(पूर्णवाद तत्वज्ञान आणि भगवद्गीता यांचा आधार घेत हे लिखाण केले आहे. 'देव' ही संकल्पना स्पष्ट व्हावी आणि ज्ञान, भक्ती, योग इ. विविध साधना/ उपासना मार्गांची एकांगी, दुराग्रही विचार न करता सांगड घालता यावी असा एक प्रयत्न. या दृष्टीने गीता तत्वज्ञान किती लवचिक आणि व्यापक आहे हे ही लक्षात येईल. प्रामुख्याने अर्वाचीन काळातील काही साक्षात्कारी संत, विभूती यांचा उल्लेखही या ओघात केला आहे. )
गीता तत्वज्ञानानुसार 'देव' ही एक व्यापक आणि सुस्पष्ट पण काहीशी जटील संकल्पना आहे. विश्वाची निर्मिती कुणी केली हे सांगता येत नाही म्हणून उगाच 'देवाने केली' असे ठोकून द्यावे असा तो प्रकार नाही. पुरूषोत्तम परमेश्वराची प्रत्यक्ष प्रचिती अध्यात्मिक (शिवतत्व प्रधान), अधिदैविक (विष्णुतत्व प्रधान) आणि अधिभौतिक (भौतिक जगत - ज्याचा या पुरूषोत्तमाशी 'स्वरूप संबंध' आहे) तिन्ही स्वरूपात वेगवेगळ्या प्रतलावर येऊ शकते व येते. "क्षरातीत मी अक्षराहुनी उत्तम मी त्या अर्थी, पुरुषोत्तम मी वेदी लोकी ऐसी माझी ख्याती" (भावार्थ गीता १५. १८) - पुरुषोत्तम परमेश्वराचे समग्र आकलन होण्याच्या दृष्टीने हा श्लोक आणि भगवदगीतेचा पंधरावा अध्याय महत्त्वाचा आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने मुळातच प्रत्येक जीवात या तिन्हीचा अंश निसर्गत: असतो. आत्त्मा (जे आपले मूळ अध्यात्मिक स्वरूप आहे), मनबुद्धीचा प्रांत (जो अधिदैविकाशी जोडला जाऊ शकतो) आणि जड देह (जो पंचेंद्रियांच्या माध्यमातून अधिभौतीकाशी संयुक्त असतो) असेच ढोबळमानाने जीवाचे स्वरूप असते.
यातील अध्यात्मिक तत्व हे अविकारी, अचल, अपरिवर्तनीय असते. या पातळीवर अद्वैत आहे. आधिभौतिक तत्व स्थूल, बरेचसे बद्ध आणि बहुतांशी कार्यकारण भावाने चालणारे असते. यात पावलापावलावर द्वैत उभे असते. हे नियमबद्ध असल्याने या निसर्गनियमात फारशी ढवळाढवळ करता येत नाही. आधिदैविक हा या दोन्हींना जोडणारा प्रांत आहे. तो मात्र सूक्ष्म, तरल आणि व्यावहारिक द्वैत आणि अध्यात्मिक अद्वैत यांना जोडणारा दुवा ठरू शकेल असा आहे.
निर्गुण, निराकार, उपाधीरहित, अविकारी, साक्षी, कूटस्थ असे परमेश्वराचे अध्यात्मिक शिवस्वरूप आहे. रमण महर्षी यालाच 'द सेल्फ' म्हणतात. या अक्षर स्वरूपाची प्रत्यक्ष अनुभूती ज्ञानमार्गी साधकाना तुरियातीत अवस्थेत येते. ती निरंतर तशीच राहाते. एखादा अनुभव आला आणि गेला असे होत नसून हे संपूर्ण आणि आमूलाग्र परिवर्तनाच असते. ही अनुभूती आलेला ज्ञानी पूर्णपणे नि:संग, व्यक्तिगत ईच्छा, वासनांच्या आणि स्थल, काल, देश, वर्ण, आश्रम इ. च्या पलीकडच्या सहज स्थितीत स्वभावतः राहातो. या स्थितीत कुठलीच अधिदैविक साधना, उपासना करण्याची गरज उरत नाही. तसा प्रश्नच उदभवत नाही. अधिभौतिक जगत ही सगळी माया आहे हे प्रत्यक्ष अनुभवल्यावर वैषयिक वासनांचे दमन करणे आणि त्यातून विकृती निर्माण होणे हा प्रश्नच उरत नाही. अत्यंत माफक गरजा असणारे हे ज्ञानी देहधारणेपुरतेच अन्न ग्रहण करून, एखादे कौपीन सारखे वस्त्र धारण करून 'अजगर' वृत्तीने एकाच ठिकाणी स्वस्थ राहतात. हे कसलाही प्रचार, प्रसार, उदघोष, नारेबाजी वगैरे करत नाहीत. अभिनिवेश तर नाममात्रही नसतो. असते फक्त एक शांत, प्रसन्न, कृपापूर्ण सहज अस्तित्व! सामाजिक दृष्टीने अशा पूर्ण संन्यस्त ज्ञानी मुनींना सामाजिक कर्तव्य असे काही नसतेच असे म्हणावे तर वावगे ठरू नये. यांचा समाजाला भारही नसतो. हे फारसे जीवनाभिमुख नसले तरी 'युसलेस', निरर्थकवादी, शून्यवादी मात्र मुळीच नसतात. अशा नैष्कर्म्य सिद्धी साधलेल्या अवस्थेतही यांचे जीवितकार्य थांबत नाही. उलट ते अत्यंत प्रभावीपणे सहज पार पडते. या अनुषंगाने भगवान रमण महर्षी यांचे चरित्र आणि त्यांच्याविषयीचे साहित्य, विकी वगैरे जालावर वाचल्यास हे स्पष्ट होईल.
ज्ञानमार्गाची मुख्य साधना मनाची सारी शक्ती एकवटून खरा 'मी कोण' हा शोध घ्यायचा अशी आहे. ही 'सेल्फ इनक्वायरी' साधायची तर चित्त चतुष्ट्य अनुकूल असायला हवे. या ज्ञानमार्गाला एक वेगळाच प्राग्जन्मीच्या साधनेचा अधिकार लागतो, सहज वैराग्य लागते. हे सारे घेऊन जन्माला येणारा लाखो करोडोमध्ये एखादाच. भन्नाट, अफाट, अचाट, लोकविलक्षण अशा कुठल्याच गोष्टीचा सोस ज्ञानमार्गी साधकाना घातकच. चवचाल मनाचे माकडचाळे पूर्णपणे थांबतात, बुद्धीची धाव तोकडी पडते, तर्क पांगळा ठरतो तेव्हा कुठे या मार्गावरची वाटचाल सुरू होते. ज्ञानियाची सहजस्थिती आणि ओशोछाप पाखंडी माणसाचा खुशालचेंडूपणा/ यु. जी. छाप तथाकथित बंडखोरपणा, वायफळ शिवराळपणा यात तर टोकाचा फरक आहे.
(क्रमशः)
वाचने
5474
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख आवडला
हंस
In reply to लेख आवडला by शुचि
पहा... अध्यात्मावर एवढं
In reply to लेख आवडला by शुचि
अशीच आपली चाचपणी
In reply to पहा... अध्यात्मावर एवढं by स्वानन्द
धन्यवाद
In reply to लेख आवडला by शुचि
अगदी अगदी
खरे असावे
In reply to अगदी अगदी by मिसळभोक्ता
प्रमाण
In reply to अगदी अगदी by मिसळभोक्ता
ऐकीव माहिती उपयुक्त असतेच!
In reply to प्रमाण by नितिन थत्ते
मला हा लेख आवडला. ज्याला
वाचत आहे...
परमेश्वराची नक्की व्याख्या
लेख आवडला.... ज्ञानमार्ग
लेख आवडला. वाचनखुण करायची आता
चांगलंय!
धन्यवाद
In reply to चांगलंय! by राघव