( उशिराने आलेलं ) शहाणपण.....
रहायला भलं मोठठ घर आहे
झोपायला स्वतंत्र खोली आहे
अंगावर पांघरणारे "बाबा" नाहीत.....
म्हणून झोप मात्र हरवली आहे !
जेवायला रोज चमचमीत मिळते
आतून ढेकर मात्र येत नाही !
शिळ्या पोळी-पिठल्याची चव यावी
म्हणून रात्री एक पोळी उरवली आहे !
कामावर जायला कंपनीची बस आहे
इमर्जान्सीला मोबाईल फोन आहे
सुबत्ताअसूनही मुलं नाखूष का?
गरीबीत पण आमची सोय कशी पुरवली आहे?
या कुशीवर वळतो , बाबा दिसतात
त्या कुशीवर वळतो , आईचे कष्ट दिसतात
उताणी पडलो तर मन मारलेले ताई-दादा दिसतात
आठवांच्या आसवांत रात्र रात्र जिरवली आहे !
सुखांसाठी पैसा लागतो पण.....
नुसत्या पैशाने सुख मिळत नाही !
कष्टाची बी प्रेमाच्या खताने आता मी
समाधानाच्या मातीत जिरवली आहे !.......
-------उदय गंगाधर सप्रे - ठाणे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1435
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
श्री रा रा
श्री रा रा उदयजी सप्रेजीसाहेब
आपली कविता छान आहे.
मात्र अनिवासी सुखी माणसांकडुन मिळणा-या थपडांना तयार रहा. विशेषतः सिंगापुर आणि यक्षनगरीतील भारतमातेचे कर्तृत्ववान सुपुत्र आपल्यावर विशेष रोष दर्शवु शकतात.
धन्यवाद !
--अवलिया
डोळे
डोळे पाणावले ..!