Skip to main content

मेक्सिकन गंबो

लेखक चित्रा यांनी मंगळवार, 22/04/2008 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
इथे एका मेक्सिकन उपहारगृहात एकदा मेक्सिकन गंबो खाण्याचा योग आला. अचानक समोर आलेला हा पदार्थ आवडला, त्यामुळे जरा घरगुती पद्धतीने मूळ कृतीच्या थोडीफार जवळ जाईल इतकी पाककृती तयार केली आहे. तीच इथे देते. खरे तर गंबो म्हणजे काही वेगळे नाही, उसळ, भात आणि भाज्या एकत्र करून जे काही बनेल ते म्हणजे ही पाककृती. भाज्यांच्या प्रमाणात उपलब्धतेप्रमाणे थोडेफार बदल केले तरी हरकत नसावी. भेंडी हा यातील एक पारंपारिक घटक आहे. जे उगाचच भेंडी आवडत नाही , आवडत नाही असे म्हणतात त्यांना अजिबात न कळता भेंडी खायला घालायची असेल तर ही पा.कृ. जरूर करा! साहित्य - १. २ वाट्या कुठचेही पिठुळ कडधान्य - जसे पिंटो बीन्स, गुलाबी (पिंक) बीन्स, राजमा, किंवा यापैकी काहीच नसल्यास सुके हिरवे /काळे वाटाणे भिजवून २. १ वाटी मध्यम दाण्याचा, पण शिजल्यावर भात खूप चिकट होणार नाही अशा पद्धतीचा तांदूळ (अमेरिकेत यासाठी बॉइल इन बॅग म्हणून एक बुटक्या दाण्यांचा अर्धवट शिजवलेला भात मिळतो, तोही वापरता येईल (पाणी उकळत ठेऊन त्यात ह्या अर्धवट शिजलेल्या भाताच्या पिशव्या सोडायच्या असतात आणि ५-७ मिनिटे शिजवून बंद करायचे, पिशव्यातील पाणी निथळून भात काढून घ्यायचा ). ३. मेक्सिकन साल्सा - बाजारात मिळतो तसा तिखट सालसा / तिखट चालत नसल्यास निदान मध्यम तिखट ४. भाज्या -
३-४ पाकळ्या लसूण २ वाट्या चिरलेली भेंडी २ मोठ्या भोपळी मिरच्या २ मोठे लाल टोमॅटो २ मोठे लाल कांदे ५-६ हिरव्या मिरच्या २ चिपॉट्ले मिरच्या. बाजारात चिपॉट्ले मिरच्यांचा अडोबो (टोमॅटो) सॉसमधील डबा मिळतो तो घ्यावा. (हे नसल्यास ८-१० सुक्या लाल मिरच्या गॅसवर तशाच भाजून, व्हिनेगर, मीठ, थोडे ऑलिव्ह तेल आणि टोमॅटो केचप यांच्या मिश्रणात ७-८ तास बुडवून ठेवल्या आणि नंतर वापरल्या तरी चालेल असे वाटते). १-२ सेलरीच्या काड्या ( ऐच्छिक, नसल्या तरी चालू शकतील, असल्या तर जरूर घालाव्यात) १ कप मक्याच्या कोवळ्या कणसांचे (किंवा बेबी कॉर्न) चे तुकडे (ऐच्छिक)
५. २ मोठे चमचे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस ६. पातळ टॉर्टिया चिप्स ( जास्त मसाले न लावलेल्या रेस्तराँ स्टाईल) किंवा टॉर्टियाचे लांब, बारीक तुकडे करून कडक होईपर्यंत तेलात तळणे. मी जास्त उद्योग न करता बाजारात मिळणार्‍या चिप्सच वापरल्या आहेत. ७. व्हेजि. स्टॉक (ऐच्छिक, आणि बाजारात मिळतो तो). ८. १ चमचा बिटर-स्वीट चॉकलेट ( किंवा थोडी साखर) ९. तेल, मीठ, वरून घालायला थोडे चीज किसून (ऐच्छिक), एक छोटा डबा सावर क्रीम किंवा सायीचे दही (ऐच्छिक ) कृती - १. बाजारात पिंटो बीन्स/गुलाबी बीन्स मिळतात ते २ वाट्या घेऊन पाण्यात पूर्ण बुडतील असे भिजवून ठेवावे आणि ८-१० तासांनंतर अगदी किंचित मीठ घालून कुकरमधून नेहमीप्रमाणे शिजवून घ्यावे (मात्र शिजल्यावर दाणा मोकळा राहिला पाहिजे, एकदम गिरगिट करायचे नाही). झटपट करायचे असले तर शिजलेल्या पिंटो बीनचे डबेही मिळतात. भारतात हल्ली हे उपलब्ध असतात का ते माहिती नाही, पण नसल्यास याच प्रकारे शिजवलेला राजमा किंवा वाटाणे वापरता येऊ शकतात. २. चिकट न शिजणारा तांदूळ घेऊन भात शिजवून घ्यावा. असा भात मी कुकरमध्ये न शिजवता बाहेर शिजवते. एक वाटी तांदळास साधारण दोन वाट्या पाणी असे प्रमाण घेते. तांदूळ शिजत आला की पाणी आटून भातात खोलगट खळगे दिसू लागतात, तेव्हा गॅस मंद करून झाकण ठेवले की आहे त्या वाफेवर भात नीट मऊ पण मोकळा शिजतो. झाकण काढून शिजलेला भात वाफ गेली की हलक्या हाताने मोकळा करून ताटात ठेवावा, थंड होऊ द्यावा. ३. थोड्या तेलावर प्रथम लसूण, मग कांदा थोडे परतून घ्यावेत. मग भेंडी, व्हिनेगर/ लिंबाचा रस, बारीक चिरलेले टोमॅटो, भोपळी मिरच्या,सेलरीच्या काड्या, मक्याच्या कणसांचे तुकडे, हिरव्या मिरच्या, असे सर्व घालून थोडे परतावे आणि मग सर्व भाज्या बुडतील एवढे पाणी (किंवा व्हेजि. स्टॉक) घालून शिजवून घ्यावे. मात्र घट्टसरच झाले पाहिजे, पाणचट करायचे नाही. भेंडी शिजल्यानंतर १ -१.५ चमचा (किंवा चवीप्रमाणे) मीठ आणि शिजलेले कडधान्य (पिंटो बीन्स), चिपॉट्ले मिरच्यांचे तुकडे थोड्या अडोबो सॉससकट घालून, शेवटी थोडे चॉकलेट किंवा साखर घालून अजून उकळावे. ह्या मिरच्यांना धुरकट वास असतो, त्यामुळे त्या आपल्या आवडीप्रमाणे बेतानेच घालाव्यात. ४. एक खोलगट बशी घेऊन त्यात आधी दोन-तीन टे. स्पून शिजलेला मोकळा केलेला भात घालावा. त्यावर १-१.५ वाटी गरम गरम कडधान्ययुक्त भाज्यांचे मिश्रण घालावे. त्यावर १-१.५ चमचा तिखट साल्सा पसरून त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर किंवा सिलांत्रो घालून, थोडे मेक्सिकन चीज भुरभुरून, १ च. च. सावर क्रीम घालून, त्याच्या बाजूला नॅचो चिप्स लावून ठेवाव्या किंवा चुरडून घालाव्या. गरम असतानाच खायला द्यावे. पाककृतीचे छायाचित्र तात्यांना पाठवले आहे, ते योग्य वेळेस प्रसिद्ध करतीलच. येथे मुद्दाम वेगळे लावत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4380
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कृतीत ४ थ्या क्र. चूक सुधार - नॅचो चिप्सच्या ऐवजी टॉर्टिया चिप्स असे वाचावे.

एकदा खाऊन बघितला पाहिजे तुमचा हा गंबो! ;) चित्राताई, मिपावर तुमची ही पहिलीच पाकृ दिसते आहे. अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर येऊ द्यात, ही विनंती! बाय द वे, 'गंबो' हा शब्द मला प्रचंड आवडला आहे. लै भारी शब्द आहे! :) पाककृतीचे छायाचित्र तात्यांना पाठवले आहे, ते योग्य वेळेस प्रसिद्ध करतीलच. येथे मुद्दाम वेगळे लावत नाही. गंबोचा फोटू मिपाच्या मुखपृष्ठावर झळकवला आहे व सोबत या पाकृचा दुवाही जोडला आहे...‍ अवांतर - (पाणी उकळत ठेऊन त्यात ह्या अर्धवट शिजलेल्या भाताच्या पिशव्या सोडायच्या असतात आणि ५-७ मिनिटे शिजवून बंद करायचे, पिशव्यातील पाणी निथळून भात काढून घ्यायचा ). मुंबईतले बरेचसे शेट्टी लोक ह्याच पद्धतीने भात करतात. जिथे खूप गरम पाण्याची कुंडं असतात तिथेही काही मंडळी गंमत म्हणून रुमालात वगैरे थोडे तांदूळ घेऊन अश्या पद्धतीने भात शिजवून पाहतात! असो, पुढच्या पाकृची वाट पाहात आहे.. आपला, तात्या गंबो! :)

ही चव नक्की आवडेल, एकतर वन डिश मील चा मी जबरदस्त पंखा!!! कालच हंगेरीयन गुलाश खाल्ले. [गंबो, गुलाश ह्या डिश खरेतर ज्या उपहारगृहात उत्तम बनवल्या जातात तिथेच खाव्या हे माझे आळशी मत ;-)] बाकी ह्या गुगलशोध दुव्यावर वेगवेगळ्या गंबोची छान चित्रे बघा.

In reply to by सहज

वन डिश मील चा मी जबरदस्त पंखा!!! मी देखील. आणि ह्या डिश खरेतर ज्या उपहारगृहात उत्तम बनवल्या जातात तिथेच खाव्या हे माझे आळशी मत ;-)] हेही ठीक. पण तरी सर्वांना खायला घालायचे असले तर कधीतरी करतोच ना आपण! बाकीची गंबोची प्रकाशचित्रे मस्त.

In reply to by सहज

आणखी एक गोपाल-काला-भक्त.

चित्रा मस्त दिसतय हे प्रकरण! करून पाहिन आणि कळवेनच तुला, तात्या,ही चित्राबरोबरच्या दुव्याची आयडीया भारी! आता ते सहजरावांनी सुचवल्याप्रमाणे चविष्ट,स्वादिष्ट,चमचमीत अशा काही नावाने एक वेगळा विभाग सुरु करण्याचे मनावर घ्या रे..म्हणजे रेसिपी शोधायला सोपे,:) स्वाती