Skip to main content

सखा राजगड : भाग -२

सखा राजगड : भाग -२

Published on 07/09/2010 - 02:03 प्रकाशित
पहिला भाग ------------------------------------------------ कशा ना कशावर बसून संक्रांत येते,रथसप्तमीपासून सुर्यनारायण आपल्या घोड्यांचा वेग कमी करतात,दिवस लांबडा होत जातो आणि रात्र आकसत जाते. गडावरचं गवत आता पिवळं पडायला लागतं,सगळ्या पायवाटा अगदी लख्ख दिसायला लागतात. उन्हं कळाकळा तापायला लागतातं,मधूनच एखादी वावटळ येते,गवत्,काडी-कचरा आपल्याभोवती भोवर्‍यासारखी गरागरा फिरवते.दिवसभर अंगाची अगदी काहीली होते,संध्याकाळमात्र थंडगार वार्‍याच्या झुळका घेउन येते. यावेळी आपण बालेकिल्ल्यावर असावं,तोरण्यामागं बुडणारा सुर्यनारायण इथंनं बघावा,संधीप्रकाशात घटकाभर तिथंच बसून रहावं आणि मग मुक्कामावर यावं. अगदी पहाटे उठून बालेकिल्ल्याच्या दरवाज्यापाशी यावं,समोर सुवेळीच्या मागं उगवणारा सुर्य बघावा आणि अगदी हरखून जावं. सुर्योदयाच्या वेळी सुवेळामाची सुर्योदय वैशाख सरत येतो,परत पावसाची चाहूल लागते,तसा तो अधून मधून आपले चौघडे ताशे वाजवत असतोच.मृगाच्या आसपास संध्याकाळी बालेकिल्ल्यावर यावं, तोरणा आणि राजगडाच्या मधल्या डोंगराच्या धारेवरून ढ्गांची लाट हळुवार फुटत असते. धुपाचा धूर संथपणे पसरावा तसे ढग फुटत असतात्,पसरत असतात. तोरणा ढगांचच मुंडास डोक्याला बांधून असतो. त्यातूनसुद्धा त्याची बुधलामाची अधनंमधनं डोकावत रहाते.एकाएकी तोरण्यावरचे ढग पांगतात आणि सुर्यनारायण बुडताना दर्शन देतो. ढगांच मुंडासं बांधलेला तोरणा ढगांच्या फुटणार्‍या लाटा आणि तोरण्यामागे बुडणारा सुर्य पुन्हा एक ऋतूचक्र सुरू होतं,या सगळ्या ऋतूत राजगड पुन्हा-पुन्हा बघायचा आणि अनुभवायचा. राजगड म्हणजे एका दिवसात उरकणारी गोष्टच नाही. इथं यायचं ते २-३ दिवस मोकळे काढूनच आणि जाताना हृदयात भरून न्यायचा राजगडाचा सहवास ! असा माझा सखा, राजगड !
लेखनप्रकार

याद्या 7721
प्रतिक्रिया 28

ख ल्ला स!!! फोटू जबरा हायेत बरं! आणि ओ जिप्सीभौ, जरा सढळ हाताने फोटू सोडा की राव! काय आपले नमनाला २-४ फोटूचे शिंतोडे उडवले आणि पोवाडा सुरु व्हायच्या आधीच पडदा पाडून दिला की! जरा निवांत, पद्धतशीर येऊ द्या की! २-३ दिवसांची राजांच्या गडाची गोष्ट आम्हाला पन ऐकायची आहे. लिवा की दमानं! येऊंद्या आजून आनि आजून भारी! --असुर

पैसाभाऊ:-आहो पहिला भाग लिहून झालेला आहे, पण त्याची लिंक कशी द्यायची हेच माहीत नाही,त्यामुळं देता नाही आली. त्यामुळ तुम्ही पहीला भाग शोधून वाचा म्हणजे वाचताना लिंक लागेल. असुरदादा :- फोटो न टाकायचे कारण म्हणजे, आळस बाकी काही नाही. माझ्याकडं राजगडाचे सुमारे १०००+ फोटो आहेत्,त्यातून फोटो शोधा,पिकासावर चढवा मग ले़खाला जोडा फार व्याप आहे. आता लौकरच राजगडावरच एखादा फक्त फोटो स्पेशल लेख टाकतो. खास आपकी फर्माइश ! आपर्णाताई :- ___/\___!!! म्हंजे काय हो? नेहमी बर्‍याच प्रतिसादात बघतो पण अर्थ माहीत नाही. इरसाल :- अहो खरच की! मला एवढे वेळा फोटो बघून पण हे कधीच सूचलं नव्हतं! तुम्ही तर फोटोला एकदम अध्यात्मिक उंचीवर वगैरे नेऊन ठेवलं. बाकी सगळ्यांचे आभार !

In reply to by जिप्सी

पैसाभाऊ:-आहो पहिला भाग लिहून झालेला आहे, पण त्याची लिंक कशी द्यायची हेच माहीत नाही,त्यामुळं देता नाही आली. त्यामुळ तुम्ही पहीला भाग शोधून वाचा म्हणजे वाचताना लिंक लागेल पहिली गोष्ट त्या पैसाताई आहेत माझ्या माहितीप्रमाणे. पहिल्या भागाची लिंक ही घ्या http://www.misalpav.com/node/14188

सगळे म्हणतात तर टाका आणखी फोटो आन लिवा की राव. मला विचाराल तर आपल्याला नाही आवडल बॉ लिखाण तुमचं. खर तर मिच लिहायला पाहीजे होत पण जाउदे आता. अवांतरः मला कोणी आणखी फोटो टाकायला सांगितलेच नाही. नायतर मी ढिगाने टाकले असते.

सर्व फोटो आवडले दूस्र्या फोटो मध्ये कृष्ण बासरी वाजवत आहे असा भास होतो आहे. सर्व फोटो अतिशय सुंदर आणि सखा राजगड हे नाव ही छान आहे.

दूस्र्या फोटो मध्ये कृष्ण बासरी वाजवत आहे असा भास होतो आहे ---> खरच की,कृष्ण बासरी वाजवत आहे आणि त्याच्यातून तेज ओसंडून बाहेर येत आहे असच वाटतयं. खरच कलात्मक दृष्टी आहे तुमची!

कलाकार आपण आहात .. कीती छान फोटो आणि वर्णन राजगड अजुन पाहिला नाहिये मी .. अशे म्हणताना लाज वाटत आहे. नुकताच रायगड फिरलो .. तुम्ही म्हण्ता तसेच वाटले तेथे .. पण राजगड ला लवक्र येण्याची ओढ लागली आहे .. आणि तुमच्या लिखाना मुळे तर कधी येकदा पाहतोय सखा राजगड असे वाटत आहे ...

हा भागही आवडला. दोन्ही भाग एकत्र चालले असते असे वाटते. स्वाती