विनोदी स्तंभ लेखन
थाप
आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की आपली फजिती करून घ्यायची नसेल तर काही तरी शक्कल लढवून वेळ मारून न्यावी लागते. त्यावेळी सत्य-असत्य, खरे-खोटे याची तात्विक चर्चा करायला उसंत नसते. सत्य नेहमीच बोलले पाहिजे अशी अट घालून जीवन जगता येत नाही. शेळीचे दूध व सहा मनुकांवर सर्वांना आयुष्य कंठता येत नाही. गैरसोईच्या सत्याला अक्कल चालवून खरे करण्याच्या कलेला "थाप" असा सोईचा शब्द आहे.
जीवनात पहिली थाप साधारणपणे 'उशीर का झाला ?' या यक्षप्रश्नाच्या उत्तरातून प्रसव पावते. सुरवातीला प्रसव वेदना होतात. पण मग शाळा-कॉलेजात नंतर ऑफिसात वरचेवर घडणार्या पेचप्रसंगातून सराव होतो. पटाईतपणा येतो.
किरकोळ थापांपर्यंत ठीक कारण त्याचे फारसे कोणी मनावर घेत नाही. पण लफडी करणार्यांना थापांचे वरदान लागते. कॉलेजात पोरींवरून, ऑफिसात प्रमोशनसाठी तर सार्वजनिक कार्यात खोट्या प्रतिष्ठेपायी थापांना ऊत येतो.
काहींना आपल्या खर्या गोष्टी देखील थापा असाव्यात असे ऐकणार्याला वाटून नये म्हणून, 'आई शप्पत', 'आप बिलीव्ह नहीं करोगे', 'मैं झूट नही बोलता हूँ' अशी पुस्ती वारंवार जोडावी लागते.
फुशारकी थापेची नातलग. नसलेले गुण, पात्रता व हिम्मत फुशारकीला लागतात. शिकारी, लष्करातील शिपाईगडी यांना तिच्याविना राहवत नाही.
स्त्रीवर्गाला आपले वय आणि वजन सांगताना अभावितपणे थाप मारावी लागते. तेवढे सोडून बाकी गोष्टी फूगवून सांगण्यात त्यांना जे समाधान मिळते त्यामुळे त्या थापांना पुरूषवर्ग थाप मानतच नाहीत.
हास्यरस निर्मितीला अतिशयोक्ती हा गुण मानला तरी त्या थापाच असतात. आचार्य अत्र्यांनी साष्टांग नमस्कार नाटकात हा रस रावबहाद्दुरांच्या तोंडीच्या संवादात असा घातला आहे. 'रामदास स्वामींच्या हजारोंच्या संख्येने काढलेल्या दंड-बैठकांमुळे शिवथर घळीत पुरूषभर मोठा खड्डा पडला आहे. पण ते काहीच नाही. पुढे ते फुगवून म्हणतात,
"आम्ही देखील काही कमी नाही. बसल्या बैठकीला आम्ही हजार-हजार साष्टांग नमस्कार घालतो. अगदी आगगाडीच्या प्रवासात देखील. आहात कुठे महाराजा? पण मनातल्या मनात !"
आता कै. प्रल्हाद केशव अत्र्यांसारखा नाटककार गेल्या 5000 वर्षात झाला नाही म्हणून त्यांना सगळेच शोभून दिसते.
******
शब्द संख्या 280
वाचने
5247
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
आयुष्यात
मस्त!
गुड वन!! -
हा हा हा!
मस्त
मस्त चटपटीत लेख, आवडला!
'आप
हॅ हॅ हॅ
हॅहॅहॅ
आवडला