✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग अंतिम

म
मितान यांनी
Mon, 09/13/2010 - 03:35  ·  लेख
लेख
नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग १ नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग २ नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ३ नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ४ सकाळ पावसात उजाडली. आजच्या प्रवासाला ' मजल दरमजल ' हे एकच नाव शोभले असते. भुरभुर पावसात बर्गन ला टाटा केले नि रेल्वेने जाऊन पोहोचलो वॉस ला. दोन बाकडे नि एक कॅफे असलेले नि एक कॅफे असलेले हे स्टेशन. एका बाजूला तळे नि तळ्याशी लगट करत रांगणारा रस्ता मग उगाच खोडकरपणे वर डोकं काढणारी एक टेकडी नि त्यावर उतारावर सरळ उभे रहाताना होणारी त्रेधातिरपिट दिसू न देण्याचा प्रयत्न करत असलेली घरे ! आणि आमचे सोबती.. रेल्वेचे रूळ ! एक मस्त झोका घेत वळणावर नाहीसे होत जाणारे... ! अवघ्या पाऊण तासात अजून काय काय बघायचं माणसानं ! VOSS VOSS आता पुढचा टप्पा बसचा. हे पण डायवर मामा आज खुषीत दिसत होते. बस चटकन भरली नि निघालीसुद्धा. आता जायचंय गुडवांगनला. एक प्रवासी गट वाटेत एका रिसॉर्टला उतरणार होता. ते रिसॉर्ट आले नि तिथे उतरणार्‍या, राहाणार्‍या लोकांबद्दल अगदी तीव्र असूया मनात दाटून आली. हे ठिकाण आपल्याला का नाही सुचले म्हणून स्वत:वर चिडचिडही झाली. ती जागाच तशी होती. एका डोंगराच्या अगदी कड्यावर ते हॉटेल बांधलेले होते. चहू बाजूंनी डोंगररांगा, समोर खोलच खोल दरी, आणि यावर कडी म्हणून त्या दरीत कोसळणारा प्रचंड धबधबा ! dhabdhaba तेवढ्यात आमच्या चालकरावांनी सांगितलं की म्हणे क्यामेरे तयार ठेवा. पण सीटबेल्ट बांधून जागेवरच बसून रहा. फोटो काढण्यासाठी उभे वगैरे राहू नका. नियम पाळण्याच्या बाबतीत आपण एकदम भारी. तस्सेच केले. बस थोड्या कच्च्या वाटणार्‍या रस्त्यावरून पक्क्या पण अगदी अरुंद रस्त्यावर आली. सगुणाचं एक खेळणं आहे. नागमोडी घसरगुंडी. त्याच्या डो़क्यावरून आपण कार किंवा बस सोडायची..दोन सेकंदात सुळ्कन खाली घसरत येते. हा रस्ता तस्सा होता ! आता आमची बस पण तशीच सुळ्कन खाली गेली नाही म्हणजे बरे ! आपल्या कर्नाटकातले ऊटी, कोडाई वगैरे रस्ते आधी अनुभवले होते म्हणून बरं. नाहीतर रामरक्षा कधीच सुरु झाली असती ! valan हेअरपिन का काय म्हणतात तशा वळणावरून बस तुरुतुरू चालली होती. शेजारी धबधबा दिसत होता. फोटो काढण्यासाठी कुणी हौशी उठला की चक्रधारी ( हो, आता या क्षणाला ते सारथी, चक्रधारी सगळे होते!) समोरच्या आरशातून एक मिश्किल कटाक्ष टाकायचे. आणि बहुतेक आरशातून आपल्याकडे बघण्याच्या नादात सर्वांना एकत्र मोक्ष मिळू नये या भितीनेच हौशी खाली बसायचा. दुसरे वळण आले की पुन्हा फोटोंची घाई व्हायची. चालकराव कथा सांगू लागले. हा पक्का रस्ता बनायच्या आधी म्हणे हिवाळ्यात बर्फ पडलेले असतानाही जिवाची बाजी लावून बस चालवावी लागायची. समोर दरीत एक छोटीशी वस्ती दिसत होती. आणि काही शेतंही ! dari आम्हाला त्या तिथे पोहोचायचे होते. अगदी काळजीपूर्वक सावकाश चालत बस पोहोचली. समोरचे दृश्य जादूई होते. उंच डोंगराच्या माथ्यावर ते आम्ही पाहिलेले रिसॉर्ट मुठीएवढे दिसत होते. आम्ही जिथे उतरलो तिथे केवळ एक बोटीचा धक्का होता. आणि एक पूल. सरोवराचा सर्वात चिंचोळा भाग हा. इथे मोठी जहाजे येऊच शकत नव्हती. एका छोट्या फेरीने आम्ही पुढ्चे साडेतीन चार तास प्रवास करून फ्लाम गावी पोहोचणार होतो. gudvangan हा प्रवास मला सर्वात जास्त आवडला. छोट्याश्या बोटीवर शंभर माणसं असतील. दोन्ही बजूला उत्तुंग पहाड आणि त्यावरची खेडी. मन वारंवार त्या भागात चिकाटीनं नि जिद्दीनं राहाणार्‍या लोकांना प्रणाम करत होतं. नॉर्वे सरकारला सलाम करत होतं. या गावांच्या अगदी जवळून आम्ही जात होतो. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या पाकळ्या समोर दिसत होत्या. एक त्यातल्यात्यात मोठं गाव लागलं. तिथे म्हणे आजुबाजूच्या वस्त्यांवर राहाणार्‍या मुलांसाठी १०० वर्षांपूर्वी शाळा सुरू झाली. एक गाव फक्त मृत लोकांचे ! म्हणजे आजूबाजूच्या गावातून अंत्यविधीसाठी तिथे जायचे. मध्येच एक सोनेरी पाकळी दिसली. अवघी ५ घरं असणार्‍या एका गावच्या (?) धक्क्याला आमची फेरीबोट उभी राहिली. खाली सायकलरिक्षासारख्या एका गाडीत पोस्टमन काका उभे होते. फेरीवरून एक पार्सल खाली फेकलं गेलं नि त्यांनी ते झेललं. हे सगळं समोरच्या घरातली सत्तरीच्या घरातली आजीबाई बघत होती. पोस्टमन काकांनी तिला तिथनच हात उंचावून बहुतेक पत्र दाखवले. म्हातारी अक्षरशः दिव्यासारखी हसली! तिने आत जाऊन एक चिमुकला रुमाल आणला नि आमच्या फेरीकडे बघत फडफडवला ! वाट बघणं आणि ती फळाला येणं एवढं सुंदर 'दिसू' शकतं ? तिचा आनंद त्या रुमालाने आमच्यापर्यंत किती सहज पोहोचवला.. post इकडे फेरीमध्ये वेगळीच गंमत घडत होती. कॅफेमध्ये एकाने (बहुदा मालकाने), आम्हाला भारतातून आलात का असे विचारले. म्हट्लं हो. मग म्हणे कुठून. म्हटलं मुंबईजवळून. म्हणे पुणं माहीतय का ? आँ.. हो असे म्हटल्यावर म्हणे वाई माहितंय ?? थक्क झालो आम्ही. हा बाबा कधीकाळी वाईमध्ये गरवारे मध्ये काम करत होता म्हणे ! त्या आनंदाप्रीत्यर्थ त्याने आम्हाला उकळलेला चहा दिला ! त्याला विचारले की फ्लाम चे रेल्वे स्टेशन बोटीच्या धक्क्यापासून किती दूर आहे ? त्यावर काय बावळट लोक आहेत असा चेहरा करून तो म्हणाला," अरे बाबांनो तुम्ही फ्लाम ला जाताय न्युयार्कला चालल्यासारखं काय विचारताय ? फ्लाम हे गाव मुळी काही मीटर्स मध्ये मोजतात! " फ्लाम आलं. एक अजस्त्र बोट तिथे उभी होती. त्यापेक्षा प्रत्यक्ष गाव कितीतरी लहान होतं. इथे तास दीड तास वेळ होता. सगळीकडे हिरवाई, स्वच्छ प्रकाश आणि निर्मळ पाणी दिसत होते. flam flam आता पुढचा टप्पा रेल्वेचा. जगातल्या सर्वात सुंदर रेल्वेपैकी एका रेल्वेची आम्ही वाट बघत होतो. ही रेल्वे म्हण्जे नॉर्वेच्या इतिहासातलं एक अत्यंत कौशल्याचं आणि धाडसाचं पान. समुद्रसपाटीपासून २ मीटर वरून ही रेल्वे तासाभरात ८६६ मीटर वर असणार्‍या मिरडाल या गावी नेते. २० कि.मी. चा हा रेल्वेमार्ग बांधायला २० वर्षे कष्ट घ्यावे लागले. १९२० साली सुरू झालेले हे काम १९४० ला पूर्णत्वास गेले. १९४४ साली तेथे पहिली विजेवर चालणारी रेल्वे सुरू झाली तर १९४७ साली वाफेवरील इंजिनाची शेवटची रेल्वे धावली. २० लांबलचक बोगद्यांपैकी १८ बोगदे हे मजुरांनी हातांनी खणले. हे बोगदे सहा सहा कि. मीटर्स लांबीचे आहेत ! पैकी एक बोगदा डोंगरातच १८० अंशाच्या कोनात वळतो ! किती साहस नि किती कौशल्य पणाला लागले असेल हे बांधताना. या मार्गावरून जाताना "रारंगढांग" मनात येत होतं. flambana या मार्गावर नॉर्वेमध्ये