अशी करावी काटकसर! ;-)
हे आहेत आमच्या पूर्वीच्या घरमालकीण बाईंचे सुपर-काटकसरीचे किस्से! अतिशयोक्ती अजिबात नाही. तसेच त्यांची हेटाळणी/ बदनामी करण्याचाही उद्देश नाही. पण एकेक नमुनेदार माणसे असतात, त्या तशाच होत्या [आता हयात नाहीत] आणि तरीही अतिशय कर्तृत्ववान बाई! पण हे किस्से वाचून तुमची नक्की करमणूक होईल!!! :)
तो काळ होता जक्कल-सुतार टोळीने पुण्यात जे हत्याकांड चालवले होते तेव्हाचा. आमचा वाडा ऐन टिळक रोडवर. त्याला ना फाटक ना कसली सुरक्षा. त्यातल्या त्यात खबरदारी म्हणून तीन मजली इमारतीच्या प्रत्येक जिन्याच्या सुरुवातीला व शेवटी असे जाळीचे दरवाजे बसवून घेतले होते. रोज रात्री दहा वाजता घरमालक त्यांना कुलुपे ठोकत असत आणि ती कुलुपे थेट दुसर्या दिवशी सकाळी साडेसहा-सात वाजता खोलली जात.
आम्ही तिसर्या मजल्यावर राहायचो. आमच्याकडे दूध घालणारा भैया सकाळी साडेपाचला यायचा. मालकीण बाईंनी सांगितले (त्या दुसर्या मजल्यावर राहायच्या) की आम्ही तुमच्या वाटचे दूध घेत जाऊ, तुम्ही फक्त रात्री झोपण्यापूर्वी दुधाचे पातेले खाली आणून देत जा! आई किंवा बाबा रोज रात्री दुधाचे पातेले नियमितपणे खाली घरमालकांकडे ठेवून येत. असे काही महिने गेले. एक दिवस घरमालक व मालकिण बाईंचे कडाक्याचे भांडण चालले होते. आई-बाबा नेहमीप्रमाणे मध्यस्थी करायला गेले. दोघे मालक व मालकिणबाई एकमेकांवर मुक्तकंठाने दोषारोप करत होते. मधेच घरमालक बाबांकडे वळून म्हणाले, ''तुम्हाला माहित नाही, पण रोज तुमच्याकडे जे दूध येते त्यातले एक कप दूध ही काढून घेते आणि त्यात कपभर पाणी मिसळते!!!'' आई-बाबा गार! वर घर-मालकीण बाई खांदे उडवून म्हणाल्या, ''त्यात काय एवढं!! त्यांचेच तर कष्ट वाचवते ना मी रोज सकाळी त्यांच्या वाटचे उठून, मग घेतलं कपभर दूध तर बिघडलं कुठं म्हणते मी!!'' ......... आता बोला!!!
त्यांचे कंजूषपणाचे किस्से तर इतके प्रसिध्द होते की भिशीमंडळातील त्यांच्या मैत्रिणीही त्यांना खुलेपणाने चिडवायच्या. त्यातलीच एक मैत्रिण माझ्या आईला एकदा रस्त्यावर भेटली. आमच्या घरमालकीणबाईंवर बरीच उखडलेली दिसली. आईने कारण विचारल्यावर मजेशीर कहाणी पुढे आली. : घरमालकीणबाईंच्या नातवांची मुंज होती. [आम्हीही गेलेलो] मुंजीत जेवणावळी घालून झाल्यावर उरलेले पदार्थ मालकीणबाईंनी घरी आणले व फ्रीजमध्ये ठोसले. अर्थात हे आम्हालाही माहित होते, कारण त्या कधी नव्हे तो माझ्या आईला विचारायच्या, देऊ का गं श्रीखंड? आम्हीही ''नाही, नाही,'' करायचो. असेच वीस-पंचवीस दिवस गेले. मालकिणबाईंकडे मैत्रिणींची भिशी होती. मिनी जेवणच होते म्हणा ना! त्या वेळी एका मैत्रिणीने त्यांना थट्टेने विचारले, ''काय गं, तुझ्या नातवांच्या मुंजीतलं तर नाहीए ना जेवण?'' त्यावर मालकीणबाई मंद हसून म्हणाल्या, ''अगं ती सांडग्यांची आमटी आहे ना, ती मुंजीत उरलेली मटकीची उसळ होती ती उन्हात वाळवून त्यांचे सांडगे घातले आणि त्यापासून बनवली. आठवडाभर उसळ खात होतो पण संपेचना गं! मग म्हटलं सांडगे तरी घालावेत!! मस्त लागतीए ना आमटी?!! तरी बटाट्याची भाजी खराब झाली म्हणून....नाहीतर गरम गरम बटाटेवडे तळणार होते तुमच्यासाठी!" तमाम उपस्थित मैत्रिणींचे चेहरे फोटो काढण्यालायक झाले होते!!
आमच्या वाड्यात प्यायच्या पाण्याचे कनेक्शन तळमजल्यावर होते. बाकी वापराच्या पाण्यासाठी छतावर पाण्याची टाकी होती त्यातून सर्व बिर्हाडकरूंना [आम्ही सोडून अन्य दोन व मालकीणबाई] पाणीपुरवठा होई.
एकदा आईला वापराच्या पाण्याला कसलातरी घाणेरडा वास येत असल्याचे जाणवले, तिने तसे मालकीणबाईंनाही सांगितले. पण त्यांनी साफ इन्कार केला. [आई शेवटी वापराचे पाणीही तळमजल्यावरून भरू लागली]. दोन दिवस तसेच चालले होते. शेवटी इतर बिर्हाडकरू व खुद्द घरमालकही कुरकुरू लागले. मग मालकीणबाईंनी आपल्या लेकाला छतावर शिडी लावून धाडले व काय प्रकार आहे ते पहावयास सांगितले. लेकाने रिपोर्ट दिला, टाकीत साळुंकी मरून पडली आहे! ऐकूनच आम्हाला ओकार्या यायचे शिल्लक राहिले होते. गेले तीन दिवस तेच पाणी सर्वजण वापरत होते. मग टाकी स्वच्छ करण्यासाठी सर्वांना नळ खुले सोडण्याचे फर्मान निघाले. साळुंकीची विल्हेवाट लावण्यात आली. दुपारी सगळा निरानिपटा करून मालकीणबाई हाश्श हुश्श करत आमच्याकडे आल्या. आईला चहाचे आधण ठेवायला सांगितले मग चहा पिता पिता म्हणाल्या, ''एवढं सगळं पाणी, वाया कसं घालवायचं.....!!! मी ह्यांना आणि लेकाला सांगितलं, आंघोळी करून घ्या म्हणून.... धुणं पण त्याच पाण्यात धुवून घेतलं.... मग मीसुध्दा डोक्यावरून न्हायले! जरा वास येत होता गं पाण्याला....पण साबण लावला की झालं काम...म्हटलं उगाच पाणी वाया नको जायला!!! '' आईला चहा गेला नाही हे वेगळे सांगायला नको!
मालकीणबाईंचा एकुलता एक भाऊ परदेशात, म्हातारपणाने, अविवाहित - बाकी कोणी नाही, असा निवर्तला. सर्व कायदेशीर सोपस्कार होऊन त्याच्या अंतिम इच्छेनुसार त्याचा मृतदेह कॉफिनमधून भारतात आणण्यात आला. तोवर त्याच्या मृत्यूलाही बरेच दिवस होऊन गेलेले. येथे मालकीणबाईंच्या लेकाने मामाचे सर्व और्ध्वदेहिक केले. त्यानंतर आठवडाभराने अशाच आमच्या मालकीणबाई दुपारच्या चहासाठी वर आमच्याकडे आलेल्या. ''बरं झालं बाई, ह्या वर्षापासून साठवणीच्या गव्हाला कशात ठेवायचं प्रश्न मिटला!'' आईने प्रश्नार्थक मुद्रेने पाहिल्यावर त्या पुढे म्हणाल्या, ''अगं ते कॉफिन आहे ना, फार चांगलं आहे गं लाकूड त्याचं.... मी म्हटलं कशाला फेका उगाच.... घेतलं साफ करून आणि आता त्यातच ठेवणार आहे साठवणीचे गहू!!''
त्यानंतर त्यांच्या किचनच्या पोटमाळ्यात लपताना [आमची लाडकी लपण्याची जागा] ते कॉफिन त्या पोटमाळ्यात आरामात पोटात गहू घेऊन विश्रांती घेत बसलेलं दिसे!!
-- अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
प्रतिक्रिया
हा हा हा.
हॅहॅहॅ
रोचक पण
हा हा
झक्कास
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
भन्नाट! माझ
शेवटचा
असतात
:)
किश्शांची मालिका
मस्त
ह.ह.पु.वा....
खुमासदार
+१
मस्तच!!
हा हा हा
भन्नाट किस्सा
अरुंधतीम्
हाहा!
भन्नाट..
व्वा
Ultimate stinginess !!
करतेच!
अरूंधती