बालपण...
दिवाळी चे दिवस …
आम्ही सारे आजीच्या घरी सुट्टी साठी आलेले.सारे काके, आत्या वगैरे…
दिवाळी म्हणजे फटाके, नवे कपडे, आणि मुख्य म्हणजे सगळ्या चुलत-आते भावंडाना भेटून खेळणे मस्ती करणे.
दिवाळी ची रात्र. थंडीचे दिवस.आजीचे घर म्हणजे जुना प्रचंड मोठा वाडा होता… मोठ-मोठे तीन चौक, १५-२० पोरांना पळापळी खेळता येईल एवढे पटांगण होता एकेक चौक म्हणजे!! त्याच्या भोवती ओवर्या आणि मग खोल्या…
सहा खोल्यांचे घर आजीचे होते… समोरच्या प्रचंड चौकात एका बाजूला केळीचे एक बेट असल्या सारखे… म्हातारी रखमाबाई तिथे भांडी घासत असे.
दिवसभर दंगा करून आम्ही पोरे दामून जात असू. जेवून झाले की डोळ्यावर पेंग येई.
घरासमोरच्या चौकातल्या अंगणात आता संध्याकाळी काढलेली रांगोळी पोरांच्या खेळण्याने पुसत आलेली… आकाश कंदीलाचा मंद रंगीत प्रकाश आंगण भर पसरलेला. दारा शेजारच्या पेरूच्या झाडाच्या पानंवर त्याचा अर्धा अर्धा रंगीत प्रकाश पडलेला रात्री वेगळाच दिसे.
समोर अंगणात एक लाकडी खाट टाकलेली, त्यात दुपारी उन्हाला टाकलेल्या गाड्या, चादरी असत. जेवून झाले की तिथे बसलेल्या मोठा लोकं मध्ये आम्ही घुसत असु. त्या गाद्याना आणि चादरीना दुपारच्या उन्हाचा खरपूस वास येत असे. अंगाणाच्या ओलसर जमिनीत हळूहळू मुरत चाललेल्या धुकाल थंडीत तो वास भलताच उबदार वाटायचा. मोठ्यांच्या काही मोठ्या गोष्टी आणि हास्यविनोद चाललेले असत.. पायारीवर एखाददोन काकवा- आत्या बसलेल्या असत, गप्पा रंगलेल्या असत.
दिवाळी चा दिवस म्हणून जरीची साडी वगैरे नेसून अगदी देवघरातल्या फोटोतल्या लक्ष्मी सारखी दिसणारी आई, आता घरच्या सध्या सुटी साडीत कॉटवर बसलेली दिसली की लगेच आम्ही तिच्या कुशीत शिरत असु. तो आईच्या साडीचा घरगुती मउ वास, उन्ह खाल्लेल्या चादारीचा खरपूस वास , ओलसर झालेल्या गवताचा वास आणि फटाक्यांचा एक वेगळाच वास मिळून एक दिवाळीचा वास तयार होत असे त्या वासाची एक धुंदी असे.
"आई कुणाची" यावर एखादे लूटूपुतिचे भांडण भावाशी करून मग एकाएका मांडीवर डोके ठेवून त्यांच्या न कळणाऱ्या गप्पा आणि दूर शहरात अजुनही वाजत असलेल्या फटाक्यांचा दाबलेला "पुट-पुट-पुट-पुट" आवाज ऐकता ऐकता डोळे मिटूमिटू होत. वर आकाशातले तारे, आकाश-कंदील, दूरचा दुसर्या चौकात जाण्याचा अंधारात भयानक वाटणारा दरवाजा, या गोष्टींकडे बघता बघता डोळ्यात उतरून झोप पूर्ण ताबा घेऊन टाके.
थोड्या वेळाने कोणी हलवतेय असे वाटे, तो बाबा उचलून आत नेत असत. तसेच नेऊन बैठकीच्या खोलीत, घरातल्या १२-१५ पोरांसाठी घातलेल्या गाद्यांवर कुठेतरी ठेवून छानशी एक चादर पांघरली जाई. तेवढ्यात झोप चाळवली जाई, त्यात आजीच्या घराच्या शेणाने सारवलेल्या जमिनीचा मायाळू वास लक्षात राही तर कधी आजोबांचे "निजलात का रे बाळानो?" हा प्रश्न कानावर पडे. उत्तर वगैरे देण्याआधीच झोप पटकन कुशीत घेऊन टाके. दमलेले आम्ही तिच्या कुशीत निश्चिंत होऊन दुसर्या दिवसाची स्वप्ने पाहण्यात मग्न होत असू.
याद्या
1942
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुठल्या
छान लिहले
सुंदर!! भाग
मस्त...खरंच
छान लिहलय.