किल्ला - एक करणे
आमच्या बारावीच्या पुस्तकात एक प्रश्न होता, ''जुन्या खेळाऐवजी नवीन प्रकारचे खेळ आल्याने आपली मानसिक वाढ खुंटली आहे का?'' दर परीक्षेला हा प्रश्न हमखास असायचा आणि सगळेच काही ना काही पुस्तकी उत्तरे द्यायचे याप्रश्नातुन आणि आजच्या जमान्यात दिवाळीची वा उन्हाळी सुट्टी लागली की, काय करावे, करू नये वगैरे याच प्रश्नांची उत्तरे शोधणारे अनेक लेखातुन संगणकीय खेळ त्रासदायकच हेच सत्य शेवटी फिरून फिरून सांगितले जाते. आणि खरे आहे ते ..!
पण, निदान दिवाळीच्या सुट्टीत तरी हा प्रश्न मला कधी पडायचाच नाही, का म्हणता? अहो किल्ला ...... आमचा जीव की प्राण . त्यामुळे वेळ कसा घालवायचा असा विचार करायला तरी वेळ कुठे असायचा ? आधीच सहामाही परीक्षा दसर्याच्या वगैरे सुट्यांमुळे खूप लांबायची. त्यामुळे, परीक्षा संपायच्या आधीच किल्ल्यांची तयारी सुरू व्हायची. जागा, कोण कोण येणार, कोण कधी गावाला जाणार आहे याची चर्चा व्हायची. आणि मग शेवटचा पेपर देऊन झाला की, हुर्रे! मग फक्त आम्ही पोरं आणि दगड माती!
पेपर झाला ,की दप्तर टाकायचे आणि बाहेर पळायचे, सगळे वाट पाहत असायचेच. मग काय, मिशन दगड माती! मिळेल तिथून मिळेल तसले दगड आणायचे, मोठे, छोटे, गोल, चौकोनी, जड, हलके, सगळे. तो दगड कुठे वापरता येईल, याचा विचार पण करायचा नाही. दगड उचलत नसेल तर, ''ये, इकडे या रे बाकीचे ..'' म्हणून बाकीच्यांना हाक मारायची. मग मेरू पर्वत उचलल्यासारखे आम्ही चार पाच स्वघोषित हनुमान तो दगड कधी ढकलत, कधी उचलून आमच्या जागी आणायचो. अर्थात यात एक दोघांना खरचटायचं वगैरे. पण कोणाला कुठे लागलंय याच भानच नसायचं! उलट स्वातंत्र्यसैनिकासारख्या त्या खुणा आम्ही सार्या ग्रुपभर दाखवीत फिरायचो. पण याहून बोंब व्हायची ती जागा ठरविताना . चांगल्या जागेवर नजर असायचीच, पण आम्हा सगळ्या दोस्तांची एक आमसभा व्हायची. आणि त्यात दोन तीन जागांवर अणुकरारावर झाली तशी चर्चा व्हायची. ''अरे त्या जोशीकाकूंपाशी नको ते बाहेर पाणी फेकतात, आपली सगळी मेहनत वाया जाईल.'' ''अरे, ते पवारासमोर नको रे, ती भिंत घाण झाली तर कॉलनी डोक्यावर घेतील ते.'' शेवटी सगळयांनुमते जागा ठरायची आणि आम्ही तिथे हे मेरुपर्वत आणून ठेवायचो. जरा भरपूर दगड झाले वाटले की, थांबायचे.
मग आता पुढची पायरी माती आणणे, ती जवळ कुठे मिळायची नाही. मिळाली तरी इतकी घाण असायची की बाप रे बाप! मग चलो मैदान! सगळे मिळेल ते साहित्य घेऊन मैदानात जायचे. आणि पोतभर माती घेऊन यायची, ती आली की थांबणे नाही ,त्याच मातकट हाताने गँग कामाला लागायची ती दगड लावायला ..
इथं सगळं दंगा व्हायचा, ''अरे, मोठा दगड मागे लाव रे'' ''ही वीट त्या फटीत टाक'', ''अरे माझा तो मोठा बाजीप्रभू ठेवायला जागा कर रे.'' हजार सूचना, कोणाच्या पायावर फरशी पडते, एखादी वीटबीट फुटते आणि साधारणता; एक तास, दोन तासाने दगड लावून व्हायचे. मग त्याच्यावर गोणपाट टाकायचा. एखादं दुसर्याने एखाद्या वाण्याकडून तो आणलेला असतोच. हा, आता सगळे एका मजेशीर कामात बुडलेले असतात. चिखल करणे, एक बादली पाणी मिळाली की, साधारणता: दहा मिनिटात सगळ्यांचे हात आपसूक काळे झालेले असतात, ''अभ्यास करा'' सारखे हात घाण करा असे इथे सांगायला लागत नाही. मग वेगवेगळ्या जागी शर्ट आणि पँटलाही चिखल लिंपला जातो. किल्ला सपाट बिपाट केले जाते. बिळे बुजविली जातात. उरलेल्या चिखलात गुहा, जंगल, शेत केले जातं. मग काय, मोहरी शिंपडली की, किल्ला रेडी! एकदम फिट!
पण हे किल्ला पुराण इथेच थांबत नाही. यानंतर गँग बाहेर पडते ते मावळे आणायला. मावळे लावायचे, पणत्या लावायच्या मग कोणत्या तरी XYZ स्पर्धेत भाग घेतलेला असतो त्यांची वाट पाहायची. बहुतेकदा ते येत नाहीतच. पण पाळीपाळीने सगळ्या किल्ल्यापाशी थांबलेले असतात,आत्ता येतील ,मग येतीत म्हणून.. या सगळ्यात दिवाळी कशी संपली कळतंच नाही.
