II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II
राम राम मिपाकरहो,
देवगंधर्व भास्करबुवा बखले. जयपूर, आग्रा, ग्वाहेर गायकीवर हुकुमत. गाण्यातला साक्षात भास्करच..त्यांची देस रागातली बंदिश.. 'पिया कर धर देखो.. '
सौ शैला दातार. एक गुणी गायिका. योगायोग असा की शैलाताई या भास्करबुवांच्या नातसून.. शैलाताईंनी नमुन्यादाखल गायलेली देस रागातली बंदिश येथे ऐकता येईल.. भास्करबुवांनी छान एकतालात बांधलेली ही बंदिश अगदी प्रसन्न आहे..मुळात देस हा रागच प्रसन्न. त्यात भास्करबुवांची प्रतिभा त्यामुळे बंदिश सुंदरच झाली आहे हे वेगळं सांगायला नको...
या बंदिशीचा भास्करबुवांनी विद्याहरण नाटकाकरता (चूभूद्याघ्या) उपयोग केला आणि पद जन्माला आलं..
'मधुकर वन वन फिरत...'
मध्यंतरीची काळात हा तात्या एका माणसाच्या प्रेमात पडला, त्याचं नांव गोविंदराव पटवर्धन. मग जिथे गोविंदरावांचं वादन असेल तिथे जा, जिथून कुठून त्यांच्या वादनाचं नाटकातलं, खाजगी कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण असेल ते मिळव, गोंविंदरावांना घरी बोलावून घरी असलेल्या पेटीवर त्यांच्याकडून कधी विनंती करून तर कधी हक्काने 'नाथ हा माझा..' सारखी पदं वाजवून घे हे उद्योग सुरू झाले. अखंड शोधाशोध करून, कधी कुणाच्या विनवण्या करून तर कधी कुणाच्या हातापायापडून गोविंदराव, भीमण्णा, वसंतराव, कुमारजी या मंडळींच्या दुर्मिळ ध्वनिमुद्रणाने तात्याचा खजिना समृद्ध झाला. त्याच खजिन्यातलं आमच्या गोविंदरावांनी वाजवलेलं 'मधुकर वन वन..' इथे ऐका..
गाण्यातल्या व्हरायटी म्हणजे काय, जागा म्हणजे काय, पेटी गाते कशी, बोलते कशी, शब्द ऐकू येतात ते कसे, हे समजेल!
आणि आता..
भास्करवांनी बांधलेलं हे पद मराठी संगीत रंगभूमीवर प्रथम कुणी गायलं बरं?
मराठी संगीत रंगभूमीचे सम्राट नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात नारायणराव बालगंधर्व यांनी! भास्करबुवांच्या देस मधल्या इतक्या सुंदर बंदिशीचं सोनं केलं ते त्यांच्याच या बावनकशी शिष्याने, स्वरलयीच्या दुनीयेतल्या एका राजहंसाने! आता नारायणराव बालगंधर्वांबद्दल मज पामराने काही लिहावं अशी माझी पात्रता नाही.. साक्षात मन्सूरअण्णा, भीमण्णा, कुमारजी, भाईकाका यांसारख्या दिग्गजांना नारायणराव बालगंधर्वांवर काय अन् किती बोलावं हे जिथे काही वेळेला उमगेनासं होतं तिथे माझी काय कथा?
एकच सांगेन की या राजहंसाने लडिवाळ स्वरालयीची, गळ्याला कुठेही अटकाव नसलेल्या, कुणालाही हेवा वाटावा अश्या निकोप आकाराच्या तानांची मुक्त उधळण केली आणि त्यात मराठी रसिक तृप्त झाला, मराठी संगीत रंगभूमी धन्य झाली.. भूप, यमन, देस, भीमपलास, बिहाग यांसारखी माणिक-मोती-पाचू आणि रत्न नारायणरावांनी अक्षरश: घराघरात पोहोचवली, मुक्तकंठे वाटली!
इथे ऐका नारायणरावांचं 'मधुकर वन वन..' आणि आपणही तृप्त व्हा, धन्य व्हा!
आपला,
(समृद्ध आणि श्रीमंत) तात्या अभ्यंकर.
वाचने
6499
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
+१
In reply to वा! by क्रान्ति
+१
In reply to वा! by क्रान्ति
फारच गोड
क्रान्ति,
तिन्ही दुवे उत्तम आहेत.
शैला
In reply to तिन्ही दुवे उत्तम आहेत. by प्रमोद देव
लेख आवडला.
क्या बात है!!
गोविंदानं
In reply to क्या बात है!! by चतुरंग
और भी आने दो...!
तात्या,