दुतोंडी पाकिस्तानी नेते
दुतोंडी पाकिस्तानी नेते
हा लेख दि. ९ मार्च २०१० रोजी 'सकाळ'च्या वेब एडिशनवर प्रसिद्ध झाला असून अद्यापही खाली दिलेल्या दुव्यावर वाचता येईल.
http://72.78.249.124/esakal/20100309/5306183452989196847.htm
----------------------------------------------------------------------------------------------
नुकतीच एक बातमी मी वाचली व मी थक्क झालो! तसा मी मुशर्रफला नेहमीच 'सरडा' म्हणतो व इथेही त्याचा रंग बदलायचा गुण दिसून आला. http://www.zeenews.com/News607311.html
काश्मीरमधल्या अतिरेकी कारवायांचा जनक पाकिस्तानच आहे, तिची सुरुवातही १९८९ मध्ये झाली व बंडखोरीला हवा देण्याचे काम आजही चालू आहे हे पाकिस्तानचे भूतपूर्व हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष ज. मुशर्रफ यांनी मान्य केले. ते 'हाऊस ऑफ लॉर्डस्'च्या एका खोलीत (chamber) 'हाऊस ऑफ लॉर्डस्'च्या कांहीं मुस्लिम सभासदांसमोर 'Leadership' या विषयावर बोलत होते. काश्मिरी मुजाहिदीन टोळ्या २० वर्षांपूर्वी जेव्हा अस्तित्वात आल्या तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पाकिस्तानमध्ये खूप समर्थन मिळत आहे, काश्मीर हेच भारत व पाकिस्तान यांच्यातील तेढीचे मूळ कारण आहे व हा प्रश्न सुटणार नाहीं तोपर्यंत या भागात शांती व वैभव नांदणार नाहीं असे बरेच तारे त्यांनी तोडले. मुशर्रफ सध्या लंडनमध्ये 'अघोषित (गुपचुप) निर्वासित' आहेत.
पण सत्य परिस्थिती ही आहे कीं सैन्यात ते ब्रिगेडियर/मेजरजनरलसारख्या हुद्द्यावर असताना काश्मीरमधील अतिरेक्यांच्या प्रशिक्षणाची केंद्रे उभारून त्याला चालना देणारे प्रमुख नेता होते.
स्वात खोर्यात तालीबानची मजबूत पकड बसली होती तिथे अलीकडे पाक सैन्याने लष्करी कारवाई केली. आपले सैन्य काश्मीरमध्ये करते ते जर 'अत्याचार', तर मग यांनी काय केले? 'लाल मस्जिद'वरील हल्ला करणारे आपल्या तत्सम हल्ल्यावर कुठल्या तोंडाने टीका करतात? वजीरिस्तानमधले रोज एक बॉम्बस्फोट करणारे अतिरेकी स्वातंत्र्यसैनिक आहेत का?
९/११ नंतर या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून तालीबानला हवेवर सोडून दिल्याचे नाटक मुशर्रफ यांनी जरूर केले पण आतून त्यांना ते सामीलच होते असे अनेक वेळा दिसून आले आहे. आजही ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या संरक्षणाखाली पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या भुसभुशीत सीमेवर आश्रयाला आहे असा अनेकांचा अंदाज आहे.
खरे नाहीं वाटत? मग हा दुवा उघडा! http://tinyurl.com/ygnmc2h
इथे तर नवाज शरीफसारखा नेता पाच वेळा ओसामा बिन लादेनला भेटल्याचे वृत्त खालिद ख्वाजा या ISI च्या एका अधिकार्याने ARY News या पाकिस्तानी चित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. नवाज शरीफ यांनी लागलीच या वृत्ताचा इन्कार केला त्याला आव्हान म्हणून या अधिकार्याने म्हटले आहे, “या वृत्ताचा इन्कार करणार्यांना मी आव्हान देतो कीं मी अशा बैठकींबद्दल भक्कम पुरावा सादर करू शकतो व नवाज शरीफ याबाबतीत खोटे बोलणार नाहींत अशी आशा करतो." (ख्वाजा स्वतः ओसामा बिन लादेनला १०० पेक्षा जास्त वेळा भेटले आहेत असेही ते म्हणाले.)
अशा दुतोंडी पाकिस्तानी नेत्यांबरोबार काय डोंबल चर्चा करणार आपण? आपल्या सरकारला व परराष्ट्रमंत्री कृष्णा यांना कधी जाग येणार?
याद्या
1317
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
मी ARY News ला
पाकिस्तानचे अजीर्ण?