वंचना

नगरीनिरंजन जनातलं, मनातलं
उलुशा वरणभातात सिंधुताईंनी रात्रीचं जेवण आटोपलं, भांडी विसळली, सकाळी भिजवून ठेवलेली मटकी उपसून पंचात बांधून ठेवली आणि चिमूटभर बडीशेप खाऊन त्या पुढच्या खोलीत आल्या. नेहमीच्या सवयीने टीव्ही लावून त्या कोचावर बसून थोड्याशा सैलावल्या. आपले थकलेले पाय ताणून आणि भेगाळलेल्या टाचा एकमेकींवर टाकून चाळशीच्या वरच्या काचेतून टीव्हीकडे निर्विकार चेहर्‍याने त्या पाहू लागल्या. क्षण दोन क्षणांतच त्याचं मन अलगद टीव्हीच्या पडद्यावरून उडालं आणि पुन्हा रवीचा विचार करू लागलं. हा हा म्हणता महिना सरला सुद्धा येतोय असा फोन येऊन. उद्या तो येणार. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून जीवापाड केलेले कष्ट आणि गेल्या चार वर्षात त्याची वाट पाहून पाहून डोळ्यांना आलेला शीण उद्या फिटणार. माझा रवी इतका मोठा झाला, शिकला, इंजिनिअर झाला, परदेशात जाऊनही शिकला, पोरानं सोनं केलं आईच्या कष्टांचं. खूप समाधानाची लाट अंगावर आल्यासारखे वाटून त्यांनी डोळे मिटले. आधीच सुखाने जडावलेल्या मनाला भूतकाळातील शेलक्या आठवणींनी गुदगुल्या करून त्या हसवू लागल्या. इंजिनिअरिंगला होस्टेलला राहायचा. एका छोट्या शहरात वाढलेला पोरगा, ना त्याला कोणी सोबतीला ना कोणी काही सांगायला पण किती पटकन रूळवलं त्याने स्वत:ला नव्या जगात. मुळातच हुशार. सगळं स्वतःच झटपट शिकला. कधी घरी येऊन कसली तक्रार म्हणून नाही. शनिवार-रविवार यायचा घरी अभ्यास नसेल तेव्हा आणि कौतुक करून घ्यायचा. आवडीची मटकीची उसळ नसली केली की लटकं रागवायचा, पण समजुतीने आहे ते खायचा. होस्टेलवर सगळी मुलं तुटून पडतात म्हणून भला मोठा डबाभर चिवडा-लाडू घेऊन जायचा. आई तुझ्या हाताच्या चवीला सर नाही म्हणायचा. सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज करूनही फर्स्टक्लास कधी सोडला नाही त्याने. इथेही शाळेत असताना किती हुशार म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या शिक्षकांकडून त्याचं कौतुक ऐकताना हृदय कसं भरून यायचं. इवलासा होता, पाचवीत. छोटीशी निळी चड्डी आणि पांढरा शर्ट घालून पाय पुरत नसतानाही सायकलवर जायचा शाळेत. कसा जात असेल तेव्हा? त्या आठवणीने त्यांना गलबलून आले आणि बंद केलेल्या पापण्यांच्या खालच्या कडेला उष्ण पाणी जमा झाले. इच्छा नसतानाही दलदलीत रुतावं तसं त्यांचं मन आणखी खोल खोल भूतकाळात जाऊ लागलं. वर्षाचाही नसेल रवी तेव्हा हे गेले. त्यांच्या बंद डोळ्यासमोर ते दृष्य लख्ख उभे राहिले. इथेच भिंतीला टेकून बसल्या होत्या त्या. तेव्हा कोच नव्हता घरात. समोर त्यांचं पार्थिव ठेवलेलं आणि मांडीवर बसून किंचाळत रडणारा रवी. शेजारी-पाजारी जमा झालेले. गर्दीतून वाट काढत माई आणि विनायक आले. दारात उभी राहून माईने किती तिरस्काराने पाहिले त्यांच्याकडे. माईची ती नजर आठवून सिंधुताईंनी खाडकन डोळे उघडले. मंद सुगंधीत झुळकीमध्ये मध्येच गटाराचा वास यावा तसा त्यांचा चेहरा आक्रसला. माई...