मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुण्य, की प्रायश्चित्त?...

दिनेश५७ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
'आणखी काही वर्षांनी, आपली सगळ्यात मोठी गरज कोणती असेल?'... ... ट्रेनमधून उतरून आम्ही दोघही एकाच बस स्टॊपवर आलो, आणि रांगेत उभं राहाताना त्यानं मला विचारलं. आमची नुस्ती तोडओळख होती. पण आज तो मला भेटताच बोलू लागला... आजूबाजूची गर्दी, बसची वाट पाहात लांब होत जाणार्‍या रांगा, हे सगळं न्याहाळत मी त्याला हवं असलेलं उत्तर शोधायचा प्रयत्न करू लागलो. पण त्यानं माझा हा प्रयत्न ओळखला असावा. मानेनंच नकार देत त्यानं माझा प्रयत्नच थांबवला. 'वृद्धाश्रम'... माझ्याकडे रोखून पाहात, उगीचच आणखी न ताणता त्यानंच उत्तर देऊन टाकलं. आणि माझा चेहेरा प्रश्नचिन्हांकित झाला. हातातल्या वर्तमानपत्राची घडी उलगडून त्यातल्या एका पानावरच्या फोटोवर बोट ठेवत त्यानं तो पेपर जोरजोरात हलवला. मग मीच ते पान पकडलं, आणि नीट तो फोटो न्याहाळला. ... जागतिक वरिष्ठ नागरिक दिनानिमित्त शंभरीच्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराचा फोटो होता. 'बघितलंत?...' पुन्हा त्या फोटोवर बोट ठेऊन ते पान जोरजोरात हलवत त्यानं विचारलं. मी फक्त होकार दिला. पण त्याचा तो प्रश्न आणि त्यानंच देऊन टाकलेलं ते उत्तर यांचा या फोटोशी काय संबंध ते मला कळलं नव्हतं. ... माझ्या तोंडावर उमटलेलं ते प्रश्नचिन्ह तसंच होतं. 'तुम्हाला सांगतो, आत्ताच मी एका वृद्धाश्रमात जाऊन आलो... माझं कुणीच नाहीये तिथे. पण'... बोलतबोलता तो थांबला. रस्त्यावरून वाहाणार्‍या गर्दीकडे पाहात क्षणभर कुठेतरी हरवल्यासारखा गप्प झाला... 'अहो, खूप गर्दी झालीय तिथे. अ‍ॅडमिशनसाठी वेटिंगलिस्ट आहे...' तो अस्वस्थ होता. मला ते जाणवू लागलं होतं. मी काही न बोलता त्याचं बोलणं ऐकत होतो. '... मला सांगा, वृद्धाश्रम चालवणं हे चांगलं काम, की वाईट?'... अचानक माझ्या डोळ्यात नजर खुपसून त्यानं विचारलं. ' नक्कीच चांगलं '... मी लगेच उत्तरलो. पण त्यानं नकारार्थी मान हलवली. 'नाही... अजिब्बात नाही.' तो ठामपणे म्हणाला. ... 'अहो, तुमच्यासारखंच उत्तर मीही त्याला दिलं. माझीही अशीच समजूत होती. हे एक पुण्यकर्म आहे, असं माझं मत होतं. पण त्यान पार बदलून टाकलं ते...' पुन्हा गर्दीकडे पाहात हरवलेल्या डोळ्यांनी तो काहीतरी टिपून घेत होता. 'तो म्हणाला, आम्ही काही पुण्य करत नाहीये... हे तर कुठल्यातरी पापाचं प्रायश्चित्त आहे...' पुन्हा माझ्याकडे आरपार पाहात तो बोलला. त्याचा अस्वस्थपणा सर्रकन माझ्या मेंदूत भिणभिणला... मी गोठल्यासारखा त्याच्या डोळ्यात पाहू लागलो. तितक्यात बस आली. पण आम्ही दोघंही स्तब्ध, तिथेच उभे होतो. पाठीमागून आवाज यायला लागल्यावर मी त्याचा हात पकडला, आणि रांगेतून बाहेर पडलो. स्टॉपच्याच मागच्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं. तिथल्या एका रिकाम्या टेबलवर जाऊन बसलो. 'काय झालं... कसलं पाप, काय म्हणाला तो... कोण होता तो...' मी आडवेतिडवे प्रश्न विचारून टाकले, आणि त्यानं समोरच्या ग्लासातल्या पाण्याचा मोठ्ठा घोट घेतला. ... 'अहो, आज सुट्टी होती, म्हणून मी सहज जरा मुंबईबाहेर कुठेतरी जायचं ठरवलं. कुणीतरी त्या वृद्धाश्रमाबद्दल मागे सांगितलं होतं. मस्त स्पॉट आहे, छान निसर्ग आहे, असं कळलं, म्हणून तिकडे गेलो...' तो आता शांतपणे सांगत होता. पण नजरेतली अस्वस्थता संपली नव्हती. मी खुणेनंच चहाची ऑर्डर दिली, आणि पुढं झुकून त्याचं बोलणं ऐकू लागलो. 'सकाळी हा पेपर घेतला, आणि हा फोटो बघितला. म्हणूनच तिकडे जायचं नक्की केल... माणसं कशाला म्हातारी होईपर्यंत जगतात हो?' पुन्हा त्यानं अस्वस्थ नजरेनं मला विचारलं. मी काहीच बोलत नव्हतो. त्यालाही तशी काही अपेक्षा नव्हती. 'साठसत्तर म्हातारे आहेत तिथे... असेच, मुलांनी आणून सोडलेले... एका म्हातारीला तर, अक्कलकोटला नेतो असं सांगून मुलानं इथे आणून सोडलंय... बिचारी रोज वाट बघतेय. मुलगा येईल न्यायला म्हणून...' 'मी गेलो, तेव्हा ती हातात कपड्यांची पिशवी घट्ट पकडून उन्हात बाहेरच बसली होती... मला विचारलं, राजन आला का रे... मला काहीच कळलं नाही, म्हणून मी मॅनेजरला विचारलं आणि तिची हकीगत समजली...' तो संथपणे बोलत होता. आता मला त्याच्या अस्वस्थपणाचं मूळ सापडत होतं. 'राजन म्हणजे, त्या म्हातारीचा मुलगा... तिकडे विरारला मोठ्ठा बंगला आहे त्याचा. त्याचे वडील वारल्यावर ह्या बाइनं नोकरी करून मुलांना वाढवलं. मुलींना डोक्टर केलं, मुलाचं शिक्षण झाल्यावर बिझिनेस सुरू झाला, तरी ही नोकरी करतच राहिली. रिटायर झाली. पाचसहा हजारांची पेन्शन आहे. अक्कलकोट स्वामींची भक्त. परवा मुलगा म्हणाला, तुला अक्कलकोटला नेऊन आणतो, तर बिचारीनं हौसेनं कपडे भरले. आणि लहान मुलासारखी मुलाच्या गाडीत जाऊन बसली. मग मुलानं थेट इथे आणून सोडलं तिला'... ... सांगतासांगता त्याच्या आवाजातच पाणी दाटलंय असं मला वाटायला लागलं. मी डोळे मिटले. छाती भरून आल्यासारखं झालं. एक मोठ्ठा श्वास भरून घेतला, आणि त्याच्याकडे बघितलं. '... अहो, जाताना त्यानं आईच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातली माळही काढून घेतली हो..' तो कळवळला. 'बिचारी दोन दिवसांपासून वाट पाहातेय मुलाची... आपल्याला त्यानं फसवलं हेही तिला कळत नाहीये. नव्वदीच्या त्या बाईला काय कळणार म्हणा... ' ... समोरचा चहा थंड झाला होता. 'मी तिच्याशी गप्पा मारल्या. मॅनेजर बाजूलाच होता. तेवढ्यात तिथे आणखीही दोनचारजणं आले. सगळ्यांशी बोललो. सगळ्यांच्याच अशाच कथा... म्हणून निघताना मॆनेजरच्या पाठीवर कौतुकानं हात फिरवला. म्हणालो, खुप चांगलं काम करताय तुम्ही... नाहीतर ह्यांचं काय झालं असतं कुणास ठाऊक... तर त्याच्या उत्तरानं मी आणखीनच हैराण झालो...' तो माझ्याकडे अपेक्शेनं पाहात बोलला. मी भुवया वर करून खुणेनंच त्याला 'काय' म्हणून विचारलं. 'तो म्हणाला, कुणास ठाऊक.. आम्ही पुण्य करतोय, की कधी कुठल्या जन्मी केलेल्या अशाच पापाचं प्रायश्चित्त भोगतोय...' ..... माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता. नकळत मी दोन्ही हातांनी डोकं गच्च पकडलं. 'हेच केलं मीपण.. त्याचं हे वाक्य ऐकल्यावर'... माझ्याकडे पाहात पुन्हा कळवळल्या स्वरात तो म्हणाला. चहा तसाच टाकून आम्ही दोघही उठलो... पुन्हा स्टॊपवर आलो... हातातली पेपराची घडी त्यानं घट्ट पकडली होती. ...' आजच मी वाचलं, की शतायु लोकांची जगातली संख्या २०५० मधे १४ पट वाढणारे. म्हणजे, आज जगात दोन लाख पासष्ट हजार आहेत. ५० साली, सदतीस लाख होतील... भारतातही साठीच्या वरच्या लोकांची संख्या वाढतेय... आज आठ कोटी आहेत, आणखी १५ वर्षांनी १५ कोटी असणारेत... ' बोलताबोलता तो थांबला. ... 'मग वृद्धाश्रमाची गरज वाढणार नाही का? तिथून निघालो, तेव्हा दोनचार जणं बाहेर थांबले होते... कुणाच्या बापाला आणायचं होतं, कुणी इथे बायकांची सोय आहे का म्हणून चौकशी करत होता...' ... तो म्हणाला, आणि मान फिरवून त्यानं डोळे पुसले! http://zulelal.blogspot.com

वाचने 3806 वाचनखूण प्रतिक्रिया 26

पैसा 02/10/2010 - 23:24
जगात असं होतं खरं. पण आपल्याला जन्म देणार्‍याना कोणी असं सोडू शकत हे मला कळण्याच्या पलिकडचं आहे. ज्यानी लहान असताना आपलं मातृ/पितृ छत्र गमावलं असेल त्याना कळेल मी काय म्हणते ते.

काजुकतली 02/10/2010 - 23:42
सुंदर लिहिलंय... मला स्वतःला तरी वाटते की वृद्धाश्रमांची संख्या वाढायला पाहिजे. माझ्या जवळच्या नात्यातल्या एक वृद्ध बाई आहेत ज्यांना आईची काळजी करणारी मुलेही आहेत. पण एका सुनेशी पटत नाही, दुसरीला नोकरीशिवाय पर्याय नाही. आईजवळ राहात असलेला मुलगा-सुन सकाळी लवकर निघुन रात्री उशीरा घरी परत येतात. त्यामुळे घरात आई दिवसभर एकटीच. त्यात प्रकृती नाजुक. आपल्याला दिवसाचे काय झाले तर मुले येईपर्यंत कोणाला कळणारही नाही ही त्यांना काळजी. घरी दिवसभर राहणारी बाई शोधताहेत, पण अजुन तरी सापडली नाही.... अशा वेळी मला तरी वाटते वृद्धाश्रम हा चांगला पर्याय आहे. निदान तिथे दिवसभर काळजी घेणारे कोणीतरी असेल... पण वृद्धाश्रमाचे नाव काढले की आपण नकोसे झालोत म्हणुन टाकुन देताहेत ही भावना येते मनात ब-याचजणांच्या. आईबाबांना वृद्धाश्रमात ठेवणारे सगळेच काही नालायक नसतात. परगावी/परदेशी राहणा-या मुलांच्या पालकांवर दिवसभर कोणीतरी पाहावे अशी वेळ आली तर त्यांनी कुठे जावे? ब-याच वेळा पैसे देऊनही माणुस मिळत नाही घरी राहुन करायला. नोकरी सोडुन आईबाबांना सांभाळत बसणे सगळ्यांनाच जमेल असे नाही. मला एकच मुलगी आहे. माझ्या म्हातारपणी मला प्रकृतीअस्वास्थ आले आणि दिवसभर कोणी सोबत राहावे लागणार अशी वेळ आली तर मी मुलीवर भार टाकण्यापेक्षा वृद्धाश्रमात राहणे योग्य समजेन.

In reply to by काजुकतली

इन्द्र्राज पवार 03/10/2010 - 12:33
"....अशी वेळ आली तर मी मुलीवर भार टाकण्यापेक्षा वृद्धाश्रमात राहणे योग्य समजेन...." ~~ अभिनंदनीय करावे असा समंजसपणा या निर्णयातून दिसून येतो. म्हणजे अशी वेळ येऊ नये असेच मी म्हणेन, परंतू जर यदाकदाचित आलीच तर 'एका घराच्या सोप्यातून दुसर्‍या सोप्यात मी गेले...' अशी भावना मनी असेल तर पुढे येऊ वाटणार्‍या समस्या या जटील वाटत नाही. इन्द्रा

यशवंतकुलकर्णी 02/10/2010 - 23:44
एका म्हातारीला तर, अक्कलकोटला नेतो असं सांगून मुलानं इथे आणून सोडलंय.
कितीही क्रुर मुलगा असला तरी असे करील हे पटत नाही. चित्रपटात पब्लिकला रडवण्यासाठी टाकलेल्या सीनसारखे वाटले. कल्पना जास्तच ताणलीय असे म्हणावे वाटते. ही सत्यकथा असेल तर त्या वृध्दाश्रमाचा पत्ता द्या. त्या बाईंची सोय लाऊ.

काजुकतली 02/10/2010 - 23:52
कुलकर्णीसाहेब, त्याने निदान खोटे बोलुन वृद्धाश्रमात सोडले. इथे निदान शारिरीक हाल तरी होणार नाहीत. पण खोटे बोलुन रस्त्यावर सोडणारे कितीतरी आहेत. मागे पेपरात वाचलेले नाशिकला कुंभमेळा भरलेला तेव्हा ब-याच जणांनी नको असलेले म्हातारे नातेवाईक तिथे आणुन सोडले.

यशवंतकुलकर्णी 03/10/2010 - 00:00
:( खरंच? काहीकाळ पेपरमध्ये काम केल्याने टेबलन्यूज (कुठंही न जाता टेबलाशी बसल्या-बसल्या लिहीलेल्या बातम्या) कशा लिहीतात ते पाहिलंय. त्यामुळे अशा बातम्यांवर विश्वास किती ठेवायचा याबद्दल साशंकता आहे. खरंच असं घडत असेल तर नाशिक तसंही फार लांब नाहीय महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपर्‍यातून. गेले असतील ते लोक परत आपापल्या घरी.

सद्दाम हुसैन 03/10/2010 - 00:51
वल्लाह , एक पठाण को इमोशनल कर दिया ऊई ! हम तो यहा हसने को आता है लेकिन आप जैसा कोइ झट से आन्ख मे आसु ला देता है ! बहुत सेन्टि ! बहुत सेन्टि!!
हात घातला आहात. उगा पाप-पुण्य अश्या बालीश भावूक आवरणात विषयाची बोळवण करु नका. तुमचा झाला लेख पण महत्वाचे मुद्दे, उपाय, चर्चा याचे काय?

In reply to by सहज

दिनेश५७ 03/10/2010 - 10:09
हेच अपेक्षित होते. ही कथा लिहिताना, या गंभीर विषयावर चर्चा व्हावी ही अपेक्षा होतीच. वरिष्ठ नागरिकांकडे होणारे दुर्लक्ष, उपेक्षा हा चिंतेचा विषय आहे, हे अगोदर पटवून घेतले पाहिजे असे मला वाटते. वृद्धाश्रम ही गरज आहे, कारण लहान घरे, नव्या पिढीच्या गरजा, व्यावसायिक व्यस्तता, जनरेशन गॅपमुळे निर्माण होणारे विसंवाद आणि मग, वृद्धांना वानप्रस्थश्रमाचा रस्ता दाखवण्याच्या प्रवृतीचे समर्थन करण्याची मानसिकता... आपण व्यावहारिकतेच्या आहारी जातो आहोत, कुटुंबव्यस्थेपेक्षाही, आर्थिक व्यवहार, भौतिक सुखांना आप्ल्या जीवनशैलीत प्राधान्य मिळू लागल आहे, आणि असे करताना, (आपल्या सोयीसाठी ) वानप्रस्थाश्रम ही गरज असल्याचे आपणच ठरवून टाकले आहे. अर्थात, वानप्रस्थाश्रमातही आपले निवृतीनंतरचे जीवन स्वखुशीने व्यतीत करणारे असतातही. तरीही, आपल्या पोटच्या मुलांच्या संसाराच्या पसार्‍यात आपल्यासाठी जागा नाही, याची खंत नक्कीच त्यांच्या मनात असतेच. यावर उपाय नाही. नाती जपण्यापेक्षा व्यावसायिक संबंधंना आपल्या रोजच्या जगण्यात जास्त महत्व आहे. कॉन्फरन्स रूममध्ये होणार्‍या मीटिंग्ज आणि कॉफी टेबलवर होणारी उलाढाल आपल्या दिवसाचे सार्थक झाल्याचे समाधान देत असल्यामुळे, आपलं काहीतरी गमावलंय, असं वाटेनासंच होत असेल कदाचित. उगीच चर्चा करण्यातही अर्थ नाही. अशा उपेक्षित वृद्धांना निदान आर्थिक अडचणी तरी असू नयेत, यासाठी सरकारच काही करू पाहातंय. म्हण्जेच, कुटुंब, पोरं, कुठेतरी कमी पडतायत अशी असंख्य उदाहरणं स्पष्ट झालेली असणार. पहा- http://maharashtra.gov.in/pdf/soc&Jus.pdf

पैसा 03/10/2010 - 09:58
दिनशनी लिहिलय सुरेख. कथा म्हणून वर्गीकरण केलंय. म्हणजे काल्पनिक आहे पण कुठेतरी त्याला सत्याचा आधार असणारच. जगात याहून भयंकर गोष्टी घडतात, मला कल्पना आहे. पण मनात असा विचार प्रथम येतो, की कोणीही मुलं आपल्या आईबापाबरोबर असं कसं वागू शकतात? पण या अतिव्यावहारिक जगात आईबापाना फसवून, कृतघ्नपणे सोडून देऊन पळ काढणं, असंही घडणं शक्य आहे. जुन्या एकत्र कुटुंबपद्धतीत हा प्रश्नच नव्हता. सगळ्यांची आपोआपच काळजी घेतली जात होती. पण आता विकेन्द्रित कुटुंबात हे शक्य नाही. काजुकतलीने लिहिलंय त्याप्रमाणे मुलांचेही काही प्रॉब्लेम्स असतात. पण माझ्या पाहण्यात असेही आलं आहे, मुलं आईबापाना बरोबर घेऊन जायला तळमळत असतात, पण आईबापच आयुष्याच्या शेवटी इतर कुठे जाण्यापेक्षा आपल्या ओळखीच्या घरी राहाणं पसंत करतात. नवीन जागी जाऊन राहाणं, नव्याने सुरुवात करणं आता शक्य नसतं. मुलंही आपाअपले कामधंदे सोडून परत येऊ शकत नाहीत. अशावेळी जे म्हातारे मुलांकडे जाऊन राहायला तयार नसतात, ते वृद्धाश्रमात जायला तयार होतील हे शक्यच नसतं. तीही स्वतंत्र मन बुद्धिमत्ता असलेली माणसंच आहेत. आणि त्यांच्या इच्छेचा आदर व्हायलाच हवा. त्याचवेळी त्यांची काळजीही घेतली गेली पाहिजे. या सगळ्याला काही उपाय नाही का? स्वतंत्रपणे राहू इच्छिणार्‍या अशा म्हातार्‍याना मदत करण्यासाठी "कामाला माणसं मिळत नाहीत" हा नेहमीचा प्रश्न कसाही सोडवायला हवाच. थोडे जास्त पैसे द्यायची तयारी असेल तर कामाला नक्कीच कोणीतरी मिळतं. बरं, असे स्वतंत्र वृद्ध आर्थिकदृष्ट्याही मुलांवर अवलंबून नसतात. त्याना हवा असतो फक्त थोडासा भावनिक आधार. मुलं आपल्यावर लक्ष ठेवून आहेत एवढी जाणीवही त्याना पुरेशी असते. पुण्यात एक संस्था आहे, आता याक्षणी त्यांचा पत्ता माझ्याकडे नाही. पण ते जिथे गरज असेल तिथे, आजारी किंवा वृद्ध माणसांची सेवाशुश्रुषा करण्यासाठी, त्यांच्या बरोबर राहाण्यासाठी विश्वासू आणि नर्सिंग वगैरे शिकलेली माणसं पाठवतात, अगदी दुसर्‍या गावात सुद्धा. जर आर्थिकदृष्ट्या शक्य असेल तर तो एक चांगला पर्याय ठरू शकेल. यात दोघांचीही गरज भागते, आणि मुलानाही फारसं टेन्शन राहात नाही. जेव्हा जवळचं कोणी नसेल, अशा अपत्यविहीन म्हातार्‍याना मात्र वृद्धाश्रम हाच सगळ्यात चांगला पर्याय असावा. प्रत्येक माणूस वेगळा, तसेच त्याचे प्रश्नही वेगेवेगळे. त्या सगळ्याना एकच छापील उत्तर असणार नाही. त्या त्या परिस्थितीत सगळ्यात चांगला पर्याय काय आहे, याची सगळ्यानी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा हेच उचित ठरेल. बाकी आईबापाना सोडून पळ काढणार्‍यांसाठी कायद्याचा बडगा आहेच!

In reply to by पैसा

सहज 03/10/2010 - 10:55
हेच म्हणतो. जसे लहान मुलांना शाळा व डे केअर सेंटरमधे भरती करतो तसेच ज्या वृद्धांची काळजी घ्यावी लागते त्यांच्याकरता डे व नाईट सेंटर निघाली तर एक उपयुक्त व व्यवहारी तोडगा निघेल असे वाटते. हा बेस्ट उपाय आहे असा दावा नाही पण कामाच्या ओझ्यात आज लहान मुलांना जसे पाळणाघरात काही तास घराबाहेर सोय करावी लागते त्या धर्तीवर हा उपाय. खरे तर कल्पक उद्योजकांनी याकडे लक्ष दिले तर चांगला चालणारा बिझनेस आहे असे वाटते, अश्या ठिकाणी काम करायला प्रशिक्षीत मनुष्यबळ (उर्फ वॉर्ड बॉय, नर्सिंग यांचे पदविका कोर्सेस) कारण वैद्यकिय समस्या असलेल्या वृद्धांशी कसे वागावे, बोलावे याकरता प्रशिक्षण हवेच नाहीतर वेगवेगळ्या आश्रमातुन रुग्ण / बालक / महीला यांना मिळणार्‍या वागणुकीची धक्कादायक वार्ता अधुन मधुन वृत्तपत्रातुन वाचायला मिळतेच.

इन्द्र्राज पवार 03/10/2010 - 12:50
"कितीही क्रुर मुलगा असला तरी असे करील हे पटत नाही. चित्रपटात पब्लिकला रडवण्यासाठी टाकलेल्या सीनसारखे वाटले. कल्पना जास्तच ताणलीय असे म्हणावे वाटते...." + वर श्री.यशवंतराव कुलकर्णी यांनी दिलेल्या या प्रतिसादाशी सहमत. जरी हे लिखाण 'कथा' गटातील असले तरी यातील प्रकटनात सत्याचा काही अंश आहे असे थोडावेळ गृहीत जरी धरले तर काही शक्यता नजरेसमोर येतात. १. कथेत घटना सांगणारा लेखकाला म्हणतो, "बिचारी दोन दिवसापासून वाट पाहात आहे....." आणि "नव्वदीची बाई..." असाही उल्लेख आहे. म्हणजेच बाईचा जन्म १९२० चा धरला तर त्या काळातील चालिरितीनुसार तिचा विवाह १९३५ ते १९४० च्या दरम्यान झाला असल्याची शक्यता आहे. तरीही मॅक्झिमम प्रॉबेबिलिटी तिच्या वयाच्या २० व्या [म्हणजेच १९४०] झाला असेल. आता हे जे कोणी थोर थोर चिरंजीव आहेत त्यांच्या जन्म १९४२ ला गृहीत धरू या. म्हणजेच आज त्यांचे वय चक्क ६८ वर्षाचे (कथानकातील घटना चालू वर्षातील आहे असे मानले आहे वाचकांनी...). २. प्रश्न असा येतो की, ६८ वर्षाचा हा गृहस्थ [जो खुद्द सरकारी व्याखेनुसार सीनिअर सिटीझन आहे] नव्वदीच्या आईला "टाकून" देण्याचे कृत्य करेल? अन् तेही तिच्या हातातील गळ्यातील दागिने काढून घेऊन ? त्यातही हा ' ६८ वर्षाचा मुलगा' चांगला बंगलेवाला आहे असेही चित्र आहे. [कथेत मुलींना शिकविले, डॉक्टर केले वगैरे असे उल्लेख आहेत....मग या साळकायांना आपल्या आईची कणव आली नसेल तर मग या आईने त्यांना शिक्षण दिले तरी कसले? ] इन्द्रा (ता.क. : श्री.दिनेश यांच्या कथेतील भावनेविषयी मात्र १००% सहमत आहे....शंका आहे ती या उदाहरणाविषयी...इतकेच.)

विनायक प्रभू 03/10/2010 - 14:10
वृद्धाश्रमातील प्रत्येक अ‍ॅडमिशन ची एक वेगळी कथा असते. बहुधा हॉरर स्टोरीच असते. माळ वगिरा फक्त ग्रॅज्युएशन. पीएच्डी ला काय म्हणाल? ३ वर्ष मनिजर वृद्धाश्रम विप्र

जाई अस्सल कोल्हापुरी 03/10/2010 - 14:37
.... विचार करण्यासारखी गोष्ट आहे.... ! पण इथे एक बोलाव वाटत.... कधी कधी काही वडिलधारे पण विक्षिप्तपणा करतात्....माझे एक मामा आजोबा आहेत. रिटायर्ड फोरेस्ट ऑफिसर्....दोन्ही मुल्..म्हणजे माझे मामा....अतिशय् प्रेमळ्... well settled..! त्यान्च्या बायका पण तशाच लाघवी... ! त्यामुळे कधीहि त्यान्च्या कडुन आजोबा - आजी चा अपमान होण / वाईट वागणुक मिळण शक्या नाही. नातवन्ड तर अ़क्षरश: तळ्तळ करतात की आजी आजोबानी आप्ल्या घरी रहाव म्हणुन... पण आजोबा?......मुद्दाम वॄद्धश्रमात राह्तात...... आहे कि नाही गम्मत्?...आणि अलिकडे नाहि .....जेन्व्हा रिटायर्ड झाले ना तेन्व्हा पासुन! ...त्यामुळे कोणतहि नात जपायची जबाब्दारी दोन्हीकडे असते...

विनायक प्रभू 03/10/2010 - 14:43
मला नाही वाटत. मेबी ही वॉन्ट्स हिज ओन स्पेस.

In reply to by विनायक प्रभू

जाई अस्सल कोल्हापुरी 03/10/2010 - 15:02
..... own space?...when is and his wife needs intence care to be taken! त्या दोघांनाही माहिती आहे के त्यांना त्यांची space पुर्ण दिली जाईल्.सुदैवाने financially sound आहेत मुलं.आणि आजोबांची ही स्वतःची आर्थिक स्थिती अगदी उत्तम म्हणता येईल. घरी मामी स्वयंपाक पाणी उत्तम पहाते.मी म्हणाले तशी खुप वेगळ्या विचरांची माणस आहेत ती.कुठेच प्रोब्लेम नाहिये. पण मग अशी स्वतः ची अनावस्था का बरे करून घ्यावी?

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

शिल्पा ब 04/10/2010 - 08:45
थोडे दिवस मजेत जातील पण नंतर कटकटी सुरु होतील असे वाटल्याने त्यांनी हा पर्याय स्वीकारला असेल...पैशाची बाजू भक्कम असल्याने केवळ देखभालीसाठी अन समवयस्कर लोकात रमण्याची सुविधा असल्यानेही त्यांनी हा मार्ग निवडला असू शकतो. आणि आपण कोण ठरवणार अनावस्था का उपयोगी ते?

प्रकाश घाटपांडे 03/10/2010 - 15:14
आमचे भाकीत
भविष्यात वृद्धाश्रमाला पर्याय म्हणुन इच्छामरण ही संकल्पना मान्य होईल. आता जगणं नकोस झाल म्हणुन कि जगण पुरेसं झाल म्हणुन हा प्रश्नाचे उत्तर व्यक्तिसापेक्ष असेल.

तिमा 03/10/2010 - 15:22
त्या आजोबांचे मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. आम्ही आता साठीच्या जवळ आलो आहोत. मुलं आपल्याला संभाळतील ही अपेक्षाच ठेवू नये असे माझे मत आहे. माझी मुलं मला सांभाळतीलही, पण मीच हातपाय हलत आहेत तोपर्यंत वेगळा रहाणार व अगदीच दोघांना होत नाही असं लक्षांत आलं की वृध्दाश्रमात दाखल होणार! आपला त्रास कोणालाही होता कामा नये असं वाटलं तर त्यांत चूक काय ?

जाई अस्सल कोल्हापुरी 03/10/2010 - 15:37
...आपण शहाणे व्हायला काही हरकत नाही. एक ठराविक वय झालं की हा नात्यांचा मोह सोडुन वान्प्रस्थाश्रम स्वतः स्विकारायला हवा. म्हणजे आजोबांची दूरदृष्टी म्हणावी लागेल. मत सुधारल्याबद्दल तिरशिंग भाऊंचे धन्यवाद!
या स्टोरीवर विश्वास बसला आहे. जिथे पैसा, शेती, वाटण्यांसाठी खून करतात त्यासमोर वृद्धश्रमात सोडणे काही क्रूर वगैरे नाही. असे करू नये हे मात्र मान्य! या प्रसंगामुळे 'आजची पिढी म्हणजे ना......' असे मत बनवण्याची मात्र घाई होते असे वाटते. आजकालची मुले बदलली आहेत हे मान्य पण आजीआजोबा तरी तसेच कुठे राहिलेत? माझ्या नऊवारी साडीतल्या आजीच्या सासूबाई म्हणजे माझी पणजीबाई ही लहान वयात म्हणजे चाळीशीत गेली. पस्तीशीतच तिने म्हणे देव देव, जपजाप्य सुरु केले होते. माझी आजी सत्तरीची झाली तरी अमकी यात्रा, तमके देऊळ असे फिरत असे. जनताबसमधून जायची तिची तयारी नसे.....मग कारने! अगदी पंचाहत्तरीत असताना माझ्या चुलतभावाच्या लग्नात नेहमीप्रमाणे तिने प्युअरसिल्कची नऊवार घेतली होती. मॅचिंग रुमाल वगैरे! आई आणि काकवा यांना कधीकधी सासूबाईंमुळे स्फुर्ती येऊन त्या नीटनेटक्या रहायच्या. अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी चालताना त्रास होत असे म्हणून आजोबांचा हात धरून जवळच्या देवळात जायची. खूपच मोकळ्या विचारांची (तिच्यापुरती तरी;)) होती. आता आई आणि सगळ्या काकवा किंवा माझ्या सासूबाई या पूर्ण नव्या जमान्याच्या आज्ज्या आहेत. "आता आमचे असे किती दिवस राहिलेत!" अश्या टाइप बोलणं नसतच. या वर्षी आम्ही (त्यांचे ग्रुप्स) कोठे फिरायला जाणार असे बोलतात. आधी वर्षातून दोनेकवेळा रेस्टॉरंटमध्ये जाणारे अठवड्यातून तीनेकवेळा तरी जात असतील. त्यांना आमच्याकडे यायला अजिबात आवडत नाही. मुख्य कारण म्हणजे ते मनाने लगेच परावलंबी होतात, तो विचारच न पेलवणारा असतो. माझ्या सासर्‍यांच्या काकू म्हणजे चतुरंगाच्या पणजीबाई अजूनही त्यांच्या मुलाकडे रहात नाहीत. त्यांनाच ते नको आहे. सून मुलगा अजिबात क्रूर वगैरे नाहित. या सगळ्यांना आता त्यांचं वृद्धत्व (तसं म्हटलेलं चालत नाही हं!) एंजॉय करायचं आहे. सगळ्यांना डायबिटीस, हाय / लो बिपी आणि काय काय झालय पण अजूनही तरूण असल्यासारखं वाटतं. आम्ही काळजीनं अर्धेमेले होतो पण उपयोग नाही म्हणून आता शिकलोय बरच!;) बदलणार्‍या दुनियेत त्यांनाही नवंनवं वाटतं. मॉलमध्ये जाउन खरेदी करायचा आम्हाला भयानक कंटाळा आहे पण ते मात्र शॉपिंग करत असतात. हे सगळेजण मध्यमवर्गीयच होते पण आधीच्या बचतीच्या सवयींमुळे झालेले नवश्रीमंत म्हणावे लागेल.:) त्यांच्यामते, त्यांची लग्नं झाली तेंव्हाच्या आईवडील, भावाबहिणींच्या जबाबदार्‍या घेउन, मुलांना वाढवून झाले आता तर मजा करायची. नातवंडांचा दिवसभराचे दंगा चार दिवस गोड वाटतो (त्यांच्याच भाषेत 'गोकुळ'). नंतर नंतर त्यांना नको वाटते हा माझा तरी वैयक्तीक अनुभव आहे. मुलं म्हटल्यावर त्यांच्या शाळांच्या वेळा, परिक्षा, दहावेळा खाणीपिणी, वेगळाले क्लासेस या गोंधळात त्यांचं पथ्यपाण्याचं जेवण आणि आवडीनिवडी सांभाळताना झालेली तारांबळ त्यांनाच आवडत नाही. लेखात दिलेले उदाहरण हे श्रीमंत मुलाच्या आईचे आहे म्हणून या प्रतिसादात आर्थिकदृष्ट्या दुर्बल वृद्धांचा विचार केलेला नाही. त्यांचे प्रश्न गंभीर आहेत हे मान्य!