इतरत्र न दिसणारी दुर्मिळ निसर्गदृष्य बघायला मिळतात. या जंगली, भीषण आणि तितक्याच तजेलदार निसर्गाभोवती इथे उगाच गूढतेचे वलय असल्याचे भासते. कदाचित "मिस्टेरियस" हा शब्द वारंवार गाईडच्या तोंडी येत होता म्हणून असेल असे वाटले. आणि या फ्लामबानारेल्वेने अजून एक अविस्मरणीय अनुभव दिला. एका प्रचंड धबधब्यासमोर रेल्वे थांबली. सगळे प्रवासी फोटो काढायला खाली उतरले. ही लगबग चालू असताना संपूर्ण आसमंत कसल्याश्या गोड संगीताने भारून गेला. समोर धबधब्याची गाज, गर्दी असूनही संगीत वातावरणात भिनले. धबधब्याच्या मध्येच एका कातळावर कुठूनशी एक रक्तवर्णी वस्त्र ल्यायलेली एक सुंदरी प्रकट झाली ! त्या संगीतातले शब्द कळत नव्हते पण सुरांची भाषा मात्र खूपच जवळची.. ती निश्चितच एखादी विराणी गात होती. मध्येच गायब व्हायची नि खूप अंतरावरच्या एका दुसर्‍या कातळावर दिसायची. शुभ्र पाण्याच्या पार्श्वभूमीवर ही केवळ आकृती दिसत होती. तिचे नृत्य तिची विरहगाथा सांगत होते. काही काळ काळाची पावलं तिला बघण्यासाठी, तिची व्यथा ऐकण्यासाठी जणू स्तब्ध झाली होती. कधीकाळच्या आणाभाकांना साक्षीदार असेल ते पाणी. आज मात्र त्या विरहिणीच्या व्यथेतले पाणी त्या उदंड पाण्यापेक्षा जास्त ठळकपणे दिसत होते. dhabdhaba baai समाधी भंगली ती रेल्वेने बोलावल्यामुळे. पुढचा टप्पा लवकरच संपला. रेल्वेने आम्हाला मिरडाल ला सोडले. आता शेवटचा टप्पा होता मिरडाल ते ओस्लो. हा संपूर्ण प्रवास डोंगरावरच्या पठारावरून होता. वाटेत ठिकठिकाणी हायकिंग, ट्रेकिंग साठी येणारे गिर्यारोहक दिसत होते. एक तर सायकलपटुंचा गट दिसत होता. लांबवर ग्लेशियर्स आणि तिथे पोहोचण्यासाठी निघालेले; संध्याकाळ झाली म्हणून तंबू टाकून तळ ठोकलेले लोकही दिसत होते. ठिकठिकाणी हॉलिडे होम्स च्या पाट्या दिसत होत्या. glaciers एक अचानक लक्षात आलं; इथे आजूबाजूला पर्वतरांगा नव्हत्या. कारण आम्ही खुद्द त्या पर्वतांच्या डो़यावरून रेल्वेने प्रवास करत होतो ! रेल्वे आता खाली उतरू लागली. मन आणि शरीर दिवसभराच्या नव्या नव्या अनुभवांनी शिणले होते. किती प्रवास झाला आज ! सकाळी आठ ते रात्री साडेदहा आम्ही वाहानं बदलत बदलत प्रवासातच होतो. रेल्वे, मग बस, मग फेरी, मग पुन्हा रेल्वे नि शेवटी अजून एक रेल्वे ! दिवसभर जाणवले नाही पण आता हा विचार करतानाही दम लागत होता. बाहेर संधीप्रकाशात अजूनही निसर्ग नटलेला दिसत होता. पण आता या क्षणी जगातले काही सुंदर बघायचे राहिले आहे असे वाटत नव्हते. matha matha ओस्लो ला साडेदहाला उतरलो. खायला शाकाहारी मध्ये केवळ कोरडे सॅंडविच मिळाले. खाऊन पुन्हा तासभर रेल्वेने जाऊन विमानतळावर पोहोचलो. आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे वेटिंग एरिया असणार असे गृहित धरले होते. पण तसे इथे काहीच नव्हते. नाही म्हणायला सहा बेंचेस सापडले. आमचे विमान सकाळी सहाला होते. आमच्यासारख्या लोकांनी आपली सोय शोधली होती. त्या आवारात असणार्‍या रात्री बंद झालेल्या कॅफे मधील कोचावर जाऊन बसलो. रात्र सरली. पाच वाजता चेक इन केले. आता मात्र विमानात गर्दी होती. विमान उडाले. उंचावरून दिसणारे नॉर्वे पुन्हा एकदा डोळ्यात भरून घेतले. स्मृतीत कोरून घेतले. डोंगराच्या कपारीत चार दिवसांसाठी मुक्कामाला राहिलेले पक्षी घरट्याकडे परत जाताना त्या पर्वतांना काय बरं वाटत असेल ?

Book traversal links for नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग अंतिम

  • ‹ नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ४
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17012 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

अप्रतिम!!! नॉर्वेवर कविता अहे

शुचि
Mon, 09/13/2010 - 03:57 नवीन
अप्रतिम!!! नॉर्वेवर कविता अहे ही लेखमाला म्हणजे.
  • Log in or register to post comments

हेवा

सुनील
Mon, 09/13/2010 - 05:02 नवीन
सुंदर प्रवासवर्णन आणि जोडीला सुंदर फोटो! तुमचा हेवा वाटतो!
  • Log in or register to post comments

सु-रे-ख !

संदीप चित्रे
Mon, 09/13/2010 - 05:44 नवीन
वाचनखूण म्हणून ठेवून घेणार आहे ही पूर्ण लेखमाला. ह्या लेखमालेसाठी पुन्हा एकदा धन्स !
  • Log in or register to post comments

मस्त

मीनल
Mon, 09/13/2010 - 06:05 नवीन
चौकटीतल्या चित्राप्रमानणे सुंदर फोटो, तितकेच सुंदर शब्द.
  • Log in or register to post comments

वर्णन

सहज
Mon, 09/13/2010 - 06:53 नवीन
लेखमालेचे कौतुक करायला पुरेसे शब्द नाहीत. अप्रतीम!
  • Log in or register to post comments

अतिषय सुंदर लेखमालेचा शेवट

रेवती
Mon, 09/13/2010 - 07:32 नवीन
अतिषय सुंदर लेखमालेचा शेवट व्हावा असं वाटतच नव्हतं. फोटो तर शब्दापलिकडचे आहेत. दरीतली छोटीशी वस्ती खूप आवडली. या ठिकाणंना भेट द्यायलाच हवी. इतकं छान, स्वच्छ आपल्याकडे लोकांना का राहता येत नसावं असं नेहमी वाटून जातं.
  • Log in or register to post comments

ग्रेट!!!!!!!!

विलासराव
Mon, 09/13/2010 - 10:43 नवीन
दुसर्या भागात पुर्ण लेखमाला आवडली असे सांगितले होतेच. तरीही ही लेखमाला मनाला खुप भावली असे पुन्हा एकदा सांगतो . आपली लेखणशैली खुपच अप्रतिम आहे हे निर्विवाद. टाका आता ती ग्रीसची लेखमाला मिपावर.
  • Log in or register to post comments

अमेझिंग

इन्द्र्राज पवार
Mon, 09/13/2010 - 11:31 नवीन
'मितान'च्या `माया`वी मोहिनीने मन प्रसन्नतेने मोहरले ! 'निळाई'च्या नवलाईनंतर या हिरव्या हिरकणीने नयन नटून गेले ! ~~ स्पीचलेस् ! लकी यू आर !! अ‍ॅण्ड थॅन्क्स ! इन्द्रा
  • Log in or register to post comments

सुंदर लेखन आणि मस्त

मदनबाण
Mon, 09/13/2010 - 11:44 नवीन
सुंदर लेखन आणि मस्त फोटु... लेखमाला आवडली... :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद! एक सुंदर अनुभव

नगरीनिरंजन
Mon, 09/13/2010 - 12:46 नवीन
धन्यवाद! एक सुंदर अनुभव दिल्याबद्दल! आयुष्यात एकदातरी हे प्रत्यक्ष पाहिलंच पाहिजे असं वाटायला लागलं आहे. वर्णन आणि फोटो दोन्हीही एकाचढ एक.
  • Log in or register to post comments

सुंदर!!

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 09/13/2010 - 13:19 नवीन
सुंदर!! आणखी लिहून तुझ्या सुंदर लिखाणाला ठिगळ लावण्याची इच्छा नाही. :-)
  • Log in or register to post comments

सुरेख

प्राजक्ता पवार
Mon, 09/13/2010 - 16:35 नवीन
लेखन व फोटो दोन्ही आवडलेत. पुढ्च्या लेखमालेच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

सुरेख!

यशोधरा
Mon, 09/13/2010 - 16:50 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

लिखान वाचुनच मन खुप प्रसन्न

गणेशा
Mon, 09/13/2010 - 17:01 नवीन
लिखान वाचुनच मन खुप प्रसन्न झाले आहे. प्रत्येक्ष अनुभवातुन तर मन कोठे असेन हे तुम्ही जबरी लिहिले आहेच. प्रवास वर्णन हे माझे सगळ्यात आवडते साहित्य. पण आता पर्यंत वाचलेल्या प्रवास वर्णना मध्ये हे सगळ्यात अनोखे .. वेगळे आणि तितकेच चित्र बद्ध होते. आपण नाही गेलो पण कोणीतरी आपले तेथे जावुन आले आहे म्हणुन आम्हलाच हेवा वाटतो आहे उगाच. कंपणीत चोरुन मिसळ पाव ओपन करताना ही .. आजु बाजुच्यांना सर्वांना नॉर्वे चे फोटो दाखवुन झाले आहेत. अआणि कोण गेले होते नॉर्वे ला असे विचारल्यावर .. मितान चे पहिलेच लेखन वाचत असताना ही माझी फ्रेंड गेली होती असी उगाच खोटे सांगुन ही मन भरुन येत होते. असो . कधी जायची वेळ आलीच तेथे तर तुमच्या या लिखानाची प्रिन्त घेवून जाणार आहे. परंतु येक .. तुमच्या वाटीचा जो मांसाहार राहिला आहे त्याची परतफेड करुन येईन मी नक्की ..
  • Log in or register to post comments

स्टँडिंग ओव्हेशन!

धमाल मुलगा
Mon, 09/13/2010 - 17:56 नवीन
त्या नॉर्वेच्या अप्रतिम निसर्गाला, तू काढलेल्या ह्या सगळ्या फोटोंना आणि तुझ्या रंगवुन सांगण्याच्या शैलीला! यु रॉक माया...यु रॉक! नशीबवान आहेस, ह्या अशा स्वर्गाची सफर करुन आलीस!
  • Log in or register to post comments

केवळ क आणि ड आणि क! आणखी काही

मेघवेडा
Mon, 09/13/2010 - 19:01 नवीन
केवळ क आणि ड आणि क! आणखी काही बोलत नाही, बोलूच शकत नाही! Image removed.
  • Log in or register to post comments

सहीच, संपूर्ण लेखमालाच सुंदर

पुष्करिणी
Mon, 09/13/2010 - 19:06 नवीन
सहीच, संपूर्ण लेखमालाच सुंदर !
  • Log in or register to post comments

झ का स!!!!

प्रभो
Mon, 09/13/2010 - 19:14 नवीन
झ का स!!!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेखमाला!!

