✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आयटीतल्या बायका

म
मिसळभोक्ता यांनी
Tue, 08/03/2010 - 11:25  ·  लेख
लेख
(सदर लेखनाची प्रेरणा एका वाक्यात सांगायची, तरः च्यायला, मग आम्हीच काय पाप केलं ? असे म्हणता येईल.) प्रविन्भप्कर आणि सुजय कुलकर्णींच्या लेखनाने आमचे डोळे खाडकन उघडले. आज जगातले सर्वात महत्वाचे प्रश्न, म्हणजे इंचाइंचाने मागे सरणारे कश्मीर (आणि वर सरकणारा हिमालय), ग्लोबल वॉर्मिंग, मेक्सिको खाडीतील तेल गळती, पुण्यातील परप्रांतीय मुलींची नशाखोरी, पॅराग्लायडिंगच्या छायाचित्रांमुळे वाढलेला इनोचा खप, ह्या सगळ्यांसाठी आयटीतल्या बायका जबाबदार आहेत, अशा आमच्या संशयावर जणू शिक्कामोर्तब झाले. आमचा हा संशय फार जुना आहे. मनोगतावरून आम्हाला आणि आमच्या देवगडच्या एका मित्राला काढून टाकण्यात, (आणि नंतर उपक्रमावर रिपीट परफॉर्मन्स घडवून आणण्यात) आयटीतील काही बायका (आणि रसायनशास्त्रातले काही अजब पुरुष रसायन) ह्यांचा हात होताच, असे आमचा देवगडचा मित्र आजही छातीठोकपणे सांगतो. पण यापेक्षाही अधिक खात्री पटली, ती आमच्या एका मित्राच्या कहाणीमुळे. तीच कहाणी इथे थोडक्यात ऐकवतो. (सत्यकथा ह्या मासिकांत येणार्‍या कथांइतकीच ही सत्य आहे, ह्याची खात्री असू द्यावी.) आमचा मित्र, तिकडला कोल्हापूर साईडचा. मनाने अतिशय निर्मळ वगैरे. सगळं तारुण्य निबंधलेखनात गेलं. वेगवेगळ्या दैनिकांचे उपसंपादक त्याला करीना, बिपाशा, दीपिका सारखे क्यूट आणि सेक्सी वाटायचे. व्हायचं तेच झालं. पत्रकार झाला. कोल्हापूरच्या तरुण भारतात, राजारामपुरीचे विशेष बातमीदार म्हणून फेमस झाला. तुंबलेल्या नाल्यांच्या प्रश्नावर त्याने महानगरपालिकेस धारेवर धरले. शेवटी महापौरांनी खास त्यांच्या स्वतःच्या भट्टीवरची पहिल्या धारेची पाजली, तेव्हा धार जरा बोथट झाली. अशीच अनेक समाजोपयोगी कामे करत ३५ वर्षाचा झाला, तोपर्यंत म्हातारी अंथरुणाला खिळली होती. लग्न केलं नाहीस, तर भूत म्हणून मानगुटीला बशीन म्हणाली, तेव्हा पोरी बघायला लागला. पण तोवर सर्व देखण्या, मनमिळावू, गुणी मुलींना देखणी, मनमिळावू, गुणी बाळे झाली होती. आता ३०-३२ वर्षांची लग्नाची मुलगी मिळून मिळणार कुठे ? म्हणून त्याने आयटी इण्डस्ट्रीकडे मोहरा वळवला. हिंजवडीला पोहोचला. तिथल्या एका मल्टिनॅशनलच्या कॅफेटेरियात आमच्या ओळखीने प्रवेश मिळवून दिवसेंदिवस शोध करायचा. एकदाची ६५ किलोखालील एक मुलगी दिसली. नेत्रपल्लवी वगैरे झाली. तिच्या जाड भिंगाच्या चष्म्यांत ह्याला आपले प्रतिबिंब दिसले, तेव्हा "तुमने मुझे अपने नजरोंमे बसा लिया है" वगैरे काही काही बोलला. आणि प्रपोज केले. तिने त्याचा रिझुमे मागितला, तेव्हाच खरे तर