Skip to main content

हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा/मिळतो/ते?

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 20/08/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तुत धाग्यावर आता २३० पेक्षा जास्त प्रतिसाद आलेले आहेत. यापुढील चर्चेकरता नवा धागा उघडावा. - संपादक मंडळ माझा ऑफिसमेट जयंती (हो, हे मुलाचं नाव आहे, जयंती प्रसाद) अधूनमधून 'बाबागिरी'बद्दल बोलतो. 'बाबा' म्हणजे बाबा अथवा वडील नव्हे, "बाबा" म्हणजे भोंदूबाबा, बाबा-बुवा-बापू-माता-गुरू मधले बाबा! कालसुद्धा जयंती अमका माणूस फारच बाबागिरी करतो असं मला सांगत होता. म्हणून मी त्याला व्याख्या विचारली, "'बाबा' म्हणजे नक्की कोण?" त्याचं उत्तर अगदीच चमत्कारिक नसलं तरीही विचार करण्यायोग्य वाटलं. त्याचं उत्तर असं: बाबा लोकांची तीन (जयंतीच्या बाबतीत ट्रीलॉजी जुनीच आहे.) लक्षणं असतात. यापुढे या लेखापुरतं 'बाबा' आणि बाबा हे शब्द एकच आहेत असं समजावं. १. बाबा लोकं अखंड उपदेश करतात; पण त्यातल्या अगदी कमी गोष्टी त्यांच्या स्वतःच्या बाबतीत लागू पडतात. २. बाबा लोकं कधी कोणाचंही ऐकून घेत नाहीत. ३. बाबा लोकांचे प्रचंड प्रमाणात (प्रमाणात हा शब्द महत्त्वाचा, का ते पुढे येईलच) अनुयायी असतात. प्रमाण हा शब्द अशासाठी वापरला की, तो आमच्या होस्टेलमधल्या एकाला बाबा म्हणतो. होस्टेलमधले १२-१५ पैकी दहा लोकंतरी त्याचे अनुयायी असतात. उदा: तो म्हणाला आज पिझा खाऊया, की कॅण्टीनमधे जेवणारे सगळे पिझा खायला तयार होतात. आपलं म्हणणं कितीही चुकीचं असलं तरी तेच तो पुढे दामटत रहातो. इ.इ. असो. तर आमचा हा संवाद सुरू असतानाच माझा मोबाईल वाजला, पाहिलं तर एक एसेमेस. त्याकडे मी दुर्लक्ष केलं आणि मुख्य, महत्त्वाच्या गॉसिपकडे लक्ष दिलं. तर पुन्हा एक एसेमेस. तर मग 'टॅम्प्लीस' घेऊन एसेमेस पाहिले. तर आणखी कोणी "गुरू" आणि "बापू" अनुक्रमे मला रूद्राक्ष आणि मणी विकत होते. 'डीएनडी'ला **वर मारणार्‍या या लोकांना चार भाषांत चार सणसणीत शिव्या हासडून मी पुन्हा जयंतीशी बोलायला गेले तर जयंती स्वतःच "बाबा" बनल्यागत माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करता झाला! मग मीही त्यालाही **वर मारून पुन्हा मराठी आंतरजालाकडे वळले. पाहिलं तर उपक्रमावर अनिरुद्ध बापूंबद्दल ही चर्चा आली होती. मला प्रश्न असा पडला की या बाबा, बुवा, माता, बापू, स्वामी, गुरुंना अनुयायी मिळतातच कसे? तेव्हा एक त्यामानाने जुना टेडवरचा व्हीडीओ आठवला, हा पहा. पण हे सगळं आपल्याकडे असंच होतं का? म्हणजे या व्हिडीओत डेरेक सिव्हर्स म्हणतो त्याप्रमाणे The first follower transforms a lone nut into a leader. हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा?

वाचने 60466
प्रतिक्रिया 231

प्रतिक्रिया

अहो कसलं काय अन कसलं काय हो! जगात मुर्खांची काय कमी आहे का? हे बाबा बुवाच्या मागे लागणारे लोक म्हणजे मेंढ्यांच्या कळपासारखे. पुढची मेंढी जाईल तिच्यामागे मान खाली घालुन चालणारे. आता पुढची मेंढी आंधळी असली तरी ते मागच्यांना काय माहित सांगा? फुक्कट रिकामा वेळ अन अंगातल्या धमकेचा अभाव असला की आयतं माळ जपत प्रत्ययाची वाट पहाणं न जमायला काय झालंय? तासावर मजुरी मिळणारा कधी तासभर पुजा करताना पाहिलाय काय? त्याला पोटभर जेवण म्हणजे त्याची आत्मक्षांती अन रात्रीची दगडावरची झोप म्हणजे मोक्ष! * अनावश्यक भाग संपादित *

In reply to by Nile

हे बरोबर बोललास. लोकांनाच काही तरी टेकू लागत असतो. त्यामुळे बाबा लोक अनुयायी शोधत नसून अनुयायी लोकच एखादा बाबा (किंवा अम्मा) शोधत असतात. अशा बाबा/अम्माला मग देवत्व बहाल करुन त्याच्या मर्कटलीलांमधूनही काही तरी दैवी संकेत काढून त्याप्रमाणे वागतात आणि मग प्रोबॅबिलिटीच्या नियमाप्रमाणे कधी घाट्यात जातात तर कधी फायद्यात. तोट्यात जाणारे आपलं पूर्वाश्रमीचं पाप समजून गप बसतात आणि फायद्यात जाणारे बाबा की जय म्हणून नाचायला लागतात. असा मग मोठा होत जातो बाबा. अवांतरः गजानन महाराज एका लग्नात टाकून दिलेल्या पत्रावळींमधून वेचून अन्न खाताना प्रथम सापडले होते असं वाचल्याचं अंधुक आठवतंय. खरं खोटं तेच जाणे. अति अवांतरः 'गण गण गणात बोते' चा अर्थ कोणालाच कसा माहिती नाही? आणि विचारला तर त्यांचे भक्त का रागावतात? माझ्या एका मित्राने मला सांगितला होता तोच तर अर्थ नाही ना त्याचा?

In reply to by नगरीनिरंजन

गण गण गणात बोते, हे खरे "गण गण गणात बा ते" असे वाचायचे असते. गुगलून खालील अर्थ मिळाला- दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ह्या चरित्रग्रंथात त्या अभंगाचा अर्थ दिला आहे... त्या सूत्रमय भजनाचा। अर्थ ऐसा वाटतो साचा। गणी या शब्दाचा। अर्थ, मोजी हाच असे।। जीवात्मा म्हणजे गण। तो ब्रह्माहून नाही भिन्न। हे सुचवावया कारण। गणात हा शब्द असे।। बोते हा शब्द देखा। अपभ्रंश वाटे निका। बाते हा शब्द ऐका। तेथे असावा नि:संशय।। बा या शब्दे करून। घेतले पाहिजे मन। ते हे आहे सर्वनाम। गण शब्दाऐवजी आलेले।। म्हणजे मना दिसे नित्य। जीव हा ब्रह्मास सत्य। यात स्पष्ट अर्थ दिला आहेच... मुळातच हे एक सूत्रमय भजन आहे असे दासगणू महाराज म्हणताहेत हे ध्यानी घ्यावे, ते शब्द एकमेकांशी सूत्राप्रमाणे संबंधित आहे...

In reply to by Nile

मी दररोज पूजा करतो. तस्मात मला काहीही उद्योग नाही, माझ्याकडे भरपूर वेळ आहे, अंगात धमक नाही आणि मी मूर्ख आहे असा "प्रत्यय" आणून दिल्याबद्दल निळोबांचे धन्यवाद. जाताजाता: तुमच्या उदाहरणातले तासावर मजूरी करणारे, हातावर पोट असणारे अनेक मजूर पाहण्यात आहेत. पण त्यातला एकही अश्रद्ध दिसला नाही.

In reply to by चिन्मना

अशिक्षित अडाणी मजुरांना पुजा पाठ करण्यापेक्षा रोजची मजुरी महत्त्वाची वाटते यातच सगळे आले. तुम्ही सुशिक्षित दगडाची/धातुची पुजा करण्यात वेळ घालवता या पेक्षा अजुन काय लिहावे?

In reply to by Nile

चुकताय निळुभाउ. रोजची मजुरी बांधकाम मजुरांना काय आणि मोठ्या कोर्पोरेटस मध्ये काम करणार्‍या मजुरांना काय दोघांनाही महत्वाची असते. हातातले काम सोडुन पुजा करणारे नक्कीच मुर्ख. पण वेळ मिळेल तसे का होइना देवाची आठवण ठेवणारे यात येत नाहीत. आणी आपला मुख्या आक्षेप कुठल्या गोष्टीला आहे ते कळाले तर बरे होइल. मुर्तीपुजेला विरोध आहे की देव या संकल्पनेलाच?

