केवढे हे क्रौर्य! - ना वा टिळक
ना वा टिळक यांची अतिशय सुंदर आणि कारुण्यरसाने ओतप्रोत भरलेली रचना म्हणजे "केवढे हे क्रौर्य!". ही कविता वाचून , डोळ्यात पाणी न आलेला माणूस विरळाच. ही कविता खूप चटका लावते. माझ्या आवडत्या कवितांपैकी ही एक कविता आहे.
अतिशय चित्रमय वर्णन असलेल्या या कवितेच्या पहील्या कडव्यात कवीने एका जखमी पक्षीणीच्या वेदनामय आणि करुण शारीरीक स्थितीची वर्णन रेखाटले आहे. ही पक्षीण बाणाने विद्ध झाल्याने तिच्या कोमल शरीरातून भळभळा रक्त वहात आहे. अतिरक्तस्त्रावामुळे तिला वारंवार ग्लानी येत आहे आणि तरीही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही पक्षीण आपले घरटे शोधीत उडत आहे. आणि शेवटी एकदाची धडपडत ती घरट्यात आलेली आहे.
क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.
घरट्यात पाऊल टाकताक्षणी नेहमीच्या सवयीने तिची इवलीशी पिल्ले किलबिलाट करून आनंद व्यक्त करतात, घरट्यात एकच आनंदाची लहर उठते आणि गोजीरवाणी पिल्लं आ वासून आईला खाऊ मागतात. तेव्हा ती त्यांना म्हणते- बाळांनो आजच्या या दुर्देवी दिवशी माझ्याच्याने फार बोलवत देखील नाही. पण हा शेवटचा घास मी तुमच्याकरता आणला आहे तो मी भरवते आणि आपण देवाची आठवण काढू यात कारण माझ्यापश्चात तुम्हा आनाथ पिल्लांचा तोच त्राता आहे.
म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!
पण ती देखील आई आहे मरण्याआधी देखील ती अनुभवाचे २ शब्द तिच्या लेकरांना सांगते आहे. माणूस हा तिच्या मते क्रूर आहे, अमानुष आहे आणि फक्त स्वतःचा स्वार्थ पहाणारा प्राणी आहे. तिच्या पिलांना कदाचित आत्ता ती सांगते त्याचे गांभीर्य कळणार नाही पण पुढे लक्षात येईल म्हणून ती मरण्याच्या आधी त्यांना स्वानुभव सांगते आहे. बोलायचे जरी तिला श्रम होत असले तरी, त्यांना सावध करते आहे.
अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं
निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!
म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.
एवढं बोलून आता तिच्या प्रयाणाची वेळ जवळ आली आहे. पण त्या क्षणादेखील आपल्या बाळांची मऊ कापसाची शय्या स्वतःच्या रक्ताने भीजू नये म्हणून ती वात्सल्यमूर्ती पक्षीण झाडाखाली चिरनिद्रेकरता देह ठेवते आहे. थकून, आपल्या पिल्लांना आशीर्वाद देत देत कायमची झोपी जात आहे. आणि केवळ माणसाच्या क्रौर्यामुळे एक सुंदर जीव, लहानग्या , निरागस पिल्लांची आई देवाघरी गेलेली आहे. ती पिल्लंदेखील आता जगतील का नाही ते केवळ देवच जाणतो. केवढा हा निसर्गाचा र्हास!! केवढे हे क्रौर्य!!!
असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.
मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!
याद्या
14655
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
वाचली आहे. पक्षिण म्हण वा
शब्द नाहीत.
+१
मस्त लिहिलेस शुचि. आवडले.
खूप छान आणि हृदय्स्पर्शी
हृदयस्पर्शी कवीतेची पुन्हा आठवण करून दिलीस.
खूपच करूण.
फक्त अर्धीच वाचू शकलो. खूपच
हो हो!!
हृदयद्रावक. शब्दच
उत्तम रसग्रहण ! बाकी ही
अरे ह्या रडणार्या बायकांना
इश्श!!!
In reply to अरे ह्या रडणार्या बायकांना by Nile
सुंदर लिखाण
प्रतिसादांबद्दल सर्वांचे
दुसर्या कडव्यातील
ना वा टिळकांच्या कविता
मातेचे हृदय म्हणून ही कविता
In reply to ना वा टिळकांच्या कविता by धनंजय
का?
In reply to ना वा टिळकांच्या कविता by धनंजय
याच दिशेने, पण नेमके असे नाही
In reply to का? by चित्रा
आवडले.. खूप सेन्सिबल
In reply to याच दिशेने, पण नेमके असे नाही by धनंजय
शेवटंच कडवं अक्षरशः खलास आहे.
छान लिहिले आहे.
अजुन डोळ्यातील पाणी हटेना.........
कविता पाठ आहे.. अतिशय आवडती