तिच्याबद्दल हाडात मुरलेला द्वेष थोडावेळ पुन्हा जुन्याच त्वेषाने धगधगला आणि मग नेहमीच्याच असहाय्यपणे डोळ्यातून पाणी होऊन वाहू लागला. सिंधुताईंचं मन कृष्णविवरात अडकल्याप्रमाणे वेगाने भूतकाळात खेचलं गेलं. त्या एकदम लहानच होऊन गेल्या. पानसरे गल्लीतलं आप्पांचं घर त्यांना आठवलं. दोन मजली,रस्त्याच्या बाजूला लोखंडी गजांची लाकडी गॅलरी असलेलं. तो मधला चौक, आप्पांची खोली, स्वयंपाकघर, पुढची खोली, तिथे लावलेला आईचा फोटो. आईला नेहमी फोटोतच पाहिलेलं. जेमतेम वर्षाची असेन तेव्हा आई गेली. पण तिचा वावर, तिचा सुगंध नेहमीच दरवळत राहिला त्या घरात. माई आल्यावरसुद्धा आईच्या फोटोसमोर उभं राहून डोळ्यांच्या कडा पुसताना पहिलं होतं आप्पांना कितीदातरी. आप्पांची किती लाडकी होते मी! बेब्या म्हणायचे मला लाडानं. पण माईनं सगळं ताब्यात घेतलं आणि सगळंच बदललं. कोणालाच कळणार नाही असं दु:ख द्यायची ती. वरकरणी अगदी कौतुक करायची, सिंधुराणी म्हणायची पण दोघी एकट्याच असल्या की मग लागट बोलायची. आईबरोबरच का नाही उलथली असं म्हणायची. आईचे दागिने एकेक करून मोडून पुन्हा नवे घडवले तिने. आई ने लावलेला चौकातला पारिजातही तोडला. फुलांची घाण होते म्हणायची. कधी सुखाने दोन घास खाऊ दिले नाहीत की चांगलंचुंगलं लेऊ दिलं नाही. चेहर्‍यावर कधी हसू दिसलं की तिचा तिळपापड व्हायचा. एखाद्याच जहरी वाक्याने ते हसू करपवून टाकायला तिला कोण असुरी आनंद व्हायचा. विनायक झाल्यावर मोठी बहिण, ताई आहेस ना तू वगैरे बोलून सगळ्यांसमोर कित्येक त्याग करायला भाग पाडलं तिने. बाहेरच्यांसमोर, मैत्रिणींसमोर कृतक्कौतुकाने बोलायची पण त्यातही जहरी प्रचारच असायचा. पिक्चरला वगैरे नेण्यासाठी मैत्रिणी आल्या की नाही म्हणता यायचं नाही तिला. मग "अगं ती मी घेतलेली अंजिरी साडी नेस आज. आणि त्याला मॅचिंग कानातले काढून ठेवलेत मी ते घाल. आमच्या सिंधूराणीची फार काळजी घ्यावी लागते मला. अंमळ वेंधळीच आहे आमची वेडाबाई." असं म्हणायचं. असं बोलून बोलून खरंच वेंधळी करून टाकली तिने. स्वयंपाकघरात अवघड कामे सांगणे आणि कापलं किंवा भाजलं की कुत्सितपणे हसणे, मुद्दाम आप्पांसमोर उपचार करताना "वेंधळी ग बाई वेंधळी" म्हणणे, जेवताना मुद्दाम विनायकाला "अरे अजून एक पोळी घे. सिंधूताई पाहा मुलगी असून तीन-तीन पोळ्या खाते" असं म्हणणे. एक ना हजार तर्‍हा. सगळं बालपण तर करपलंच पण तारूण्याचं तर वारंही लागू दिलं नाही या बाईनं. पुन्हा त्वेषाने सिंधूताईंचा जबडा ताठरला, पण दोनेक क्षणांनी एक हताश सुस्कारा टाकून त्या शेवटी उठल्या. टीव्ही आणि लाईट बंद करून पलंगावर पडल्या. अंधारगुडुप केल्यावर तरी आपले विचार आपल्याला दिसणार नाहीत अशी एक वेडी आशा त्यांना चाटून गेली. पण अंधाराच्या पार्श्वभूमीवर गतआठवणींचा चित्रपट आणखीच ठळक होत गेला. आप्पा गेल्यावर तर तिच्या अधिकाराला काही आव्हानच उरलं नाही. शिवाय इतकी वर्षं तिला लाडात वाढवली असा लोकांचा व्यवस्थित गैरसमज झालाच होता. मग काय घरी राहणं हीच एक शिक्षा होऊन गेली. पण ती काही काळच टिकली. बीए फायनलला असतानाच माईने तिचा एक दूरचा भाचा पाहून लग्न ठरवूनही टाकलं. एखाद्या फुलासारख्या असलेल्या सिंधुला एका कळकट, कळाहीन कावळ्याच्या गळ्यात बांधून दिली तरी सिंधूला बरंच वाटलं. आप्पांचं घर दुरावलं याचं वाईट वाटत असलं तरी स्वत:चं जग निर्माण करायची स्वप्नं होती. पण तिथेही नियतीने डाव साधलाच. लायकी नसताना मिळालेल्या रत्नाबद्दल आनंद वाटण्याऐवजी असुरक्षितताच माणसाचा आनंद कसा कुस्करते याचं जीवघेणं उदाहरणच नियतीनं दाखवून दिलं. ते सगळे अपमानाचे, गलिच्छ भाषेचे, मारहाणीचे किळसवाणे प्रसंग पुन्हा एकदा अनुभवून सिंधुताई शहारल्या. डोळे गच्च मिटून घेऊन त्या प्रतिमा मनःपटलावरून पुसण्यासाठी धडपडत राहिल्या. तरी ती चित्रं एकामागून एक येऊन आदळत राहिली. नवर्‍याचा अकाली मृत्यु, एक वर्षाच्या पोराला अगतिकपणे पुन्हा माईकडेच ठेवून नोकरीसाठी केलेली वणवण, ती गॅस गोडाऊनमधली कारकुनाची नोकरी, संध्याकाळी रवीला आणायला माईच्या दारात लाचारपणे जाऊन उभं राहणे, तिथेच दिवसभर जमिनीवरच रांगणारा, कधी कधी दोन दोन तास घाण झालेलं दुपटं तसंच अंगावर वागवणारा रवी. दु:खाचे एकामागून एक येणारे कढ सहन करीत कधीतरी उत्तररात्री त्यांचा डोळा लागला. सकाळी सवयीनेच सहा वाजता त्यांना जाग आली. शरीरात मरगळ साचून राहिली होती पण रवीच्या आठवणीने मनाला पुन्हा उभारी आली. लगबगीने त्या उठल्या. प्रातर्विधी आटपून, छान पैकी आंघोळ करून मग त्यांनी पुढचे दार उघडले. भरपूर पावसाळी, सादळलेल्या रात्रीनंतर ऊन पडावं तसं त्यांना सकाळचं ऊन वाटलं. आठ वाजतच आले होते. काल रात्री दोन वाजता मुंबईत उतरणार म्हणाला होता रवी. त्यानंतर सहा-सात तासांचा प्रवास म्हणजे आठ-नऊला पोचेन म्हणाला होता. त्या उगीचच गॅलरीत येऊन उभ्या राहिल्या. दोन्ही हात सिमेंटच्या कठड्यावर टेकवून थोडं वाकून गल्लीच्या दोन्ही टोकांकडे आलटून पालटून पाहू लागल्या. आत्ता अशी झोकात गाडी शिरावी गल्लीत, आपल्या चाळीसमोर थांबावी, त्यातनं देखणा रवी उतरावा ऐटीत आणि मग सगळ्यांनी त्याच्याकडे आणि आपल्याकडे कौतुकाने पाहावं असं त्यांना उत्कटतेनं वाटलं. त्या दहा-पंधरा मिनीटं चिकाटीनं वाट पाहत राहिल्या पण गल्लीत काहीही नवी घटना घडली नाही. संडासांसमोरच्या रांगा, दात घासणारे बायका-पुरुष आणि सकाळी सकाळी कामाला निघालेले लोक हे पाहून पाहून कंटाळा आल्यावर नाईलाजाने त्या आत आल्या. तो येईपर्यंत कामं तरी उरकून टाकावीत या विचाराने स्वयंपाकाला लागल्या. मन लावून सगळा स्वयंपाक केला. त्याला आवडतात म्हणून शेंगदाणे-खोबरं घातलेली मटकीची उसळ, शेवयांची दाट खीर, तूप लावलेल्या मऊ घडीच्या तीन-तीन पदर सुटणार्‍या पोळ्या एवढं करेपर्यंत बारा कधी वाजले कळालंच नाही. भांडीही घासून झाली, सगळं आवरून झालं, एक वाजला. अजून पोराचा पत्ता नाही, काही फोनही नाही. नसत्या शंकाकुशंकांनी त्यांचं मन भरून गेलं. धडधडत्या हृदयाने हातात मोबाईल गच्च धरून त्या उगाचच आतबाहेर करत राहिल्या. दोन वाजता मात्र त्यांचा संयम संपला. पण काय करावे त्यांना कळेना. कोणाला फोन करून चौकशी करता येईल का? पण विचारायला त्याचा फ्लाईटनंबर सुद्धा माहिती नाही. कोणत्या गाडीने येणारे,मुंबईत पोचला की नाही,कोणत्या रस्त्याने येणारे काहीच तर माहिती नाही. त्या हतबुद्धपणे पुढच्या खोलीत मध्येच उभ्या असताना खाली हॉर्न वाजला. जीव भांड्यात पडल्याचा मोठ्ठा सुस्कारा सोडून त्या गॅलरीत धावल्या. एक पांढरी सुमो चाळीसमोर उभी होती. चाळीकडच्या बाजूचे दार उघडले आणि त्यातून रवी बाहेर आला. कित्ती वाळला आहे म्हणेपर्यंत त्याने वर पाहिले आणि हसून त्यांच्याकडे पाहून हात हलवला. त्यांनीही उत्साहाने हात हलवला आणि डोळ्यातल्या पाण्याने धूसर झालेल्या नजरेनेच लोक कसे कौतुकाने पाहत आहेत ते टिपण्याचा प्रयत्न केला. डोळे पापण्यांनीच टिपत त्यांनी