त्याला धोक्याची जाणीव व्हायला हवी होती. पण प्रेमात पडलेल्याला आणि जॉब शोधणार्‍याला अक्कल नसते, म्हणतात. आयटीतली मुलगी शोधायची म्हणून खरे तर आमच्या मित्राने सहा महिन्यात जे२ईई वगैरे शिकून घेतले होते. तर मुलाखत अशी झाली. मुलगी: काय स्किल्सेट ? मित्रः काय असाच थोडाफार, इकडे तिकडे, काहीतरी. तसं घरातलं वातावरण सोवळं, त्यामुळे लग्नासाठी आवश्यक स्किल्सेट स्वतःच बिल्ड केला. मुलगी: अच्छा, म्हणजे सेल्फ मोटिव्हेटेड, क्विक टु लर्न, वगैरे. मित्रः हो, तसेच म्हणा. सुरुवात अगदी एफ-१ की पासून. मुलगी: हायबर्नेट वगैरे ? मित्रः हो, करतो की. दर शनिवार रविवारी. मुलगी: स्प्रिंग ? मित्रः ओढून बघा. ताणेन पण तुटणार नाही. मुलगी: कुठे कुठे वापरलेत हे स्किल्स ? मित्रः तशी संधी कमीच मिळाली, आणि मिळाली तीही अनपेड. मुलगी: व्हेअर डू यू सी युअरसेल्फ इन फाईव्ह इयर्स ? मित्रः हियर ओन्ली. विथ यू. बस, त्या "विथ यू" ने त्या जाड भिंगाच्या चष्म्याखाली वाफ जमायला लागली. आणि महिन्याभरात आमच्या मित्राचे लग्न झाले. बाहेरून अगदी आनंदी वाटणारे युगल. पण आमचा मित्र आमच्या पार्ट्यांना येणे बंद झाले, केस गळायला लागलेच होते, पण आता चंद्रकोर उगवायला लागली होती. सतत विमनस्क दिसायचा. म्हणून एकदा हिंजवडीहून परतताना त्याला गाठला. आणि बळेबळेच दोन पेग पाजले. मग मित्र खुलला, आणि त्याने अनेक किस्से सांगितले. सगळे काही इथे लिहिण्यासारखे नाहीत. (अधिक माहितीसाठी इच्छुकांनी व्यनि करावा. किंवा जाऊ द्या,उगाच सर्वर ची ब्यांडविड्थ कशाला वाया घालवता?) लग्नानंतर काहीच दिवसांनी, रोज कॅफेटेरियात खायचा कंटाळा आला, म्हणून बायकोला त्याने कुकर लावायला सांगितला.बायकोने आधी कांकूं केले, पण एक नवीन स्किल्सेट रिझ्युमेवर टाकता येईल, म्हणून भात केला. तर पहिल्याच घासात खडा. "अगं, तांदूळ निवडून घेतला होतास का ?" दाताचा टवका थुंकत मित्र म्हणाला. तर बायको खेकसली. "तू मला भात करायला सांगितला होतास. खडे नसलेला, असं स्पेक मध्ये होतं का ? प्रॉडक्ट रिलीज झाल्यानंतर स्पेक बदललेलं कसं चालेल ? पुढच्या वर्शनला ही व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्विस म्हणून कन्सिडर करीन." नंतर दर शुक्रवारी ती वीकली स्टेटस रिपोर्ट मागायला लागली. एका आठवड्यात त्याच्या रिपोर्टमध्ये घर झाडल्याची फक्त तीनदा नोंद होती, म्हणून "आय हॅव नोटेड धिस फॉर युवर अ‍ॅन्युअल इव्हॅल्युएशन", म्हणाली. भाजी आणणे, कपडे धुणे, घर साफ करणे, अशा प्रत्येक कामासाठी, एक एक बगझिला टिकेट बनवायची, आणि घरी येऊन रोज डॅशबोर्ड उघडून बग-स्टेटस रिव्ह्यू करायची. मित्र हे सर्व उदास होऊन सांगत असताना, मला उगीच डोक्यात काहीतरी चमकले. मी म्हटले, "पण, काय रे, 'ते' तरी व्यवस्थित होते ना ?" मित्राच्या डोळ्यात पाणी तरळल्या सारखे वाटले. "वीकली स्टेटस सॅटिस्फॅक्टरी वाटले, तर शनिवारी नक्की. माझी सगळी बगझिल्ला टिकेट्स रिझॉल्व्ड फिक्स्ड असणे आवश्यक आहे, तरच." मित्र पुढे सांगत होता. "आमच्या म्हातारीचे काय खरे नाही. तिने अल्टिमेटम दिले, की नातवाचे तोंड पाहिले नाही, तर भूत म्हणून दोघांच्याही मानगुटीला बसेन, म्हणून." "अरे, पण तुमच्या दोघांच्या मानगुटी कधीच जवळजवळ नसतात. एकदम दोघांच्या मानगुटीवर कशी बसेल ती ?" माझा माफक विनोदाचा प्रयत्न. मित्राने आवंढा गिळला, आणि पुढे सांगू लागला. "मी भीत भीतच बायकोला सांगितले. तर, आश्चर्य असं, की ती खूपच खूष झाली. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कंटाळा आला, आता प्रॉडक्ट डेव्हलप करायला मिळणार म्हणून तिला आनंद झाला होता. तिच्या बरोबरच्या -- म्हणजे वयाने आणि आकारानेही-- काही मुली म्हणे अमेरिकेत आयटीत होत्या. त्या हिला ईमेलवरून खिजवायच्या. कारण त्या प्रॉडक्ट करायच्या, आणि ही सर्विस. त्यामुळे स्वतःचे प्रॉडक्ट म्हटल्यावर, तिला एक विकृत आनंद झाला. तिने रोडमॅप डॉक्युमेंट लिहायला सुरुवात केली. टाईमलाईन्स, प्रोसेसेस, सगळ्या डॉक्युमेंट केल्या. अरे इतके डिटेल मध्ये प्लॅनिंग केले. आता रिक्वायरमेंट देणारी कस्टमर म्हणजे आमची म्हातारी. मग हिने एक पॉवरपॉइंट तयार केले, चित्रे वगैरे काढून, अगदी डिटेलवार. आणि कोल्हापुरात म्हातारीला प्रेझेंटेशन देऊन आली. इंटरमिडिएट डिलिव्हरेब्ल्स ची चित्रे पाहून म्हातारीचे डोळे पांढरे झाले. डेव्हेलपमेंटसाठी वॉटरफॉल मॉडेल वापरावे, का अजाईल प्रोसेसेस ह्यावर बरेच दिवस विचार झाला. शेवटी, अजाईल इज इन, वॉटरफॉल इज सो सेव्हन्टीज, म्हणून ते ठरले. स्प्रिंट प्लॅनिंग मंथली करायचे ठरले, कारण फीचर इंप्लिमेंट करून क्यू-ए, डिप्लॉयमेंट वगैरे व्हायला एक महिना लागतो म्हणे." मी अवाक होऊन पहात होतो. हसावे की रडावे काही कळत नव्हते. मी सहानुभूती दाखवण्यासाठी आणखी एक पेग मागवला. मित्र मात्र लगेच उठला, आणि म्हणाला, "नको रे, जातो आता घरी. आज तिसरा मंथली स्प्रिंट रिव्ह्यू आहे. उद्यापासून नवीन स्प्रिंट सायकल सुरू होणार. प्रोजेक्ट डिले झाले, तर बेंचावरच्या मंडळींना अ‍ॅडिशनल रिसोर्स म्हणून प्रोजेक्टवर टाकेल ती." असा आमचा निर्मळ मनाचा उमदा मित्र, ह्याचे आयटीतल्या मुलीने कसे वाटोळे केले, बघा. या एका उदाहरणावरून तुम्हाला सहज कळले असेल, की जगातले सगळे प्रॉब्लेम्स आयटीतल्या बायकांमुळे झालेले आहेत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20009 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

