✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्त्रीमुक्ती - विस्कळीत विचार

च
चित्रा यांनी
Mon, 01/10/2011 - 22:31  ·  लेख
लेख
पाश्चिमात्य तसेच भारतातील स्त्रीमुक्तीवादी चळवळींचा माझा अभ्यास नाही, हे या लहानशा लेखाच्या प्रारंभीच सांगून टाकते. तेव्हा या लेखात जे काही आहे, ते माझ्या वैयक्तिक निरीक्षणांमधून आले आहे, त्यात माझे अनुभव जेव्हा कधीतरी स्त्रीमुक्तीवादी लेखिकांच्या स्त्री किंवा मिळून सार्‍याजणी सारख्या मासिकांमधून ज्या कथा/कादंबर्‍या किंवा लेख हाती लागले त्यांच्याशी आपोआप जोडले गेले, कधी त्यात आणि माझ्या मध्यमवर्गीय आयुष्यात मी जे काही समान पाहिले त्यामधून ही मते कधी टोकदार तर कधी बोथट होत गेली. स्त्रियांच्या मुक्ततेचा प्रश्न हा सर्व मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांच्या समाजाच्या दृष्टीने नेहमीच थोडा टिंगलीचा, थोडा टवाळीचा तर कधीकधी अतिशय गंभीर असा ठरला आहे. मुळात मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांबद्दल असे म्हणण्याचे कारण असे की एका पीडीत अशा व्यक्तीची ती स्त्री आहे म्हणून पीडीत आहे, आणि म्हणून तिची सुटका करावी, हा विचार मध्यमवर्गियांनीच महत्त्वाचा समजला आहे/असावा. या प्रश्नांकडे अभ्यासक म्हणून बघण्याची गरज मध्यमवर्गानेच जाणली असावी, असा माझा समज आहे. तरी हे प्रश्न मात्र मध्यमवर्गाच्या पलिकडले, सगळ्याच समाजांना, समाजातील सगळ्याच स्तरांतील लोकांचे आहेत. मी ज्या गावात वाढले, तेथे कुणबी, ब्राह्मण, कायस्थ आणि मुसलमान अनेक वर्षे राहत होते. ब्राह्मण कनिष्ठ मध्यमवर्गीय अधिक होते, कायस्थ हे त्यामानाने सुखवस्तू, शिकलेले असत आणि मुसलमान कारागीर अधिक होते. याउलट कुणबी विशेष करून लोणावळ्याकडील भागातून वसतीला आले होते, आणि लहान लहान "बेडी" करून राहत असत. हे सांगण्याचे विशिष्ट कारण असे, की या जातींप्रमाणे आणि आर्थिक स्तराप्रमाणे स्त्रियांवरील बंधने कमी-जास्त होती. तरीही एका विशिष्ट पातळीवर त्या स्त्रिया समान होत्या. तसेही 'अर्थ' सारख्या चित्रपटांमधून कथेतील पुरुषाच्या आजूबाजूच्या सर्व स्तरातील निम्न, मध्यमवर्गीय आणि यापेक्षा उच्चस्तरीय आणि वरवर पाहता मध्यमवर्गीयांच्या सोवळ्या बंधनांमधून मुक्त स्त्रियांचेही प्रश्न असतात त्यांची झलक दिसलीच होती. त्यावेळी साम्य लक्षात आले नाही, पण जशी मी मोठी झाले तशी माझ्या आजूबाजूला असलेल्या घरांमधली स्त्रियांबद्दलची अ‍ॅपथी, थोडेसे दुर्लक्ष, थोडीशी हात झटकून टाकण्याची भावना दिसायला लागली. माझ्या माहेरी कामाला येणारी बाई लग्न होऊन आमच्या वाडीत आली, तेव्हा आम्ही त्यांच्या घरच्या सत्यनारायणाला गेलो होतो ते आजही आठवते. तिची सासू वर्षानुवर्षे आमच्याकडे कामाला होती. तिच्या सुंदर आणि शालीन अशा त्या सुनेला लग्न करून आणल्यानंतर त्यांच्या घरी प्रसाद देताना पाहिल्याचे मला आजही जसेच्या तसे आठवते. पण नवरा व्यसनी झाला, लवकर गेला, त्याच्यामागे चार मुलांचा सांभाळ करण्यात तिचे आयुष्य कसे जाते आहे हे आम्ही पाहत होतो, पण थोडीफार पैशाची मदत आणि तिच्या मुलांच्या शिकवण्या याखेरीज आम्ही फार काही केले असे वाटत नाही. आता तिचे स्वतःचे घर आहे, मुले बर्‍यापैकी नीट शिकली, पण तिने खूप भोगले आहे/असावे. अजूनही चार घरची कामे सोडू शकत नाही, हेही तिचे वास्तव आहे. ज्या स्त्रिया तिच्याएवढ्याही नशीबवान नव्हत्या, त्यांना नवर्‍याच्या मृत्युनंतर घर सोडावे लागले, त्यांच्याबद्दल काहीबाही ऐकू येत असे. लहानपणची माझी खेळण्यातली मैत्रिण तिच्या बहिणीच्या बाळंतपणातल्या निधनानंतर सोळाव्या वर्षी लग्न होऊन तिच्याच मेव्हण्याला दिली गेली. माझ्या मुसलमान मैत्रिणीच्या घरातली अगदी थेट हीच कथा. तेव्हा आम्ही चौथीत असू. अकरावीतल्या तिच्या सख्ख्या मोठ्या बहिणीला अपघाती निधन झालेल्या बहिणीच्या पंचवीशीतल्या नवर्‍याच्या मागे स्कूटरवर बसून जाताना पाहिली तेव्हा वाटलेले आश्चर्य अजून आठवते. आमच्या घरी शिक्षण होते, घरदार व्यवस्थित होते. तरी कुठे फारशी स्त्री मुक्त होती? अर्थात पुरुषही मुक्त नव्हते. नोकरीला बांधलेले होते. पण घरातल्या स्त्रियांचा दिवस हा पहाटे चारला सुरु होई आणि रात्री अकराला मावळे. चार वाजता उठून करायचे काय तर आंघोळी करून सर्वांचे डबे, मुलींच्या वेण्या, आणि तयारी. दहाला परत थोडी सुटका झाली, तरी बारापर्यंत सकाळी शाळेत गेलेली मुले घरी येण्याची वेळ व्हायची, मग त्यांची जेवणे, अडीच तीनच्या सुमाराला दुपारची थोडी झोप आणि परत चार वाजल्यापासून संध्याकाळची तयारी. उन्हाळ्यात उन्हाळ्यातली कामे - वाळवणे घालणे, वर्षभराच्या तांदळाला बोरिक पावडर लावून ठेवायचा (हा काय प्रकार होता, तो जे केले आहे त्यांनाच कळेल. तांदूळ दोन हातांमध्ये घ्यायचा आणि पांढर्‍या पावडरने भरलेले हात घासून ती त्या तांदळाला चोळायची. असा वर्षभराचा तेरा-चौदा माणसांना लागेल एवढा तांदूळ आमच्या घरी उन्हाळ्यात यायचा), डाळींना उन्हे द्यायची, पापड, लोणची, मिरगुंडे, बटाट्याचा वर्षभरच्या उपासांना पुरेल एवढा कीस घालायचा, चिकवड्या-कुरड्या इ. इ. दहा कामे असत. ही कामे करण्यासाठी आम्ही मदत करत असू, पण मुख्य काम बायकांचेच. ती झाली की महिनाभर विश्रांती, माहेरी जाण्याची चंगळ असे. तेवढे झाले की परत जूनच्या पहिल्या आठवड्यात घरी. शिवाय एकत्र कुटुंबांमधील रुसवे-फुगवेही असत. या सगळ्या धबडग्यात नवर्‍याबरोबर चित्रपटाला जाण्यासारखी हौस तरी भागवायला वेळ कुठे होता? पुढे मी जेव्हा नवर्‍याकडून सासू-सासरे एकत्र चित्रपटांना जायचे हे ऐकले तेव्हा आठवले की आईबाबा दोघेच मिळून एकत्र चित्रपटाला गेले आहेत असा केवळ एक दिवस मला आठवतो. तेव्हा आईला झालेला आनंद आठवतो. माझ्या घरातल्या इतर स्त्रियांचीही कथा याहून काही फार वेगळी नव्हती. असे वाटते की या बायकांनी आपल्या जाणत्या आयुष्यातील खूप वेळ हा आपल्याला दिला, घरच्यांच्या सन्मानासाठी, पाहुणे-रावळ्यांसाठी दिला. आता तिला माणसांची ऊठबस करण्याचा फार कंटाळा येतो, इतका की कधीकधी मला तिच्या कंटाळ्याचा कंटाळा येतो. पण कधीतरी विचार करताना असे वाटते की तो कंटाळा येण्याचा तिला हक्क आहे. तो तिच्या वेळेवरचा तिचा अधिकार आहे. तो कसाही, तिला हवा तसा घालवण्याचा अधिकार तिला आहे. मुळात स्त्रियांची मुक्ती हा विषय इतका चावून चघळून चोथा झालेला विषय बनला आहे, की त्यावर वेगळे काय बोलणार असे कधीतरी वाटते. कधी वाटते की आपली एवढी पात्रता नाही. पण तरीही असे म्हणावेसे वाटते की प्रत्येक माणूस, जो जिवंत असतो, त्याला मिळालेल्या प्रत्येक क्षणाची लांबी ही सारखीच असते. पुरुष आणि स्त्री या दोन्ही व्यक्ती असल्या तरी त्यांना मिळणारे क्षण हे कसलेही लिंग न स्विकारता येतात. त्या क्षणांमध्ये स्त्रियांचा क्षण किंवा पुरुषांचा क्षण असे भेद नसतात. त्या क्षणाच्या काळात काय करावे निर्णय करण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असावे. असे अनेक क्षण स्वत:च्या मनाविरुद्ध काढणे याचा अर्थ जवळजवळ संपूर्ण आयुष्य मनासारखे न जगता येणे. हे कोणाही व्यक्तीला करावे लागू नये. यासाठी पैशाचे स्वातंत्र्य, शिक्षणाचे स्वातंत्र्य, दुसर्‍याच्या इच्छेचे, वेळेचे मोल समजणे इत्यादी गोष्टींचे महत्त्व आहे. बाईने डाळीला फोडणी द्यावी, का पुरुषाने; किंवा बाईने बाळाची शी काढावी, का पुरुषाने, हे प्रश्न माझ्या मते महत्त्वाचे आहेत, पण दुय्यम आहेत, प्रत्येक जित्याजागत्या व्यक्तीला मिळालेला वेळ कसा वापरता यावा या विचारांचे बाय-प्रॉडक्टस आहेत. मुळात जन्माला आलेल्या स्त्री-पुरुषांना आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर आपण मान्य केलेल्या चौकटींमध्ये, शक्य तितक्या स्वेच्छेने करता यावा, ही माझ्या मते खरी स्वातंत्र्याची व्याख्या असायला हवी. चौकटी अवघड असल्या तर स्वत:पुरत्या शिथिल करण्याचे स्वातंत्र्य हवे. स्त्री-मुक्ती चळवळीची उपेक्षा होते, त्यांचा अजेंडा कसा चुकीचा, एकांगी आहे हे खरेखोटे दळण आपण नेहमीच दळत असतो. मराठी लेखक आणि लेखिकाही एकेरी, कंटाळवाण्या कथा लिहून समाजातील विसंगती दाखवत राहतात. पण हे असे सतत कंटाळवाणे काहीतरी कथा-कादंबर्‍या-लेखांमधून दाखवणारे भले मूर्ख, एकांगी असतील, पण आजूबाजूला जे जिवंत व्यक्तींच्या आकांक्षा दाबणे, त्यांचा स्वतःच्या वेळेवर हवा तेवढा अधिकार नसणे घडत होते/घडत आहे ते अधिक चुकीचे आहे असे नाही वाटत?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29803 वाचन

💬 प्रतिसाद (161)

प्रतिक्रिया

एका कळीला फुल होन्याचि संधी

नरेशकुमार
Tue, 01/11/2011 - 18:15 नवीन
एका कळीला फुल होन्याचि संधी मिळालिच पाहिजे होती. असे मनापासुन वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

पुरुषांना कमी पगाराच्या बायका

विजुभाऊ
Wed, 01/12/2011 - 13:00 नवीन
पुरुषांना कमी पगाराच्या बायका का हव्या असतात हे कोडे आहे स्त्रीने आपल्याला नकार देवू नये म्हणून असेल बहुतेक. जास्त पगाराचा नवरा मिळावा ही स्त्रीयांची अपेक्षा असते तर पुरुषांची स्त्रीने नेहमी आपल्या पेक्षा थोडे कमीच रहावे. आर्थीक बाबतीत वरचढ होऊनये. शिवाय स्त्रीचे उत्पन्न असेल तर तो बोनस गृहीत धरण्यात येतो. मिळाला तर उत्तमच की. ही भावना असते. लग्नानन्तर समजा स्त्रीची प्राप्ती नवर्‍यापेक्षा जास्त झाली की त्या स्त्रीला तिच्या उत्पन्नामुळे सुपीरीयॉरिटी कॉम्प्लेक्स येतो असा ही समज आहे. पुरुषाने हा कॉम्प्लेक्स सहन करणे थोडे अवघडच असते. बाकी भरपूर शिकुन स्त्रीया लग्नानन्तर स्वतःचे डोके ( मेंदू) बाजूला का ठेवून देतात हे देखील एक कोडे आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

धन्यवाद

प्रियाली
Wed, 01/12/2011 - 17:02 नवीन
लग्नानन्तर समजा स्त्रीची प्राप्ती नवर्‍यापेक्षा जास्त झाली की त्या स्त्रीला तिच्या उत्पन्नामुळे सुपीरीयॉरिटी कॉम्प्लेक्स येतो असा ही समज आहे. पुरुषाने हा कॉम्प्लेक्स सहन करणे थोडे अवघडच असते.
धन्यवाद. उत्तर मला पटते.
बाकी भरपूर शिकुन स्त्रीया लग्नानन्तर स्वतःचे डोके ( मेंदू) बाजूला का ठेवून देतात हे देखील एक कोडे आहे
डोके बाजूला ठेवणे, स्त्री, लग्न वगैरेंचा परस्परसंबंध नाही. स्त्रियांचे व्यवच्छेदक लक्षणही नाही. समाजधारणाही नाही. डोके बाजूला ठेवण्याचे काम स्त्री आणि पुरुष हे दोन्ही करत असतात. तेव्हा हे कोडे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पुरुषांना कमी पगाराच्या बायका

अप्पा जोगळेकर
Wed, 01/12/2011 - 15:50 नवीन
पुरुषांना कमी पगाराच्या बायका का हव्या असतात हे कोडे आहे. छ्या. काहीतरीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

चित्राताई, तुझी

मितान
Tue, 01/11/2011 - 00:31 नवीन
चित्राताई, तुझी स्वातंत्र्याची व्याख्या मनापासून पटली. तू दिलेली उदाहरणे माझ्याच सासर माहेरच्या एकत्र कुटुंबात पाहिलेली आठवतात. अनेकदा तू म्हणतेस तसे क्षण मनासारखे जगायला कुणाचीच हरकत नसते. तिथे आड येतो तो पिढ्यानपिढ्या स्त्री म्हणून आपल्यात झिरपत आलेला तो विशिष्ट दृष्टिकोण. एक उदा : एक सामाजिक विषयावरचा चित्रपट बघायला कोणी मित्रमैत्रिण तयार होईना म्हणून मी एकटीच गेले नि चित्रपट पाहून आले. त्यावर कॉलेजातल्या 'स्त्रीमुक्तिवादी' गटात १५ दिवस चर्चा झाल्या ! नंतर मी एकटी सिनेमाला कधीही जाऊ शकले नाही. अर्थात खूप छोटं उदाहरण आहे हे. पण मला तरी अजून स्वता:तल्या १ % तरी शिल्लक असलेल्या पारंपारिक कर्मठ दृष्टिकोनातून मुक्त होता आलं नाही !
  • Log in or register to post comments

सिनेमाला एकट्याने जाणे

प्रियाली
Tue, 01/11/2011 - 05:19 नवीन
एक सामाजिक विषयावरचा चित्रपट बघायला कोणी मित्रमैत्रिण तयार होईना म्हणून मी एकटीच गेले नि चित्रपट पाहून आले. त्यावर कॉलेजातल्या 'स्त्रीमुक्तिवादी' गटात १५ दिवस चर्चा झाल्या ! नंतर मी एकटी सिनेमाला कधीही जाऊ शकले नाही.
अरेरे! असं व्हायला नको. सिनेमाला बिनधास्त एकट्याने जावे. मी अनेकदा जाते. उलट, माझा नवरा मला प्रोत्साहन देतो. (जा बाई! मी पैसे घालवून तीन तास झोपण्यापेक्षा, पैसे न घालवता तीन तास ताणून देतो असे म्हणतो. अर्थात, सर्व चित्रपटांसाठी नाही.) नाहीतरी, अलेक्झांडर, ३००, एंजल्स अँड डिमन्स बघण्यात त्याला इंटरेस्ट नसतो आणि मला उगीच बाजूला बसून कुणी (घोरून) डिस्टर्ब केलेले चालत नाही. मी आरामशीर एकट्याने चित्रपट बघते. :) माझ्याही मैत्रिणी आहेत हसणार्‍या पण प्रत्यक्षात गंमत अशी की त्यांच्यापैकी अनेकजणी नवर्‍याबरोबरही थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघत नाहीत. (कारण वेळ नाही, इंटरेस्ट नाही, मुले लहान आहेत वगैरे) बायकांनी एकट्याने हॉटेलात जाऊ नये, एकट्याने थेटरात जाऊ नये म्हणणार्‍यांना खेटरे दाखवणे उत्तम. इतक्या वर्षात हे केले नाहीस म्हणून आता एकदा करून बघ, अशीच गंमत म्हणून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

बायकांनी एकट्याने हॉटेलात जाऊ

नीधप
Tue, 01/11/2011 - 09:20 नवीन
बायकांनी एकट्याने हॉटेलात जाऊ नये, एकट्याने थेटरात जाऊ नये म्हणणार्‍यांना खेटरे दाखवणे उत्तम.<< अगदी अगदी. कामानिमित्ताने मुंबईभर फिरत असताना भूक लागते/ चहाची तल्लफ येते/ थोडावेळ टेकावसं वाटतं... मग उडपी/ कॉफिशॉप/ रेस्तरां असं जे काय त्या वेळेला गरजेचे असेल ते आणि समोर दिसेल त्याप्रमाणे त्यात घुसायचं. काही ठराविक एरियांमधे मुंबईतही अजूनही एकटी बाई येऊन बसलीये यावर वेटर्स मधे जरा बारीकशी हलचल पसरतेच. आपली कावळा नजर त्यामुळे ते दिसतेच. आणि आपल्यामुळे हे झालंय ह्यामुळे चक्क मजा येते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

करेक्ट!

