एक विषय- तीन लेख

लेखक: रन्गराव जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
इयत्ता चौथी- विषय-" एक प्रवास" दोन आठवड्यांपूर्वी आईबरोबर मामाच्या गावी जाऊन आलो. प्रवासाला जायच म्हणून कधी नव्हे ते भल्यापहाटे उठलो. नाष्टा आवरून घरातून बाहेर पडलो. रिक्षातून जावूया असा हट्ट धरला तरीही बर स्थानक फार लांब नाही अशी समजूत घालून आईने एक मैलभर चालवल. एवढ चालून स्थानकावर पोहोचलो परत भूक लागली. पायही दुखायला लागले होते. पण सगळी नुसता धुरळा होता किंवा लोकांनी पान खावून थुंकल्यामुळे काही जागा रंगल्या होत्या. बसायला धड जागा मिळाली नाही. ताटकळत उभा रहाव लागलं. नेहमीप्रमाणे बस उशीरा येणार होती. तोपर्यंत एक मुलगा चॉकलेट विकायला आला. मी आशेन आईकडे बघितले तर आईने मला "दात किडतात चॉकलेटने" अस सुनावलं. तो गेला.. थोड्यावेळाने अजून एक काका पेप्सीकोला विकायला आले. मी आईला म्हणालो "ह्याने दात किडत नाहीत. हे घेवूयात आपण!" त्यावर- " नको सर्दी होईल सकाळी सकाळी थंड खावून. तुला फारच भुक लागली असेल तर बरोबर खायला घेतल आहे त्यातल काही तरी देवू का ?" अस तिन विचारून निराशा केली. आई मला कधी मला जे खायचा असत ते खावू देत नाही म्हणून मला तिच्याबरोबर प्रवास करायला आवडत नाही. बस यायला वेळ असल्याने मी इकडे तिकडे पहात उभा राहीलो. एक दादा डोळ्याला काळा चष्मा लावून, उंच बुट घालून, तोंडतून बिडीच्या धुराची वर्तुळ सोडत उभे होते. मला त्यांचा रूबाब फार आवडल. मोठा झाल्यावर मी पण असच करणार. फार उशीराने बस आली. पळत पळत जावून खिडकीजवळ जागा पकडली. पण बस चालू झाल्यावर लगेच झोपून गेलो. मामचे गाव आल्यावर आईने उठवलं. गुण- २/१० आणि सहामाही परीक्षेच्या उत्तर-पत्रिका घरी मिळत असल्याने घरी काय आनंद झाला असेल हे सांगण्याची गरज नाही. खर लिहल्यान शिक्षणात तोटा होतो ह्याचा हा पहिला अनुभव इयत्ता १०वी - विषय-" एक प्रवास" (जवळ्पास दोन पान लिहिली होती. तेवढ लिहायला मला , अणि तुम्हाला वाचायला अजून जास्त बोअर होईल म्हणून फक्त सारांश लिहितो आहे.) मानसाचे जीवन हा एक प्रवासच आहे. काही ना काही कारणाने प्रवास करतो आपण. प्रवास ही एक संधी असते, रोजच्यापेक्षा काही वेगळ करण्याची, काही शि़कण्याची. बस स्थानक हा शहाराचा अविभाज्य घटक असतो, कायम लोकांनी गजबलेला. त्याची स्वत:ची एक अर्थव्यवस्था असते. ती अनेकांना जगवते. बसमध्ये आपण कुणाच्या शेजारी बसताना त्याचा धर्म अथवा जात पहात नाही. प्रसंगी आपली जागा एखाद्या वयोवृद्धाला देतो. सर्वधर्म समभाव, सहिष्णुता, सामाजि़क जबाबदारी ह्या शाळेत शिकलेल्या गोष्टी आचरणात आणण्याची संधी प्रवासातच मिळते. गुण - ८/१०. उगाच जड काही तरी लिहल की प्रगती होती ह्याचा एक अनुभव. आजचा दिवस- विषय - "एक प्रवास" (भाषा जरा वांड आहे, त्रास होणार असेल तर पूढ वाचू नकात!) दिवाळीच्या दोन दिवस आधी मित्रांना भेटायला त्यांच्या गावी गेलो रेल्वेनं. त्याच दिवशी संध्याकाळी परत निघायच होतं सहाच्या रेल्वेन. पण मित्रांबरोबर दंगा करण्यात वेळ कसा निघून गेला तेच समजल नाही. कसाबसा