अजून थोडी आठवलेली

ऋषिकेश
Tue, 08/03/2010 - 13:21 नवीन
अजून थोडी आठवलेली माहिती: स्क्रममधे दर स्प्रिंटच्याशेवटी 'शोकेस' मिटिंग असते.. डेली 'स्टँडअप' कॉल असतो प्रोजेक्टच्या आधी 'मास्टर' स्टोरी लिस्ट असते रोज बदलणारा "बर्न अप" चार्ट असतो
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

मिसळभोक्ता
Tue, 08/03/2010 - 13:30 नवीन
अगदी अगदी !!! डेली स्टँड अप १०-१५ मिन्टांपेक्षा जास्त नको म्हणतात ;-) शेवटी अजाईल म्हणजे तरीकाय हो, बी इंग रिस्पॉन्सिव्ह टु चेंजिंग रिक्वायरमेंट्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

:)

ऋषिकेश
Tue, 08/03/2010 - 13:33 नवीन
:) अजूए एक तत्त्व राहिलेच व्हॉट कस्टमर वाँट्स कॅनबी फुलफिल्ड बाय ओन्ली अटेंडिंग इट्स ६०% रिक्वार्मेंट्स. (रेस्ट ऑल इज फॉर प्लेजर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

प्लेजर

मिसळभोक्ता
Tue, 08/03/2010 - 13:38 नवीन
(रेस्ट ऑल इज फॉर प्लेजर) का कोण जाणे, प्लेजर म्हटले की "अत्याधुनिक उपकरणे" आठवतात. त्यामुळे आफ्टर ६०% रिक्वायरमेंट्स आर मेट, स्टार्ट युजिंग "अत्याधुनिक उपकरणे", असे काहीतरी दिसते. जय हो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

__/\__

ऋषिकेश
Tue, 08/03/2010 - 13:40 नवीन
=)) __/\__ फारच हसत असल्याने यापुढे काहि लिहिता येणार नाहि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

डेली स्टँड अप १०-१५

विजुभाऊ
Tue, 08/03/2010 - 17:29 नवीन
डेली स्टँड अप १०-१५ मिन्टांपेक्षा जास्त नको म्हणतात पावलो कोएलो चे "एलेवन मिनिट्स" वाचून काढलय बहुतेक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

अगागागा

नंदन
Tue, 08/03/2010 - 13:31 नवीन
अशक्य!, ठार मेलो हसून हसून =)) =)) [तरी एका अपाचे प्रोजेक्ट ज्यात ओपन-सोर्स इम्प्लिमेंटेशन आहे त्याचा उल्लेख हवा होता - डेटा इन्टेन्सिव्ह डिस्ट्रिब्युटेड अ‍ॅप्लिकेशन्ससाठी तरी ;)]
  • Log in or register to post comments

झकास

रणजित चितळे
Tue, 08/03/2010 - 13:47 नवीन
छान वाटले वाचुन
  • Log in or register to post comments

महत्वाचा मुद्दा नाहिये.....

स्वछंदी-पाखरु
Tue, 08/03/2010 - 14:35 नवीन
वरील पुर्ण लिखाणात पी. एम.पी. बद्दल दोघांचे पण ज्ञान नसेल असे वाटले........ प्रोजेक्ट क्म्पंलीट नसेल होत तर संपर्क साधा..........
  • Log in or register to post comments

म हा न ! ! !