खाली पाहिलं तेव्हा रवी गाडीच्या मागच्या भागातून बॅगा काढत होता. त्याला मदत करताना विनायकला तिथे पाहून कोणीतरी फाडकन मुस्कटात मारावी तसं सिंधुताईंचं तोंड एकदम उतरलं. ते दोघे बॅगा घेऊन वर आले. त्यांच्याकडे कोर्‍या नजरेने पाहत विनायकने बॅग आत ठेवली आणि रवीच्या पाठीवर थाप मारून "येतो रे" म्हणून तो झपाट्याने निघून गेला. रवीने वाकून नमस्कार केला तरी त्याच्या डोक्यावर हात ठेवायचं भान सिंधुताईंना उरलं नाही. संताप, द्वेष, आश्चर्य, दु:ख या सगळया भावनांच मिश्रण त्यांच्या मनात थैमान घालू लागलं होतं. रवीने आई म्हणून हाक मारल्यावर त्या भानावर आल्या. कसंनुसं हसून त्यांनी हात उंचावून त्याच्या गालावरून हात फिरवला. "उशीर झाला रे बाळा." "हो ना आई, अगं विनूमामा आणि माईआजी नं... " "ते कुठं भेटले तुला?" "अगं, ती एक गंमतच झाली. एअरपोर्टवरून बाहेर पडतो तर विनूमामा समोर उभा सुमो घेऊन. खास घ्यायला आलोय म्हणे तुला" "पण त्याला कसं कळालं तू कधी येतोय ते?" सिंधुताईंचा आवाज हळूहळू तीक्ष्ण होऊन चिरकायला लागला होता. "अगं मीच सांगितलं होतं त्याला फोनवर." "म्हणजे तू त्यांना फोन केलास?", सिंधुताई जवळजवळ ओरडल्याच. "हो मग काय झालं आई? त्यांचाच आला होता आधी मला एकदोनदा फोन. माईआजी फार छान बोलली बघ. आपणही झालं गेलं विसरून जाऊ या ना आता?" "काय?", क्षुब्धतेनं सिंधुताईंचा शब्द फुटेनासा झाला. खरं तर त्यांना ताडताड बोलायचं होतं. काय काय विसरू असं विचारायचं होतं, सगळी त्यांच्या कृष्णकृत्यांची यादी त्याच्या पुढे वाचायची होती. पण त्यातलं त्यांना काहीही करता आलं नाही. रवी बॅगा नीट कोपर्‍यात ठेवताना पाहात त्या तशाच घुसमटत राहिल्या. स्वतःच्या असहाय्यतेची त्यांना एकाच वेळी चीड आणि कीवही आली. तरी आल्या आल्या रडारड नको म्हणून त्यांनी महत्प्रयासाने स्वतःला आवरले. पटकन पदराने डोळे पुसत त्यांनी आपला चेहरा हसरा केला. "असो. चल तू आता दमला असशील, भुकेला असशील. फ्रेश हो. मी वाढते तोपर्यंत. तुझ्या आवडीची मटकीची उसळ केलीये.", उसन्या उत्साहाने पदर खोचत त्या म्हणाल्या. रवी एकदम ओशाळवाणा झाला. खाली मान घालून अजिजीच्या स्वरात म्हणाला," अगं, मी लगेच इकडेच येणार होतो पण विनूमामाने इतका आग्रह केला की मला मोडवला नाही. तिकडेच घेऊन गेला आधी तो. आणि माईआजीनंही इतका आग्रह केला की बस. मला तिथे खावंच लागलं. त्यामुळे आत्ता भूक नाही गं. पण मी संध्याकाळी जेवेन ना. आलोच मी फ्रेश होऊन". एवढं म्हणून तो त्यांची नजर टाळून पटकन टॉवेल घेऊन बाथरूमकडे पळाला. त्या त्याच्याकडे पाहात होत्याही आणि नव्हत्याही. नुकतंच बांधलेलं नवं कोरं घर लुटावं तशी त्यांची नजर वैफल्याच्या भावनेने रिती झाली. वेड्या संतापाने मोठ्या झालेल्या त्यांच्या डोळ्यांमध्ये लाल शिरांच्या तारा गांडूळांच्या प्रजेसारख्या पसरू लागल्या. स्वतःच्या ही नकळत त्या स्वयंपाकघरात गेल्या. ताट घेऊन कट्ट्यावर ठेवलं. भरून येणार्‍या डोळ्यांनी प्रयत्नपूर्वक पाहात एकेक पदार्थ वाढून घेतला. ताट उचलून त्यांनी टेबलावर ठेवलं आणि खुर्चीच्या पाठीवर दोन्ही हात गच्च धरून काही क्षण उभ्या राहिल्या. एक क्षणभर त्यांनी डोळे मिटले आणि मग अचानक दु:खाच्या लाटांनी उन्मळून पडाव्या तशा त्या अनावरपणे गदगदून रडू लागल्या.
वर्गीकरण

33 टिप्पण्या 6,167 दृश्ये

Comments

यकु नवीन

विनूमामाला एखादी पोरगी असावी ;-) थोडक्यात कथा संपवलीत..अजून येऊंद्या ना..

चित्रा नवीन

पांढरपेशा कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातील अशा दाहक वास्तवाचे चित्रण चांगले केले आहे. अशा परिस्थितीतील व्यक्तीने काय करायला हवे? हा प्रश्न होऊ शकत नाही. लहानपणीच जर विरोध केला असता तर आज सिंधुताईंसारख्या व्यक्तींवर ही वेळ आली नसती असे वाटते. अर्थात एकदा विरोध केला तर तो करणे किती सोपे असते याचा अंदाज सिंधुताईंना येईल, पण ती पहिली पायरी ओलांडायलाच लोक तयार होत नाहीत.

रेवती नवीन

In reply to by चित्रा

एकदा विरोध केला तर तो करणे किती सोपे असते भयंकर सहमत. आपण एखाद्या न पटणार्‍या गोष्टीबद्दल शब्दही न उच्चारता गप्प का बसतो? स्प्ष्टपणे नाराजी व्यक्त करायला काहीच हरकत नाही असे वाटते. तसेही विधवांना (सधवांनाही) जिणे काही साधे नसायचेच. इतर गोष्टींशी मुकाबला आयुष्ञभर असतोच ना. मग आता तरी मुलाचा कान पकडून सांगावे बाईंनी!

नगरीनिरंजन नवीन

In reply to by रेवती

खरं आहे. पण लहानपणापासूनच सातत्याने आलेल्या वाईट अनुभवांमुळे अशा लोकांचा आत्मसन्मान गंभीररित्या कमी झालेला असतो. शिवाय एक प्रकारची स्वकरूणेची भावना निर्माण होऊन दु:खाशी लढण्यापेक्षा दु:ख कुरवाळण्यात एक प्रकारचा सॅडिस्टिक आनंद मिळत असावा बहुतेक. कथा आवडली हे सांगणार्‍या सर्वांचेच आभार!

गवि नवीन

In reply to by रेवती

सहमत. आनंद मिळतो म्हणा किंवा लढ्ण्याची इछाशक्ती मरून जाते म्हणा. बादवे. सॅडिस्टिक ऐवजी या संदर्भात मासोचिस्टिक शब्द हवा. कथा सुंदर..

मनीषा नवीन

In reply to by नगरीनिरंजन

दु:खाशी लढण्यापेक्षा दु:ख कुरवाळण्यात एक प्रकारचा सॅडिस्टिक आनंद मिळत असावा बहुतेक. मला असे वाटत नाही . अर्थात या कथेचे तुम्ही लेखक असल्याने तुम्ही त्यावर जास्त अधिकाराने लिहू शकता . पण ही कथा वाचताना मला जाणवली ती सिंधुताईंची हतबलता , आपण काहीच करु शकत नाही याची वेदनादायक जाणीव, आणि त्यातून येणारी त्यांची विफलता. प्रतिकार , विरोध करणे प्रत्येकासाठी तितकेसे सोपे नसते . अर्थशास्त्रा मधे कुठलाही लॉ लिहिताना त्याची assumptions लिहीतात. This law is true if ... all other things remain constant for everyone and for all the time . जे कधीच खरं नसतं . कथा आवडली हे वे.सां. न.

नगरीनिरंजन नवीन

In reply to by मनीषा

तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. >>मला जाणवली ती सिंधुताईंची हतबलता , आपण काहीच करु शकत नाही याची वेदनादायक जाणीव, आणि त्यातून येणारी त्यांची विफलता सिंधुताईंच्या मनाची हतबलता, काहीच करू न शकण्याची भावना आणि त्यातून त्यांना सगळं विफल वाटणे हेच ठळकपणे दिसतं. आपण आजूबाजूला अशा स्त्रियाही पाहतो बर्‍याचदा. त्यांच्याबद्दल कणवही वाटते आणि महत्त्वाचं म्हणजे त्या स्त्रियांनाही स्वतःबद्दल कणव वाटत असते. प्रत्यक्षात या सर्व त्यांच्या मनातल्या भावना असतात. त्यांच्या सुखाच्या कल्पना नेहमी दुसर्‍यांच्या वागण्याशी निगडीत असतात. सिंधुताईंना माईमुळे दु:ख सहन करावं लागलं म्हणून रवीने एका विशिष्ट पद्धतीने वागावं या गैरवाजवी अपेक्षेतूनच हे दु:ख निर्माण झालं आहे. रवीला स्वतःचे अनुभवविश्व आहे आणि त्यात सगळा भूतकाळ आईकडून ऐकूनही कदाचित माईला इतकं वाईट स्थान नसेलही हे त्या ध्यानात घेत नाहीत. आपल्या आयुष्याला आपणच जबाबदार आहोत, आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे आणि आपल्याला जे हवं आहे ते लढूनच मिळवावे लागते असा विचारच कमी आत्मसन्मानामुळे नसतो आणि मग वाईट वागणार्‍या माणसाला खलनायक आणि स्वतःला बिचारं समजून दु:ख कुरवाळायची सवय लागते. अर्थात हा सगळा विचार करून मी कथा लिहीली नाही. आजूबाजूला असणार्‍या काही स्त्रिया आणि काही ऐकीव/वाचलेल्या गोष्टींतून हे चित्र निर्माण झालं.

स्वानन्द नवीन

खूप छान लिहीले आहे. वाचताना सिंधूताईंचे आयुष्य आपण जगतोय असं वाटलं, त्यांची दु:खं,कष्ट, आशा, अपेक्षा, वैफल्य, अगदी प्रत्येक गोष्ट खूप तोडक्या शब्दांत पण तितक्याच ताकतीने मांडली आहे. खूप छान!

रन्गराव नवीन

लेखकाचं नाव नगरीनिरंजन हे बघून आत काही तर मस्त विनोदी असणार म्हणून वाचायला सुरवात केली. मनानं हसण्याची तयारी केली होती आणि तुम्ही त्याला रडवण्याची. डोळ्यातन पाणी येनं फक्त बाकी राहिल आहे. अजून काय पावती देणार? :)

राजेश घासकडवी नवीन

घटनांचा -विचारांचा वेग-आवेग कायम राखलेला आहे. उतारवयीन मध्यमवर्गीय स्त्रीच्या आयुष्यातला शेवटचा आधार खिळखिळा व्हायला सुरूवात होण्याचं चित्रण चांगलं जमलेलं आहे. वर प्रेम दाखवून दुष्टपणा करण्याची वर्णनंही छान आहेत. सासवा-सुना, जावा-जावा, नणंदा-भावजया यांच्यातली वैरं ही अशाच न बदललेल्या दुपट्यांमधून उफाळून येतात. इथे अधिकाराने तिची आईच असल्यामुळे बालपण कोमेजून टाकून लिबलिबित कण्याच्या बनवण्यात माई यशस्वी झाल्या आहेत. कथेच्या शेवटी या कण्यावर आणखीन एक आघात होतो. तो पूर्णपणे मोडून पडला असता तर आणखीन परिणामकारक झाली असती असं वाटतं. आणि मटकीची उसळ तर निश्चितच सांडायला हवी होती.

चित्रा नवीन

In reply to by राजेश घासकडवी

का तुमच्या मते कथेत मसाला थोडा जास्त पडला का? मला असे वाटले नाही. वर प्रेम दाखवून दुष्टपणा करण्याची वर्णनंही छान आहेत. सासवा-सुना, जावा-जावा, नणंदा-भावजया यांच्यातली वैरं ही अशाच न बदललेल्या दुपट्यांमधून उफाळून येतात. एखादा लेख/कथा आवडला/आवडली नसला/नसली, तर तसे लिहावे. आवडला/आवडली असे सांगून थट्टा करण्याचे प्रयोजन कळले नाही.

राजेश घासकडवी नवीन

In reply to by चित्रा

मी थट्टा केली असा आपला समज का झाला हे कळलं नाही. कथेतली वर्णनं आवडली असंच म्हणण्याचा प्रयत्न करत होतो. घरगुती कलहांमध्ये अशा बारक्यासारक्या गोष्टींतून वार केले जातात हे कथेत चांगलं टिपलं आहे. न बदललेलं दुपटं, लग्नप्रसंगी मिळालेली स्वस्तातली साडी, नेमक्या आपल्या गरजेच्या प्रसंगी त्यांच्या घरी काहीतरी काम निघणं... अशा घटनांतून जाणीवपूर्वक दुर्लक्ष व अपमान दिसून येतो किंवा दाखवून दिला जातो. कथेच्या ज्या मर्यादा जाणवल्या, किंवा ज्या गोष्टी खुलवल्याने कथा मला अधिक भावली असती, तेही स्पष्ट लिहिलं आहे. तुमचा गैरसमज झाला, लेखकाने करून घेऊ नये ही विनंती.

स्वानन्द नवीन

In reply to by राजेश घासकडवी

स्पष्टीकरण केलंत ते बरंच झालं. गैरसमज वेळीच टळलेले बरे. मला देखील चित्राजींना वाटलं तसंच काहीसं वाटलं होतं.

नगरीनिरंजन नवीन

In reply to by राजेश घासकडवी

>> तो पूर्णपणे मोडून पडला असता तर आणखीन परिणामकारक झाली असती असं वाटतं. आणि मटकीची उसळ तर निश्चितच सांडायला हवी होती. हे जरा मेलोड्रामॅटिक वाटल्याने यात उपरोध असावा असं वाटलं खरं, पण तुम्ही नेहमीच आमच्यासारखं भावनेच्या भरात प्रतिसाद न देता विचारपूर्वक आणि स्पष्ट भाषेत विचार मांडता हे माहिती असल्याने तो विचार झटकून टाकला होता. कथा आवडली हे वाचून आनंद वाटला. धन्यवाद.

गुंडोपंत नवीन

कथा छान जमली आहे. इच्छा नसतानाही दलदलीत रुतावं तसं त्यांचं मन आणखी खोल खोल भूतकाळात जाऊ लागलं. मस्त! शब्दांकन चित्रदर्शी आहे. कथेत कारुण्य असले तरी अंगावर येणारे नाही. अजून पॅरेग्राफ करायला हवे होते असे वाटले. असो, या धर्तीवरची एक कथा जी. ए. ची पण आहे का? मला नक्की लेखक आठवत नाही. पण त्यात बहीण, आई, मुलगा,आणि त्याचे लग्न या संदर्भात भूतकाळाचा असलेला ताण याचे सुरेख चित्रण होते. नगरीनिरंजन छान लिहिताय, अजून हवे. कथा-माला आली तर फार आवडेल!

गणेशा नवीन

खरेच खुप छान लिहिली आहे कथा ... एक स्त्री .. तीचा केवीलवाना प्रवास ... परावलंबत्व झेलुन स्वप्नांची राख नाही परंतु तरीही अस्तित्वाचे चटके सहन करुन काळकुट्ट झालेले आयुष्य .. आणि तरीही आशेच्या एका झोताने ही फुंकर मारुन तुम्हा आयुष्याच्या निखार्याला आगीचे दाहक अस्तित्व दाखवले आहे. एकदा का परावलंबनाची .. मन मारुन न्हेन्याची सवय लागली .. की स्वताचे मन मारुन शेवट पर्यंत झुरनारी अनेक माणसे मी पाहिली आहे.. केविलवाने त्यांचे आयुष्य का आणि कशा साठी ? हे प्रश्न निर्मान होतात्च ... ही कथा ही त्याच चित्रणावर आधारीत आहे असे वाटले ... --- तुमच्या कविताच वाचल्या होत्या ... पहिल्यांदाच कथा वाचली ... खुप आवडली .. चित्र निर्मिती निर्मान करण्याची ताकद आपल्या शब्दात आहे .. असेच लिहित रहा ...

उपास नवीन

ननि, कथा आवडली.. प्रसंग, तपशील छान मांडलेत आणि कथेचा वेगही उत्तम.. अवांतरः रविलाही सिधूताईंसारखी आपल्या माणसांपासून झळ लहानपणापासून बसलेली असण्याची शक्यता आहेच, तरीही तो 'मुव्ह ऑन' म्हणतोय हे तितकंस वाईटही नसेल.. अर्थात सगळ्म खूप वैयक्तिक आहे पण रविसारख्या क्षितिजं विस्तारलेल्या माणसानेआणि परदेशात गेल्यावर माणसांची नव्याने किंमत कळलेल्या माणसाने जुन्या कलहांचे ओझे वर्षानुवर्षे आणि पिढ्या न पिढ्या न वागवता माणसं जोडण्याचा प्रयत्न केला तर ते ठार चूक नसावे.. नाण्याची दुसरी, झालच तर तिसरी बाजूही असतेच :) मागचं काय पुढे घेऊन जायचं ते ज्याचं त्याने ठरवायचं.. अजून एक म्हणजे माझे इतरांशी जे संबंध आहेत ते अग्दी तस्सेच्या तसे,चांगल्या-वाईटासकट, मुलांनीही ठेवावेत असं म्हणणं म्हणजे भावनिक गुलामगिरीच नव्हे काय, त्यांना त्यांचे स्वतंत्र निर्णय घ्यायला तसेच नाती विणायला, जोपासायला द्यायला हवीतच.. त्यांच्या निर्णयक्षमतेवर आपला विश्वास हवा.. मार्गदर्शन जरुर करावे पण लुडबूड नको.. :)

मस्तानी नवीन

In reply to by उपास

नगरीनिरंजन, कथा खूपच आवडली ... फेसबुक च्या स्टेटस ची टेर खेचणारी सही कथा लिहिणारे तुम्ही आणि ही हृदयस्पर्शी कथा लिहिणारे ही तुम्हीच ... कमाल आहे ! आणि उपास, तुमचं अवांतर कथेइतकच आवडलं !

पक्या नवीन

In reply to by उपास

निरंजन साहेब कथा आवडली. लेखन शैली ही खूपच छान आहे. वर उपास यांनी लिहीले आहे - >> माझे इतरांशी जे संबंध आहेत ते अग्दी तस्सेच्या तसे,चांगल्या-वाईटासकट, मुलांनीही ठेवावेत असं म्हणणं म्हणजे भावनिक गुलामगिरीच नव्हे काय, त्यांना त्यांचे स्वतंत्र निर्णय घ्यायला तसेच नाती विणायला, जोपासायला द्यायला हवीतच. माझ्या मते सिंधूताईंची ह्या गोष्टीला ना नसावी. कारण त्या तेवढ्या परिपक्व वाटत आहे. माईने मुद्दामच हा डाव खेळलेला आहे. सिंधू ताईंना त्रास देण्याच्या हेतूने आता त्या त्यांच्या मुलाला आपल्याकडे वळवू पाहत आहे त्यासाठीच मुद्दाम विनायक रवीला घ्यायला आला. तसे नसते तर विनायक त्याला घ्यायला येउन सुध्दा त्याने रविला आधी त्याच्या घरी सोडले असते आणि मग स्वतःच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले असते. अशा प्रकारच्या सामान्य परीस्थितीत कोणीही तसेच वागेल. मला वाटते की सिंधू ताईंना ह्या गोष्टीचे वाइट वाटले असावे की माईचा डाव त्यांना स्वतःला तर समजत आहे पण मुलाच्या ते लक्षात येत नाही आणि त्या स्वतः मुलाला ते पटवून देऊ शकत नाही.

शिल्पा ब नवीन

In reply to by पक्या

वाटते की सिंधू ताईंना ह्या गोष्टीचे वाइट वाटले असावे की माईचा डाव त्यांना स्वतःला तर समजत आहे पण मुलाच्या ते लक्षात येत नाही आणि त्या स्वतः मुलाला ते पटवून देऊ शकत नाही. +१००%

पैसा नवीन

सिंधुताईंच्या जणू काही अंतरंगात शिरून कथा लिहिली आहे. खूप सहृदयतेने चित्रण केलंय. त्यामुळे रवीचं वागणं कोणाला खटकलं असेल तर ते चूक म्हणता येणार नाही. जगात असल्या गोष्टी घडत असतात. खूप स्त्रियांवर अजूनही असे प्रसंग येत असतात. पण एवढ्या कष्टाने मुलाला मोठं केल्यानंतर असं काही घडावं ही सिंधुताईची व्यथा काजळाला भिडली. नगरीनिरंजन, या कथेसाठी १००/१०० मार्क्स! जसे बंडूच्या कथेसाठी घेतले होते! दोन्ही कथा संपूर्ण वेगळ्या माणसानी लिहिल्यात असं वाटावं इतक्या छान जमल्यात.

आळश्यांचा राजा नवीन

आमच्या स्वतःच्या आयुष्यात अशाच प्रकारचा प्रसंग घडला असल्याने याला `परफेक्ट' वर्णन म्हणू शकतो. (दि मोस्ट पर्सनल एक्स्पिरियन्सेस आर द मोस्ट जनरल वन्स!) लेखकाने उपप्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, आणि उपासरावांनी अवांतरात म्हणल्याप्रमाणे, एका पिढीची दु:खं नवीन पिढीनं कारण नसताना पुढं नेण्याची अपेक्षा केली तर दु:ख अजूनच वाढणार आहे. त्याला कुणाला वंचना म्हणायचं असेल तर कुणाचाच इलाज नाही. रवीला कदाचित विनू पुन्हा फसवीलही. पण रवीला त्याला बेनिफिट ऑफ डाउट द्यायचा असेल तर तो त्याचा चॉइस आहे. आईचं मन सांभाळण्यासाठी विनूला थारा न देणे हाही त्याचा चॉइस असू शकतो. पण त्याला त्याचे निर्णय घेऊ द्या ना. पर्सनली मला वाटतं - विनूबद्दल अढी वगैरे न ठेवणे ही एक गोष्ट झाली. मुव्ह ऑन वगैरे ठीक आहे. पण त्याच्याशी पुन्हा संबंध जोडणे ही अपरिहार्य गरज नसेल, तर आईचं मन समजून विनूशी संबंध न ठेवणे हे माणुसकीला अधिक धरून आहे. या कथेतला रवी तेवढा प्रगल्भ वाटत नाही. आणि खरी वंचना तीच आहे. आईचं मन समजून घेता येत नाही या मुलाला. इथे भावनिक गुलामगिरीचा प्रश्न येत नाही. आईचं दु:ख (पुन्हा भूतकाळात जाऊन) दूर करता येणं तर शक्य नाही. मग पुन्हा त्या दु:खाला निमित्तमात्र असणार्‍यांशी संबंध नव्याने जोडून जखमेवरची खपली काढायची हा मूर्खपणातून झालेला क्रूरपणा आहे. समजूतदारपणाच्या आवरणाखालचा मूर्खपणा.

बबलु नवीन

In reply to by आळश्यांचा राजा

उत्तम प्रतिसाद आराशेठ. या कथेतला रवी तेवढा प्रगल्भ वाटत नाही. आणि खरी वंचना तीच आहे. आईचं मन समजून घेता येत नाही या मुलाला. १००% सहमत. आईचं दु:ख (पुन्हा भूतकाळात जाऊन) दूर करता येणं तर शक्य नाही. मग पुन्हा त्या दु:खाला निमित्तमात्र असणार्‍यांशी संबंध नव्याने जोडून जखमेवरची खपली काढायची हा मूर्खपणातून झालेला क्रूरपणा आहे. समजूतदारपणाच्या आवरणाखालचा मूर्खपणा. परफेक्ट.