Skip to main content

ऍबल कॉन एला

लेखक निनाद यांनी रविवार, 09/01/2011 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट कथा - वय सुचवणी १५ + साठी ऍबल कॉन एला Hable con ella (इंग्रजी मध्ये - टॉक टू हर.) बेनिनो आणि मार्को एका नृत्य नाटिकेमध्ये शेजारी शेजारी बसतात. बेनिनो मार्कोला पाहतो आणि एका प्रसंगामुळे त्याच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून तो त्याच्या लक्षात राहून जातो. बेनिनो हा पेशाने नर्स आहे आणि तो एका इस्पितळात काम करतो. त्याची अनेक वर्षे आजारी असलेली आई नुकतीच वारली आहे. या इस्पितळात बॅले नृत्य करणारी सुंदर तरुणी ऍलिशिया, अपघातात कोमात गेल्याने बेशुद्ध आहे. बेनीनी तीची सुशृषा करतो आहे. बेनीनी तिच्या प्रेमात पडलेला आहे. इतका की त्याचा पूर्ण विश्वास आहे की तीला सर्व काही कळते. त्यामुळे ऍलिशिया जरी कोमात असली तरी तो तिच्याशी कायम संवाद साधतो. म्हणजे आपण एकमेकांशी बोलतो असे तसेच. तिला तिच्या आवडीच्या चित्रपटांच्या कथा सांगतो. मासिकातील चित्रे दाखवतो. पण ती मात्र कोमात आहे. तिची सुषृशा मनापासून करतो अगदी तीची पाळी आल्यावर तिचे पॅड्स् बदलण्यापासून ते तिचे केस कापणे नेलपेंट लावून देणे वगैरे सर्व काही. पुढे ही जवळपास एकतर्फी प्रेम कथा फ्लॅशबॅकमध्ये उलगडत जाते. मार्को हा एक पत्रकार आहे. तो त्याच्या पहिल्या प्रेमापासून आताशा वेगळा होण्याचा प्रयत्न करतो आहे. लिडिया नावाच्या एका मॅटेडोर ची मुलाखत घेण्यासाठी तो तीच्या संपर्कात येतो. लिडियाही तिच्या प्रियकरापासून विभक्त होण्याचा प्रयत्न करते आहे. लिडिया आणि मार्को काही चमत्कारिक घटनांमुळे एकमेकांच्या जवळ येतात आणि प्रेमात पडतात. काही काळ एकत्र घालवतात. असेच एकदा एका खेळासाठी ती जात असतांना लिडिया मार्कोला म्हणते. की मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. हा खेळ झाल्यावर आपण बोलूया, पण काय आणि कशा विषयी हे मात्र ती सांगत नाही. मार्को हो म्हणतो पण खेळ भलतीकडेच जातो. वेदनांनी बेभान झालेला तो बैल लिडियाला चिरडतो. या अपघातात लिडियाही कोमात जाते. मार्को उध्वस्त होतो. लिडियाला ज्या इस्पितळात ठेवतात तेथेच बेनिनो आणि त्याची ऍलिशिया ही असते. मार्को तेथे असतांना, बेनिनोला ऍलिशियाशी नेहमीप्रमाणे बोलतांना पाहतो. त्याला ते विचित्र वाटते. बेनिनो मार्कोला सांगतो की तूही लिडियाशी बोलले पाहिजेस. तिच्या बरे होण्यामध्ये ते फार महत्वाचे आहे. पण मार्को हा संवाद लिडियाशी साधू शकत नाही. तो बेनिनोला परखडपणे ऐकवतो की असा संवाद शक्य नाही. तिच्या मेंदूलाच मार बसला आहे. तिला काहीही कळत नाहीये. बेनिनोला ते पटत नाही. एक दिवस तो मार्कोला म्हणतो की मला ऍलिशियाशी लग्न करायचे आहे. मार्को चकित होतो. तो त्याला विचारतो की असे कसे शक्य आहे? ऍलिशिया कोमात आहे. ती हो कसे म्हणेल? तो बेनिनोला तो विषय डोक्यातून काढून टाकायला सांगतो. बेनिनो मात्र ऍलिशियाला आपण पाहिलेल्या चित्रपटांच्या कथा सांगत राहतो. एका दिवशी उघडकीला येते की ऍलिशियाची पाळी चुकली आहे. ऍलिशिया गरोदर आहे. इस्पितळाची मॅनेजमेंट खडबडून जागी होते. चौकशीमध्ये सारा संशय बेनिनोवर येतो. बेनिनोला बलात्काराच्या आरोपावरून कारागृहात धाडले जाते. पुढे काय होते? बेनिनोला ऍलिशिया मिळते का? तिचे कोमातले गरोदरपण? लिडिया बरी होते का? लिडियाला काय सांगायचे असते? मार्को पुढे काय करतो हे चित्रपटातच पाहा. चित्रपटाच्या दोन्ही नायिका शारिरीक खेळातल्या/पेशातल्या आहेत तर नायक नर्स अणि लेखक पत्रकार असे साधेसुधे शारिरीक पेशाशी तसा संबंध नसलेले आहेत. अप्रतिम चित्रपट, खिळवुन ठेवणारे नाट्य. अनवट विषयावरची वेगळीच प्रेमकहाणी असेही म्हणता येईल. अल्मोदोवरने नेहमीप्रमाणेच गुंतागुंतीच्या आणि अनपेक्षित कथेने खिळवून ठेवले आहे. जावियेने केलेले बेनिनोचे काम मस्तच आहे. मला बेनिनोचे निस्सीम प्रेम करणे आवडून गेले. सेक्स अँड ल्युसियाची अभिनेत्री पाझ वेगा ही या चित्रपटात दिसून जाते. अल्मादोवरच्या व्हॉल्व्हर या चित्रपटाची ओळख आपण मागे पाहिली होती. त्याच्या पात्रांचा वेगळेपणा त्याही सादरीकरणात आपल्याला जाणवला असेल अशी आशा आहे. चित्रपटाचे नाव: हॅबल कॉन एला Hable con ella भाषा : स्पॅनिश वर्षः २००२ लेखक दिग्दर्शकः पेद्रो अल्मोदोवर Pedro Almodóvar अभिनयः बेनिनो - जाविये कमारा Javier Cámara, मार्को दारीयो ग्रांदीनेत्ती Darío Grandinetti, ऍलिशिया- लिओनोर वॅटलींग Leonor Watling, लिडिया रोझारियो फ्लोरेस Rosario Flores पारितोषिके - अनेक! सबटायटल्स - इंग्रजी वितरण - २०थ सेंच्युरी फॉक्स - तबकडीवर उपलब्ध
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2744
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

सुंदर परिक्षण!! तबकडी घेऊन नक्कीच पाहीन हा चित्रपट - चंबा

Hableचा उच्चार स्पॅनिशमध्ये 'अ‍ॅबल' असा नसून 'आब्ले' असा होत असावा, असे वाटते. तसेच, नक्की खात्री नाही, पण conचा उच्चार 'कोन' असा व्हावा, असे वाटते. चूभूद्याघ्या, स्पॅनिशतज्ज्ञ योग्य काय तो खुलासा करतीलच, वगैरे वगैरे. (चित्रपट हा आपला विषय नसल्यामुळे) बाकी चालू द्या.

धन्यवाद! पंडित गागाभट्ट म्हणतात ते बरोबर असावं, चित्रपटाचं नाव 'आब्ले -कोन -एल्या' असं उच्चारलं जात असेल असं वाटतं.

चित्रपटाची नोंद करुन ठेवली आहे. निनाद इतका वेळ मिळतो कधी? एकदा टाईम मॅनेजमेंटबद्दल लिही बाबा!

In reply to by सहज

निनाद इतका वेळ मिळतो कधी?
'लाइफबॉय ज्याचे घरी' च्या चालीवर - बायको मुली नसती घरा सिनेमांच्या ओळखी भराभरा! ;) टाईम मॅनेजमेंटबद्दल काही लिहण्याची माझी लायकी नाही सहजा! अन्यथा इतके सिनेमे पाहत डोक्याचे लोणचे बसलो नसतो... :)

ह्म्म मस्तच आहे चित्रपट, उच्चार खाली दिल्याप्रमाणे .. आब्ले कॉन एज्जा/एय्या. -निखिल.

धन्यवाद चंबा,शिल्पा रम्ज्या. जमल्यास चित्रपटही पाहा...

निनाद, हे परिक्षण अगदी पर्फेक्ट जमले आहे. आणि चित्रपटाची कथा पण अगदी वेगळीच. सुंदर... कधी बघू न बघू... पण असे काही चित्रपट आहेत हे तुम्ही सांगताय त्या बद्दल शतशः धन्यवाद!

असे तूमचे या चीत्रपटाचे झालेले रसग्रहण पाहता वाटत आहे. बादवे पूण्यात सध्या महोत्सव चालू आहे चीत्रपटांचा.