घाटावरचे भट
Tue, 08/03/2010 - 14:39 नवीन
म हा न ! ! !
  • Log in or register to post comments

सुजय कुलकर्णींचा हा लेख मी

डी.प्रासाद
Tue, 08/03/2010 - 14:46 नवीन
सुजय कुलकर्णींचा हा लेख मी मझ्या एका मैत्रिनिला दाखवला होता ती पन 'आय.टी.' त आयटीमधे काम करते... तीचा पारा असा काय वर गेला... का बस... म्ह् ने की आम्ही पन काम करतो मग तुम्ही स्वयपाक नको करयला... .... च्यायला करायच कही नही हो... पन उद्या म्हनतील ... झाडू मारा... कापडे ध्वा .....येवद्यात थाब्ल्या तर नशीब नाहीत .... पोर बी.............
  • Log in or register to post comments

अ श क्य...

स्वाती दिनेश
Tue, 08/03/2010 - 14:47 नवीन
अ श क्य लिहिले आहे... मि भो इन फुल फॉर्म... झाडावर बसून पॉपकॉर्न खाऊन संपले आता मचाणच बांधून ठेवायला हवे आहे काल परवाचे काही धागे आणि त्यावरचा मिभोंचा हा षटकार बघताना वाटते आहे,:) स्वाती
  • Log in or register to post comments

भन्नाट लिहिले आहे.. मिभोराव..

अनिल २७
Tue, 08/03/2010 - 14:59 नवीन
भन्नाट लिहिले आहे.. मिभोराव.. आजपासून मी तुमचा पंखा!! बाकि काहि म्हणा, आय टी तली बाई म्हणजे हमखास टी आर पी खेचणार...
  • Log in or register to post comments

छे, कैच्याकै

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/03/2010 - 15:01 नवीन
आय टी तली बाई म्हणजे हमखास टी आर पी खेचणार
अहो अनिलसेठ, मिभोकाका आयटीतले असले तरि बाई नाहीयेत ... (पळा आता, मिभोकाका हाणताहेत!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

धन्यवाद आदितीबाई.. आज तुम्हि

अनिल २७
Tue, 08/03/2010 - 15:10 नवीन
धन्यवाद आदितीबाई.. आज तुम्हि माझे डोळे उघडलेत..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आयाय ग... च्यायला लचकाच

अर्धवट
Tue, 08/03/2010 - 15:35 नवीन
आयाय ग... च्यायला लचकाच तोडतय.. मिभोभौ... मस्त...
  • Log in or register to post comments

अगायायाया सक्काळी सक्काळी बाजार उठला!!!

चतुरंग
Tue, 08/03/2010 - 16:25 नवीन
काय ती फटकेबाजी! =)) =)) =)) मिभो इज बॅक इन अ‍ॅक्शन. यू मेड माय डे!!! :) :) (तरी बरं फक्त सॉफ्टवेअरचाच उल्लेख झालाय अजून हार्डवेअर प्लॅट्फॉर्म्स वगैरे आलेले नाहीत. ;) ) (खुद के साथ बातां : रंगा, मिभोची 'हाडूप' हत्तीवरुन मिरवणूक काढावी का?) (सिस्टिम्स्)चतुरंग
  • Log in or register to post comments

>> प्रोजेक्ट डिले झाले, तर

शुचि
Tue, 08/03/2010 - 16:54 नवीन
>> प्रोजेक्ट डिले झाले, तर बेंचावरच्या मंडळींना अ‍ॅडिशनल रिसोर्स म्हणून प्रोजेक्टवर टाकेल ती.>> ही ही मस्त!!!
  • Log in or register to post comments

___

आंबोळी
Tue, 08/03/2010 - 17:04 नवीन
साष्टांग नमस्काराचि स्मायली कशी टाकतात?
  • Log in or register to post comments

ही घे!

चतुरंग
Tue, 08/03/2010 - 17:06 नवीन
<०()8=<
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

शंका...........