चतुरंग
Mon, 09/13/2010 - 22:13 नवीन
कित्येक दिवसांनी इतकी सुंदर लेखमाला वाचली. मितानताई, तुमच्या स्वर्गातल्या फेरफटक्याचा हेवा करु का तुमच्या हटके लिखाणाचा करु का त्या केवळ अनिमिष नेत्रांनी बघण्यासारख्या दृश्यांच्या फोटूंचा करु समजत नाहीये! हे सगळं समोरच्या घरातली सत्तरीच्या घरातली आजीबाई बघत होती. पोस्टमन काकांनी तिला तिथनच हात उंचावून बहुतेक पत्र दाखवले. म्हातारी अक्षरशः दिव्यासारखी हसली! तिने आत जाऊन एक चिमुकला रुमाल आणला नि आमच्या फेरीकडे बघत फडफडवला ! वाट बघणं आणि ती फळाला येणं एवढं सुंदर 'दिसू' शकतं ? तिचा आनंद त्या रुमालाने आमच्यापर्यंत किती सहज पोहोचवला.. क्या बात है!! लेखनातलं लालित्य इतक्या सहजपणे यावं तर असं.... (मंत्रमुग्ध)चतुरंग
  • Log in or register to post comments

मितान, अतिशय तरल भाषा, तितकीच

प्राजु
Mon, 09/13/2010 - 23:07 नवीन
मितान, अतिशय तरल भाषा, तितकीच अप्रतिम छायाचित्रे आणि एकूणच तुझी शैली... स्वर्गिय अशीच ही लेखमाला होती. आम्ही सुद्धा हरवून गेलो होतो नॉर्वे मध्ये.. मला या भागातलं आवडलेलं वाक्य.." आता या क्षणी जगातले काही सुंदर बघायचे राहिले आहे असे वाटत नव्हते." या एका वाक्यातच अख्खा नॉर्वे सामावलेला आहे असं वाटलं. तुझं खास अभिनंदन, इतकी सुंदर लेखमाला लिहिल्याबद्दल. आणि आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

कुठं होता?

श्रावण मोडक
Tue, 09/14/2010 - 21:48 नवीन
तुम्ही कुठं होता याआधी? काही वेगळा आयडी वगैरे?
  • Log in or register to post comments

सलाम....

चिगो
गुरुवार, 09/16/2010 - 13:13 नवीन
काल लिहीता हो तुम्ही !! मानलं तुम्हाला. चौथ्या भागात " असं वाटलं या समुद्राला उचलून घेऊन त्याच्या जावळांवर हात फिरवावा !" हे वाचून तिथल्या तिथे दाद द्याविशी वाटली पण म्हटलं एकादमात फुटून बोलूया... कमाल केलीयत.. सुंदर लिखाण, नुस्त्या शब्दांच्या जोरावर त्या दर्‍याखोर्‍यांत घेवुन गेल्यात. अजुन्ही तिथेच आहे.. त्याला जोड, अतिशय नेमक्या, सुंदर आणि बोलक्या फोटोजची.. (तो ढगांचे reflection पाण्यात दाखवणारा फोटो तर चोरून नेवून फ्रेम करावासा वाटतो). मनापासून सांगतो, फार्फार दिवसांनी इतक्या तरल शब्दांत, इतक्या सुरेखपणे केलेलं प्रवासानुभव वर्णन वाचलंय.. तोडलं तुम्ही अक्षरशः ! आता फक्त गंडा बांधून घ्यायला कधी येवू, ते सांगा..
  • Log in or register to post comments

अगदी चित्रासारखे दिसते आहे

शिल्पा ब
Sat, 09/18/2010 - 21:46 नवीन
अगदी चित्रासारखे दिसते आहे नॉर्वेतील गाव... मस्त लेखमाला.
  • Log in or register to post comments

तायडे.. अतीसुंदर.. महान.. लै

अर्धवट
Sun, 09/19/2010 - 09:33 नवीन
तायडे.. अतीसुंदर.. महान.. लै भारी.. कडक.. लालीत्य लालीत्य म्हणतात ते हेच.. तुला माहीत नाहिये तु काय लिहितेयस ते...
  • Log in or register to post comments

अ प्र ति म

नंदन
Sun, 09/19/2010 - 15:03 नवीन
सुरेख/अप्रतिम इ. विशेषणांच्या पलीकडचं! बकेट लिस्टमध्ये अजून एक जागा वाढली :)
  • Log in or register to post comments

लॉर्ड ऑफ द रिंग्ज मधील गाँडॉर

बॅटमॅन
Mon, 05/14/2012 - 11:56 नवीन
लॉर्ड ऑफ द रिंग्ज मधील गाँडॉर प्रदेश आठवला हे वाचून :) खल्लास!!
  • Log in or register to post comments

नका रे नका हा धागा वरती आणु.

मृत्युन्जय
Mon, 05/14/2012 - 13:16 नवीन
नका रे नका हा धागा वरती आणु. एवढे नेत्रसुखद सौंदर्य पाहुन कामावरची वासना (उरली सुरली. मूळात सोमवारी काम करायची इच्छा असते कुठे? ) उडते रे
  • Log in or register to post comments

वा!!

