लेखनप्रकार
रोज संध्याकाळी फ़िरून परत येण्याच्या वाटेवरच शॉप अॅन्ड सेव्ह सुपरमार्केट आहे. त्यामुळे अचानक लागलेले किंवा अचानक आठवलेले वाणसामान तिथून आणण्याची सोय आहे. एकदम मोठी यादी वगैरे बनवून दोन तीन आठवड्यांचे सामान जरा दुरच्या मार्केटमधून आणून टाकलेले असतेच. तरीही वाटेवर हे जास्त वर्दळ नसलेले दुकान दिसले, की पाउले तिकडे उगाचच वळतात. मग आलोच आहोत तर माझे उगाच अबरचबर खादाडीचे जिन्नस टोपलीत टाकणे, त्यावर चित्राचे ठरलेले भाष्य ऐकणे वगैरे प्रसंग नेहमीचेच. आज देखील हा मराठीतला प्रेमळ संवाद ऐकून तिथे नेहमी दिसणारी चायनीज म्हातारी मंदसे हसली. मध्यम उंची, बारकुडी काया, इथल्या पधातीचा गुडग्याच्या थोडे खाली येणारा झगा घातलेला. केसांचा आखुड बॉयकट. आमची भाषा ओळखीची नसली, तरी आम्ही आतापर्यंत तिच्या ओळखीचे झाले होतो. “सॉरी सू, आज पण आम्ही तुला स्टॅम्प्स देऊ शकणार नाही.” तिने विचारण्याआधीच चित्राने तिला समजेल अशा सिंग्लीशमधे सांगून टाकले. नेहमीच्या ओशाळवाण्या स्मितामागे सूने तिची निराशा लपवली. ते पाहून चित्राला राहवले नाही. तिला चीअर अप करण्यासाठी चित्राने सू बरोबर थोड्या गप्पा सुरू केल्या. मला विनाटोक अबरचबर खादाडी जमा करायची मोकळीक मिळताच मी त्यांना तिथे सोडून सुपरमार्केटच्या फ़ळ्या शोधू लागलो. पण उगाचच खाण्याची इच्छाच कोण जाणे कुठे नाहिशी झाली. उगाच इकडे तिकडे फ़िरून मी दुकानाच्या बाहेर उभा राहून झाडावर जमलेल्या हजारो साळुंक्यांचा कलकलाट ऐकत राहिलो.
दहा एक मिनटात चित्रा तिच्याशी बोलून जुजबी खरेदी करून बाहेर आली.
“काय म्हणत होती सू?”
“काही नाही, नेहमीचेच! हे सुपरमार्केट छोटेसे असल्यामुळे विस डॉलरच्या वर खरेदी करणारे खूप कमी लोक भेटतात. आज देखील पाच सहा तास वाट बघून चार पाच स्टॅप्सच मिळाले म्हणे.”
“मला एक कळत नाही चित्रा, इथे वेळ घालवण्या ऐवजी ती पलीकडच्या मोठ्या सुपरमार्केट मधे का जात नाही?”
“अरे इथल्या सारखे तिथे जास्त खरेदी केली की फ़्री परचेस स्टॅम्प्स कुठे मिळतात!” चित्राने आठवण करून दिली.
“अरे खरच की! पण येवढा वेळ वाट पाहून चार पाच स्टॅम्प्स मिळणार. कधी तेही नाही. त्यात ती असे काय घेऊ शकणार आहे?
“खरयं. वीस डॉलरवर एक स्टॅम्प फ़्री. दिवसभर उभे राहून तीन चार डॉलरचे सामान सुद्धा तिला मिळत नसावे.! अरे कधी कधी मी मुद्दामच इथून वीस डॉलरच्या वर खरेदी करून तिला मिळालेले स्टॅम्प्स देते. पण इथले भाव इतर ठिकाणपेक्षा जास्तच आहेत. नेहमी असे कसे करणार?
बोलता बोलता आमची पावले आपसुकच घराच्या दिशेने वळली. “ही सू आपल्याच ब्लॉकसमोर रहाते ना? तिने काय घर भाड्याने वगैरे घेतले आहे का?” मी विचारले.
“अरे, भाड्याने कसले! तिचे स्वत:चे अपार्टमेंट आहे.”
“येवढे मोठे स्वत:चे अपार्टमेंट असतांना ही लोकांना रोज दुकानात स्टॅम्प्स मागत कशाला बसते?”
“अगदी स्वत:चे अपार्टमेंट असले, तरी त्याच्या भिंती चाटून पोट थोडीच भरू शकते?”
“एक खोली जरी भाड्याने दिली, तरी बऱ्यापैकी मासिक उत्पन्न विनासायास मिळेल!”
“तिच्या घरी हे दोघे म्हातारा म्हातारी, मुलगी, मुलगा, सून आणि त्यांची तीन नातवंडे इतका गोतावळा रहातो माहीत आहे? तीनही बेडरूम फ़ुल्ली ऑक्युपाईड. कुठली खोली देणार भाड्याने?”
“येवढे लोक रहाणार, हे दोघे म्हातारा, म्हातारी. मग मिळवतं कोण आहे?”
“तेच आज ती बोलत बसली होती. मुलाची नोकरी आहे. सुनेला आधी होती, ती रिट्रेंच झाल्यापासून घरीच आहे. मुलाची कमाई जेमतेमच असावी बहुतेक. हिचा नवरा रिटायर होउन पाच वर्षे झाली. हिची एका फ़ॅक्टरीत नोकरी होती, तीही आता नाही. वय झालं, सतत असेंब्ली लाईन वर बसून पाठ दुखते. हिचही वय आता सदुसष्ट आहेना!”
“आणि मुलगी? एका मुलाबरोबर दिसायची मागे. लग्न झाले नाही का तिचे?”
“मुलीचेच तर दु:ख तिला छळते आहे.”
“म्हणजे काय?”
तेवढ्यात घरी पोहोचलो तेव्हा दार बंद करून मुलगा बाहेर जातांना दिसला. कुठे जातोय, केव्हा येणार ह्या चौकशात सुपरमार्केट म्हातारीचा विषय राहूनच गेला.
एक दिवस रात्री अकरा नंतर नुकतीच झोप लागत होती, अचानक बाहेरून खूप जोरजोराने आरडा ओरडा ऐकू येउन झोप मोड झाली. बेडरूमच्या खिडकीतून पाहिले तर समोरच्या अपार्टमेंट मधूनच आवाज येत आहेत असे लक्षात आले. बरेच लोक खाली जमले होते. थोड्या वेळातच एक अॅम्ब्युलन्स कर्कश सायरन वाजवत आली. बरोबर आलेल्या महिला मदतनीस भराभरा वर गेल्या. वरच्या फ़्लॅटमधून एका मुलीला घेऊन सगळे खाली आ्ले. ती मुलगी जोरजोरात हिसडे देऊन सुटायचा प्रयत्न करीत होती. तिला स्टॅम्पवाल्या बाईच्या मदतीने कसेबसे व्हॅनमधे बसवले. सायरनच्या भणभणाटात आली तशीच ती व्हॅन रस्त्याला लागली. जमलेले लोक कुजबुज करीत पांगले. पुन्हा एकदा रात्रीच्या शांततेने सगळ्या कॉलोनीचा कबजा घेतला.
सकाळी शेजारणीकडून चित्राला सगळी हकीगत कळली. म्हातारीच्या मुलीला वेडाचा जोराचा झटका आला होता. मागेही एक दोनदा असे झाले होते म्हणे. मुलीच्या बॉयफ़्रेंडनी तिला फ़सवले होते. तिच्याबरोबर आधी नेहमी फ़िरायचा. लग्नाआधी जरा सेटल होउ, एकत्र बिझीनेस काढू म्हणून तिला नादाला लावले. मुलीने नोकरीत थोडाफ़ार पैसा साठवला होता. तो सगळा गेला. वर कर्ज काढून गळ्याभोवती पाश आणखी आवळला. कर्ज चुकवणे अशक्य होते. दिवाळे काढावे लागले. भावाचाही पैसा गेला. मग त्या मुलाने एक दिवस म्हातारीच्या मुलीला सोडून दिले. हे कुटुंब आधीच बेताच्या परिस्थितीतले. म्हातारीचे राहते घर हाच एक आसरा सगळ्यांना उरला. ह्या सगळ्या तणावाने मुलीला वेडाचे झटके येऊ लागले. घरीच रहायची. जास्त हाताबाहेर गेले तर अॅम्ब्युलन्स बोलावून इलाज करवून परत आणायचे. मुलाच्या कमाईवर रोजचे खर्च भागायचे. त्यात हॉस्पीटलमधे रहाण्याचा खर्च परवडणे शक्यच नव्हते.
ही चित्तरकथा ऐकून हळहळण्यापलीकडे आम्ही काय करू शकत होतो? त्यानंतर महिनाभराने पुन्हा ती बाई सुपरमार्केटमधे दिसली. चित्राने तिच्याजवळ मुलीची चवकशी केली. सध्या बरी आहे म्हणली.
“अग तिचे लक्ष हळुहळु इतर गोष्टीत रमव. आपोआपच तिला जुन्या दु:खाचा विसर पडेल. घरबसल्या काही उद्योग का नाही करत तुम्ही? चार पैसे मिळतील” चित्राने सुचवून पाहिले.
“घरी मला शांततेत रहाता आले असते, तर मी स्वत: ह्या आधीच नसता का सुरू केला काही उद्योग!” सू उद्वीग्न होउन म्हणाली. “सुनेला अजूनही नोकरी मिळालेली नाही. ती घरीच असते. कामावर देखील तिचे कोणाशीच पटत नाही. नाहीतर तिच्याबरोबरच काही केले असते ना? मला देखील ती काही करू देत नाही. सारखी भांडणे, त्यात मुलीचा हा प्रॉब्लेम! काही शांतता लाभत नाही घरात. उद्योग कसला करणार!”
“अग मग, निदान एखादी नोकरी तूच का करीत नाहीस? सुपरमार्केटमधे उभे राहून लोकांकडून असे कितीसे स्टॅम्प्स तू जमवणार? कुठल्याही नोकरीत यापेक्षा नक्कीच जास्त कमावशील.” तिचे दिवसभर
दुकानात लोकांना मागून स्टॅम्प्स जमवणे अजुनही चित्राच्या पचनी पडले नव्हते.
“किती ठिकाणी काम मागून पाहीले. माझ्यासारख्या म्हातारीला कोणीच काम देत नाही. आणि मी इथे खूप कमवण्याच्या उद्देशाने येतच नाही. स्टॅम्प्स मिळो न मिळो. मला काही फ़रक पडत नाही. निदान इथे येऊन घरातल्या कटकटींपासून घटकाभर मुक्ती मात्र नक्कीच मिळते. शिवाय जे काही स्टॅम्प्स मिळतात, त्याचे समाधान वेगळेच! ह्या लहानशा गोष्टीच मनाला खूप शांतता देऊन जातात!”
बाहेरच्या झाडांवरच्या सावल्यां दुकानातल्या प्रकाशात विरून जात होत्या. घरातल्या छाये्तील कोलाहलात तिला मनस्वाथ्य सापडले नव्हते. झाडावरच्या असंख्य साळुंक्यांचा कलकलाट तिची शांती भंग करीत नव्हता. तो कोलाहाल कानामागे टाकण्यासाठी आम्ही बाहेरच्या सावल्या मागे टाकून घरचा रस्ता धरला. सावल्यांचे सावट मनावर पडू न देण्याचा हाच एक उपाय आम्हाला माहित होता.
मिसळपाव
असे लोक पाहिले की दया
काम करत करत प्रतिष्ठेने
अशा गोष्टी पाहून काळजाला घरं
In reply to अशा गोष्टी पाहून काळजाला घरं by नगरीनिरंजन
+१
आपल्याला जमतय तेव्हढ करण हेच
सावल्या
In reply to सावल्या by सहज
वायांग कुलीत ची उपमा आवडली.
सहज सुंदर कथा
ह्म्म..
>>तो कोलाहाल कानामागे
...
निशब्द .. तरीही अशी कथा वाचुन
In reply to निशब्द .. तरीही अशी कथा वाचुन by गणेशा
खूप आवडले
In reply to निशब्द .. तरीही अशी कथा वाचुन by गणेशा
प्रतिसाद चूक आणि त्यामुळे
हं....
हम्म
In reply to हम्म by लवंगी
>> या वयात पण स्वावलंबनाने
In reply to हम्म by लवंगी
काल इथे वालमार्ट मध्ये काम
In reply to हम्म by लवंगी
@ लवंगी ..
In reply to @ लवंगी .. by मनीषा
खर आहे...
अशी माणसे
कसं तरीच होत असं काही पाहिलं