पिवळा डांबिस
Tue, 01/11/2011 - 09:58 नवीन
कामानिमित्ताने मुंबईभर फिरत असताना भूक लागते/ चहाची तल्लफ येते/ थोडावेळ टेकावसं वाटतं... मग उडपी/ कॉफिशॉप/ रेस्तरां असं जे काय त्या वेळेला गरजेचे असेल ते आणि समोर दिसेल त्याप्रमाणे त्यात घुसायचं. १००% सहमत! माझी बायको एम एस सी करतांना तिला मुंबईभर फिरावं लागायचं! ज्यांना एमएससीचा अभ्यासक्रम माहिती आहे त्यांना ठाऊक असेल की त्यात दिवसभर लॅबमध्ये प्रयोग करावे लागतात आणि संध्याकाळी लेक्चर्स असतात.आणि ती मुंबईभर (म्हणजे फोर्ट पासून ते बोरिवली/ मुलुंडपर्यंत कुठेही) असतात. लेक्चर संपेपर्यंत रात्रीचे ८.३० वाजतात म्हणजे घरी येईपर्यंत ९.३०-१०.००. अशा वेळी त्या मुलींनी काय दिवसभर उपाशी रहायचं? माझी (त्यावेळेची भावी) पत्नी आणि तिच्या मैत्रिणी (कधी एकत्र तर कधी एकएकट्याच) मग अशाच कोठेतरी उडप्याच्या हॉटेलमध्ये जात असत. मला त्यात कधीच काही वावगं वाटलं नाही. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की माझी आणि माझ्या पत्नीची ही गोष्ट २५ वर्षांपूर्वीची आहे.... आणि तिच्या आईवडिलांना आणि भावी सासू-सासर्‍यांनाही त्यावेळेही त्यात कधीच काही वावगं वाटलं नाही..... त्यानंतर मग आज हे मी काय वाचतोय? माझ्या त्यावेळच्या पहाण्यातली मराठी लोकं वर वर्णन केल्याइतकी बुरसटलेली कधीच नव्हती... की मुंबईकर आणि इतर महाराष्ट्रीयन लोकं यांत हा मूलभूतच फरक आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

>>>>मुंबईकर आणि इतर

मितान
Tue, 01/11/2011 - 12:48 नवीन
>>>>मुंबईकर आणि इतर महाराष्ट्रीयन लोकं यांत हा मूलभूतच फरक आहे? :) हॉटेलात एकटीने खाणे मला नवीन नाही. पण नीधप म्हणते तशी एकटी बाई खात बसलेली बघुन आजुबाजूला आणि वेटर्स मध्ये किंचित कुजबूज सगळीकडेच जाणवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

तशी एकटी बाई खात बसलेली बघुन

अप्पा जोगळेकर
Wed, 01/12/2011 - 15:57 नवीन
तशी एकटी बाई खात बसलेली बघुन आजुबाजूला आणि वेटर्स मध्ये किंचित कुजबूज सगळीकडेच जाणवते. हे म्हणजे काहीच्या काहीच आहे. तुमच्याच डोक्यात असेल कि अरे आपण काहीतरी चुकिची गोष्ट करतोय की काय ? इतका वेळ नसतो कुणाकडे. आपल्यालाच वाततं लोकं आपल्याला पाहतायत असं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

की मुंबईकर आणि इतर

रेवती
Tue, 01/11/2011 - 19:02 नवीन
की मुंबईकर आणि इतर महाराष्ट्रीयन लोकं यांत हा मूलभूतच फरक आहे? असं काही नाही. नवरा अमेरिकेत असताना मी महिनोन् महिने एकटी रहायचे तेंव्हा एकटीनेच हैदराबादच्या खानपानगृहात जायचे. तेंव्हाही आजूबाजूच्या लोकांच्या आणि वेटर्सच्या नजरेतला विचित्र भाव टिपता येत असे. जेवताना असे लोकांनी आपल्याकडे बघणे मलाच नको वाटायचे म्हणून मग एक हाटेल जिथे एकदोन वेटर्स जरा ओळखीचे होते तिथे जायला सुरुवात केली. एकटीला बघून तेही हमखास छोटे टेबल, रस्त्याकडची बाजू बघून देत आणि वेळ चांगला जात असे. तिथून बाकिचे लोकही फारसे बघू शकत नसत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

सिनेमा, हॉटेलात जाउन खाणं,

पुष्करिणी
Tue, 01/11/2011 - 15:42 नवीन
सिनेमा, हॉटेलात जाउन खाणं, चहाच्या टपरीवर चहा पिणं या गोष्टी मी एकटीनं केल्यात आणि करतेही. पहिल्यांदा असं वाटलं होतं की सगळे लोक माझ्याकडेच पहातायत ...पण नंतर भीड चेपली. इतर मैत्रिणीही ह्या गोष्टी हळूहळू करू लागल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

गुड!

पिवळा डांबिस
Wed, 01/12/2011 - 05:42 नवीन
मुंबईखेरीज अन्यत्रही बायकांनी गरज पडल्यास एकट्याने बाहेर जाऊन हॉटेलात खाणं हे घडू शकतं हे वाचून खरोखरीच बरं वाटलं. हां, असं करतांना पुरुष बघत रहातात हा मुद्दाही सत्य आहे. त्याचं काय आहे की बायका (मग त्या एकट्या असोत वा बायका-बायकांच्या ग्रुपमध्ये असोत) हाटेलातच काय पण कुठेही दिसल्या की तिथे एकटे असलेले पुरुष (मग त्यां पुरुषांचं वय, वजन, उंची, रंग, मॅरिटल स्टॅटस काहीही असो!) त्यांना न्याहाळत बसतात हे मात्र एक अखिल भारतीय दुर्दैव आहे! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

त्यांना न्याहाळत बसतात हे

अप्पा जोगळेकर
Wed, 01/12/2011 - 16:00 नवीन
त्यांना न्याहाळत बसतात हे मात्र एक अखिल भारतीय दुर्दैव आहे! म्हणजे काय? पाहायचंही नाही की काय? - आपादमस्तक न्याहाळणारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

खरं तर माझा अनुभव असा आहे की

पुष्करिणी
Wed, 01/12/2011 - 19:55 नवीन
खरं तर माझा अनुभव असा आहे की छोट्या गावातल्या बायका या बाबतीत जास्त मुक्त असतात , त्यांची जास्त रिस्क घ्यायची तयारी असते. माझे पुण्यातले शेजारी आणि पुण्यात यायच्या आधीच्या गावातले शेजारी यांत स्त्रीमुक्ती किंवा स्त्री स्वातंत्र्य या बाबतीत आधीच्या गावातले शेजारी/ओळखीचे लोक जास्त ओपन मांइडेड होते / आहेत. मी व्यक्तीश: एका दारु पिउन धिंगाणा घालणार्‍या आणि बेकार नवर्‍याच्या बायकोला ओळखते, त्या बाइंनी आजूबाजूच्यांची अजिबात तमा न बाळगता , वेळप्रसंगी नवर्‍याच्या दोन मुस्काटात ठेउन त्याला नोकरीला लावलं..आणि दारुही सोडवली. आधी लोकांनी कुजबूज केली पण नंतर सपोर्टही खूप केलं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

शंका

पंगा
गुरुवार, 01/13/2011 - 11:46 नवीन
मुंबईखेरीज अन्यत्रही बायकांनी गरज पडल्यास एकट्याने बाहेर जाऊन हॉटेलात खाणं हे घडू शकतं हे वाचून खरोखरीच बरं वाटलं.
असे का वाटावे बरे? म्हणजे, इतरत्र असे घडू शकत नसावे अशी शंका का बरे यावी? सूर्य गेटवे ऑफ इंडियाला उगवून चौपाटीस मावळत असावा काय? प्रशस्तिपत्राबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

सहमत आहे

आजानुकर्ण
गुरुवार, 01/13/2011 - 11:56 नवीन
बायकांनी गरज पडल्यास बाहेर खाण्याजोगी परिस्थिती असणाऱ्या पुण्यात वास्तव्य असल्याचे वाचून माझंही मन भरून आलं. त्यापेक्षा जास्त आनंद वरील प्रशस्तीमुळे झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

सहमत आहे

आजानुकर्ण
गुरुवार, 01/13/2011 - 11:56 नवीन
बायकांनी गरज पडल्यास बाहेर खाण्याजोगी परिस्थिती असणाऱ्या पुण्यात वास्तव्य असल्याचे वाचून माझंही मन भरून आलं. त्यापेक्षा जास्त आनंद वरील प्रशस्तीमुळे झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

सूर्य!

पिवळा डांबिस
गुरुवार, 01/13/2011 - 23:57 नवीन
सूर्य गेटवे ऑफ इंडियाला उगवून जराशी तपशीलातली चूक! सूर्य गेटवेला न उगवता मुंब्र्याच्या डोंगरात उगवतो. पण असो! चौपाटीस मावळत असावा काय? खचितच! जि़ज्ञासूंनी प्रत्यक्ष जाऊन खात्री करावी!!! (मुंबईचा जाज्वल्य अभिमान असलाच पाहिजे ही अट मुंबईकर होण्याला लागतच नाही! --आदरणीय भाईकाका) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

हाहाहा

मुक्तसुनीत
Fri, 01/14/2011 - 00:03 नवीन
जराशी तपशीलातली चूक! सूर्य गेटवेला न उगवता मुंब्र्याच्या डोंगरात उगवतो. पण असो! यलोनॉटी , सूर्य गेटवेला उगवण्याची चूक होयाचीच. अस्सल मुंबईकराला "कापूस कुठे उगवतो" असे विचारल्यावर नाही का , तो "गादीतून आपोआप बाहेर येतो" असे उत्तर देत ? ;-) - कुणी मुंबईस एक भिकार म्हण्टले तर तिला सात भिकार म्हणणारा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

तुमच्या उपप्रतिसादाची वाट

रेवती
Fri, 01/14/2011 - 01:52 नवीन
तुमच्या उपप्रतिसादाची वाट बघतच होते. पिडांच्या लेखाला, प्रतिसादाला तुमच्या उपप्रतिसाद आला नाही तरच नवल!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

:)

पिवळा डांबिस
Fri, 01/14/2011 - 06:19 नवीन
अस्सल मुंबईकराला "कापूस कुठे उगवतो" असे विचारल्यावर नाही का , तो "गादीतून आपोआप बाहेर येतो" असे उत्तर देत ? मुसुराव, अगदी बरोब्बर! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+१

पिवळा डांबिस
Tue, 01/11/2011 - 00:33 नवीन
प्रत्येक माणूस, जो जिवंत असतो, त्याला मिळालेल्या प्रत्येक क्षणाची लांबी ही सारखीच असते. पुरुष आणि स्त्री या दोन्ही व्यक्ती असल्या तरी त्यांना मिळणारे क्षण हे कसलेही लिंग न स्विकारता येतात. त्या क्षणांमध्ये स्त्रियांचा क्षण किंवा पुरुषांचा क्षण असे भेद नसतात. त्या क्षणाच्या काळात काय करावे निर्णय करण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असावे. असे अनेक क्षण स्वत:च्या मनाविरुद्ध काढणे याचा अर्थ जवळजवळ संपूर्ण आयुष्य मनासारखे न जगता येणे. हे कोणाही व्यक्तीला करावे लागू नये. यासाठी पैशाचे स्वातंत्र्य, शिक्षणाचे स्वातंत्र्य, दुसर्‍याच्या इच्छेचे, वेळेचे मोल समजणे इत्यादी गोष्टींचे महत्त्व आहे. बाईने डाळीला फोडणी द्यावी, का पुरुषाने; किंवा बाईने बाळाची शी काढावी, का पुरुषाने, हे प्रश्न माझ्या मते महत्त्वाचे आहेत, पण दुय्यम आहेत, प्रत्येक जित्याजागत्या व्यक्तीला मिळालेला वेळ कसा वापरता यावा या विचारांचे बाय-प्रॉडक्टस आहेत. मुळात जन्माला आलेल्या स्त्री-पुरुषांना आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर आपण मान्य केलेल्या चौकटींमध्ये, शक्य तितक्या स्वेच्छेने करता यावा, ही माझ्या मते खरी स्वातंत्र्याची व्याख्या असायला हवी. चौकटी अवघड असल्या तर स्वत:पुरत्या शिथिल करण्याचे स्वातंत्र्य हवे. १००% सहमत! उत्तम लेख आणि त्याहून उत्तम सारांश!! आणि वर वर्णन केलेले स्वातंत्र्य पूर्णपणे शक्य आहे (मायक्रो लेव्हलवर) असा अनुभव आहे!!!
  • Log in or register to post comments

सामाजिक स्वतंत्रता....!!

इन्द्र्राज पवार
Tue, 01/11/2011 - 01:11 नवीन
"....चौकटी अवघड असल्या तर स्वत:पुरत्या शिथिल करण्याचे स्वातंत्र्य हवे. ..." ~ चित्राताईंच्या या लक्षणीय लेखातील वरील वाक्य फार अर्थपूर्ण आहे. म्हणजे अगदी लक्ष्मीबाई टिळकांपासून ते गौरी देशपांडे यांच्यापर्यंतचे या विषयावरील साहित्य चर्चेला घेतले तरी जिथेतिथे ही एक भूत 'चौकट' स्त्रीच्या मुक्तछंदातील पाचर म्हणून आडवी येतेच. अवघड असेल तर अजूनही अगदी 'प्रोफेसर' पदावर काम करणारी स्त्री ती चौकट फेकून देणे दूरच पण शिथिल करण्यासाठी काय प्रयत्न करत असेल हाही एक संशोधनाचा विषय ठरेल. मी मुंबई-पुणे येथील वातावरणाचा उल्लेख मुद्दाम करीत नाही, कारण नाही म्हटले तर तेथील स्त्री वेळ आली तर ती चौकट शिथिल होईल की नाही याची वाट न पाहता ती तोडूनही टाकू शकेल...इतपत ती बौद्धिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र बाण्याचीही आहे. पण दुर्दैवाने बहुतांशी भागात आजही 'आले आहे नशिबी, तर करावे लागेल...' म्हणून नोकरीवरून दमूनभागून आल्यानंतरही अगोदर घरी येऊन हातात रीमोट कंट्रोल घेऊन बसलेल्या नवरा नावाच्या 'मालका'ला चहा करून तिला द्यावा लागतो....[हे मी स्वतः डोळ्यानी माझ्या थोरल्या बहिणीला करताना पाहिले होते...आजही करते....शासकीय सेवेत क्लास टू ऑफिसर असून]. "....आजूबाजूला जे जिवंत व्यक्तींच्या आकांक्षा दाबणे, त्यांचा स्वतःच्या वेळेवर हवा तेवढा अधिकार नसणे घडत होते/घडत आहे ते अधिक चुकीचे आहे असे नाही वाटत?...." ~ नक्कीच चुकीचे आहे. पण याला कारण काही अंशी स्त्रीच आहे असे माझे निरिक्षण सांगते [मी स्वतः आजही एकत्र कुटुंबात राहतो आणि चित्राताईंनी लेखात उल्लेख केलेली सर्व कामे आमच्या घरातील स्त्रिया करीत असतात आणि त्यातही माझी आई ही 'आपल्या भावाच्या दारी येऊन राहिलेली' या दर्जाची असल्याने इतरांच्या तुलनेत तिला आणखीन एक पाटी जादा काम नेहमीच असते]. चित्राताई हे मान्य करतील की स्त्रीच्या मनामध्ये एक नैसर्गिक भय असतेच असते. वेळ आली तर स्त्री वाघालादेखील भीत नाही, भुतालाही ती बाहेरची वाट दाखवेल; पण का कोण जाणे हीच स्त्री 'पुरुषा'ला घाबरते. हे घाबरणे का यावे तर स्त्रीनेच मनाची कल्पना करून घेतली आहे की पुरुषाशिवाय तिचे जीवन अपूर्ण आहे. ती अपूर्णता आपल्या कपाळी येऊ नये म्हणून प्रसंगी ती आपल्या आशाआकांक्षेला मुरड घालते आणि स्वतःच्या वेळेवर उदक सोडते. हे शिक्षित स्त्रीच्या बाबतीत होते तर या महाराष्ट्राच्या हजारो खेडोपाडी पसरलेल्या गावातील स्त्रीची काय रामकहाणी !! माझ्या माहितीतील (अगदी माझ्या वर्गातील म्हटले तरी चालेल) एम.ए. झालेल्या मुलीचा बी.ए. झालेल्या, पण व्यवसाय धंद्यात चांगला स्थिर असलेल्या, युवकाशी रितीरिवाजानुसार विवाह झाला. वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविलेली ही वर्गभगिनी स्त्री मुक्ती चळवळीवर तावातावाने बोलत असे, त्यावेळी तिचे कौतुकही आम्ही वर्गमित्र करत असू. पण एकदा नवरोबाने तिच्या मैत्रिणीला पाठविलेल्या पत्रावर तिने " सौ. xxx शिंदे-देसाई" अशी जोड आडनावाची (जसे 'माधुरी दिक्षित-नेने) अशी सही केलेली पाहिल्यावर ते पत्र हिसकावून घेऊन फाडून टाकले तर त्याच्या कृतीला या कॉलेज प्लॅटफॉर्मवर बिजली असलेल्या व आता 'नवरी' झालेल्या तरुणीने काहीच विरोध केला नाहीच उलट 'या पुढे तशी सही करणार नाही' अशी चक्क कबुलीही दिली. हा किस्सा नंतर तिने आमच्या ग्रुपला एवढ्यासाठी सांगितला की, तिला पत्र पाठविताना आता फक्त "सौ.xxx देसाई" असाच उल्लेख करून पाठवावा यासाठी. म्हणजेच नवर्‍यापेक्षा जास्त शिकूनही आणि गुणात्मकरित्याही अधिक सक्षम असणारी अशी ही स्त्री जर 'बॅक टु दि पॉट्स अ‍ॅण्ड पॅन्स' होते, तर स्त्रीमुक्ती गीत गाणार्‍याने तरी काय अपेक्षा ठेवायची? इन्द्रा
  • Log in or register to post comments

याला कारण काही अंशी स्त्रीच

रेवती
Tue, 01/11/2011 - 01:31 नवीन
याला कारण काही अंशी स्त्रीच आहे थोडी सहमत. स्त्रीनेच मनाची कल्पना करून घेतली आहे की पुरुषाशिवाय तिचे जीवन अपूर्ण आहे. पुरुषही खरेतर स्त्रीशिवाय अपूर्ण आहे आणि त्याचे भय त्यालाही वाटत असते. उदाहरणे तर अनेक देता येतील. त्यातल्या कितीतरी उदाहरणांमुळे स्त्री मुक्ती बाजूला राहून जाते कि काय असे वाटू शकेल. एकंदरीत विचार करताना स्त्री किंवा पुरुष असा विचार न होता बरोबर काय किंवा चुकिचे काय (कृती) असा विचार व्हावा. नवरा नावाच्या 'मालका'ला चहा करून तिला द्यावा लागतो यात दोष दोघांचाही आहे. नवरा आधी घरी पोहोचला आहे तर त्याने चहा करायला काय हरकत आहे आणि जर तो ती कृती करत नसेल तर त्याला तसे ठामपणे सांगण्याची कृती बायकोने करायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

याला कारणे अशी असू शकतात की,

Pearl
Wed, 01/12/2011 - 11:33 नवीन
>>म्हणजेच नवर्‍यापेक्षा जास्त शिकूनही आणि गुणात्मकरित्याही अधिक सक्षम असणारी अशी ही स्त्री जर 'बॅक टु दि पॉट्स अ‍ॅण्ड पॅन्स' होते, तर स्त्रीमुक्ती गीत गाणार्‍याने तरी काय अपेक्षा ठेवायची?>> याला कारणे अशी असू शकतात की, १. त्या स्त्रीला जर मुलं-बाळं असतील तर (ती स्त्रीस्वभावातली एक त्रुटी म्हणा किंवा weak point म्हणा किन्वा आई असण्याचा effect/side effect म्हणा ) अशा स्त्री ला जुळवून घेणे महत्वाचे वाटत असते आपल्या बछड्यांसाठी. त्यांना आई-वडिल दोन्ही मिळावेत आणि त्यांचा परिपक्व विकास व्हावा, परिपूर्ण जीवन मिळावे असे तिला वाटत असल्याने may be ती बंडाचे निशाण न फडकवता शरणागती पत्करत असावी २. किंवा माहेरून support नसणे वा अन्य काही मजबूरी (मजबूरीला मराठी शब्द पटकन आठवत नाहिये) असावी. ३. समाजाच pressure असू शकते. लहानपणापासून पहात आलेले संसार, नवरा-बायकोंच्या वागण्याबद्दलच्या बरं-वाईट/चूक्-बरोबर च्या समाजमान्य कल्पना ह्यांचाही पगडा/pressure असू शकते. किंवा एकट्या बाईला समाज कसे जगू देत नाही किंवा तिच्याकडे कसे पाहिले जाते, तिचे जीवन कसे चर्चिले जाते ह्याची पाहिलेली उदाहरणे ही कारणेही असू शकतील. Anyways, मला पण शिकलेल्या/विचार करण्याची ताकद असलेल्या मुली उगाच अशी मुस्कटदाबी/अरेरावी सहन करताना पाहिल्या की अस्वस्थ व्हायला होते. याचा अर्थ प्रत्येकीने उठून घरी रोज भांडणं केली पाहिजेत असे नाही पण फक्त नवरा आहे म्हणून उगाचच मुस्कटदाबी/अरेरावी सहन करू नये. सध्याच्या जगात मुलींनी लग्नाआधीचेच नाव कायम ठेवण्याचे विचार/चर्चा चालू असताना असे प्रसंग पाहिले की मनाला दु:ख होते. कोणालाही आपण जन्मापासून आपण वापरत असलेले नावच नक्कीच अधिक जवळचे वाटणार. असो. हा झाला १ sample विषय. असे हजारो विषय्/गोष्टी आहेत. असो. (माझ्यापुरते मला असे वाटते की स्त्रियांना स्त्री मुक्ती वगैरे अशी काही मुक्ती अभिप्रेत नसून स्त्री ला १ स्वतंत्र अस्तित्व किंवा १ माणूस म्हणून जगायचे आहे असे अभिप्रेत आहे. ) ही झाली शिकल्या सवरत्या स्त्रियांची कथा. यावरून अशिक्षित/परावलंबी स्त्रियांच्या व्यथांची कल्पनाच न केलेली बरी. थोडे विषयाच्या अनुषंगाने अवांतरः आणि बरेच घरात मी असे पाहिले आहे की सासूलाच आवडत नसते स्वतःच्या मुलाने स्वतःच्या घरात काम केलेले. मुलाला सुनेने ताट वाढून हातात दिले पाहिजे. etc. मग सून नोकरी करणारी असो किंवा नसो. मला हे ही कळत नाही कि सुनेने कसे वागावे हे सासू(सासरे) कसे काय ठरवू शकतात/ का बंधन घालू शकतात. हा स्वयंघोषित अधिकार त्याना कुणी दिला आहे. सुनेने कसे वागावे किंवा मुलगा-सुने ने एकमेकांशी कसे वागावे हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न असतो. अवांतराबद्दल क्षमस्व. पण आसपास असे प्रकार पाहिले की रहावत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

उत्तम

नंदन
Tue, 01/11/2011 - 01:21 नवीन
लेख आवडला. संयत, नेमका आणि टोकाची भूमिका न घेणारा - लेखात उल्लेखलेल्या बव्हंशी दळणीय कथांपेक्षा बराच वेगळा. स्वातंत्र्याची लिंगनिरपेक्ष व्याख्याही पटली. (इंद्राच्या प्रतिसादातला शेवटचा किस्सा वाचून 'आहे मनोहर तरी' मधला 'डाऊन विथ द किचन'चा प्रसंग आठवला.)
  • Log in or register to post comments

लेख आवडला!

स्वाती२
Tue, 01/11/2011 - 01:22 नवीन
चित्रा ताई, माझ्या लहानपणच्या आठवणी अगदी अशाच! फरक इतकाच की विभक्त कुटुंब होते. पण तरीही नोकरी निमित्ताने रहाणारे भाचे-पुतणे आले-गेले खूप असायचे. तीच गोष्ट आजोळी! मात्र या सगळ्या कष्टांची घरातल्या पुरुषांना किम्मत होती. आमच्याकडे बरेचदा सकाळचा दुसरा चहा बाबा करायचे. आमच्यासाठी पहाटे पाच वाजता उठलेल्या आईला १५-२० मिनिटे जरा स्वस्थ बसुन निदान हेडलाईन्स तरी वाचायला मिळायच्या. दुपारी तीन-साडेतीन ला बाबा चहा प्यायला घरी यायचे. तेव्हाही आई एखादे चांगले पुस्तक वाचत असेल तर 'असु दे! तुझी लिंक तुटेल' म्हणत बाबा चहा करायचे. मला आणि माझ्या बहिणीला त्यांनी कुठलीच गोष्ट मुलगी म्हणून नाकारली नाही आणि मुलगा नाही म्हणून कधी खंतही केली नाही. लहानपणी या सगळ्याचे काही विशेष वाटले नव्हते पण जरा समज आल्यावर इतर घरात मुलींना मिळणारी वागणूक् बघितल्यावर प्रचंड चिडचिड व्हायची. मात्र खरी झलक अनुभवली ती लग्नानंतर ६ महिने सासरी राहिले तेव्हा. इकडे यायचे म्हणून नोकरी सोडली होती. दुपारी सगळे काम आटपून हातात वाचायला पुस्तक घेतले तर सा. बाई म्हणाल्या-'मला असे मुलींनी जाड जाड पुस्तक वाचत बसलेले अजिबात आवडत नाही. माझ्या मुलींना पण मी असल्या सवयी लागू दिल्या नाहित.' आख्ख्या एक मिनिटाने माझी ट्युब लागली. 'मला मात्र पुस्तकांशिवाय चैन पडत नाही. त्यामुळे मी येताना वाचायला पुस्तकं घेऊनच आले.' मी त्यांना शांतपणे सांगितले. मात्र तो पर्यंत माझ्या अवांतर वाचनावर कुणी आक्षेप घेइल असे कधी वाटले नव्हते. हळू हळू माझा रिकामा वेळ आणि तो मी कसा घालवावा इतपासून माझी देवावरची श्रद्धा मी कशी व्यक्त करावी/ करु नये इतपर्यंत बर्‍याच गोष्टीबाबत मतप्रदर्शन, आज्ञावजा सल्ले देणे झाले. शेवटी त्यांना स्पष्ट सांगावे लागले की पहिली २५ वर्षे पुसणे मला जमणार नाही. तुमच्या कडून काही नवीन आवडले तर जरूर घेइन पण तुमच्या मुलाने पसंत केलेली मी ही अशी आहे. गंमत म्हणजे माझ्या सा. बाईंनी स्वतःचे छंद जोपासले होते. सा. बुवा त्यांना घरात सगळ्या कामात मदत करायचे. अगदी वेळप्रसंगी पोळ्यासुद्धा भाजायला मदत करायचे. म्हणजे स्वातंत्र्य फक्त स्वतः पुरते! :(
  • Log in or register to post comments

माझीदेखील केस काहीशी अशीच आहे

शुचि
Tue, 01/11/2011 - 01:39 नवीन
माझीदेखील केस काहीशी अशीच आहे :( १८० अंशात सासर-माहेर फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

जिथे तिथे आपल्या मतांची पिंक

Pearl
Wed, 01/12/2011 - 11:40 नवीन
>>'मला असे मुलींनी जाड जाड पुस्तक वाचत बसलेले अजिबात आवडत नाही. माझ्या मुलींना पण मी असल्या सवयी लागू दिल्या नाहित.' हेच मला पटत नाही की जिथे तिथे आपल्या मतांची पिंक टाकायचा अधिकार आपल्याला आहे ही समजूत असे लोक का करून घेतात. कुठे असे कुणी ऐकले आहे का की जावयाला एखाद्या सासूबाईंनी असे सांगितले की, 'मुलांनी अमूक अमूक असे करू नये. मला अजिबात आवडत नाही. सो तू परत असे नको करू' असे सांगितले तर त्याला ते आवडेल का? त्याची प्रतिक्रिया काय असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

उत्तर

पंगा
गुरुवार, 01/13/2011 - 12:49 नवीन
हेच मला पटत नाही की जिथे तिथे आपल्या मतांची पिंक टाकायचा अधिकार आपल्याला आहे ही समजूत असे लोक का करून घेतात.
याला एकच उत्तर आहे: भारतीय समाजात अजूनही प्रबळ असलेली Gerontocracy. (याला मराठीत 'थेरडेशाही' म्हणावे काय?) याचा त्रास कोणालाही, कधीही आणि कोठेही, धर्म- जाति- आणि लिंगनिरपेक्षतः होऊ शकतो. ('मौत और टट्टी, किसी को भी, कभी भी और कहीं भी आ सकती है' या सुभाषिताप्रमाणेच.) आणि त्यात senilityची भर पडली की मग आणखीच बहार येते. जणू दुधात साखरच! मात्र याला विरोध करणे हे हिंदुधर्मातील महत्पापांपैकी होय.
कुठे असे कुणी ऐकले आहे का की जावयाला एखाद्या सासूबाईंनी असे सांगितले की, 'मुलांनी अमूक अमूक असे करू नये. मला अजिबात आवडत नाही. सो तू परत असे नको करू'
शंका: असे सासूबाईंनीच म्हटले पाहिजे का? सासरेबुवांनी म्हटलेले नाही का चालणार? आणि 'मुलांनी अमूक अमूक करू नये' हे स्पेसिफिक कारणच असले पाहिजे का? एकंदरच ढवळाढवळ - आणि तीही बहुधा अत्यंत कुजकटपणे - चालू शकेल काय? थोडक्यात उत्तरः होऊ शकते.
असे सांगितले तर त्याला ते आवडेल का?
अशा प्रकारचे काहीही सांगितलेले मनापासून आवडणारी कोणतीही जिवंत - आणि डोक्याने अंमळ अधू किंवा कोमात वगैरे नसलेली - व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) दाखवून द्या. तिला सद्गुरू मानण्यास मी तयार आहे.
त्याची प्रतिक्रिया काय असेल?
स्वतःच्या घरात राहत असतानासुद्धा दुसर्‍याच्या घराचा हप्ता भरून (किंवा घर गहाण टाकून) वारावर जेवल्यासारखे वाटू शकते. मग नेमके काय करावे म्हणता? बोला! (असल्या पादरट कारणांसाठी घटस्फोटाचा वगैरे विचार करणे हा माझ्या मते शुद्ध - नव्हे, रिफाइन्ड - महामूर्खपणा आहे. नाही म्हणजे, असले काही अघोरी उपाय सुचवणार असाल तर आधीच सांगून ठेवतोय!) 'माइंड युवर ओन बिझनेस' किंवा तत्सम काही म्हटल्याने फक्त अपमान होऊ शकतो आणि तापमान वाढते आणि आपलेच डोके खराब होते, दुसर्‍यात सुधारणा होत नाही. (शिवाय असली उत्तरे देणे जिवावर येत असेल आणि त्याचा उपयोग नाही, उलट त्रास आहे, हेही दिसत असेल, तर भयंकर चिडचीड होऊ शकते. आपलीच. प्रतिपक्षावर ढिम्म परिणाम नसतो.) आणि सरळ सांगून सुधारणा तर सोडाच, मुळात डोक्यात काही प्रकाश पडण्याची सुतराम शक्यता नसते, उलट 'आपलेच कसे बरोबर'छाप उलट आर्ग्युमेंटे मिळण्याची ग्यारंटी असते. अशावेळी जोडीदारीण जर समजदार - आणि तितकीच खमकी - असली, तर तिचाच काय तो आधार असतो. तीच काय ती अशा 'केसेस' व्यवस्थित 'हाताळू' शकते; अन्यथा पुरुषाच्या हातात अशा वेळी चिडचीड होण्याव्यतिरिक्त फारसे काही नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

लेख छान आहे. पण असे व्हायला

शिल्पा ब
Tue, 01/11/2011 - 02:45 नवीन
लेख छान आहे. पण असे व्हायला हवे वगैरे सांगणे सोपे अन करणे मात्र ... प्रत्येकाने / प्रत्येकीने दुसर्याची स्पेस जपली तरी बरीच मुक्ती मिळेल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चित्रा
Tue, 01/11/2011 - 05:11 नवीन
धन्यवाद. अदिती म्हणते आहे तसे कोणीतरी (बाबा) विचार करायला उद्युक्त करणे महत्त्वाचे आहे. काहींच्या बाबतीत नवीन विचार देण्याचे, किंवा स्वतःकडे बघण्याची दृष्टी देण्याचे काम वाचनाने होते असेही होत असावे. मितान यांचाही अनुभव तसाच गंमतीदार आहे. लोकांची काहीशी दुटप्पी वृत्ती दिसते. स्वाती२, तुम्ही घरच्यांना दिलेले उत्तर मला आवडले. त्यात ठामपणा आणि संयम आहे. शुचि यांच्या मैत्रिणीचे उदाहरण हल्लीच्या काम करणार्‍या स्त्रियांना पटणे अवघड आहे. स्वतःला आवडत नाही म्हणून एखाद्या गोष्टीचा त्याग करणे, त्याविषयी घरच्यांना पटवून देता येणे वेगळे, आणि नवरा म्हणतो आहे, त्याच्या करिअरसाठी स्वतःच्या करीअरचे दान करणे वेगळे. दोघांमध्ये सख्य असले तर हा निर्णय आनंदानेही होईल. पण कोणाही व्यक्तीने स्वतःचे असे थोडेतरी पैसे कमवावे किंवा घराबाहेर थोडेसे पडावे, लोकांमध्ये थोडे काम करावे, असे मला वाटते. हे अनुभव माणसाला जगात वावरण्याचे थोडेसे का होईना ज्ञान देतात. सुरेख संसार करणे हे चांगलेच आहे, पण ते करत असताना थोडे जगात वावरण्याचे ज्ञान यावे. ते घरातून थोडे बाहेर पडल्याशिवाय मिळत नाही असे वाटते. शिल्पा ब, म्हणतात स्पेस देण्याने सुरुवात व्हावी. मुळात देण्याची स्पेस ही कल्पना आपल्याकडे फारशी रुजू नाही. तेव्हा त्याचीही थट्टा होतच असते. यासाठी व्यक्तींनी जागरूक असणे महत्त्वाचे असे वाटते. (जसे स्वाती२ होत्या). इंद्रराज पवार यांनी दिलेली उदाहरणे मासलेवाईक आहेत. मात्र स्त्रियांचे पुरुषाशिवाय जीवन अपूर्ण आहे तसे बायकांशिवाय पुरुषांचेही असावे. घाबरण्यापेक्षा स्त्रियांना स्थैर्य गमावायचे नसते, असे मला वाटते. येणारी अस्थिरता स्विकारण्याचे धाडस होत नाही. त्यासाठी लागणारे आर्थिक/सामाजिक बळ नसते. मुलांची जबाबदारी घेता येईल का ही शंका असल्याने असलेले स्थैर्य कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवणे महत्त्वाचे वाटते असे होत असावे. स्त्रियांच्या परिस्थितीला पुरुष जबाबदार आहेत, असे माझ्या मते नेहमीच बरोबर नाही. आपण सगळेच सर्व जैसे थे तसे राहावे यासाठी प्रयत्नशील असतो. त्यातून दुर्दैवाने बाहेर पडायला लागले, तर सावरतोही. पण शक्य तितके स्थैर्याला धक्का लागू नये यासाठी आपल्याला न पटणार्‍या गोष्टीही स्वीकारत असतो. हे पूर्ण नष्ट होणे शक्य नसावे असे वाटते. मात्र हे स्विकारणे एकाच घटकाला सतत करायला लागू नये. बाकी, रेवती, प्रियाली, पिडा, नंदन यांच्या सहभागामुळेही चर्चेत चांगली भर पडली आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

>>>>>शिल्पा ब, म्हणतात स्पेस

मितान
Tue, 01/11/2011 - 12:52 नवीन
>>>>>शिल्पा ब, म्हणतात स्पेस देण्याने सुरुवात व्हावी. मुळात देण्याची स्पेस ही कल्पना आपल्याकडे फारशी रुजू नाही. तेव्हा त्याचीही थट्टा होतच असते. यासाठी व्यक्तींनी जागरूक असणे महत्त्वाचे असे वाटते. हे मात्र अगदी खरं. लग्न होऊन अगदी ओळखीच्या घरात आले तेव्हा हे स्पेस प्रकरण सासूच्या गळी उतरवायला बरेच दिवस लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

लेख अतिशय संतुलित आणि संयमित

नगरीनिरंजन
Tue, 01/11/2011 - 06:00 नवीन
लेख अतिशय संतुलित आणि संयमित आहे. आवडला. >>मुळात जन्माला आलेल्या स्त्री-पुरुषांना आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर आपण मान्य केलेल्या चौकटींमध्ये, शक्य तितक्या स्वेच्छेने करता यावा, ही माझ्या मते खरी स्वातंत्र्याची व्याख्या असायला हवी. चौकटी अवघड असल्या तर स्वत:पुरत्या शिथिल करण्याचे स्वातंत्र्य हवे. १००% सहमत. इतक्या प्रकारचे लोक असतात की याहून सर्वसमावेशक व्याख्या होऊ शकत नाही असे वाटते. आणि या व्याख्येत 'स्त्री-पुरुषांना' असे म्हटले आहे ते खूप बरे केलेत. या अनुषंगाने या लेखाच्या शीर्षकातला स्त्रीमुक्ती हा शब्द थोडासा अप्रस्तुत वाटतो कारण अन्याय हा फक्त स्त्रियांवरच होतो असे नाही. स्त्रियांवरच्या अन्यायाचे प्रमाण खूप जास्त आहे हे मान्य आहे पण थोड्या प्रमाणात का होईना पुरुषांवर अन्याय होतोच. त्यामुळे अशा विचारांना स्त्रीमुक्तीचे लेबल लावून उगाच त्यांच्याबद्दल लिंगभेदाला खतपाणी घालणारे किंवा पुरुषांच्या विरोधातले विचार असे गैरसमज होऊ नयेत असे वाटते. विशेषतः स्त्रियांवर अन्याय फक्त पुरुष करतात असे नसून सध्याच्या समाज रचनेत अधिकार मिळालेल्या स्त्रियाही इतर स्त्रियांवर अन्याय करायला मागेपुढे पाहत नाहीत. उदा. सासवा. मी स्वत: दोन्ही प्रकारची उदाहरणे पाहिली आहेत. अतिशय मनमोकळ्या आणि आनंदी अशा स्त्रीच्या कोणतीही हौस-मौज पूर्ण न होऊ देणारे नवरा-सासू पाहिले आहेत त्याचप्रमाणे वर्षातून फक्त दहा-पंधरा दिवस सासूचे तोंड पाहायला लागत असूनही तिच्या नावाने वर्षभर खडे फोडून, नवर्‍यानेही स्वतःच्या आईविरुद्ध बोलावे म्हणून त्याला त्रास देणार्‍या स्त्रियाही पाहिल्या आहेत. हे सगळं व्यक्तिसापेक्ष आहे आणि हातात अधिकार आले की कोण कसे वागेल ते सांगता येत नाही. आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचे बळ मिळणे हे या चळवळींचे उद्दिष्ट असावे मग ती स्त्री असो वा पुरुष.
  • Log in or register to post comments

चांगला लेख

सहज
Tue, 01/11/2011 - 06:37 नवीन
चांगला लेख व वाचनीय प्रतिसाद. एका कुटुंबात विविध निर्णय कसे घेतले जातात? लोकेशन (महानगर, अन्यशहर,ग्रामीण विभाग) व समाजातील कुठल्या स्तरात तुम्ही सध्या आहात? आपल्यात अशी पद्धत नाही, आपल्याकडे असे नसते इ. वाक्यांचा नेमका मतितार्थ. याचा खल ज्याने त्याने करावा. मग प्रेम म्हणजे काय? तडजोड म्हणजे काय? सुखी आयुष्याची व्याख्या? ह्यावर विचार. शेवटी म्हणलं तर समाजाचा म्हणलं तर ज्याचा त्याचा असा हा प्रश्न. व्यक्ती स्वातंत्र्याची, समानतेची शिकवण आपल्या शिक्षणपद्धतीत नेमकी कशी शिकवली जाते यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments

चांगला लेख व वाचनीय

नरेशकुमार
Tue, 01/11/2011 - 06:52 नवीन
चांगला लेख व वाचनीय प्रतिसाद. इतकेच. दुर्दैवाने (खरेतर सुदैवाने ) इतक खोल विचार करन्याचि वेळ आलीच नाही. आमच्य घरचे वातावरनच असे आहे कि आता स्वतःवर काहि बंधने घालुन घ्यावित असे कधिकधि वाटते. (असे बायकोला हि वाटते हे विशेश, पन कधिकधि)
  • Log in or register to post comments

वरील प्रतिसाद वाचून आणि शुचीच

शिल्पा ब
Tue, 01/11/2011 - 07:11 नवीन
वरील प्रतिसाद वाचून आणि शुचीच म्हणणं वाचून आश्चर्य वाटलं. उच्चशिक्षण घेऊन घरी का बसायचं? मग काय उपयोग त्या शिक्षणाचा? फक्त भक्कम कमावणारा नवरा मिळावा म्हणून? प्रत्येकाच्या ओळखीत कोणी न कोणी असे असेलच. आपल्याकडे समाजमनाचा फारच बाऊ केला जातो...लोक काय म्हणतील? याला प्रचंड महत्व. नवर्याचं न ऐकता समजा नोकरी केली आणि त्याने त्यावरून त्रास दिला तर का म्हणून अशा माणसाबरोबर राहायचं? उलट स्त्रीला नोकरीतून पैशाचं बळ मिळतच ना मग मन मारून, घुसमटून जगण्यात काय अर्थ? माझ्या मते जिथे कुठे जी शक्य असेल ती नोकरी स्त्रियांनी करावी...एक म्हणजे बाहेरच्या जगात जगायला मिळते, त्यातूनच मित्र/मैत्रिणी जोडता येतात...आर्थिक बळ आहेच... केवळ नवरा/ सासू इ. कोणी म्हणते म्हणून घरीच बसावं हा निर्णय योग्य नाही....गृहिणी असणे कमीपणाचे मुळीच नाही...उलट तो एक प्रचंड डोकेदुखी असणारा २४/३६५ जॉब आहे जिथे कुणी कामाला appreciate करत नाही...पण लादलेला अन मनाविरुद्ध्चा निर्णय असेल तर आयुष्यभर ती जाणीव कुरतडत राहणार. आणि खरं सांगायचं तर वरील प्रतिक्रिया आणि समाजातील अगदी घरातीलहि उदा. पाहून असं वाटतं कि मुक्तीची खरी गरज पुरुषांना आहे.
  • Log in or register to post comments

उच्चशिक्षण घेऊन घरी का

नरेशकुमार
Tue, 01/11/2011 - 07:29 नवीन
उच्चशिक्षण घेऊन घरी का बसायचं? मग काय उपयोग त्या शिक्षणाचा? फक्त भक्कम कमावणारा नवरा मिळावा म्हणून? माझे उत्तर केवळ यासाठी, बायकोने नोकरी करण्यात माझी काहीच हरकत नाही हो (आनि आता हशि हरकत घेण्याचि वेळ सुध्दा गेलि कधिच) तिलाच नोकरि कराविशि वाटतच नाही, बायको अगोदरच BE झालेलि आहे. आता ति ते CDAC, software testing, MBA वगेरे वगेरे करत बसते. ति म्हनते कि पुढे मुलांना मार्गदर्शन करायला सोपे जाईल. पुन्हा बायकोने नोकरी करण्यात माझी काहीच हरकत नाही हो पन माझि हरकत/संमती याला कोनी विचारले तरि पाहिजे ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

खरा प्रश्न !

मीली
Tue, 01/11/2011 - 08:49 नवीन
शिल्पा ,तुझे सगळे मुद्दे पटले पण एक म्हणजे मुले असतील तर ....तर खरा प्रश्न येतो.नवर्या विरुद्ध जायला स्त्री दहा वेळा विचार करते .कारण मुलांना एकटे वाढवणे म्हणावे तितके सोपे नाही आहे.आणि दुसरे लग्न ही पण दूरची गोष्ट आहे कारण घटस्पोटित चा शिक्का लागलेला असतो.बर्याचश्या गोष्टी खूप सोप्या वाटतात.'मुलांना दोघाचे प्रेम,आधार मिळणे आवश्यक आहे' असाही विचार स्वताच्या अभिमानापेक्षा ,त्रासा पेक्षा प्रबळ होत असावा असे मला वाटते. अजून एक म्हणजे स्त्री शिकलेली असो अगर नसो स्वत:चे निर्णय घेता यायचे स्वातंत्र तिला हवेच हवे.गरज असली तर तिने मागे राहायला नको.पण मुले लहान असतील आणि तिला घरी राहायचे असेल तरी काही जण तिला घरी बसू देत नाहीत.माझ्या एका मैत्रिणीची सासू तिच्या लग्नानंतर सारखी मागे लागायची बी ई मुलगी केली तरी नोकरी करत नाही .नोकरी लागायला थोडा वेळ लागतो हे पण समजून घेत न्हवती. लेख खूप छान लिहिला आहे.आमच्या आजोळी पण लहानपणी आधी माणसांची पंगत ,मुले मग शेवटी मुली असे बसायच्या.फार राग यायच्या .मुले खेळायला निघून जायची ,मुली मागचे आवरत राहायच्या.बंडाची ठिणगी लहानपणीच पडली होती.मी प्रश्न विचारले तर उलट उत्तरे देते म्हणायची आजी! आता च्या पिढी ने मात्र हि चाकोरी भेदली आहे हे मात्र नक्की!!
  • Log in or register to post comments

हम्म...मुलं असतील तर बराच फरक

शिल्पा ब
Tue, 01/11/2011 - 08:59 नवीन
हम्म...मुलं असतील तर बराच फरक पडतो हे खरंय. पण आजकाल भारतातसुद्धा घटस्फोटीत असलेल्याना खूप अडचणी येत नसाव्यात असे वाटते. बाकी यातून आपणच शिकायचे कि आपल्या मुलांना त्यांच्या बायकोच्या मताला किंमत दिली पाहिजे , तिच्या मताचा आदर केला पाहिजे वगैरे शिकवायचे....आणि मुलींना वेगळी वागणूक न देता त्यांच्या आवडीचे शिक्षण घेऊ द्यायचे....स्वावलंबी होण्यास मदत करायची.....म्हणजे त्यांना अशी चर्चा करायची वेळ येणार नाही. बाकी सासवांबद्द्ल बोलाल तितके कमीच... सुनेच्या जागी मुलगी असती तर मते क्षणात बदलली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीली

संयत, संतुलित लेख आवडला.

यशोधरा
Tue, 01/11/2011 - 08:46 नवीन
संयत, संतुलित लेख आवडला.
  • Log in or register to post comments

लेख उत्तम आहे. अतिशय संतुलित

नीधप
Tue, 01/11/2011 - 09:25 नवीन
लेख उत्तम आहे. अतिशय संतुलित आहे.
  • Log in or register to post comments

लेख आवड्ला.. मात्र...

ऋषिकेश
Tue, 01/11/2011 - 09:31 नवीन
बराचसा बॅलन्स्ड लेख आवडला, एक दृष्टीकोन म्हणून पटला (खरंतर रुचला) मात्र भुमिका म्हणून १००% पटला नाही. अनेकदा स्त्री मुक्ती म्हणजे काय हा प्रश्न मला पडे.. स्त्री ने मुक्ती, मुक्तता मिळवायची ते कोणापासून? पुरुषापासून? मुलांपासून? समाजापासून? कामापासून? इतरांनी लादलेल्या इच्छांपासून? माझ्यामते स्त्री मुक्ती म्हणजे स्त्री ने 'न्यूनगंडा'पासून मिळवलेली मुक्ती. आपल्याला ही गोष्ट येणार नाही ह्या गंडापासून मुक्ती. मग ही मुक्ती फक्त पुरुषांचे / समाजाने लाधलेली बंधने/कामे झुगारण्यापुरतीच असून चालणार नाही तर एखादी बंधने स्वखुशीने लाऊन घेण्याचीही हवी. लेखात दिलेल्या व्याख्येप्रमाणे "आयुष्यात मिळालेल्या क्षणोक्षण काळात काय करावे निर्णय करण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असावे. " दुसरी गोष्ट, इथे स्त्री ची भुमिका ही केवळ पत्नी ह्या अर्थाने घेतली आहे (जसे भाज्या निवडणे - जे 'नवरा' का करत नाही वगैरे वगैरे) भाज्या निवडणे, केर काढणे, भांडी विसळणे, बगिचे साफ करणे, बिले भरणे वगैरे सोपी आणि कमी धोकादायक कामे घरातील लहान मुलांना (विषेशतः मुलगे) का करायला लाऊ नयेत? स्त्रीया मुलांना तेही कुटुंबांचा भाग आहे हे विसरून ही कामे स्वत: करतात किंवा नवरा करत नाही म्हणून ओरडा करतात मात्र स्वतःचा मुलगा जो पुढे कुणाचा तरी नवरा बनणार आहे त्याला कामे सांगितली जात नाहीत असे का? तिच गत मुलींची माझ्या ओळखीच्या अनेक मुलींना अजूनही ब्यांकांचे व्यवहार माहीत नाहीत असे का? स्त्री ने मुक्त व्हावं म्हणताना त्याला पोषक वातावरण लहानपणापासून निर्माण करण गरजेचं आहे. एम्बीए, बीई वगैरे झालं तरी साधी कुटुंबांची सहल आयोजित करण्यासाठी नवर्‍यामागे लागणार्‍या मुली मी बघतो तेव्हा विचित्र वाटतें. अगदी कमावत्या मुलींना ऑनलाईन बुकिंग, एजंटशी बोलणे, वहाने ठरवणे, त्यातील ठग टाळणे वगैरे प्राथमिक गोष्टींचेही ज्ञान नसते. जर मुली सक्षम नसतील तर त्या स्वतंत्र होतीलच कश्या? अ‍ॅकॅडेमिक शिक्षण आणि सक्षम विचार यात फरक आहे (आणि म्हणूनच मग आपण ह्याच एम्बीए मुली घरी बसलेल्या बघतो) स्त्रीने मुक्त, स्वतंत्र वगैरे व्हावं हेच मला मुळी पटत नाही. सर्वप्रथम तीने स्वयंपूर्ण असावं मग ती कायमच स्वतंत्र असेल 'लग्न करण्याआधीही, लग्न ठरवतानाही आणि लग्नानंतरही!"
  • Log in or register to post comments

+१

शिल्पा ब
Tue, 01/11/2011 - 09:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

+१

यशोधरा
Tue, 01/11/2011 - 10:01 नवीन
अनेकदा स्त्री मुक्ती म्हणजे काय हा प्रश्न मला पडे.. स्त्री ने मुक्ती, मुक्तता मिळवायची ते कोणापासून? पुरुषापासून? मुलांपासून? समाजापासून? कामापासून? इतरांनी लादलेल्या इच्छांपासून? माझ्यामते स्त्री मुक्ती म्हणजे स्त्री ने 'न्यूनगंडा'पासून मिळवलेली मुक्ती. आपल्याला ही गोष्ट येणार नाही ह्या गंडापासून मु़क्ती. अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

>>अगदी कमावत्या मुलींना

Pearl
Wed, 01/12/2011 - 12:00 नवीन
>>अगदी कमावत्या मुलींना ऑनलाईन बुकिंग, एजंटशी बोलणे, वहाने ठरवणे, त्यातील ठग टाळणे वगैरे प्राथमिक गोष्टींचेही ज्ञान नसते. जर मुली सक्षम नसतील तर त्या स्वतंत्र होतीलच कश्या? +१ पण बर्‍याच ठिकाणी असेही पाहिले आहे की अशा arrangements करणे, स्वतःहून ही कामे फटाफट करणे, decisions घेणे ही कामे बायकांनी/बायकोनी केलेली नवर्‍यांना आवडत नाहीत. त्यांचा असाच आग्रह असतो की तू compulsory घरातली कामे बघ. आणि मी बाहेरची बघणार. सो arrangements करणे/plan करणे. / banking/finance जाणून घेणे याबद्दल आवड असूनही असे करताना नवर्‍याची आडकाठी असल्याने / विरोध असल्याने त्यांना त्या गोष्टी करता येत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मुक्ति मिळविन्यापेक्षा,

नरेशकुमार
Tue, 01/11/2011 - 10:51 नवीन
मुक्ति मिळविन्यापेक्षा, एकमेकांत गुंतुन राहण्यात काय मज्जा असते सांगु.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख आणि चर्चा. काही

नितिन थत्ते
Tue, 01/11/2011 - 11:43 नवीन
सुंदर लेख आणि चर्चा. काही प्रतिसाद पटले नाहीत. परंतु वेळेअभावी लिहिणे शक्य होत नाहीये.
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/12/2011 - 13:18 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा