Skip to main content

ऐक धरित्रे!!

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 27/11/2009 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक धरित्रे, तव उदरातील गर्भांकुर ते नवे नव्हाळे उमलून येता अंगांगावरी बाहू तुझे गं लेकुरवाळे ग्रीष्माचा गं अफ़ाट वणवा थोडेसे तू सोस उन्हाळे तुझ्याच साठी घेऊन येईन मेघ अनोखे निळे सावळे सचैल घालेन स्नान तुजला बहरून येशिल राजस बाळे ! लेऊन घेशील साज आगळा माणिक, पाचू, मोती पोवळे तृप्त होऊनी, गीत तुझे मग कडेकपारीतूनी झुळझुळे इंद्रधनूच्या झुल्यावरी गं घेशिल हलके तू हिंदोळे आज लेऊनी घे गं तूही सुर्याचे हे लखलख वाळे उद्या पुन्हा मी बरसत येईन पुरवेन आणिक तुझे डोहाळे - प्राजु
लेखनविषय:

वाचने 3324
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

चित्रमय कविता. वाचताना डोळ्या समोर चित्र उमटत गेली. छान , ताजतवानं वाटल.(कविता वाचुन व्हीजुअलाईज करा. बघा आळस जातो कि नाही?) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

कवितेला छान लय आहे. इंदिरा संतांच्या बाभळीवरच्या कवितेची आठवण झाली. लवलव हिरवी गार पालवी काट्यांची वर मोहक जाळी. घमघम करती लोलक पिवळी फांदीतर काळोखी काळी. ----------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

कवितेची मध्यवर्ती कल्पना खूपच आवडली. ऐक धरित्रे, तुझ्या उरातील- "उरात" च्या ऐवजी दुसरा समर्पक शब्द योग्य वाटला असता. सगळ्यात चांगले कडवे- आज लेऊनी घे गं तूही सुर्याचे हे लखलख वाळे उद्या पुन्हा मी बरसत येईन पुरवेन आणिक तुझे डोहाळे

कविता सुंदर. प्रसन्न करून गेली. क्रांतिताईशी सहमत. बिपिन कार्यकर्ते

>>बाहू तुझे गं लेकुरवाळे हा शब्दप्रयोग फारच वेगळा वाटला- अर्थातच छान! (विडंबनाला सुरुवात केली आहे)

छान.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!