सहा वाजता स्टेशनवर पोहचलो. गाडी काही कारणान प्लॅट्फोर्म एकऐवजी सहा नंबरला लागली होती. वेड्यासारखा पळालो पण गाडी चुकली. आता बस स्थानकावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. जीवावर आलं होतं. गेल्या पाच वर्षात एसटीनं प्रवास केला नव्हता. रोज शहारात फिरायला बाईक होती. वेळ पडलीच तर शहरात सुद्धा व्होल्व्होची सोय होती. आणि बाहेरगावी जायच तर रेल्वे, व्होल्व्हो आणि जमल तर विमान. आयटीवाले असल्यामुळे असा जंगी थाट आहे. पण काय करणार? आज घरी तर जायलाच पाहिजे. बस स्टंडवर आलो. फक्त दोन बस होत्या एक सात वाजता आणि दुसरी नऊ वाजता. अजून वीस एक मिनीटं होती. अंगात जीन्स, टी-शर्ट, पाठीला सॅक, कानात इअरफोन आणि हातात अ‍ॅक्वा फिनाची बाटली अशा आवतारत " ऑड मॅन" होऊन तिथं उभारलो होतो. दहा मिनिटात माझ्यासारखाच अवतार असलेला अजून एक नग उतरला तिथ. नजरा मिळ्ताक्षणीच जातभाई (आयटी वाले) असल्याची खात्री पटली. दोघही तिथ ईंग्रजीतून गप्पा मारत उभारलो. (मराठीत बोलायला सुरुवात केली की कमीपणा येतो आयटीवाल्यांना, म्हणून सुरुवात ईंग्रजीतन आणि मग नंतर मराठी). नितीन नाव त्याच. दोघांना एकच बस पकडायची होती. त्याला तसं माझ्यापेक्षा तासभर जास्त प्रवास करायचा होता. थोडी उशीराच बस तिथ आली. आणि आली ती फुल्ल भरूनच. नितीन म्हणाला ही राहू दे पूढच्या बसन जावूया. शेजारी उभा असलेले काका म्हणाले -" लई शाना हाईसा. हित उभं राहायला तर जागा हाय, त्या गाडीत ते बी मिळ्णार नाय. गुमान चला, नायतार रातच्यला थंडीत स्टँडवर झोपाया लागल!" आणि तो गाडीत घुसलासुद्धा आणि पटापट लोकं घुसली गाडीत. मेंढरं भरल्यासारख मानसं भरली होती गाडीत आणि ड्रायव्हरच्य केबिनमध्ये पन. आम्हाला कशीबशी दरवाज्याजवळ पायर्यांवर उभा रहायला जागा भेटली. सुटली एकदाची गाडी. स्थानकाबाहेर आली तोच चाक खड्यात आदळलं. आणि कुणाची डोकी पूढच्या शीटवर आदळली तर कुणी पूढ उभारलेल्याच्या अंगावर पडलं. जवळ उभारलेला एक गडी चिडला आन म्हणला -" डायवर खुळ्या लवड्याचा हाय, देशी चढ्वून चालावाया बसलाय!" केबीन शेजारून त्याचा असा उद्धार झालेला एकून ड्रायवरपन पेटला आणि खेकसला-" सरकार येड्या भोकाचं हाय. असा रस्ता ह्यांच्या बानं बांधला हुता! रस्त्यात खड्डा पडलाय का खड्यात रस्ता ह्ये उमजना आता. माज्या नावान कशाला खडं फोडताय भोसडीच्यांनो. सरकारला शिव्या द्या रांडेच्यांनो." रांडेच्यांनो हा शब्द ऐकल्याबरोबर गडी म्हणाला -"तू कोलापूरच दिसतायस". ड्रायव्हर- "हाय,, मग?' गडी- " आमच गावकरी म्हणा की तुमीबी!" ड्रायव्हर -" मग तिथ माग काय करतयस मर्दा, ये पूढ केबीनमध्ये निवांत बैस!" गडी -" नग, जागा नाय तिथं." " इथ लोगासनी जागा नाई आन तुमी निवांत ऐसपैस बसलाय व्हय रं, सरका तिकड"- ड्रायव्हर केबिन मधल्या लोकांवर खेसकला! त्यातल एक व्हुत आगाव. ते बेण म्हनाल-" तिकीट काढलय आमी." आता गडीबी ईरेला पेट्ला-" तिकीट काढलय व्हय? जणु गाडी तुमच्या बानं ईकत घेतल्यावानी सांगालयस की. सरकतयस का गप्प सुक्काळीच्या, उगा तोंड वाजवाया लावू नग." त्या दोघा कोल्हापूरी छ्त्रपतींसमोर नमत घेवून लोक सरकले आणि गड्याला जागा करून दिली. गडी म्होरं जावून बसला. " आता बघ कशी नाद खुळा गाडी चालिवतो ते अस म्हणून दोघांच्या गप्पा चालू झाल्या, म्हन्जे सगळ्या जगाचा उद्धार चालू झाला. शिव्या देण वाईट, असं उगाचच शिकिवत्यात आपल्याला. इथ शिव्यांची देणघेण करून दोघं दोस्त बनली आणि बसाया जागाबी मिळाली. अस करत करत, कार्र कुच आवाज करत गाडी पुढल्या गावात आली. कुणीबी उतरल नाही. एक मावशी बाहेर उभी होती. ती आत यायला लागल्यावर, कंडक्टर म्हणाला- " ये जागा नाय गाडीत, तु कुठं आत यायला लागली." पण मावशी कुठलं ऐकतीया, " बाईमानसाला गाडीत जागा नाय म्हणतयस . मुडदा बशिवला मी तुझा. तोंडात किडं पडतील तुझ्या!" अस ओरडत मावशी गाडीत शिरली. आणि कुठून माहीत नाही पण तिच्यासाठी जागा तयार झाली. गठुडं खाली ठेवून मावशी निवांत बसली तिथ. गाडी परत सुरू झाली, तस लोकांच्या गप्पा रंगाया लागल्या. थोड्या वेळान. नितीनला फोन आला. त्याच्या आईचा फोन होता. " गाडी मिळाली आहे, दोन अडीच तास लागतील अजून!" असं काही तरी सांगून मोबाईल तो खिशात ठेवू लागला. तो बघून जवळ उभारलेल्या काकांनी ईचारलं -" कन्चा फोन म्हणायचा ह्यो?" नितीन- " आय फोन" अस अभिमानान सांगितलं. काका- " आईचा फोन आलता ते कळलं, पर ते फोनच नाव सांगा". नितीन. " फोनच नावच आय फोन आहे." काका आश्चर्याने -" म्हणजे आयचा फोन आय फोन वर आन बाचा फोन वेगळ्या फोन वर अस हाय व्हय.. आमचं तर सगळ फोन एकाच मोबाईलवर येत्यात. असला कसला फोन घेतलास?. मी बगा दोनश रुप्ये जास्त देवून नोकीयाचा रेडीओवाला फोन घेतलाय. बॅटरी बी हाय त्यात. आणि आता हातातन टाकून दावतो, काय झालं तर नाव नाय सांगणार. तुमी शे दोनशे अजून जास्त दिले अस्ते तर चांगला फोन आला असता की राव. दिसतोय बी कसला नाजूक, जरा कुठ दाबलं तर मोडनार. आणि बटणहो कुठ दिसत नाहीती. " नितीन - " बटण नाहीत त्याला. टच फोन आहे तो!" काका " आँ, बिन बटणाचा फोन आणालाय. पैका किती दिला?". नितीन- " ३० हजार." काका -" थट्टा करताय का राव गरीबाची? दुकान्दार लई लबाड दिसतोय. चांगल शिकलेल तर दिसताय तुमी आणि अस कस गंडला व? तीस हजारात चांगला कॅम्प्युटर आला असता की राव!" नितीनला काय बोलाव सुधरना आता. आय फोननं पार पोपट केला होता. मी मनाशी ठरवला कुणाचाही फोन आला तरी आता मोबाईल बाहेर काढायचा नाय. नाही तर आपला नंबर लागणार. अशाच मजेशीर गप्प ट्प्पा करत, लोंबकाळत दोन तास काढले. आणि शेवटी आमच गाव आलं. नितीनला दिवाळीच्या शुभेच्छा देवून उतरलो. मनात विचार आला- सर्वोत्तम सस्पेंशन असणार्या त्या आरामदायक व्होल्व्हो मधला प्रवास किती बोअर होती आणि प्रचंड थकवा येतो. कारण तिथ टाचनी जरी पडली तरी लोकांना डिसटर्ब होतो. मोठ्यान हसण असभ्य मानला जात. पण ह्या एसटीचा दोन तास उभारून केलेल्या प्रवासानं अजीबात थकवा आला नाही. हे खाच-खळगे आपण अजूनही दोन तास का होईना झेलू शकतो ह्या विचारान स्वतःचच कौतुक वाटल. आपल्या मातीशी आणि मध्यमवर्गीय सोशिकतेची अजून ही घट्ट असेलेल नातं पाहून आनंद झाला.

