Skip to main content

अनुप्रास

लेखक शरद यांनी सोमवार, 27/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असतांना ज्या कविता आपल्याला आवडावयाच्या त्यातील काही उदाहरणे १] देवी दयावती दवडसि दासाची दु:खदुर्दशा दूर पापाते पळवितसे परमपवित्रे तुझा पय:पूर ! मोरोपंत २] कुरुकटकासि पहाता, तो उत्तर बाळ गडबडला, स्वपरबळाबळ नेणुनि, बालिश बहु बायकांत बडबडला ! मोरोपंत लहानपणी द द ,प,प,ब,ब, यांची पुनरावृत्ति मजेदार वाटावयाची. शिवाय पाठ करावयालाही सोपे. माध्यमिक शाळेत अलंकार म्हणून उपमा, उत्प्रेक्षा व्याकरणाच्या एक भाग म्हणून शिकवावयास सुरवात केली आणि सगळी मजाच गेली. सदाशिव पेठेत बरीच वर्षें काढल्यामुळे कोणत्याही विषयावर ( विशेषत : आपला अभ्यास नसलेल्या ) ठोकून मत द्यावयाचा अधिकार मला आहेच. तेंव्हा माझे असे ठाम मत आहे कीं लहान मुलांना मराठीची गोडी लावावयाची असेल तर अभ्यासक्रमात व्याकरण हा विषय ठेवावा पण परिक्षेमध्ये अजिबात ठेवूं नये. व्याकरणाची धास्ती न घेता मुले चांगले वाङ्मय वाचू लागली तर केवळ वाचनानेच मुलांचे मराठी सुधारेल व आवड वाढल्याने मराठीला बरे दिवस येतील. ( हा चर्चेचा विषय करावा; अनेक "तज्ञ" भाग घेऊ शकतील !) असो. तर काय सांगत होतो की हा " अनुप्रास " लहानपणापासून ओळखीचा. जेव्हा एक किंवा अनेक व्यंजनांची आवृत्ती होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. याचे तीन प्रकार; [१] छॆकानुप्रास, [२] वृत्यनुप्रास, [३] शब्दानुप्रास. पहिला व तीसरा फ़ार प्रचारात नाहीत. आपण नेहमी बघतो तो वृत्यनुप्रास. याची आणखी उदाहरणे : [३] हंसे मुक्ता नेली मग केला कलकलाट काकांनीं , हाकानी नभ भरले जाय सुरांच्याही नाद हा कानीं ! म्रोरोपंत [४] डुमडुमत डमरु ये,खणखणत शूल ये, शंख फ़ुंकीत य़ॆ, येइ रुद्रा ! प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा क्रूर विक्राळ घे क्रुध्द मुद्रा ! कडकडा फ़ोड नभ, उडव उडुमक्षिका, खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका, मांड वादळ,उधळ गिरि जशी मृत्त्तिका, खवळवीं चहुकडे या समुद्रां ! भा.रा.तांबे. अनुप्रासात व्यंजनांची पुनरावृत्ती होत असते, स्वर वेगवेगळे असले तरी चालतात. अनुप्रासाचे एक सुंदर उदाहरण श्री. विसुभाऊ यांनी दिले आहे. दहावीच्या अभ्यासक्रमात 'अनुप्रास' होता. तेव्हाचे ठरलेले उत्तर - गारा, वारा, पर्जन्यधारा यांचा एकच मारा होऊन "रमावरा, आता तुम्हीच तारा!" असे म्हणत वर्‍हाडी मंडळी सैरावैरा पळत सुटली. तसेच श्री. वाचक्नवी यांनी दिलेली शब्दानुप्रास (किंवा लाट्यानुप्रास) याची ही उदाहरणे : १. जान्हवीसुतासवें लढावयास संगरीं । चक्र चक्रपाणि पाणिमाजिं तो सदा धरी ॥ (तो चक्रपाणि पाणिमाजीं चक्र धरी.) २. पद्म पद्मलोचना घेउनी करीं जना । (पद्मलोचना स्त्री करीं पद्म घेउनी..) ३. किंतु कर्ण भेदि नीलकंठकंठज स्वर। (नीलकंठ मोर, कर्णभेदि स्वर कंठातून काढतो.) शरद
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6068
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

ॐ पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि| विश्वप्रिये विश्वमनोनुSकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निदस्त्व|| पद्मानने पद्मऊरु पद्माश्री पद्मसंभवे| तन्मे भजसिं पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहं|| ________________________ काळे काकूंनी काळे काकांचे कचेरीच्या कामाचे काळे, कोरे करकरीत कागद कात्रीने कराकरा कापून केरात काढले.

मस्त! अलंकार शिकताना अनुप्रासाचं हे उदाहरण दिल्याचं आठवतंयः गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले शीतलतनू चपलचरण अनिलगण निघाले रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील यमुनेतटी नावांचा कृष्ण मेळ खेळे

च्यामारी शाळेत असताना ह्या व्याकरण नावाच्या प्रकाराला जाम बिचकून होतो.. आणि ह्याला कारण त्यावेळेचा शिक्षकवृंद.. कधी व्याकरण योग्य शिकवण्याची तसदीच घेतली नाही.. पण आता मात्र ह्या गोष्टी आवडतात आणि गोडीने वाचतोही.. - पिंगू

In reply to by पिंगू

>>कधी व्याकरण योग्य शिकवण्याची तसदीच घेतली नाही.. अगदी अगदी. पण तरीही व्याकरण हा माझा आवडता भाग होता. कमी कष्टात जास्त मार्क मिळवून देणारा म्हणून ;)

शरद लेख आवडला मला पण एक शालेतिल उदाहरन आठवले माधवरावांचा मिलिंद माहिमला मिलमध्ये मजूर म्हणून काम करतो अनिल आपटे

'ळ' हे अक्षर कवितेत फारसे वापरले जात नाही अशी चर्चा झाल्यावर गदिमांनी एका बैठकीत गाणं लिहिलं असं ऐकिवात आहे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा - घननीळा, लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा सुटली वेणी, केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे काजळ गाली सहज ओघळे या सार्‍याचा उद्या गोकुळी, होईल अर्थ निराळा

>> मराठीची गोडी लावावयाची असेल तर अभ्यासक्रमात व्याकरण हा विषय ठेवावा पण परिक्षेमध्ये अजिबात ठेवूं नये>> १००% सहमत! शाळेत व्याकरण या प्रकाराने फार छळले. अवांतर वाचन भरपूर असूनही शाळेत असताना मराठी हा नावडता विषय होता.

In reply to by स्वाती२

शाळेत व्याकरण "अभ्यास" म्हणून शिकताना कधीच आवडलं नाही. पुलंच्या 'बिगरी-ते-म्याट्रिक' मधे त्यांनी म्हटल्याप्रमाणे, फणस सोलल्यासारखी कविता सोलायची गरे टाकून द्यायचे आणि चारखंड चावत बसायचं.

In reply to by प्राजु

या श्लोकावरून त्याची एक गंमत आठवली. हा पूर्ण श्लोक असा आहे: रामः राज मणी सदावीजयते रामंरमेशं भजे रामेणाभिहता निशाचर चमु रामाय तस्मै नमः|| रामात नास्ती परायणं परतरम रामस्य दासोस्म्यहम | रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर || यात अधोरेखीत केलेले शब्द हे 'राम' ह्या अकारन्ती पुल्लिंगी शब्दाचे प्रथमा, द्वितीया... ते संबोधन हे विभक्ती प्रत्यय आहेत. :) म्हणजे रामः ( प्रथमा ), रामं ( द्वितीया ), रामेण ( तृतीया )....

मर्ढेकरांच्या काही ओळी आठवतात .......खिळे पाडुनि.... कढईच्या दे कुट्ट कपाळी ठोकुन पक्के, काळे बळकट