माझी मास्तरकी !
पुण्यातली बुधवार पेठ 'अनेक गोष्टींसाठी' प्रसिद्ध(!) आहे.याच वस्तीतल्या लोकांशी माझा अगदी जवळचा सबंध आलेला आहे त्याविषयी थोडंसं....
२००६ सालची गोष्ट्,पुण्यातल्या माझ्या एका ओळखीतल्या एका गृहस्थांनी 'मामाचं गाव' असा एक उपक्रम राबवला होता. कुणासाठी? तर ज्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत जायसाठी मामाचं गावच नाही अशां मुलांसाठी. ही मुलं कोण? तर बुधवार पेठेतल्या वेश्याव्यवसाय करणार्या स्त्रियांची!
ही मुलं ८ दिवस रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत आमच्याकडं येत. त्यांना रमवण्यासाठी आम्ही रोज वेगवेगळे खेळ्,चित्रकला,मातीकाम इ. गोष्टी करायचो.त्यातच एके दिवशी ज्या संस्थेतर्फे ही मुलं आमच्याकडं येत त्यासंस्थेच्या ताई आमच्याकडं आल्या,त्यांच्याशी गप्पा मारताना या मुलांबद्दलच्या अनेक गोष्टी कळत गेल्या.
या मुलांच्या आयांचा वेश्याव्यवसाय हाच मुख्य पेशा होता. त्यांबद्दल बोलताना ताई म्हणाल्या,"अरे ज्या खाटेवर यांच्या आया गिर्हाईकांबरोबर असतात्,त्याच्याच खाली यातली लहान मुलं झोपलेली असतात." माझ्या अंगावर सर्रकन काटा आला,एवढं उघडं वाघडं सत्य माझ्या मुर्दाड मनालासुद्धा पचलं नाही. अशा अनेक गोष्टींतून्,मुलांच्या सहवासातून त्यांच 'जिणं' माझ्यासमोर उलगडत गेलं.
शेवटच्या दिवशी मी ताईंना विचारलं,"ताई , मी तुम्हाला काय मदत करू? (आर्थिक सोडून ! त्यावेळी माझाच पडता आणि बेकारीचा काळ सुरू होता.) ताई म्हणाल्या तुला काय जमेल द्यायला? मी म्हणालो सध्या फक्त वेळ ! मग जरा चर्चा करून मी ८वी-१०वीच्या मुलांना सकाळच्या वेळेत शिकवावं असं ठरलं.(८वी-१०वीची मुलं बाहेरच्या शाळेत जात्,संस्थेची शाळा १ली - ७ वी पर्यंतच)
आजकालच्या मुलांना पहीली दुसरी पासूनच ट्युशन लावतात्,पण यातल्या १०वीच्या मुलांनासुद्धा ते परवडायचं नाही. मग त्यांच्या शाळेआधी त्यांना गणित्,ईंग्लिश्,सायन्स(जवळ्पास सगळेच विषय थोडेफार) शिकवायची जबाबदारी मी घेतली.
शाळा सुरू झाल्यावर मंडईतल्या एका केळांच्या भट्टीच्या मागच्या बाजूला असलेल्या शाळेत आमचे सकाळचे वर्ग सुरू झाले.या मुलांच्यात शिकायची प्रचंड तळमळ होती. शिकवता शिकवता त्यांच्याशी माझी मैत्रीच होउन गेली. सकाळी ०८.३० ते ११ पर्यंत आमचे वर्ग चालायचे,आम्ही सगळेच बरोब्बर साडेआठाला हजर व्हायचो. कधीतरी एखादा/एखादी वेळानं यायचे,वेळ का झाला? म्हणून विचारलं तर रात्री २वा.,३वा झोपलो असं उत्तर मिळायचं.(कारणं ही वाढलेली मुलं आईच काम पूर्ण झाल्याशिवाय घरात झोपायलाच यायची नाहीत)
स़काळचा क्लास ११.०० वा संपला की ही मुलं शाळेला जायला निघायची. त्यांना डबा वगैरे चैनी माहीतच नव्हती,घरातनचं ५-१० रु. मिळायचे.(१ली - ७वीच्या मुलांना मात्र शाळेत जेवण मिळायचं) आणि रात्रीच जेवण म्हणजे आम्लेट्,बुर्जीपाव इ.
एका शनिवारी या मुलांच्या पालकांच्या(!) भेटीचा कार्यक्रम होता,मलाही बोलावलं होतं. तेंव्हा या मुलांच्या आयांना भेटायचा भेटायचा योग आला. अगदी साध्या साड्यात,किंचीत सुजलेल्या डोळ्यांच्या,अशा त्या सभेला आलेल्या होत्या. माझं फारसं काही काम नव्हतं,पण तरीही सगळ्या माझ्याशी २-२ शब्द बोलल्या,मीपण बोललो.
थोडे दिवसांनी श्रावणात आमच्या वर्गातल्या मनोजच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती,सगळ्यांना आमंत्रण होतं,बाकी सगळे सकाळी जाणार होते,पण मला जमणार नव्हतं,मी संध्याकाळी यायचं कबूल केलं. संध्याकाळी ७च्या सुमाराला मला न्यायला शाळेपाशी मनोज्,बंडु,शंकर्,दीपक असं मित्रमंडळ हजर होतं.
मंडई ओलांडून,बुधवार पेठेतल्या अरूंद आणि गर्दीनं भरलेल्या रस्त्यानं आम्ही निघालो. रस्त्यात आम्लेट्,वडापाव इ.च्या गाड्या ,पानपट्ट्या,बाजूला दारूचं दुकानं अशा एका मोडक्या चाळीसारख्या इमारतीच्या पायर्या चढून आम्ही दुसर्या मजल्यावर गेलो. जिन्यातच पायर्यांवर उभारलेल्या गिर्हाईकांशी,आपसात गप्पा मारणार्यांना चुकवत, मनोजच्या खोलीच्या दाराशी पोचलो. बाहेरच्या गॅलरीत अनेकजणी मेकप करून्,गुटखा पान चघळत उभ्या होत्या.
खोलीच्या आतलं वातावरणं मात्र पूर्ण वेगळं होतं.एकच खोली पण अगदी लख्खं. एका कोपर्यात पूर्व पश्चिम बघून पूजा मांडलेली. एका कोपर्यात स्टोव्ह. एका कोपर्यात छोटी न्हाणी त्याला पडद्याचा आडोसा. एक कॉट व त्यावर बैठक.
मी गेलो,बसलो. मनोजची आई हसतमुखानं समोर आली,विचारपूस केली. मी उठून दर्शन घेतलं,तिर्थप्रसाद घेतला. स्टोव्हवरच्या उकळत्या मसाले दुधाचं एक भांड्भरून माझ्यासमोर आलं. बाहेर खिडकीतनं,गॅलरीतनं अनेक डोळे कुतुहलानं आमच्यावर खिळलेले.
मी दुध पिताना मनोजच्या आईनं त्याच्या अभ्यासाविषयी चौकशी केली,बाकीच्या मुलांच्या आयासुद्धा आल्या.मनोजच्या आईच्या 'मावशीबाई' सुद्धा येउन गेल्या. मग मुलांच्या अभ्यासाबरोबरचं माझीसुद्धा चौकशी झाली. घरी कोण कोण ? असे प्रश्न झाले. त्यांच्या बोलण्यातून मला 'आपल्या जगाविषयी' असलेली त्यांची उत्सुकता जाणवत होती.
तासभर गप्पा झाल्यावर मी जायला निघालो,मनोजच्या आई मला डोक टेकवून पाया पडल्या,पाठोपाठ मुलंही. मला अगदी बावरून गेल्यासारख्म झालं,मग एका वारकर्यानं दुसर्या वारकर्याच्या पाया पडावं तस मीही त्यांना नमस्कार केला.तो नमस्कार मी त्यांच्या मनाच्या पावित्र्याला होता.
जाता त्यांनी मला ५१ रु. दिले,म्हणाल्या पुढच्या वेळेला कोल्हापूरला जाल तेंव्हा अंबाबाईची ओटी भरा !
आता मी सुद्धा माझ्या व्यापात अडकलो,घर बदललं तस शिकवायला जाणंही सुटलं. पण अजूनही रस्त्यात कॉलेजला जाणारी ही मुलं भेटतात्,एखाद्या राणीचा,पुनमचा कॉईन बॉक्सवरून फोन येतो,२-५ रुपये खर्च करून त्या माझ्याशी बोलतात.यांच्या हसर्या चेहेर्यामागं अनेक कथा आणि व्यथा दडलेल्या असतात्,त्यांच्याविषयी परत कधीतरी !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नाही पचवू शकणार हे हलाहल ..
नाही पचवू शकणार हे हलाहल !!!!
नाही पचवू शकणार हे हलाहल ..
:-)
लेख आवडला... आपल्या पुढील
नि:शब्द
जिप्सी, तुमचे कौतूक वाटले !
दु:खी करणारे लेखन!
जबरदस्त !! सलाम !!!