विलासराव यांनी 13/11/2010 - 22:54 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आमचाही भरपुर प्रवास झालाय असा.

चिरोटा यांनी 13/11/2010 - 23:14 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मस्त निबंध. परतताना व्हॉल्वोने आलात की सेमी स्लिपर की 'प्रवाशांच्या सेवेसाठी" ?

रन्गराव यांनी 13/11/2010 - 23:27 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by चिरोटा

Permalink

रेल्वेन मस्त झोपून. म्हणून तर तीन-तीन निबंध लिहायला दम राहीला ;)

लतिका धुमाळे यांनी 13/11/2010 - 23:29 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

फारच छान निबन्ध. लतिका धुमाळे

>>बरं असतं कधीकधी सोंग उतरवून मातीत खेळायला. जबरदस्त वाक्य आहे. सकाळी वाचल होतं. अजूनही डोक्यात गुणगुणतय :)

पंख यांनी 14/11/2010 - 16:39 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मस्त लिहिलय.. पण शेवटचा प्रवास कल्पनाविस्तार आहे का? लोकं आता एवढीपण आडाणी नाही राहिली.. एस.टीत गोंधळ असतो, पण एवढेपण काय आफ्रीकेतून आलेले नसतात.. भारी फोन, साधा फोन हे कळतं हल्ली सर्वांना..

>>भारी फोन, साधा फोन हे कळतं हल्ली सर्वांना.. मान्य आहे पण आय फोन अजून फार प्रचलित नाही भारतात. खेड्यातला माणूस असल्यामुळं त्यान आयफोन आणि भारीतले टच फोन बघितले नसावेत अजून अस म्हणता येईल कदाचित. पण तो जाणून बुजून फिरकी घेत असण्याचीही शक्यता आहे. एडगबाळी दिसणारी खेडवळ मानसं पन फार चालू असतात. मला तर तो जाणून बुजून मज्जा करत होता अस वाटतय.

चिगो यांनी 14/11/2010 - 18:44 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

झिंदाबाद... ग्रामिण जीवनाचे व तेथील सामाजिक परीस्थितीचे अतिशय वास्तववादी झलक राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांमध्ये होते. वरवर रांगडी भाषा, जीत शिव्यांचा यथेच्छ शिडकावा असतो, बारकाईने पाहील्यास त्यातील माया व सलोखाही आढळून येतो.. (ब्बास, थकलो. आता मलाबीन ८/१० किंवा ९/१० मार्क्स द्यावेत, ही विनंती :-D )