नाच गं घुमा!!!
आता नक्की आठवत नाही.. पण नागपंचमीच्या आधीची कुठली तरी एक तिथी असायची.. सगळ्यांना पंचमीच्या उंच च उंच झोक्याचे वेध लागलेले असायचे.. पण त्याआधीच या तिथीपासून रात्रीचे खेळ चालू व्हायचे!! संध्याकाळपासूनच गल्लीतल्या बायका एकमेकींना आठवण द्यायला लागायच्या.. "आज रात्री जेवण झाल्यावर चौकात जमायचे हं!!!" मी तर पुष्कळ लहान होते .. त्यामुळे इकडे तिकडे निरोप पोचवण्याचं काम मध्ये मध्ये लुडबुड करणार्या आमच्या वानरसेनेकडे आपसूकच यायचं. रात्री ९:३०-१०:०० चा सुमार झाला की एक-एक करून बायका जमू लागत.. गल्लीत हुंब्यांचे घर अगदी चौकात.. घराला ओटाही होता.. त्यामुळे ते सगळ्यांचं जमण्याचं ठिकाण.. हुंबे आजी तशा खडूस, पण यादिवसांत त्या कशा कोण जाणे प्रेमळ व्हायच्या.. मग जाधवांच्या दोन सुना, चव्हाणांच्या घरातल्या सात-आठ लेकीसुना, पाटीलकाकू, झालंच तर शेजारच्या गल्लीतल्या बायका, आम्ही शाळकरी ८-१० मुली, असे सगळे जमले की जो उतमात सुरू होई तो अगदी १२ वाजले तरी संपत नसे... लोळणफुगडी... बसफुगडी... कोंबडा... पिंगा.... झिम्मा...आणि बरंच काही!!! परवा शनिवारी मराठी बाणा पाहात होते.. मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू झाला नि ते मंरतलेले दिवस आठवत गेले..
एकदा असेच नाचून नाचून थकलो होतो.. पण कुणालाच थांबावंसं वाटत नव्ह्तं. हुंबेआजी एकदम ओट्यावरून खाली उतरल्या. सगळ्याच दिलवाले मधे अमरिशपुरी नाचकामात आल्यावर थांबतात तशा थांबल्या. आजी येताना सुप घेऊन आल्या होत्या. आता या सुपाने चोप देणार की काय? असं प्रश्नचिन्ह सगळ्यांच्याच चेहर्यावर!!! त्या आल्या तशा रिंगणात मध्यभागी उभ्या राहिल्या नि म्हणाल्या, "म्हणा गं पोरींनो, नाच गं घुमा”. आणि काय त्या नाचल्या, यंव रे यंव!!! एका हाताने सुप धरायचं.. निमिषार्धात तो हात सोडायचा.. सूप अधांतरी राहू द्यायचं नि ते खाली यायच्या आधी दुसर्या हाताने पकडायचं.. आणि हे करत करत स्वतःभोवती गोल गोल फिरायचं!!! दुसर्या दिवशी येताना घरोघरची सुपं बाहेर आली होती हे काय आता वेगळं सांगायला हवं???
लोळणफुगडी, बसफुगडी, साधी फुगडी नि कोंबड्याच्या स्पर्धा तर अगदी रोजच!!! आम्ही खेळणार म्हणून रस्ता अगदी चांगला झाडून, पाणी मारून तयार असायचाच. आधी जोड्या ठरत. मग एकमेकींसमोर बसून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना स्पर्श करतील अशी लांबलचक मांडी घालून बसायचं... दोन्ही हातानी दोन्ही अंगठे पकडायचे... डाव्या बाजूने कलंडायचं, तसंच सरळ होत पूर्ण पाठ जमिनीला लावायची... नि मग धरलेले अंगठे न सोडता, कुठल्याही आधाराशिवाय उजव्या बाजूने पूर्वस्थितीत यायचं. हे खेळताना "काठवट खणा.. सातारखाना" असले काहीतरी गाणं सुरू असायचं. हे असे हात सुटेपर्यंत चालायचं.. शेवटपर्यंत जी कुणी तग धरेल ती अर्थातच जिंकायची.. (कार्यक्रम संपवून घरी आल्या आल्या मी बेडवर हे करायचा प्रयत्न केला.. कलंडले खरी, पण उठायलाच येईना. :( मग लगेच दुसर्या दिवशी उठल्या उठल्या हॉलमधलं सगळं फर्निचर एका बाजूला सारलं, थोडी लोळायला ऐसपैस जागा केली.. नि पुन्हा प्रयत्न केला.. हुश्श!!! जमलं हो!!! खूपच जड नि जाड झाले नाहीए काही अशी मनाची समजूतपण लगेच घालून घेतली!!!!)
