Skip to main content

पूर्व दिशेला अरूण पथावर..

लेखक प्राजु यांनी रविवार, 29/11/2009 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक धिंगाणा डॉट कॉम वर जाऊन आवाज चांदण्यांचे -२ या अल्बम मधली गाणी ऐकायचा मूड झाला. मनात आलं आणि मी चालू केली गाणी. ऐकता ऐकता, पूर्व दिशेला अरूण पथावर ध्वज सोन्याचा झळकत सुंदर .. पी. सावळाराम यांनी लिहिलेलं , हृदयनाथ मंगेशकरांचा संगित साज ल्यायलेलं , धर्मकन्या या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं.. आणि मन जवळ जवळ २० वर्ष मागे गेलं. नक्की या गाण्यामुळे गेलं की, त्या गाण्याशी जोडलेल्या आठवणींमुळे हे सांगणं खरंच कठीण आहे. आठवणींच्या मळ्याचं एक बरं असतं, वेळी-अवेळी कधीही तिथे जा.. तिथे नेहमीच सुगी असते. दुष्काळ सहसा नसतोच. मग मी तरी त्या आठवणींनी तरारलेल्या त्या पिकावर झुलून आले नसते तरंच नवल. कालच यशोचा लेख वाचला.. तेव्हाही आजी-आजोबांच्या आठवणींनी मनात काहूर माजलं होतं.. आणि आज हे गाणं! आलं की सगळं एकदमच येतं म्हणतात न तसंच. या गाण्याने कित्येक सकाळी प्रसन्न केल्या आहेत. याच असं नवे सगळ्याच भूपाळ्या. मात्र त्या भूपाळ्यांना संगितासोबतच एका वेगळ्याच वातावरणाची किनार होती. माझ्या तासगावच्या घराची. तिथल्या सकाळच्या धावपळीची. माझ्या त्या घराबद्दल मी आधीही लिहिलेलं आहे. नव्याने काय लिहू? जाग यावी ती घन:श्याम सुंदरा किंवा पूर्व दिशेला अरूण पथावर या गण्याच्या मंजुळ स्वरांनी. तसंच आळोखे पिळोखे देत गादीवर उठून बसावं, अर्धवट झोपाळलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहावं. सकाळी आलेलं पाणी भरण्याची घाई चालू असावी. माजघरात कोणीतरी चहा करत असावं, आजोबांची बंब पेटवण्याची तयारी चालू असावी. कोणीतरी ताई गाद्या अंथरूणं पांघरूणं काढण्याच्या तयारीत असावी. आणि चादरींचे, बेडशीट्सच्या घड्या करताना झटकल्यामुळे येणारे फ़डाक फ़डाक आवाज ऐककडे चालू असवेत. शेजारची गादी उचलल्यावर त्या काळ्याभोर शहाबादी फ़रशीवर कौलातून थेट एखादा चुकार कोवळा किरण पडावा आणि पौर्णिमेच्या रात्रीला दिसणार्‍या पूर्ण चंद्राप्रमाणे तो कवडसा त्या फ़रशीवर उठून दिसावा. त्या किरणाला न्याहाळत वरती कौलापर्यन्त नजर जावी आणि त्या कवडश्यामध्ये हजारो कण पाठशीव खेळताना दिसावेत. धुलीचे कण, कापडाचे धागे, कापसाची तुसं, आजोबांच्या बंबातला धूर.... आणि मग उगाचच फ़ुंकर घालून त्यांचा खेळ बिघडवावा.. आणि या सर्वाला मनापासून साथ करत असावा तो भोका-भोकाच्या कव्हर मध्ये असलेला रेडिओ. सांगली आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकवत आजोबांच्या दिवाणाजवळ असलेल्या कोनाड्यात