In reply to by मृत्युन्जय

आक्षेप अंधश्रद्धेला आहे, चुकीच्या समजुती-रुढींमुळे समाजात चालणार्‍या मुर्खपणाला आहे. देवाच्या नावाखाली चालणार्‍या लुबाडणुकीला आहे. देव संकल्पनेवर विश्वास नसला तरी लोकांच्या देव नावाच्या वैयक्तीक समजुतीला विरोध नाही. देव संकल्पनेची गरज अनेकांना आहे असे वाटते. कुणाला देव आहे असे मानल्याने वैयक्तीक काही फायदा होत असेल(इतरांचे काही नुकसान, फसवणुक न करता) तर आनंदच आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

ब्रम्ह तेथे माया, वॄक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया. सौजन्य - प्र.के. अत्रे अगागागा ठॉय. फुटलो. =)) =)) =)) ते "हुप्या तिथे वानरे" असेही करता येइल. गवश्या.

थोडं विषयांतर होतंय, पण मध्यंतरी एक नित्यानंद स्वामी नेट वर व्हिडिओ रुपे धमाल उडवत होता. तसंच कोणा पायलट बाबाने एका साध्यासुध्या अपंग अनुयायाला जिवंत समाधी घ्यायला लावल्याचं ऐकिवात आलं होतं. या असल्या भोंदू बाबांना कोण आणि कसे आवरणार?

झाली झाली झाली. अपेक्षीत डबल सेंचुरी झाली. लगे रहो.

आयच्या गावात!!!!! अजुन चालुच है का हे दळण? आयला, त्या कोण त्या अनिरुध्दबाप्पूंचं नाव घेऊन त्याआडुन आपण किती अश्रध्द आहोत आणि कसे बरोबरच्च आहोत ह्याच्या टिमक्या वाजवायचा कंड अजुनही नाहीच शमला का? एव्हढीच एनर्जी है तर चला, तुम्हाला चार सामाजिक कामं देतो. हल्ली देणग्यांचा ओघ असतो पण स्वयंसेवक मिळत नाहीत. चला, तुमची एनर्जी कारणी लाऊ.... बोला कोण कोण येतंय वृध्दाश्रमात वेळ्+सेवा द्यायला? बोला कोण कोण येतंय SAA चं काम करायला? उगं येतंय टायपायला म्हणुन कडाकडा भांडत बसतेत नळावरच्या बायांसारखे! स्वतःला जे नाही करायचं त्याबद्दल कोणी सांगितलं की वस्सकन अंगावर येता येतं, तसं दुसर्‍याच्या श्रध्दांवर वाटेल तसे आरोप करताना हीच बुध्दी कुठं जाते? आता बास करा की हे चवचाल चाळे. असो. हे आकाशातला बापा, माझ्या मेंढपाळा, ह्या अज्ञ बालकांना क्षमा कर, कां की ते काय करत आहे हे त्यांनाच कळत नाही. -फादर धमाल दिब्रेटो.

In reply to by धमाल मुलगा

हा प्रतिसाद इतर कोणाला उद्देशून नसल्यामुळे तो सदर लेखाला उद्देशून आहे अशा समजातून पुढील प्रतिसाद लिहीला आहे. हा समज चुकीचा असल्यास पुढील वाक्ये वाचू नयेत. १. लेखात कुठेही अनिरूद्ध बापूंचा उल्लेख नाही. २. आपण अश्रद्ध आहोत असा कुठेही लेखात उल्लेख नाही. ३. दुसर्‍यांच्या श्रद्धांवर लेखात कुठेही हल्ला नाही. ४. माझ्या प्रतिसादांमधे कुठेही अनिरूद्ध बापूंवर टीका नाही. त्यांच्या महावाक्यात मला खोट दिसते आहे ते योग्य का अयोग्य असा प्रश्न विचारला आहे, त्याचे उत्तर मिळण्याऐवजी हीन पातळीवरची टीका माझ्यावर झाली (जी आकाशातल्या असलेल्या/नसलेल्या बापाला प्रिय झाली; त्याबद्दल संपादकांचे आभार). ५. टायपायला येतं म्हणून लोकं इथे टंकतात हा गैरसमज आहे. ६. प्रतिसाद किंवा लेख टाकण्यासाठी टी/कॉफी ब्रेक पुरतो; वृध्दाश्रमात वेळ्+सेवा द्यायला हा वेळ पुरणार नाही. ७. या लेखातून, प्रतिसादांतून, वाद-विवादांमधून कुणाचाही काडीइतका फायदा झाला नसेल तर एकवेळ तक्रार करायला जागा आहे. पण एक मिनीट ... ज्या लोकांना एवढी "मारामारी" वाचायला वेळ नाही त्यांनी एवढे प्रतिसाद असलेला धागा उघडू नये. अशाच प्रकारची तक्रार करायची असेल तर प्रत्येक प्रतिसादात लांबलचक स्वाक्षर्‍या टाकणार्‍यांचीही करता येईल. लांबलचक म्हणजे काय ही गोष्ट व्यक्तीसापेक्ष बदलते. ८. इतरांची ती अंधश्रद्धा आपली ती श्रद्धा हे चुकीचं आहे तर दुसर्‍यांची शक्ती प्रतिसाद टंकण्यात व्यर्थ जात हे ही आपण ठरवू शकत नाही. ९. नळावरच्या बायांसारखे हा शब्दप्रयोग सेक्सिस्ट आहे म्हणून त्याचा निषेध! असो, सध्या माझा टीब्रेक संपल्यामुळे प्रतिसाद आवरता घेते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बोला कोण कोण येतंय वृध्दाश्रमात वेळ्+सेवा द्यायला? बोला कोण कोण येतंय SAA चं काम करायला? ... ह्या अज्ञ बालकांना क्षमा कर,
माझ्या मुळ प्रतिसादात असलेल्या ह्या अधोरेखीत वाक्यांतुन अनेकवचन प्रतीत होते. त्यामुळे 'केलेला प्रत्येक विरोध हा मलाच आहे' अशा फोबियात नाही राहिले तरी चालेल. :) अर्थात, आपल्या प्रतिसादातील
हा समज चुकीचा असल्यास पुढील वाक्ये वाचू नयेत.
ह्या सुचनेचे पालन करणेत आले आहे. :) कोणतीही मुक्ताफळे वाचणेत आली नाहीत. मंडळ आभारी आहे. अवांतरः सार्वजनिक गणपती उत्सवाची वर्गणी घ्यायला कधी येऊ हो ताई? :P

In reply to by धमाल मुलगा

माझ्या मुळ प्रतिसादात असलेल्या ह्या अधोरेखीत वाक्यांतुन अनेकवचन प्रतीत होते. त्यामुळे 'केलेला प्रत्येक विरोध हा मलाच आहे' अशा फोबियात नाही राहिले तरी चालेल.
याचप्रमाणे निरीश्वरवाद्यांनी श्रद्धेची चिकित्सा करणारा प्रत्येक लेख आपल्यालाच डोळ्यासमोर ठेवून लिहीलेला नाही हा निरोप ज्यांना खिल्ली उडवल्यासारखी वाटते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अवांतराचे उत्तरः कोण गणपती? धन्यवाद. :-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

याचप्रमाणे निरीश्वरवाद्यांनी श्रद्धेची चिकित्सा करणारा प्रत्येक लेख आपल्यालाच डोळ्यासमोर ठेवून लिहीलेला नाही हा निरोप ज्यांना खिल्ली उडवल्यासारखी वाटते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.
हा हा हा! ज्यांना 'कुठे कसं काय शिजतं' ते कळत नाही त्यांना हे वाक्य अत्यंत प्रामाणिक वाटलं नाही तरच नवल. :) आम्ही आजकाल एव्हढे दुधखुळे राहिलो नाही....दुर्दैवानं! >>अवांतराचे उत्तरः कोण गणपती? धन्यवाद. अरेरे..सगळ्यांच्या लाडक्या गणपतीबाप्पांचं नाव काढताच आपण इतक्या शांततेत विचारलंत म्हणजे छान प्रगती आहे. :) बोला......गणपतीबाऽऽऽप्प्पाऽऽऽ मोऽऽऽअऽरया!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मिपाचा धाग्यावरच्या प्रतिसादांचा विक्रम काय आहे? कारण उद्या सकाळपर्यंत या धाग्याने बहुधा ओळळपरेडला मागे टाकले असेल. धर्माची गोळी नेहेमीच कशी बरोबर लागु पडते?