बसफुगडी हे लठ्ठ लोकांचं काम नोहे. ती खेळायची म्हणजे आधी चवड्यावर बसायचं...नि एकदा उजवा पाय पुढे आणि डावा पाठीमागे, आणि दुसर्यांदा डावा पुढे नि उजवा मागे, असे वर्तुळात फिरवत राहायचे.. हात आपसूक जसे पाय हलतील तसे हलतात.. हे प्रकरण मात्र लोळणफुगडीपेक्षा अवघड!!! जास्त वेळ तग नाही धरता येत.. नेहमीची फुगडी घालताना फू बाई फू म्हणतात तसे ही फुगडी घालताना "चुईफुई" अशा सगळ्याजणी म्हणायच्या.. आम्ही मुली मुळातच वात्रट.. आम्हाला हे चुईफुई गाणं नाही आवडायचं.. आम्ही मुद्दाम मोठ्यांदा "कुईफुई.. कुईफुई" म्हणत बसायचो.. (ही फुगडी पण लगेच घालून पाहिली.. पण कुठचे काय? दोनच मिनिटात पाय दुखायला लागले.. नि हात लढाई येत नसलेल्या शिपायासारखे अंमळ जास्तच आवेशात हलत होते.. छ्या: प्रॅक्टीस नाय राहिली!!!)
फुगडीच्या स्पर्धा म्हणजे अगदी कहर!!! गाणी म्हणून, कसंही र ला र, ट ला ट लावून एकमेकींची पिंग्यातून प्रेमळ उणीदुणी काढून नि कमरेचे काटे ढिले करून झाले की फुगड्यांना सुरूवात व्हायची.. सगळ्यात आधी घामेजल्या ओल्या हातांना खडू/भस्म्/माती काहीतरी लावलं जायचं, नाहीतर मग ऐनवेळी हात सुटले तर तोल जाऊन पडण्याचीच शक्यता जास्त... नि वेगात असताना हात सुटले, तर कुठे जाऊन पडेल याचा नेम नाही. फुगड्यांची गाणी आता आठवत नाहीत.. पण आधीच्या हळूहळू गिरक्या लवकरच वेग घ्यायच्या.. मग नुसत्या गिरक्यांचा पण कंटाळा यायचा.. एका जोडीतली कुणीतरी अर्धवट खाली बसून जमिनीला एक पाय नि दुसरा अधांतरी ठेवून जातं घालायला लागली, की त्या संसर्गाची लागण लगेच व्हायची. . अशावेळी मग कुणाचं जातं जास्त वेळ टिकतं याची शर्यत लागायची. जातं घालता घालता फुगडी तशीच संपवणं यात काहीच नाही.. पण जात्यातून पुन्हा फुगडीसाठी उभं राहाणं हे खरं कौशल्याचे काम!!! अजूनही कधी फुगडी घालायचं म्हटलं की मी दोन्ही आणि एका पायावर सारख्याच उत्साहाने तयार असते!!!
खेळून खेळून काकू लोक दमले तरी आमचा उत्साह उतू जात असायचा.. बसलेल्या आयांच्या मागे "चला, उठा"चं टुमणं लावलं की "जा गं, कोंबडा कोंबडा खेळा" म्हणून त्या सुटवणूक करून घ्यायच्या!!! मग काय, आम्ही कानांत वारं शिरलेल्या वासरांसारखे धूम!! एक सुरवातीची नि दुसरी भोज्जाची रेष आखायची.. सुरूवातीच्या रेषेवर पायांवर पायठेऊन बसायचं.. दोन्ही पंजे गुडघ्यावर एकांवर एक.. नि शर्यत सुरू... मध्येच कुणी अडखळायचं.. ढोपरं फुटायची, खरचटायचं तरीही बिल्कुल रडारड न करता पुन्हा कोंबड्याची पोज घेऊन शर्यत सुरूच र्हायची.. अगदीच चिल्लीपिली असतील ती सगळं झाल्यावर भ्वॉ म्हणून भोकाड पसरायची!!!
शाळकरी वयातल्या या गोष्टींची मजाच और होती!!! पंधरा दिवस हां हां म्हणता कसे निघून जायचे तेच कळायचे नाही.. दिवसभर शेतात, घरात काम करून थकलेल्या, नोकरी वरून आलेल्या बायकांना, दिवसभराचं हुंदाडणं जणू कमीच पडलेल्या आम्हा सर्वांसाठी ती पर्वणीच असायची.. कधी घराबाहेर न पडणार्या पाटील काकू नवर्याशिवाय बाहेर पडत ते याच दिवसांत. मूल नाही म्हणून खंतावलेल्या, कधी कुणाशी न बोलणार्या चव्हाण काकू याच दिवसांत हसताखेळताना दिसत.. नि नेहमी करवादणार्या हुंबेआजी नाचून थकलेल्या लेकीसुना आणि पोरीबाळींना मोठ्या प्रेमाने लिंबूसरबताचे ग्लासेस भरभरून देत असत.
आताशा नागपंचमीच्या वेळेस गांवी असणं खूप वर्षांत जमलं नाही. हुंबेआजी गेल्या... त्यांची सून पायाला काहीतरी झाल्याने गेली दहा वर्षे अंथरूणाला खिळून आहे... बरीच कुटुंबे काही कामाकारणाने गांव बदलून निघून गेली.. आणि हे आमचे छान रंगीबेरंगी दिवस चॅनेलच्या सुळसुळाटात हरवले!!!!
वाचने
11109
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
क्या बात है!
In reply to क्या बात है! by वेदश्री
शंका
In reply to शंका by पंगा
बालपणचा दोस्त
In reply to बालपणचा दोस्त by वेदश्री
धन्यवाद
In reply to धन्यवाद by पंगा
नाही समजले
In reply to नाही समजले by मिसळभोक्ता
कल्पना नाही
In reply to नाही समजले by मिसळभोक्ता
अष्ट्या म्हणजे आशिष!
In reply to अष्ट्या म्हणजे आशिष! by वेदश्री
डोण्ट
In reply to डोण्ट by विंजिनेर
उच्चभ्रू ?
In reply to उच्चभ्रू ? by मिसळभोक्ता
धन्यवाद
In reply to अष्ट्या म्हणजे आशिष! by वेदश्री
छान आठवण
In reply to अष्ट्या म्हणजे आशिष! by वेदश्री
हिशेब समजला नाही
In reply to हिशेब समजला नाही by पंगा
+१
छान लेख
व्वा..
मस्त
कुठ कुठ
मस्त कलंदर आठवणी
चांगला लेख
छान लिखाण
सुंदर
सह्हीच!
In reply to सह्हीच! by धमाल मुलगा
व्वा एकदम
लेख आवडला.
In reply to लेख आवडला. by बिपिन कार्यकर्ते
+१
सुंदर लेख!!!
बसफुगडी
In reply to बसफुगडी by रेवती
झकास आउटसोर्सिंग
लै भारी गं
का कोणास
वा अगदी
मस्त
सध्या फक्त
सुंदर लेख.
स्मरणरंजन
रमून गेले
मजा आली
In reply to मजा आली by पुष्करिणी
फोटू ?
In reply to फोटू ? by मिसळभोक्ता
(अंगठे
In reply to (अंगठे by पुष्करिणी
सोप्पे आहे!
In reply to सोप्पे आहे! by पंगा
ही ही ही
In reply to फोटू ? by मिसळभोक्ता
पुष्करिणी
छान लिहीलय ग मके!
मस्त
ह्याला
आमच्या आजोळी, आईच्या मैत्रिणी खेळायच्या
मस्त आठवणी
In reply to मस्त आठवणी by साक्षी
पूर्वी
वा!