Skip to main content

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ९ - अंतीम.

लेखक अर्धवट यांनी मंगळवार, 31/08/2010 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १ धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २ धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३ धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ४ धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ५ धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ६ धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ७ धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ८ काल सुट्टी होती. स्थानीक साथीदारांच्या मदतीनं भोजनशोध मोहिमेवर बाहेर पडलो. थोडी जुजबी माहिती जमा झाल्यावर टेंपल स्ट्रीट या रस्त्यावर येउन पोचलो. इथं पोहोचेपर्यंत काही ह्या नावातली खोच लक्षात आली नाही. शहराचं नाव दारेसलाम. बहुतांश लोकवस्ती मुस्लीम, उरलेली ख्रिश्चन अशा शहरात अगदी मध्यावर, दाट लोकवस्तीच्या ठिकाणी हा टेंपल स्ट्रीट आहे. रस्त्याच्या दुतर्फा अत्यंत सुंदर हिंदु देवदेवतांची मंदिरे. अगदी सुंदर प्रशस्त देवळं. कृष्ण, राम, शंकर, कालिमाता, हनुमान अगदी सगळ्या देवांनी अगदी ऐसपैस बस्तान बसवलंय. एकेक मंदेर म्हणजे एखाद्या तिर्थक्षेत्री असतं तेवढं सुबक नी प्रशस्त. प्रत्येक देवळात एक मोठा हॉल, प्रवचनासाठी. कृष्णाच्या देवळात चाललेलं एक गुजराती भाषेतलं लडिवाळ प्रवचनही ऐकल अर्धातास बसुन. कुठे पिंपळाचा मोठा पार, चिवचिवणार्‍या चिमण्या तर कुठे पांढर्‍या धाग्यांनी गुंडाळुन अदृष्य केलेला वडाचा बुंधा. त्या रस्त्यावरुन जाणार्‍या तीनपैकी एक चेहेरा भारतीय. भारतीय लोक इथं इतकं वजन राखुन असतील याची कलपनाच नव्हती. देवळात बसल्यावर वाटुच नये आपण आपल्या देशापासुन हजारो मैल दूर येउन बसलोय. बजुलाच एक चक्क शुद्ध शाकाहारी हॉटेल आणि शेजारी अर्थातच एक मिठाइचं ऐसपैस दुकान. काचेच्या काउंटरमागे ढोकळा, फरसाण, फापडा,रसगुल्ला, जिलबी, गुलाबजाम वगैरे थाट आणि काउंटरला त्या दुग्धजन्य मिठाइचाच एक अविभाज्य भाग वाटणारा एक गोड गुज्जुभाय. आजचं जेवण तर जोरकस झालं.. मस्त गरमगरम फुलके, बटाट्याची भाजी, वालाची उसळ, रसगुल्ला, दाल, भजी हे सगळं पचवायला दोन मोठे ग्लास मसाला ताक. आणि नंतर मुखशुद्धी म्हणुन चवीपुरता उगाच दोन-तीन प्लेट ढोकळा.. आहाहा क्या केहेने.. गुज्जु समाजाचं वर्चस्व इथे खुपच आहे, त्या बाजारपेठेतल्या काही प्रकारच्या व्यापाराचे अनभिषीक्त सम्राटच जणु. त्या रस्त्यावर इलेक्ट्रॉनीक वस्तंपासुन कापड दुकानापर्यंत सगळी दुकानं होती सगळ्याचे मालक गुज्जु. (मला बँकॉकच्या नाना स्ट्रीट ची आठवण झाली, त्या रस्त्यावर दुतर्फा शेकडो दुकानं टेलरची आणि सगळ्याचे मालक सरदारजी.) ह्या सगळ्या दुकानात कामगार स्थानीक आहेत आणि आमचे गुज्जुभाय आपल्या अस्खलीत स्वाहीली भाषेतुन सगळा कारभार चालवतात. भाषा ऐकायला मस्त वाटते. अगदी आपल्या बंगालीसारखी मधुर नसली तरी प्रत्येक शब्दाचा शेवट स्वरानं होत असल्यामुळे प्र्त्येक शब्द हेल काढुनच उच्चारावा लागतो. ह्या स्वाहीली भाशेत व्यंजनानं शेवट होणारा शब्द ऐकु आला तर तो इंग्रजी किंवा इतर कुठल्यातरी परक्या भाषेतला आहे असं बेलाशक समजा. इतके दिवस ती भाषा कानावर पडुन सुधा माझं स्वाहीली भाषेचं ज्ञान काही मोजक्या शब्दांपलिकडे गेलं नाही म्हणा. दुका म्हणजे दुकान. दवा म्हणजे औषध्. असांते म्हणजे धन्यवाद. खरीबू म्हणजे स्वागत. सींबा म्हणजे सींह, थिंबा म्हणजे हत्ती. साफ म्हणजे स्वच्छ. माझी म्हणजे पाणी. माझिवा म्हणजे दुध. 'चाय माझिवा' मागवायचा नाहितर काळा काढा प्यावा लागतो. मी आमच्या कॅटीनमधे एकदा त्या पोरीला कॉफी मागितली. माझ्याकडे बघुन ती हसतंच सुटली. मी बावरलो. माझी यथेच्छ कीव करुन आणि हसून झाल्यावर तिनं सांगितलं की कहाव्हॉ म्हणजे कॉफी.. आणि काफी म्हणजे कानफाटात.. मी चक्क तीला एक कानफाटात मागितली होती.. माझं स्वाहीलीचं ज्ञान एवढ्यावरच आटोपतं. इथं एके ठिकाणी स्थानीक नृत्य बघायला मिळालं जास्त वर्णन करत बसत नाही पण पन्नास एक स्त्रीपुरुष हातात हात घालुन रिंगण करून पाय आपटंत आपापला पार्श्वभाग एका ठेक्यात हादरवण्याची ती कसरत करताना पाहिले की काहीतरी वेगळीच शंका येते ब्वॉ. साधरणतः आपल्याकडे अडीअडचणीच्या वेळी शौचालय रिकामे नसल्यास पोट आत घेउन स्वतःचं वजन उजव्या डाव्या टाचेवर करत पाच मिनीटाचा 'ग्रेस टाइम' मिळवण्यासाठी जे पदलालित्य केलं जातं त्याच्या बराचसा जवळपास जाणारा हा नाचाचा प्रकार आहे. हाच नृत्यप्रकार सगळ्या स्थानीक कार्यक्रामांतुन केला जातो. अगदी आबालवृद्ध आनंदाने तो नाच करतात. बाकी तो नाच कसाही असुदेत पण असा सगळा समुदाय हसत गात हातात हात घालुन त्या तालावर धुंद होउन नाचताना पाहिला की त्या उत्स्फुर्त प्रसन्नतेची लागण आपल्यालाही झाल्याशिवाय रहात नाही. हेच नृत्य निवडणुकीच्या प्रचारातही केलं जात असावं बहुतेक. आत्ताच्या सत्ताधारी राष्ट्राध्यक्षाचा गर्द हिरवा फोटो घेउन एक माणुस असाच नाचताना एका चौकात बघितल्याचं आठवतंय. जिकडेतिकडे त्याचे त्या एकाच हिरव्यागर्द शर्टातले फोटो बघुन हा हिरवा पोपट रस्तोरस्ती अजुन किती दिवस बघणं यांच्या नशिबी आहे असा एक विचार उगाचंच मनात येउन गेला. हा राष्ट्राध्यक्ष गेली दहा वर्षे सत्तेवर आहे. त्याचे हिरव्याकंच रंगाचे फोटो मोठमोठ्या बॅनर वर लावलेले दिसतात. संसदेत सगळे आपापल्या पक्षाच्या रंगाचा शर्ट घालुन येतात. आपले सगळे थोर्थोर नेते असे रंगीबेरंगी शर्ट घालुन लोकसभेत दंगा करतानाचं चित्र मनःचक्षुंपुढे उभं राहिलं आणि हसायलाच आलं एकदम. देशाच्या बाकी परीस्थितीविषयी बोलायचं तर गरिबी भरपूर. देशात कुठंही नविन गाडी विकत मिळंत नाही, सगळ्या जपानी गाड्या सेकंडहँड आयात होतात इथे. सार्वजनीक वाहतुकीसाठी रिक्षांचा वापर सर्रास होतो, आपल्या बजाजच्या रिक्षांचा. वेगवेगळे रोग आहेत, महागाई आहे. गेला महिनाभर ह्या युनिवर्सीटीमधे एड्सविरोधी जनजागरण मोहीम चालू होती. गुन्हेगारी आहे. बेकारी आहे. पाण्याचा प्रश्न आहे. शहरीकरणाचा प्रश्न आहे. रस्ते रोज तीनचार तास तरी ट्रॅफीक जॅम मुळे बंद असतात. पण तरी लोक मजेत आहेत. हसताना दिसतात. मोठं मजेशीर समाजमन आहे हे. इथल्या कुठल्याही समस्येविषयी तुम्ही लोकांशी बोलायला गेलात तर इकंदरीत प्रतिक्रिया ऐकुन तुमच्या लक्षात येइल की आपण आफ्रिकन स्थितप्रज्ञ संतांच्या मेळाव्यात येउन पोहोचलेलो आहोत. चला इथले दिवस संपत आलेत, गेले २५-३० दिवस इथलं जग पहात होतो. नविन माणसांना भेटत होतो. पण खरंच हे जग वेगळ होतं का?..का मला ते भासलं वेगळं?.. नविन ठिकाणे नक्की काय बदलतं तेच कळत नाहिये... केवळ जागा बदलते म्हणजे मी बदलतो का? राग, आनंद दु:ख घरी असताना जितक्या वेळेला वाटतं तितक्याच वेळेला इथंही वाटलंच की... एकटेपणाचे चार क्षण जास्त आले असतील कदाचित पण तसा तो एकटेपणा माझ्या बरोबरच चालतोय की लहानपणापासुन. या देशात जे काही पाहिलं ते 'माझ्या' नजरेतुन ना.. माझ्याच चष्म्यातुन... मग हे प्रवासवर्णन नाहीच की.. हे तर माझ्या त्यावेळच्या दृष्टीकोनाचं वर्णन.. अथवा माझ्या त्या क्षणांच्या अंतरंगाचं प्रतिबिंब म्हणा ना... म्हणजे खरी अफ्रिका आपल्याला दिसलीच नाही की काय... की 'खरी अफ्रिका', 'खरा भारत' असं नसतंच मुळी काही... आपलं अंतरंग जेवढं सजग, समृद्ध, तेवढंच बाहेरचं जगही रंगीबेरंगी.. असो.. इथला मुक्काम संपताना जितका आनंद साचलाय मनाच्या गाभार्‍यात.. घरी जायचं, आप्तांना भेटायचं, मातृभूला भेटायचं म्हणुन.. तसा एक हळवा कोपराही आहेच की इथल्या आठवणींसाठी... आयुष्यातले २५-३० दिवस इथं काढले, थोडासा तरी उरणारंच की मी इथं... आणि २५-३० दिवस म्हणजे काही कॅलेंडरवरचे ३० चौकोन नव्हेत, मोजता येणारे.. रोजची नवी पहाट, संपुर्ण जगलेला दिवस आणि स्मरणात रमलेली रात्र म्हणजे तो एक चौकोन... त्या कॅलेंडरवर जरी सुट्टीचे चौकोन लाल आणि बाकिचे काळे रंगवले तरी वास्तवात कोणता लाल आणि कोणता काळा हे आधी थोडंच सांगता येतं.. कधि उत्तुंग निळा.. कधी धुक्यातला पांढरा.. कधी अश्रुंचा काळा.. कधी लाजलेला गुलाबी.. असं सुंदर कॅलेंडर प्रत्येक क्षणी जगतच असतो आपण... . . . नमस्कार मंडळी, जरा जास्तच लांबलेल्या लेखमालिकेतील हा शेवटचा लेख. आपण माझं अर्धकच्चं लेखन वाचलंत. आणि वर मोठ्या मनानं प्रतिक्रियाही दिल्यात याबद्दल धन्यवाद. अर्थात तुम्हाला लेखन आवडलं याचं खरं श्रेय त्या वर्ण्यविषयाला, त्या वास्तवाला, तिथल्या माणसांना. ते वास्तव इतकं मोहक होतं, इतकं सच्चं होतं की माझ्यासारख्याच्या लेखनाचीही तुम्ही प्रशंसाच केलीत. माझा सहभाग एवढाच की मी ते सगळं माझ्या तोकड्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवलं. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10174
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

एकदम झकास लेखन आणि एका सुंदर लेखमालेचा तितकाच हृद्य आणि सुंदर शेवट! तुमच्या भाषेत सहजता आहे, शब्दात आपलेपणा आहे, वर्णनात वाचकाला बरोबर नेण्याचं सामर्थ्य आहे! जियो!! (ही लेखमाला संपली आहे हे सत्य मी स्वीकारतो आहे परंतु असेच उत्तमोत्तम लेखन येत राहू दे अशी तुम्हाला विनंती आहे ती नजरेआड करु नका.) चतुरंग

शेवटच्या काही भागात काही फोटो चढवता आले तर बघा. चांगली माहीती, थोडीशी पर्यटनविषय जसे, कुठून कुठल्या विमानसेवा, पर्यटनाला अनुकूल महीने / मोसम, बघण्यालायक काही जागा, करन्सी, थोडा खर्चाचा अंदाज दिलात तर हौशी लोक टांझानियाला जायचा विचार करु शकतील. :-)

सगळेच भाग आवडलेत,प्रतिसादातून तसे वेळोवेळी सांगितलेही आहे. चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे ही लेखमाला संपली तरी वेगवेगळे लेख मात्र येत राहू देत. स्वाती

या देशात जे काही पाहिलं ते 'माझ्या' नजरेतुन ना.. माझ्याच चष्म्यातुन... मग हे प्रवासवर्णन नाहीच की.. हे तर माझ्या त्यावेळच्या दृष्टीकोनाचं वर्णन.. अथवा माझ्या त्या क्षणांच्या अंतरंगाचं प्रतिबिंब म्हणा ना... पु लं नी त्यांच्या प्रवासवर्णनात अश्याच आशयाचे वाक्य लिहील आहे. शेवटी हे प्रवासवर्णन आहे. तुमच्या प्रवासाचे वर्णन. एखाद्या ट्रेवल कंपनीचे जाहिरजापत्रक नाही. त्यामुळे जे लिहिले आहे आणि ज्या प्रकारे लिहिले आहे ते योग्यच आहे. बाकी लेखमाला खुपच गोड होती. अगदी टांझानियातल्या गुज्जुभैयासारखी. वर्णन खुपच सुंदर. शेवट एकदम भावुक. आवडले मला.

In reply to by मृत्युन्जय

पुल म्हणतात "हे प्रवासवर्णन नव्हे तर प्रवासातल्या माझं वर्णन आहे!".. बाकी संपूर्ण लेखमाला ओघवती आणि चित्रदर्शी शैलीत आहे.. अजून वेगवेगळ्या विषयांवर लिहित रहा आम्ही वाचत आहोतच. तूर्तास या लेखमालेबद्दल असांते! :)

अर्धवटराव तुमचे लेख असेच सुरु ठेवा. हा अल्पविराम आहे. पुर्णविराम नव्हे.

लेखमालेची जितकी उत्कंठावर्धक सुरवात तितकाच हृद्य आणि भावस्पर्शी शेवट. अर्धवटराव अगदी अप्रतिम लेखन करता आपण. पुढच्या लेखाची/लेखमालेची वाट पाहतोय. अर्थात तुम्हाला लेखन आवडलं याचं खरं श्रेय त्या वर्ण्यविषयाला, त्या वास्तवाला, तिथल्या माणसांना. ते वास्तव इतकं मोहक होतं, इतकं सच्चं होतं की माझ्यासारख्याच्या लेखनाचीही तुम्ही प्रशंसाच केलीत. थोडा वेळ हे आपण गृहीत धरु.(मला तरी तसं वाटत नाही.मला वाटतं प्रशंसा जी होतेय ती तुमच्या लिहिण्याची जी शैली आहे त्यामुळे. ओघवत्या भाषेमुळे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा रहातो.) जाऊ द्या कारण काहीही असले तरी लेखमाला आणि लेखक दोन्हीही प्रशंसेस पात्र (विचार करुनही योग्य शब्द सापडला नाही)आहेत असे मला वाटते. माझा सहभाग एवढाच की मी ते सगळं माझ्या तोकड्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवलं. धन्यवाद. बर बर... अवांतरः जर तुमची भाषा तोकडी आहे तर जरा माझा लेख (त्यातील भाषा) कोणत्या प्रकारची आहे हे जाणुन घ्यायला उत्सुक ? (जिज्ञासु ) विलासराव.

मस्त होते सगळे भाग! तुम्ही प्रसन्न आणि प्रमाणिक वर्णन केले त्यामुळे तिकडे फिरून आल्यासारखे वाटले. असेच लिहीत (आणि फिरतही ) रहा. धन्यवाद आणि पु.ले.शु.

मिसळ पाव वर बरेच दिवसा नंतर आलो आहे. पहिल्यांदाच आज आपला हा थ्रेड पाहिला , आपले प्रत्येक भाग वाचत आहे. रिप्लाय देइनच वाचल्यावर . धन्यवाद

हा शेवट वाटून घ्यायला मन तयार नाहि ! असेच लिहीत रहा !

खुपच सुंदर लेखमाला.. जरी अफ्रिकेतला प्रवास संपला तरी पुढच्या प्रवासात आम्हाला पण असेच घेवुन जा :-) --टुकुल

मस्त झालाय हा भाग सुद्धा. तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे हे प्रवासवर्णन नाही म्हणूनच हे आफ्रिकन वर्णन जे तुम्ही केलंय तुमच्या अनुभवातून, दृष्टीकोनातून ते वाचून आनंद झाला. एखाद्या देशाची खरी ओळख ही ४- ६ दिवस टूरीस्ट म्हणून फिरल्याने होत नाही तर ती तिथे काही काळ राहून, समाजात मिसळून च होते. अशी ओळख करून घ्यायला, समजून घ्यायला मला जास्त आवडते . तुमच्या मुळे आफ्रिकेतील एका देशाची छान पैकी ओळख झाल्यामुळे धन्यवाद :)

दिवस म्हणजे काही कॅलेंडरवरचे ३० चौकोन नव्हेत, मोजता येणारे.. रोजची नवी पहाट, संपुर्ण जगलेला दिवस आणि स्मरणात रमलेली रात्र म्हणजे तो एक चौकोन... त्या कॅलेंडरवर जरी सुट्टीचे चौकोन लाल आणि बाकिचे काळे रंगवले तरी वास्तवात कोणता लाल आणि कोणता काळा हे आधी थोडंच सांगता येतं.. कधि उत्तुंग निळा.. कधी धुक्यातला पांढरा.. कधी अश्रुंचा काळा.. कधी लाजलेला गुलाबी.. असं सुंदर कॅलेंडर प्रत्येक क्षणी जगतच असतो आपण... >>> संपुर्ण लेखमाला झकास झाली आहे >> बाकी अर्ध्या लेका काही फोटोज का नाही टाकले ? या करता तुला पुण्यात आल्यावर काफी का देऊ नये ?

अत्यंत सुंदर लेखनमाला. शेवटच्या काही भागांमध्ये फोटुची उणीव जाणवुन गेली :(

मास्तर, सुरेख प्रवासात आम्हालाही सामील करून घेतल्याबद्दल आभार. आणि लेखमालेचा शेवट खूपच भावला.

>>आणि २५-३० दिवस म्हणजे काही कॅलेंडरवरचे ३० चौकोन नव्हेत, मोजता येणारे.. रोजची नवी पहाट, संपुर्ण जगलेला दिवस आणि स्मरणात रमलेली रात्र म्हणजे तो एक चौकोन... त्या कॅलेंडरवर जरी सुट्टीचे चौकोन लाल आणि बाकिचे काळे रंगवले तरी वास्तवात कोणता लाल आणि कोणता काळा हे आधी थोडंच सांगता येतं.. कधि उत्तुंग निळा.. कधी धुक्यातला पांढरा.. कधी अश्रुंचा काळा.. कधी लाजलेला गुलाबी.. असं सुंदर कॅलेंडर प्रत्येक क्षणी जगतच असतो आपण... हे जास्त आवडलं, असांते :)

तुमची लेखमाला वाचून खूप बरं वाटलं. 'काफी' मजा आया :) लेखमालेची सुरूवात दणक्यात झाली (मला अजून तो छत्रपती शिवाजी ची पाटी घेतलेला गडी आठवतोय...आणि हसू आवरत नाही.) समारोपही छान जमला. त्या नाचाचा जर व्हिडिओ सापडला तर अमृताहून गोड होईल. असंच लिहीत रहा. त्यासाठी तुम्हाला म्यागीवर महिनाभर राहावं लागलं तरी बेहेत्तर. :)

छान लेखमाला. समारोप चांगला.

उत्तम फिरवुन आणल्याबद्द्ल असांते

प्रवस वर्णन आवडल ....पण शेवटि फोटो अपलोअड केले अस्ते तर अजुन मजा आली अस्ति ..खास करुन तिथली मन्दिर बाजार्पेठ , जेवणाचे प्रकर ,लोक....

खरंच हे जग वेगळ होतं का?..का मला ते भासलं वेगळं?.. नविन ठिकाणे नक्की काय बदलतं तेच कळत नाहिये... केवळ जागा बदलते म्हणजे मी बदलतो का? राग, आनंद दु:ख घरी असताना जितक्या वेळेला वाटतं तितक्याच वेळेला इथंही वाटलंच की... एकटेपणाचे चार क्षण जास्त आले असतील कदाचित पण तसा तो एकटेपणा माझ्या बरोबरच चालतोय की लहानपणापासुन. --->अगदी अगदी शब्दा शब्दाशी सहमत !! :-) 'खरी अफ्रिका', 'खरा भारत' असं नसतंच मुळी काही... आपलं अंतरंग जेवढं सजग, समृद्ध, तेवढंच बाहेरचं जगही रंगीबेरंगी.. --->>> तुमची लेखमाला वाचताना पदोपदी हे जाणवलं.... आणि २५-३० दिवस म्हणजे काही कॅलेंडरवरचे ३० चौकोन नव्हेत, मोजता येणारे.. रोजची नवी पहाट, संपुर्ण जगलेला दिवस आणि स्मरणात रमलेली रात्र म्हणजे तो एक चौकोन... त्या कॅलेंडरवर जरी सुट्टीचे चौकोन लाल आणि बाकिचे काळे रंगवले तरी वास्तवात कोणता लाल आणि कोणता काळा हे आधी थोडंच सांगता येतं.. कधि उत्तुंग निळा.. कधी धुक्यातला पांढरा.. कधी अश्रुंचा काळा.. कधी लाजलेला गुलाबी.. असं सुंदर कॅलेंडर प्रत्येक क्षणी जगतच असतो आपण... --->>>>>>क्या बात है !! आपण अनुभवलेली प्रत्येकच गोष्ट अशी शब्द्बद्ध करताच येत नाही .. रंगीबेरंगी आहे हे जग. आपण कोणत्या नजरेने (कुठल्या चश्म्याने खरं तर!) हे सारं पाहतोये हाच काय तो फरक.आपण नेमकं उत्तम शब्दात ते सारं ह्याठीकाणी मांडू शकलात त्याबद्दल अभिनंदन!! :-) आणी असांते !!!! :-)

वाचल्यावर कय प्रतिक्रिया लिहू समजत नाही. कारण ती पुनरुक्तीच ठरेल. आणखी लिहा. अधाशासारखी वाट पाहू.

छत्रपती ! तुमचे लेखन खुप मनापासुन वाचले खुप आवडले. शेवटच्या लेखातुन भावनिकतेची ही चोटी लकेर दिसुन आली. शेवटी खुप छान लिहिले आहेच, पण थोडे अजुन लिहिने बाकी राहिले आहे असे उगाच मनाला वाटते आहे. कदाचीत आजुन वाचायला मिळावे असे मन म्हणत आहे. असो भेटु पुन्हा .. - शब्दमेघ

संपूर्ण लेखमाला उत्तम ! असे प्रवास आणि प्रवासानुभव ; दोन्ही समृद्ध करणारे असतात. धन्यवाद अर्धवट. आता चीन कधी ? ;)

अतिशयच आवडली ही लेखमालिका!! मला वाटते, मला 'माझे खोबार' नंतर इतकी प्रचंड आवडलेली मालिका... सगळ्यात जास्त आवडली ती तुमची लेखनशैली! अतिशय चपखल वाक्यं व उपमांचा वापर करून तुम्ही अगदी प्रथितयश लेखकासारखे लिखाण केलेले आहे, कृपया त्याला कमी लेखू नका.. :) आता तुम्ही केलेली जी काही भटकंती आहे ती मालिका रूपामध्ये आलीच पाहीजे..