कवितानागेश
Tue, 08/03/2010 - 18:40 नवीन
मला एक शंका सतावतेय... स्वैपाक उत्तम करणे इतकेच फुसके 'क्वलिफिकेशन' लग्नासाठी पुरते का? स्वभावाचे काय? उत्तम स्वैपाक करणारी ' कैदाशीण' चालेल का? माझ्या पाहण्यात आहेत काही..... कळवा मला, कर्तव्य असेल तर!
  • Log in or register to post comments

:)

ब्रिटिश टिंग्या
Tue, 08/03/2010 - 19:01 नवीन
तुम्ही दररोज आरश्यात पाहता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

>>उत्तम स्वैपाक करणारी '

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 08/04/2010 - 06:29 नवीन
>>उत्तम स्वैपाक करणारी ' कैदाशीण' चालेल का? स्वयंपाक न करणाऱ्या कैदाशिणीपेक्षा बरीच की नाही. अशा पण खूप आहेत माझ्या पाहण्यात. जालावर पण आहेत म्हणे काही :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मिभो झिंदाबाद!!

मी-सौरभ
Tue, 08/03/2010 - 20:10 नवीन
मिभो झिंदाबाद!! मिभो झिंदाबाद!! मिभो झिंदाबाद!! मिभो झिंदाबाद!! मिभो झिंदाबाद!! मिभो झिंदाबाद!! पावन झालो हा लेख आनी प्रतिसाद वाचून...... अवांतरः या लेखाला मुखप्रुष्ठावर अढळ स्थान द्यावे .......
  • Log in or register to post comments

नमस्कार...

चावटमेला
Tue, 08/03/2010 - 22:11 नवीन
आयला, जबराट... मिभोंना, शिर साष्टांग नमस्कार... बादवे, satire कसे लिहावे याचे क्लासेस कधी सुरु करताय? पटकन जॉईन होतो :)
  • Log in or register to post comments

मला हा ब्लोग खुप आवड्ला

शिल्पा ब
Tue, 08/03/2010 - 22:21 नवीन
मला हा ब्लोग खुप आवड्ला
  • Log in or register to post comments

अरे इथला माझा प्रतिसाद का

आमोद शिंदे
Tue, 08/03/2010 - 23:16 नवीन
अरे इथला माझा प्रतिसाद का उडवला? मला वाटलं ह्या धाग्यावर धूडगूस घालायची खुली सूट आहे :)
  • Log in or register to post comments

आजचा दिवस सार्थकी लागला. बाय

पांथस्थ
Wed, 08/04/2010 - 00:53 नवीन
आजचा दिवस सार्थकी लागला. बाय द वे, आजचा दिवस दर वर्षी मिपावर "IT Womens Day" म्हणुन साजरा करण्यात यावा अशी संस्थळ चालकांना नम्र विनंती :)
  • Log in or register to post comments

लगे रहो मिभो!!!

दिनेश
Wed, 08/04/2010 - 01:10 नवीन
लगे रहो मिभो..मजा आली. कोदा लेखनातून थोडी सुटका झाली.. दिनेश
  • Log in or register to post comments

मिभो लय भारी राव ...

बन्ड्या
Wed, 08/04/2010 - 03:01 नवीन
एकदम पिक्चरच पाड्लात ...... लय भारी. ... बन्ड्या कोल्हापूरी
  • Log in or register to post comments

ज ब रा!

स्वाती२
Wed, 08/04/2010 - 04:19 नवीन
ज ब रा!
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Wed, 08/04/2010 - 06:41 नवीन
१००वा प्रतिसाद!!!! कार्येशु मंत्री, कर्मेशु दासी, भोज्येशु माता, शयनेशु रम्भा, रुपेशु लक्ष्मी, क्षमया धरित्री, सत्कर्म नारी, कुलधर्म पत्नी आजकाल मिळत नाही म्हणता?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा