Skip to main content

"इकडचे" आणि "तिकडचे"..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 10/12/2010 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
खूप पूर्वी मनात आलेलं आणि लिहिलेलं काही आज पुन्हा दिसलं आणि आणि त्यातले काही पॉईंट्स उचलून चर्चेला आणावेसे वाटले म्हणून.. खाली जे काही लिहिलंय ते आडपडदा न ठेवता किंवा मुद्दाम "न्यूट्रल" राहण्याचा कोणताही प्रयत्न न करता "ज्याचे अनेक (जवळ जवळ सर्वच) रोजच्या कट्ट्यावरचे मित्र परदेशात गेले आहेत आणि कायमचे राहिले आहेत" अशा भारतात "उरलेल्या" म्हणा किंवा "राहिलेल्या" म्हणा, माणसाच्या मनातून हे लिहिलं आहे : -------------------------- जो कोणी अमेरिकेला (किंवा यू.के. वगैरेला) जातो.. तो "आयुष्यातून" जातो.. तिकडे गेलेल्यांचा पहिला पहिला संपर्क हा (अगदी नॅचरली) भारून गेलेला आणि आपलं तिथलं जीवन कसं वेगळं आणि समृद्ध आहे हे इकडच्या भारतीयांना भरभरून सांगण्यासाठी असतो. तास तासभर आय एस डी चालतोच. तिथे कॅसिनोत गेलो, नग्न नृत्य पाहिलं, रस्ते स्वच्छ, सगळ्या घरांत वॉशिंग मशीन,ए.सी. डिशवॉशर, ओव्हन, वॉल टू वॉल कार्पेट, वगैरे असतं हे सांगितलं जातं.. आणि बेसिनला पिण्याइतकं स्वच्छ पाणी येतं हे ही. .. एखाद दोन महिन्यातच "कार घेतली" चे आवर्जून फोन ई-मेलवर फोटो येतात. इकडचे सगळं खूप ऐकतात वाचतात. (पुन्हा वरच्याप्रमाणेच हेही अगदी नॅचरली..)वेळोवेळी "जळतात" ही "तिकडच्यां"च्या नशिबावर.. पण वारंवार सतत कौतुक केलं जातंच असं नाही. एकतर आता इथेही बर्‍याच गोष्टी मिळत असल्या तरी एक नैसर्गिक हेवा असतो आणि पुन्हा आपल्या "इकडच्या" रोजच्या रहाटगाडग्याशी जुळणारं असं "तिकडच्यां"च्या बोलण्यात काही सापडत नसल्याने नुसतंच ऐकायचं आणि "वा..आयला..सही" असे उद्गार काढायचे याला बहुधा "इकडचे नंतर कंटाळत असावेत. आपल्या "इकडच्या" आयुष्यात मात्र "तिकडच्यां"ना नवीन वाटेल अशा नवीन डेली घटना फारशा नसतात. म्हणून शेवटी "मग तुझं काय चाललंय?" या तिकडून येणार्‍या प्रश्नाला फार दीर्घ उत्तर देता येत नाही.. "चाललंय आपलं, नेहमीचंच.." म्हणून इकडचे नंतर नंतर गप्प बसतात. "तिकडच्यांना"ही इकडून भरभरून रिस्पॉन्स मिळत नाही असं लक्षात येऊन तेही सांगणं कमी करत जातात. तिकडचे झालेले अनेकजण "भारतीय सिस्टिम" ला सकारण नावं ठेवतात.. करप्शन, पोल्युशन वगैरे मुद्दे जेन्युइनही असतात. त्यावर उत्तर किंवा बचाव म्हणून "इकडचे" कधीकधी आपल्या देशाचे गोडवे गातात..(असेना का करप्शन वगैरे..संस्कृती बघा..) असं म्हणणार्‍यांमधे मनापासून दुखावल्याने म्हणणारेही असतात आणि आपल्याला "तिकडे" जाता येत नाही (कर्तबगारीत कमी पडल्याने) याची खंत असलेलेही अनेक असतात. म्हणून कधीकधी अशा ठिकाणी आपल्या देशाचा अभिमानही "डिफेन्सिव्ह मोड", बचावात्मक पवित्र्यात बाळगला जातो की काय असं वाटतं. तशी (उदा.) अमेरिकासुद्धा अजिबात "कमी" नाही.. ..कोणताच देश कमीजास्त नाहीच.. पण पैशाच्या, डॉलरच्या शक्तीच्या खेळामधे आपण सगळे क्षुद्र ठरतो.. मी बर्‍याचदा बघितलंय : "तिकडचे" इकडे आले की सगळ्यांनी त्यांना भेटायला गावोगावाहून यायचं.. काही परफ्यूम,चोकलेट्स वगैरे आणली असतील ती घ्यायला जाण्याचाच "इकडच्यां"चा उत्साह जास्त दिसतो.. तिकडचे आलेले स्वत:हून इकडच्यांना घरी भेटायला क्वचित येतात..(कारण सामान घेऊन फिरणं अवघड जातं इ.इ.).. एकदम एअरपोर्ट ते गाव...गाव ते एअरपोर्ट..व्हिसा रिन्युअल किंवा इतर कारणांनीही मुंबईला खूपदा येतील पण बोरिवली, ठाणे , डोंबिवली अशा आडबाजूच्या मित्रांकडे केवळ भेटायला कितीजण येतात, शंका आहे. "इकडचे" त्यांना खास देशी बेत, पिठलं भाकरी वगैरे बनवून जेवायला बोलावतात ..किंवा पुरणपोळी.. यात काही वेगळं घडलं तर "यांचा" "त्यांना" अपमान..आणि कधी "त्यांचा" "यांना"..अशा घटना भारतभेटीनंतर कटुता ठेवतातच.. विचारण्याचा मुद्दा असा आहे की मनुष्य अंतराने दूर गेल्यावर त्याच्यात आणि आपल्यात काहीच (आर्थिक, रोजच्या घटना, वातावरण इ.इ.इ) "सिमिलर" राहात नाही. आणि त्याच्या परदेशातल्या "नाविन्या"पेक्षा आपापल्या देशांत आणि आपल्याच गावात "उरलेल्या" देशी मित्रांसोबत "सिमिलॅरिटीच्या" बेसिस वर आपलं नातं जास्त दृढ होत जातं आणि परदेशी मित्र मागे मागे पडत जातात. .. असं सगळ्यांच्या बाबतीत होतं का? परदेशी गेलेला मित्र..त्यासोबतचं नातं तुटत जातं..मधेच ते आले की भेट जमवून आणली तरी आणि होऊ नाही शकली तरी ते नातं नुसतंच ढवळलं जातं.. अवघड सिच्युएशन होते.. आणि ही झाली इकडे बसून लिहिलेली एकतर्फी बाजू.. "तिकडे" गेलेल्याचंही काय? तिकडचं कष्टाने कमावलेलं वैभव बघायला आणि कौतुक करायला जोपर्यंत इकडचे कोणी येत नाही तोपर्यंत त्यांनाही काय वाटत असेल ? कारणं काही असोत.. योग्य किंवा अयोग्य.. पण शेवटी "इकडचे" आणि "तिकडचे" ही दरी पडतेच आणि वाढत जातेच.. बरोबर आहे का मी म्हणतो ते? इथे इकडचे आणि तिकडचे दोन्हीकडचे खूप मिपाकर आहेत. कोणीही प्लीज पर्सनली घेऊ नये ही विनंती. आपल्यातले काहीजण (इकडचे आणि तिकडचे दोन्हीही) असे वागत नसतीलही..मागे असंच माझ्या ब्लॉगवर लिहिलं तेव्हा "आपण नक्की कोणाकडे पाहून टीका करत आहात. मी स्वतःहून भारतात सगळ्यांना भेटायला जातो" अशा स्वरुपाच्या नाराज प्रतिक्रिया आल्या. हे सार्वत्रिक आहे का एवढंच बघायचंय. मला वाटतं नीट जमत नसूनही माझा मुद्दा मी पुरेसा मांडलाय..!! तरी मत मांडायला एक ठाम मूळ मुद्दा हवाच म्हणून खाली एका वाक्यात लिहितोय..: मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ?

वाचने 21717
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

In reply to by नंदन

आमचा लै आवडता खेळाडू हाये! एकदम झक्कास!! बाकी, दोन टायमाची भाकरी मिळवण्यात व्यग्र असल्याने फार लिहू शकत नाही. चालू द्या!

मूळ धागा वाचून अभिप्राय लिहिणार होतो.... पण इथे येता येता बाकीचे अभिप्राय वाचून मला काय लिहायचंय ते विसरूनच गेलो... आठवलं की परत इथे येईन..... बाकी, मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ? असहमत!!!! खर्‍या निरपेक्ष मैत्रीमध्ये अंतराचा अडथळा येत नाही, हे स्वानुभवावरून!!!

In reply to by पिवळा डांबिस

मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ? असहमत!!!! खर्‍या निरपेक्ष मैत्रीमध्ये अंतराचा अडथळा येत नाही, हे स्वानुभवावरून!!! (सहमत)बेसनलाडू

मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ? केवळ परदेशी जाण्यामुळे किंवा न जाण्यामुळे मैत्री चे नातं संपत असेल तर त्या मैत्रीची मर्यादाच तेव्ह्ढी होती असे समजावे.. तसही रोजची व्यग्रता, अनेक समस्या आणि जबाबदार्‍या यातुन आपण किती वेळ आपल्या अगदी परदेशी न गेलेल्या मित्र - मैत्रीणिंना देउ शकतो? नात्यांमधे दुरावा येण्यासाठी आणि तो वाढत जाण्यासाठी परदेशी जाणे हे कारण असू शकत नाही .

मी एक अनिवासी ह्या नात्याने माझे मत मांडतो . अमेरिकेत अथवा युकेत अथवा आणि कुठेही ३० ते २० ते १५ अगदी १० वर्षापासून परदेशात राहिलेले अनिवासी असतात ,ते एकतर उच्च शिक्षण च्या निमितान्ने तेथे गेले असतात किंवा उच्च शिक्षणाच्या जोरावर नोकर्या घेऊन घेलेले असतात (हा लेख मी महाराष्ट्रीयन अनिवासी एवढ्याच समूहा ला लक्षात घेऊन लिहित आहे. ) त्यांची परदेश गमनाची मुख्य कारण त्यावेळी भारतात असणारी बेरोजगारी /महागाई /समाजात बुद्धिवंतांना असलेली किंमत /अडाणी व विवेकशून्य लालची लोकांकडे असलेले समाजाचे पर्यायाने देशाचे नेतृत्व (ह्यामुळे भ्रष्टाचाराला मिळालेली प्रतिष्ठा ) व त्याचवेळी समोर अमेरिकन वा एखाद्या परदेशी प्रगत देशाचे मनोरम्य चित्र .म्हणून काही संधी मिळाली तर काहींनी संधी मिळवून अनिवासी झाले .ह्या लोकांना तेथील कायदा सुव्यवस्था /सुब्बता /आधुनिक जीवनशैली(ह्यात मला प्रक्टिकल विचारसरणी ठेवून जगणारी विचारसरणी ज्यात ५ दिवस काम व दोन दिवस आराम (ह्या दोन दिवसात मग आजूबाजूची मराठी डोकी हुडकणे /त्यांनी एकत्र येऊन पार्ट्या करणे /हातात बाटली असणे. अश्या नवीन अनिवासी संस्कृती बद्दल म्हणायचे होते . .पण मराठी साहित्य व परंपरा ह्यांच्यात रमलेला त्यांचा मनातील एका कप्पा उदास होता . व त्याची खुशामत करण्याची मंडले (ह्यांचे उदिष्टे फक्त आपल्या आयुष्यातील गतकाळ आठवणे त्यासाठी मग जुनी गाणी शास्त्रीय गाणी /मराठी नाटके व मराठी सण व परंपरा सांभाळणे ह्या सर्व गोष्टी हिरारीने (काहीश्या जिद्दीने ) सुरु झाले .कारण होते .ह्या परदेशात परकीयांनी जाणते /अजाणते पणी ह्यांना परकीय असल्याची जाणीव करून देणे होय .प्रत्येक वेळी टोमणे व शेलके शेरेच काही गोर्यांकडून नको ऐकायला .पण त्यांची जीवन शैली व मूल्य कितीही झाली तरी ह्या अनिवासी लोकंना पूर्णपणे स्वीकारता नाही आली .आजही ५ मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन एकच भाषा /खाद्य पदार्थ /एकच विषय (तो एकतर भारता संबंधी राजकारण अथवा सिनेजगतावर वा सद्यस्थितीतील कोणत्याही सामाजिक असामाजिक प्रश्नावर असो किंवा अमेरिकेत स्थिरावताना येणारे दैनंदिन आयुष्यातील प्रश्न जसे मुलांचे शिक्षण / एखादी नवी गोष्ट जसे कार व जागा घ्याची असेल तर सल्ला ह्या विषयांवर जे मेतकुट जमते ते इतर गोर्यांबरोबर होऊच शकत नाही .) मग येथे स्थिरावल्यावर भारतात काय होतंय ह्यांची कल्पना नसल्याने (त्याकाळी सोशल नेटवर्क प्रगत नसल्याने भारतात फोन म्हणजे चैनीची गोष्ट (लांब लचक फोन कॉल) ह्यामुळे भारतात घडणारी सामाजिक स्थित्यंतर ह्यांच्यापासून लपून राहिली .बरे येथे स्तःयिक आहोत .व आता गाडी /घर व आपल्या कर्तबगारीमुळे व बचत व योग्य प्लानिंग मुले अमेरिकन ड्रीम व त्याहून जास्त कमावून बसलेल्या अनिवासी भारतीयांना समाजात एक ओळख हवी होती. ती अमेरिकन समाजात शोधणे शक्य नव्हते .(उद्या एखादा भय्या समजा म्हणजे उदाहरण द्यायचे म्हणून जेष्ठ नेते कृपाशंकर सिंग हे मुंबईत पैसा व्यापार आपल्या सचोटीने कमावून गब्बर झाले म्हणून ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नाही बनणार (त्यांचा जीव रमणार हि नाही ) मुंबईच्या उच्चभ्रू टाटा गोदरेज व हिरा व शेअर मध्ये डील करणार्या मुंबईच्या बड्या लोकांमध्ये सुध्धा सामील होऊ शकत नाही .त्यांना खरा मान हा त्यांचा मूळ गावी .(आज मुंबईत काम करतो ह्या एका शब्दावर ह्या लोकंना त्यांच्या राज्यात सुंदर स्थळ मिळते) तर मग आपल्या कर्तबगार अनिवासी भारतीयांनी महार्ष्ट्रातून लेखक /नाटककार / व अनेक नामवंत मंडळीचा आपल्या कडे बोलावून पाहुणचार करू लागले /हेतू एकच आपल्या आयुष्याचे रसभरीत वर्णन कळू दे मायदेशी .दुसरा हेतू म्हणजे थोरा मोठ्यांचे पाय लागुदे आपल्या घराला. पण ह्यात कुठेतरी महाराष्टार्तील मित्र व अनिवासी भारतीय मधील दुरावा व विचार करण्याची प्रवृत्ती बदलते .भारतात आल्यावर ह्या अनिवासी भारतीयांना येथील उणीवा प्रकर्षाने जाणवतात त्यावर प्रखर भाष्य ते करतात .त्यामुळे कुठेतरी एक शीत युद्ध सुरु होते .बाकी काही वर्षापूर्वी परदेशातून आल्यावर खाऊ म्हणून चोकालेत आणणे (आमच्या लहानपणी आम्हाला क्वचित पेन वा अश्या गोष्टी मिळत हॉलीवूड मधून पाहिलेले परदेश वास्तवात काही प्रमाणात फोटोत पाहायला मिळणे )ह्यामुळे परदेशातून कोणी येणार म्हणून पूर्ण गल्लीत दवंडी असायची .अनेक दूरदूरचे नातेवाईक येऊन कौतुक सोहळे व्हायचे .पण खुपदा माझ्या पाहण्यात असे आले आहे कि हि लोक अजूनही आपला भूतकाळ जगण्यासाठी त्याकाळातील गाणी अथवा इतर विषय हेच अजेंड्यावर ठेवतात . . हीच लोक कार्यकारणीवर असतात .त्यामुळे नवीन आलेले अनिवासी वा विद्यार्थी त्यांच्याशी समरस होऊ शकत नाहीत( १०० % मराठी कलावंत ज्यात श्रेयस /पुष्कर /भारती अचार्केकर /किशोर प्रधान /विजू खोटे /क्रांती रेडेकर असलेले नाटक लेखन व निर्माते दाभोळकर ह्यांचे नाटक युरोपात दौरे होत असतांना महारष्ट्र मंडळात लंडन मध्ये होऊ दिले नाही .कारण नाटक इंग्लिश मध्ये होते .(खरे तर ह्यांची तरुण पिढीला हे मराठी व हिंदी फ्युजन असलेले नाटक अधिक आवडले असते कारण ह्याच्या बोलीभाषेत अर्धे शब्द मराठी तर अर्धे इंग्लिश असतात . .२ ,)मध्ये मी माझ्या पिढीला अंतर्भूत करेन .जे ५ ते७ वर्षापूर्वी अनिवासी झाले .आम्ही जेव्हा भारत सोडला तेव्हा नेट संस्कृती आपल्या इथे बाळसे धरू लागली होती .जागतीकरणामुळे महासत्ता बनण्याची चाहूल लागली होती (आपण त्या भाग्यवान २० % मध्याम्वार्गीयात मोडतो ज्यासाठी परकीय व स्वकीय बहुराष्ट्र कंपन्या त्यांचे जगातील अद्यावत सामुग्री अत्यंत आकर्षक स्वरुपात आपल्यासाठी उपलब्ध केली आहे .उदा भारतातील मोबाईल कंपन्याचे टेरिफ सध्या जगात सर्वात आकर्षक व स्वत आहेत .) त्यामुळे भारत वियोग आम्हाला याहू व आदी मेसेंजर मूळे जाणवला नाही . अवंतिका मध्ये काय झाले हे आठवड्याचे संशिप्त वृत्तांत एका chat मध्ये कळत होते मराठी पेपर वाचता येत होते .अर्थात २००० नन्तर जेव्हा जेव्हा भारतात आलो मुंबई व पुण्यात ५ वर्षापूर्वीची बेरोजगारी कमी व सुब्बता दिसत होती .किंबहुना आमच्या मित्र मंडळीत आम्ही तुमच्या पेक्षा कमी नाही हि दाखवायची अहमिका होती .(हे पाहून एक भारतीय म्हणून मला तरी खूप बरे वाटले .दृष्टीकोन हा बराच व्यापक आणि प्रक्टिकल होता .(ह्या पिढीत एखाद्या मुलीसाठी देवदास होणे माझ्यामते ओल्ड फेशन होते .त्यापेक्षा दिल चाहता हे मधील किंवा तू नही तो कोई और सही अर्थात पहिले लगीन करियरचे असा व्यवहारी दृष्टीकोन दिसला .) आता यु ट्यूब मूळे झी मराठी व इतर मराठी संस्थालामुळे मराठी शो व पुरस्कार सोहळे पाहता येतात .फु बाई फु मध्ये कोण चाबूक काम करते ह्यावर चर्चा व इंटर नेट मधील torent मूळे अमेरिकन व जगातील गाजलेल्या टीवी मालिका व सिनेमे चकट फु पाहायला मिळत असल्याने भारतीय व अनिवासी भारतीय ह्यात फारसा फरक दिसत नाही आहे , किंबहुना अनिवासिपेक्षा भारतीयच फार्म विले वर जास्त सापडतील .ओर्कुट व फेसबुक ने आपणास एका समान फेस दिले आहे असे मला वाटते .आम्ही नोकरी व घर ह्यामधील प्रवासात वाचणारा वेळ मिपा व आदी मराठी संस्थळावर घालवतो . .काही आधुनिक अनिवासी परकीय बिग ब्रदर मध्ये काय आहे आमच्या डॉली ची सर आहे का कुणाला ? म्हणून देशी अवतार चवीने पाहतात. म्हणून यु ट्यूब जिंदाबाद. आम्ही खुपते तिथे गुप्ते काही आठवड्याने का होईना उशिरा पाहतो (आखातामध्ये सर्व भारतीय वाहिन्या दिसतात हेच लोण तमाम जगभरात पोहचेल .किंवा काही वर्षात नेट टीवी बाळसे धरेल .आज भारतीय लहान मुलांना ( मुंबईतील)माझ्या पाहणीतील हेना मोन्तेना माहित असते .पण मुग्धा सुध्धा माहित असते .ते टिंग्या पाहून हळहळत नाहीत कारण हि संस्कृती त्यांना व अनिवासी शिशु पिढीला सारखीच नवीन असते .. आहे .भावी पिढीतील भारतीय व अनिवासी भारतीय ह्यांच्यात माझ्या मते वैचारिक दृष्ट्या विशेष फरक राहणार नाही आहे .पण अनिवासी भारतीयांनी आपली थोडी मानसिकता बदलायला हवी ( आय मीन स्वताच्या भाव विश्वातून बाहेर येऊन सत्य स्वीकारले पाहिजे .एक उदाहरण द्यायचे त अमेरिकेतील साहित्य संमेलन/ वक्ता अविनाश धरमाधिकारी /.ते जेव्हा भाषणात म्हणाले कि सिलीकोन VALLEY ची दुसरी भाषा मराठी आहे (प्रचंड टाळ्या व सहमती )पण मग म्हणाले त्यांनी येथील ओपेरा वा नाटक पहिली त्यातील टेक्निकल प्रगती पाहता आपली नाटक काहीच नाही .तेव्हा मात्र साप दिसल्यागत शांतता (आम्ही सत्य स्वीकारत नाही .आज भिकार डेली सोप मुळे मराठी तरुण पिढी जर नेट वरून इंग्लिश मालिका पहायला लागले डिस्ने वा हॉलीवूड सिनेमे पहिले तर मग दोष कोणाचा ? हि पिढी मग परदेशात आल्यावर ते महारष्ट्र मंडळात एकरूप होत नाही कारण तेथे अजूनही २० वर्षापूर्वीचे महार्ष्ट्रीय सांस्कृतिक उपक्रम होतात . मग समवयस्क नवे अनिवासी भारतीय एकत्र येऊन स्वताची नवीन संस्कृती निर्माण करतात .(ते राज ठाकरे किंवा इतर मराठी विषयाला वाहिलेल्या कम्युनिटीवर असतात .व आधुनिकता व पारंपरिकता ह्याचा मेळ घालायचा प्रयत्नात असतात .त्यांना भारतात आल्यावर अजिबात परके वाटत नाही .किंबहुना भारतात येतांना मुंबईतील सागरी सेतूवरून फिरायची मनीषा असते .थोडे हिरवे पैसे खिशात असल्याने भारतीय नव चंगळवादी संस्कृती भोगण्याचा प्रयत्न असतो .व परदेशात भारताविषयी स्तुती सुमने एकूण सुखावत असतो .ते आपल्या भारतीय असण्याचा माज दाखवतो परदेशात .(शायनिंग इंडिया वा उगवत्या महासत्तेचे वारसदार म्हणूनच परदेशात जगतात . .)आपल्या मातीशी परदेशात गेल्यावरच महती कळते .कारण घरकी मुर्गी दाल बराबर .

In reply to by प्राजु

बाकी आमच्या डान्रावांना मागे टाकलंस!
म्हणजे प्राजूतै तुला उत्तराच्या (मुद्द्यांना धरून्/सोडून लिहायच्या) स्टाईलमुळे असं वाटतंय का उत्तराच्या लांबीमुळे? ;)

In reply to by Nile

नायल्या, नायल्या, अरे आंजावर काही शब्दांची पेरणी "पॉलिटिकल करेक्टनेस" दाखवण्यासाठीच असते हे का आता तुला सांगायला हवं? इथे लिहिणार्‍याबरोबर वाचणार्‍याचं मन सुद्धा दुखावलं जाऊ नये ह्याची जाणीव आहे बरं मला! ;)

In reply to by विंजिनेर

आंजावर.... ... मन सुद्धा दुखावलं जाऊ नये
च्यायला, ह्या आंजावरील अनुभवी लोकांना नक्की झालंय तरी काय! काहीतरी विपरीतच बोलुन राह्यलेत. परवा तो नंदन सुद्धा असंच काहीतरी बोलत होता.

कॉलेजमध्ये असताना कमी जबाबदारी असते, भरपूर वेळ असतो, मैत्री होण्यासाठी वाव भरपूर असतो, आणि एकंदरीतच धमाल खूप असते. त्यामुळे त्या काळात मैत्री बळकट ठेवणं सहज सोपं असतं. ती तशी ठेवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात हेच नंतर समजतं. ते दिवस संपले की अनेक कारणांमुळे हे नातं बदलतं. माझ्या मते इकडचे-तिकडचे हे 'एखाद्या नात्यात फरक पडणे' या सर्वसाधारण घडणाऱ्या गोष्टीच्या अनेक कारणांपैकी एक आहे. इतर कारणं (बऱ्याच लोकांनी लिहिलेली आहेत) - लग्न - नवीन नोकरी - नवीन ठिकाण - संसाराच्या जबाबदाऱ्या - संपर्काची साधनं - स्वभावातील बदल - मुळातच नाती भक्कम ठेवण्याचा त्या नात्यातल्या दोहोंचा स्वभाव, गरज, इच्छा - मुळातला त्या नात्याचा घट्टपणा यापैकी काही परिस्थितीजन्य आहेत, काही व्यक्तिगत आहेत. नवीन पिढ्यांना संपर्काच्या साधनांचा काहीच प्रश्न नाही. इंटरनेट, टीव्ही, फोन मुळे आमूलाग्र क्रांती झालेली आहे. पण आपल्या कक्षा रुंदावतात, फोकस बदलतो हे मुख्य कारण अजून आहेच. तेव्हा मुळात मैत्री किती जिवाभावाची होती, व ती समुद्रापल्याडही जपून ठेवावीशी किती वाटतात हेच शेवटी महत्त्वाचं. माझा व्यक्तिगत अनुभव हा अशी नाती जोपासण्याचे कष्ट न घेतल्यामुळे व थोड्याफार प्रमाणात माझ्या विसराळू स्वभावामुळे हातातून गळून गेलेल्या वाळूचा आहे. इकडचे-तिकडचे मधलं अंतर कारणीभूत ठरलं पण ते ओलांडण्याचे कष्ट घेतले असते तर हातात बरंच काही शिल्लक राहिलं असतं.

आम्ही तरुणपणी आमची कर्तबगारी (२०० अर्ज पाठवण्याची चिकाटी)) कमी पडल्यामुळे 'तिकडे' जाऊ नाही शकलो. आणि आता म्हातारपणी पण मुलीचे घर बघायला जाताना व्हिसा मिळण्यात ज्या अडचणी आल्या (स्पेशल स्क्रुटिनी), त्या आमच्या कर्तबगारीमुळेच.(रसायनशास्त्रातली उच्च पदवी मिळवल्याचे पातक केल्यामुळे)

मूळ लेख आणि सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्यात. त्यातल्या धमू यांच्या एकंदरीत आणि अदिती आणि मेवे यांच्या प्रतिक्रियेतील काही भागांशी सहमत आहे. माझ्या मते मैत्रीमध्ये दुर्घटना होण्यासाठी 'तिकडे' जाण्याचीच गरज आहे असे नाही. जरा लहानपणापासूनचा आढावा घेतला तरी लक्षात येतं की आपण एकाच शहरात, एकाच शाळा/कॉलेजात असूनही कालांतराने मित्रमैत्रिणी बदलतात. तसेच धमू म्हणतात तसे 'फ्रेम ऑफ रेफरंस' वेगळ्या झाल्याने शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने शहर बदलल्यावर जुन्या मित्रांसोबत गप्पा तेवढ्या रंगत नाहीत. मुळात केवळ रोज कट्ट्यावर भेटून २-४ तास मनसोक्त गप्पा मारणे, कुठेतरी फिरायला जाणे, इ. गोष्टी म्हणजेच मैत्री असते का? आणि खरं तर या गोष्टीसुद्धा एका 'फ्रेम ऑफ रेफरंस' मध्ये राहूनच शक्य होतात. बहुतेक लोक लग्नापूर्वी मित्रांसोबत तासन् तास गप्पा मारतात. मात्र लग्न झाल्यावर मनातले सुख-दु:ख सांगायला, विचारविनिमय करायला, जबाबदारी वाटून घ्यायला कोणीतरी असल्यावर 'सो कॉल्ड' मित्रांची आठवण कमीच येते. त्यामुळे केव्हातरी समोर आल्यावर या मित्रांसोबत एक अवघडलेपणा असतोच. अदिती म्हणतात त्याप्रमाणे कधी-कधी असंही होतं की १-२ वर्षांनी भेटलेल्या मित्रांसोबतही अगदी काल एका ताटात जेवल्याप्रमाणे मोकळ्या गप्पा होतात. मधला संपर्क नसलेला काळ कुणाच्याही लक्षात येत नाही. तेथे कुठलीही दुर्घटना जाणवत नाही. एकूण काय, तर 'मैत्रीमधील दुर्घटना' ही फक्त 'तिकडे' जाण्यावरच अवलंबून नसून त्या मैत्रीवरच अवलंबून असते... 'तिकडे' जाणे हे एक कारण असू शकते. ------------------------------------------------------------------------------------------- अवांतर : पुण्याला शिकायला आल्यानंतर माझ्या शाळेतल्या बहुतेक मैत्रिणी दुरावल्या होत्या. नंतर नोकरीच्या निमित्ताने मी बंगलोरला असताना त्यातल्या एकीचे लग्न होवून ती बंगलोरला आली. आम्ही दोघी १२वी पर्यंत कायम सोबत असायचो. रिकाम्या वेळात एकमेकींकडे जाऊन गप्पा मारत बसत असू. ती मला बंगलोरात भेटल्यावर, मधली ४-५ वर्ष काहीही संपर्क नसताना (मला तिच्या लग्नाचं आमंत्रण देखील नव्हतं! ), आम्ही पुन्हा तेवढ्याच मोकळेपणाने गप्पा मारल्या. कुठेही, कसलाही अवघडलेपणा नव्हता. अर्थात, आम्हा दोघींमध्ये कोणीही तिकडे गेलेले नव्हते :प

नातेवाईक विसरला का? आमचा एक मित्र तिकडे गेला तर त्याला पैसा मागून मागून जीव नकोसा केला सगळ्या नातेवाईकांनी. आता तर तो आई बापाचाही फोन घेत नाही कारण ते पण तेच करतात. अब्बाजानला चढवायचा अजून एक मजला घरावर. हा पोरगा झाला त्याचा एटीएम. फक्त आम्मीला फोन करतो तीचा जीव तुटतो त्याच्यासाटी. पण आता बंद झाले सगळे. शिव्या देतात तिकडे गेला आन बदलला म्हणून. पण आधी केलेली मदत विसरले सगळे.

In reply to by आंसमा शख्स

तिकडे गेल्यामुळे स्वभाव बदलने(?), हा मला वाटते एक स्वतंत्र विचार करण्याचा मुद्दा आहे. खूप पैलू आहेत आपल्या एकाच प्रतिसादात. अश्या दृष्टीने एक नवीन चर्चा सुरु व्हावी अशी अपेक्षा आहे. जसे, तिकडे गेलेल्यांना इकडून कोणते कटू-गोड अनुभव आले, त्यातून ते काय शिकले ? हजारो मैलावरून आपापली नाती जपत असताना कसे वागले गेले पाहिजे ? आदी.