी अवाक! म्हणजे शेजारी बसून गप्पा वगैरे ठीक आहे, पण उतरायला मदत वगैरे जरा अतीच होतं! असल्या अनपेक्षीत सलगीच्या धक्क्यातून मी जागा होईपर्यंत तिने पर्समधून एक वॉकींग-स्टिक काढली आणि म्हणाली, "मला दिसत नाही ना, आणि प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधल्या गॅपची मला थोडी भितीच वाटते." आणि तिला प्लॅटफॉर्मवर उतरवल्यावर गप्पा मारल्याबद्दल ठांकू म्हणून गेली! त्यानंतर मी अक्षरश: सुन्न बसून होतो. कुणीतरी सणसणीत कानाखाली वाजवल्यावर कसं सगळं भण्ण होतं ना, तसं वाटत होतं. इतका वेळ मी ज्या मुलीशी गप्पा मारल्या -गप्पा कसल्या, पाऊण तासाची टाईमपास बॅटींग केली- तिला अजिबात दिसत नव्हतं हे कळल्यावर डोकं भणाणून गेलं माझं! तिच्या वागण्या-बोलण्यातून असं एकदाही जाणवलं नाही की तिला दृष्टीदोष आहे. सगळं इतकं सहजपणे चाललं होतं, ती चक्क माझ्याकडे पाहून बोलत वगैरे होती. मग मला एक एक संदर्भ जाणवायला लागले, की तिच्या बोलण्यातून एकदाही काही पाहिल्याचा, रंगांचा उल्लेख आला नव्हता. सुरुवातीला माझी भाषा मराठी आहे वगैरे गप्पा झाल्यावर तिने पर्फ्युमबद्दल बोलायला सुरु केलं होतं. अर्थातच, 'वास' हे तिचं क्षेत्र होतं आनि ती त्याबद्दल भरभरुन बोलत होती! ती पर्फ्युमिस्ट आहे म्हटल्यावर मी सहाजिकच तिला 'पर्फ्युम' नावाच्या एका इंग्रजी चित्रपटाबद्दल विचारलं होतं तेव्हा तिने "मला चित्रपट पहायला आवडत नाहीत" असं उत्तर देऊन विषय संपवला होता. बोलताबोलता ती बर्‍याच वेळा माझ्या मागे काचेत शून्यात पाहिल्यासारखं बोलायची. या सगळ्याकडे मी खूप सहज दुर्लक्ष केलं होतं हेही आठवलं. दृष्टीदोषासारखा प्रॉब्लेम असलेली लिझ मला अगदी सहपणे भेटली आणि सहजपणे एक ठसा ऊमटवून गेली. ती मला भेटणं हा संपूर्ण योगायोगाचा भाग होता. म्हणजे तिला मी भेटलो नसतो, दुसरा कोणीही भेटला/ली असता/ती तरी तिला काहीही फरक नव्हताच. असं शेवटच्या क्षणी आपल्या गप्पेकर्‍याला एकदम शॉक देणं तिच्या नकळत ती करतच होती, आणि करत राहीलसुद्धा; पण माझ्या डोक्यात हा प्रसंग इतका फिट्ट बसलाय, की ही लिझ विसरणं केवळ अशक्य! कुठेही दृष्टीदोषाचा उल्लेखही नाही, की त्यामुळे प्रॉब्लेम होतोय वगैरे तक्रार नाही. रोजच्यारोज घरून लंडनला जा-ये करताना तिचं कुठेही अडत असेल असं नाही! स्वत:च्या सुंदर दिसण्याचा अभिमान नाही की दिसत नसल्याची खंत नाही! असलं आरस्पानी सौंदर्य, देहबोलीतली विलक्षण सहजता आणि तुफान आत्मविश्वास असलेली ही मुलगी त्या दिवशी जाणिवा हलवून गेली हे मात्र नक्की! (अन्यत्र पूर्वप्रकाशित)
लेखनप्रकार

याद्या 8501
प्रतिक्रिया 55
जबराट अनुभव, याला म्हणंतात आपल्या लिमिट ओ़ळखुन त्यातच बाप होणं, जे नाही त्याबद्द्ल रडण्यापेक्षा जे आहे त्यात सुखी होणं, पण त्याच वेळी जे नाही त्याबद्दल दुखः न बाळगणं अथवा त्याचा न्युनगंड मनात न बाळगणं. या दोन गोष्टींसाठी तुमच्या या सहप्रवासीचा मी शिष्य झालो, "जो जो ज्याच्या गुण घेतला तो तो म्या गुरु केला " या न्यायानं. अजुन एक लक्षात आलं, त्या रिकाम्या डब्यांत ति तुमच्या जवळ येउन बसली ते तुमचा आवाज ऐकुन व तुम्ही लावलेल्या परफ्युमच्या वासाने. तुमचे पुणेरी / भारतीय उच्चार ऐकुन तिला तुम्ही तिचा गैरफायदा घेणार नाही याचा पण विश्वास आला असेल काय किंवा तुम्ही लावलेला परफ्युम मुळं तिनं हा अंदाज बांधला असेल. माझ्या स्वभावाप्रमाणं एक शंका, डब्यात चढताना पण तिला कुणाची तरी मदत लागली असेल ना आणि डब्याचा दरवाजा ते तुमच्या सिटपर्यंत तिला वॉकिंग स्टिक वापरावी लागली असेलच ना ?

In reply to by मनराव

ए क णं ब र !@@ बाकी तिला कसे माहित की ती किती सुंदर दिसते ? :) आत्मविष्वास आवडला. तुमच्यात खुप चांगलं लिहीण्याची ताकद दिसली. :) -बेसुर

In reply to by ५० फक्त

तुमचे पुणेरी / भारतीय उच्चार ऐकुन तिला तुम्ही तिचा गैरफायदा घेणार नाही याचा पण विश्वास आला असेल
हे जरा अति होतंय.. :) बाकी असुरा, अनुभवकथन करण्याची शैली आवडली. मस्त लिहितोस. :)

In reply to by मेघवेडा

मेव्या, अनुभवकथन काय रे, तुला किमान १० वेळा सांगून झाला असेल हा प्रसंग! त्यालाच अनुभवकथन म्हणत असशील तर शाबासकीच आहे माझ्यासाठी!! :-) हर्षद, मी भारतीय/पुणेरी वगैरे असल्यामुळे नसावं ते. तिच्या सोयीच्या जागी (दाराजवळची जागा) मी बसलो होतो आणि ती नेहेमीच्या सवयीने येऊन तिथे बसली असावी. तुमची शंका रास्त आहे, पण ती शेजारी बसेपर्यंत माझं लक्षच गेलं नाही तिच्याकडे, मी मित्राशी फोनवर बोलत होतो !! --असुर

खल्लास रे असुरा. असा धक्का खरोखर सुखद म्हणावा दु:खद ते कळत नाही पण सलाम करावासा वाटतो तो या लोकांच्या लढण्याला आणि लढण्याच्या प्रचंड इच्छाशक्तीला.

असुर्या, खूपच सुंदर रे!! .... स्वत:च्या सुंदर दिसण्याचा अभिमान नाही की दिसत नसल्याची खंत नाही! असलं आरस्पानी सौंदर्य, देहबोलीतली विलक्षण सहजता आणि तुफान आत्मविश्वास असलेली ही मुलगी त्या दिवशी जाणिवा हलवून गेली हे मात्र नक्की! वा !!

अगदी छान अनुभव...आहे त्या परिस्थितीत खंबीर राहून इतरांनासुद्धा सकारात्मक दृष्टीकोन देणारी व्यक्ती...कदाचित भारतीय हेल ऐकून तिला तुमचा विश्वास वाटला असेल म्हणून ती तुमच्या बाजूला आली असेल. बाकी सौंदर्याचं म्हणाल तर तिलासुद्धा ते कदाचित माहित नसेल...असो.

. असुऱ्या फार छान रे

छोटे खानी लेख उत्तमच , आत्मविश्वास वगैरे वगैरे छानच!!पण... पण... पण ..... पण लेका नक्की सांग की पुन्हा किती वेळा ती मुलगी दिसली? तु गाड्याच्या वेळा बदलुन पाहील्यास का? तिच्या पर्फ्युमच्या दुकानात गेलास का? ती उतरलेल्या स्टेशनात शोधाशोध केलीस का? मुद्याचे सांगायचे सोडून कुठल्या जाणीवा बघायला सांगतोस रे!! थोडक्यात कीप इट रियल डूड! :-)

In reply to by सहज

सहजकाका, खूप प्रयत्न करुन झालाय आत्तापर्यंत. तिची कंपनी माहीती असती तर एक दिवस आमचा मोर्चा तिकडे घेऊन गेलो असतो. पण असल्या ट्रेनमधल्या ओळखी मी कधीच सिरियसली घेत नसल्याने (आणि बर्‍याच वेळा स्वत:बद्दलही खोटीच माहीती सांगत असल्याने) तिच्या कंपनीची मी चौकशी केली नाही! पण लंडनच्या स्टेशनवर मी तिला शोधायचा प्रयत्न करुन झालाय. गाड्या बदलून झाल्या, प्लॅटफॉर्म बदलून झाले, स्टेशन बदलून झाली. नो उपयोग! ती भेटावी अशी माझी प्रचंड इच्छा आहे. ती जर कधी भेटली तर मी याच धाग्यावर सांगीन तुम्हाला!!! बाकी, ट्रायिंग टू कीप इट अ‍ॅज रीयल अ‍ॅज पॉसिबल हेवेसांनल!!! --असुर

मस्त लिहलाय अनुभव कोणी हे नोटिस केलय का मुंबईतल्या कोण्त्यहि फलाटा वर अपंगाच्या डब्याजवळ एक बारिक आवाजात चुक-चुक वाजनारि बेल सतत वाजत असते एरवि ते आपल्या लक्शातहि येत नाहि ,ते अंधा साठी सिग्नल असतात त्या ठिकाणी बरोबर अंध थाबंतात , कोणालाहि न विचारता.

फारा वर्षांपूर्वी वाचलेली रस्किन बाँडची अशाच धाटणीवरची कथा आठवली. मात्र फरक असा, की यात निवेदक स्वतः अंध असतो. उत्तरांचलच्या पहाडी इलाख्यात कोठेतरी रेल्वेने प्रवास करत असतो. शेजारी एक तरुणी येऊन बसते, प्रवासभर त्याच्याशी गप्पा मारते. हा आपला (तिच्या आवाजावरून) कल्पना करत राहतो, की ती सुंदर असेल, दिसायला कशी असेल, वगैरे वगैरे. मग तिचा चेहरा कसा असेल याची कल्पना करण्याचा प्रयत्न करतो. पण काही केल्या तिचे डोळे कसे, कुठल्या रंगाचे असतील याबद्दल त्याची कल्पना निश्चित होत नसते, आणि त्याबद्दल कुतूहलापोटी त्याला चुटपूट लागून राहते. बरे, विचारताही येत नसते. विचारणार कसे? त्यामुळे तो तसाच तिच्याशी प्रवासभर अशाच गप्पा मारत राहतो, आणि एकीकडे कल्पना लढवत राहतो. तीही त्याच्याशी मोकळेपणाने बोलत राहते. पुढे तिचे स्टेशन येते, आणि प्रवासात गप्पांमध्ये छान वेळ घालवल्याबद्दल ती त्याचे आभार मानून तिला उतरवून घ्यायला कोणीतरी आलेले असतात, त्यांच्याबरोबर निघून जाते. आता मात्र याच्याच्याने कुतूहल आवरत नाही, आणि तो शेजारी बसलेल्या दुसर्‍या प्रवाशाकडे सहजच विचारल्यागत खडा टाकतो, "का हो, ही जी तरुणी माझ्या शेजारी बसली होती, बोलायला वगैरे छान होती, दिसायलाही नीटनेटकी होती, नाही? डोळे पाहिलेत का हो तिचे, कसे होते ते?" शेजारचा उत्तर देतो, "हो ना! काय पण एकेकाचं नशीब असतं बघा. इतकी सुंदर मुलगी होती, पण बिचारीला दृष्टी नव्हती."
अतिअवांतरः चॅप्लिनचा 'सिटी लाइट्स' पाहिला होतात काय?

वेगळा अनुभव मस्त शब्दात मांडला आहे! मस्त!!

:-) असे कणखर लोकं अधूनमधून भेटलेले चांगले असतात. 'काल पाय लचकला', 'कँटीनमधलं जेवण फार तिखट होतं म्हणून काम झालं नाही' वगैरे तक्रारी बाजूला ठेवायला सोपं पडतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खरंय अदिती, ह्या प्रसंगानंतर कामाच्या बाबतीत मला जितक्या वेळा बिचकायला झालंय, किंवा मी सबबी सांगायचा प्रयत्न केलाय, तेव्हातेव्हा मला या मुलीची आठवण झालीये. भले दर वेळी नाही जमलं, पण बर्‍याच वेळा मी सबबी सांगायच्या ऐवजी कामं करुन दिली आहेत. थँक्स टू हर!! --असुर

अनुभव कथन मस्त झाले आहे . बाकी ह्याच पार्श्व भूमीवर केरळ राज्यात नुकतेच महिलांना आरक्षित डब्यात एकटी महिला प्रवास करत असतांना एका इसमाने आत शिरून तिच्यावर बलात्कार केला नि तिला डब्यातून खाली फेकले .(पुरावा मागे राहू नये म्हणून ) तिच्या भावाने दिलेल्या मुलाखातीनुसार तिने त्याला कळवले होते आत्मविश्वासाने कि हा महिला आरक्षित डबा आहे .त्यामुळे काळजी करायचे काहीच कारण नाही . मुंबईतल्या जयबाला आशर प्रकरण तर केवढे प्रसिद्ध झाले होते . लोकल मध्ये लेडीज डब्यात एक चरसी भिकार्याने तिला डब्याबाहेर फेकले .( करणे तिने धीराने त्याचा प्रतिकार केला ) तिचे दोन्ही पाय गेले .तिला रेल्वेत नोकरी मिळाली . पण भिकारी पकडला गेला नाही . बाकी परदेशात प्रवासाच्या दरम्यान अपंग व्यक्तींसाठी केलेल्या सोयी कौतुकास्पद असतात .

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद शेठ, तुम्ही आमचे जुने मित्र :) अगदी मिपाच्या आधीपासूनचे, म्हणुन एक नम्र विनंती करतो. आपला प्रतिसाद हा कायम ८/१० ओळींचा असलाच पाहिजे असा आजकाल तुमचा अट्टाहास का असतो ? तुम्ही आत्ता वर दिलेल्या प्रतिसादाचा आणि ह्या लेखनाचा बादरायण संबंध देखील लावणे अवघड आहे. तुमचे प्रतिसाद निश्चीतच अभ्यासनीय असतात तेंव्हा स्वत:च्या हाताने अशा गैरमार्गाला लागु नका. ते अवांतर करणे वगैरे आमचे राखीव कुरण आहे ;) त्यात उगा तुमचा चंचु प्रवेश नको.

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा शेठ मला दिलेल्या सल्यावर मी जरूर विचार करेन . माझ्या मते माझ्या प्रतिक्रिया ह्या लेखाच्या अनुषंगाने असतात . ह्याच लेखा विषयी जर म्हटले तर ह्या लेखाचे सार हे लेखकाला बसलेला धक्का (ज्यात शेवटी ती अपंग असलायचे कळले. ) मग त्याच्याअनुषंगाने त्याने त्यांच्या संवादाचा परत एकदा गोषवारा केला .आणि त्याला लिंक लागली ती त्यांच्यातील संभाषणातील अनेक दुर्लक्षिलेल्या वाक्यांची किंवा तिच्या देहबोलीची . कमालीचा आत्मविश्वास (स्वताबद्दल /जीवनाविषयी / रोजच्या दैनंदिन व्यवहारातील ) त्या मुलीमध्ये असुर ह्यांना आढळला . मी देखील अनेक अपंग लंडन किंवा जर्मनीत सराईत पणे फिरताना /प्रवास करतांना पाहतो .(हॉटेलात अपंग व्यक्तींसाठी वेगळ्या सोयीसुविधा असलेल्या खोल्या असतात .त्यांच्याशी कसे वागायचे ह्या बद्दल एका मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय संस्थेकडून आम्हाला एक दिवसाचे प्रशिक्षण मिळाले .( हॉटेल मधिले सेवा कशी त्यांना पुरवावी /त्यांच्याशी संवाद साधतांना काय संकेत पाळावे ) पण माझ्या डोक्यात तेव्हा एक प्रश्न आला . ह्या सर्व सोयीसुविधा भारतात अपंगांना नक्कीच मिळत नाही . सदर लेखात ती व्यक्ती गाडीतून निर्धास्त प्रवास करत होती . तिने लेखकाशी संवाद साधला .व त्याला अंतर्मुख करून निघून गेली . तिच्या आत्मविश्वासाचे व निर्भयपणे सार्वजनिक जीवनात वावरण्याचे प्रमुख कारण काय असावे ह्या बद्दल माझे एक मत आहे . परदेशात अपंगांकडे पाहण्याची सकारात्मक वृत्ती त्याच बरोबर महिलांचे समाजातील स्थान आणि त्यांचा समाजात वावर व त्यामुळे त्यांचे समाजाला योगदान हाहि एक मुद्दा माझ्या मनात आला. विशेतः रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या एकट्या महिला हि तिथे आम बाब आहे. आणि त्याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी केरळ येथे घडलेला किस्सा मी लिहिला. व काही वर्षापूर्वी धडधाकट मुंबईच्या जयाबालेचा लिहिला सदर लेखात नि ह्या दोन घटना ह्यांमध्ये रेल्वेचा डबा नि त्यात दोनच प्रवाशी / एक महिला एका पुरुष ( दोन वेगळ्या खंडात दोन एकाच परिस्थितीत दोन विभिन्न अनुभव ) ह्याचा अर्थ संपूर्ण भारत काही असंकृत ठरत नाही .पण तेव्हाच मूल्यशिक्षणाच्या अभावाने आपल्या समाजात ह्या विकृती व गुन्हे होतात असे मला वाटले . .अर्थात आपल्या समाजातील हा विरोधाभास मला खटकला . मला माहित नव्हते प्रतिक्रिया देण्याचे अलिखित संकेत .असतात . प्रतिक्रिया हि शक्यतो १ ते २ ओळीत असावी . लेख किंवा इतर साहित्य प्रकार आवड्ल्यावरच प्रतिक्रिया द्यावी( लेख आवडला नाही तर एकतर प्रतिक्रिया देऊ नका किंवा व्यनी करावा जास्तीजास्त खरडवही ) ह्यामुळे होते काय तर एकूण प्रतिक्रिया वाचून माणूस गटणे छाप मराठीत नक्कीच पारंगत होतो .किंवा वैचारिक मधुमेह होऊ शकतो ह्यापुढे माझ्या प्रतिक्रियेतून मी तिच्या लिहिण्याविषयी माझी भूमिका अधिक स्पष्ट पणे लिहीन .

कुणीतरी सणसणीत कानाखाली वाजवल्यावर कसं सगळं भण्ण होतं ना, तसं वाटत होतं
हेच झाले रे अगदी वाचनाच्या शेवटी शेवटी. सुरा उत्तम लिहितो याबद्दल शंकाच नाही मात्र तो फार कमी लिहितो ह्याची खंत वाटते. कुठलाही मिठ, मसाला न घालता जे घडले तसे मांडण्याची शैली भावली :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>>>कुठलाही मिठ, मसाला न घालता जे घडले तसे मांडण्याची शैली भावली +१ अगदी हेच मनात आले . असुरा, अजून लिही. छान लिहितोयस :)

तक्रार न करता परिस्थितीशी सकारात्मकतेने जुळवून घेणारे लोक पाहिले की आपोआप त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायला होतं. माझी एक अंध सहकारी आहे. अंबरनाथहून मुंबईत ये-जा करते. योगायोगाने तिला कॉलेजमध्ये भेटलेली पहिली व्यक्ती मीच होते. माझ्या कॉलेजात प्रवेश करताना पायर्‍या चढून थेट पहिल्या मजल्यावरच आधी यावं लागतं. पावसाळ्यात पायर्‍या निसरड्या झाल्या होत्या त्यामुळे मी दुसरा, चांगला-विनापायर्‍यांचा रस्ता दाखवला होता. आणि तेव्हापासूनच मी आसपास असले की ती स्वतःहून हाक मारते. ज्या गोष्टी असुरला नंतर लक्षात आल्या त्या मी तिच्याशी बोलायला बिचकायचे. पण तिची वाक्यं म्हणजे: "मी नवीन गुलाबी रंगाचा ड्रेस घेतला. खूपच छान दिसतोय."," माझ्या मुलाने सगळं अंग रंगांत बरबटून घेतलं"," आज स्वयंपाकाला जरा जास्तच वेळ लागला... " अशी सतत दिसण्या-पाहण्याबद्दल बोलणारी आणि ती स्वयंपाक हाताने करते ही माहितीही माझ्यासाठी नवीन होती. नंतर घाबरत, तिला वाईट वाटू नये अशा पद्धतीनं तिला याबद्दल विचारलं तेव्हा तिने ती चार-पाच वर्षांची असताना अंधत्व आलं, पण त्यानंतर तिनं स्वावलंबनासाठी खास प्रशिक्षण घेतलं आणि यथावकाश त्यात अगदी स्वयंपाकही शिकवला गेला असं संगितलं. कुणी घरी आलं की त्या व्यक्तीने घेतलेली वस्तू मग ती स्वयंपाकघरातील असो वा कुठलीही, ती त्याच ठिकाणी ठेवली की तिला काही अडचण येत नाही!!!! तिला लॅपटॉपवर पुस्तकं वाचायला आवडतं. पण मराठी वाचणारं सॉफ्टवेअर उपलब्ध नसल्यानं तिला मराठी साहित्याला मुकावं लागल्याची खंतही वाटते.

मध्यंतरी एका अंधांच्या सत्कार सोहळ्याला गेलो होतो. त्यात तो तरुण मुलगा संगणक अभियंता होता.( नाव आठवत नाही आता) तो सत्काराला उत्तर देताना म्हणाला," आय गॉट द विजन व्हेन आय बिकेम ब्लाईंड." मला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे छप्पर हादरल्यासारखे वाटले.

खुप छान, अनुभव आणि तुमची लेखन शैली सुद्धा

वा! असुर राव फार छान लिहलयं पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

श्री.असुर.... ~ सुरूवातीला अगदी तुमच्यासारखेच मलाही वाटत गेले की, हा एक अचानक गवसलेला "रोमॅन्टिक" प्रसंग व्यक्त करणारा धागा आहे आणि ती गौरांगना 'तू भारतातील असल्याचे कळाल्याने मी आता भारावून गेले आहे...मला भारतीय तत्वज्ञानाविषयी खूप ओढ आहे....मी पुढील महिन्यात गंगास्नानासाठी अलाहाबादला जावे म्हणते..." अशा पध्द्तीचे संवाद करणार तुमच्याशी, मग तुमची तिला भारतात हरेक प्रकारचे सहाय्य करण्याचे आश्वासन...नंतर 'परत उद्या इथेच याच डब्यात भेटू या...!" अशा धाटणीच्या भरतवाक्याने भेटीची समाप्ती....मग तुमचे पुढील स्वप्नरंजन....असा काहीसा 'रमेश मंत्री' स्टाईल मामला वाचायला मिळणार अशीच माझी कल्पना झाली. पण पुढे तुम्ही दाणदिशी डोक्यावर बर्फासारखी गारेगार पाण्याची बादली उपडी केली...आणि तुमच्यापेक्षा मीच सुन्न झालो [असे दिसते आहे की इथले सर्वच वाचक अवाक् झाले आहेत, वस्तुस्थिती वाचल्यावर]. रीअली अमेझिंग...यट, सो टची !! तुम्ही शेवट करताना असे लिहिले आहे की "अन्यत्र पूर्वप्रकाशित..." याचाच अर्थ असा की लिझच्या त्या अविस्मरणीय भेटीनंतर टेम्सखालून बरेचसे पाणी वाहून गेले असणार, मग या दरम्यान तिची परत भेट व्हावी असा काही तुम्ही प्रयत्न केला आहे का? असल्यास त्याबद्दलही वाचायला आवडेल. ग्रेट मीटिंग ! इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

याचाच अर्थ असा की लिझच्या त्या अविस्मरणीय भेटीनंतर टेम्सखालून बरेचसे पाणी वाहून गेले असणार
टेम्सखालून?????? खालून पाणी वाहून जाण्यासाठी नदीवर सामान्यतः एखादा पूल वगैरे बांधण्याचा प्रघात आहे, असे आजवर ऐकून होतो. त्याऐवजी टेम्सच्या पात्राखाली खोदून तेथे पाण्याची 'ट्यूब'* टाकण्याच्या लंडनच्या पीडब्ल्यूडी खात्याच्या या डुलक्या म्हणायच्या, की तांत्रिक प्रगती?
* हा सांडपाणी वाहून नेणारा ड्रेनेज/स्यूएजचा भुयारी पाइप तर नसावा? पण टेम्सखालून?????? उद्या समजा तो फुटला किंवा त्याला भेगा पडल्या, आणि त्यातून पाणी (वगैरे वगैरे) झिरपू लागले, तर काय होईल? लंडनचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कोठून येत असावा? लंडनच्या कुप्रसिद्ध काळ्या प्लेगानंतर पिवळ्या काविळीच्या साथीस असा पाइप कारणीभूत होईल ना!

In reply to by पंगा

"....टेम्सखालून??????...." ~ पंगाशेठ, यू आर राईट. मला खरेतर 'पूलाखालून बरेचसे पाणी...' असे अभिप्रेत होते, पण लंडनच्या संदर्भामुळे 'टेम्स गेटवे खालून बरेचसे पाणी'....असे पूर्ण टंकण्याऐवजी निव्वळ त्या नदीचेच नाम आले. सॉरी...अ‍ॅण्ड थॅन्क्स फॉर पकडींग द कान ! इन्द्रा

In reply to by पंगा

त्याऐवजी टेम्सच्या पात्राखाली खोदून तेथे पाण्याची 'ट्यूब'* टाकण्याच्या लंडनच्या पीडब्ल्यूडी खात्याच्या या डुलक्या म्हणायच्या, की तांत्रिक प्रगती?
पंगाशेट, टेम्साखालना खरेच पाय्प टाकणारेत आता.. आन पाय्पाची साय्ज? च्यानल टन्लायेवडी! साडेतीन बिलियन पौंडाचो प्रोजेक्ट आसा.. सुपर स्युअर!! इंद्रराजांका कमी समजू नको.. याच प्रोजेक्टविषयी ल्हिले होते तेंनी.. तुला काय कळत नाय आनि आला बडबडत.. ;)

थक्क अनुभव....... झक्क लेख.........

सुरेख अनुभव कथन. असे अनुभव खूप काही देऊन जातात. माझा आतेभाऊ लिगली ब्लाईंड आहे. त्याचा सकारात्मक दृष्टीकोन मला नेहमीच मार्गदर्शक ठरलाय.

एकदम प्रामाणिक आणि ओघावतं अनुभवकथन! सुंदर लिहिलंयस मित्रा!! झकास एकदम. बाकी, अनुभवाबद्दल मी पामर काय बोलणार? वाचूनच एव्हढा हललो, तू ते अनुभवल्यावर काय अवस्था झाली असेल ह्याची कल्पना करतोय.

शारिरीक व्यंगाची पर्वा न करता अगदी समर्थपणे जगाचा सामना करणार्‍या व्यक्ती पाहिल्या की स्वतःच्या करंटेपणाची लाज वाटायला लागते.

थक्क करणारा अनुभव आणि तुझ्या साध्या अकृत्रिम भाषेने आणखीच जिवंत केलेला. जरा चुटपुट लागली, तू इतक्या कमी वेळा का लिहितोस म्हणून!

अनुभव कथन आवडले...मलाही धक्का बसला ! पूर्वी बसमधे कधीकधी एक अंध माणूस दिसायचा..एकदा माझ्या शेजारी बसला होता तेंव्हा म्हणाला की ड्रायव्हरला सांगितलंय पण तुम्हीही अमुक अमुक स्टॉप आल्यावर सांगा..मी त्याच्या २ स्टॉप आधी उतरणार होतो..त्याला तसे सांगितले आणि विचारले की मी येऊ का तुमच्या स्टॉप पर्यंत..तर हसुन म्हणाला " इट्स ओके..आय कॅन मॅनेज" :)

मनावर चढलेली सगळी लोलुपतेची पुटं काढणारे आणि अस्तित्वाचे एक साधे थेट तळातले सत्य जाणवून देणारे अनुभवकथन! किती गृहीत धरतो आपण प्रत्येक गोष्ट नाही? नशिबाने लाभलेल्या सुंदर आणि निर्दोष शरीराबद्दल प्रयेक क्षणी अत्यानंदाने कृतज्ञ राहण्याऐवजी आपण भलत्याच बिनमहत्त्वाच्या गोष्टींबद्दल रडत राहतो. अंध असूनही बळकट मन असणारी ती तरूणी अपंग की शरीराने धडधाकट असूनही आयुष्याबद्दल तक्रार करत रडणारे कमकुवत मनाचे लोक अपंग हे ज्याचं त्याने ठरवावं. असुरा, खूप छान, संयत आणि मनाला भिडेल असं लिहीलं आहेस.

अनुभव कथनाची शैली खरच आवडली. या अनुभवातून तू स्वतःही बदलला हे जास्त आवडले. स्वतःतील या बदलातून ती आता तुझ्याजवळ आहेच असे मानायला हरकत नाही. :)

असे अनुभव आपल्याला समृध्द करत असतातच आणि किती लहानसहान गोष्टींत आपण तक्रार करत असतो ते किती फोल आहे, याची जाणीवही करुन देतात.. असुरा, लिहिण्याची शैली आवडली.. स्वाती