Skip to main content

डिफायन्स

लेखक यकु यांनी शनिवार, 22/01/2011 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
२००८ साली आलेला हॉलीवूडचा डिफायन्स हा सिनेमा दुसर्‍या महायुध्दातील एका सत्यकथेवर आधारीत आहे. जर्मनीच्या ताब्यात आलेल्या पोलंड आणि बेलोरूशियामध्ये एसएस स्क्वाड स्थानिक पोलीसांच्या मदतीने ज्यूंच्या धरपकडी आणि अमानुष हत्या सुरू करते. बेलोरुशियामधील एका खेडेगावातील बेल्स्की कुटुंबातील तिघे भाऊ या हत्यासत्रातून वाचतात; पण त्यांच्या वडीलांचा यात बळी जातो. ज्यू दिसला, की त्याला पकडून यातना शिबिरात टाकणे किंवा तिथल्या तिथे गोळ्या घालणे असे धोरण असते. बेल्स्की कुटूंबातील तिघे भाऊ जंगलात पळून जाण्यात यशस्वी होतात. जंगलात पुढे जात असताना जंगलामध्ये पळून आलेली अनेक ज्यू लोक बेल्स्की भावांच्या नेतृत्वाखाली संघटीत होतात.
एसएस स्क्वाड आणि स्थानिक पोलीसांच्या वेळी अवेळी होणार्‍या हल्ल्यांना तोंड देत हे लोक जंगलांमध्ये लपून पुढे जात राहातात. हल्ल्यातून वाचुन जंगलात पळून आलेले अनेक ज्यू या तिघा भावांच्या आश्रयाला येतात; संख्या दररोजच वाढत जाते. त्यासोबतच एवढ्या लोकांच्या सुरक्षेचा आणि खाण्यापिण्याचाही प्रश्न उभा राहातो. इथे टुव्हीया बेल्स्की (डॅनियल क्रेग) आणि झूस बेल्स्की (लिव श्रायबर) या दोन भावांमध्ये वाद होतो. टुव्हीयाचे म्हणणे असते येणार्‍या प्रत्येकाला सोबत घ्यायला हवे तर झूस म्हणतो या सर्वांना संघटीत करून जर्मन सैनिकांशी लढायला हवे. दोघांमध्ये हाणामार्‍या होऊन झूस बेल्स्की एका सोव्हीएत फुटीर सैनिकी टोळीला जाऊन मिळतो. ज्यूंच्या एका मोठ्या समूहाचे नेतृत्व टुव्हीया आणि अझायल बेल्स्की (जेमी बेल) या लहान भावाकडे येते. टुव्हीया जवळच्याच मोठ्या गावात जाऊन तिथे असलेल्या ज्यू लोकांशी बोलणे करतो आणि त्याच्या नेतृत्वात असलेल्या ज्यू लोकांना अन्न, कपडे वगैरेची मदत मिळवण्याचे प्रयत्न करतो. लपून लढत राहाण्याऐवजी जर्मनांच्या डिपोर्टेशन कॅम्पमध्ये जाणेच चांगले आहे असे तिथल्या पुढार्‍यांचे म्हणणे पडते. ते डिपोर्टेशन कॅम्पस नसून यातना शिबिरे आहेत आणि तिथे मृत्यू शिवाय काहीही मिळणार नाही हे टुव्हीया पटवून देतो. या गावातील लोकांपैकी कुणाचा भाऊ, कुणाची बहिण तर कुणाची बायको जंगलामध्ये टुव्हीयाच्या नेतृत्वाखालील समूहात अडकलेले असतात. शेवटी त्या गावातील सगळे ज्यू लोक जंगलात येणे पसंत करतात. जंगलातील ज्यूंच्या समूहाला खूप मोठी मदत मिळते. टुव्हीयाच्या नेतृत्वाखाली आता शिक्षक, नर्सेस, अकाऊंटट, उपटसूंभ तरूण, कोवळ्या मुली, महिला, म्हातारे अशा सगळ्यांचाच भरणा असतो. समूहाचे नेतृत्व करताना येणार्‍या जबाबदार्‍या, निर्माण होणारे हेवेदावे, अन्न नसल्याने होणारी उपासमार यात प्रभावी नेतृत्व टिकवून हल्ल्यांना तोंड देत जमलेल्या समूहाला जंगलातून पुढे घेऊन जात असताना डॅनियल क्रेग आणि जिमी बेलच्या भूमिका अविस्मरणीय बनतात. हे सर्व लोक तात्पुरत्या कॅंम्पच्या ठिकाणी जंगलामध्येच जमीन खोदून लाकडाचे खंदक उभे करतात. शिक्षक लहान मुलांना शिकवू लागतात, तरूण आणि ताकदवान लोक बंदुका हातात घेऊन रात्रीच्या पहार्‍यावर उभे राहातात, आयाबाया रोज तेवढ्या लोकांचे अन्न एकत्र शिजवतात आणि ते सर्वांना वाटण्याचे काम करतात. प्रत्येकजण स्वत:च्या कौशल्यानुसार कुठली ना कुठली जबाबदारी घेतो. या समूहातील तरूण तरूणी आपापल्या आवडीनिवडीनुसार "फॉरेस्ट हजबंड" आणि "फॉरेस्ट वाईफ" ची निवड करतात. त्या समुहामध्ये हाया ही अत्यंत गोड, कोवळी तरूणी आणि अझायल यांचे गूळपीठ जुळत आलेले असते; पण नेमके बोलणे झालेले नसते. अझायल बेल्स्की हायाला मागणी घालतो ते दृश्य फार हसवून गेले. हाया कशाचीतरी टोपली (बहुतेक जंगली कंद) घेऊन जंगलातून कॅम्पवर येते. Hello Chaya, Let me take it.. (Asael) Hello .. (Chaya) तो तिच्या हातातील टोपली घेऊ लागतो. No.. no.. its ok.. its ok.. I am fine.. (Chaya) नेमकं काय बोलावं त्याला कळत नाही. म्हणून तिच्याकडे पाहात तो तिथेच उभा राहातो. Can I help you? (Chaya) Chaya I was wondering if, may be, you.. and .. you and I.. (Asael) I accept! (Chaya) You do? (Asael) Yes, I do. (Chaya) जर्मनांच्या हल्ल्यातून उसंत मिळून कॅम्प थोडा स्थिर स्थावर झालेला असतो. त्या जंगलामध्येच, बर्फ भुरभुरत असताना अझायल आणि हायाचा ज्यूंच्या पध्दतीनुसार विवाह पार पडतो. तो प्रत्यक्ष पाहाणेच उत्तम आहे.
हिवाळा सुरू होऊन बर्फ पडू लागतो तेव्हा कॅम्पवरचे अन्न संपत येते. लोकांची उपासमार होऊ लागते आणि बरेच लोक आजारीही पडू लागतात. स्वत: टुव्हीयादेखील आजारी पडतो. लोकांची उपासमार टाळण्यासाठी तो स्वत:चा घोडा मारतो. टुव्हीयाला सोडून गेलेल्या झूस कडे मदतीसाठी जाऊन ते दोघे एका जर्मन पोलीस ठाण्यावर हल्ला करतात आणि तिथला औषधांचा साठा कॅम्पवर येतो. समूहातील टारगट तरूण शिरजोर होऊन टुव्हीयाचे नेतृत्व भिरकावून देतात आणि समूहावर सत्ता गाजवायला पाहातात. तेव्हा टुव्हीयाला त्या टोळक्याच्या माजलेल्या नेत्याला गोळी घालावी लागते. काही काळानंतर जर्मनांचे हल्ले आणखी तीव्र होतात. आता जंगलातून ज्यूंच्या मागे पळण्याऐवजी जर्मन विमाने जंगलावरून घिरट्या घालू लागतात. टुव्हीयाने तयार केलेल्या कॅम्पवर जबरदस्त बॉम्बफेक केली जाते. कॅम्प सोडून जीव वाचवत पळण्याशिवाय काही मार्ग नसतो. चित्रपटातील युध्दाची दृश्ये खिळवून ठेवतातच पण पूर्ण चित्रपट जंगलात चित्रित केला असल्याने हॉलीवूडच्या चित्रीकरणातील तो नेहमीचा फ्रेशनेस खूप आवडून जातो. जर्मनांच्या हल्ल्यातून या लोकांचा शेवटी जीव वाचतो काय? या लोकांचे शेवटी काय होते ते प्रत्यक्ष चित्रपटातच पाहाणे उत्तम आहे. सेव्हींग ऑफ पायरेट रॅन, हॉटेल रवांडा, ब्लड डायमंड याच चित्रपटांसारखा असल्याने या चित्रपटाच्या चाहत्यांना डेफियन्स नक्कीच आवडेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2239
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

शेवटी व्हिडोवर पाहून घेतला होता. मस्तच आहे. राहून राहून क्रेग बाबत वीचार मनात आला होता की हा माणूस ज्यूधर्मीय आहे की काय ? कारण "म्यूनीक" मधे सूध्दा ह्याने ज्यूंच्या बाजूने लढणार्‍याचा रोल केला होता :)

खरोखरिच छान परिक्षण. चित्रपट नक्कीच डाऊनलोड करुन बघिन! चंबा

बेश्ट, चित्रपट परिक्षण आवडले.