शिल्पा ब 04/10/2010 - 08:58
माझं म्हणणं काय हरकत आहे वृद्धाश्रमात राहण्यासाठी? माझी आजी, वडिलांची आई आता आजोबा नाहीत - तर मी जरा १० एक वर्षाची असल्यापासून आमच्याकडे मधूनमधून यायचे (गावी राहतात- वाड्यात), पण गेले कि इतर सगळ्यांना सांगणार कि कशी शिल्पा नवीन हिंदी गाणी ऐकते, कसा दिवसभर अभ्यास करत नाही, दंगामस्ती करते वगैरे....आता त्या वयात अजून काय करणार ..पण मी मार खाल्ला... आता माझी चुलत बहिण जी माझ्यापेक्षा बरीच लहान आहे...तिच्याबद्दल अगदी हेच चालले आहे...काकू चिडते...चीडणारच...तरुण म्हणण्यापेक्षा या काळातील पौगंडावस्थेतील मुलांनी काय करावे...आणि काहीही वाटत असले तरी वयाला साजेसे अन त्या त्या काळात जे आहे तसेच ते वागणार...आता एवढी चार चार मुले अन स्वतःचा वाडा (मोठ्याने सगळे घेऊन सुद्धा) आहे म्हंटल्यावर बाहेर राहायची गरज नाही पण तरी स्वतः विचार नको का करायला आजीने? पण ... हा पणच तर आहे..

सहज 04/10/2010 - 09:24
मला भारतातल्या वृद्धाश्रमांबाबत विशेष माहीती नाही पण धर्माथ, देणगीवर चालवलेले वृद्धाश्रमापेक्षा, रिटायरमेंट होम्स अशी कल्पना पुण्यामधे परांजपे बिल्डर्स यांनी सुरु केली होती. 'अथश्री' या व अश्या प्रकल्पांबद्दल कोणी अजुन माहीती देउ शकेल काय? चोप्य पेस्त बद्दल क्षमस्व At Athashri special attention has been given to amenities that best suit the requirements of the elders. Medical facilities Doctors on call Paramedical ambulance fully equipped with emergency equipment Primary health centre Special diet food in the canteen Other value added services Shuttle bus service Sophisticated electronic systems that provide 24-hour professional security Internet cafe with broadband connectivity Gym & clubhouse Library Community halls and lots more

३_१४ विक्षिप्त अदिती 08/10/2010 - 13:00
असेही अनेक म्हातारे पाहिले आहेत जे मुलांच्या नोकरीनुसार स्वतःचं घर बदलू इच्छित नाहीत. स्वतंत्र रहाणं ज्यांच्या तब्येतीला झेपतं त्यांचा प्रश्नच नसतो. माझे सख्खे आजोबाच, कर्जतच्या पुढे थोडी शेती आणि घर होतं तिथे राहिले. नोकरीची वीस वर्ष झाल्यावर कुळकायद्यामुळे जमीन जाऊ नये म्हणून नोकरी सोडली; तिथेच एका कातकरी गुराखी मुलाला लहानाचा मोठा केला. त्याने दारू पिऊ नये म्हणून प्रयत्न केले, (आज आख्खी कातकरी वाडी दारूपासून लांब आहे) तो तिथेच राहिला. ९२ व्या वर्षी आजोबा दिवाणावरून पडले, डोक्यातून रक्त गेलं. आमच्याबरोबर शहरात येण्याची, हॉस्पिटलमधे जायची त्यांची इच्छा नव्हती. त्याच गुराखी मुलाने, नारायण काकाने, आजोबांचं सगळं केलं. महिन्याभरात आजोबांनी खाणं-पिणं सोडलं आणि त्यानंतर पाच दिवसात सगळं संपलं. याउलट माझी एक नातेवाईक, जवळची म्हणावी अशी मैत्रीण! तिच्या वडलांना स्वतःपुरतंच फक्त आता करता येतं, तरीही बसल्याजागी मैत्रिणीवर रॅगिंग सुरू असतं, गॅसची शेगडी का बदलली आणि नवीन टीव्ही का आणला वगैरे वगैरे! नोकर्‍यांचं स्वरूप इत्यादींमुळे हे प्रश्न निर्माण होणारच. पण कोणत्याही वयात आपल्यासारख्या लोकांशी मैत्री करता आली तर प्रश्न सोडवणं कठीण जाऊ नये. वृद्धाश्रमातही आपले मित्र बनवले किंवा घरातल्याच पुढच्या पिढीशी मैत्री झाली (हे उदाहरण मी पहाते आहे.) की असे प्रश्न निर्माण होत नाहीत. (बर्‍याचदा) प्रश्न येतो तो (दोन्ही बाजूंनी) तडजोडी न करण्यात.