Skip to main content

धपाटे- खास कोल्हापुरी!

लेखक स्पंदना यांनी शुक्रवार, 13/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नमस्कार. अंह! अंह!! अपर्णाची गल्ली चुकली कि काय ? अस नका वाटून घेऊ ! आम्ही इथे अगदी बरोबर पत्त्यावर आलो आहोत. तर पाहिलं नमन त्या गणपाला!! द्या आशीर्वाद हो मजला! पाक कृतीचा वसा चालवण्याला! माझा दुसरा साष्टांग जागुताई! घे लेकरास जाणून बाई ! तिसरा नमस्कार केशवजी तुम्हा! द्या आशीर्वाद आज आम्हा! चला सुरुवात करू. श्रावण म्हंटल कि जशी हिरवागार साज ल्यालेली धरित्री दिसते, तशीच मला जाणवते आपली सुध्धा त्या रुपात सामावून जाण्याची, त्या जल्लोषात सामील होण्याची अनावर आस! म्हणूनच कि काय श्रावणात बक्कळ सण असतात. आज चतुर्थी! भावाचा उपास! अन नागराजाला भाऊ मानून त्याच्या पूजेचा आज पहिला दिवस! आज आमच्या कोल्हापुरात धपाटे केले जातात! केले जातात, घातले नाही! तर घ्या सामान लिहून. साहित्य:- १ पेला तांदूळ. १ वाटी गहू. १ वाटी ज्वारी. १ वाटी हरभरा डाळ. २ टेबल स्पून धने. १ टेबल स्पून जिरे. हे सार छानस भाजून घ्या. सर्व भाजत आल कि शेवटी धने अन मग आच बंद करून जिरे मिसळा. याच बारीक पीठ दळून आणा. आता हिरवा मसाला. काही जास्त नाही, कोथिंबीर १/२ जुडी. लसूण एक गड्डा. हिरव्या मिरच्या ३ ते ४ ( वा आवडी नुसार) हे सार चर्नर मध्ये फिरवून घ्या. आता दळून आणलेल्या पिठात थोडी हळद , मीठ, अन हा मसाला मिक्स करा. पाणी घालून पीठ मऊसर मळून घ्या. आता एक करा. जरा दोन चार मित्र मंडळींना फोन करुन,' धपाटे खायला' येण्याचा आग्रह करा. ते लोक बावरुन जाउन, "नको नको माझ्या वाटणीचे तुच खा" अस म्हणतील. नंतर चिडवायला बर, मैत्री साठी एव्हढ पण नाही करत म्हणुन! एक साधारण भाकरीला घेतो ना तेव्हढ्या आकाराचा गोळा घ्या, माझ्या कडे धपाट्याची खास नॅपकिन असते. बाकीच्या वेळी ती वाळवून फ्रीज मध्ये ठेवते मी. तर नॅपकिन ओला करून पोळपाटावर पसरून त्यावर हा गोळा ठेवा अन हलक्या हाताने थापत थापत धपाटा पसरून घ्या. तव्यावर थोड तेल टाका. त्यावर नॅपकिन उचलून उलटी टाका. बोटांनी छोटी छोटी छिद्र तयार करा अन नॅप्कीन काढून घ्या. बाजूने थोड तेल सोडा अन मग अगदी भरगच्च पाण्याचा शिपका मारून तव्यावर झाकण घाला. एक २ ते ३ मिनिटात धपाटा तयार! हा एका बाजूनेच भाजतात. भाजताना मारलेल्या पाण्याच्या शिपक्याने तो खुसखुशीत तर होतोच पण तव्या कडच्या बाजूला हलका कुरकुरीत पण होतो. याच्या बरोबर खरतर काळ्या वाटण्याची उसळ करतात. पण मला इथे नाही मिळाले म्हणून मी हिरव्या वाटण्याची उसळ केली. भिजवलेले वाटाणे २ वाट्या . कांदा कापून १ . अस्सल कोल्हापुरी मिसळनीच तिखट. मीठ , आमसूल, अन थोडा गूळ वा साखर. भिजलेले वाटाणे कोरडे भाजून घ्या. अन जमल तर त्याच कढइत थोडे थोडे फोडून घ्या . तेलावर जिरे, मोहरी, कडीपत्ता , हिंग अन कांदा परतून घ्या. वाटाणे मिसळा. हळद मीठ अन तिखट घाला. भरपूर पाणी घालून चांगल शिजू द्या. झाल! मात्र वाढताना हिरव्या मिरचीचा खरडा, मस्त दही, लोणी अगदी मस्ट!! एकदा खाऊन बघा, परत परत बनवाल!

वाचने 11912
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

In reply to by स्पंदना

वाचताना प्लिज 'गणपा भाउला' असे वाचावे. फोटोच्या गोंधळात पॅरेग्राफ वा दोन वाक्यात थोड अंतर ठेवायच हे सगळ विसरुन गेल. वर तर वर गणपा यांचा फोटो कसे चिटकवावे हा लेख पण दिसत नाही आहे.

पाकृ फोटोशिवाय अपूर्णच वाटते.. आता छान वाटले.... आम्ही लहान असताना धपाटे धपाटे म्हणून एकमेकांना छळायचो त्याची आठवण झाली!!!

१ पेला तांदूळ, १ वाटी गहू, १ वाटी ज्वारी, १ वाटी हरभरा डाळ, २ टेबल स्पून धने, १ टेबल स्पून जिरे. हे सार छानस भाजून घ्या. सर्व भाजत आल कि शेवटी धने अन मग आच बंद करून जिरे मिसळा. याच बारीक पीठ दळून आणा...... इथपर्यंत वाचत येउन अडकलो! आता इथे परदेशात बारीक पीठ दळून कुठून आणायचं हो? तयार पीठं मिळतात तांदुळ, ज्वारी वगैरेची, त्यांत कणीक आणि डाळीचं पीठ घातलं तर चालायला हरकत नसावी, प्रमाण काय असावं?

In reply to by बहुगुणी

बहुगुणींना पडलाय तोच प्रश्न मलाही पडलाय. उत्तर मिळाले तर(च) बायको धपाटे करेल (नाहीतर मला घालेल) (खवय्या)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

बहुगुणी अन बे.ला. कष्टाविण फळ ना मिळते.... मी दिवस भर लिटल इंडियात एक चक्की आहे म्हणुन शोध शोध शोधल, अन ती बंद होता होता तिथे पोहोचले! चक्की वाला लय भारी, ११ ते ५ फक्त, त्यात ही दुपारी १ ते २ आराम! पण शेवटी मिळाल दळुन! अदरवाइज भारतातुन येताना आणने.

खुमासदार लेखन. धपाटे पण रुचकर असावेत.
आता एक करा. जरा दोन चार मित्र मंडळींना फोन करुन,' धपाटे खायला' येण्याचा आग्रह करा. ते लोक बावरुन जाउन, "नको नको माझ्या वाटणीचे तुच खा" अस म्हणतील.
या वाक्यात गुरूजी (घासकडवी) दिसले. :) नंदू

मस्त झालेत धपाटे . लवकरच करुन बघणार.

शन्का : एकाच बाजुने भाजले तर कच्चे नाही रहात का???

In reply to by प्राजक्ताचि फुले

नाही. त्यावर जे पाण्याचा शिपका मारुन नंतर झाकण ठेवायचे असते ना, त्यामुळे अतिशय छान भाजुन निघतात, वरुन थोडे सॉफ्ट अन तव्याकडील बाजुने कुर कुरीत. करुन बघा आवडेल.

आमच्या शेजारील देशावरचे लोक असे धपाटे दसरा या सणाला करतात. एरव्ही हि करतात . मला खुप आवडायचे म्हणुन ते माझ्या साठि राखुन मला ते देत असत . आता शेजार धर्म राहिलाय कुठे//

उद्याच सामान आणुन करायच विचार करतोय

मस्त! बहुतेक हे खाल्ले आहेत पण तेव्हा मी हा काय थालपीटचा प्रकार दिसतोय आज जरा वेगळा लागतोय असे म्हणुन संपवले असावे.

मस्तच आहे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची ईच्छा.

वा वा वा.. तोंडात खळकन पाणी आलं!... कधी एकदा तुमचे हे कोल्हापुरी धपाटे करते असं झालंय.. आपण गाववाले.. तो चक्कीवाला नक्की कुठे आहे गं? ;)

मस्त! मल्टी ग्रेन थालिपिठ म्हणाना! बाकी धपाटे हा तोंडानेदेखिल खायचा पदार्थ आहे हे नव्यानेच कळले!

अपर्णा, फोटो व पाकृ दोन्ही एकदम झक्कास!!! :-)

कालच केले होतो , झाले चागले पण मिठ कमी पडल होते व थोडे कमि तिखट झाले मि दोन्ही बाजुनी भाजले होते

छ्या! हे असलं काही करायचं आणि आम्हाला खायला बोलवायचं नाही हे बरोबर नाही. तुम्ही ती फोन करायची स्टेप गाळली की काय? :-)

आमच्या शेजारी एक काकू राहत त्या बाजरीचे धपाटे करायच्या आणि अर्थातच चार पाच आमच्याकडे धाडायच्या.....अतिशय छान असायचे ते...

मी लहान होतो त्यावेळची गोष्ट- एक दिवस आईने स्वयंपाक खोलीतून मला हाक मारली आणि विचारले, "आज कारले नि चपाती खाणार की धपाटे खाणार?" मी घाबरून म्हणालो, "कारले नि चपाती खातो". पण नंतर इतरांच्या ताटात धपाटे वाढलेले पाहून मला कळून चुकले की आई जेवणातल्या धपाट्यांविषयी विचारत होती आणि मला वाटले होते की गेल्या आठवड्यात, कारले खात नाही म्हणून आई माझ्यावर भडकली होती आणि हात ऊगारून म्हणाली होती, "पुढच्या वेळेस जर तू कारले खाल्ले नाहीस, तर 'धपाटे' खाशील!". त्यावेळी मी झालेल्या शाब्दिक गोंधळाबद्दल स्वतःलाच दोष देत, मला न आवडणारी कडू कारल्याची भाजी मुकाट्याने खात बसलो होतो.

च्यायला...धपाट्यांसारखी चीज नाय बा. आता ते कसे करतात अन काय ह्याच्याबद्दल आपलं ज्ञान शून्य! आपल्याला माहितीये ते फक्त हादडायचं :) मस्त सकाळी सकाळी सहा-साडेसहाला उठावं, अंगणात भुंकणार्‍या कुत्र्यांना सोडावं, त्यांच्यासोबत पळत पळत रानात जावं..तिथं त्या कुत्र्यांना मातीत लोळवावं, त्यांच्याशी मस्ती करावी आणि मग निवांत विहीरीत पोहत बसावं....कधीपर्यंत? घड्याळ गेलं खड्ड्यात..पोटात भुकेचा आगडोंब उसळेपर्यंत! मग ओल्या अंगानंच परत घराकडं येतायेता एखादा ऊस खात यावं आणि दारात पोचल्याबरोब्बर धपाट्यांचा खमंग वास यावा.......खल्ल्लास तिच्यायला! हातपाय धुवुन दे दणादण हादडायला सुरुवात. हे मुठमर खरड्याचा गोळा, सुगडभर दही आणि एकापाठोपाठ एक धपाटे....अगदी म्हातारीनं, "आता ऊठा मेल्यांनो..हात दुखायला लागले रांधून रांधून.." असं म्हणेपर्यंत खा खा करायचं आणि मागं बागेत जाऊन पडी टाकायची.....हॅट्ट तिच्यायला.... आठवणींनीच जीव कसनुसा झाला.