माझ्या काही थिअरीज आहेत पैकी १ म्हणजे - शिक्षकांची मुलं चांगली निघतात. चांगली म्हणजे त्यांना शिस्त असते वगैरे वगैरे. असो.
माझी आई देखील शिक्षीका होती. मला तिच्याबद्दल आठवेल तसं सांगायचं आहे. प्रयत्न करते. मला वाटतं स्त्रिया-स्त्रियांमधलं सर्वाधिक क्लिष्ट, कडू-गोड, गिल्ट रिडन नातं जर कोणतं असेल तर ते आहे आई-मुलीचं. या सुंदर, अनोख्या, अनवट नात्याबद्दल माझ्या मनात नेहेमीच एक कुतुहल, गंमत अशी संमिश्र भावना आहे.
आई हे १ अजब रसायनच असतं नाही? मायेनी डोक्यावरून हात फिरवत तुम्हाला जागं करणारं आणि दुसर्या क्षणी तुमच्यावर रागानी बरसणारं सुद्धा. तुमचं सगळं भावविश्व व्यापूनही ४ अंगुळं उरणारं.
माझी आई शिक्षीका, आता निवृत्त मुख्याध्यापिका, पाककलेत अतिशय सुगरण अशी. खास कोकणस्थी ,फणसासारखा वरून काटेरी पण आतून गोड असा तिचा स्वभाव होता. मला या स्वभावाला सरावायला बरीच बरीच वर्ष लागली. आम्ही कर्क राशीचे लोक मुळातच रडे जरा फट म्हणताच आमचे डोळे भरून येतात. आईच्या काटेरी बाह्यरूपाला सरावायला बराच त्रास झाला.
आई व्यवहारात अतिशय काटेकोर आणि दक्ष होती. अनाठायी, नको तिथे पैसा कधीच सुटायचा नाही. लहानपणापासून बचतीचं बाळकडू आम्हाला तिनी दिलं. पण हेदेखील सांगीतलं की भरपूर पुस्तकं वाचायची. पुस्तकांवर खर्च करताना हात आखडता घ्यायचा नाही. याउलट कपडे, फॅशन याबाबत ती अगदीच उदासीनच नव्हे तर त्याचा तिला तिटकाराच होता. तिचं म्हणणं हे होतं की हे नवश्रीमंत नटण्यावर जास्त खर्च करतात. यांच्या प्रायॉरीटीजची वाट लागलेली असते. याउलट ज्यांनी पैसा लहानपणापासून पाहीलेला असतो किंवा कष्टाने मिळवलेला असतो ते व्यवस्थित रहातात. सांगायचा मुद्दा हा की एकंदर ती फॅशन वगैरे कमी लेखायची.
आई आस्तिक होती. पण फार देव देव करणारी अजीबात नव्हती. रोज संध्याकाळी स्वयंपाक करताना रामरक्षा म्हणत असे. ती ऐकून ऐकून माझी पाठ झाली होती.
आईला मोजक्याच पण अतिशय जीवलग मैत्रिणी होत्या. ज्या अजूनही तिला भेटतात, रहातात. तिनी कॉलेजमधल्या मोजक्या का होईना मैत्रिणी जपल्या.
माझी काही उदाहरणंच द्यायची तर -
लहानपणी नक्की १००% मी आईवेडी असणार. कारण टीनेज मधे आई हळूहळू मला तोडायला लागली. तिचं म्हणणं हे होतं की मी स्वतंत्र कधी होणार? असं आईवेडं असणं माझ्या वाढीच्या दृष्टीने चांगलं नाही. आता जेव्हा मी काही मुली बघते ज्या त्यांच्या आईची सावली असतात, ज्यांच्या संसारात त्यांच्या आईचा अनाठायी हस्तक्षेप असतो त्यावेळी मला माझ्या आईच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं.
मी माँटेसरीत असताना आमच्याकडे भांडी घासायला १ मामी यायच्या. त्यांनी गौरीचंआम्हाला निमंत्रण दिलं होतं. मी हावरटासारखा गौरीच्या रुखवतातला कानवला मागीतला : (. झाल! घरी आल्यावार जो बेदम मार बसला. अजूनही मी कोणाला काही मागू शकत नाही. हे संस्कार तिने केले.
तिचं सगळच पटलं असही नाही. "कोकणस्थ ब्राम्हण्य" हा तिचा अभिमानाचा मुद्दा होता. मला जातीपातीचा तिटकारा होता. आमची बरीच बोलचाल आणि शेवटी पर्यवसन कटू शांततेत होत असे. दुसरा वादग्रस्त मुद्दा होता तो हा की - माझं म्हणणं होतं की पैशानी सर्वं सुखं विकत घेता येत नाहीत. पैसा हे सुख मिळवायचं साधन नाही. तर तिचं म्हणणं असे की "असेल. पण पैशानी ९९% समस्या सुटतात." यावरून वादविवाद व्हायचे.
तिनी मला खूप काही दिलं. जेवढी माझी कुवत तेवढं जिरलं, मी धरून ठेऊ शकले.
आजच आई आणि मुलगी याच्या नातेसंबंधांबाबत मस्त पुस्तक वाचत होते. माझा ऑलटाईम फेव्हरेट विषय. त्यावरून स्फूर्ती घेऊन हा लेख लिहायला घेतला. शेवटी प्रत्येकाला स्वतःची आई खास वाटते. जशी मला माझी वाटते. ते तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी हा लेखनप्रपंच.
वाचने
6029
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला
चांगलं स्फुट आहे.
भिडल मनाला शुची. स्वतः आई
छान स्फुट
अप्रतिम लेख.
माझी आई
अप्रतिम लेख वयच्या २९ व्या
आई
छान..
छान
छान लेख...
(विषय दिलेला नाही)
In reply to छान लेख... by अनिल २७
प्रकटन आवडले...
लेख आवडला ..
माझ्या काही थिअरीज आहेत पैकी
छान लिहिलय.
स्फुट आवडले
लेख आवडला
@शुचीजी
वा! सुरेख लेख झाला आहे.. जरा
आई आई ग.........
हेच
In reply to आई आई ग......... by वेताळ
चांगली म्हणजे त्यांना शिस्त
छानच लेख! लेखातला विस्कळीतपणा
छान........