Skip to main content

रसिया मुठिया

रसिया मुठिया

लेखक मितान
Published on गुरुवार, 16/09/2010
सध्या एका गुजराती मैत्रिणीच्या सासूबाई बेल्जियम भेटीला आल्या आहेत. या गुजराती सुगरणीच्या हातचा एक पदार्थ परवा खाल्ला. चटकन होणारा , रुचिपालट म्हणून चविष्ट आणि रसदार असा हा पदार्थ माझ्या सर्व खवैय्या मित्रमैत्रिणींसाठी - सामग्री - शिजवलेला भात - २ कप ( दुपारचा उरलेला असेल तर अजून उत्तम ) बेसन - अर्धा ते पाऊण कप ताक - ५ ते ६ कप आले लसूण पेस्ट - २ चमचे लाल तिखट - १ चमचा ( आवडीनुसार कमीजास्त करा) हळद - अर्धा चमचा हिंग , मोहरी, जिरे, कढिपत्ता, तेल फोडणीसाठी अर्धा चमचा साखर, एक चमचा तूप कृती - एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर एक चमचा आलं लसूण पेस्ट व कढिपत्ता घाला. थोडी हळद आणि लाल तिखट घाला.वरून चमचाभर बेसन ताकात मिसळून ते फोडणीत घाला. गॅस बंद करून टाका. आता मुटक्यांसाठी भात घ्या. त्यात बेसन, उरलेली आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ आणि चिमुटभर हिंग घाला. हाताला थोडे तेल लावून हे मिश्रण चांगले मळून घ्या. त्याचे मुटके वळता यावे एवढे मऊ मळून घ्या. प्रत्येक वेळी हात पाण्यात बुडवून मुटके वळून घ्या. कढई ठेवलेला गॅस चालू करा. फोडणी घातलेले मिश्रण चांगले उकळू लागले की त्यात हळू हळू एकेक मुटका सोडा. मुटके सोडल्यावर न हलवता कढईवर झाकण ठेवा. जेवणाची तयारी करा. ५ मिनिटात मुटके शिजून वर आलेले दिसतिल. त्यात अर्धा चमचा साखर आणि चमचाभर तूप घाला.असेल तर कोथिंबिर पेरा. एका वाडग्यात तयार रसिया मुठिया घ्या. वर अजून एक चमचाभर तूप घ्या आणि खा. ज्यांना कढीभात आवडतो त्यांना हा पदार्थ नक्की आवडेल. तुमच्या प्रतिक्रीया भलानी मावशींना कळवतेच :)

याद्या 7855
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

आईशप्पथ काय टायमिंग हाय! जेवण बनवायलाच चाललो होतो तेवढ्यात ही पाकृ दिसली! 'सोपे नि झटपट' क्याटेगरीतली दिसते आहे. भातसुद्धा उरलेला आहेच! आत्ताच करून फोटोरूपी पर्तिसाद देतो. :D मितान, लै भारी गो!

@ पुष्का, मेव्या, मी बेसन आणि भात मिसळण्याची पायरी लिहायची विसरले. :( >>आता मुटक्यांसाठी भात घ्या. त्यात बेसन आणि उरलेली आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ आणि चिमुटभर हिंग घाला. हाताला थोडे तेल लावून हे मिश्रण चांगले मळून घ्या.

झाले! आत्ताच हादडले! लै भारी गो मितान! मला मी हा आयटम बनवीत असताना मला सतत मार्गदर्शन करणार्‍या मितानबैंचा 'ऑल इंग्लंड ब्याचलर पाकृ मंडळा'तर्फे आगामी 'लंडन कट्ट्या'च्या वेळी जाहीर सत्कार करण्यात येईल आशे मी जाहीर करीत आहे! फोटू नीट आला नाहीये. पण प्रूफ म्हणून पुरेसा आहे! ;)

सोपा असावासे वाटते. आणि चविष्टही.

फोटू आणि पाकृ वेगळीच दिसतीये. पहिल्यांदाच ऐकला हा प्रकार्....म्हणजे वाचला! चविष्ट असणार!

छान आणी सोपी पाकृ :)

आधी फक्त नाव ऐकलं होतं ("राहुल, नाम तो सुना होगा" सारखं!) आता करूनही पहाते.

मस्त! नक्की करुन बघणार! मला अशाच पाककृती आवडतात! सोप्या,झंझट नसलेल्या आणि पटकन होणार्‍या...

सोपी आणि सुटसुटीत पाकृ आहे गं मितान. लगेचच करून पाहते. :)

उद्या मुद्दामून भात उरवणार आहे!

वेगळी दिसते आहे पाकृ, करुन पाहिले पाहिजे. तसेही भात उरतो तेव्हा फोभा, दहीबुत्ती करुन खायचाही कधीतरी कंटाळा येतो.. स्वाती ९तसेही भा