Skip to main content

रिक्षावाले

रिक्षावाले

Published on 04/02/2011 - 18:18 प्रकाशित मुखपृष्ठ
कुठल्याही शहरातले रिक्षावाले यांचं माझ्याशी नक्की नातं काय हा प्रश्न मला अजून सुटलेला नाहीये. माझ्या चेहरयावर केवळ ह्या लोकांनाच वाचता येणाऱ्या भाषेत कायमचा एक यडबंबु भाव कोरून ठेवला असावा, किंवा त्यांना केवळ माझा चेहेरा पाहून 'हा येणारा इसम अगदीच ‘हा’ असून ह्याला गंडवलं नाही तर संघटना आपल्याला वाळीत टाकेल' अशी भीती वाटत असावी. नेमका मी गेल्यावर ‘ह्याला आपल्या घरी आज फुकट जेवायलाच घेऊन जायचंय’ असे चेहरे करून बघतात लेकाचे. त्रास ‘नाही’ म्हणल्याचा होत नाही हो, ते ज्या हलकट्ट सुरात म्हणतात त्याचा होतो. ‘स्वारगेटला येणार का’ असं विचारल्यावर ज्या स्वरात मला आत्तापर्यंत उत्तर मिळाली आहेत ती जर तुम्ही ऐकलीत तर तुम्हाला माझ्या हेतूविषयी आणि गंतव्य स्थानाविषयी नक्की शंका येईल. हा प्रश्न मला भेडसावायला लागला त्याला आता खूप वर्ष झाली. तेव्हा मी कॉलेजला शेअररीक्षा किंवा ज्याला आमच्याकडे वडाप म्हणतात त्याने जात असे, बापानं खडूसपणा दाखवून अजून बाईक घेऊन दिली नव्हती. पॉकेटमनी नावाची ‘नियमित उत्पन्न योजना’ आमच्या वेळेला एवढी बापप्रिय नव्हती. त्यामुळे जसे लागतील तसे पैसे घेऊन शेअररीक्षाने २.५ रुपयात कोलेजला जाणे हा सर्वमान्य उपाय होता. अगदी त्यावेळेपासूनच ‘रम्य’ आठवणी आहेत या लोकांच्या. अगदी पहिला पाशिंजर मी असलो तरी मीच आत बसायचं, आणि मी शेवटी आलो तरी मीच आत बसायचं. माझ्या कॉलेज आयुष्यातली अनेक लेक्चर मी केवळ रीक्षाचा प्रवास करून गेल्यावर परत लाकडी बाकावर बसायला लागू नये म्हणून बुडवली आहेत. ज्यांनी रिक्षातुन त्या उजव्या बाजूला लावलेल्या बारक्या लोखंडाच्या आडव्या दांडीवर बसुन प्रवास केलाय त्यांनाच कदाचित माझं दु:ख कळू शकेल. मी समजत होतो कि रिक्षातुन फक्त चार किंवा जास्तीतजास्त पाच माणसं जाऊ शकत असतील, चालक सोडून. पण अलीकडेच हैद्राबाद मध्ये मी शेअररीक्षा सारखाच एक प्रकार बघितला, आणि माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा कुठल्याही क्षणी रुंदावू शकतात याचा अनुभव घेतला. त्या छोट्याश्या वाहनातून ते दाक्षिणात्य भरदार स्त्रीपुरुष ८-१० च्या संख्येने आरामात गप्पा मारत प्रवास करताना पहिले आणि मनोमन प्रवास ह्या शब्दाला ‘सफर’ हा इंग्रजी अर्थाचा हिंदी प्रतिशब्द योजणारयाला प्रणाम केला. तसे मी बऱ्याच शहरात रीक्षावर सर्वांगीण अत्याचार झालेले बघितलेत पण आमच्या भागानगरातली मौजच न्यारी, ‘पुढे एक मागे चार’, ‘पुढे दोन मागे तीन’, ‘पुढे तीन मागे दोन’, अश्या असंख्य शक्यतांचा सामना ह्या डोळ्यांनी केल्यावर आता माझी ‘पुढे शून्य मागे दहा’ असे प्रवासीही चालत्या रिक्षात बघायची तयारी आहे. पण रिक्षातुन अनेक प्रवाशांना नेलं तरच गैरसोय होते असं जर तुमचा गैरसमज असेल तर तो दिल्लीच्या रिक्षातुन प्रवास करून मोडू शकेल, खरतर मोडू बरच काही शकेल. दिल्लीत रिक्षा विकताना बहुतेक शॉकअब्सोर्बर काढून विकत असावेत. समोर दिसलाच तर दिसणारा अगदी नगण्य खड्डा, तुमच्या मणक्यापर्यंत पोचताना भलताच दणका देऊन जातो. थोडक्यात अर्धा तास प्रवास केलात तर आपण रिक्षातुन चाललोय की ‘अन्त’रिक्षातुन हेच कळेनासं होतं. बरं त्याला सांगायला जावं तर तो मान मागे वळवून आपल्याला दिल्लीतल्या रस्त्याबद्दल तक्रारी सांगू लागतो, आपला जीव खालीवर. नोएडामध्ये ते सायकलरीक्षावाले असतात, खरं सांगू का त्यापैकी कुणी ‘कहा जाना है’ असं विचारू लागला ना कि खरच गलबलून येतं हो. नाही पण म्हणवत नाही आणी ते श्रम पहावतही नाहीत. मी तरी अजून त्यातून कधी गेलेलो नाहीये. तीच गोष्ट कलकत्त्यात. अगदी नको नको होऊन जातं ते त्यांचे श्रम बघून. त्यातल्यात्यात मुंबईचे रिक्षावाले बरे वाटतात. मलातरी अनुभव चांगला आहे. माझ्या एका दिल्लीच्या मित्राला मुंबईत रीक्षावाल्याने वरचे सुट्टे दोन रुपये परत दिलेले पाहून अगदी भरून आलं होतं. पुण्यातले एकेक अनुभव वर्णन करायला लागलो तर उगच इथेच आखाडा व्हायचा नेहेमीसारखा. पण मी हल्ली पुण्यात थोडा सावधपणे रीक्षात बसतो, शक्यतो कुठेतरी जाणारी रीक्षा थांबवतो, स्टॉपवरची नाही निवडत, मग नाही म्हणत नाहीत शक्यतो. पण पुण्यातही काही चांगले अनुभव आहेतच, मी तरी लगेच जनरलायझेशन करणार नाही, पण पुण्यातले वाईट अनुभव मला तुलनेने जास्त आहेत हे खरंच. पुण्यात अथवा मुंबईत मला हौशी रिक्षावालेही नाही दिसले कधी, सांगली, कोल्हापूरकडे तो अनुभव जास्ती, स्वच्छ चकचकीत पांढरं हूड, पोलिश केलेली बोडी, हूडच्या आतमधून सुंदर लाल, निळी हिरवी नक्षी. पितळी चकचकीत हँडल, चालकाच्या पाठीमागे मखमली कुशन, आत छोटासा पंखा आणि ढाकचिक ढाकचिक वाजणारा डेक. वा वा क्या बात है. साला रिक्षा असावी तर अशी.
लेखनप्रकार

याद्या 8105
प्रतिक्रिया 47

रिक्षावाले पत्ता सांगण्यास मात्र नेहेमीच तत्पर असतात. आणि कुठे एखादा अपघात झाला असेल तर एखादा तरी रिक्षावाला मदत करतोच. रिक्षावाल्यांबाबत तसे माझेही फारसे चांगले मत नाही आहे. पण जेव्हा कधी एखाद्या रिक्षावाल्याबाबत एखादा "चांगला म्हणता येणार नाही असा" अनुभव येतो तेव्हा मी वर उल्लेखलेल्या दोन गोष्टींचे स्मरण करतो आणि मनातल्या मनात त्या रिक्षावाल्याला माफ करतो. इथे बेंगलोरमध्ये लांब अंतर जायचे असेल तर काही सिटी कॅबची सर्व्हीस तशी चांगली आहे.त्यामुळे अश्या वेळेला मी शक्यतो कॅबने जायचाच प्रयत्न करतो.दोन पैसे जास्त जातात पण रिक्षावाल्याकडुन फसवुन घेऊन डोकेदुखी करुन घेण्यापेक्षा ते कधीही परवडते.

In reply to by कानडाऊ योगेशु

पुण्यात एका रिक्षावाल्याने पत्ता सांगण्याचे पैसे मागितले होते पत्ता सागुंनजाल्यावर !!!!!!!!!मग मी पहिले वाक्य XXXXXXXXXXXXXXXXXXX

In reply to by लॉरी टांगटूंगकर

पतंग उडवण्याचा सीजन संपला असं वाटलं मला. अजून ढील देणे चालूच आहे वाटतं. चालू द्या.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

कोल्हापूरात पण पत्ता सांगून झाल्यावर रिक्षावाल्याने पत्ता सांगितल्याचे पैसे मागितले. पण रिक्षावाल्याची आणि आमची दोघांचीही विनोदबुद्धी जागृत असल्याने "हॅ हॅ हॅ" करून पुढे निघून गेलो. अन्यथा "कोल्हापूरातल्या रिक्षावाल्यांचे किस्से" असा एखादा लेख पडला असता.

मस्त अनुभव.आता जवळपास सगळ्याच रिक्षा rear engineच्या आहेत. लहान गावांत जुन्या रि़क्षा अजुनही दिसतात. मला लहानपणी रिक्षावाले रिक्षा चालवताना तिरके का बसतात हा प्रश्न कायम पडायचा.कधीच समाधानकारक उत्तर मिळाले नाही.पांढरे आणि खाकी पोषाख असे दोन प्रकार त्यांच्यात असतात हे बर्‍याच नंतर कळले. सर्वात प्रामाणिक रिक्षावाले अर्थातच मुंबईचे.ईतक्या वर्षात कधीच वाईट अनुभव नाही आला.

In reply to by चिरोटा

मला लहानपणी रिक्षावाले रिक्षा चालवताना तिरके का बसतात हा प्रश्न कायम पडायचा.कधीच समाधानकारक उत्तर मिळाले नाही
ऐकीव माहितीनुसार, ड्रायव्हर लोकांना बसुन बसुन मुळव्याधीचा त्रास होतो..तसा त्रास होत असल्यास तिरके बसतात. :) बाकी लेख गमतीदार !

माझा मुंबईतल्या रिक्षावाल्यांचा अनुभव बराच चांगला आहे इतर जिल्ह्या/राज्यां/देशा पेक्षा. कधी तरी इच्छीत स्थळी येण्यास नकार या पल्याड वाईट अनुभव मुंबईत तरी आलेला नाही. बाकी रिक्षावाल्यांची निरिक्षणे छान मांडली आहेत रे अर्धवटा. :)

खुसखुशीत लेख आवडला.
थोडक्यात अर्धा तास प्रवास केलात तर आपण रिक्षातुन चाललोय की ‘अन्त’रिक्षातुन हेच कळेनासं होतं.
हे जबरा होतं

या विषयावर लिहायला पुष्कळ आहे. मुंबई आणि ठाणे असे मिळुन १०-१२ रिक्षावाले तरी मला आणि मी त्यांना नावानीशी ओळखतो. मुंबईत मुलुंड चेक नाका आणि हायवे चेक नाका इथल्या काही रिक्षावाल्यांना मी त्यांचा रिक्षा मधे बसत नाही हे पण माहित आहे. कारण सिंपल आहे त्यांच्या सगळ्यांच्या रिक्षांचे मिटर फास्ट आहेत. आणि त्याहुनही पुढे सांगायचे एक दुर्दैव म्हणजे ज्या रिक्षांचे मिटर फास्ट निघतात त्यातले ९५% हे मराठी असतात. रिक्षावाले आणि मी अशी लेखमाला लिहिण्याचा मानस आहे. पण मला तरी सध्या कार्यबाहुल्याने कधी वेळ मिळतो ते बघुयात. दिल्ली/नोएडा मधे तर जाऊ द्या काही बोलणे गैरच वाटते. नोएडा मधे छोट्या आंतरासाठी मी सायकल रिक्षा आवर्जुन वापरायचो. आधी मला त्रास झाला त्याबाबत पण मग विचार केला की ह्यातल्या किती लोकांची ऑटो घ्यायची ताकद आहे. आणि यांच्या जिवावर चालणारे कुटुंब पण किती मोठे असेल. त्यापेक्षा या रिक्षा घासाघीस न करता दोन पाच रुपये जास्त देउन वापरणे मला योग्य वाटते. ठाण्यात एका रिक्षावाल्याने मध्यंतरी व्हॅल्यु अ‍ॅडेड सर्विसेस म्हणुन पेपर,मॅगजिन्स ईत्यादी ठेवायला सुरुवात केलेली पाहिले आहे. तुमच्या शेवटच्या भागतल्या रिक्षाच्या म्युजिक सिस्टम वरुन मला माझाच रिक्षातली गाणी हा जुना लेख आठवला.

मस्त खुशखुशीत लेख! दिल्लीत रिक्षावाले आणि टॅक्सीवाले इतका त्रास देतात की एयरपोर्टवरून बाहेर येई पर्यंत त्याच विमानाने परत जावं असं वाटायला लागतं.

अर्धा तास प्रवास केलात तर आपण रिक्षातुन चाललोय की ‘अन्त’रिक्षातुन हेच कळेनासं होतं. अर्ध्या.... अर्ध्या लेका बालिष्टर का नाही रे झालास.

सायकलरिक्षावाल्यांचे श्रम खरच पाहवत नाहीत. माझं आणि रिक्षावाल्यांचं असंच वाकडं आहे. बरेचदा मला भांडायची खुमखुमी असते आणि पब्लिक जमा होइपर्यंत भांडते देखील. मागच्या जानेवारीत पुण्यात रिक्षावाल्याशी भांडले. बरेच लोक्स जमा झाले. त्याचं आणि माझं भांडण संपल्यावर माझे बाबा मलाच रागावले.

रिक्शात बसल्यावर गंतव्य स्थान येईपर्यंत रिक्शावाल्याशी हवापाण्याच्या गप्पा मारा. तो तुम्हाला फसवणार नाही.

नाशीक मधे रीक्षा करण्या साठी श्रीमंत असण्याची अट आहे . मुंबईतील ११ साठी , नाशीक मधे २५ पासुन ४० पर्यंत कीतीहि आकारु शकतात.

In reply to by मराठी_माणूस

गोव्यात येऊन बघा. कमीत कमी भाडे ५० रुपये आहे! लेख मस्तच. रिक्षावाल्यांबद्दलचे निरीक्षण एकदम जागतिक सत्य.

In reply to by मराठी_माणूस

ऑ, तुमी सगळे लोकं रिक्षेवाल्याचे उणेदुणे काढूं र्‍हायलेत बॉ. आमी रिक्षावाले परत्येक अनुभवात येगयेगळे वागतो. त्याच्यामधूनच कधीकधी आगळीक व्हती. आन भौ तुमाला सांगतो, गिर्‍हाईकंबी आजकाल लई चावनट झालेत. आवो सुट्टे पैसे देतच न्हाई. सकाळच्या पयल्या पट्यालाच १०० रुपयाची नोट काढतात. आन हवालादार किती तरास देता ते काय कमी हाय का? जावूद्या सालं चालायचच ह्ये. चला पुडी खायची का? हिरा आहे माझ्याकडे. तुमचाच वाट बघणारा रिक्षावाला

भोपाळचे रिक्षेवाले पुरुषांना विचारतात कि तुम्हाला रिक्षा चालवायचा आहे का? एखादा हौशी प्रवासी हो म्हणतो. पण ती खरी म्हणजे त्या रिक्षाचालकाची "हौस" भागवण्याची टॅक्ट असते... (अनुभव नाहि) अर्धवटराव

अत्यंत विनोदी लेख. खूप हसले. >> पुढे शून्य मागे दहा’ असे प्रवासीही चालत्या रिक्षात बघायची तयारी आहे.>> हे तर अफलातूनच!!!

अर्धवटा, तुझी निरिक्षण क्षमता अफाट आहे, त्यामुळे लेखन छान झालंय. एकेकाळी माझ्या कंपनीतल्या लोकांना रिक्षा घेण्यासाठी फायनान्स केलेला आहे, त्यामुलं अगदीच फसवलो जातोय असं वाटत नसेल तर शक्यतो भाड्याविषयी मी जास्त किरकिर करत नाही. बाकी काही वर्षापुर्बी डोंबिवलीमध्ये एकदम ढिकचॅक आणि आयटम रिक्षा ब-याच होत्या, खास करुन राम नगर की राम मंदिर स्टँड आहे ना पुर्वेला तिथे. त्यात जायला जामजा यायची. हर्षद.

'इतकी वर्षे इतके वाईट अनुभव येउनही लोक पुन्हा दरवेळी रिक्षाकडेच का वळतात ?' ह्यावर कोणी एखादी माहितीपूर्ण लेखमाला लिहिल काय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसली किंवा लोकसंख्येच्या मानाने अपुरी पडत असली की इतर पर्याय वाढतातच. मुंबईत लोकल कार्यक्षम आहे, परंतु या महानगराची लोकसंख्या एवढी आहे, की बेस्टच्या बस असुनही टॅक्सी आणि उपनगरांत रिक्षा चालतातच. पुण्यात पीएमपीएलच्या गाड्या संख्येने अपुर्‍या/कायम खचाखच भरलेल्या आणि तासाची फ्रिक्वेन्सी असलेल्या आहेत. इथे मुंबईसारखी लोकलची व्यवस्था पण नाही. त्यामुळे तासभर वेळ कोण घालवत बसणार? खेडेगावांमध्ये एसटी बसच्या फेर्‍या कमी आहेत तेथे लोक जीपचा वापर करतात. त्यामुळे 'इतकी वर्षे वाईट अनुभव येऊनही लोक पुन्हा दरवेळी रिक्षाकडे का वळतात?' याचे साधे-सोपे उत्तर 'नाईलाज' हे आहे. मारुतीची ऑम्नी व्हॅन हे वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी उत्तम साधन आहे, असे मला वाटते. त्यात ७ माणसे बसू शकतात आणि आकारही आटोपशीर आहे. पण सरकार या वाहनाला सार्वजनिक वाहतुकीसाठी का परवाना देत नाही कुणास ठाऊक? रिक्षा उत्पादक आणि व्यावसायिकांची लॉबी खूपच प्रबळ आहे, हाच अर्थ दिसतो.

In reply to by योगप्रभू

त्यामुळे 'इतकी वर्षे वाईट अनुभव येऊनही लोक पुन्हा दरवेळी रिक्षाकडे का वळतात?' याचे साधे-सोपे उत्तर 'नाईलाज' हे आहे.
आम्ही चालत जातो किंवा सायकल वापरतो :) पुढे ? आणि नोकरीसाठी लांब जावे लागते वैग्रे कारणे प्लिज नकोत. तो आमचा दोष नाही :P

In reply to by llपुण्याचे पेशवेll

+१ आम्ही देखील सायकल चालवतो.
येस ! आणि साला ह्या पुप्याची सायकल आमच्या सायकलपेक्षा चमकदार असल्याने आमची जळजळ होते.

In reply to by योगप्रभू

त्यामुळे 'इतकी वर्षे वाईट अनुभव येऊनही लोक पुन्हा दरवेळी रिक्षाकडे का वळतात?' याचे साधे-सोपे उत्तर 'नाईलाज' हे आहे.
असंच म्हणते. माझ्या पुण्यातल्या घरापासून गावात जायला फारशी सोयीची बस सेवा नाही. वृद्ध लोकांना वाहन चालवणे दिवसेंदिवस कठीण होत जातं. गल्लीच्या कोपर्‍यापाशी रिक्षा मिळतात, पण एकजात सगळ्यांचे मीटर फास्ट आणि अंतराबद्दल आडमुठेपणा. पण काय करणार? दुसरा इलाजच नसतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

लेखमालेचं माहित नाही.. पण माझा एक सदाशिव पेठी मित्र रविवारी पायी फिरल्यावर आजोबांचा आत्मा स्वप्नात येऊन रागावतो म्हणून रिक्षाने फिरतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आम्ही जगातल्या सगळ्यात सोयीच्या ठिकाणी रहात असूनही आमचे काही मित्र स्वतःचं वाहन चालवणं, पार्किंग, घरापासूनचं अंतर या दृष्टीने सगळ्यात गैरसोयीच्या ठिकाणी टपरी उघडून बसतात. मग मित्रांना भेटण्यासाठी रिक्षात बसावंच लागतं. असो. लेख आवडला.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>'इतकी वर्षे इतके वाईट अनुभव येउनही लोक पुन्हा दरवेळी रिक्षाकडेच का वळतात ?' ह्यावर कोणी एखादी माहितीपूर्ण लेखमाला लिहिल काय ? लेखमाला कशाला, २-३ ओळीत लिहिता येईल. १) गरजवंताला अक्कल नसते. २) अडला हरी गाढवाचे पाय धरी. अवांतर :- "वेड पांघरून पेडगाव ला जाणे" ही म्हण का कुणास ठावूक, पण आठवली :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

लेखमाला कशाला, २-३ ओळीत लिहिता येईल. १) गरजवंताला अक्कल नसते.
रिक्षाने प्रवास करणारे सगळेच गरजवंत असतात हे अत्यंत हास्यास्पद आणि बळच विरोधाला विरोध म्हणुन केलेले विधान आहे. रविवारी बर्‍याचदा मी बाहेर जाणे टाळतो पण जावे लागलेच तर सायकलला सुट्टी म्हणुन ५ मिनिटांच्या अंतरावर देखील रिक्षाने गेलेलो आहे.
२) अडला हरी गाढवाचे पाय धरी.
आता रिक्षावाल्यांची अशी सो-कॉल्ड वागणुक माहिती असताना देखील इतक्या वर्षात रिक्षा प्रवासाला समांतर पर्याय (निदान स्वतःपुरता) शोधु न शकणारे गाढव का रिक्षावाला गाढव ?
अवांतर :- "वेड पांघरून पेडगाव ला जाणे" ही म्हण का कुणास ठावूक, पण आठवली
मल तर नाही आठवली बॉ. काही लोकांना वेडही पांघरता येत नाही आणि पेडगावलाही जाता येत नाही. जुने स्कोर सेटल कसे करावे ह्याचे देखील साधे ज्ञान त्यांना नसते. असो...

In reply to by परिकथेतील राजकुमार

हे बघ पर्‍या , कोणी कशाने प्रवास करावा हे सांगण्याचा हक्क तुला नाही , तु फक्त तुझं एक निरिक्षन नोंदव. बाकी सायकल ने आम्ही पण प्रवास करतो , नसली सायकल तर दांडी यात्रा पण करतो. ;) हैदराबाद चा बराचसा भाग आम्ही पायी फिरुन चाळणी केल्या होता. त्याची आठवण झाली. पायी / सायकल वर फिरल्याने शरिराचा उत्तम व्यायाम होतो. एरोबिक एक्सरसाइझ शरीराला छाण असतो. त्यामुळे भुक आणि झोप दोन्ही व्यवस्थित लागते. आणि जळजळ होत नाही.. पर्यायाने असे धागे निघत नाहीत - पायनाथ सायकले

In reply to by परिकथेतील राजकुमार

आता रिक्षावाल्यांची अशी सो-कॉल्ड वागणुक माहिती असताना देखील इतक्या वर्षात रिक्षा प्रवासाला समांतर पर्याय (निदान स्वतःपुरता) शोधु न शकणारे गाढव का रिक्षावाला गाढव ?
परफेक्ट पुणेरी उत्तर. आवडले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>रिक्षाने प्रवास करणारे सगळेच गरजवंत असतात हे अत्यंत हास्यास्पद आणि बळच विरोधाला विरोध म्हणुन केलेले विधान आहे. ......आता रिक्षावाल्यांची अशी सो-कॉल्ड वागणुक माहिती असताना देखील इतक्या वर्षात रिक्षा प्रवासाला समांतर पर्याय (निदान स्वतःपुरता) शोधु न शकणारे गाढव का रिक्षावाला गाढव ? आता हे बघा, मी मुंबईत राहतो. समजा काही कामानिमित्त १-२ दिवसांसाठी पुण्यनगरीत यावे लागले, तर त्या १-२ दिवसांसाठी सायकल घेऊ म्हणता एक? समजा मला वार्ज्यावरून वरून वाकड ला जायचे असेल आणि ते ही भरपूर सामान घेऊन, तर काय करावे म्हणता? मला गिनीज बुकात जायची हौस असती तर "एक दिवसात पुण्यातील ४-५ ठिकाणे PMT ने फिरणे" अशी एक Category टाका असे त्यांना सुचवले तरी असते. तूर्तास तशी हौस नाही, म्हणून तसे पत्र नाही टाकले. नाईलाज म्हणून रिक्षाने जावे लागते अशा अर्थाचे प्रतिसाद अजून १-२ जणांनी वर दिले आहेत. इतकी साधी कारणे ज्याच्या लक्षात येत नाहीत त्याच्याकडे एकतर विचार करण्याची क्षमता कमी असेल किंवा लक्षात येऊनही मुद्दाम युक्तिवाद करत असेल. मला वाटले तुम्ही दुसऱ्या प्रकारात मोडत असाल, तसे नसेल तर माझे "वेड पांघरून..." वाले वाक्य मागे घेतो. खुष ?? (तुम्ही पुण्याचे आहात म्हणून पुण्याचे उदाहरण दिले, दुसऱ्या शहराचे असता तर तिकडचे दिले असते. सांगितलेले बरे, नाहीतर उगाच पुणेद्वेष,पुणेद्वेष असा गळा काढाल.) >>काही लोकांना वेडही पांघरता येत नाही आणि पेडगावलाही जाता येत नाही. जुने स्कोर सेटल कसे करावे ह्याचे देखील साधे ज्ञान त्यांना नसते. इथे स्कोर सेटल करण्याचा काय प्रश्न? काविळ झाली कि जग पिवळे दिसते म्हणतात. मुळात तुमच्याशी स्कोर मेंटेन करून तो सेटल करण्याइतके महत्त्व तुम्हाला मी देतो हा तुमचा गोड गैरसमज आहे. फील गुड factor साठी तुम्हाला तसे वाटून घ्यायचे असेल तर जरूर घ्या. मी मुद्द्याला सहमती किंवा विरोध दर्शवावी, व्यक्तीला नाही, अशा मताचा आहे. उद्या एखाद्या धाग्यावर तुमचे म्हणणे पटले तर इथे वाद झाला होता हे लक्षात न ठेवता सहमती दर्शवेन. ज्यांचे अख्खे जालिय आयुष्य कंपूबाजीत आणि दंगा घालण्यात गेले आहे अशांना हे पचायला जड जाते. असो, अशी बाष्कळ विधाने करून धुरळा उडवायला तुमच्याकडे अमर्याद वेळ आहे. माझ्याकडे तो नाही, म्हणून दर वेळेला तुमच्या आरोपांना उत्तर देईन असे नाही. इथे दिले नसते तर तुमचे म्हणणे मान्य आहे असा अर्थ झाला असता. तो होऊ नये म्हणून इतका प्रतिसाद प्रपंच करावा लागला.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>> मी मुंबईत राहतो. समजा काही कामानिमित्त १-२ दिवसांसाठी पुण्यनगरीत यावे लागले, तर त्या १-२ दिवसांसाठी सायकल घेऊ म्हणता एक? हाण्ण तेज्यायला. ;) ;) >>> मुळात तुमच्याशी स्कोर मेंटेन करून तो सेटल करण्याइतके महत्त्व तुम्हाला मी देतो हा तुमचा गोड गैरसमज आहे. हे सर्वात बेस्ट. संतुलित आणि समर्पक प्रतिसाद. येकदम गप्प केलं राव रिकामटेकड्यांना. ;)

प्रिय अर्धवटराव, लगे रहो! लेख मस्तच झालाय्. एकदम नानकटाईसारखा खुसखुशीत! असेच लिहीत रहा. काका अवांतरः 'यांची संगत नको रे बाप्पा'मधील कांहीं नावे बदलायला हवीत, नाहीं कां?

झक्कास रिक्षा चालवली आहे....... अर्धवटराव >>मनोमन प्रवास ह्या शब्दाला ‘सफर’ हा इंग्रजी अर्थाचा हिंदी प्रतिशब्द योजणारयाला प्रणाम केला माझा सुद्धा त्याला साष्टांग दंडवत.......