बसलेला. नक्की कशामुळे काय प्रसन्न हे सांगणं खरच कठीण आहे!! उठून अंगणात यावं. लख्ख सारवलेलं अंगण आणि त्यावर वेलीवरून ओघळलेल्या जाईच्या फ़ुलांनी सुप्रभात म्हणत स्वागत करावं. पूर्वदिशेला अरूणपथावर... खरंच 'अरूणपथ'.. किती सुंदर शब्द आहे हा! आज विचार करताना लक्षात यतं तेव्हाची सकाळ खरंच सोन्याचा ध्वज झळकवणारी होती. ती किरणं कोवळी होती.. तो साज कोवळा होता, ते सूर कोमल होते. अगदी कोमल...! अगदी आजीच्या सुरकुतलेल्या हातांसारखे कोमल, अंगणातल्या पारिजातकाखालच्या त्या मातीसारखे मृदू, आणि भरपूर आलं घालून केलेल्या त्या ताज्या दूधाच्या चहासारखे तजेलदार! सकाळचं ते देखणं रूप, पाण्याच्या कळशांचा किणकिणणारा मंजुळ आवाज, आजोबांच्या बंबाचा "व्ह्हॉऽऽऽऽ" असा त्या बंबातली उब दाखवणारा आवाज आणि या सगळ्या आवाजात "पंख उभारुनी उडती गगनी सात सुरांनी उजळे अंबर.." गाणारा आशाताईंचा अद्वितिय स्वर..! प्रभू अजी गमला, मनी तोषला..! दुसरं काय? आन्हिकं आटोपून माजघरातल्या पाटावर जाऊन बसावं आणि वाफ़ाळणारा तो चहा , त्यात कासिमचाचाच्या बेकरीमधली खारी बुडवून खावी.. चहात बुडलेल्या खुसखुशीत खारीचा किंचीत मऊ झालेला गरम गरम घास घशाखाली उतरावा आणि आजीच्या देवपूजेची घंटी वाजावी. पाठोपाठ, हरी ओम हिरण्यावर्णाम हरिणिम सुवर्ण रजतस्रजाम.. हे श्रीसूक्ताचे बोलही ऐकू यावेत.. आणि मग "फुले वेचली भरून ओंजळी गुंफिन प्रभूला माळ मनोहर".. याची प्रचिती यावी. मी जगले ते दिवस सुवर्णाचे होते की, ते मनांत कोरले गेले आहेत म्हणून असं वाटतं आहे याची कल्पना नाही. काळाच्या ओघात सगळं मागं पडत जातं असं म्हणतात. सकाळ आजही प्रसन्न असते, मात्र तिला कोणत्याही आवाजाची किनार नसते. आजही अरूणपथ हा पूर्वेलाच आहे, सोन्याचा ध्वज झळकवणारी ती किरणंही तितकीच कोमल आहेत, मात्र ती कोमलता कोरडी आहे. तिच्या जोडीला ना कुणाच्या हातावरच्या सुरकुत्या आहेत ना पारिजातकाखालची मृदू माती. विचार करता करता या एका गाण्यानंतर पुढची ८ गाणी कधी वाजून गेली हे कळलंच नाही. गाण्यांचा आवाज थांबला आणि भानावर आले तेव्हा पापण्यांचे काठ ओले होते. आत्ताही असं वाटतं आहे, की अचानक धपकन झोपेतून जाग येईल, आणि जे काही आजूबाजूला आहे ते आत्ताचं माझं जग म्हणजे एक विचित्र स्वप्नं असेल. मी जागी होऊन डोळे चोळत "पर्णांमधुनी किरण कोवळे चिलापिलांचे उघडी डोळे" हे ऐकत ऐकत, त्या कौलारातून पडणार्‍या चुकार कवडश्यातल्या कणांवर फ़ुंकर घालून उठेन आणि अंगणात जाईन... तो अरूणपथवरचा सुवर्ण ध्वज पाहण्यासाठी ! - प्राजु
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3935
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

छान, सुंदर स्फुट. असे बरेचदा होते. कुठलेसे गाणे असे कुठेतरी मागे, भूतकाळात घेऊन जाते..प्रश्न गाण्याचा नसतो तर, त्या गाण्याबरोबर जुळल्या गेलेल्या काही आठवणींचा असतो.. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गाणे ऐकताना एकदम ४० वर्षे मागे गेलो. पाटीवी (पार्ले) पाचवी ते सातवी च्या पर्वात सकाळी आपण म्हणालात ती दोन्ही गाणी शाळा सुरू व्हायच्या आधी लागायची. पुन्हा, छान प्रकटन - चंबा

सुरेख प्रकटन.. जर आपल्याला ही आपल्या मनाला सारख भुतकाळात/भविष्यात फिरता आल असतर किती वर झालं असत आसा विचर नेहमी येतो. शाळेत जायच्या आधी सकाळी ११:०५ ला आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावर लागणार ते संगीत आजही मला मागे खेचुन नेते. मग ते शेंबड नाक फुरफुरत मामाचा हात पकडुन जाणारा गण्या डोळ्या पुढुन हलत नाही.

In reply to by स्वाती२

हेच म्हणतो, नेहमीप्रमाणेच सुरेख !

काय बोलू प्राजु? नेहमीप्रमाणेच सुंदर. अंमळ नोस्टॅल्जिक करून गेला. बिपिन कार्यकर्ते

मस्त..आवडलं.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

या लेखाबरोबर तुझ तासगावच घर पाहिल.. अशा चिरतरूण आठवणींवरच आपण जगतो.. प्राजु , अशाच काहिश्या आठवणी आपण आपल्या चिमुरड्यांसाठी बनवत असतो.. आपला भूतकाळ जागवताना त्यांना पण असाच सुंदर आठवणींचा खजीना देण्याच काम आपण करायच.. जेंव्हा आपली चिमुरडी मोठी होतील तेंव्हा तीसुद्धा एखाद गाणं गुणगुणत अश्याच आठवणीत रंगुन जातील.. :)

In reply to by लवंगी

प्राजु , अशाच काहिश्या आठवणी आपण आपल्या चिमुरड्यांसाठी बनवत असतो.. आपला भूतकाळ जागवताना त्यांना पण असाच सुंदर आठवणींचा खजीना देण्याच काम आपण करायच.. जेंव्हा आपली चिमुरडी मोठी होतील तेंव्हा तीसुद्धा एखाद गाणं गुणगुणत अश्याच आठवणीत रंगुन जातील.. +++ सहमत अरुण पथावर ऐवजी रथावर आहे असे वाटते आहे

आठवणींच्या मळ्याचं एक बरं असतं, वेळी-अवेळी कधीही तिथे जा.. तिथे नेहमीच सुगी असते ओहो, क्या बात है ! [लेख दुस-या पानावर गेल्यावर प्रतिसाद देणार होतो पण वरील ओळींमुळे दम निघाला नाही] :) -दिलीप बिरुटे

एकेक गाणं असं कुठेतरी आठवणी गुंफून बसलेलं असतं मनाच्या गाभ्यात. सकाळचा बंब त्याचं ऊन ऊन पाणी आणि ते धुराने डोळे चुरचुरणं आठवून हरवून गेलो... चतुरंग

सुरेख प्रकटन... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

मनातून आलेले लेखन आवडलेच. बंब, धुळीचे कण हे सगळे डोळ्यासमोर उभे राहिले.

छान लिहिल आहेस. मीनल.

काळाच्या ओघात या गोष्टी मागे पडल्यात परंतु आपल्या मनात आजही तितक्याच ताज्या आहेत. सुरेख लिहीलेस गं.:)

लेख आवडला. आठवणी सुरेख लिहिल्यात. अवांतर : गाण्याचे शब्द "पूर्व दिशेला अरुण पथावर" असे नसून "पूर्व दिशेला अरुण रथावर" असे आहेत. पूर्व दिशेला अरुण रथावर ध्वज सोन्याचा झळकत सुंदर.

In reply to by मुक्तसुनीत

मला इथे तर पथावर वाचायला मिळालं. कदाचित रथावरच असेल..- प्राजक्ता http://www.praaju.com/

बर्‍याच दिवसानी प्राजू ष्टाईल वाचायला मिळाले :)

केवळ सुरेख आठवणी अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा