मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भोचकपणा नुसता.....

भानस · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कधी कधी आपण सहजच खूश असतो. म्हणजे खास काही कारण नसतेच. आतून अगदी छान, उमलून आल्यासारखे वाटत असते. अगदी साध्या साध्या गोष्टीही अशावेळी आपला आनंद वाढवत राहतात. नेहमीसारखाच गजर टाहो फोडून आक्रंदतो.... एरवी त्याचा गळा दाबणारी मी आज आधीच जागी झालेली असते. मिटल्या डोळ्यांनी अंथरुणाची न सोडवणारी उब अनुभवत पडून असते. आज झोपही पूर्ण झाल्यासारखी ..... तृप्त. गजर हलकेच बंद करते. खिडकीतून तुकड्यातुकड्याने दिसणाऱ्या आभाळाकडे टक लावून पाहत खुदकन हसते. तेही लगेच प्रतिसाद देते. " अरे वा! आज मूडमे हो क्या....... चक्क माझ्याकडे तुझे लक्ष गेले.... तेही पहाटे पहाटे..... " असे म्हणून माझ्याकडे पाहत हळूच डोळे मिचकावत सोनेरी-लालसर रंगाची भरभरून उधळण करून आसुसून साथ देऊ लागते. पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याच्या शीतल लहरी, त्यावर सळसळणारी गुलमोहोराची, पिंपळाची पाने.... फांद्यांफांद्यांतून वारा बागडेल तसतसा उठणारा शीळेचा नाद..... डवरलेल्या पारिजातकाची मुक्त उधळण, जमिनीशी लगट करणारी नाजूक नाजूक शुभ्र फुले व केशर सांडणारी देठे....... सारे चराचर आल्हाददायी झालेले....... घर अजून शांतच असते. प्रत्येकाच्या संथ, एका लयीत चाललेल्या श्वासोच्छ्वासाचे, चेहऱ्यावरील अर्ध जागृत निद्रेतील भाव - स्वप्नांच्या रेंगाळलेल्या खुणा टिपत, गुणगुणत मी स्वयंपाकघरात शिरते..... "असाच यावा पहाटवारा जसा वितळतो पावा, आरसपानी सूर मुलायम असाच निथळत यावा..... भरून यावा कंठ खगांचा आणि फुटावे गाणे, व्हावी उन्मन कुणी कोकिळा त्यांच्या मधुर स्वराने, हुंकारातून असा ओघळत शब्द प्रीतिचा यावा... " मला कशामुळे इतके प्रसन्न वाटतेय हे शोधण्याच्या भानगडीत न पडता भरभरून हा आनंद मी स्वत:त भिनवून घेते. हो नं, न जाणो अचानक संपला तर...... आज तोही माझी साथ सोडायला बिलकुल उत्सुक नसतोच. मोलकरीण वेळेवर येते, लेकाने दप्तर रात्रीच भरून ठेवलेले असते. पहिल्या हाकेला उठून अगदी शहाण्या बाळासारखा आवरून उड्या मारत तो शाळेत जातो. रिक्षावाले काका स्वत: वर येऊन त्याला घेऊन जातात. नवऱ्याच्या शर्टाची बटणे धारातीर्थी पडलेली नसतात. आवर गं पटापट, तुला सोडतो आज स्टेशनवर असे तो मनापासून म्हणतो. एवढेच नाही तर आज डब्यात भाजी कुठली असेही विचारत नाही. मी माझ्याच नादात गुणगुणत राहते......, " गीत होऊन आले, सुख माझे, आले, साजणा, स्वप्न कल्पनेत होते सूर ताल तेच झाले, साजणा........ " मन प्रसन्न असले की ती प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावर, अंगावर बिलगून राहते. समोरून पाहाणाऱ्यालाही ती पोचतेच. माझा आवडता पंजाबी घालून जरा सैलसरच शेपटा, कुंकू लावून मी खाली उतरते. तोवर नवरा स्कूटर काढून गेटवर उभा असतो वाट पाहत.... आणि अचानक समोरून मैत्रीण येते. अगदी नखशिखान्तं मला न्याहाळते. मी कावरीबावरी. अशी काय पाहतेय ही......मला उगाचच वाटून जाते..... संडे इज लॉंगर दॅन मंडे झालेयं की काय..... छे! असे कसे होईल....... तिचे, असे माझ्या आरपार पाहणे संपतच नाही. मी वेंधळ्या हालचाली करत ओढणी सावरत चुळबुळत असताना...... ती निरखतच विचारते, " काय खास? नाही म्हणजे ऑफिसातच जाते आहेस नं? की...... बरीच रंगरंगोटी केली आहेस ती ...... " आता माझी सटकते...... एक तर सरळ सहजपणे म्हणायचे, " अगं, कसली गोड दिसते आहेस तू आज..... एकदम मूडमें नं...... सहीच रे! माझाही दिवस आज मस्त जाईल बघ....... " पण हे शब्द तोंडातून कसे निघावे.... तोंडावर साधा पावडरचा पफ काय फिरवलाय... तर टवळी म्हणतेय रंगरंगोटी करून कुठे निघालीस........वाटते जीभेची तलवार चालवावी अन तटकन घाव घालावा...... टाकावे बोलून .... " तुझ्या तेलकट, मेणचट, सदाच दुर्मुखलेल्या मुखकमलावर इतकी लिपस्टिक बरबटवली आहेस नं ती जरा पूस गं..... कमीतकमी दहा-बारा जणींचे ओठ रंगतील....... " पण मी तिला असे टोचून मला आनंद मिळेल का? छे! उलट दिवसभर मी स्वत:ला कोसत राहीन....... मग माझा आनंद कशाला संपवा- दिवस फुकट घालवा... ( खरे तर इतके बोचरे बोल बोलायची माझ्यात हिंमतच नाहीये..... भिडस्तपणा जन्मजात मुरलेला आहे अंगात....... म्हणून मग स्वत:चीच समजूत घालून घ्यायची झालं........ ) पण आज मनही बेटे ऐकेना, " अय्या! कशी गं तू मनकवडी..... बरोबर ओळखलेस. आज नं डेट आहे डेट....... " असे म्हणून तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे व वासलेल्या तोंडाकडे पाहत मी डोळे मिचकावत पळते ती थेट नवऱ्याच्या मागे जाऊन बसते. ती अजूनही तशीच भिरभिरलेली. ते पाहून नवरा विचारतो, " काय गं, अशी भूत बघितल्यासारखी का पाहतेय ती........" " काही नाही रे....... मी ' डेटला ' चाललेय असे सांगितल्यामुळे बावचळलीये ती..... आता दिवसभर बसेल अशीच आ वासून..... तिला सोड..... चल तू.... आज मस्त गाडी पळवं...... आज मोगॅंबो खूश हैं...... " आता काहीतरी गरज होती का तिला हा भोचकपणा करण्याची.... कुचकट कुठली...... जणू काही खास लायसन्स दिलेय असे बोलण्याचे ...... पदोपदी ही अशी माणसे सारखी ढवळाढवळ करतच असतात. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायचे आणि दुसऱ्याला लागट बोलत राहायचे....एक से एक नमुने...... " बाहेर निघालीस? इतक्या उन्हाची? कुठे गं? " असेच जरा काम आहे काकू.... म्हणून टाळले की.... " हो का..... अग, काम असणारच गं.... पण इतक्या तातडीने जाते आहेस म्हणून विचारले..... नाही म्हणजे नसेल सांगायचे तर नको सांगूस हो....... मी काळजीपोटी विचारत होते....( तरिही मी सांगत नाही हे पाहून..... ) तरी पण.... ठाण्यातच जाते आहेस की अजून....... " सोडणार नाही..... छ्ळतच राहणार...... " दुसऱ्याच्या घरात काय चाललेय हे आपल्याला कळलेच पाहिजे..... नव्हे तो आपला हक्कच आहे " असे मत बऱ्याच जणांचे असते. गंमत म्हणजे स्वत:च्या घरात काय काय घडतेय याचा मात्र यांना पत्ता नसतो आणि कळवून घ्यायची गरजही नसते. असेच एकदा एक ओळखीचे काका बिल्डिंगमधल्याच एका लहान पोराला पकडून विचारत होते, " काय रे, काल आई-बाबा भांडत होते नं तुझे? काय झालेले? मग आई रडली नं.... मला ऐकू येत होते....." तो चारपाच वर्षांचा मुलगा बिचारा रडकुंडीला आलेला..... आणि काकांची सरबत्ती चालूच.... मी चटकन पुढे होऊन लेकराला गोंजारले आणि ते बघ तुझे मित्र बोलवताहेत तुला... पळ की.... असे म्हणत काकांच्या हातून त्याचे बखोट सोडवले...... चटदिशी पळाला तो... जणू कुठल्या शिक्षेतूनच सुटला होता. बिचारा...... काकांना म्हटले, " काका, अहो काय हे...... आधीच पोरगं घाबरलेय..... तुम्हाला कशाला हव्यात नको त्या चौकश्या? किती लहान आहे तो...... इतकं चैन पडत नसेल आणि धमक असेल तर जा की त्याच्या बाबाला जाऊन विचारा नं...... एवढुसा जीव बिचारा, किती भेदरला होता...... त्याला का छळतायं...... " हे ऐकले मात्र..... ते खवळलेच एकदम, " हेच नं...... आजकालची तुम्ही मुलं, फार आगाऊ झाला आहात........ का? का म्हणून नको विचारू मी त्याला........ एका बिल्डिंगमध्ये राहतो नं आपण. मग...... कळायला नको कोणाच्या घरात काय चालते ते...... काही सामाजिक जबाबदारी आहे का नाही....... विचारीन, त्याच्या बापालाही विचारीन जाऊन..... काय घाबरतो की काय मी..... " असे म्हणत ते तणतणत निघून गेले. हम्म्म..... सामाजिक जबाबदारी....... मी कपाळाला हात लावला......... डोळ्यासमोर सारखा खेटरं खाऊन परत आलेल्या काकांचा चेहरा तरळत राहिला...... काही लोक कहर असतात अगदी. सरदेसाई हे आडनाव सारस्वतांमध्ये आहे, कऱ्हाड्यांमध्ये आहे.... आणिकही कोणात असेल. दोघांचेही कुलदैवत शांतादुर्गाच. सारस्वतांमध्ये हे आडनाव जास्त फ़ेमस. दिलीप सरदेसाई, राजदीप सरदेसाई..... त्यामुळे सरदेसाई म्हणजे सारस्वतच हे समीकरण रूढ झालेयं. तर एकदा अश्याच एका मैत्रिणीशी गप्पा सुरू होत्या...... तुम्ही कुठले आम्ही कुठले....... गाव कुठले - कुलदैवत कोणते....... मी आपले सांगितले, " आम्ही नं, देवरूखजवळ एक छोटेसे गाव आहे वांजोळे म्हणून, तिथले. कुलदैवत शांतादुर्गा. " लगेच मैत्रीण म्हणे, अग ती अमुक तमुक म्हणत होती की तू तर सारस्वतच आहेस पण सगळ्य़ांना चक्क खोटे सांगतेस की मी कऱ्हाडे आहे म्हणून...... म्हणत होती, पक्की मासेखाऊ असेल ती. मी अवाक. मुळात मी चुकूनही कोणालाही जात विचारत नाही. जातपात मी मानत नाही तेव्हां पुढचे प्रश्नच मला पडत नाहीत. संवादाचा - मैत्रीचा आणि जातीचा काही संबंध आहे का? शिवाय हे असे खोटे सांगण्याने माझा कुठला फायदा होणार होता....... मासेखाऊ असेन तर अगदी छाती ठोकून सांगेन नं आहे म्हणून..... मासे खायची काय चोरी आहे का? " अगं काहीतरीच काय, मी कशाला खोटे सांगेन.... जा पाहिजे तर माझ्या सासूबाईंना विचार जाऊन........ आणि तिचे मरू दे गं पण तुलाही खरेच असे वाटते का की मी खोटे सांगतेय..... " हे विचारल्यावर मैत्रीण म्हणे, " अग अगदी तसेच नाही गं...... पण, आजकाल कोणाचा काय भरवसा द्यावा....... " मी नादच सोडला. मला काय फरक पडतो, कोणी काही का समजेना ....... पण........ मन दुखलेच. खूप दिवस मनात होते.... छानशी पैठणी घ्यावी. आता पैठणी काही रोज नेसता येत नाही... कपाटाचीच धन होणार. हे सगळे कळतेय..... पण हौस असतेच नं..... तर मी व आई गेलो पैठणी घ्यायला. गिरगाव पंचे डेपोमधून पैठणी घेतली आणि दुकानाची पायरी उतरलो तोच समोर वरच्या काकू दत्त म्हणून उभ्या....... एक तर गिरगाव पंचे डेपो हेच मुळी एक मोठे प्रकरण आहे. पैसे देऊन साडी घ्यायला गेलोय का घोडचूक करायला......... असा प्रश्न पडावा आणि आपणच आपल्याला दोन चापट्या मारून घ्याव्यात, अशी गत.... त्या दिव्यातून पार पडून घेतलेली पैठणी अजून नीट मनभरून पाहिलीही नाही तोच या काकूंचे दर्शन....... आम्हां दोघींकडे व हातातल्या पिशवीकडे पाहत, " काय..... मायलेकी अगदी गळ्यात गळा घालून फिरतायं..... खरेदी का? वा, वा...... काय घेतलेस गं? पाहू तरी मला......" ( खसकन माझ्या हातातली पिशवी ओढून भसकन पैठणीची घडी विस्कट्त बाहेर काढलेली पाहून माझा जीव कळवळल्याने.... न राहवून..... मी एक क्षीण प्रयत्न करत म्हटले..... ) " काकू.... अहो जरा हळू तरी..... चुरगळतेय हो...... " माझ्या बोलण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत किती गं बावळट तू असा आविर्भाव चेहऱ्यावर व शब्दाशब्दात ठासून भरत, " बाई बाई...... अगं किती हा पैशाचा नास. कुठे मिरवणार आहेस तू ही नेसून..... पाहावं तेव्हा तर जीन्स मध्ये असतेस..... तुमच्या त्या अमेरिकेत का घालणार आहेस ती..... जळ्ळलं मेलं लक्षणं..... आता जाशील इथेच कपाटात ठेवून. त्यापेक्षा सिफॉन- सिल्क काहीतरी हलकेफुलके घ्यायचेस नं..... अहो भाग्यश्रीच्या आई तुम्ही तरी सांगायचेत तिला...... कसली मेली हौस.... एक नाचली की लगेच सगळ्यांची सुरवात..... शोभते का हे वागणे..... " हे बोलून काकू गायब. किती हा भोचकपणा ........ काहीतरी गरज होती का याची? मी पैठणी नेसेन.... कपाटात ठेवीन... अमेरिकेत आणेन..... नाहीतर कात्रीने कापून त्याचे पडदे बनवेन....... तुम्हाला काय करायचयं? विचारायला आले होते का मी? किती हौसेने गेलेलो आम्ही दोघी.... तासभर पंच्यांचे टिपीकल कुचकट शेरे ऐकून ( जणू गिऱ्हाईकावर मेहेरबानीच केलीये दुकान थाटून ) त्यांना पुरून उरत घेतलेली माझी सुंदरशी पैठणी बिचारी मलूल होऊन गेलेली पाहून भडभडून आले मला. पुन्हा काकुंच्या या तोफखान्याला प्रत्युत्तर देण्याआधीच त्यांनी पलायन केलेले...... पैठणी घेऊन झाली की मस्तपैकी मंजूचा वडा चापू गं असे मनाशी ठरवून निघालेल्या आम्ही दोघी आमचाच वडा झाल्यासारख्या पाय ओढत घरी आलो. घरातलेच आपले म्हणवणारे लोकही कधी कधी इतका अति भोचकपणा करतात नं ........ माझ्या एका दूरच्या बहिणीने माझ्या आईला फोन केला. नेमकी मीही आईकडे होते. " आज कसा गं हिचा फोन आला..... एरवी तर चुकून कधी साधी चौकशीही करत नाही.... " आईच्या मनात आधीच पाल चुकचुकलेली. दोन मिनिटे उगाच इकडचे तिकडचे काहीतरी बोलून झाल्यावर म्हणे, " मामी, अगं मी नं एका इन्शुरन्स कंपनीचे काम करतेय. उद्याच येते बघ तुझ्याकडे..... तू आणि मामा घेऊन टाका एक एक छोटिशी पॉलिसी, फक्त दहा दहा लाखांची. " मला हे काही ऐकू येत नव्हते.... पण आईच्या कपाळावरची शीर तडतडायला लागलेली पाहिली आणि समजले की काहितरी पेटलेयं........ तरी आई संयम ठेवून म्हणाली, " अगं, आम्हा दोघांची कसली पॉलिसी काढतेस आता या वयात..... ती मॅच्युअर होण्याआधीच आमची रवानगी होणार आहे इथून.... आणि रिटायर्ड माणसांकडे कुठले आले गं इतकाले पैसे....... बरं तुझ्या मामाला पेन्शनही मिळत नाही. " हे ऐकताच आमची ही भोचकभवानी म्हणते कशी, " अगं मामी, तुम्ही गचकलात तरी मुले आहेत की... त्यांना होईल...... आणि मामाला पेन्शन नसले म्हणून काय झाले.... आत्ताच तर घर विकलेत नं तुम्ही..... मग मिळाले असतील की खोऱ्याने पैसे..... काय कुजवायचेत का आता ते..... द्या की मला त्यातले थोडे. " आमची आई सिंह राशीची........ उगाच सिंहाला डिवचू नये हेच खरे....... एकदा का तो संतापला नं की मग मात्र...... " अगं, तुझा मामा दोन वेळा हॉस्पिटलात अगदी मरणाच्या मुखात होता....... इतकाले पैसे लागले ऑपरेशनला...... कसे उभे केले असतील मामीने- तिच्या मुलांनी.... आलीस का विचारायला...... ते सोड गं...... ढांगभर अंतरावर राहत होतीस साधा एक वेळेचा गोळाभर भातही आणला नाहीस शिजवून... जरा तेवढीच मामीला मदत. आणि आता पैसे कुजवायचेत का म्हणून विचारतेस तू......... आमच्या गचकण्याचे तुला काडीचेही दु:ख तर नाहीच वर सल्ले देतेस...... खबरदार पुन्हा फोन करशील तर....... " असे म्हणून आईने फोन आपटला..... आहे की नाही कमाल भोचकपणाची......

वाचने 16291 वाचनखूण प्रतिक्रिया 63

मदनबाण गुरुवार, 06/03/2010 - 20:11
मोगॅंबो ने लेख नेहेमी प्रमाणेच मस्त लिहला आहे... ;) वाटते जीभेची तलवार चालवावी अन तटकन घाव घालावा...... टाकावे बोलून .... " तुझ्या तेलकट, मेणचट, सदाच दुर्मुखलेल्या मुखकमलावर इतकी लिपस्टिक बरबटवली आहेस नं ती जरा पूस गं..... कमीतकमी दहा-बारा जणींचे ओठ रंगतील....... " पण मी तिला असे टोचून मला आनंद मिळेल का? छे! उलट दिवसभर मी स्वत:ला कोसत राहीन....... मग माझा आनंद कशाला संपवा- दिवस फुकट घालवा... दोन स्त्रीया एकमेकांशी बोलताना भरपुर खोटचं बोलत असतात तर...म्हणजे खरं बोलतात त्या, पण मनात हं... ;) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

मस्त कलंदर गुरुवार, 06/03/2010 - 20:42
अगदी पटलं.. कधी कधी लोक इतका विनाकारण भोचकपणा करतात नि सगळा मूडचा विचका करतात.. आणि बर्‍याचदा उलटून बोलताही येत नाही.. जाम राग येतो मला अशा लोकांचा!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 06/03/2010 - 21:16
अगदी! पण मी बोलते बिन्धास्त उलटून! एकदा लग्नानंतर काही महिन्यांतच मी आमच्या ठाण्याच्या घरी गेले होते. तर बिल्डींगमधल्या एक आज्जी, "काय गो माहेरवाशीण आली आहे का?". कशी आहेस वगैरे नाही, डायरेक्ट माझ्याच बापाच्या घरासमोर उभी राहून मलाच परकी बनवते ही बाई! मी पण बोलले, "नाही, दुसरी मालक आली आहे इथली!". आता एवढं ऐकून गप बसावं तर ते नाही. "आता लग्नं झालं तुझं, आता हे घर तुझं नाही." आता मात्र माझ्या पेशन्सचा बळी गेला होता, "तुम्हाला काय हो करायचंय आमच्या घरात कोण किती मालक आहे ते? माझ्या बापाने माझ्यासाठी अर्ध घर ठेवलं आहे याचा तुम्हाला का हो त्रास? आम्ही दोघं भावंडं पाहून घेऊ कोण मालक आणि कोण उपरं ते!" बिल्डींगमधल्या कोणीही त्यापुढे मी आणि माझ्या भावासमोर "माहेरवाशीण" हा शब्द काढला नाही. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Pain Fri, 06/04/2010 - 08:15
एकदा लग्नानंतर काही महिन्यांतच मी आमच्या ठाण्याच्या घरी गेले होते. तर बिल्डींगमधल्या एक आज्जी, "काय गो माहेरवाशीण आली आहे का?". कशी आहेस वगैरे नाही, डायरेक्ट माझ्याच बापाच्या घरासमोर उभी राहून मलाच परकी बनवते ही बाई! यात मालकीचा प्रश्न कुठे आला ? लग्न झालेली मुलगी माहेरी आल्यास तिल माहेरवाशीण म्हणतात ना ?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Pain Fri, 06/04/2010 - 09:47
म्हणजे स्त्रियांचे लग्न झाले की त्या लोकांशी उगाच भांडणे उकरून काढतात का ? मागे कोणीतरी सांगितले होते की लमाणी स्त्रिया करमणूक म्हणून भांडतात. आपल्या सभ्य(?), सुशिक्षीत, संगणक्-साक्षर स्त्री-सदस्यांमधेही अगदी तशीच प्रवृत्ती पाहून फारसे आश्चर्य वाटले नाही.

In reply to by Pain

आपणांत लमाणी स्त्रियांचा हा गुण पुरेपूर उतरलेला दिसतो. असो. हा मिपावरचा धागा असून चाळीसमोरचा नळ नाही याची (तुम्हाला असेल-नसेल, पर्वा इल्ले!) मला जाणीव झालेली आहे. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Pain Fri, 06/04/2010 - 10:26
सरळ प्रश्नाला उगाच उद्धट दुरुत्तर केल्याने हे सुरु झाले... तुम्ही सिद्ध केलत की हा गुण तुमच्यात दिसतो ते. वाचणारा कोणीही सांगेल; तुमचे तुम्हाला कळले तर उत्तम, शक्यता कमी.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त कलंदर Fri, 06/04/2010 - 14:41
मला नेहमी वाटायचं की माहेरवाशीण म्हणजे सासरहून स्वत:चे कोडकौतुक करून घ्यायला येणारी स्त्री!!! पण नंतर कळलं की ही आणि एवढीच त्याची व्याख्या नाही. गौरी-गणपतीमधल्या गौरींची आल्याच्या दुसर्‍या दिवशी कानउघडणी होते. म्हणजेच त्या मुखवट्यांसमोर एक परात किंवा तत्सम भांडे पालथे घालून त्यावर उलथणे, लाटण्यासारख्या गोष्टी कराकरा वाजवायच्या. इतका तो कर्णकटू आवाज येतो की कधी एकदा कानउघडणी संपतेय असे होऊन जायचं. एकदा जाणतेपणी आईला ही प्रथा का म्हणून विचारलं. तर तिचे उत्तर होतं, "गौरी शंकराशी म्हणजेच नवर्‍याशी भांडून माहेरी येते. ती आल्याच्या दिवशी तिला घरी असेल ती भाजीभाकरी खाऊ घालयची. दुसर्‍या दिवशी माहेरवाशीणीचं कौतुक म्हणून पुरणावरणाचं गोड खाऊ घालायचं. नि रात्री अशी कशी नवर्‍याशी भांडून निघून आलीस म्हणून कानउघडणी करायची. नि बाई, आता तुझे लग्न झाले. इथून पुढे जरी आलीस तरी तुझे माहेरपण तीनच दिवसांचे असे म्हणून तिसर्‍या दिवशी तिची परत रवानगी करायची.म्हणून गौरी फक्त तीन दिवस असतात." त्याक्षणी वाटलं, की लग्न झालं म्हटलं की मुलगी इतकी का आई-बाबांना परकी होते? जर काही दुखलं खुपलं म्हणून शेवटचा आधार म्हणून ज्यांनी तळहाताच्या फोडासारखं जपलं, जे सगळ्यात जास्त आपल्याला ओळखतात त्या आईबाबांकडे यायचं, तेच जर असे दुसर्‍या दिवशी कानउघडणी करून तिसर्‍या दिवशी मुलीला हाकलून देणार असतील तर तिने आधारासाठी पाहायचे कुणाकडे? तेव्हापासून मी निदान माझ्या घरातली कानउघडणीची प्रथा बंद करवलीय. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

हे असं काही मला माहित नव्हतं. पण हा अर्थ तर आणखीच विचित्र आहे. पण "लग्न झालं म्हटलं की मुलगी इतकी का आई-बाबांना परकी होते?" हा मुद्दा तरीही व्हॅलिड नाही का? आणि त्याहीपुढे हे 'ईण' प्रत्यय लागलेले शब्दतर माझ्या आणखीनच डोक्यात जातात, डॉक्टरीण, वकिलीण वगैरे! पूर्वी जेव्हा स्त्रियांना स्वतंत्र ओळख, अस्तित्व नव्हतं तेव्हा हे 'ईण' त्या बायकांना कौतुकास्पद वाटत असेलही; पण आज जेव्हा स्त्रियांना स्वतःची ओळख, अस्तित्त्व आहेत तेव्हा ही गोष्ट त्यांच्यासाठी अपमानास्पद आहे. कोणी मुलगा आई-वडिलांकडे गेला तर त्याला काय "माहेरवासा" म्हणणार का? जाऊ दे, एवढी पेन घेऊन पेन न झिजवता इथे लिहीणं म्हणजे गीतापठणच असणार! ॥उद्धट॥ अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त कलंदर Fri, 06/04/2010 - 15:14
त्याहीपुढे हे 'ईण' प्रत्यय लागलेले शब्दतर माझ्या आणखीनच डोक्यात जातात
आमच्या घरी याचं नेमकं उलटं होतं. आई मास्तरीण म्हणून बाबांना तिच्या नोकरीच्या गावातले लोक मास्तर म्हणायचे.. अवांतरः यावरून एक पीजे आहे.. खवमध्ये ये, सांगते!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Pain Sat, 06/05/2010 - 00:13
स्त्री-पुरुष वेगळे आहेत आणि वेगळेच राहणार. ईण शब्दात काय चूक आहे ? यात स्वतः च्या ओळखीचा काय संबध ? आपली भाषा आहे. तसेच कर्त्याच्या लिंगाप्रमाणे क्रियापदही बदलते, मुलगा: मी जातो, मुलगी: मी जाते. उद्या त्याबद्दलही शंख कराल. कावीळ झालेल्याला जसे सगळे पिवळे दिसते तसे भांडकुदळ माणसाला सगळीकडे अपमान दिसतो. असल्या बायकांना माहेरवाशीण म्हणुन कटवणेच उत्तम म्हणजे हसत-खेळत गुण्यागोविंदाने जगायला मोकळे.

In reply to by Pain

टारझन Sat, 06/05/2010 - 00:19
कावीळ झालेल्याला जसे सगळे पिवळे दिसते तसे भांडकुदळ माणसाला सगळीकडे अपमान दिसतो. असल्या बायकांना माहेरवाशीण म्हणुन कटवणेच उत्तम म्हणजे हसत-खेळत गुण्यागोविंदाने जगायला मोकळे.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) - (गुण्या गोविंदा) पेनबा५१२

In reply to by Pain

>> स्त्री-पुरुष वेगळे आहेत आणि वेगळेच राहणार. वेगळे आहेत हे मान्य, वेगळे रहाणार का नाही, माहित नाही. म्यूटेशनमुळे काय होऊ शकेल हे मी सांगू शकत नाही. मराठीत मी जाते, मी जातो अशी क्रियापदं असली तरीही सगळ्या भाषांमधे असं होत नाही; इंग्लिशमधे होत नाही. (मला इंग्लिश भाषा आवडण्याचं आणखी एक कारण!) आपली भाषा आहे म्हणून मला त्यातलं सगळंच आवडावं, पटावं असं काही नाही. भाषा मला जन्माने मिळालेली आहे, माझ्या निवडीतून नाही! समोरच्या व्यक्तीशी तिचं वय, नाव, आडनाव, शिक्षण, लिंग हे विसरून हा आपल्यासारखाच माणूस आहे एवढा आदर त्या व्यक्तीला दिला जाईल तेव्हा बरेचसे अमंगळ भेदाभेद गेलेले असतील. >> कर्त्याच्या लिंगाप्रमाणे क्रियापदही बदलते एग्गजॅक्टली! पण कधीकधी कर्ता स्त्रिलिंगी असेल तरीही संबोधन (किंवा खासगीत वापरायचं नाव) तिच्या नवर्‍याच्या पेशावरून, आडनावावरून येतं ... खुद्द कर्त्यावरून नाही. आहेत, चालल्या आहेत त्या गोष्टी बरोबरच आहेत असं मान्य केलं की प्रश्नच संपतो. कारमेन बिन लादेन यांचं 'द व्हेल्ड किंगडम' (का असं काही नाव आहे पुस्तकाचं) त्यात तिने लिहीलं आहे की पहिल्या मुलग्याचा जन्म झाला की आई नाव बदलते. कारमेनच्या नवर्‍याचं नाव येस्लाम, तो आईचा सगळ्यात मोठा मुलगा, म्हणून आईचं नाव पुस्तकात येतं ते उम येस्लाम! कारमेनची सासू असणार्‍या ह्या बाईंची ओळख फक्त येस्लामची आई एवढीच? पेशाने डॉक्टर असणार्‍या बाईचा उल्लेख, नवरा वकील असेल तर इतर लोकांकडून वकिलीण असा होणं याचा त्या डॉक्टरला काय त्रास असेल हे कळण्यासाठी जी संवेदनशीलता लागते ती तुमच्याकडे नसेल तर प्रश्नच मिटला ... अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मनीषा Sat, 06/05/2010 - 09:17
समोरच्या व्यक्तीशी तिचं वय, नाव, आडनाव, शिक्षण, लिंग हे विसरून हा आपल्यासारखाच माणूस आहे एवढा आदर त्या व्यक्तीला दिला जाईल तेव्हा बरेचसे अमंगळ भेदाभेद गेलेले असतील. +१

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कानडाऊ योगेशु Mon, 06/07/2010 - 18:18
इंग्लिशमध्येही He आणि She आहेतच. माझ्यामते संस्कृत मध्ये लिंगभेद नाही. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Pain Mon, 06/07/2010 - 22:48
वेगळे आहेत हे मान्य, वेगळे रहाणार का नाही, माहित नाही. म्यूटेशनमुळे काय होऊ शकेल हे मी सांगू शकत नाही. मराठीत मी जाते, मी जातो अशी क्रियापदं असली तरीही सगळ्या भाषांमधे असं होत नाही; इंग्लिशमधे होत नाही. (मला इंग्लिश भाषा आवडण्याचं आणखी एक कारण!) आपली भाषा आहे म्हणून मला त्यातलं सगळंच आवडावं, पटावं असं काही नाही. भाषा मला जन्माने मिळालेली आहे, माझ्या निवडीतून नाही! Unless specified otherwise, मी साध्या माणसांबद्दल बोलतोय. सगळ्या भाषांमधे,इंग्लिशमधे अस होत नाही हे सगळ्यांना माहिती आहेच. (इंग्लिशमधील नियम exclusive नाहीत. to -टू, पण go गो वगैरे. अशी चुकिची भाषा मला आवडत नाही. घाणेरड्या फ्रेंचबद्दल तर बोलायलाच नको.) असो. आपल्या आवडत्या भाषा आणि कारणे हा विषय नाहीये. ज्या भाषेत बोलत आहोत त्यातील व्याकरणाच्या नियमांमुळे अपमान झाला अशी ओरड अनाठायी आहे. अफगाण आणि इतर राष्ट्रांमधील स्त्रियांच्या जीवालाच धोका आहे तिथे नावाचे काय ? आणि चालीरीतींबद्दल म्हणाल तर पुर्वी भारतात मुलाचे नाव आईवरुन ठेवले गेल्याची उदाहरणे आहेत. पेशाने डॉक्टर असणार्‍या बाईचा उल्लेख, नवरा वकील असेल तर इतर लोकांकडून वकिलीण असा होणं याचा त्या डॉक्टरला काय त्रास असेल हे कळण्यासाठी जी संवेदनशीलता लागते ती तुमच्याकडे नसेल तर प्रश्नच मिटला ... हा प्रकार मी कुठेही पाहिला /ऐकला नाहीये. पेशाने डॉक्टर असणार्‍या बाईला डॉक्टरीण, वकील= वकिलीण ह्यात काही चूक नाही हे माझे म्हणणे आहे.

In reply to by मस्त कलंदर

प्रमोद देव Fri, 06/04/2010 - 14:55
मक ह्यांनी दिलेल्या ह्या नव्या माहितीबद्दल आभार. माहेरवाशिणीचा इतकाच(फक्त तीन दिवस माहेरपणाचा) हक्क असेल तर मी त्याचा निषेध करतो. आता कायद्यानेही स्त्रीला म्हणजे मुलीला बापाच्या संपत्तीत समान वाटणी मिळू शकते...हे खरं तर सहजपणाने व्हायला हवे होते...पण काय दूर्दैव पाहा...त्यासाठीही कायदा करावा लागावा ना?

In reply to by प्रमोद देव

टारझन Fri, 06/04/2010 - 21:07
खाली "देवुत्सु" म्हणुन सही करायला विसरलात काय हो मालक ? ;) अवांतर : तात्या मिसळपावचा आधी मालक होता, आता माहेरवासी झाला आहे , असे म्हणने योग्य ठरेल काय ? - बंदन

In reply to by मस्त कलंदर

Pain Sat, 06/05/2010 - 00:17
म.क. नविन माहिती आणि गोष्टीबद्दल आभार. ही पद्धत पटली नाही. मी हा प्रकार आमच्या कुठल्याच नातेवाइकांकडे पाहिला नाहीये. मुला-मुलींना बरोबरीने वागवले जाते. जमीन्-जुमला हक्क किंवा अशा कुठल्याही सदर्भात.

In reply to by Pain

मस्त कलंदर Sat, 06/05/2010 - 00:32
ही कदाचित त्या त्या भागातील प्रथा असू शकते. सांगली-कोल्हापुरात गौरींची कानउघडणी होते.. ती संपल्यावर "ये गं गौरी बाई, एवढं जेऊन जाई" अशी गाणी पण म्हणतात.. नि गौरीबाई पण कानौघडणी नंतर सासरी जायला तयार होतात पण त्यांचा मेक-अप अर्धवट राहिलेला असतो म्हणून त्या "आता काय करू बाई शंकर आला.. पाटल्या(एक एक करून इथे सगळे दागिने येतात) ल्यायला उशीर झाला" म्हणून हळहळतात!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Pain Fri, 06/04/2010 - 23:55
एखाद्या शब्दाचा एखादा अर्थ माहिती नसणे आणि ज्याने तो वापरलाय त्याला विचारणे यात काहीच गैर नाही. शिकण्याची प्रव्रुत्ती दिसते. पण उगाचच्या उगाच भांडणे उकरणे, उद्धटपणा नक्कीच चूक~

In reply to by Pain

जियो*! तुमच्या अभ्यासू व्रुत्तीला सलाम!!! (भांडणप्रिय आणि उद्धट) अदिती *जुन्या मालकांकडून शब्द उधारीवर आणला आहे. अवांतरः माहेरवाशीण या शब्दांवर कोणी का चिडलं असेल हे तुम्हाला आज ना उद्या नक्की समजेल, असाच अभ्यास सुरू ठेवा. ऑल द बेस्ट!

शिल्पा ब गुरुवार, 06/03/2010 - 21:23
छान जमलाय लेख...अशा भोचक अन नाकघालू लोकांचा फार राग येतो...आणि बर्याचदा हे लोक आपल्यापेक्षा वायानेच मोठे असतात त्यामुळे काही बोलता येत नाही...नाहीतर परत, "काय बाई फटकळ आहे, लहान, मोठं काही बघत नाही" असं बोलून मोकळे. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

चित्रा गुरुवार, 06/03/2010 - 21:47
गंमतीदार लेख. जातींवरून चौकशा लोकांना भारी असतात. काही लोक आडनाव सांगितले की उगाचच जातीची खात्री करून घेतात. तसे खरेतर जात कळली तरी त्यांच्या वागण्यात विशेष काहीच बदल होत नाही, तरी "आपल्यातले" का हे पाहण्याची खुमखुमी असतेच. पण हा भोचकपणा जाईल तेव्हा जाईल अशा ठिकाणी मी आले आहे. आमच्या लहानपणी एक (तशा इतर वेळी प्रेमळ) शेजारीणबाई होत्या, त्या हमखास मी नवीन फ्रॉक घातला की कसा शिवला आहे म्हणून खालून सरळ फ्रॉक वर उचलून बघत त्याची आठवण झाली :) मला तेव्हा भयंकर अवघडल्यासारखे व्हायचे, कारण हा प्रकार कोणाच्याही समोर होऊ शकत असे. आणि आता कळत नाही, की नक्की शिवण आतल्या बाजूने कशी आहे, हे समजून घेऊन नक्की त्यांना काय कळत असेल?! पण थोडासा भोचकपणा कोणालाच चुकलेला नाही असे वाटते.

बेसनलाडू गुरुवार, 06/03/2010 - 21:54
आवडले. (भोचक)बेसनलाडू इथे इसळपाववर एक भोचक स्नेही आहेत. त्यांचे शिकवणी वर्ग आहेत काय पहायला हवे ;-) (ह. घ्या. भोचकशेठ!) (विद्यार्थी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

भोचक Fri, 06/04/2010 - 09:46
हॅहॅहॅ. बेला, तो भोचकपणा 'व्यावसायिक' गुण आहे. बाकी, अस्मादिकांच्या एवंगुणविशिष्ठ गुणाविषयीचे संकीर्तन आवडले हेवेसांनल. बेलांच्या लेखनाचा फ्यान (भोचक)

शुचि Fri, 06/04/2010 - 02:48
हा हा .... मस्त आहे लेख . खरच असतात नमुने. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मनीषा Fri, 06/04/2010 - 07:59
छान अनुभव कथन... काही वर्षे (६ते ७ वर्षे) मी आणि माझा मुलगा पुण्यात रहात होतो ,माझे पती नोकरी निमित्त पुण्याबाहेर आणि नंतर परदेशी असत.. त्या वेळी आमच्या पुणेरी भाषेत सांगायचे तर मी 'अल्टिमेट' भोचकपणा अनुभवला आहे.. पण आता अनिवासी .. झाल्यानंतर एक सत्य कळले .. ते म्हणजे भोचकपणा हा "युनिव्हर्सल फिनॉमिना" आहे .. :)

In reply to by मनीषा

विंजिनेर Fri, 06/04/2010 - 09:08
एक सत्य कळले .. ते म्हणजे भोचकपणा हा "युनिव्हर्सल फिनॉमिना" आहे ..
अगदी अगदी.... जगाच्या कुठल्याही काना-कोपर्‍यात अगदी पहिल्या भेटीत सुद्धा असे "आनंददायी" अनुभव येतात. मराठी संकेत स्थळांवर वावरणे हा त्यावर चांगला उतारा आहे. गेंड्याची कातडी तर डेव्हलप होते पण नो साईड इफेक्टस यु नो... (मिपावरच्या भोचक आणि भावनाशील खम्प्लेंटींच्या "बिच्चारा.." स्टाईल लेख-पुरात वाहून गेलेला)विंजिनेर

गुंडोपंत Fri, 06/04/2010 - 08:13
मस्तच लिहिले आहे. मनमोकळ्या भाषेमुळे आवडले. अजून येऊ द्या! आपला गुंडोपंत

Pain Fri, 06/04/2010 - 09:04
तुम्ही श्वास स्वातीचा या नावानेही लेखन करता का ?

मस्त लिहिले आहे... आवडला लेख. त्या गाण्याच्या ओळीही सुरेख आहेत. भोचकपणा हा मानवस्वभावधर्मच आहे. कोणालाच चुकलेला नाही. बर्‍याच लोकांनी भोचकपणामुळे झालेला त्रास वगैरे लिहिलं आहे. पण मला विचाराल तर, तद्दन फ्लॅट संस्कृती किंवा पाश्चात्य देशातून (सरसकटीकरण नाही करत, पण शेजार्‍या शेजार्‍यांमधला जो एक पोलादी पडदा बहुधा असतो) जो एक प्रकारचा एकटेपणा जाणवतो, त्यापेक्षा मोकळेढाकळे शेजारी नक्कीच आवडतील मला. मी लहानपणी ज्या इमारतीत वाढलो, खेळलो, तिथे सगळीच घरं आमचीच होती. ज्या मजल्यावर खेळायचं त्या मजल्यावरच्या कोणत्याही घरात शिरून खाणं पिणं करता येत असे. सगळ्यांना सगळं ठाऊक असायचं. कोणाच्या घरी कोण पाहुणे येणार हे सगळ्यांनाच माहित असायचं. शेजारचे काका गेले तेव्हा नातेवाईकांच्या बरोबरीने आमचे सगळ्यांचे वडिल लोक पुढे होते. आजोळ तर चाळीतच. असं सगळं. त्यामुळे आखातात गेल्यावर माझी खूपच वाईट अवस्था झाली. नवीन राहणीमान पचवायला खूपच जड गेलं. म्हणून म्हणतो, भोचकपणा कही अगदीच वाईट नाही. पण काही लोक अति करतात आणि शिवाय वाईट हेतूने करतात ते मात्र नक्कीच वाईट. लहान मुलांना विचारणं वगैरे तर खूपच वाईट. अशा लोकांना ठोकलेच पाहिजे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

गॉसिपिंग हा देखील भोचक पणाच असतो. एखाद्या व्यक्तिबद्दल त्याच्या पश्चात आपापसात बोलणे. खव व्यनी यातुन देखील जालीय भोचकपणा दिसुन येतो. एखादी व्यक्ती संवादास प्रतिसाद देत नाही याचा अर्थ ती संवादास उत्सुक नाही असाही असु शकतो किंवा कशाला उगीच भोचकपणा करा म्हणुन संवाद टाळत असते असाही असु शकतो. नावडती व्यक्ती किंवा आयडी संवादास उत्सुक असेल तर तिचे वर्तन हे भोचक वाटु शकते. आवडत्या व्यक्ति वा आयडी ने भोचकपणा केला त्याला तो मैत्रीचा हक्क वा अधिकार म्हणुन स्वयंघोषित/प्रेरित मान्यत असते. आपण आपल्या खाजगी बाबीत इतरांचा मान्य केलेला हस्तक्षेप हा व्यक्ति, स्थळ ,समाज व मूड सापेक्ष असतो. अ व्यक्तिने केलेले वर्तन हे भोचक असेल तर ब व्यक्तिने केलेले तेच वर्तन हे भोचक असते काय? ते अ व ब याच्याशी आपल्या असलेल्या संबंधांवर अवलंबून आहे. भोचक वर्तन हे केवळ शब्दबोलीवर नव्हे तर देह बोलीवर देखील अवलंबुन असते. वर्तनातील भोचकत्वाचे आकलन हे तुमच्या पिंडावर, वयावर, संस्कारावर अवलंबुन आहे. आपल्याच भोचकपणाचे वा भोचकपणावर केलेल्या खोचकपणाच्या प्रतिक्रियांचे आकलन हे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्यालाच वेगवेगळे होत असते. भोचकपणा आहे म्हणुन साहित्य निर्माण होते, पत्रकारिता आहे, सामाजिक अनुबंध आहेत. भोचकपणा हे व्यक्तिमधील सामाजिक जाणिवेचे लक्षण आहे.भोचकपणामुळेच वादसंवाद वाढतात. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे तो पर्यंत भोचकपणा टिकून राहणार आहे. माझ मी काहीही करीन तुम्ही कोण मला विचारणारे? ओळखीचा ना पाळखीचा कशाला हॅहॅहॅ करतो? आमच आम्ही मसणात जाउ याला काय घेण देण आहे? असशील तु मोठा तुझ्या जागी आम्हाला कशाला सांगतोय? याला कुणी नस्त्या उचापत्या करायाला सांगितल्यात? डोळे बंद कर म्हणाव आमचे आम्ही नागडे फिरु नाहीतर कपडे घालू याच्या खिशातले पैसे जातात का? अगोदर स्वतःच्या ढुंगणाखाली काय जळतय ते बघ नंतर आम्हाला सांग? स्वतःच ठेवायच झाकून आन दुसर्‍याच बघायच वाकून? जिथ तिथ काड्या घालायची सवय गप्प बसकी? आमच आम्ही बघुन घेउ तुमच्या दारात नाही आलो झोळी घेउन?............या प्रतिक्रिया हेच दर्शवतात कि तुमचा हा संवादी हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही आणि ते अभिव्यक्त करायाचा अधिकार आम्हाला आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सहज Tue, 06/08/2010 - 09:54
अजुन थोडी छटाक, पावशेर वाक्य टाका एन्ड गिव्ह डॉ. दिवटेज एन्ड झुंबर्स रन फॉर देअर मनी! ;-) नेहमीप्रमाणे प्रकाशकाकांचा छान प्रतिसाद! स्वतंत्र लेख होईल. (हॅ हॅ हॅ गॉसीपप्रेमी) सहज

In reply to by प्रकाश घाटपांडे

Pain Tue, 06/08/2010 - 10:02
अगदी खरे. संतुलित, संयत. मीही असाच विचार करतो. मला वाटायचे लोकांनाही हेच वाटत असेल्..पण ३-३ धागे आले म्हणजे....जाउद्या.

भानस Fri, 06/04/2010 - 19:00
सगळ्यांचे अनेक आभार. बाकी भोचकपणा हा युनिव्हर्सलच आहे. आपुलकी-प्रेम व भोचकपणा यातला फरक ज्यांना कळला ते दुसर्‍याला दुखावणारे-कटकट होईल असे बोल शक्यतो बोलत नाहीत. बिपिनजी, माझे लहानपणही चाळीत गेलेले आहे. अगदी आव जाव घर तुम्हारा, असेच वातावरण. अलिप्तपणा-फटकून वागण्यापेक्षा हे नक्कीच चांगले व भावणारे. पण काही लोकांना कुठे थांबावे व काय बोलावे याचे तारतम्यच नसते. त्यांचा आवाजही नेहमीच चढा असतो त्यामुळे " नंगे से खुदा भी डरता हैं " तेव्हां कुठे यांच्या नादी लागा असे म्हणून लोकं मनातल्या मनात त्यांना मूर्ख म्हणून दुर्लक्ष करतात आणि अशा लोकांच फावतं. शिवाय, एकदा का वय वाढलं की मग तर खुल्ला लायसंन्सच मिळतो. आमच्याच चाळीत अशाच एका घटनेवरून एकीचा बळी गेलायं. यापरिस दुर्दैव ते काय... ही घटना जिव्हारी लागून राहिली हो. मात्र तुम्ही म्हणता तसे पोलादी भिंती मात्र नको वाटतात. असो. अदिती, अगदी अगदी. हे माहेरवाशीण प्रकरण त्रासदायकच होते. कदाचित त्यांचे स्वतःचे अनुभव त्यांना असे बोलायला भाग पाडत राहतात. शिवाय त्यांना त्यात गैर वाटत नसते. ( त्यांना आलेल्या अनुभवात म्हणा-रूढीबद्दल म्हणा ... आधी मन खूप दुखलेले असते आणि नंतर नाईलाजाने स्विकारले जाते मग संधी मिळताच असे बाहेर येते) चित्रा, बापरे! एक एक कठिणच प्रकार गं... आता असे फ्रॉक उचलून पाहायचं म्हणजे... तुला दरवेळी किती कानकोंडे वाटले असेल गं... :( pain, मी ' भानस ' नावानेच लिहिते. :)

In reply to by भानस

उपाशी बोका Tue, 06/08/2010 - 10:08
भोचक लोकांना त्यांच्याच भाषेत आणि लगेच उत्तर द्यावे, म्हणजे पुढील वेळी ते तसा प्रयत्नही करणार नाहीत. "नंगेसे तो खुदा भी डरता है | हम वो है, जिनसे नंगे भी डरते है || "

In reply to by उपाशी बोका

पंगा Tue, 06/08/2010 - 17:54
फ्रॉक वर करून पाहणार्‍या व्यक्तीस (संदर्भ: चित्रातैंचा प्रतिसाद.) जशास तसे, त्याच भाषेत आणि लगेच उत्तर नेमके कसे द्यावे बरे? - पंडित गागाभट्ट.

भाग्यश्री Sat, 06/05/2010 - 00:46
लेख आवडला.. भोचकपणा अजिबात आवडत नाही मलाही! मी स्पीचलेसच होऊन जाते कधी कधी, समोरच्याचा अल्टीमेट भोचकपणा पाहून!

रेवती Sat, 06/05/2010 - 16:28
मला अस्साच वैताग यायचा जेंव्हा समोर राहणारे काका त्यांच्या मुलीचा व माझा उल्लेख 'सासूरवाशीणी' म्हणून करायचे. माझा नवरा अगदी पहिल्यांदा ३ महिने परदेशी गेल्यावर एक महिना मी एकटी राहिले नंतर एक महिना सासरी व शेवटी एक महिना माहेरी रहिल्यावर आजूबाजूच्या लोकांना वाटले कि मी आता काही परत नांदायला (हाही त्यांचाच शब्द!) जात नाही. मग आईबाबांना सरळ तसे प्रश्न सुरु झाले. बरं हा अनुभव स्पेश्शल पुण्यातला म्हणावा तर औरंगाबादेत माझ्या वहिनीला असाच अनुभव आला. बाळंतपणाला आईकडे गेलेल्या तीला तीन चार महिन्यांनी पुण्यात येणे अपेक्षित होते पण पंधरा दिवस जास्त राहिल्यावर शेजार्‍यांनी जाहिर केले कि आता काही तुझा नवरा परत नेत नाही तुला! (?) पदरात मूल टाकून परदेशी पळून गेला आता!(माझा भाऊ कामानिमित्तच गेला होता.) आधीच बाळंतपणात हळवी झालेली ती इतकी वैतागली कि माझे आईबाबा तीला आणायला लगेच औरंगाबादला गेले. आपल्या बोलण्यावागण्याचा दुसर्‍यांवर अनिष्ट परिणाम तर होणार नाही ना हा विचार सगळ्यांनीच करणे जरूरीचे आहे तसेच अतोनात मनाला लावून घेण्यातही अर्थ नाही. बोलणारे बोलून निघून जातात आणि आपण विचार करत बसतो. अश्यावेळेस वयाचा मान राखता आला नाही तरी चालेल असे वाटते. नवर्‍यावरून बायकोची आयडेंटिटी असावी किंवा उलटे असावे आणि ते अपमानकारक रित्या वापरले जावे हे सगळ्यात वाईट! असले अनुभव म्हणाल तर फुल्ल ष्टॉक आहे आपल्याकडे! @चित्राताई, त्या शेजारणीच्या हातावर एक तडाखा मारावा असे वाटले एकदम! रेवती

In reply to by रेवती

नीधप Tue, 06/08/2010 - 12:45
माहेरी जास्त दिवस राह्यले की लोकांना काय उकळ्या फुटतात काय माहीत. बरं झालेलं बघवत नाही की काय कोण जाणे... आमच्या वरती एक जण रहायची अशी. लग्न झाल्यावर मग मुली झाल्यावर रोज दुपारभर आधी ती एकटी मग आणि मग मुलीपण वरतीच म्हणजे तिच्या माहेरीच असायच्या. ती एकुलती एक आणि माहेरच्या घरी भरपूर जागा म्हणून तिने माहेरी स्वत:चं ऑफिस थाटलं होतं तिचं. फेअर इनफ. पण माझं लग्न झाल्यावर शूटमुळे मी बरेच महिने पुण्यात होते सलग. नवरा येऊन जाऊन असायचा. शूट आणि तयारीसाठी पुण्यात तर इतर कामांसाठी मुंबईत असा. ह्या दरम्यान एकदा ती आमच्या वरची मला जोरात म्हणाली होती, 'इथे माहेरी काय रहातेस? सासरी जा आपल्या. तुझ्या घरी जा इथे नको राहूस.' मी अवाक. 'तुझ्या पिताश्रींना माझ्यासाठी तोशीस पडतेय का? नाही ना? मग तुझा काय संबंध?' असं तिला स्पष्टपणे विचारलं मी तेव्हापासून गप्प बसली. याच लोकांनी माझ्या आणि माझ्या दुसर्‍या एका मैत्रिणीत कमालीचे गैरसमज घडवले. असो... सुदैवाने ते लोक तिथून हलले आणि ब्याद टळली. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

भानस Mon, 06/07/2010 - 09:17
स्वाती२, भाग्यश्री व रेवती मनःपूर्वक आभार. रेवती, असे अनुभव फार क्लेश देतात. :( तुझी व तुझ्या वहिनीच्या मनाची अवस्था मी समजू शकते. कधी कधी वाटते की लोकांना असे घडावे असे वाटत असते म्हणून ते बोलून दाखवतात.

बेसनलाडू Tue, 06/08/2010 - 12:05
लेखन वाचून आणि त्याहीपेक्षा जास्त - प्रतिसाद वाचून - किंचितशी अस्वस्थता आली. विचारपूस आणि भोचकपणा यातील धूसर सीमारेषा आपण विसरू लागलो आहोत की विसरून गेलो आहोत; की आपल्याला आपली "प्रायवसी" (!!) इतकी प्रिय झाली आहे की तिचे बोट धरून आपण माणूसघाणेपणाकडे, एकलकोंडेपणाकडे, आत्मकेंद्रीपणाकडे, आपल्याच सायलो/कोषामधे वाटचाल करू लागलो आहोत, असे दोन प्रश्न पडले आहेत. (सामाजिक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

आजूबाजूला माणसांची गरज जवळजवळ प्रत्येकालाच असते. पण संपर्काची साधनं वाढल्यामुळे आजकाल जास्त पर्याय मिळतात. माझा ऑफिसमेट दोन-चार वर्ष एकत्र काम करूनही माझा "मित्र" नसेल पण चार दिवसांपूर्वी प्रत्यक्षात प्रथम भेटणारा मिपावरचा एखादा आयडी मला फार जुना मित्र वाटेल. या नवनव्या संपर्कमाध्यमांच्या वापरामुळे मला जुनी मूल्यही कदाचित मौल्यवान वाटणार नाहीत; पण माझ्यासारखाच विचार असणार्‍या एखाद्या माणसाशी गप्पा मारणं जास्त गरजेचं वाटेल. एकत्र कुटुंबपद्धती होती तेव्हा घरातल्या गोष्टी घराबाहेर चर्चेस यायच्या नाहीत. आजकाल सहजच आपण आपल्या मित्र-मैत्रीणींबरोबर गप्पा मारताना घरातल्या अडीअडचणी, प्रॉब्लेम्स बोलून टाकतो. काही दशकांपूर्वी (का शतकापूर्वी) हा विचार "ब्लास्फेमस" वाटला असता; याच धर्तीवर आज इतर अनेक गोष्टी भोचक वाटतात. घाटपांडे काकांचा प्रतिसाद आवडला. एकाला जे भोचक वाटेल तेच दुसर्‍याला आपुलकीपूर्णही वाटेल. व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक आहे का नाही हे प्रत्येकाचं व्यक्तीगत मतच असतं (होस्टेलच्या कॉरीडोरमधे, इतरांच्या दारांसमोर उभं राहून जोरजोरात गाणं म्हणणं हे एकाच्या मते 'होस्टेल-लाईफ' असतं, दुसर्‍याच्या मते व्यक्तीगत स्पेसवर डल्ला मारणं!) कधीही माणूस कसा आहे हे ओळखल्याशिवाय उगाच दुसर्‍याच्या व्यक्तीगत गोष्टींबद्दल न बोलणंच बरं; व्यवस्थित ओळख पटल्यावर कितीही, कसल्याही चौकशा केल्या तरीही ती विचारपूस वाटते. त्यातून इतरांच्या पैसा, प्रॉपर्टीसंदर्भातल्या चौकशा न केलेल्याच बर्‍या! अदिती --------------------------------------------------------------- गेले दोन दिवस मुक्काम, वडीलांनी मागे ठेवलेल्या अर्ध्या मालकीच्या घरात!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कानडाऊ योगेशु Tue, 06/08/2010 - 18:36
सहमत.. त्यातून इतरांच्या पैसा, प्रॉपर्टीसंदर्भातल्या चौकशा न केलेल्याच बर्‍या! उमेदवारीच्या सुरवातीच्या दिवसांत ट्रेनी म्हणुन काम करत असताना पगार विचारणे/सांगणे हा प्रकार सर्रास होत असे.एकतर आम्हाला विद्यावेतन मिळत असे आणि सर्व ट्रेनीजना ते सारखे असल्यामुळे तिथे गोपनीयतेला काहीच अर्थ नव्हता. पण काही सिनिअर ट्रेनी जे नंतर व्यवस्थित कंपनीच्या पेरोल वर लागले त्यांना हा प्रश्न विचारल्यावर त्यांची अवस्था फार विचित्र व्हायची. अवांतर : मयसभेत दुर्योधन पडलेला असताना त्याला धर्मराजाने दाखविलेली सहानुभुती भोचकपणा ह्या सदरात येऊ शकते का? --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बेसनलाडू Wed, 06/09/2010 - 00:35
आजूबाजूला माणसांची गरज जवळजवळ प्रत्येकालाच असते. पण संपर्काची साधनं वाढल्यामुळे आजकाल जास्त पर्याय मिळतात. माझा ऑफिसमेट दोन-चार वर्ष एकत्र काम करूनही माझा "मित्र" नसेल पण चार दिवसांपूर्वी प्रत्यक्षात प्रथम भेटणारा मिपावरचा एखादा आयडी मला फार जुना मित्र वाटेल. सहमत आहे. या नवनव्या संपर्कमाध्यमांच्या वापरामुळे मला जुनी मूल्यही कदाचित मौल्यवान वाटणार नाहीत; हे नीट कळले नाही. पण माझ्यासारखाच विचार असणार्‍या एखाद्या माणसाशी गप्पा मारणं जास्त गरजेचं वाटेल. पटते. एकत्र कुटुंबपद्धती होती तेव्हा घरातल्या गोष्टी घराबाहेर चर्चेस यायच्या नाहीत. आजकाल सहजच आपण आपल्या मित्र-मैत्रीणींबरोबर गप्पा मारताना घरातल्या अडीअडचणी, प्रॉब्लेम्स बोलून टाकतो. काही दशकांपूर्वी (का शतकापूर्वी) हा विचार "ब्लास्फेमस" वाटला असता; याच धर्तीवर आज इतर अनेक गोष्टी भोचक वाटतात. हेही पटते. घाटपांडे काकांचा प्रतिसाद आवडला. एकाला जे भोचक वाटेल तेच दुसर्‍याला आपुलकीपूर्णही वाटेल. किंचित पटते. मला वाटते हे आपले समोरच्या व्यक्तीशी समाजमान्यतेने असलेले नाते आणि दीर्घ सहवासातून व भावनिक जवळीकीतून निर्माण झालेले नाते यांच्यातल्या फरकावर हे अवलंबून असावे. उदा. मी जेथे जन्मलो, वाढलो, २२ वर्षे राहिलो, त्या दादरच्या चाळीतील अनेक स्वघोषित काका-काकूंच्या अनेक प्रकारच्या चौकश्या भोचक वाटत नाहीत. पण नात्यातीलच एखाद्या आजीच्या/काकूच्या अशाच प्रकारच्या चौकश्या भोचक वाटू शकतील. कधीही माणूस कसा आहे हे ओळखल्याशिवाय उगाच दुसर्‍याच्या व्यक्तीगत गोष्टींबद्दल न बोलणंच बरं; व्यवस्थित ओळख पटल्यावर कितीही, कसल्याही चौकशा केल्या तरीही ती विचारपूस वाटते. त्यातून इतरांच्या पैसा, प्रॉपर्टीसंदर्भातल्या चौकशा न केलेल्याच बर्‍या! हेही माझ्या वरील मुद्द्याला दिलेल्या उत्तराशी (दीर्घ सहवास, पुरेशी (पुरती?!) ओळख, भावनिक जवळीक इ.) मिळतेजुळते. (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कधीही माणूस कसा आहे हे ओळखल्याशिवाय उगाच दुसर्‍याच्या व्यक्तीगत गोष्टींबद्दल न बोलणंच बरं; व्यवस्थित ओळख पटल्यावर कितीही, कसल्याही चौकशा केल्या तरीही ती विचारपूस वाटते.
माणुस ओळखणेच अवघड असते. स्वतःचीच स्वतःशी असणारी ओळख देखील बदलत जाते तर दुसर्‍या माणसाची काय घेउन बसलात? प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सहज Wed, 06/09/2010 - 08:15
अहो प्रकाशकाका ऊठसूट गल्लीतल्या भलत्या सलत्या परिसंवादाला जाउ नका हो. एक गॉन केस स्टडी करतायना?

नाना बेरके Tue, 06/08/2010 - 13:16
भोचकपणा कुणालाच आवडंत नाही. पण एकदा आम्हाला ह्याचा फायदा झाला आहे. कसब्यातल्या आमच्या वाड्यात दुसर्‍या मजल्यावर अ‍ॅड. करमरकर रहात होते. त्यांची बायको .. वकिलीण .. एक नंबरची भोचक .. त्यांच्या स्वैपाकखोलीच्या खिडकीतून वाड्यात.. येणारी-जाणारी .. सगळी माणसे दिसंत. ह्या वकिलीण बाईला फार उचापात्या .. सारखं कोण आलं ..कोण गेलं .. स्वैपाक सोडून चौकश्या करायला जिन्यात यायची. कुण्णाला आवडत नसे. एकदा वाड्यात दुपारी चोरी झाली. पोलीस कंप्लेंट झाली. पोलीसांनी चौकशी करायला सुरवात केली कि, सकाळपासू़न वाड्यात कोण कोण येऊन गेलं त्यावेळी ह्या बाईंनी पटकन सांगितलं कि .. एक चष्मेवाली बाई कागद गोळा करायच्या निमित्तानं आली होती .. तिला मी हटकली .. तशी ती पाठीवरचं पोतं घेऊन भराभरा पळाली. लगेच दुसर्‍या दिवशी पोलीसांनी ती बाई पकडून आणली. वकिलीण बाईनी तिला बरोब्बर ओळखलं. तिच्याकडून चोरलेलं थोडंफार सामान पोलिस मिळवून दिलं. ती बाई .. इतकी पोचलेली .. तिन नंतर (महिनाभरानं) येऊन सांगितलं कि, सगळंच पोलिसांनी काढून घेतलं, तुम्हाला थोडंफारंच दिलं. चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील. नाना बेरके

सविता००१ Fri, 02/13/2015 - 10:04
तुमच्यामुळे मिपावरचे वाचायचे राहून गेलेले लग्गेच मिळ्तंय. धन्यवाद भाग्यश्री:- सुंदर लेख आहे. खरच असली माणसं असतातच आजूबाजूला आपल्याला त्रास द्यायला.