अर्पणओळ - नववर्षात व्यायामाचा संकल्प सोडलेल्या सर्वांना!
बाहेर मस्त थंडी पडलिये, पहाटे उठून आलं घातलेला वाफाळता चहा प्यावा, दिवस लवकर सुरु करावा, डोंगरामागून येणार्या सूर्यनारायणाचं दर्शन घ्यावं असं मला अजिबात वाटत नाही........ म्हणजे लहानपणापासून कधी वाटलंच नाही, पण तसं वाटावं म्हणून मी प्रयत्न भरपूर केले. आई, आज्जी बरेचदा जवळच्या देवळात काकडआरतीला जात असत. किती मस्त वाटतं वगैरे वर्णनंही करत्.....तरीही पहाटे उठणं हा माझा घास नव्हे. मुलांना पहाटे उठण्याची चांगली सवय लावावी असं आईला नेहमी वाटत असे. तिला त्यात कधी यश मात्र आलं नाही. आम्ही ऐकायला तयार नव्हतो म्हणून नंतर आईनंच तिचं मत बदललं आणि "मुलांनी आत्ता नाहीतर कधी झोपायचं? तेवढंच सुख!" अश्या विचारापर्यंत ती आली. आजीचं मत मात्र बरंच वेगळं होतं. निदान मुलींनी तरी पहाटे उठावं असं तिला वाटे. यासाठी 'संस्कृत सुभाषितं पाठ कर' म्हणून ती बरीच मागं लागत असे. पहाटे काही लोकांना कविता, लेखन असं काय काय सुचतं.......मला साधं दात घासायलाही सुचायचं नाही. शनिवारी मात्र शाळेसाठी न उठून सांगते कोणाला? त्यात आपल्याकडची म्हण आहेच 'न कर्त्याचा वार शनिवार'! आता शनिवारऐवजी दुसर्या कोणत्याही वारी सकाळची शाळा असती तरी मी तेवढाच आळस केला असता हे काय सांगायला हवं! तसेही पहाटे उठून मला फारसे दिव्य अनुभव कधी आले नाहीत.
बाहेरच्या अंधारलेल्या वातावरणात मला नको नको त्या आकृत्या दिसायच्या. आता तुम्हीच सांगा, अंधारात कधी कासव, साप, विचित्र आकाराची माणसं, झाडाच्या हलत्या पानातून तयार होणारे आकार्.......काय म्हणून दिसत नाही? असो, तर माझी, आई आणि आज्जीची ही शाब्दीक झटापट पाहून बाबांनी माझ्या मनावर व्यायामाचं महत्व बिंबवायचं ठरवलं. दोन दिवस सक्काळी लवकर उठून त्यांनी सूर्यनमस्काराचं प्रात्यक्षिक दाखवलं. एक तक्ता भिंतीवर चिकटवण्यात आला. मीही दोन दिवस नेमानं सूर्यनमस्कार घालून विक्रम केला आणि 'आरंभशूर' ही पदवी प्राप्त केली.
दिवाळीच्या सुट्टीत मला बाहेर पळण्यासाठी पाठवावं असं सर्वानुमते ठरलं. आत्या, ताई आणि माईला घेऊन दिवाळीत येणार होती. मग आम्ही तिघींनी व्यायामानं दिवस सुरु करण्याचा घाट घातला. पहिल्याच दिवशी माईनं आमच्यावर बहिष्कार घातला आणि रजईत गुरफटून झोपून गेली. ती नंतर दिवसभरात कधीतरी व्यायाम करेल असं ठरलं.ताईचा आणि माझा निश्चय पक्का असल्यानं दोघी निघालो. बाहेर बराच अंधार असल्यानं एकमेकींच्या साथीनं पळायला सुरुवात केली आणि पाच मिनिटातच मला विविध आकारांबरोबरच फक्त ज्योत हवेतून हेलकावत येताना दिसली. ताईला दाखवल्यावर तीही त त प प करू लागली. एखाद्या मिनिटात पांढरे कापड हवेतून गेलं आणि आम्हाला थंडीतही घाम फुटला. झाडामागे थोडावेळ थांबून आम्ही घराकडे धूम ठोकली. रात्रपाळीचा धोतर नेसलेला वॉचमन हातात कंदील घेऊन परत घरी जात होता हे सत्य फार काळ आमच्यापासून लपून राहिलं नाही. त्यानंतर दिवाळीच सुरु झाली आणि पळणं बारगळले. पहाटे नाही तरी दिवसभरात एकदा व्यायाम करायचाच असं ठरलं.
एकदा माईला आणि मला कोकणात काकांकडे रात्रीच्या एस. टी. ने पाठवावं असं ठरलं तेंव्हा आजीच्या भाषेत आम्ही 'मोठ्या' झालो होतो. रात्रभर गाडीनं प्रवास करून पहाटेच कणकवलीस उतरलो आणी पुढची आचर्याची एस. टी पकडली. आता अडीच तास छान झोपता येणार होतं. वाटेत उखडलेल्या रस्त्यामुळे जाग आली. अंधारात खिडकीबाहेर लक्ष गेलं. गाडीच्या हेलकाव्यासरशी एक जाडजूड साप खिडकीवर शेपटीचा फटका देवून पुन्हा वर जात होता. माझी भीतीनं गाळण उडाली पण काच बंद होती म्हणून डोळे गच्च मिटून बसून राहिले. थोड्याच वेळानं बसवर सामान बांधायचा तो सापासारखा दोर आणखी खाली आला आणि माझा गैरसमज दूर झाला. उजेड असता तर असं झालं असतं काय मंडळी? अश्याप्रकारे पहाटेच्या अंधाराशी माझं सूत काही जमत नव्हतं. काकांकडून परत येताना आमची कोल्हापूर गाडी होती आणी तेथून खासगी बसने पुणं गाठायचं होतं. झोपेत माईचं डोकं काचेवर टण् टण् आपटतं म्हणून नेहमी मलाच खिडकीची जागा मिळते. यावेळीही मनाचा मोठेपणा दाखवून मी खिडकीशेजारी बसले. रात्रीची छान झोप लागली. पहाटेचे चारेक वाजले असतील, अर्धवट जागी होऊन बघते तर अगदी आठदहा फुटांवर एक उदास चेहेरा हवेत तरंगताना दिसला आणि मी खाडकन् जागी झाले. चहासाठी चालकसाहेब ढाब्यावर थांबले होते. शेजारी विरुद्ध दिशेला जाणारी बस थांबली होती. एक झोपाळलेला मनुष्य त्याच्या खिडकीतून बाहेर एकटक पहात बसला होता. त्याच्या बसमधील दिवे लागल्यामुळे मला हे दृष्य दिसलं होतं. व्यायामानं मनाची शक्तीही वाढती......दिवसभरात कधीतरी व्यायाम करायलाच हवा.
तर्हेतर्हेचे आकार दिसणं बरोबर की चूक तेच कळेनासं झालं पण मी धीर सोडला नाही. सालाबादप्रमाणे शाळेची सुट्टी आली. पहाटे पळायला जायचं मनावर घेतलं तर यावेळी आज्जीनेच नापसंती दाखवली. मुलीच्या जातीला असं निर्मनुष्य रस्त्यावरून पहाटे पाठवणं तिला मान्य नव्हतं. "काऽऽऽही होत नाही, जाऊ दे तिला!" असं व्यायामप्रेमी बाबांचे म्हणणं पडल्यामुळे मी मैत्रिणींना घेऊन जायचं ठरवलं. मला कधी झाडांच्या पानांमधून भूत दिसत असे तर कधी दगडधोंड्यातून माणसाचा चेहरा! धीर देवून गीता आणि सविता कंटाळल्या. रस्त्यांवरच्या दिव्यांमुळे माझीच सावली भस्सकन् पायाखालून पुढे जायची आणि भीती दाखवायची. आमचं पळणं नेमाने अठवडाभर चालूच होतं. माझ्या शंका कुशंकाही चालूच असत. अश्या एका पहाटे नेहमीच्या गुलमोहरासमोरून जाताना मी एका माणसाची आकृती हवेत असल्याचे दोघींना दाखवलं तर पुन्हा मला वेड्यात काढून मार्गक्रमणा सुरु राहिली. घराजवळच्या मैदानाला दोन फेर्या मारून आम्ही परत येताना चांगलं उजाडत आलं होतं. रहदारी, लोकांच्या एकत्र जमून गप्पा सुरु होत्या. गुलमोहराशेजारून जाताना गर्दीतून आवाज कानावर पडला,"बॉडी खाली घेऊ, साहेब?" आम्ही क्षणभर गोठलो. तिथे आत्महत्या केल्यामुळे एका मनुष्याचा देह झाडाला लटकत होता. सविता आणि गीताने माझ्याकडे पाहिले आणि जी मॅरेथॉन सुरु झाली ते घरी येऊनच थांबलो. प्रसंग ऐकून घेतल्यावर आजीनं लगेच दृष्ट काढून टाकली आणि रामरक्षा पुटपुटत राहिली. "बास झाले ते व्यायम अन् फियाम! काय दिवे लावायचेत ते घरीच लावा." आज्जी रागावली होती. "पोरीच्या मनावर परिणाम झाला तर उद्या तिला कोण पत्करील?" हे वाक्य बाबांसाठी होतं. मग आम्ही पहाटेचा व्यायाम थांबवला आणि दिवसभरात कधीतरी नक्की करायचा असं ठरवून टाकलं.
रेवती
वाचने
5356
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेहेहे!! भारी आहे हा भास आणि
हाहाहा
अरे वा ? अरे वा ? एकंच
खूप आवडलं. लहानपणीच काय,
खुसखुशित लेख....... मला
लय भारी! उठुबिठु नका ह! अगदी
In reply to खुसखुशित लेख....... मला by नरेशकुमार
लेख मस्त. मज्जा वाटत असताना
एकदम झक्कास! काही वर्षापुर्वी
लेख एकदम खतरनाक आहे .तसा मी
In reply to एकदम झक्कास! काही वर्षापुर्वी by अनामिका
>>>मला साधं दात घासायलाही
खी खी खी... रेवती "आज्जी"
मस्त मस्त मस्त
मस्तच
हा खेळ सावल्यांचा मस्तच लेख
रेवतीताई, मस्त खुसखुशीत लेख..
हा हा हा शेवट एकदम भारीच.
हा हा हा शेवट एकदम भारीच.
ये ब्बात! मस्त लेख!
मस्तं लिहलंय. मजा आली
:) लेख आवडला.
मस्तच!
हाहाहा!!!
हेहेहे :)
लेख मस्त! पण तो शेवट लै वंगाळ
हा हा हा!
छान लेख
मस्त लेख. भास-आभासांचे किस्से
मंडळी, आता म्हणावं तेवढं
रेवती आज्जी..
In reply to मंडळी, आता म्हणावं तेवढं by रेवती
धन्यवाद! शतक पूर्ती साठी
In reply to रेवती आज्जी.. by मी-सौरभ
हा घ्या
In reply to धन्यवाद! शतक पूर्ती साठी by रेवती
वाढदिवस नसतांना कशाला उगाच
In reply to मंडळी, आता म्हणावं तेवढं by रेवती
मस्त लेख
मस्तच! लेख अतिशय मनापासुन
झकास लेख .. आवडला
लेख छान झालाय
मला सकाळी मुद्दाम कोणी उठ