या किल्ला पुराणात अनेक घटना घडायच्या, घडतात. जेवणखाणं तर आपण विसरलेलो असतोच. मग, घरातून आईचा ओरडा ''अरे, काही खाणार आहेस की नाही, का रात्रीच घरी येणार आहेस?'' मग चिखलाचे हातपाय घेऊन घरी आल्यावर बाबाचा ओरडा ठरलेला. पोरापोरामध्ये भांडणे ठरलेली. कोणतरी रुसत, त्याला शांत करायचे. आणि जय शिवाजी जय भवानी म्हणत दिवाळी घालवायची. शेवटच्या दिवशी चार सुतळी बाँब गुहेत लावले तर ढूम्म! स्वतः:च किल्ल्याची लक्तरे वेशीवर टांगायची.
पण तुम्ही म्हणाल यात नवीन ते काय? आम्ही पण असंच करायचो.आता सगळ आठवतय ते आम्हाला , बरोबर आहे, कारण तीच आपली परंपरा आहे. पण आजकाल परिस्थिती बदलत आहे. सगळी पोरं ''काउंटर स्ट्राईक, हरक्युलेस'' खेळत आहेत आणि यांच्यापुढे किल्ले मागे पडत चालले आहेत. आणि काही पालक देखाल मुलांना वेगवेगळ्या परीक्षेत ,शिबिरात अडकवून ठेवत आहे आणि हा आनंद हिरावत आहेत .. त्यामुळेच सगळे तज्ञ ,लेखक ओरडून सांगत आहेत, असं करु नका म्हणुन .. नेहमी सांगतात, पण तसा फारसा फरक पडत नाही.च महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे असं सांगावं का लागतं? आपणच आपल्या मुलांना यापासून का परावृत्त करतो? काही पालकांना एवढी काळजी, की मातीने तुला त्रास होईल म्हणून माती ते आणून देणार, प्लॅस्टिकचे मावळे देणार, मग म्हणणार किल्ला कर. हे काय नविनच?
आजकाल मुलांचा आयक्यू चेक करतात. तो कमी आल्यावर चिडतात. मला एक सांगा, कसा वाढेल आयक्यू? किल्ल्यासारख्या उपक्रमामुळे जी मुलांची वाढ होते ती इतरवेळी होतच नाही. नकळतपणे मुले रचना करायला शिकतात. एकत्र काम करायला शिकतात. अचानक आलेल्या संकटांना तोंड द्यायला शिकतात हे शिक्षण इतर कुठे मिळते बरे? निदान मी तरी शिकलेलो .. आपण त्यांना मदत केली , बंधन घातले तर तेच या शिक्षणाला मुकतात, त्यामुळे, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन किल्ला करू देणं हेच चांगलं!
त्यांचे काय झालंय, असतंय तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. या म्हणीप्रमाणे आपण आपल्या मराठी परंपरांना विसरलोय. पारंपरिक गोष्टी सोडायच्या ..आणि नव्या गोष्टींनी आयक्यू वाढत नाही म्हणून ओरडायचं! लेख लिहायचे! मग असे प्रश्न आमच्या इंग्लिशच्या पुस्तकात येत आहेत. वाईट वाटत ते आपल्या करंटेपणाचं! सगळं असताना मॉडर्न व्हायच्या नादात आपण हे घालवतोय. आणि, संस्कृती मरतेय म्हणून गप्पा मारतोय, असो, सगळेच तसे आहेत असे मुळीच नाही ,पण आपण त्यात जाऊ नये एवढी काळजी घेउया ना ?काय म्हणता ? आणि ते सगळं राहु दे , आपली संस्कृती जपण्यासाठी म्हणून नव्हे, तर या स्पर्धेच्या जगात तुम्हाला तुमच्या पोराचा आयक्यू, इक्यू वाढवायचा आहे, म्हणून तरी, त्याला किल्ला करू दे, तुम्ही खूश आणि तो ही! बस्स, या दिवाळीला एवढंच सांगणं!
सर्व मिपाकराना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा व ही भेट !!!! गेल्या डिसेंबर महिन्यात लिहिलेला हा अप्रकाशित लेख परवा सहज सापडला , तो समयोचित वाटल्याने इथे देत आहे .
प्रतिक्रिया
छान लिहिलं आहेस.
मझा आ गया.............
आम्ही यावर्षी पण किल्ला केला
किल्ला केला आहे. ? मग....
खुपच छान!
शब्दानकन छान पण .....काहिहि लिहले आहे.
कोण गाढव आपल्या मूलाला किला
काऊंटर स्ट्राईक ने काय विकास होतो ते समजले तर बरे होईल ?
खरे तर विकासाचा मूद्दाच इथे
तूम्हाला सशाची गोष्ट आठवते का " आभाळ पाठीवर कोसळले आहे "
हा एक भाग आमच्या शहरी भागातुन
:) तुम्हाला सूध्दा दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा
तूमच्या शेवटच्या
आम्ही बरिच वर्षं किल्ला
छान लेख.फ्लॅट सिस्टीम मधे
छान लेख, लहानपणच्या स्म्रुती जाग्या झाल्या.
पहिला अर्धा भाग
छान रे विनायका! अगदी सह्ही
हो करतो अजुनही यावर्षी जरा
मी तर किल्ला न चुकता अजुनही दिवाळीत करतो
विनायकराव छान आहे लेख. आम्ही
किल्ला - एक करणे
स्मृतीचित्र आवडले