आजकाल माझी 'कारवाँ' मधल्या हेलनसारखी अवस्था झाली आहे. ती कशी अंगाला शक्य त्या सगळ्या कोनांमधून घुसळून आणि डोळ्यांना, पापण्यांना, बुबुळांना शक्य त्या सगळ्या दिशांना फिरवून "वो आ गया...वो आ गया..." असं बेभानपणे जाहीर करत सळसळत नाचते; तसच काहीसं झालयं माझं...
'तो' येणार असे वाटले की मी बाह्या सरसावून बसतो. कधी-कधी अगदी आतूरतेने त्याची वाट देखील बघतो. मग मनातल्या मनात मी देखील "वो आ गया...वो आ गया..." असं पुटपुटतो. कधी-कधी (नव्हे बर्याचदा) 'त्या'च्या येण्याची धास्ती मला अस्वस्थ करून जाते. 'तो' आला की 'मी माझा' राहत नाही. 'तो' आला की मी माझाच काय, माझ्या बायकोचा देखील राहत नाही. 'त्या'ने मला आपल्या कवेत घेतले की मग मला कसलेच भान राहत नाही. एखाद्या झंझावातासारखा 'तो' येऊन मला सैरभैर करून जातो...
नाही, ही तुम्ही 'सम'जताय तशी थ्रि'लिंग' आणि रं'गे'ल भानगड अजिबात नाही. मी हे सगळं बोलतोय ते आपल्या कॉमन मित्राविषयी...ज्याचं नाव आहे, कंटाळा!!!
कंटाळा हा आजकाल माझा परममित्र बनलेला आहे. बहुधा सगळ्यांना त्याच्या गहिर्या दोस्तीचा कधीतरी अनुभव येतोच. कारण कुठलेही असो, कंटाळा त्याच्या मैत्रीचा हक्क न चुकता बजावतो. याची मैत्री तशी धोकादायकच. चांगल्या क्षणांचं वाटोळं करावं तर कंटाळ्यानेच. आपल्या (म्हणजे आपापल्या) बायकोच्या उत्साहावर व्यवस्थित पाणी आणि विरजण घालून नामानिराळा राहणारा हा मित्र म्हणजे "मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली" या म्हणीचे मूर्त स्वरूप आहे. बायको एखाद्या शनिवारी संध्याकाळी बाहेर फिरायला जायचा आणि मग बाहेरूनच जेवून घरी यायचा बेत आखते. आपण अगदी बुधवारपर्यंत तिच्या या बेताला खतपाणी घालतो. "नंतर आईस-क्रीमही खाऊ आणि मस्त मसाला पान खात-खात घरी येऊ." असे अॅड-ऑन्स टाकून आपण तिच्या अपेक्षा आणखी वाढवून ठेवतो. अतिउत्साहाच्या भरात आपण "त्यापेक्षा आपण आधी फिरायला जाऊ; भटकत-भटकत सिटी प्राईडला जाऊ; एखादा मस्त पिक्चर टाकू; बाहेर जेवण करू, आईस-क्रीम खाऊ, पान खाऊ आणि निवांत घरी जाऊ..." असं म्हणून उत्साहाच्या सगळ्या सुरक्षित सीमा पार करतो. गुरुवारपर्यंत (हो, गुरुवारीच!) बायको कुठले कपडे घालायचे, कानातले कुठले घालायचे, चप्पल कुठली घालायची असा विचार सुरु करते आणि त्यानुसार तयारी सुरु करते. शुक्रवारी आपण विकेंडच्या आनंदात तिला एखादा ड्रेस ही प्रॉमिस करून टाकतो. मग काय, बायकोच्या आनंदाला पारावार राहत नाही. दिवसभर ती एखाद्या परीसारखी तरंगत असते. वेळेवर चहा, जेवण, नाष्ता अशी सगळी 'हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री' घरी अवतरते. मग "तुझे बूट खूप खराब झालेयत रे...उद्या दुसरे घालून जा. मी यांना पॉलिश करून आणेल." असंही पुसटसं ऐकायला मिळतं.
शुक्रवारी संध्याकाळपासूनच आपला 'मित्र' भेटी द्यायला लागतो. मग आपण हळूच तिच्या बेताला बेता-बेतानेच प्रतिसाद द्यायला सुरुवात करतो. "अगं उद्या संध्याकाळी एका मित्राला भेटायला जायचयं; त्याचे वडील खूप आजारी आहेत." आपण पहिला निरुपद्रवी पेच टाकतो. "पण मी लगेच परत येतो; आपण लगेच निघुयात". बायको थोडीशी निर्धास्त होते. मग शनिवारी सकाळी कंटाळ्याने आपला ताबा घेतलेला असतो. सकाळी ११ वाजता आपण (की कंटाळा?) आळसावलेल्या अवस्थेत पेपर चाळत असतांना पुढच्या गेमप्लॅनची तयारी करतो. मग दुपारी जेवण होते...आळस आणि कंटाळा वाढत जातो. पाच वाजता "खूप डोकं दुखतयं...संध्याकाळी जायचा कंटाळा आला आहे" असं म्हणून आपण वातावरणनिर्मिती करतो आणि शेवटी थोडी चिडचिड करून तिचा बेत हाणून पाडतो. असं किती जणांच्या बाबतीत घडतं माहित नाही पण असं माझ्या बाबतीत एक-दोनदा घडलेलं आहे. खरच खूप कंटाळा आलेला असतो...एक आनंदी संध्याकाळ कंटाळ्यामुळे उमलण्याआधीच कोमेजते आणि टीव्हीवरच्या निरर्थक, रटाळ पडद्यावर हरवून जाते.
आजकाल ऑफिसमध्ये पण खूप कंटाळा येतो. नवीन काही वेगळे काम आले की कंटाळा हमखास मानगुटीवर बसून छळतो.
"समीर, वुई नीड टू एनहान्स द एक्जिस्टिंग अॅप्लिकेशन"
"ओह..व्हाय?"
"वुई हॅव गॉट फीडबॅक फ्रॉम अ लॉट ऑफ युजर्स दॅट धिस अॅप्लिकेशन इज नॉट युजेबल. अँड इट डज नॉट हॅव ऑल दॅट वुई नीड इन अॅन अप्लिकेशन लाईक धिस..वुई विल हॅव टू डू ह्युरिस्टीक इवॅल्युअशन, कंडक्ट सर्वेज, टेक फीडबॅक, गॅदर रिक्वायरमेंटस अँड री-डिजाईन द अॅप्लिकेशन..."
"बट आय मे नॉट स्पेंड टू मच टाईम ऑन धिस सिन्स आय हॅव ऑलरेडी बीन असाईनड टू अ फुल-टाईम प्रोजेक्ट."
"बट धिस इज आवर युनिट वर्क. यु विल हॅव टू स्पेअर सम टाईम वीकली"
"इट्स जस्ट अ स्मॉल अॅप्लिकेशन. व्हाय डू वुई नीड टू बॉदर अबॉउट इट सो मच?"
झालं, कंटाळ्यापायी मी हे काम कसं निरर्थक आहे हे पटवून द्यायला लागलो. त्यात 'रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट' किती क्षुल्लक आहे; लोकं सर्वे किती फालतू समजतात; त्यांचा फीडबॅक कसा बर्याचदा फसवा आणि घाई-घाईत दिलेला असतो...अशी बरीच कारणे द्यायला सुरुवात केली. ही सगळी कारणे तकलादू होती असे अजिबात नाही. यातली सगळी कारणे अगदी खरी होती. पण त्या कामाचा सांगोपांग विचार करून मी ही कारणे देत नव्हतो; मला कंटाळा आल्याने देत होतो हे सत्य मी माझ्या विवेकबुद्धीपासून लपवू शकत नव्हतो. कंटाळा तुमच्या ऑफिसमधल्या कामात किती घातक ठरू शकतो त्याचे हे एक छोटे उदाहरण. मग अगदी नेमलेल्या कामात टाळाटाळ करणे, मग कामे पुढे किंवा कुणाकडे तरी ढकलणे या पातळीपर्यंत कंटाळ्याचा आलेख वाढत जातो.
मीटींग्जचा कंटाळा, ब्रेनस्टॉर्मिंगचा कंटाळा, डॉक्युमेंट्स वाचण्याचा कंटाळा....कामाचा कंटाळा, ऑफिसला जाण्याचा कंटाळा....कितीही टाळायचा म्हटला तरी कसा टाळावा हा कंटाळा?
मागच्या बुधवारी आमच्या ऑफिसात जपानी क्लायंटकडचे २० लोकांचे एक मंडळ आले होते. आदल्या दिवशी तशी कल्पना दिली होती. मी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेलो. जपान्यांची टाप-टीप बघून मला माझीच शरम वाटायला लागली. स्वच्छ इस्त्री केलेले कपडे, चमचमणारे कोट, लख्ख बूट... मी हळूच माझ्याकडे पाहिलं. सोमवारी घातलेले कपडे मी शिरस्त्याप्रमाणे बुधवारी घातले होते. (मंगळवारचे गुरुवारी घालत असतो.) पावसात भिजलेले बूट पॉलिशविना मेलेल्या कुत्र्यासारखे दिसत होते. पाण्याचे पांढरे डाग बुटांवर उठून दिसत होते. एका बुटाची लेस वाट चुकलेल्या वासरासारखी इकडे-तिकडे नाचत होती. कॉलरजवळ काळपट झालेला शर्ट पँटमधून बंडखोरी करून बाहेरचे जग पाहण्याची धडपड करत होता. केस विस्कटलेले होते आणि दाढीचे खुंट इतके वाढले होते की कुणी खुशाल खुंटीसारखा वापर करून शर्ट अडकवावा. चेहरा तेलकट झाला होता. आधीच मी देखणा आणि त्यात असा अवतार झाल्याने मी अतिरेकी दिसत होतो.
दाढी करण्याचा कंटाळा, बूट पॉलिश करण्याचा कंटाळा...संध्याकाळी घरी आल्यावर तर कंटाळा आपल्या परमोच्च पातळीवर जाऊन पोहोचतो. कसेबसे कपडे बदलवून टीव्ही नामक डोकेदुखीसमोर एखाद्या ओंडक्यासारखे बसून बेचव कार्यक्रम बघण्यात काहीच आनंद नसतो; पण आजकाल कंटाळ्याने मला त्यातही आनंद शोधण्यास भाग पाडले आहे. 'बिग बॉस', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'बंदिनी', 'राखी का फैसला', 'इस देस न आना लाडो', 'मान रहे तेरा पिता' सारखे रटाळ, निष्क्रीय बनवणारे कार्यक्रम असोत किंवा 'आगे से राईट', 'मेला', 'जंग', 'रामजाने' सारखे भिकार चित्रपट असोत; मी ठामपणे बसून राहतो. माझ्यातली निष्क्रीयता मला कळते पण कंटाळ्यापुढे नाईलाज असतो. एक-दोन महिन्यांपूर्वी मी ए. आर. रहमान चे एक सुंदर चरित्र वाचले; त्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या मुलाखतींवर आणि त्यांच्या कोड्यांवर बेतलेले डोक्याला चालना देणारे एक पुस्तक वाचले; जपानी कायझेन व्यवस्थापन पद्धतीवर एक पुस्तक वाचले; थोडेफार लिखाण केले, माझ्या काही नातेवाईकांना बर्याच वर्षांनी भेटलो; ऑफिसात देखील बरे काम केले......आता आठवले की थोडे वाईट वाटते. असा अचानक वाल्मिकीचा वाल्या कसा झाला? आनंदाने आणि उत्साहाने नवनवीन अनुभव घेणारा मी आज असा कंटाळेश्वर कसा झालो? बाय द वे, 'कंटाळेश्वर' ही माझ्या बायकोने मला अलिकडच्या काळात प्रदान केलेली मानद पदवी आहे.
पण कधी कधी हा कंटाळा प्रगतीसाठी आवश्यक असतो. एकाच पद्धतीच्या कामाचा पुरेपूर, अगदी मेंदूला झिणझिण्या येईपर्यंत कंटाळा आल्याशिवाय आपण पुढचे पाऊल उचलत नाही असे मला वाटते. नाविन्याचा शोध, मेंदूला आव्हान देणार्या क्षणांचा शोध ही सारी धडपड कंटाळ्यातून जन्माला येते. कंटाळा ही नाविन्याची जननी आहे. समाधानी राहिलो तर पुढे जाणार कसे? रुटिन इज नॉर्मल असे कुणीतरी म्हणाले आहेच. कंटाळ्याच्या पुढची पायरी विचार आणि त्यापुढची पायरी पूर्ण ताकदीनिशी कृती आहे. पुढच्या दोन पायर्या जीवनाला नवीन अर्थ देतात. आणि त्या पायर्यांवर पाऊल ठेवण्याचा कंटाळा केलात तर मग माझ्यासारखी गत होते.
आता अचानक मला पुढे काही टंकण्याचा कंटाळा आला आहे.... तुमच्या कंटाळ्याच्या कथा अशाच आहेत का?
वाचने
6445
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
मध्येच तो आल्यामुळे अर्धंच
होय
छान लिहिलंय. कंटाळेकी हमसेभी
सगळे नवरे सारखेच.. माझा नवरा
बिचारं ते ध्यान. पाशवी चुचु
In reply to सगळे नवरे सारखेच.. माझा नवरा by पर्नल नेने मराठे
>>माझा नवरा दाढी न करता येत
In reply to सगळे नवरे सारखेच.. माझा नवरा by पर्नल नेने मराठे
हा हा हा...
In reply to सगळे नवरे सारखेच.. माझा नवरा by पर्नल नेने मराठे
मला तर कोणी हाका मारुन बोलवत
बेष्ट!
In reply to मला तर कोणी हाका मारुन बोलवत by कानडाऊ योगेशु
मस्त झालाय लेख. मला पण असाच
१,२?
In reply to मस्त झालाय लेख. मला पण असाच by Dhananjay Borgaonkar
१,२?
In reply to मस्त झालाय लेख. मला पण असाच by Dhananjay Borgaonkar
मला तर आरशांत चेहरा
In reply to १,२? by समीरसूर
आहो तसा मी निर्लज्जच आहे. पण
In reply to मला तर आरशांत चेहरा by कानडाऊ योगेशु
दोन महिन्यांनी लग्न का?
In reply to आहो तसा मी निर्लज्जच आहे. पण by Dhananjay Borgaonkar
अजुन ६ महिने??आरे काय त्रास
In reply to दोन महिन्यांनी लग्न का? by धमाल मुलगा
न करण्याचा त्रास जास्त होईल.
In reply to अजुन ६ महिने??आरे काय त्रास by Dhananjay Borgaonkar
अनुभवाने शहाणपण येते म्हणतात
In reply to न करण्याचा त्रास जास्त होईल. by धमाल मुलगा
बाजीगर मध्ये वाक्य आहे ना,
In reply to अजुन ६ महिने??आरे काय त्रास by Dhananjay Borgaonkar
+१००
In reply to १,२? by समीरसूर
man face waxing करून
In reply to +१०० by भाऊ पाटील
लग्न होण्या अगोदर मी माझी एक
हाण्ण तिच्यायला....
In reply to लग्न होण्या अगोदर मी माझी एक by गांधीवादी
अडीच महिन्यांनी तिला
In reply to हाण्ण तिच्यायला.... by धमाल मुलगा
हा हा हा !! छान लेख ....मला
मस्त ...
कंटाळा व टंकाळा
आयला!
+१
In reply to आयला! by धमाल मुलगा
ए धम्या ते आराम हराम है
In reply to आयला! by धमाल मुलगा
'आलास माणसाचा शत्रू आहे' हे
In reply to ए धम्या ते आराम हराम है by गणपा
असेल असेल...
In reply to ए धम्या ते आराम हराम है by गणपा
समिरसुर मग तुम्हाला आवड तरी
चांगला प्रश्न!
In reply to समिरसुर मग तुम्हाला आवड तरी by पर्नल नेने मराठे
"कंटाळा ही नाविन्याची जननी
माझे आवडते वाक्य - आळस ही
+१
In reply to माझे आवडते वाक्य - आळस ही by मितान
वरकरणी हा लेख कंटाळ्यावर असला
मला देवनागरीत लिहीलेलं
खरयं
In reply to मला देवनागरीत लिहीलेलं by ३_१४ विक्षिप्त अदिती