मुक्त विहारि
Mon, 05/14/2012 - 13:37 नवीन
सुंदर प्रवास वर्णन..
  • Log in or register to post comments

ही लेखमाला वाचायची राहिली

भडकमकर मास्तर
Mon, 05/14/2012 - 14:34 नवीन
ही लेखमाला वाचायची राहिली होती.... "शब्दांच्या पलिकडले" प्रकरण आहे हे... :)
  • Log in or register to post comments

हे एक अतीशय उत्कृष्ट प्रवास

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/14/2012 - 15:00 नवीन
हे एक अतीशय उत्कृष्ट प्रवास वर्णन आहे... :-) जोडीनी फोटो तर,अंगावर रोमांच उभे करत होते. लेखमालेचा शेवट वाचताना ,का कोण जाणे ?,मन अतीशय स्तब्ध झालं...! मितान ताई तुंम्हाला सलाम...
  • Log in or register to post comments

धागा वर आणून कौतुक

मितान
Tue, 05/29/2012 - 21:44 नवीन
धागा वर आणून कौतुक केल्याबद्दल धन्यवाद ! त्यावेळच्या मितानचा हेवाच वाटतोय !!!! सध्या नांदेड्,लातूर , औरंगाबाद असे उन्हाळी हिल्स्टेशन्स फिरतेय.... ;)
  • Log in or register to post comments

आज परत...

अर्धवटराव
Wed, 05/30/2012 - 22:02 नवीन
हे संपूर्ण नोर्वे प्रकरण वाचले... आणि परत दिव्यासारखी हसणारी आजी मनात घर करुन गेली. बाकी प्रवासवर्णन, फोटो वगैरे किती अप्रतीम आहे हे सांगायचा प्रयत्नही करणार नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

क्लास...

सुमीत भातखंडे
Wed, 05/30/2012 - 23:00 नवीन
रोमांचकारी.....फोटो आणि वर्णन दोन्ही. वाचनखूण साठवून ठेवल्ये!!! (हरखून गेलेला) सुमीत भातखंडे
  • Log in or register to post comments

अत्यंत सुंदर देश, त्याचे

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 06/19/2015 - 01:22 नवीन
अत्यंत सुंदर देश, त्याचे भन्नाट फोटो आणि उत्कृष्ट प्रवासवर्णन !!! वाखू साठवली आहे हेवेसांन.
  • Log in or register to post comments

सर्व भाग वाचून काढले. अप्रतिम

पद्मावति
Fri, 06/19/2015 - 14:50 नवीन
सर्व भाग वाचून काढले. अप्रतिम. मस्तं सफर घडवली नॉर्वेची.
  • Log in or register to post comments

हि माझी आता पर्यंत वाचलेली

गणेशा
Fri, 06/19/2015 - 14:52 नवीन
हि माझी आता पर्यंत वाचलेली सर्वात आवडती सफर आहे... आज पुन्हा धागा वर आल्याने फोटो पाहिले पुन्हा मस्त.. येथे मात्र पायी भटकंती केली पाहिजे असे मात्र वाटत आहे... एकदा नक्कीच नॉर्वे ला जाता आले पाहिजे असे वाटत आहे
  • Log in or register to post comments

अतिशय छान. अप्रतिम

diggi12
Tue, 04/30/2024 - 12:26 नवीन
  • Log in or register to post comments

अतिशय छान. अप्रतिम

diggi12
Tue, 04/30/2024 - 12:26 नवीन
  • Log in or register to post comments

माहितीपुर्ण लेख

बरखा
Fri, 05/03/2024 - 19:17 नवीन
खुप छान वर्णन केले आहे. नोर्वे सुन्दर आहे अस ऐकुन आहे. प्रवास वर्णन छान केले आहे. ईतक्या जवळ जाउन नोर्दन लाईटस नाही पाहिले क? त्या साठी सुध्धा नोर्वे प्रसिध्ध आहे.
  • Log in or register to post comments

अप्रतिंम सुंदर लेखमालिका !

चौथा कोनाडा
Tue, 05/14/2024 - 12:28 नवीन
अप्रतिंम सुंदर लेखमालिका ! सुंदर नॉर्वे दर्शन घडवल्याबद्द्ल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा