✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'पझल' – मध्यमवयीन स्त्रीचा ‘स्व’शोध

च
चिंतातुर जंतू यांनी
Sun, 01/09/2011 - 00:48  ·  लेख
लेख
पझल (२००९) – दिग्दर्शिका: नातालिआ स्मर्नॉफ (अर्जेंटिना) Rompecabezas - Film Poster चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा एका घरात पार्टी चालू असते. घरची गृहिणी झटत असते. स्वयंपाकघरातून तऱ्हतऱ्हेचे पदार्थ आणून घरातल्यांची आणि पाहुण्यांची सरबराई करत असते. हळूहळू लक्षात येतं की खुद्द तिचाच वाढदिवस साजरा करायला लोक जमले आहेत. पण तिला मात्र आराम नाही. नवरा आणि दोन वयात आलेली मुलं असा तीन पुरुषांचा संसार करणारी ती बाई (मारिआ) पुढच्या काही प्रसंगांत अधिक ओळखीची वाटू लागते. नवरा तसा प्रेमळ आहे. मुलं गुणी आहेत. सगळे आपापल्या आयुष्यात मग्न आहेत. म्हटलं तर ती अगदी सुखी गृहिणी आहे. पण काहीतरी सलतं आहे. ते उचकटून वर यायला वाढदिवसाला आलेल्या एका भेटवस्तूचं निमित्त होतं. ते एक जिगसॉ पझल आहे. ते सोडवण्यात मारिआला एक विलक्षण आनंद मिळतो. तहानभूक, घरकाम विसरून ती त्यात रमून जाते. मग तिला जिगसॉ पझल सोडवण्याची चटक लागते. जिनं तिला ते भेट दिलेलं असतं त्या बाईला दुकान विचारून ती तिथनं आणखी पझल्स आणते. तिथंच सूचनाफलकावर तिला एक माहिती मिळते. पझल सोडवण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कुणाला तरी एक पार्टनर हवा असतो. ती त्या माणसाला जाऊन भेटते. तो तिची चाचणी घेतो आणि आपली पार्टनर म्हणून तिची निवड करतो. मध्यमवयीन, मधमवर्गीय मारिआचं आयुष्य इथं एक कलाटणी घेतं. तिचं साधं घर दूर उपनगरात असतं, तर त्याचं आलिशान घर शहरात मध्यवर्ती असतं. आठवड्यातून दोनदा एकत्र येऊन पझल सोडवण्याचा सराव करण्यासाठी मारिआ गपचूप शहरात येऊ लागते. माहेरची एक नातेवाईक आजारी असण्याचं खोटं कारण सांगून ती येत असते. कारण असल्या उद्योगांवर नवरा चिडेल हे तिला ठाऊक असतं. नवर्‍यापासून लपवून एखादी भानगड करावी तसं हे चालू असतं. मग हळूहळू स्पर्धेचा दिवस येतो, आणि... पुढची गोष्ट सांगत नाही. पण चित्रपटाचं वेगळेपण जाणवेल असे काही तपशील सांगतो. प्रत्यक्ष स्पर्धा आणि तिचा निकाल, जिंकणं-हरणं यावर अमेरिकन चित्रपटातल्यासारखा इथं भर नाही. भर आहे तो स्वतःच्या आनंदाची एखादी गोष्ट करण्यातलं साधंसुधं समाधान एका मध्यमवयीन स्त्रीपुढे एक वेगळं स्वातंत्र्य आणि सौंदर्य कसं घेऊन येतं, यावर. ही काही पांढरी-काळी गोष्ट नाही. इथं नवरा दुष्ट नाही. त्याचं बायकोवर आणि तिचंही त्याच्यावर प्रेम आहे. एका पुरुषप्रधान व्यवस्थेत आपल्या बायकोची गरज मात्र त्याला उमजत नाही. मुलं आपापल्या मार्गावर जाऊ इच्छितात. आपल्या मर्जीविरुध्द जगण्याचं स्वातंत्र्य त्यांना तो देतो. जेव्हा मारिआ स्पर्धेविषयी सांगते तेव्हाही किंचित कटकट सोडता तो ते मान्य करतो. प्रश्न आहे तो मारिआचा. भेटवस्तू म्हणून मिळालेलं तिचं पहिलं पझल म्हणजे इजिप्तची राणी 'नेफरटिटी'चं चित्र असतं. तिचा पझल पार्टनर तिला नेफरटिटी, तिनं केलेल्या धार्मिक सुधारणा यांविषयी सांगतो; तिला वाचायला आपल्याकडचं सुरेख चित्रांचं एक पुस्तक देतो; 'सवडीनं वाचून परत कर' सांगतो. पझल सोडवण्याच्या सर्वसाधारण तर्‍हेपेक्षा मारिआची पध्दत वेगळी आहे हे लक्षात येतं तेव्हा तो तिला रूढ चौकटीत बसवायला जात नाही. त्यापेक्षा तिची शैली विकसित होऊ देतो. त्या शैलीला अनुसरून ते दोघं एकत्र काम करतात – खरे पार्टनर्स म्हणून. एखाद्या पुरुषाशी विवाहबाह्य संबंध ठेवण्यासारखं हे असतं. पण हे निव्वळ क्षणिक सुखासाठी नसतं. कारण तिला नव्यानं घडवण्याची ताकद त्याच्यात असते. दोघं एकत्र येऊन काहीतरी छान घडत असतं. हे मारिआलाही कळत असतं. म्हणून ती घरी आपल्या पार्टनरविषयी अजिबात काही सांगत नाही. आपली पत्नी आजकाल अधिक सुंदर दिसते आहे हे नवर्‍याला जाणवतं. तिला तो हे बोलूनही दाखवतो. दोघांचं सहजीवन हे तसं सुखीही असतं. त्यामुळे तीही या गोष्टीनं सुखावते; तोही सुखावतो. तिचं हे फुलून येणं अतिशय तलम, सुंदर आहे. एका अत्यंत शांत, ठाय लयीत चित्रपट उलगडत जातो आणि संपतोही. अर्जेंटिनासारख्या देशात घडणारी ही कहाणी अगदी आपल्याच देशात आपल्या परिसरात घडत असेल असं वाटतं. अखेर आपल्या मनात घर करून राहते ती साधीसुधी पण मनस्वी, अखेरच्या चौकटीत निळ्याशार आकाशापुढे आता मोकळी झालेली मारिआ. (या चित्रपटाला बर्लिन महोत्सवात नामांकन होतं.)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6589 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

एखाद्या पुरुषाशी विवाहबाह्य संबंध ठेवण्यासारखं हे असतं.

आत्मशून्य
Sun, 01/09/2011 - 21:40 नवीन
ह्यालाच तर म्हणाय्चा भंपक पणा चाय्ला त्या बाइने कोणाचाही विश्वास घात केलेला नसताना हे म्हणे विवाहबाह्य संबंध ठेवण्यासारखं असतं. लेको कोणते पूरूश?त्यांच्याबाबत बाहेर घडणारी प्रत्येक गोष्ट घरात सांगतात ? मग स्त्री काही नीमित्ताने बाहेर पडली आणी काही गोश्टी सिक्रेट ठेवल्या की लगेच ते पुरुषाशी विवाहबाह्य संबंध ठेवण्यासारखं कस ठरत ? महामूर्ख वीचार.
एका अत्यंत शांत, ठाय लयीत चित्रपट उलगडत जातो आणि संपतोही.
ते पोस्टर बघूनच कळतय... अवांतर: जंतू भावा तूप्ला नावा बघोन एह्या पीक्चार चा पोस्टार तूप्ल्या प्रोफाइल इमेज म्हून लय शोभाल म्हून बोलू राय्लोय, तेव्हडे मनावर घ्याच.
  • Log in or register to post comments

मस्तच ओळख आणि धन्यवाद, जंतु.

बिपिन कार्यकर्ते
Sun, 01/09/2011 - 02:48 नवीन
मस्तच ओळख आणि धन्यवाद, जंतु.
  • Log in or register to post comments

इतक्या छान चित्रपटाची ओळख

पुष्करिणी
Sun, 01/09/2011 - 03:05 नवीन
इतक्या छान चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

मस्त ओळख

धनंजय
Sun, 01/09/2011 - 03:06 नवीन
मस्त ओळख.
  • Log in or register to post comments

परिपूर्ती

नंदन
Sun, 01/09/2011 - 03:29 नवीन
चित्रपटाची ओळख आवडली.
भर आहे तो स्वतःच्या आनंदाची एखादी गोष्ट करण्यातलं साधंसुधं समाधान एका मध्यमवयीन स्त्रीपुढे एक वेगळं स्वातंत्र्य आणि सौंदर्य कसं घेऊन येतं, यावर.
अमृता प्रीतम ह्यांनी उल्लेखलेला 'चौथा कमरा' आठवला. (''भारतीय स्त्रीला चौथा कमरा कधीच मिळत नाही. पहिला कमरा पुरुष मंडळींच्या बैठकीचा, दुसरा रसोई पकवण्याचा आणि तिसरा नवर्‍याची शेज सजवण्याचा. आपल्या देशातल्या स्त्रीला स्वत:चा हक्काचा एखादा लहानसा कोपरा असतोच कुठे?")
  • Log in or register to post comments

नोकरी करत असल्यास गोष्ट वेगळी

Pain
Sun, 01/09/2011 - 22:33 नवीन
नोकरी करत असल्यास गोष्ट वेगळी पण जर स्त्रिया गृहिणी असतील तर सगळे घर त्यांच्याच अखत्यारीत येते. मुळात घर निवडण्यापासून त्यातल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टी त्यांच्याच निर्णयाने केल्या जातात. एकटा माणूस कुठेही राहू शकतो पण कुटुंब सुरु करण्यासाठी घर घेतले जाते. संपूर्ण घरच हक्काचे असताना एक लहानसा कोपराही नाही असा कांगावा कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

चित्रपट पहावासा वाटतो आहे

शुचि
Sun, 01/09/2011 - 03:52 नवीन
खलील जिब्रान विवाह या विषयासंदर्भात म्हणतो - But let there be spaces in your togetherness, And let the winds of the heavens dance between you.
  • Log in or register to post comments

ओळख आवडली

राजेश घासकडवी
Sun, 01/09/2011 - 03:52 नवीन
आयुष्याचे तुकडे चाकोरीत, ठोकून ठोकून बसवलेले असतात. न जुळणाऱ्या पझल सारखे. मग आहे मनोहर तरी गमते उदास असं वाटत राहातं. कुठे चुकतंय कळत नाही. कधीतरी अचानक हे कोडं नव्याने सोडवण्याची संधी मिळते. एक मोकळा कोपरा, पुन्हा ते तुकडे योग्य पद्धतीने जुळवता यावेत यासाठीची मानसिक शांतता, आणि आपल्या पद्धतीने ते तुकडे जोडायला प्रोत्साहन देणारा सवंगडी. मग प्रेमात पडल्यासारखं वाटणार नाही तर काय? रुटिनी आयुष्य समाजात इतकं प्रस्थापित झालं आहे की आपली पद्धत वापरून जीवनाचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करणं हे जणू काही विवाहबाह्य संबंध राखण्याप्रमाणे टॅबू (व त्यामुळेच कदाचित अपराधी आनंद देणारं) वाटावं? महोत्सवात तुमच्याप्रमाणे चित्रपट बघायला आवडला असता. नुसतंच इनो घेतो झालं.
  • Log in or register to post comments

चांगली ओळख

निनाद
Sun, 01/09/2011 - 04:34 नवीन
वेगळ्या भाषेतील चित्रपट ओळख करून देण्याच्या मालिकेत मनापासून स्वागत! चित्रपटाची तुम्ही अतिशय उत्तम ओळख करून दिलीत.
ही काही पांढरी-काळी गोष्ट नाही. इथं नवरा दुष्ट नाही. त्याचं बायकोवर आणि तिचंही त्याच्यावर प्रेम आहे. एका पुरुषप्रधान व्यवस्थेत आपल्या बायकोची गरज मात्र त्याला उमजत नाही.
आयुष्य कप्प्या-कप्प्या जगण्यापेक्षा एजूजिनसी निरनिराळे अनुभव घेत यांची सरमिसळ करत जगले तर जास्त मजेदार वाटते. स्पॅनिश चित्रपट बरेचदा कुटुंबा भोवती आणि स्त्रीची ओळख याभोवती फिरत राहतो. वर राजेश यांने नेमक्या शब्दात मांडलेले ,
कुठे चुकतंय कळत नाही. कधीतरी अचानक हे कोडं नव्याने सोडवण्याची संधी मिळते. एक मोकळा कोपरा, पुन्हा ते तुकडे योग्य पद्धतीने जुळवता यावेत यासाठीची मानसिक शांतता, आणि आपल्या पद्धतीने ते तुकडे जोडायला प्रोत्साहन देणारा सवंगडी. मग प्रेमात पडल्यासारखं वाटणार नाही तर काय?
हे वाक्यही आवडले. चित्रपट नक्की पाहण्याचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

नेटफ्लिक्सवर नाही

शुचि
Sun, 01/09/2011 - 04:37 नवीन
माझा प्रयत्न झालासुद्धा करून इतकी चिंतांनी करून दिलेली ओळख सुंदर आहे. नेटफ्लिक्सवर नाही सापडला. यु ट्युबवर ट्रेलर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

जालावर

निनाद
Sun, 01/09/2011 - 04:53 नवीन
मी जालावर चित्रपट पाहत नाही. बरेचदा अनुभव तुटक असतो म्हणून मी टाळतो. मला तबकडी वर बघायला आवडतात. आमच्या वाचनालयात शोधतो, कदाचित असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

चित्रपटाचं कथानक आवडलं आणि

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 01/09/2011 - 05:03 नवीन
चित्रपटाचं कथानक आवडलं आणि जंतूंनी लिहीलेली ओळखही आवडली. चित्रपट बघायला न मिळाल्यास गुर्जींप्रमाणेच घरी बसून इनो घेते.
  • Log in or register to post comments

चिंतातुर जन्तू छान आहे हा चित्रपट

विनायक बेलापुरे
Sun, 01/09/2011 - 06:34 नवीन
कथानक फारसे नवे वाटले नाही. शैल वुइ डान्स - हा पन चित्रपट अश्याच "मोनोटोनस ,डेस्परेट" आयुष्यावर बेतलेला आहे. त्यात बायकोने नवर्या मागे सोडलेल्या दिटेक्टिवचा सहकारी म्हणतो - What would cause a man after 20 years to do something completely out of character out of the blue? - Did I get that right? - Yeah, "The mass of men lead lives of quiet desperation," Maybe the desperation can't be quiet anymore, इथे पुरुषाच्या जागी स्त्री आहे इतकेच. :)
  • Log in or register to post comments

पहायलाच हवा हा चित्रपट.

वाहीदा
Sun, 01/09/2011 - 15:02 नवीन
अर्जेंटिनासारख्या देशात घडणारी ही कहाणी अगदी आपल्याच देशात आपल्या परिसरात घडत असेल असं वाटतं. अखेर आपल्या मनात घर करून राहते ती साधीसुधी पण मनस्वी, अखेरच्या चौकटीत निळ्याशार आकाशापुढे आता मोकळी झालेली मारिआ. पहायलाच हवा हा चित्रपट. चिंजंचे लिखाण नेहमीप्रमाणेच सुंदर. छानश्या चित्रपटाची ओळख करुन दिल्याबध्द्ल चिंजंचे आभार.
  • Log in or register to post comments

चिंजं

सहज
Sun, 01/09/2011 - 08:33 नवीन
चिंजंनी सिनेमा आपल्या समोर जो उलगडला आहे ती बातच काही और! सिनेमा बघताना त्यातल्या ज्या जागा चिंजंना कळतात व ते ज्याप्रकारे आपल्या समोर उलगडून दाखवतात ही एक अजब अनुभूती आहे. अतिशय सुंदर ओळख, चित्रपट नक्की पाहीन.
  • Log in or register to post comments

सहमत आहे!

निनाद
Sun, 01/09/2011 - 09:03 नवीन
तुमच्या प्रतिसादाशी सहमत आहे. चिंजंनी अजून चित्रपटांविषयी लिहायला हवे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

छान परीक्षण. सहज यांच्या

नगरीनिरंजन
Sun, 01/09/2011 - 11:56 नवीन
छान परीक्षण. सहज यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. जो पर्यंत समाजरीती, विवाहसंस्था आणि एकूणच जगण्याचे साचेबद्ध नियम यांचं अवडंबर माजतच राहील तोपर्यंत असे चित्रपट निघतच राहणार. चित्रपटाच्या नायिकेला मिळालेला आनंद नशीबात नसलेले कितीतरी लोक या व्यवस्थेत गुदमरून मरत असतील.
  • Log in or register to post comments

भर आहे तो स्वतःच्या आनंदाची

पर्नल नेने मराठे
Sun, 01/09/2011 - 12:35 नवीन
भर आहे तो स्वतःच्या आनंदाची एखादी गोष्ट करण्यातलं साधंसुधं समाधान एका मध्यमवयीन स्त्रीपुढे एक वेगळं स्वातंत्र्य आणि सौंदर्य कसं घेऊन येतं, यावर. ह्म्म...
  • Log in or register to post comments

नेफरटिटी....एक प्रतीक

इन्द्र्राज पवार
Sun, 01/09/2011 - 12:47 नवीन
"पझल" चा विषय जसा हळुवार आहे तितक्याच संयतपणाने श्री.चिंजं यानी मूळ कथानकाचा शेवट न सांगता परीक्षण दिले आहे ते इथे सर्वानाच भावले आहे हे प्रतिसादावरून स्पष्टच आहे. कथेतील त्या विवाहित स्त्रीला भेटवस्तू म्हणून मिळालेलं तिचं पहिलं पझल म्हणजे इजिप्तची राणी 'नेफरटिटी'चं चित्र असते हे वर आले आहे. इथे दिग्दर्शकाची [जी एक स्त्रीच आहे] कल्पनाशक्ती वाखाणण्यासारखी आहे, कारण पझलमधे 'नेफरटिटी' चित्राचा वापर हे एक "सिम्बॉल" आहे. चेससमान असलेला एक बोर्ड गेम जो विविध चित्रांच्या कोड्यांनी सजलेला असतो आणि इ.स.पूर्व काळात इजिप्तच्या सम्राट सम्राज्ञींचा हा एक मनोरंजनासाठी [तसेच बुद्धिमत्ता कौशल्याचाही] आवडीचा तसेच रोचक गेम होता. जरी दोन खेळाडूंमधील हा कोड्याचा खेळ असला तरी पहिल्याने आपण कुणीतरी 'अज्ञाता' समवेत सुखाच्या सफरीला चाललो आहे असे समजून त्यातील चित्रांची अदलाबदल करत जायचे असते, जेणेकरून एक क्षण असा येईल की त्या 'अज्ञात' व्यक्तीकडूनच 'मला' खर्‍या अर्थाने 'पवित्र असे सुख' मिळेल आणि माझ्या मनाचे 'चित्र' पूर्ण होईल. "पझल गेम" हे एक सुखाचे "प्रतीक" आहे, जे पुरूष आणि स्त्री या दोन्ही खेळाडूनी अदृश्यरित्या अनुभवाचे असे या खेळात मानले जाते. ज्याचे चित्र प्रथम पूर्ण होते तो किंवा ती विजयी मानली जाते. पण याचा अर्थ दुसरा पराभूत झाला असे नसतो, कारण त्याने किंवा तिने पुरविलेल्या चित्राच्या हालचालीवरच अ किंवा ब आपले चित्र पूर्ण करील....मला वाटते 'पझल' चित्रपटातही पती किंवा पत्नी यातील एक शेवटी 'पराभूत' दाखविले नसणार. "नेफरटिटी" ही राणी दैवी सौंदर्याचे लक्षण मानले जाते. तिच्यासारखे सौंदर्यच काय पण आपल्याला बुद्धिमत्ताही असावी असे तिचे महत्व मानणार्‍या त्या काळातील स्त्रीयांना वाटत असे. "पझल" चित्रपटातील नायिका 'आपण अधिक सुंदर दिसायला हवे...' असे ज्यावेळी म्हणते तेव्हा तिच्या मनी हीच 'नेफरटिटी' असणार....कोड्याचे नावही त्यासाठीच. इन्द्रा
  • Log in or register to post comments

धन्यवाद

राजेश घासकडवी
Sun, 01/09/2011 - 22:29 नवीन
या सांकेतिकतेवर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद. जीवनाचं कोडं सोडवणं, व त्याच वेळी असा खेळ खेळणाऱ्या नेफरटिटीचा आदर्श मनात ठेवून तो पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करणं हे दोन्ही यातून खुबीने साधलं आहे. चिंजंना प्रश्न - चित्रपटाच्या शेवटी ती स्त्री वेगळी व सुंदर दिसायला लागते असं तुम्ही म्हटलं आहे. त्यात त्या चित्रातल्या नेफरटिटीसारखी काहीशी दिसते का? तसं दाखवलं असेल तर दिग्दर्शनाला अधिक खोलवर दाद दिली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

एका सुंदर चित्रपटाची तितकीच

मस्त कलंदर
Sun, 01/09/2011 - 18:27 नवीन
एका सुंदर चित्रपटाची तितकीच सुंदर ओळख. मलाही हे परिक्षण वाचताना 'शॅल वी डान्स' आठवला. चंजं, अजून काही अनोळखी आणि सुंदर चित्रपट-परिचयाची वाट पाहात आहे..
  • Log in or register to post comments

मलापण! इंद्रानी उलगडून

मेघना भुस्कुटे
Mon, 01/10/2011 - 08:28 नवीन
मलापण! इंद्रानी उलगडून दाखवल्याप्रमाणे तत्त्वज्ञानाचा स्पर्श नाहीये 'शॅल वी डान्स'ला. पण थीम हीच आहे. बाकी चिंजं - मजा येतेय... अजून परीक्षणं येऊ द्यात..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

अरेच्या, हे तर चित्रपट

Pain
Sun, 01/09/2011 - 22:21 नवीन
अरेच्या, हे तर चित्रपट परिक्षण आहे... नावावरुन वाटले की ;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चिंतातुर जंतू
Sun, 01/09/2011 - 23:16 नवीन
प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद.
चिंजंना प्रश्न - चित्रपटाच्या शेवटी ती स्त्री वेगळी व सुंदर दिसायला लागते असं तुम्ही म्हटलं आहे. त्यात त्या चित्रातल्या नेफरटिटीसारखी काहीशी दिसते का? तसं दाखवलं असेल तर दिग्दर्शनाला अधिक खोलवर दाद दिली पाहिजे.
चित्रपटात नवरा बायकोला असं म्हणतो. त्यानं बायको सुखावते. ती नेफरटिटीसारखी दिसते का? त्या अभिनेत्रीचं हे छायाचित्र पाहा: Image removed. मला वाटतं की हे नेफरटिटीसारखं असणं इतकं शब्दशः अभिप्रेत नाही. सुरुवातीची काहीशी गोंधळलेली, साधीसुधी मध्यमवयीन स्त्री चित्रपटात हळूहळू कुठेतरी एक प्रगल्भ, हुशार, तेजस्वी, आत्मविश्वासपूर्ण आणि ऐटदार नायिका बनते, हे मारिआ ओनेट्टो या अभिनेत्रीचं कौशल्य आहे. नेफरटिटी हे या गुणांचं प्रतीक म्हणता येईल.
  • Log in or register to post comments

सुरेख ओळख! इन्द्रराज यांचा

स्वाती२
Mon, 01/10/2011 - 03:06 नवीन
सुरेख ओळख! इन्द्रराज यांचा प्रतिसाद वाचनीय!
  • Log in or register to post comments

'पझल' आणि स्त्रीची भीती...!!

इन्द्र्राज पवार
Mon, 01/10/2011 - 10:06 नवीन
सर्वश्री राजेश घासकडवी, मस्त कलंदर, मेघना आणि स्वाती यानी 'नेफरटिटी सिम्बॉल' प्रतिसाद आवडल्याचे कळविल्याबद्दल त्याना धन्यवाद. चिंजंनी आताच्या ताज्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे कोणत्याही फ्रेममध्ये अशी प्रतीके शब्दशः घेतले जात नाहीत. इथे नेफरटिटी स्त्रीची अशी एक प्रतिमा वापरली आहे दिग्दर्शिकेने की जी प्रत्येक स्त्रीच्या (विशेषतः मध्यमवयीन...) मनी वसलेली असते.... मला नक्की इथे काय म्हणायला हवे हे नीटपणे शब्दबद्ध करता येणार नाही, पण सर्वसाधारणपणे चाळीशीनंतर विवाहित स्त्रीला आपण सुंदर, हुशार, तेजस्वी, आत्मविश्वासपूर्ण असलो तरी 'दिसलो' पाहिजे असे वाटत असावे. "पझल" च्या कथेतील नेफरटिटीच्या चित्राचा वापर याच संकेतासाठी आहे (असावा). काल रात्री हाच विषय आम्ही मित्रांमध्ये चर्चेला घेतला होता (पझल + त्या अनुषंगाने इथे झालेली चर्चा), त्यावेळी एकाने (जो इथला सदस्य नाही) सांगितले की 'स्त्री' च्या अशा मानसिकतेवर हिंदीमध्येदेखील काही चित्रपट आहेत, त्यातील शर्मिला टागोरचा 'गृहप्रवेश'. म्हणजे पती एका तरूण सेक्रेटरीमध्ये गुंततो व नायिकेला 'आपल्यातील तारुण्य कमी झाले म्हणून तो बाहेर जात आहे..." अशी काहीशी भावना वाटत राहते. मी हा चित्रपट पाहिलेला नाही, पण इथल्यापैकी कुणी पाहिला असेल तर 'पझल' अनुषंगाने माहिती दिल्यास हाही चित्रपट मिळविता येईल. इन्द्रा
  • Log in or register to post comments

'गृहप्रवेश'

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 01/10/2011 - 23:04 नवीन
'गृहप्रवेश' पाहिला आहे. पण तो चित्रपट एवढा इन्व्हॉल्ड (मराठी शब्द?) नाही असं मला वाटतं. 'गृहप्रवेश' नवरा दुसर्‍या स्त्रीमधे गुंतण्याबद्दल आहे; नायिका सर्वच बाबतीत तिच्या नवर्‍यावर अवलंबून आहे. 'पझल'मधे मात्र नायिकेने स्वतःचा शोध घेण्याचा विचार आहे. नवरा का असेना पण दुसर्‍यावर अवलंबून असण्यापेक्षा स्वत:ला शोधणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. एकूण माझा आवाका आणि कुवत पहाता हे व्यक्त करण्यासाठी चांगले शब्द सुचणं माझ्यासाठी कठीण काम आहे, पण मेघना भुस्कुटे, चिं.जं., बिपिन, मुक्तसुनीत यांच्यापैकी कोणी अधिक चांगल्या पद्धतीने लिहू शकतात. इंद्रा तुझे प्रतिसादही आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

मस्तच........!

जिवाणू
Mon, 01/10/2011 - 12:20 नवीन
चित्रपटाची छान ओळख करून दिली.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा