मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वेणी सोडुनिया : गौळण

गंगाधर मुटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
वेणी सोडुनिया : गौळण गुपचिप आला हा उघडोनी ताला झोपेमधी होते याने रंग टाकीला गौळण सांगे राधा, गौळणीला .... ॥धृ०॥ नाही गडे याचा, जराही भरोसा नख मारूनिया दिला, पदराला खोसा बेगी बेगी येतो, चिमटेची घेतो वाकड्या, सुदामा, पेंद्या संगतीला ..... ॥१॥ करुनिया चाल, डिवचितो गाल वेणी सोडुनिया आत, भरतो गुलाल असा चक्रपाणी, कोणा ना जुमानी चिंबाचिंब भिजवितो पैठणीला ..... ॥२॥ कुणी गडे याला, जरा समजावा बोलताती सासू दीर, मार किती खावा वळणाचा घाट, हा अडवितो वाट अरविंद पाहे सखे, ब्रह्मलीला ..... ॥३॥ गंगाधर मुटे ................................................... १९८० च्या सुमारास मी लिहिलेली एक गौळण. ’’गौळण" एक लोभसवाणा काव्यप्रकार. गोकुळात श्रीकृष्णाने गोपिकांसमवेत ज्या कृष्णलीला केल्यात त्याचे रसभरित गेयरूपी वर्णन म्हणजे ’’गौळण". पवित्र आणि वासनारहित प्रेमाचे प्रतीक म्हणजे "गौळण". पण या काव्यप्रकाराची फारशी दखल साहित्यक्षेत्राने घेतलेली नसावी. जाणकारांनी या काव्यप्रकाराविषयी अधिक प्रकाश टाकला तर आवडेल. ...................................................

वाचने 3943 वाचनखूण प्रतिक्रिया 6

स्पंदना Tue, 12/07/2010 - 08:10
कविता छान आहे. पण 'वासना रहित प्रेमाचे प्रतिक' हे नाही पटल. उलट मी म्हणेन सर्वस्व अर्पिण्याची परिसीमा म्हणजे 'गौळण! ' त्याचा नटखट पणा , त्याचे यौवनावस्थेत पदार्पण करत असतानाचे घातलेले धिंगाणे, म्हणजे गौळण!

In reply to by स्पंदना

गंगाधर मुटे Tue, 12/07/2010 - 22:40
सर्वस्व अर्पिण्याची परिसीमा याचे पण फार वेगवेगळे अर्थ काढले जातील. श्रीकृष्णाने बालवयात देखील खूप खोड्या केल्यात. दही दूध चोरणे, कुणाच्या वेण्या बांधने वगैरे. ते वर्णन सुद्धा याच काव्यप्रकारात मोडते. :)

In reply to by मदनबाण

गंगाधर मुटे Tue, 12/07/2010 - 22:43
फारच सुंदर भजन आहे हे. या काव्यप्रकाराबद्दल माझा पण तसा फारसा अभ्यास नाहीये. फक्त जुजबी ओळख तेवढी आहे. हा काव्यप्रकार संत एकनाथांनी खूप चांगल्या तर्‍हेने हाताळला. कदाचित सर्वात जास्त गौळणी त्यांनीच लिहिल्या असाव्या. "आज गोकुळात रंग खेळतो हरी" आणि "किती सांगू मी सांगू कुणाला" ह्या कविता/गीते गौळण या प्रकारातच मोडणार्‍या आहेत. कवी उत्तमकुमार रचित आणि गोदावरी मुंढे यांनी गायलेल्या गौळणींची कॅसेट मागे महाराष्ट्रभर खूप गाजली होती. "वाजवितो पावा कृष्णमुरारी, वेडी झाली राधा ऐकून बासरी" हे गीत मला खूप आवडले होते.

स्वानन्द Wed, 12/08/2010 - 19:00
नेहमी प्रमाणेच एकदम मस्त! >>गुपचिप आला हा उघडोनी ताला ताला म्हणजे काय? >>झोपेमधी होते याने रंग टाकीला इथे 'झोपेमधी होता याने रंग टाकीला' बरोबर वाटेल असं वाटतं.